तुम्ही किती व्यवस्थित आहात?

Submitted by फारएण्ड on 9 November, 2012 - 10:15

आजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल.

खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर "अ" असेल तर प्रत्येकी १००० गुण, "ब" असेल तर प्रत्येकी १०० गुण व "क" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा.

प्रश्नावली सोडवण्याआधी: हे पान प्रिंट करा व नीट ठेवून द्या. उद्या याच वेळेस ते पान सापडले नाही तर तुम्ही ही प्रश्नावली सोडवण्याची गरज नाही, फक्त आपला अव्यवस्थितपणा नीट सांभाळा. अधिक माहितीसाठी तुमच्या "अव्यवस्थितपणा सल्लागारा" शी संपर्क करा.

आता प्रश्नावली:

१. लग्न, पूजा किंवा 'एथनिक' कार्यक्रमासाठी तुम्ही निघायच्या तयारीत आहात. झब्बा किंवा त्यातून डोके घालायचा कोणताही शर्ट इस्त्री करून आलेला आहे. त्याची डोके जाण्यासाठी आवश्यक असणारी बटने तुम्ही कधी काढता?
अ. घडी उलगडायच्या सर्वात आधी.
ब. घडी उलगडून त्याची इस्त्री नीट चेक करतो, एखादा चिकटलेला धाग्याचा तुकडा काढून टाकतो व मग बटने काढतो.
क. तो घालताना डोक्यात अडकला की हात वर करून बटने शोधतो.

२. तुमच्या घरात हुकमी चालणारी पेन्स व सगळीकडे सहज दिसणारी एकूण पेन्स याचे गुणोत्तर काय आहे?
अ. शंभरः फोन शेजारी, कॅलेंडर वर व्यवस्थित चालणारी पेन्स नेहमी नीट ठेवलेली असतात. न चालणारी पेन्स लगेच पुन्हा चालू करतो किंवा टाकून देतो.
ब. शून्यः एकही पेन चालत नाही.
क. शून्य ते शंभरः बरीच चालू आहेत पण चालणारे नेमक्या वेळेला सापडत नाही. "पॉश" दिसणार्‍या पेनांमधे रीफिल नसते. मागचे बटन पुश करून चालू/बंद होणारी बॉलपेन्स प्राचीन काळापासून एकाच स्थितीत आहेत - ते बटन कायमचे दाबलेल्या अवस्थेत आहे किंवा खाली/वर कोणत्याही अवस्थेत केले काहीच फरक पडत नाही. टोपणवाली पेन्स व ती टोपणे "लंबी जुदाई" मोड मधे आहेत.

३. तुमच्या किल्ल्या सहसा कोठे असतात?
अ. भिंतीवर एक किल्लीच्याच आकाराचा किल्ली होल्डर आहे, त्यावर. कीचेन च्या रिंगांमधून किल्ल्या बाहेर येऊ पाहात नाहीत ना हे रोज चेक करतो.
ब. एक फॅन्सी बाउल आहे त्यात. कधीकधी इकडेतिकडेही असतात.
क. घरात आल्यावर पहिली जागा दिसेल तेथे, किंवा जेथून किल्ली स्वतःहून खाली पडत नाही अशा कोणत्याही जागी, बाहेर असताना ज्या हातात जड गोष्ट धरलेली आहे त्याबाजूच्या खिशात इतर दहा गोष्टींच्या खाली असतात, व बाहेर काढताना त्यातील किमान दोन गोष्टी खाली पडतात.

४. तुम्ही सेल फोनवर बोलताना ब्लू टूथ कधी कानाला लावता?
अ. ते नेहमी कानावरच असते. आंघोळ करताना शॉवर कॅप त्यावर घालतो.
ब. फोन आल्यावर किंवा करताना 'टॉक' बटन दाबायच्या आधी कानावर लावतो.
क. फोन उचलून १०-१२ वेळा 'हॅलो' म्हणून काहीच ऐकू आले नाही, "च्यायला, सिग्नल नसताना फोन कशाला करतात कोणास ठाऊक" वगैरे करून झाल्यावर मग ब्लू टूथ कनेक्टेड असल्याने फोन मधून काहीच ऐकू येणार नाही हे लक्षात आल्यावर.

