समोर 'हडसर' किल्ल्याच्या अप्रतिम पायर्या बघण्यात दंग झालो होतो.. किल्लेबांधणीचे एक अप्रतिम उदाहरण समोर होते.. एकसंध पाषाण फोडून केलेल्या पायर्या अगदी छप्परवजा बोगदयासदृश मार्गातून जाताना वाटत होत्या.. त्याचेच फोटो घेत असताना पोटात भूकेची चळवळ सुरु झाली.. आता नाश्ता बनवायला हवा म्हणून एकीकडे 'डबा ऐसपैस' खेळायला गेलेल्यांची (मायबोलीकर इंद्रा व रोहीत एक मावळा आणि रोहीतचा मित्र) आठवण झाली.. आम्ही (मी व सौ. रॉक्स) दोन डोंगराच्या घळीमध्ये होतो.. अगदीच अरुंद नव्हती.. इथेच आम्ही सोबत आणलेले सॅकसामान ठेवले होते.. त्या डबेवाल्यांची काहीच चाहूल नाही म्हणून हाक देण्यासाठी आम्ही त्या पायर्यांनी उजवीकडच्या डोंगरावर जाउ लागलो तोच त्या बोगदासदृश मार्गावर वरतून बर्यापैंकी मोठे माकड डोकावताना दिसले.. त्या चिंचोळ्या वाटेतून जाताना ते धोकादायक वाटले.. नि लगेच या बांधकामाचा अंदाज आला.. शत्रुवर हल्ला केला की शत्रूला पळण्यासाठी नो चान्स ! म्हटले आता हा माकड हल्ला करेल की काय म्हणून हटकले नि आम्ही पटकन वरती चढून गेलो.. पण हे डबेवाले काय नजरेस पडले नव्हते.. जोराने हाका दिल्या तेव्हा रोहीतचा मित्र अगदी दुरवर दिसला..
अचानक सौ. रॉक्सला ते माकड नि आमच्या घळीत असणार्या सॅकसामानाची आठवण एकाच वेळी झाली.. बस्स.. लगेच आम्ही दोघांनी लगेच खाली धूम ठोकली.. पण निष्फळ.. ते मोठे माकड एव्हाना सॅकवरती विराजमान झाले होते.. नि हातात प्लॅस्टीकची पिशवी होती.. ज्यात आम्ही आणलेल्या गॅस स्टोव्हचा बर्नर होता.. बाकी माझी, रोहीत एक मावळा आणि सौ. रॉक्स अशा आमच्या तीघांच्या सॅक होत्या.. झाले आम्ही बसलो बोंबलत... हटकले तर त्या माकडाने तोंडातले सुळके दाखवून सगळे सामान आपलेच असल्याचे भासवू लागला ! जल्ला आमच्यावरच दादागिरी करू लागला.. ! ज्याम डेंजर वाटत होते..
आम्हीपण मग थोडे आक्रमक होउन दगड हातात घेतले ! पण त्याची मुद्रा बघून फेकण्याचे वा मारण्याचे धाडस होत नव्हते.. उगीच चवताळून अंगावर यायचा.. शेवटी आजुबाजूला दगड आपटून बघितले नि ते माकड थोडे कचरले ! तो फायदा उठवून आम्ही पुन्हा मोठे दगड घेउन आमच्या समोरच आपटत पुढे गेलो.. ते माकड एकटेच होते सो सॅक घेउन पळायचे की नाही या संभ्रमात अडकलेला.. साहाजिकच त्याने हातातली प्लॅस्टीकची पिशवी तिकडेच ठेवून मागे हटला.. म्हणजे त्याचीसुद्धा हल्ला करण्याची मनस्थिती नव्हती.. पण आम्ही सॅकजवळ पोचणार तोच त्याने पुन्हा आक्रमक भावमुद्रा धारण केल्या.. मला तर अगदी बालपणीचा रुमाल पळवण्याचा खेळ आठवला.. इथे मधोमध फक्त सॅक होत्या !
