मेकओव्हर

Submitted by राजेंद्र क्षत्रिय on 30 October, 2012 - 14:39

आज नविन ऑफिसचा पहिलाच दिवस होता. नुकतीच रिजनल ऑफीसमधून ब्रान्च ऑफीसला बदली झाली होती. नाही म्हटलं तरी थोडे टेंशन होतेच. नऊ-दहा वर्षे सर्व्हिस झाली होती. बराचसा अनुभव गाठीशी होता. तरी स्वतंत्र ब्रांच सांभाळण्याची पहिलीच वेळ. नविन ऑफीसमध्ये स्वागत झाले, मि. सबनिस सहकाऱ्यांच्या ओळखी करून देत होते.

ऑफिसमध्ये एकुण नऊ सहकारी. त्यात एकच महिला. मिसेस्‌. मृणाल पानसे. असिस्टंट मॅनेजर. बत्तीस- पस्तीशीच्य़ा असाव्यात. गोरापान रंग, मध्यम उंची, सुदृढ बांधा. डोळ्यांवर जाड काड्यांचा चष्मा. केसांना तेल लावून चापून चोपून बांधलेली वेणी. खांदे किंचीत पुढे झुकलेले, जाडी भरडी साडी गुंडाळलेली. कोपरापर्यंत स्लिव्हज्‌ असलेले ब्लाऊज, कपाळावर मोठी टिकली, चेहऱ्यावर उदास भाव, एकुण गबाळे ध्यान असावे असे वाटायचे पण बाईंचा चेहरा कमालीचा तेजस्वी, सुंदर. रेखीव. तपकिरी डोळे, तरतरीत नाक, नाजूक जीवणी, गुलाबी ओठ. सबनीस म्हणाले," मॅड्म, आपले नविन साहेब". त्यांनी किंचीत पुढे झुकून नमस्कार केला. मीही, "नमस्कार" अशी प्रतिक्रिया दिली. सर्वांच्या ओळखी झाल्यावर मी माझ्या केबिनमध्ये गेलो. मागील कामाचा आढावा घ्यायचा होता, पुढील कामाचा दिशा ठरवायची होती. बऱ्याच नविन कल्पना अमंलात आणावयाच्या होत्या. सहकाऱ्यांच्या मदतीनेच ते शक्य होतं. मी कामाला लागलो.

काही जुन्या फाईल्स्‌ चेक करताना प्रत्येक वेळी असि. मॅनेजर या नात्याने मिसेस्‌. मृणाल पानसेंची मदत घ्यावी लागत असे. प्रत्येक वेळी त्या माझ्य़ा केबिन मध्ये येताना, " आंत येऊ का, सर?", असं विचारत असत. " या, प्लीज बी सिटेड", म्ह्टल्यावरही, मी पुन्हा बसायला सांगेपर्यंत तशाच उभ्या राहात.अतिशय कमी बोलणे, मोजकाच प्रतिसाद. म्ह्टलं बाई कमालीच्या विनयशील आणि एटीकेटस्‌वाल्या दिसतात. एकदा म्हटलं, "मॅड्म तुम्ही फार एटीकेटस्‌ वगैरे पाळण्याची गरज नाही. डायरेक्ट येऊन बसत जा ". बाई थोड्या खुलतील असं वाटलं पण त्यांनी अगदीच थंड प्रतिसाद दिला. कमालीचे थंड, अतिआद्याधारक , अतिविनयशील लोकांचाही कधीकधी कंटाळा येतो.

एक जुनी फाईल चेक करताना लक्षात आले कि, कंपनीचे सर्व नियम डावलून काही क्लायंटस्‌ना काही विशिष्ट फॅसिलिटीज्‌ प्रोव्हाइड केल्या होत्या. त्या संबधी बाईंना विचारताच, संबंधित क्लायंटस्‌ हे कंपनीचे सुरूवातीपासूनचे ग्राहक कसे आहेत आणि पुढील काळात ते कंपनीकरीता कसे फायदेशीर ठरतील याचे बाईंनी अस्खलित इंग्रजीमधुन दिलेले क्लॅरीफिकेशन ऐकून मी चाटच पडलो. या बाई तर अत्यंत हुशार दिसतात. पण मग यांचं एकंदरीत वागणं, राहणीमान असं का ? या बाईंचा नेमका काय प्रॉब्लेम आहे हेच कळत नव्हतं.

कोणाच्य़ाही वागण्या- राहण्याचा त्यांच्य़ा विव्द्त्तेशी तसा काही संबंध नसतो. हे खरंय, पण जरा व्यवस्थित राहायला हरकत नसते. मागूनही न मिळणारं नैसर्गिक सौंदर्याचं लेणं लाभलेल्यांनी कमीत कमी त्याची योग्य निगा राखायला तरी हरकत नसावी. हिरा जरी मातीत पाडला तरी त्याचं तेज कमी होत नाही पण तो सोन्याच्या कोंदणात बसवल्यावर त्याचे सौंदर्य निश्चितच वाढतं. हे नाकारता येत नाही.