५. तुम्ही गाडी केव्हा धुता?
अ. मी दर रविवारी सकाळी साडेसात वाजता (आपोआप, गजर न लावता) उठून बाहेर गाडी धुतो. माझ्या गाडी धुण्याच्या वेळेप्रमाणे आजूबाजूचे लोक घड्याळे लावतात, व पक्षी/खारी वगैरे पाणी प्यायला आधीच जमा होतात.
ब. दर तीन चार महिन्यांनी, गाडी ओळखू येईनाशी होते तेव्हा, किंवा धुळीत "वॉश मी" वगैरे लोक लिहून जातात तेव्हा.
क. दर पावसाळ्यात आपोआप धुतली जाते.

६. तुमचे रिमोट्स कोठे असतात?
अ. टीव्हीच्या कपाटात प्रत्येक रिमोट साठी स्वतंत्र योग्य आकाराचा कप्पा केलेला आहे व त्यावर कोणत्या रिमोटसाठी ते लिहीलेले आहे. वापरून झाल्यावर प्रत्येक रिमोट त्याच्या कप्प्यात ठेवतो. कोचवर बसलेलो असताना आवाज वाढवायचा असेल्/चॅनेल बदलायचे असेल तर उठून रिमोट काढतो, वापरतो व परत ठेवून देतो. दर सहा महिन्यांनी बॅटरी बदलतो व रिमोट परत कप्प्यात ठेवून त्या बॅटरीज इ-वेस्ट सेंटर मधे देऊन येतो.
ब. बहुतेक वेळेस कॉफी टेबलवर. कधीकधी शोधावे लागतात.
क. जो रिमोट हवा आहे तो नेमका कोचाच्या उशांखाली, कोचाच्या खाली, खेळण्यांमधे किंवा "इकडे कोणी ठेवला?" विचारण्यासारख्या अनेक ठिकाणी असतो. शोधायच्या नादात ५-१० मिनीटे सहज जातात. कधीकधी तर तेव्हा सापडतच नाही पण नंतर दुसरे काहीतरी शोधताना सापडतो. त्यावेळेस नको असलेले रिमोट्स अगदी समोर ठेवण्याच्या बाबतीत मात्र मी एकदम टापटीप आहे.

७. तुमच्या मित्रांचे/ओळखीच्यांचे फोन नंबर कसे लक्षात ठेवता?
अ. मला सगळे पाठ आहेत.
ब. मी आजवर आलेला वा केलेला प्रत्येक फोन नंबर माझ्या सेल फोन मधे कॉन्टॅक्ट्स मधे आहे.
क. जेव्हा गरज पडेल तेव्हा आधी मागितल्यावर आलेल्या मेल मधून शोधतो (आधी जीमेल, मग याहूमेल या क्रमाने), अगम्य नावाच्या फाईल्स उघडून त्यात लिहीलेला आहे का पाहतो. पोस्ट-इट नोट्स, बिलांच्या मागच्या बाजू वगैरे ठिकाणांहून मिळवतो. नंबर बरोबर नाव लिहीलेले नसल्यास 'असाच काहीतरी नंबर होता' एवढा आत्मविश्वास आल्याशिवाय तो ट्राय करत नाही.

८. बर्‍याच कारणांनी तुमच्याकडे आलेल्या पावत्यांचे तुम्ही काय करता?
अ. माझ्या नोंदवहीत कोणती पावती किती दिवस ठेवायची याचा चार्ट आहे. रोज रात्री एकदा त्यादिवशीच्या पावत्या त्याप्रमाणे लावतो, व योग्य दिवशी फाडून/श्रेडर मधे घालून टाकतो.
ब. इतर बिलांबरोबर असतात. अधूनमधून फाडतो.
क. पँटच्या मागच्या खिशात "जाणार्‍या पावत्या दिसतात पण येणार्या दिसत नाहीत". पॅण्ट धुवून परत आल्यावर कागदाचे बोळे तेथून खाली पडतात. त्यातील एक दोन कधीकधी उलगडून ते बसचे तिकीट होते, की रेस्टॉरंटची पावती, की सिनेमाचे तिकीट हे शोधण्याचा प्रयत्न करतो. "अरे ही परवा आपण शोधत होतो ती पावती" हा खूप कॉमन संवाद आहे.

९. इतरांच्या तुमच्याकडे किंवा तुमच्या इतरांकडे विसरलेल्या गोष्टी
अ. माझ्याबाबतीत असे कधी होतच नाही. इतरांनी आमच्याकडे येताना बरोबर आणलेल्या गोष्टी आयफोनच्या कीबोर्डच्या दाबलेल्या बटनांप्रमाणे मला इतर गोष्टींच्या मानाने कायम ठळक व मोठ्या दिसतात. विसरण्याचा प्रश्नच नाही.
ब. पुन्हा आठवेल तेव्हा.
क. सहसा ती गोष्ट द्यायला म्हणून जायचे ठरवतो व तीच गोष्ट न्यायची विसरतो. माझ्या विसरलेल्या गोष्टी शिफ्टिंग्/मूव्हिंग करताना वेगळ्या काढून मित्र नेण्यासाठी फोन करतात.