आमच्या सौ. बाकीच्यांना हाका मारत होती पण घळीतून वरती हाक पोचणे अशक्य.. 'जल्ला डबा टाकण्यासाठी कुठे तडमडायला गेलेत' इति माझ्या मनातल्या मनात... माकड काही केल्या हटेना.. शेवटी धीराने मोठमोठे दगड जमिनीवर त्याच्यादिशेने आपटत आम्ही सॅकजवळ पोहोचलो.. हुश्श ! पण जिंकलो नव्हतो.. कारण ते माकड थोडेसे म्हणजे फक्त पाच-सात फूट मागे हटले होते नि अजुनही स्वतःचा जबडा दाखवत रागपट्टी देत होता..
जल्ला एकमेकांना हुल देउन घाबरवण्याचा गेम सुरु होता.. इथे 'जो डर गया वो हार गया' हे गणित पटकन ओळखले...तेव्हा हल्ला होईल असे वाटले नाही... पण अंदाज नेहमीच खरे ठरतील कशावरुन.. सो दडपण होतेच... शेवटी घाईघाईत आम्ही सॅक उचलून पाठीवर घेतल्या पण रो.मा ची सॅक कशी उचलणार..दोघांच्या हातात दगड नि आता ती प्लॅस्टीकची पिशवी... मी आमच्यात्या 'डबामंडळीना पुन्हा एक प्रयत्न म्हणून हाक देण्यासाठी थोडा मागे वळालो तर माकडाने लगेच त्या रो.मा च्या सॅककडे पुन्हा मार्गाक्रमण केले.. साहाजिकच त्या सॅकपाशी उभ्या असणार्या सौ. रॉक्स किंचाळत माझ्याबाजूने आल्या.. आता माकडाने रो.माची सॅक बळकावली.. ते सॅकला हात लावणार तोच माझा संयम सुटला.. वैतागून अगदी जोरजोरात ओरडत, पाय आपटत, दोन्ही हातातले दगड दाखवत, वाकडे तिकडे नाचत सरळ त्याच्यादिशेने वेगाने चालून गेलो !!! बस्स. आपल्यापेक्षा भारीतला रौद्र अवतार बघून माकड घाबरले नि अगदी धूम ठोकून वीस-तीस फुटांवर जाउन बसले. जो डर गया वो हार गया !
क्षणाचाही विलंब न लावता सॅक उचलली आणि सौ. ला पुढे करून त्या पायर्यांनी वरती पळत जायला सांगितले.. मागून मी.. सारी शक्ती पणाला लावून आम्ही सॅकसकट त्या बोगदासदृश मार्गातून पायर्या अत्यंत वेगात चढून गेलो.. हुश्श.. आतापर्यंत ट्रेकमध्ये जराही दम लागला नव्हता पण आता नुसती धाप लागली होती.. ! नाही म्हटले तरी आपल्या लोकांना त्याकाळच्या पायर्या ह्या असामान्यच.... आता अगदी मोठ्या मोकळ्या पठारावर आलो पण जल्ला हे डबेवाले मात्र दिसतच नव्हते ! त्यात रो.मा चा मित्र 'सुरेंद्र' दिसला नि त्याला तातडीने जवळ बोलावले.. कारण ते माकडदेखील वरती आलेच.. पण आता मात्र घाबरुन अगदी दुरवर बसलेले.. त्याची झुंड नव्हती हे आमचे नशिब.. नाहीतर सॅकची पर्वा केलीच नसती.. थोड्याचवेळात इंद्रा आला.. हे साहेब तिथेच वरती मग फोटोग्राफी करत बसलेले ! आता आमची संख्या 'चार' झाल्यामुळे माकडाने काहीवेळ आमच्यावर पाळत ठेवून नंतर पुर्णत: शरणागती पत्कारली नि पशार झाले.. आम्ही पुन्हा घळीत उतरु लागलो कारण तिथे पोहे करण्याचा बेत होता... मागून रो. मा पण आला नि त्याला 'पुन्हा डबा टाकायला जाशील तर सॅकसकटच जा' म्हणून दम भरला ! असो, आमच्या सौ. ना आयते तांडवनृत्य पहायला मिळाले होते आणि साहाजिकच ते पुन्हा पुन्हा आठवून हसत बसलो.. ! एक मजेशीर नि तितकाच धोकादायक अनुभव !
