गोष्ट माकडाची !

Submitted by Yo.Rocks on 2 January, 2013 - 14:18

समोर 'हडसर' किल्ल्याच्या अप्रतिम पायर्‍या बघण्यात दंग झालो होतो.. किल्लेबांधणीचे एक अप्रतिम उदाहरण समोर होते.. एकसंध पाषाण फोडून केलेल्या पायर्‍या अगदी छप्परवजा बोगदयासदृश मार्गातून जाताना वाटत होत्या.. त्याचेच फोटो घेत असताना पोटात भूकेची चळवळ सुरु झाली.. आता नाश्ता बनवायला हवा म्हणून एकीकडे 'डबा ऐसपैस' खेळायला गेलेल्यांची (मायबोलीकर इंद्रा व रोहीत एक मावळा आणि रोहीतचा मित्र) आठवण झाली.. आम्ही (मी व सौ. रॉक्स) दोन डोंगराच्या घळीमध्ये होतो.. अगदीच अरुंद नव्हती.. इथेच आम्ही सोबत आणलेले सॅकसामान ठेवले होते.. त्या डबेवाल्यांची काहीच चाहूल नाही म्हणून हाक देण्यासाठी आम्ही त्या पायर्‍यांनी उजवीकडच्या डोंगरावर जाउ लागलो तोच त्या बोगदासदृश मार्गावर वरतून बर्‍यापैंकी मोठे माकड डोकावताना दिसले.. त्या चिंचोळ्या वाटेतून जाताना ते धोकादायक वाटले.. नि लगेच या बांधकामाचा अंदाज आला.. शत्रुवर हल्ला केला की शत्रूला पळण्यासाठी नो चान्स ! म्हटले आता हा माकड हल्ला करेल की काय म्हणून हटकले नि आम्ही पटकन वरती चढून गेलो.. पण हे डबेवाले काय नजरेस पडले नव्हते.. जोराने हाका दिल्या तेव्हा रोहीतचा मित्र अगदी दुरवर दिसला..

अचानक सौ. रॉक्सला ते माकड नि आमच्या घळीत असणार्‍या सॅकसामानाची आठवण एकाच वेळी झाली.. बस्स.. लगेच आम्ही दोघांनी लगेच खाली धूम ठोकली.. पण निष्फळ.. ते मोठे माकड एव्हाना सॅकवरती विराजमान झाले होते.. नि हातात प्लॅस्टीकची पिशवी होती.. ज्यात आम्ही आणलेल्या गॅस स्टोव्हचा बर्नर होता.. बाकी माझी, रोहीत एक मावळा आणि सौ. रॉक्स अशा आमच्या तीघांच्या सॅक होत्या.. झाले आम्ही बसलो बोंबलत... हटकले तर त्या माकडाने तोंडातले सुळके दाखवून सगळे सामान आपलेच असल्याचे भासवू लागला ! जल्ला आमच्यावरच दादागिरी करू लागला.. ! ज्याम डेंजर वाटत होते..

आम्हीपण मग थोडे आक्रमक होउन दगड हातात घेतले ! पण त्याची मुद्रा बघून फेकण्याचे वा मारण्याचे धाडस होत नव्हते.. उगीच चवताळून अंगावर यायचा.. शेवटी आजुबाजूला दगड आपटून बघितले नि ते माकड थोडे कचरले ! तो फायदा उठवून आम्ही पुन्हा मोठे दगड घेउन आमच्या समोरच आपटत पुढे गेलो.. ते माकड एकटेच होते सो सॅक घेउन पळायचे की नाही या संभ्रमात अडकलेला.. साहाजिकच त्याने हातातली प्लॅस्टीकची पिशवी तिकडेच ठेवून मागे हटला.. म्हणजे त्याचीसुद्धा हल्ला करण्याची मनस्थिती नव्हती.. पण आम्ही सॅकजवळ पोचणार तोच त्याने पुन्हा आक्रमक भावमुद्रा धारण केल्या.. मला तर अगदी बालपणीचा रुमाल पळवण्याचा खेळ आठवला.. इथे मधोमध फक्त सॅक होत्या !

आमच्या सौ. बाकीच्यांना हाका मारत होती पण घळीतून वरती हाक पोचणे अशक्य.. 'जल्ला डबा टाकण्यासाठी कुठे तडमडायला गेलेत' इति माझ्या मनातल्या मनात... माकड काही केल्या हटेना.. शेवटी धीराने मोठमोठे दगड जमिनीवर त्याच्यादिशेने आपटत आम्ही सॅकजवळ पोहोचलो.. हुश्श ! पण जिंकलो नव्हतो.. कारण ते माकड थोडेसे म्हणजे फक्त पाच-सात फूट मागे हटले होते नि अजुनही स्वतःचा जबडा दाखवत रागपट्टी देत होता..

