तुम्ही किती व्यवस्थित आहात?

Submitted by फारएण्ड on 9 November, 2012 - 10:15

आजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल.

खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर "अ" असेल तर प्रत्येकी १००० गुण, "ब" असेल तर प्रत्येकी १०० गुण व "क" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा.

प्रश्नावली सोडवण्याआधी: हे पान प्रिंट करा व नीट ठेवून द्या. उद्या याच वेळेस ते पान सापडले नाही तर तुम्ही ही प्रश्नावली सोडवण्याची गरज नाही, फक्त आपला अव्यवस्थितपणा नीट सांभाळा. अधिक माहितीसाठी तुमच्या "अव्यवस्थितपणा सल्लागारा" शी संपर्क करा.

आता प्रश्नावली:

१. लग्न, पूजा किंवा 'एथनिक' कार्यक्रमासाठी तुम्ही निघायच्या तयारीत आहात. झब्बा किंवा त्यातून डोके घालायचा कोणताही शर्ट इस्त्री करून आलेला आहे. त्याची डोके जाण्यासाठी आवश्यक असणारी बटने तुम्ही कधी काढता?
अ. घडी उलगडायच्या सर्वात आधी.
ब. घडी उलगडून त्याची इस्त्री नीट चेक करतो, एखादा चिकटलेला धाग्याचा तुकडा काढून टाकतो व मग बटने काढतो.
क. तो घालताना डोक्यात अडकला की हात वर करून बटने शोधतो.

२. तुमच्या घरात हुकमी चालणारी पेन्स व सगळीकडे सहज दिसणारी एकूण पेन्स याचे गुणोत्तर काय आहे?
अ. शंभरः फोन शेजारी, कॅलेंडर वर व्यवस्थित चालणारी पेन्स नेहमी नीट ठेवलेली असतात. न चालणारी पेन्स लगेच पुन्हा चालू करतो किंवा टाकून देतो.
ब. शून्यः एकही पेन चालत नाही.
क. शून्य ते शंभरः बरीच चालू आहेत पण चालणारे नेमक्या वेळेला सापडत नाही. "पॉश" दिसणार्‍या पेनांमधे रीफिल नसते. मागचे बटन पुश करून चालू/बंद होणारी बॉलपेन्स प्राचीन काळापासून एकाच स्थितीत आहेत - ते बटन कायमचे दाबलेल्या अवस्थेत आहे किंवा खाली/वर कोणत्याही अवस्थेत केले काहीच फरक पडत नाही. टोपणवाली पेन्स व ती टोपणे "लंबी जुदाई" मोड मधे आहेत.

३. तुमच्या किल्ल्या सहसा कोठे असतात?
अ. भिंतीवर एक किल्लीच्याच आकाराचा किल्ली होल्डर आहे, त्यावर. कीचेन च्या रिंगांमधून किल्ल्या बाहेर येऊ पाहात नाहीत ना हे रोज चेक करतो.
ब. एक फॅन्सी बाउल आहे त्यात. कधीकधी इकडेतिकडेही असतात.
क. घरात आल्यावर पहिली जागा दिसेल तेथे, किंवा जेथून किल्ली स्वतःहून खाली पडत नाही अशा कोणत्याही जागी, बाहेर असताना ज्या हातात जड गोष्ट धरलेली आहे त्याबाजूच्या खिशात इतर दहा गोष्टींच्या खाली असतात, व बाहेर काढताना त्यातील किमान दोन गोष्टी खाली पडतात.

४. तुम्ही सेल फोनवर बोलताना ब्लू टूथ कधी कानाला लावता?
अ. ते नेहमी कानावरच असते. आंघोळ करताना शॉवर कॅप त्यावर घालतो.
ब. फोन आल्यावर किंवा करताना 'टॉक' बटन दाबायच्या आधी कानावर लावतो.
क. फोन उचलून १०-१२ वेळा 'हॅलो' म्हणून काहीच ऐकू आले नाही, "च्यायला, सिग्नल नसताना फोन कशाला करतात कोणास ठाऊक" वगैरे करून झाल्यावर मग ब्लू टूथ कनेक्टेड असल्याने फोन मधून काहीच ऐकू येणार नाही हे लक्षात आल्यावर.

