टोमॅटो चटणी

Submitted by नीधप on 12 December, 2012 - 11:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चमचाभर उडीद डाळ, काही थेंब तेल (मी राइस ब्रान वापरले. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही वापरू शकता).
४ छोटे किंवा ३ मोठे टोमॅटो... पिकलेले, लाल झालेले हवेत.
अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
३ हिरव्या मिरच्या
३-४ छोट्या लसूण पाकळ्या
आल्याचा पाव इंचाचा तुकडा
आवडत असल्यास आणि सिझन असल्यास किंचित ओली हळद (ही नसली तरी चालेल)
सैंधव
चिमूटभर साखर

क्रमवार पाककृती: 

टोमॅटोच्या आकारानुसार उभ्या चार किंवा सहा फोडी करा.
कढलं किंवा छोट्या पॅनला तेलाचा हात पुसून घ्या.
गॅसवर चढवणे, तापल्यावर चमचाभर उडीद डाळ खरपूस परतून घेऊन डाळ काढून घ्या.
गॅस बंद करू नका.
त्याच कढल्यात किंवा पॅनमधे जास्तीचे तेल न घालता त्यात टोमॅटोच्या फोडी टाका.
साल खरपूस होऊ द्या. किंचित जळकटली तरी चालेल. सतत परतत रहा.
टोमॅटो पुरेसे परतले गेले की काढून घ्या.
फोडी थोड्या गार झाल्या की परतलेल्या फोडी, खरपूस भाजलेली उडीद डाळ, आले, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीसाठी सैंधव, चिमूटभर साखर, ओल्या हळदीचा बारीकसा तुकडा असे सगळे मिक्सरमधे बारीक एकजीव वाटून घ्या.
चटणी तयार.

ऑऑ आणि इटालियन हर्ब्ज वापरूनही अशी करता येईल असे वाटते. मी केली नाहीये. तुम्ही करून पहा आणि इथे सांगा Happy

वाढणी/प्रमाण: 
डिप म्हणून ५-६ जणांच्या पार्टीला व्यवस्थित पुरेल.
अधिक टिपा: 

ही चटणी अरूंधती कुलकर्णी च्या आंध्रा स्टाइल मु डा खि बरोबर अप्रतिम लागते.
चिप्स, काकड्यांचे तुकडे, बेबी गाजरे, सेलरीचे तुकडे, पिटा ब्रेड यासाठी डिप म्हणूनही उत्तम लागते.
सॅण्डविचमधे हिरव्या चटणीचा कंटाळा आला असेल तर ही लावा.
पोळीच्या रोलमधे पोळीवर सॅलडची पाने पसरून त्यावर ही चटणी पसरून मग त्यावर बॉइल्ड व्हेजीज घालून पॉकेट करून रोल करता येतील. पॅक लंच म्हणून उत्तम.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट + माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे. टोमॅटो हा फार आवडीचा प्रकार नाहीये पण ही चटणी करुन बघावी असं वाटतंय. तांदूळ / ओट्सच्या धिरड्यांशीही छान लागेल बहुतेक.

हो तांदूळ असलेल्या सगळ्या गोंष्टींबरोबर मस्त जाते.
सौदिंडियन वस्तूंबरोबर पण मस्तच. आंबोळ्यांबरोबरही चांगली लागेल बहुतेक.

दक्षिण भारतात खुप मोठ्या प्रमाणात आणि आवडीने खाल्ली जाणारी डिश आहे ही
तरिही चक्क मला आवडते!

मस्त कृती!

फक्त मला एक सांगा, ह्या चटणीची कन्सिस्टन्सी कशी असते? सॉससारखी गुळगुळीत होते, की खोबर्‍याच्या चटणीसारखी होते?

मस्त.
आमच्याकडे दोश्याबरोबर असली चटणी + हिरवी चटणी + पांढरी नारळाची चटणी असते. दोश्यासाठी करताना गोडसरपणासाठी मी साखरेऐवजी मनुका घालते ३-४.
क्वचित कधी यात टॉमॅटोबरोबरच एखादा कांदा पण परतून वेरिएशन करता येतं. यात दाण्याचं कुट घालून पण छान लागते चटणी.
ऑऑ+ इटालियन हर्ब्ज घालून करून बघणार.