खरे तर ही माकडं सर्वत्र आढळतात.. त्यांच्या वाटयाला कधी जाउच नये.. पण तेच जर आपल्या वाटेला आले तर काय पंचाईत होते हे या अनुभवातून कळाले.. आता हे माकड तसे थोडे सौजन्यशील होते म्हणून निभावले.. सॅक मिळवली.. पण हीच घटना जर माकडांसाठी प्रसिद्ध अशा नाशिकच्या ब्रम्हगिरी वा सप्तशृंगीच्या डोंगरावर घडली असती तर 'बाबारे घेउन जा' म्हणत हात जोडून उभा राहिलो असतो..! त्यात ते एकटे होते व आम्ही दोघे होतो म्हणून संख्याबळाचा थोडा फायदा मिळाला नि ते थोडे संभ्रमात पडले असावे....
असो.. समजा असा बाका प्रसंग उद्भवला तर काय करावे म्हणून घरी गेल्यावर नेट धुंडाळले नि फारशी नाही पण काही माहिती मिळाली.. आमच्या गावी अशी माकडं जेव्हा शेतात येतात तेव्हा फटाके लावून त्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न करतात.. मिळालेली काही माहिती :
माकडाची ताकद माणसाच्या ताकदीपेक्षा दुप्पट असते !! चपळाईबद्दल सांगायलाच नको..
मुख्यतः माकडांच्या वाटेला जाउच नये.. विनाकारण त्रास देउ नये.. इजा आपल्यालाच होणार..
जर माकड मोकाट फिरणारे असेल तर चार हात लांबच राहिलेले बरे.. स्वतःजवळ खाद्यपदार्थ, चकाकते दागदागिना वा खेळणे असेल तर त्वरीत लपवा किंवा सोडून द्या किंवा पळ काढा.. माकडं खाद्यपदार्थांच्या वासाला आणि चकाकणार्या गोष्टींकडे लगेच आकर्षित होतात आणि हे हिसकावण्यासाठी उत्सुक होतात.. तेव्हा त्यांच्यासमोर अशा वस्तू हाताळणे टाळा..
दुर्दैवाने माकडाने आव्हान दिले तर ते स्विकारु नका.. आक्रमण करु नका.. परिस्थितीचा अंदाज घेउन स्वतःचा बचाव कसा करु शकाल ते पहा.. हटवण्यासाठी वा त्यांना घाबरवण्यासाठी त्यांच्या दिशेने जमिनीवर दगड फेका.. (ही युक्ती मला यावेळी तरी लागू पडली)
कुठल्याही प्रकारे (दात दाखवून वा नजरेला नजर देउन) आव्हान देउ नका..
अजून कोणाकडे माहिती असल्यास शेअर करा.. वेळप्रसंगी नक्कीच उपयोगी पडेल..
अरे वा, छानच लिहिलेस
अरे वा, छानच लिहिलेस की........ वाचताना मजा वाटतीये पण प्रत्यक्षात तुमची कसली तंतरली असेल याची कल्पना आली.
एकंदरीत माकडे विचित्रच असतात व वर तू सावधगिरीच्या ज्या सूचना दिल्या आहेस (माकडांपासून कसे सावध रहावे याबाबतीतल्या) त्या अगदी प्रॅक्टिकल व सुयोग्य आहेत.
मागे एकदा आम्ही (मी, शांकली व दोन मुली) वरंधा घाटातून येत असताना कार थांबवून फोटो काढण्यासाठी खाली उतरलो. मुली माकडांना घाबरत असल्याने गाडीतून उतरल्याच नाहीत. मी फोटो काढत होतो व शांकली तिथेच कट्ट्यावर बसली होती. एक माकड तिच्या जवळ आले. शांकली घाबरली नाही पण तिथेच बसून राहिली व मला फोटो काढ म्हणत राहिली - माकड तिच्याजवळ आहे असा. मा़कडाला तिच्या जवळ खायला काही असावे असे वाटून ते तिची ओढणी ओढू लागले - तेव्हा मात्र मी जोरात ओरडत त्या माकडाच्या अंगावर गेल्याचे नाटक केल्यावर ते पळून गेले. पण मुली प्रचंड घाबरुन आईला उठ, उठ म्हणून ओरडत होत्या -गाडीतूनच.