जल्ला एकमेकांना हुल देउन घाबरवण्याचा गेम सुरु होता.. इथे 'जो डर गया वो हार गया' हे गणित पटकन ओळखले...तेव्हा हल्ला होईल असे वाटले नाही... पण अंदाज नेहमीच खरे ठरतील कशावरुन.. सो दडपण होतेच... शेवटी घाईघाईत आम्ही सॅक उचलून पाठीवर घेतल्या पण रो.मा ची सॅक कशी उचलणार..दोघांच्या हातात दगड नि आता ती प्लॅस्टीकची पिशवी... मी आमच्यात्या 'डबामंडळीना पुन्हा एक प्रयत्न म्हणून हाक देण्यासाठी थोडा मागे वळालो तर माकडाने लगेच त्या रो.मा च्या सॅककडे पुन्हा मार्गाक्रमण केले.. साहाजिकच त्या सॅकपाशी उभ्या असणार्‍या सौ. रॉक्स किंचाळत माझ्याबाजूने आल्या.. आता माकडाने रो.माची सॅक बळकावली.. ते सॅकला हात लावणार तोच माझा संयम सुटला.. वैतागून अगदी जोरजोरात ओरडत, पाय आपटत, दोन्ही हातातले दगड दाखवत, वाकडे तिकडे नाचत सरळ त्याच्यादिशेने वेगाने चालून गेलो !!! बस्स. आपल्यापेक्षा भारीतला रौद्र अवतार बघून माकड घाबरले नि अगदी धूम ठोकून वीस-तीस फुटांवर जाउन बसले. जो डर गया वो हार गया ! Proud

क्षणाचाही विलंब न लावता सॅक उचलली आणि सौ. ला पुढे करून त्या पायर्‍यांनी वरती पळत जायला सांगितले.. मागून मी.. सारी शक्ती पणाला लावून आम्ही सॅकसकट त्या बोगदासदृश मार्गातून पायर्‍या अत्यंत वेगात चढून गेलो.. हुश्श.. आतापर्यंत ट्रेकमध्ये जराही दम लागला नव्हता पण आता नुसती धाप लागली होती.. ! नाही म्हटले तरी आपल्या लोकांना त्याकाळच्या पायर्‍या ह्या असामान्यच.... आता अगदी मोठ्या मोकळ्या पठारावर आलो पण जल्ला हे डबेवाले मात्र दिसतच नव्हते ! त्यात रो.मा चा मित्र 'सुरेंद्र' दिसला नि त्याला तातडीने जवळ बोलावले.. कारण ते माकडदेखील वरती आलेच.. पण आता मात्र घाबरुन अगदी दुरवर बसलेले.. त्याची झुंड नव्हती हे आमचे नशिब.. नाहीतर सॅकची पर्वा केलीच नसती.. थोड्याचवेळात इंद्रा आला.. हे साहेब तिथेच वरती मग फोटोग्राफी करत बसलेले ! आता आमची संख्या 'चार' झाल्यामुळे माकडाने काहीवेळ आमच्यावर पाळत ठेवून नंतर पुर्णत: शरणागती पत्कारली नि पशार झाले.. आम्ही पुन्हा घळीत उतरु लागलो कारण तिथे पोहे करण्याचा बेत होता... मागून रो. मा पण आला नि त्याला 'पुन्हा डबा टाकायला जाशील तर सॅकसकटच जा' म्हणून दम भरला ! Proud असो, आमच्या सौ. ना आयते तांडवनृत्य पहायला मिळाले होते आणि साहाजिकच ते पुन्हा पुन्हा आठवून हसत बसलो.. ! एक मजेशीर नि तितकाच धोकादायक अनुभव !

खरे तर ही माकडं सर्वत्र आढळतात.. त्यांच्या वाटयाला कधी जाउच नये.. पण तेच जर आपल्या वाटेला आले तर काय पंचाईत होते हे या अनुभवातून कळाले.. आता हे माकड तसे थोडे सौजन्यशील होते म्हणून निभावले.. सॅक मिळवली.. पण हीच घटना जर माकडांसाठी प्रसिद्ध अशा नाशिकच्या ब्रम्हगिरी वा सप्तशृंगीच्या डोंगरावर घडली असती तर 'बाबारे घेउन जा' म्हणत हात जोडून उभा राहिलो असतो..! त्यात ते एकटे होते व आम्ही दोघे होतो म्हणून संख्याबळाचा थोडा फायदा मिळाला नि ते थोडे संभ्रमात पडले असावे....