ओके नी!
मिक्सरमधे किती फिरवायची ते कळण्यासाठी म्हणून विचारले.
अल्पनाची मनुकांची आयडीया पण मस्त आहे.

हो मनुका मस्त लागतील चिमूटभर साखरेऐवजी.
टोमॅटो संपूर्ण स्मॅश होईतो मिक्सर फिरवायचा. बारीक तुकडे न राह्यलेले बरे

नी, मिरच्या पण लाल घेतल्या तर रंग छान येईल. छान चवही येईल, मला वाटतं न वाटताही हे मिश्रण चांगले लागेल. आता मलाच प्रयोग करायला हवा.
( नी कडून एकाही पाककृतीचा फोटो आलेला आठवत नाही ! असे का ? )

मला चटणीच्या ताजेपणात सुक्या लाल मिरचीच्या स्वादापेक्षा ताज्या हिरव्या मिरचीचा स्वाद आवडतो. त्यामुळे हिरवी मिरची वापरलीये. अनेकदा जिथे सुकी लाल मिरची वापरायची तिथेही मी एखादी सु ला मि कमी करून हि मि ढकलते त्या स्वादासाठी Happy

हि चटणी मस्तच लागते. व्हेरिएशन म्हणून हे असे करता येइल (मी नेहमी करते आणि चट्टामट्टा होते चटणी म्हणजे चांगली लागत असावीच इतरांनाही :फिदी:) नारळ तेलाची फोडणी करायची. उडीद डाळी सोबत, कढीपत्ता, लाल मिरच्या (कधी नंतर लाल तिखट घालते), कांदा परतून मग टो.फोडी परतायच्या. त्यात एखाद चमचा/ चवी नुसार सांबार मसाला घालून परतून भाजी सारखं (पाणी न घालता) शिजू द्यायचं. हे सगळं मिक्सर मधून वाटायचं

कविता, नारळ तेल म्हणजे पॅराशूट खोबरेल का? की खायचं खोबरेल तेल वेगळं वापरतेस तू?

अगं कविताच्या व्हेरिएशनमधे ती होती होईल म्हणून लिहिले >>>हो खरच की. Happy पण असही बघ करुन आवडेल तुला. कधी कधी मी न वाटता भाजी म्हणून पण खपवते Proud

पॅराशूटच्या बाटलीवर खाण्यास योग्य असे लिहिलेले असते ती बाटली बघून घेत जा>>> +१ शुद्ध खोबरेल तेल लिहीलेलं तेल चालेल. ते अ‍ॅडव्हास, हॉट आयुर्वेदिक व्.वालं नाही चालणार

पॅराशूटच्या बाटलीवर खाण्यास योग्य असे लिहिलेले असते ती बाटली बघून घेत जा>>>>> सूर्या ब्रॅ.ण्डचे खायचे खोबरेल तेल मिळते. ते घेतलेले जास्त चांगले. त्यावर "एडिबल ऑइल" छापलेले असते. आजूबाजूला कोणी मल्याळी असतील तर त्यांना विचारा. साऊथच्य अकाही पदार्थांवर खोबरेल तेलाची फोडणी सही लागते.

गनपावडर नसेल तर हमखास ही चटणी मी बर्‍याचदा दोशासाठी अथवा इडलीसाठी करते.

धन्यवाद फॉर रेस्पी.. नक्की करून पाहिन आणि खाईन सुद्धा. Happy
सध्या, तु परवा सांगितलेली पुदिना, लसूण कोथिंबिर वाली चटणी सुरू आहे घरी.. ती संपली की हिच. Happy

अरे हो सांगायचेच राह्यले
या चटणीत मी एकदा पनीरचे तुकडे बुडवून ठेवले होते तासभर.
मग ते तुकडे पॅनला तेलाचा सढळ हात लावून त्यात साँटे केले. जरा खरपूस.
एकदम भारी स्नॅक/ स्टार्टर झालं. चुकूच शकणार नाही किंवा वाईट होणारच नाही असं स्टार्टर Happy
कुठल्याही चटणीतला घट्ट भाग लावून असे पनीर साँटे करता येते.

तर ही चटणी करण्यात आलेली आहे आणि ती अत्यंत सुरेख, उडदाच्या डाळीची छान चवयुक्त, आणि चविष्ट इत्यादी झालेली आहे! Happy
नी, छानच आहे चटणी. पनीरचा प्रयोग लवकरच करण्यात येईल!

Pages