<<<<<परिस्थितीचा अंदाज घेउन स्वतःचा बचाव कसा करु शकाल ते पहा.. >>>> हे अगदी म्हणजे अगदी खरे आहे.... पॅनिक, अॅग्रेसिव्ह न होता परिस्थिती हाताळणे खूप गरजेचे आहे....
माकडांची टोळीच जर समोर असती तुमच्या तर काही खैर नव्हती तुमची - सुदैवाने बचावलात...
माकडाकडून काही इजा झाल्यास (चावा अथवा नखाने ओरखाडणे) रेबीजचे व्हॅक्सीन घेणे अतिशय गरजेचे आहे. सर्व प्रकारचे उष्णरक्तीय प्राणी (वॉर्म ब्लडेड अॅनिमल्स) रेबीजचा प्रसार करु शकतात. असे प्राणी रेबीज या विषाणूंचे नॅचरल रिझर्वॉयअर्स (reservoirs)असू शकतात.
बापरे, भारी आहे अनुभव
बापरे, भारी आहे अनुभव
बाब्बो
बाब्बो
ऐकूनच तेव्हा माझी तंतरली होती
ऐकूनच तेव्हा माझी तंतरली होती कारण महादेव मंदिरा कडे जाताना दोन-चार माकडांच टोळक बघितल होतं. यो ची समयसुचकता कामी आली.
बाबौ... वाचताना तुझं तांडव
बाबौ...
वाचताना तुझं तांडव नृत्य इमॅजिन करुन हसु आलं पण प्रसंग कठीण.
आम्ही या मनोहारी दृश्याला
आम्ही या मनोहारी दृश्याला मुकलो यार...

बाकी ... रतनगडला असा अनुभव घेतलाय
थरारक अनुभव. ते माकड एकटेच
थरारक अनुभव. ते माकड एकटेच होते म्हणून हल्ला केला नाही. पिल्लासकट माकडीण असती तर तिने हल्ला केलाच असता.
थोडाफार दोष आपलाही आहे, पहिल्यांदा कौतूकाने आपण त्यांना खाऊ देत राहिलो आता त्यांना कळलेय, कि थोडा त्रास दिला कि माणसे आपला खाऊ टाकून पळून जातात.
माथेरानला सनसेट पॉइंटवर माझ्यासमोर एका तान्ह्या बाळाच्या तोंडातली दूधाची बाटली माकडाने पळवली होती आणि त्या बाटलीतून आपल्या पिल्लाला पाजायला सुरवात केली होती. माथेरानचे स्थानिक दुकानदार सर्रास बंदूका वापरतात. त्यांच्या दुकानातील वस्तूंना माकड हात लावणार नाही, पण ती वस्तू ( पैसे देऊन ) आपल्या हातात आली तर मात्र लगेच लांबवतील.
त्यांना अजिबात खायला न देणे हाच उपाय आहे. अंगातील शर्ट बटणे काढून पसरवून ठेवला किंवा ओढणी दोन हातावर पसरवून घेतली ( थोडक्यात आपण आहोत त्यापेक्षा मोठे आहोत असे दाखवले ) तर ते थोडे मागे सरतात.
चितमपल्लींनी कुठे काही लिहिल्याचे आठवत नाही. त्यांच्याशी संपर्क साधल्यास ते नक्कीच सल्ला देतील.
माथेरानला एकदा माकड नव्हे
माथेरानला एकदा माकड नव्हे मोठ्या वानराने एका माणसाच्या कानाखाली लगावलेली मी पाहिली आहे. फटका वगैरे काहीनाही थेट व्यवस्थीत कानाखालीच...
आधी काय झाले होते माहित नाही पण त्या माणसाचे सामन बहूदा वानराने घेतले होते.
एकदा लोहगडावर असा प्रसंग आलेला. मोठी लांब काठी शक्यतो जवळ बाळगावी. किंवा चिरकणारा आवाज करणारी पुंगी / शिट्टी. ह्याचा फायदा होतो.