५. तुम्ही गाडी केव्हा धुता?
अ. मी दर रविवारी सकाळी साडेसात वाजता (आपोआप, गजर न लावता) उठून बाहेर गाडी धुतो. माझ्या गाडी धुण्याच्या वेळेप्रमाणे आजूबाजूचे लोक घड्याळे लावतात, व पक्षी/खारी वगैरे पाणी प्यायला आधीच जमा होतात.
ब. दर तीन चार महिन्यांनी, गाडी ओळखू येईनाशी होते तेव्हा, किंवा धुळीत "वॉश मी" वगैरे लोक लिहून जातात तेव्हा.
क. दर पावसाळ्यात आपोआप धुतली जाते.

६. तुमचे रिमोट्स कोठे असतात?
अ. टीव्हीच्या कपाटात प्रत्येक रिमोट साठी स्वतंत्र योग्य आकाराचा कप्पा केलेला आहे व त्यावर कोणत्या रिमोटसाठी ते लिहीलेले आहे. वापरून झाल्यावर प्रत्येक रिमोट त्याच्या कप्प्यात ठेवतो. कोचवर बसलेलो असताना आवाज वाढवायचा असेल्/चॅनेल बदलायचे असेल तर उठून रिमोट काढतो, वापरतो व परत ठेवून देतो. दर सहा महिन्यांनी बॅटरी बदलतो व रिमोट परत कप्प्यात ठेवून त्या बॅटरीज इ-वेस्ट सेंटर मधे देऊन येतो.
ब. बहुतेक वेळेस कॉफी टेबलवर. कधीकधी शोधावे लागतात.
क. जो रिमोट हवा आहे तो नेमका कोचाच्या उशांखाली, कोचाच्या खाली, खेळण्यांमधे किंवा "इकडे कोणी ठेवला?" विचारण्यासारख्या अनेक ठिकाणी असतो. शोधायच्या नादात ५-१० मिनीटे सहज जातात. कधीकधी तर तेव्हा सापडतच नाही पण नंतर दुसरे काहीतरी शोधताना सापडतो. त्यावेळेस नको असलेले रिमोट्स अगदी समोर ठेवण्याच्या बाबतीत मात्र मी एकदम टापटीप आहे.

७. तुमच्या मित्रांचे/ओळखीच्यांचे फोन नंबर कसे लक्षात ठेवता?
अ. मला सगळे पाठ आहेत.
ब. मी आजवर आलेला वा केलेला प्रत्येक फोन नंबर माझ्या सेल फोन मधे कॉन्टॅक्ट्स मधे आहे.
क. जेव्हा गरज पडेल तेव्हा आधी मागितल्यावर आलेल्या मेल मधून शोधतो (आधी जीमेल, मग याहूमेल या क्रमाने), अगम्य नावाच्या फाईल्स उघडून त्यात लिहीलेला आहे का पाहतो. पोस्ट-इट नोट्स, बिलांच्या मागच्या बाजू वगैरे ठिकाणांहून मिळवतो. नंबर बरोबर नाव लिहीलेले नसल्यास 'असाच काहीतरी नंबर होता' एवढा आत्मविश्वास आल्याशिवाय तो ट्राय करत नाही.