एकदा सबनिसांना घेऊन काही कामासाठी हेड ऑफिसला गेलो होतो. येतांना बरीच रात्र झाली. सबनिसांना म्हटलं ," उशीर बराच झालाय, आपण आता एखाद्या छानशा हॉटेलमध्ये जेवण करू. आणि मग सावकाश घरी जाऊ ". सबनिसांनी ’हो’ म्हणताच जवळच एका हॉटेलमध्ये गेलो. तीन-तीन पेग रिचवले. जेवणाची ऑर्डर दिली. बाईंबद्दल सबनिस काही बोलतील म्हणून दोन वेळा मुद्दामच त्यांचा विषय काढला. पण बाईंच्या विषयाला पध्द्तशीरपणे बगल देत, पठ्ठा स्वतःबद्दलच बोलत राहिला. पिल्यावर बहुदा माणसे स्वतःबद्दलच जास्त बोलतात. बाईंबद्दलचे अनेक प्रश्न तसेच अनुत्तरीत राहीले.

बोलता बोलता नविन ऑफिस जॉईन करून महिना झाला होता. दिवसातून चार-पाच वेळा मृणाल पानसेंची भेट होतच होती. प्रत्येक वेळी त्यांचा तोच विनय, तोच थंडपणा, तिच उदासी. जसे जसे दिवस जात होते तसे तसे त्यांच्याबद्दलचे माझ्या मनांतले विचार कमी होण्याऎवजी वाढत चालले होते. का या बाई इतक्या ठंडपणे वागत असतील? का एवढ्या डिप्रेस्ड असतील? घरगुती नवरा-बायकोंची भांडणं, आर्थिक अडचण, मुलां-मुलीचा काही गंभीर प्रॉब्लेम असे एक कि अनेक विचार फेर धरून माझ्यासमोर नाचत असत. वास्तविक त्या माझ्या बरोबर ऑफिसमध्ये काम करतात. एवढाच त्यांचा अन माझा संबंध. त्यांच्या विषयी मी इतकी काळजी का करावी? पण बराच प्रयत्न करूनही मला ते विचार बाजुला सारता येत नसत.
कधी कधी वाटायचे कि, बाईंना स्पष्टच एकदा विचारावे. पण तसा योग काही आला नाही.

बदली झाल्यापासून सतत काम आणि काम. त्यामूळे घरात फार काही लक्ष देणं होत नव्हतं. सुधा माझी बायको, काहीशी कंटाळली होती. बरेच दिवस माहेरी देखील जाणं झालं नाही तीचं. म्हटलं, चार-पाच दिवस जाऊन ये आईकडे.

रविवारी पहाटेच झोप चाळवली. बाजुला चाचपडल्यावर लक्षात आले. सुधा माहेरी जाऊन दोन दिवस झाले होते. रात्रीच्या तीन पेगचा अमंल अजून जाणवत होता. म्हटलं तासभर पडावे अजून. नंतर कधी डॊळा लागला कळलेच नाही.

घरी सुधा नव्हती. दूध, ब्रेड वगैरे वस्तू संपल्या होत्या. जवळच असलेल्या मॉलमधून त्या घ्याव्यात म्हणून मॉलच्या पार्कींग मध्ये गाडी लावली. समोर बघतो तर मिसेस्‌. मृणाल पानसे. हो ती मृणालच होती. निळी जिन्स व पांढरा टॉप घातलेली, स्टेप कट केलेले सुंदर केस गालावरून खांद्यापर्यंत रूळत होते. डोळ्यावर ग्रीन शेड असलेला रिमलेस चष्मा, हातात छोटीशी पर्स. एका गाडीला किंचितशी रेलून उभी असलेली मृणाल माझ्याकडेच वघत होती. मी गाडीतून उतरलो तशी ती फॅशन शोमध्ये मॉडेल्स कॅट-वॉक करतात तशी माझ्या दिशेने चालत येऊ लागली. मी जागेवरच थिजून गेलो. जवळ आल्यावर लाडीकपणे म्हणाली, " हॅलो ऽऽ, सर " आणि तिचा गोरापान, लांबसडक बोटे असलेला कोमल हात शेकहॅंड करीता पुढे केला. मी पुढे सरसावून तिचा हात हातात घेतला आणि तेवढ्यात तिच्या पर्स मधला मोबाईल वाजला. ती एकटक माझ्याकडे बघत होती आणि मी तिच्याकडे. कितीतरी वेळ मोबाईलची रिंग वाजतच राहिली. माझा हात सोडून ती फोन रिसिव्ह करेल असे वाटले पण तिचे त्या रिंगकडे लक्षच नव्हते. मीही तसाच थिजून ऊभा होतो. कितीतरी वेळ स्वप्न पूढे सरकतच नव्हते.
मोबाईल माझा वाजत होता. सकाळीच कोणीतरी कडमडणार होतं. आज रविवार होता. पूर्ण आरामाचा दिवस. मी फोन रिसिव्ह करणार नव्हतो, थोडावेळ वाजून रिंग बंद झाल्यावर मी उठलो. संपूर्ण दिवस आळसांत गेला.