आता उत्तरांची बेरीज करून एकूण गुण पाहा:

गुणः ५००० व जास्तः आपल्या चरणकमलांवर पाणी घालून ते तीर्थ विकायला ठेवा. जोरात खपेल. 'दिल चाह्ता है' मधल्या सुबोधचा रोल तुम्हाला न देता त्या दुसर्‍या कोणाला कसा दिला याची कागदपत्रे काही वर्षांनी खुली होतील तेव्हा आधीच त्यावर पुस्तक लिहा.
गुणः ५०० पेक्षा जास्त पण १००० पेक्षा कमी: तसा प्रॉब्लेम नाही पण दर सहा महिन्यांनी ही प्रश्नावली चेक करा.
गुणः १० पेक्षा कमी: अभिनंदन! तुम्हीही अधूनमधून ही प्रश्नावली चेक करायला हरकत नाही पण तुम्हाला वेळच्या वेळी ही सापडणे अशक्य आहे. तेव्हा नाद सोडून द्या.

(***) ते सर्वेक्षण छापून आणले होते पण लेख लिहीताना सापडले नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा प्रश्न इथे चालेल का माहित नाही...पण इतक्यात माझ्याबरोबर घडलाय Wink
तुम्ही तुमच्या मुलाला कार सीटमधून कसं काढ्ता?

अ. चारीच्या चारी बकलं नीट काढून त्यातून त्याचे हात व्यवस्थित बाहेर काढून तो व्य्वस्थित उतरेल याची सोय करून.
ब. सगळ्या बकलांना निदान ओढल्यासारखे करून मग ती निघतातच पोरगं घाई असल्यामूळे निघतंच.
क. एका बाजुची बकलं काढल्यावर मुलाने आता(तरी) स्वतःचं स्वत| उतरावं अशी अपेक्षा करत्ता आणि ते अर्ध्यात अड्कल्यावर अरेच्च्या दोन्ही बाजुला बकल्स असतात नै का? असं स्वतःच्याच टपरीत मारून ते अर्ध लोंबकळं ध्यान दुसर्या बाजूने सोडवता..

मी खरं कोणे एके काळी निदान ब तरी होते पण ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या आन Proud

कुत्र्यांसाठी सर्विस लिफ्ट्च वापरायची असा नियम असताना, कधीकधी मोह होऊन पीपल लिफ्ट वापरता का? मग अवचित पणे पीपल लिफ्ट थांबली आणि महिला वर्ग आत कुत्रे बघून किंचाळता झाला कि सॉरी म्हणून त्या फ्लोअर वरून पुढे सर्विस लिफ्ट ने जाता?

Rofl अफाट आहे!
प्रश्न क्र. ९ आणि १० पण महान आहेत!

मी ब आणि क गटात, (फक्त किल्ल्यांच्या बाबतीत बहुतेकवेळा अ गटात)
आणि नवरा अर्थातच कायम, बाय डिफॉल्ट अ गटात.

नुकतंच ऑफिसमधल्या ऑडिटच्या निमित्ताने नवर्‍यानं 5-S बद्दल सांगितलं. त्याची पुस्तिका आणून दाखवली. मी त्यातली 'नको असलेल्या वस्तू वेळच्यावेळी फेकून द्याव्यात' - या सूत्राची तेवढी ताबडतोब अंमलबजावणी केली. Proud मजा आली ते करताना Wink

मी माझे सगळे पासवर्डस व्यवस्थित लक्षात रहावेत म्हणून एका एक्स एल मधे कोडवर्ड मधी लिहून ठेवले आहेत. आता ती फाईलही सापडत नाही आणि कोड्स ही आठवत नाहीत.