८. बर्‍याच कारणांनी तुमच्याकडे आलेल्या पावत्यांचे तुम्ही काय करता?
अ. माझ्या नोंदवहीत कोणती पावती किती दिवस ठेवायची याचा चार्ट आहे. रोज रात्री एकदा त्यादिवशीच्या पावत्या त्याप्रमाणे लावतो, व योग्य दिवशी फाडून/श्रेडर मधे घालून टाकतो.
ब. इतर बिलांबरोबर असतात. अधूनमधून फाडतो.
क. पँटच्या मागच्या खिशात "जाणार्‍या पावत्या दिसतात पण येणार्या दिसत नाहीत". पॅण्ट धुवून परत आल्यावर कागदाचे बोळे तेथून खाली पडतात. त्यातील एक दोन कधीकधी उलगडून ते बसचे तिकीट होते, की रेस्टॉरंटची पावती, की सिनेमाचे तिकीट हे शोधण्याचा प्रयत्न करतो. "अरे ही परवा आपण शोधत होतो ती पावती" हा खूप कॉमन संवाद आहे.

९. इतरांच्या तुमच्याकडे किंवा तुमच्या इतरांकडे विसरलेल्या गोष्टी
अ. माझ्याबाबतीत असे कधी होतच नाही. इतरांनी आमच्याकडे येताना बरोबर आणलेल्या गोष्टी आयफोनच्या कीबोर्डच्या दाबलेल्या बटनांप्रमाणे मला इतर गोष्टींच्या मानाने कायम ठळक व मोठ्या दिसतात. विसरण्याचा प्रश्नच नाही.
ब. पुन्हा आठवेल तेव्हा.
क. सहसा ती गोष्ट द्यायला म्हणून जायचे ठरवतो व तीच गोष्ट न्यायची विसरतो. माझ्या विसरलेल्या गोष्टी शिफ्टिंग्/मूव्हिंग करताना वेगळ्या काढून मित्र नेण्यासाठी फोन करतात.

आता उत्तरांची बेरीज करून एकूण गुण पाहा:

गुणः ५००० व जास्तः आपल्या चरणकमलांवर पाणी घालून ते तीर्थ विकायला ठेवा. जोरात खपेल. 'दिल चाह्ता है' मधल्या सुबोधचा रोल तुम्हाला न देता त्या दुसर्‍या कोणाला कसा दिला याची कागदपत्रे काही वर्षांनी खुली होतील तेव्हा आधीच त्यावर पुस्तक लिहा.
गुणः ५०० पेक्षा जास्त पण १००० पेक्षा कमी: तसा प्रॉब्लेम नाही पण दर सहा महिन्यांनी ही प्रश्नावली चेक करा.
गुणः १० पेक्षा कमी: अभिनंदन! तुम्हीही अधूनमधून ही प्रश्नावली चेक करायला हरकत नाही पण तुम्हाला वेळच्या वेळी ही सापडणे अशक्य आहे. तेव्हा नाद सोडून द्या.

(***) ते सर्वेक्षण छापून आणले होते पण लेख लिहीताना सापडले नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब. तीनचार मास्क्स एका वेळी वापरात असतात. त्यातला बरा दिसणारा उचलून घालायचा. अधूनमधून सगळेच टाकून देऊन नवीन काढायचे.
<<
यूव्ही सी लाईट चेंबर नसली तर मास्कपुरती तरी असावी, म्हणून एपिडेमिक पुन्हा जोर धरेल असे वाटत असेल तर घेऊन ठेवा. हातघाईवर आले नसल्याने सध्या स्वस्त मिळतील.
अ‍ॅक्वागार्ड्/तत्सम वॉटर प्युरिफायरमधे या ट्यूब वापरल्या जातात, मास्कसाठी पुरेश्या असतात.

मास्क घालून देखील मला दोन वेळा कोविद झाला... नन्तर मास्क घालणे सोडले एकदाही नाही झाला...
सो नो मास्क पॉलिसी बेस्ट पॉलिसी...

मी कोविडोत्तर ही मास्क वापरते , फायदे ---
१. घरून ऑफिससाठी निघताना मेकप ची गरज नसते . लिपस्टीक लावायची असते पण उशीर झालेला असतो अशा वेळी मास्क कामाला येतो
२. तुम्ही स्वतंशी पुटपुटू शकता , गाणी ऐकताना लिपस्सिन्क करू शकता , लोक विचित्र नजरेने बघत नाहीत .
३. बिन्धास्त जांंभई देउ शकता
४.समोरून येणार्या व्यक्तिबद्दल , आपल्या सोबत्याकडे हळू आवाजात काहीही कमेंट करू शकता . समोरच्याला कळत नाही .
५. कचरापेटीजवळून जाताना नाक दाबून जायची गरज नाही .