असो.. समजा असा बाका प्रसंग उद्भवला तर काय करावे म्हणून घरी गेल्यावर नेट धुंडाळले नि फारशी नाही पण काही माहिती मिळाली.. आमच्या गावी अशी माकडं जेव्हा शेतात येतात तेव्हा फटाके लावून त्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न करतात.. मिळालेली काही माहिती :

माकडाची ताकद माणसाच्या ताकदीपेक्षा दुप्पट असते !! चपळाईबद्दल सांगायलाच नको..

मुख्यतः माकडांच्या वाटेला जाउच नये.. विनाकारण त्रास देउ नये.. इजा आपल्यालाच होणार..

जर माकड मोकाट फिरणारे असेल तर चार हात लांबच राहिलेले बरे.. स्वतःजवळ खाद्यपदार्थ, चकाकते दागदागिना वा खेळणे असेल तर त्वरीत लपवा किंवा सोडून द्या किंवा पळ काढा.. माकडं खाद्यपदार्थांच्या वासाला आणि चकाकणार्‍या गोष्टींकडे लगेच आकर्षित होतात आणि हे हिसकावण्यासाठी उत्सुक होतात.. तेव्हा त्यांच्यासमोर अशा वस्तू हाताळणे टाळा..

दुर्दैवाने माकडाने आव्हान दिले तर ते स्विकारु नका.. आक्रमण करु नका.. परिस्थितीचा अंदाज घेउन स्वतःचा बचाव कसा करु शकाल ते पहा.. हटवण्यासाठी वा त्यांना घाबरवण्यासाठी त्यांच्या दिशेने जमिनीवर दगड फेका.. (ही युक्ती मला यावेळी तरी लागू पडली)

कुठल्याही प्रकारे (दात दाखवून वा नजरेला नजर देउन) आव्हान देउ नका..


अजून कोणाकडे माहिती असल्यास शेअर करा.. वेळप्रसंगी नक्कीच उपयोगी पडेल..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>माथेरानला सनसेट पॉइंटवर माझ्यासमोर एका तान्ह्या बाळाच्या तोंडातली दूधाची बाटली माकडाने पळवली होती आणि त्या बाटलीतून आपल्या पिल्लाला पाजायला सुरवात केली होती<<<

खरे आहे. माकडे फार नक्कलखोर असतात. माझ्यासमोर एका लहान बाळाची आई त्याचे डायपर बदलत असताना माकडीणीने ते पळवून आपल्या पिल्लाच्या कुल्ल्यांना बांधलेले मी या डोळ्यांनी बघितले आहे.

' माथेरानचीं माकडं' हा एका स्वतंत्र धाग्याचा [ दोरखंडाचाच, म्हणा ] विषय होऊं शकतो ! मनुष्यस्वभाव व संवयी यांचा तिथल्या माकडांइतका सखोल अभ्यास व जाण जगातील इतर कोणत्याही माकड समुदायाला नसावी. आमच्या बरोबरच्या एका बाईंच्या पर्समधील खाण्याच्या पुडीसाठी एका माकडाने १५ मिनीटं तिचा पाठलाग करत नेमक्या दोन्ही बाजूला खोल घळण असलेल्या रस्त्याच्या भागात आल्यावर बिनधास्त येवून ती पुडी काढून घेतली ; उतरणीच्या झाडावर अगदीं जवळच बसून त्या बाईंकडे मिश्किलपणे बघत तो येथेच्छ त्या पुडीवर ताव मारत होता. आम्ही कांहीही करुं शकत नव्हतो व हें त्याला पाठलाग सुरूं केल्यापासूनच पक्कं माहित होतं !!!

खवटुन्निसा,

>>माझ्यासमोर एका लहान बाळाची आई त्याचे डायपर बदलत असताना माकडीणीने ते पळवून आपल्या
>> पिल्लाच्या कुल्ल्यांना बांधलेले मी या डोळ्यांनी बघितले आहे.

हे तर काहीच नाही. आमच्या ओळखीच्या एक बाई सचिवालयात कामाला असतात. त्यांना विधानसभा अधिवेशनासाठी नागपुरात जावं लागायचं. सोबत अनेक बायका असायच्या म्हणून त्या सगळ्यांची व्यवस्था स्त्री वसतिगृहात होत असे. सगळ्या बायका असल्यामुळे वावरण्यात एक प्रकारचा मोकळेपणा येत असे. म्हणून की काय, काही बायकांनी आपली अंतर्वस्त्रे धुवून सज्ज्यात वाळत टाकली होती. ती सगळी माकडांनी पळवली. शिवाय योग्य रीतीने परिधानही केली!

आता बोला!

आ.न.,
-गा.पै.