वैतागून अगदी जोरजोरात ओरडत, पाय आपटत, दोन्ही हातातले दगड दाखवत, वाकडे तिकडे नाचत सरळ त्याच्यादिशेने वेगाने चालून गेलो !!!
>>> असेच करावे लागते. आपले शरिराचा आकार अधिक मोठाकरून म्हणजे हात लांब करुन, उंचावुन चाल करुन जायचे. अंदाज घ्यायचा काय होतय कारण माकड प्रतिहल्ला देखील करु शकते. ह्यावेळी हातात काठी, दगड हवेतच.
बाप्रे... कठीणच असतं. माझ्या
बाप्रे... कठीणच असतं.
माझ्या लहानपणी आम्ही राहुरी विद्यापीठात रहात असतांना, वानरांचे टोळके यायचे. त्यावेळेस आईने सांगितले होते माकडांच्या समोर अजिबात डोक्यात हात घालायचा नाही/ म्हणजे डोकं खाजवायचं नाही तसच नाक खाजवुन माकडांना चिडवायचं नाही.
५-६ वर्षांपुर्वी आम्ही घारापुरीला गेलो होतो. तिथेही भर्पुर माकडे आहेत. आणी धीट आहेत.
लेण्यांच्या आवारात एंट्री केल्याबरोबर माकडाच्या पिल्लाने आईची साडी पकडली. आम्ही आरडाओरडा केल्यावर पळालं. तरी चांगल्या प्युअर सिल्कच्या साडीला त्याच्या नखांमुळे छिद्र पडलेच. नंतरही सगळे गोल करुन जेवायला बसलो तेव्हा ते चक्क आमच्या ताटातुन चपात्या पळवत होते. आम्ही काहीही करु शकत नव्हतो. काठी उगारली तर दात विचकायचे ते.
तसच एकदा जळगावला शिकायला असतांना कॉलेजची ट्रीप गेली होती पद्मालयला. परततांना म्हसावद स्टेशनावर थांबलेलो गाडीची वाट बघत. तिथे ओपन प्लॅटफॉर्म होता. तिथेही ४-५ माकडं आली. एक केळेवाला बसलेला त्याच्याकडे सारखी केळं मागायची. नाही दिलं तर विचित्र आवाजात दात विचकायची. वैतागुन त्यांच्यापुढे टोपली ठेवुन तो गेला.
मोठी लांब काठी शक्यतो जवळ
मोठी लांब काठी शक्यतो जवळ बाळगावी. किंवा चिरकणारा आवाज करणारी पुंगी / शिट्टी >> नोटेड !
बापरे !!!!!!!!!
बापरे !!!!!!!!!
बापरे ... थरारक
बापरे ... थरारक अनुभव.
दुर्दैवाने माकडाने आव्हान दिले तर ते स्विकारु नका.. आक्रमण करु नका.. परिस्थितीचा अंदाज घेउन स्वतःचा बचाव कसा करु शकाल ते पहा..>>>+१
माकडा ने हाय हुप हाय हुप हाय
माकडा ने हाय हुप हाय हुप हाय हाय!!!! कराय ला लावले....

मला प्लॅनेट ऑफ एप्स ची आठ्वण
मला प्लॅनेट ऑफ एप्स ची आठ्वण झाली
बाप्रे मानायला हवं तुम्हाला
बाप्रे
मानायला हवं तुम्हाला :O
बापरे ! मोठेच धाडस..
बापरे ! मोठेच धाडस..
काठी वापरणे सोईचे पडते, जी एस
काठी वापरणे सोईचे पडते, जी एस कडे कायम शाखेत वापरतात तो दंड असायचा त्यामुळे माकडांचा असा त्रास झाला नाही.
ट्रेकमध्ये काठी सोबत असली की
ट्रेकमध्ये काठी सोबत असली की माकड, साप (आणि माणूस) वचकून राहतात असं ऐकलंय
जोक्स अपार्ट, काठी हवीच!