सोमवारी सकाळी ऑफिसमध्ये गेलो. सबनिस आपल्या टेबलावर काही फाईल्स्‌ चाळत बसले होते. त्यांच्या पूढेच मृणाल पानसेंची केबिन होती. जाताना सहज उघड्या असलेल्या त्यांच्या केबिनच्या दारातून आत नजर टाकली मात्र आणि मला प्रचंड धक्का बसला. अगदी पन्नास हजार पौंडांचा. उणे तीस अंश तापमानाला जसं शरीर गारठून कडक व्हावे तसा मी काकडून गेलो. सर्व शरीर कडक झाले. समोर खुर्चीवर मृणालबाई बसलेल्या होत्या. लेडीज परफ्युमचा मंद सुगंध केबिनच्या बाहेरपर्यंत दरवळत होता. स्टेपकट केलेले त्यांचे केस फॅनच्या वाऱ्याने उडत होते, कपाळावरची मोठी टिकली गायब झाली होती, गळ्यात जाड मण्याच्या मंगळसूत्राऐवजी छोटीशी सोन्याची नाजूक चेन घातली होती. हातात जाड्या भरड्या बांगड्यांच्या ऎवजी आता एकाच हातात नाजूक असं गोल्डन्‌ घड्याळ घातलेले होते. आयब्रोज छान कोरलेल्या, ओठांना हलकीशी लिपस्टीक, पिंक टॉप, जिन्स घातलेल्या मृणाल पानसे खांदे मागे खेचून आपल्या नैसर्गिक उन्नत उरोजांना अधिकच उभार देत, रिमलेस चश्म्यातून प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे बघत होत्या. जागेवरच थिजलेलो मी आऽ वासून त्यांच्याकडे बघतच राहिलो. कडक झालेली माझी मान वळवून मी सबनिसांकडे बघितले तर ते खाली मान घालून, चष्म्याच्या वरून माझ्याकडे बघत गालांतल्या गालांत हसत होते.

नविन बदलून येणारे साहेब कसे असतील आणि कसे नाही असे वाटून बाईंनी सबनीस आणि सहकाऱ्यांसह हा बनाव केला होता. महिन्याभरांत माझ्या सज्जनपणाची खात्री पटल्यामुळे ही ललना आज आपल्या मूळ रूपात अवतीर्ण झाली होती.

मी मात्र मृणालचा मेकओव्हर पहिल्याच भेटीत केला होता. मनांतल्या मनांत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mast.....

mast.....

छान लिहीलयं. बाईंचे वर्णन मात्र सुरेख केलयं. नैसर्गीक सौंदर्य फार अभावानेच पहायला मिळते. लिहीत रहा पुढे गुलमोहरमध्ये.

काहीच्या काही कथा!

मगाशी मोबाईलवरुन लिहीत असल्याने फार लिहीता आले नाही!
मुळात कथेतील नायिकेचा विचारच पटला नाही. त्यात तिला तिचा 'साहेब' सज्जन आहे याची खात्री पटते पण नायक खरोखर सज्जन आहे का? असा प्रश्न नायकाने पाहिलेल्या प्रश्नावरुन पडला!

असो. पु ले शु!

एक्झॅक्टली.
डल आणि बोरिंग आणि कामापुरतं काम अ‍ॅटिट्यूड ठेवणर्या बाईत बॉसने पर्सनल इंटरेस्ट दाखविला नाही यात त्याच्या स्वभावाच्या सज्जनतेची खात्री पटण्यासारखे काय?
मुद्दाम कुणी प्रोवोक करून , हेतुपुरस्सर शरीरसौष्ठव दाखवत असेल तरिही बॉस सज्जन राहिला तर सज्जन !
Happy

Good Writing Raju Da ...
Though there are fewer lacunas are in writing u can develop it by the time
Here On Maayboli platform some of the IDs are over smart..( harsh in their remarks) so ignore them and keep writing..

परत तेच Sad बाईचे कपडे , इतर जामानिमा आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी होऊ शकणारी छेड्छाड Sad Sad
याचा एकमेकाशी काहीही संबंध नाही असे कीतीही बायकांनी ओरडून सांगितले तरी लोकांच्या ध्यानात येतच नाही.

तरीही , <<मी मात्र मृणालचा मेकओव्हर पहिल्याच भेटीत केला होता. मनांतल्या मनांत.>> हे वाक्य माझ्या विधानाला पुरकच आहे.

कथेचा शेवट फारसा पटला नाही. मेकोव्हरचे कारण दुसरे काहीतरी असायला हवे. कारण तशा बायका पुरुषांच्या वागण्याला महत्व देत नाहीत.