Happy

स्वस्ति, अजून १ आठवला Happy
घाई च्या वेळी अघळ पघळ बोलणार्या (नकोश्या) व्यक्ति जवळून जाताना मास्क अजून जरा नाका च्या वर ओढून घ्यावा, फोन कानाशी लावत बाकीचा चेहरा लपवावा आणि तिथून पळ काढावा Wink

मी मिलिंद सोमण फेस मास्क वापरतो. त्याने कोविड होत नाही हा अनेक फायद्यांपैकी एक आहे.

विषाणू चा आकार. अतिशय लहान असतो तो मास्क मधून पण आरामात शरीरात प्रवेश करू शकतो.
असे पण युक्तिवाद केले गेलेले आहेत.
आणि ते चुकीचे पण नाहीत.
त्या मुळे अगदी १००% सुरक्षा हवी असेल तर स्वतःचा ऑक्सिजन cylinder सोबत घेवून च आपली ऑक्सिजन ची गरज भागवावी.
हवेतील ऑक्सिजन बरोबर विषाणू पण शरीरात जाण्याचा धोका राहणार नाही

रबरी सिलिंडर न्यायचे आणि ओटू पंप. या पंपाने हवेतला ऑक्सिजन ओढून रबरी सिलींडर मधे भरता येतो. थोडं महाग मॉडेल घेतलं तर हायड्रोजन पण ओढता येतो. आणखी वरचं मॉडेल घेतलं तर दोन्ही वायू एकाच वेळी ओढून त्याचं मिश्रण करता येतं. कुणा कुणाला लिक्विड ऑक्सिजन सांगितलेला असतो डाएटिशिनकडून. पाण्यात तर व्हायरस पण असतात. त्यामुळे पाणी आपले आपणच तयार करायचे.

Lol
त्याचाच फास पडून मरून जाऊ. कोरोनाचा विषाणू हसेल मग...मोगॅम्बो सारखं. शिवाय अमिबा, ईकोलाय वगैरे रणजित टाईप पाण्यातले छपरी विषाणूही हसतील ते वेगळं. बघा बुवा. Wink

आमच्या नात्यात एक रिटायर्ड मनुष्य होते. निवृत्त झाल्यावर रोज सकाळी सकाळीच एकूण एक नातेवाईकांना फोन लावायचे. त्यांच्या पत्नीकडे तक्रारी गेल्या कि वयाने ज्येष्ठ आहेत, शिवाय नात्यात पण वरिष्ठ. पण सकाळी घाईची वेळ असते. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अवस्था आहे. निवृत्तोबांच्या पत्नीने त्यांना वाईट वाटणार नाही अशा बेताने ही गोष्ट सांगितली.

मग सायंकाळचे फोन येऊ लागले. लोक कामावरून थकून घरी आलेले. हात पाय धुवायच्या आधीच फोन. फोन घेतला कि अघळपघळ गप्पा. नसत्या चौकशा आणि त्यातून झापाझापी असा रोजचा उद्योग झाला. शिवाय त्या फोन कॉल मधे एक्शन है, इमोशन है, डरामा है, रोमान्स छोडके सब है असा फील असायचा. सर्वांना रांगेने तास दोन तास पीळायचे. सकाळचा फोन पाच मिनिटांचा होता तोच बरा होता असे सर्वांना वाटू लागले.