घारापुरीला आम्हाला देखील माकडांचा असाच अनुभव आलाय. शीतपेय सर्रास हातातुन पळवतात, उडी मारुन. मी तर ते बघुनच घाबरले होते. माझ्याकडची कोकची बाटली पाहुन एक माकड माझ्याकडे येत आहे हे पाहून मी ती बाटली तिथेच फेकून दिली होती. माकडाने लगेच उचलुन ते गट्टम केले Happy

आमचा रतनगडावरील अनुभव..

इकडे आम्ही सुर्याला कॅमेरात टिपण्यात मश्गुल झालो होतो.पण तिकडे त्या idiots नी(माकडांनी) नी आमच्या राहत्या जागेवर हल्ला केला.त्याच काय झाल.... भाविन अंगावरची शाल ठेवायला गुहेपाशी गेला आणि बघतो तर काय माकडांनी त्याची बॅग ओढत गुहेच्या दरवाजापाशी आणली होती.प्रदिप अणि संदिप ची सॅक आधिच उघडी होती.संदिपने आणलेले सफरचंद आणि ब्रेडचे पुडे आणि प्रदिप ची केळी व चिप्स
त्यांनी कधीच लंपास केली होती.सुर्याला तसाच ताटकळत ठेवत आम्ही सर्व गुहेपाशी आलो.पण ते काय मागे हटायला तयार नव्हते.मी त्यांच्या म्होरक्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला पण तोच आमच्या अंगावर धावुन आला.हिंसेच्या मार्गाने काही साध्य होणार नाही म्हणुन आम्ही शांततेचा मार्ग स्विकारला.बाजीप्रभुंनी जशी खिंड थोपवुन धरली होती.त्याप्रमाणे आम्ही गुहेच्या तोंडापाशी बसुन राहीलो.तो आतमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत होता.पण आम्ही त्याला आत जाऊ दिले नाही.आमच्या नाश्त्याचे त्यानी तीन-तेरा वाजविले होते.भरपुर वेळसुद्धा वाया गेला.मग सर्व सामान पॅक करुन तेथुन आम्ही निघालो.
हेच ते 3 idiots...

हम्म्म.. यो तुझं प्रसंगावधानाचं कौतुक आहे रे..
बाकाच प्रसंग आला होता.. काळजी घे पुढच्या वेळेकरता..
पाचगणीला बहिणीकडे गच्चीतून काळ्या तोंडाची माकडीण यायची आणी जेवणाच्या टेबलावरील पोळ्यांचा डबा उघडून ,संपूर्ण चळतच पळवून न्यायची.. पुढे गच्चीचं दार लावल्यावर खिडकीच्या गजातून तिचं ( तिचंच असावं) पिल्लू आत शिरून तेच काम करायचं. नंतर , माकडीण गच्चीलगतच्या झाडावर बसलेल्या इतर फॅमिली मेंबर्समधे व्यवस्थितपणे पोळीवाटपाचं काम करताना दिसली..
असो
यो.. अर्रे माकडाला ,' जाऊ द्या ना घरी' करून दाखवायचंस नं.. लग्गेच सॅक आपणहून परत दिली असती त्याने.. Light 1 Lol

लेण्याद्रीला माकडाने सहलीसाठी आलेल्या मुलांच्या हातातील कोल्ड्रिन्क हिसकावुन घेतल्याचं पाहिलं होतच.
वरचे अनुभव अजुन ड्यान्जर...

आमचाही माथेरानचा अनुभव असाच आहे. आम्ही दोघे व आमची मुलगी, तसेच हीची बहिण तीचा नवरा व मुलगी असे माथेरानला गेलो होतो. दुपारी हीची बहिण एकटी त्यांच्या रुममध्ये पुस्तक वाचत पडली होती व आम्ही इतर सर्वजण बाहेर बॅडमिंटन खेळत होतो. तर एका माकडाने चक्क माणसासारखे दारावर नॉक केले. मेहुणीला वाटले तीची मुलगीच आली असेल. २ मिनीटांनी तीनी पुस्तकातून डोके बाजुस काढून पाहिले तर ते माकड शांतपणे आत येऊन खुर्चीवर बसले होते. तीची घाबरुन बोबडी वळायची बाकी होती. तेवढ्यात दार उघडून तीची मुलगी आत गेली, तीने माकडाला पाहून जोरदार किंकाळीच फोडली. त्यामुळे कदाचीत घाबरुन का काय ते माकड दारातुन मुलीच्या बाजुने बाहेर निघून गेले.

. वाचताना मजा वाटतीये पण प्रत्यक्षात तुमची कसली तंतरली असेल याची कल्पना आली यो.. खतरा अनुभव.

Pages