त्यामुळे मी पण पाऱ अगदी तळागाळातली़ 'क' Lol Lol

राम गणेश गडकरी यांच्या बहुधा प्रेमसंन्यास मध्ये 'विसरभोळा गोकुळ नावाचे विनोदी पात्र आहे. नावावरूनच्या त्याच्या कारनाम्यांची कल्पना आलीच असेल. बायकोने बाजारातून तोळाभर केशर आणि शेरभर साखर आणायला सांगितली तर त्याने शेरभर केशर आणि तोळाभर साखर आणली. बायकोने सांगितलेली कामे लक्षात राहावीत म्हणून तो पआठवणी साठी प्रत्येक कामाला एक अशी उपरण्याला गाठ मारतो पण नन्तर कोणती गाठ कोनत्या कामासाठी आहे हेच विसरून जातो !! Proud

बायकोने बाजारातून तोळाभर केशर आणि शेरभर साखर आणायला सांगितली तर त्याने शेरभर केशर आणि तोळाभर साखर आणली. <<<
एवढा विसरभोळा गोकुळ पण शेरभर केशर आणण्याइतके पैसे कॅश घेऊन फिरे. याचंच मला कौतुक वाटतं... Happy

Biggrin एक नंबर!
>>>गुणः ५०० पेक्षा जास्त पण १००० पेक्षा कमी: तसा प्रॉब्लेम नाही पण दर सहा महिन्यांनी ही प्रश्नावली चेक करा. <<< हे बरीक बरे सांगितले. लगेच काँम्प वरती अ‍ॅड फेव्ह करून ठेवले हे पान, हो विसरायला नको Wink

>>एवढा विसरभोळा गोकुळ पण शेरभर केशर आणण्याइतके पैसे कॅश घेऊन फिरे
Rofl
आजकाल तर दुकानात पण शेरभर केशर ठेवणं परवडत नसेल Wink

Lol फारेंड, अचूक निरीक्षण! शूम्पी, आगाऊची भर भारी! आणि सुमेधाव्हीच्या घरचे महान!
मी रैनाच्या लायनीत इधरकी अ उधरकी क!

प्र.११. तुम्हाला हवा असलेला चष्मा तुम्हाला कुठे सापडतो?
अ. तुम्ही नेहमी जिथे चष्मा ठेवत आला आहात त्याच ठराविक जागी.
ब. टीव्हीवर, फोनजवळ, पेपरखालीवर, फ्रीजवर, मायक्रोवेव्हवर, उशीजवळ.
क. तुम्ही शेवटला तो कधी घातला होतात, पाहिला होतात हे तुम्हाला आठवावे लागते. तरीही सापडत नाही, तुम्ही नाद सोडून देता. दुसर्‍या दिवशी सोफा, बेडखालून झाडू फिरवताना तो लोटांगण घेत बाहेर येतो किंवा आंघोळीच्या वेळेस साबण घेताना शेजारी सापडतो.

प्र. १२. एखाद्या शर्टचे बटन तुटले किंवा तत्सम किरकोळ शिलाईकाम निघाले की तुम्ही ते कधी करता?
अ. तो कपडा जरा वेळ वार्‍यावर ठेवून त्याचा घामट वास गेला की तुम्ही लगेच ते काम उरकून घेता आणि मगच तो धुवायला टाकता किंवा कपाटात ठेवता.
ब. आठवड्याची तयारी करताना.
क. इतर सर्व कपडे परिधान स्पर्धेत बाद होतात आणि हा कपडा एकमेव विजेता ठरतो तेव्हा तुम्ही 'इतके दिवस का नव्हता वापरला कोण जाणे!' म्हणत त्याला इस्त्री करायला घेता. कदाचित घालताही, आणि मग तुम्हाला हे काम राहिल्याचे आठवते.

आजकाल तर दुकानात पण शेरभर केशर ठेवणं परवडत नसेल <<<
असेल तर तिजोरीत ठेवत असतील..
केशर दीड का पावणेदोन लाख रूपये किलो आहे.. Happy