आता आणखी एक उद्योग सुरू झाला. यांचा फोन झाला कि अजून एका नातेवाईकाचा फोन येऊ लागला. आज काय म्हणाले .... राव ? टोन कसा होता ? स्वतःशी हसत होते का ? आवाजात अभिनय कसा होता अशा चौकशा करीत. हे दुहेरी संकट झाले. दुसरे पण ज्येष्ठ आणि वरिष्ठच. पहिल्यांचं माहिती झालं होतं. पण हे दुसरे का करतात हे कळत नव्हतं. बरं त्यांचा कॉल वीजवितरण कंपनीत फोन केल्यावर "माणूस गेला आहे , पाच मिनिट ते उद्या सकाळपर्यंत कधीही वीज येईल " हे सांगणारा मनुष्य ज्या निर्विकारपणे सांगतो, तोच टोन असायचा.

एका समारंभात या महाशयांची गाठ पडल्यावर सर्वांनी एकच गिल्ला केला. त्यांनीही जास्त फुटेज न खाता खुलासा केला कि मला व्यवस्थितपणाची पहिल्यापासूनच खूप आवड आहे. त्यामुळे .... रावांचे फोन आले कि मी त्यांच्या आवाजाचे, बोलण्याचे, चढौताराचे, स्वतःशी हसण्याचे बारीक निरीक्षण करत असे. मग त्यांना मी विचारायचो कि "आज घेतली का ? कुठली घेतली ?" ते ब्रॅड सांगायचे. पण माझ्या एकट्याच्या अभ्यासावर मत बनवणे पुरेसे होणार नाही म्हणून मी तुम्हा सर्वांना फोन करून ते काय काय बोलले हे विचारून शेवटी त्यांना ब्रँड विचारू लागलो. हे सर्व मी लिहून ठेवू लागलो.

यावरून मी काही निरीक्षणे काढली.
रॉयल चॅलेंज घेतली कि .... राव हसून खिदळून बोलतात. हा त्यांचा आवडता ब्रॅण्ड आहे.
सिग्नेचर घेतली कि हसणं असतं, पण प्रवचनाच्या मोड मधे येतात. ही थोडी महाग पडते.
चुकून ब्लॅक डॉग घेतली कि मग गहन विषयांवर पीळतात. ही अजून महाग असते. नशा हळूहळू चढते.
रेड लेबल घेतली कि एक एक शब्द म्हणजे मौल्यवान असल्याप्रमाणे हुं हुं असे हुंकार भरत (कदाचित तिकडे डोळे मिटत) क्लास घेणे सुरू होते. हिला पैसे जास्त पडत असल्याने त्यांच्याकडे एक अधिकार येत असावा.
शिवास रीगल घेतली कि " हं बोल रे" हे पालुपद खूप वेळा यायला लागतं. शिवास रीगल च्या एका पेग मधे आर सी चा पूर्ण खंबा येत असल्याने थेंब थेंब मौल्यवान आहे हे स्वतःला बजावत असताना प्रत्यक्षात मात्र शब्दांची डिलिव्हरी जपून केल्याचे समाधान मिळवत असतात.
शिवास रीगल झाली कि मग बजेट कोसळल्यावर मॅकडॉवेल्स वर गाडी घसरते.
ती लवकर चढत नाही. अर्धवट चढते. मग चीडचीड झाली कि ..
कॉलवर पलिकडच्याच्या चुका शोधून झापाझापीला सुरूवात !
ते ही बजेट कोसळलं कि मग मोसंबी नारंगी,,,,

समजलं ना अचानक शिव्या का देतात ते ?

असा व्यवस्थित मनुष्य नंतर पाहण्यात आलेला नाही.

( हा किस्सा प्रतिसाद कर्त्याच्या वैयक्तिक आयुष्यातल्या अनुभवावर आधारीत असून विशिष्ट शहरातल्या सवयीप्रमाणे लेबोसुला या प्रकारातला नाही तरी कुणी स्वतःवर ओढवून घेऊ नये ही नम्र विनंती).

गळ्यात नको, डोक्यावर पगडी सारखी लावायची ट्यूब.
दुचाकीवर त्याचा हेल्मेटसारखाही उपयोग होईल आणि कारमध्ये बसल्यास एअरबॅग सारखाही.

Pages