काश यात्र्या वेळेवर पोहोचला
काश यात्र्या वेळेवर पोहोचला असता..... आम्हाला यो चं माकडासहीत उडीबाबा पहायला मिळालं असतं
पण यो चांगलं प्रसंगावधान
७-८ वर्षांपूर्वी माझ्या काही
७-८ वर्षांपूर्वी माझ्या काही विद्यार्थी मुली सुटीत औरंगाबादजवळ (किंवा नागपूरजवळ - आठवत नाही) जाऊन आल्या होत्या. परत आल्यावर तेथील हकीकती सांगतांना त्या म्हणाल्या कि गावातील मुली किंवा स्त्रिया एकट्या दुकट्या शौचास झाडीत जात नाही (ते खूप छोटे गाव आहे) कारण तेथील अनेक स्त्रीयांवर माकडांनी .... केला किंवा तसा प्रयत्न केला आहे. तेथील माकडे मोठी आहेत. बरोबर पुरुष असला तरी ते जुमानत नाहीत. ऐकून शहारे आले होते!
यावरुन विवेकानंदांची एक गोष्ट
यावरुन विवेकानंदांची एक गोष्ट आठवली. ते एकदा कुठलाश्या जंगलातुन संध्याकाळी जात होते. तिथे त्यांना काही माकडे दिसली. त्यांनी सहज त्यांना थेडे चणे टाकले. थोड्या वेळात ती माकडे त्यांच्या मागे लागली. विवेकानंद पळु लागले. वाटेत एक माणुस त्यांना काठी घेउन येताना दिसला. त्याने काठी जोरात आपटली त्याबरोबर माकडे घाबरुन पळाली.
पुढे निर्भय होण्याचे (चुकीच्या विचारांना इंधन न पुरवण्याचे) महत्व त्यांनी सांगताना ही गोष्ट ते सांगत.
बापरे
बापरे
यो चं माकडासहीत उडीबाबा
यो चं माकडासहीत उडीबाबा पहायला मिळालं असतं >>
जी एस कडे कायम शाखेत वापरतात तो दंड असायचा >> तो दंड तर सबसे मजबूत ! माझ्याकडे आहे तो.. पण बराच मोठा असल्याने नेणे सोयीस्कर पडत नाही...
आया.. तू तर काय काठीच्या जोरावर कुठेही वेगात चढू शकतोस रे.. पाहिलय
सोबत खोटे दात / अणुकुचीदार
सोबत खोटे दात / अणुकुचीदार कवळी ठीवायची आयडिया कशीये?
आला माकड.. लाव कवळी.. घाबरव..
पिस्तुल वा बंदूकसदृश वस्तू
पिस्तुल वा बंदूकसदृश वस्तू हाती घेऊन नेम धरायचा. बहुसंख्य माकडे बिचकून पळतात.
-गा.पै.
सह्ही अनुभव रे
सह्ही अनुभव रे

यो.. खतरा अनुभव..
यो.. खतरा अनुभव..
मला यातही काळ्या तोंडाची
मला यातही काळ्या तोंडाची जास्त धोकादायक वाटली आहेत. बाकीच्यांचे कांय अनुभव??
यो च्या समोर जर काळ्या तोंडाचा हुप्प्या एकटा असता तर असा ऐकला नसता..
यो च्या समोर जर काळ्या
यो च्या समोर जर काळ्या तोंडाचा हुप्प्या एकटा असता तर असा ऐकला नसता.. >> जल्ला मी पण मग असा कल्ला केला नसता.. चुपचाप भागो आणि काय
त्यांच्या नादी कोण लागेल ! एअरगन हवी मग !
' एका टोप्या विकणार्याच्या
' एका टोप्या विकणार्याच्या सगळ्या टोप्या माकडानी पळवल्या म्हणून वैतागून त्याने स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढून फेकली; सर्व माकडानी मग आपापल्या हातातल्या टोप्या झाडावरून खाली फेकल्या.'

टीप - सावधान ! ही गोष्ट आतां माकडांच्या आया पिल्लाना अगदीं लहानपणींच ऐकवतात व असा मूर्खपणा आपण कधीही करूं नये असं बजावतात.
जल्ला, इतक्या अडवाटेच्या घळीत मी म्हणतो जायचाच कशाला, साधे पोहेच करायला !!
ता.क. -योगेशजी, आपल्याला लई आवडतं तुमचं लिवणं.
Pages