धमाल लेख अन प्रतिसाद Lol

बरं अजून एक प्रश्न: तुमचं क्रेडिट कार्ड कुठे ठेवता?
अ. पैशाच्या पाकीटात/पर्समध्ये कार्ड ठेवायच्या कप्प्यात.
ब. कधी पाकीटात्/पर्समध्ये तर कधी जीन्सच्या खिशात. कधी दुसरी/नवी पर्स घेतली किंवा चुकून दुसरी जीन्स घातली तर पहिल्यातच विसरले असते. तेवढंच त्यादिवशी पैसे वाचतात या दिलाशामुळे ही सवय सुधारत नाही.
क. मागच्या वेळेस वापरले तेव्हा कुठे ठेवले असावे याचा विचार केला जातो. बहुतेक कारमध्ये पेट्रोल भरताना वापरले होते असं आठव्ल्यामुळे लगेच ८ मजले खाली जाऊन रात्री १२ वाजता कार शोधण्यात येते. तिथेही सापडले नाही की पेट्रोलपंपावरच राहिले असावे म्हणून कार्ड ब्लॉक करुन झोपी जाण्याशिवाय पर्याय नसतो. दुसर्‍या दिवशी पेट्रोलपंपावर ते सापडत नाहीच. मग पुढचा आठवडा नवीन कार्डाचे अप्लिकेशन करण्यात जातो. एके दिवशी स्वयंपाकाच्या मावशी फ्रीजर मधून पनीर काढताना बर्फ कशानेतरी खरवडताना दिसतात. जवळ जाऊन बघता "हेच्च ते कार्ड, तरी मी म्हणत होतो घरातच असणार कुठेतरी" वगैरे डायलॉग्ज होतात. महत्प्रयासाने ते तिथे कसे पोचले यावर विचार करता आठवते की पेट्रोल भरुन कार्ड बाजुच्या सीटवर ठेवले होते. शिवाय येताना घेतलेले पनीर अन आइसक्रीमही तिथेच ठेवले होते. त्यामुळे पनीर अन आइसक्रीम बरोबर कार्डाची रवानगीसुद्धा "घरच्यांनी" फ्रीजरमध्ये केली असणार..अशाप्रकारे "घरचे सगळे क पण मी मात्र अ च बरं का" असं ठासुन सांगितल्या जातं. Lol

इथे क प्रकार करणारा माझा नवरा आहे, मी नव्हे. मी "ब" आहे. Wink

अरे हे इतकं अभ्यासपूर्ण लिखाण असं कसं मिसलं. कदाचित क गटात असावी मी. Happy अगदी खो खो हसले आज.

पण खरंच मी अ-ब-क वर्गांमधे मन मानेल तसा संचार करते. पण नवरा त्याच्या स्वतःच्या सगळ्या वस्तुंबाबत अगदी अ गटात. माझ्या सासर्-माहेरचे लोक पण माझ्यासारखेच वेळ पाहुन अ-ब-क करणारे आहेत. त्यामुळे एखाद्या दिवशी नवर्‍याची वस्तु नाही सापडली तर तो एकटाच स्वतःवरच चिडत बसतो. असा एखादा लेख, घरगुती स्वच्छता, नीटनेटकेपणाबद्दल लेख असं काही वाचलं की स्फुरण चढतं आणि एकदम आमची सफाई मोहीम निघते. आणि मी काही लिमिटेट टाईमसाठी ब मधुन अ मधे जाते. परत मग ये रे माझ्या मागल्या.
पसरलेलं घर कसं हसरं दिसतं ना!! एखाद्या मातीत खेळणार्‍या गोंडस बाळाप्रमाणे. Happy
कुणाची अतिस्वच्छ घरं पाहिली की पुलंच ते चौकोनी कुटुंब आठवतं - चार साबणाच्या वड्या. Happy

नी - प्लॅस्टिक पिशव्यांबाबत मी तुझ्याबरोबर आहे. ही माझी फार लहानपणापासूनची सवय आहे. ४ बहिणींमधे आईच्या साड्यांच्या कॅरी बॅगेवरून वाटणावाटणी व्हायची. बंद असलेल्या बॅगेला जास्त मागणी. मग ती बॅग जपून वापरणं आणि नीट ठेवणं ही सवयच लागलीये. Happy

नताशा: मी डेबिट कार्ड ३ वेळा वॉशर ड्रायर मधून काढलय.. वाकडं झालं तरीही चालतं नंतर
शेवटी एकदा (भारतात (कायम करता म्हणून) परतायच्या आदल्या दिवशी) ते चुकून ट्रॅश कॉम्पॅक्टर मधे टाकलं.. आता ते तिथून निघणं अशक्य आहे म्हटल्यावर कँसल करणं, नवीन कार्ड दुसर्‍यांच्या पत्त्यांवर मागवणं वगैरे सगळी धावपळ झालीच Uhoh

ते ठेवताना लक्षात याSSयSSचंSSच नाही - काय करणार Sad

.

क्रे का, डे का इत्यादी बाबतीत मी अ वर्गात आहे. यातल्या ब आणि क पणाचे दुष्परीणाम सोसण्याइतकी माझ्या खिशाची ताकद नाही. नवरा पण माझ्याच वर्गातला या बाबतीत. Happy

पेन ड्राइव्ह वॉशिंग मशीन मधे धुवायला टाकणे जीन्सच्या खिशातून हे मात्र माझ्या नवर्‍याने केलेले आहे. एकदा नव्हे तर दोनदा. व्हॉट अ कन्सिस्टन्सी!! Wink

Pages