पुराणातील कथा

Submitted by नंदिनी on 16 November, 2012 - 06:21

इथे तुम्हाला माहित असलेल्या वेगवेगळ्या रोचक पुराणकथा लिहा. हिंदू, बौद्ध, जैन, इस्लाम, ख्रिस्ती, ग्रीक, रोमन आणि इतर धर्मांतील व देशांतील कथा माहित असतील तर इथे लिहा. हा बाफ अशा कथांच्या संकलनाकरता आहे. त्या कथांची सत्यासत्यता तपासण्यासाठी अथवा वैज्ञानिक कसोट्या लावण्यासाठी नाही.

इथे टिंगलटवाळी करणारे, एखाद्या धर्माला उद्देशून चेष्टा-मस्करी करणारे लिखाण करू नये ही विनंती.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्वत्त्मामा ब्रह्मास्त्र हाताने फेकतो.. आणि अर्जुन मात्र तेच ब्रह्मास्त्र धनुष्याला लावून उडवतो! >> हो कारण अश्वत्थामाकडे काहीच अस्त्र नसल्यामुळे तो व्यास मुनींच्या आश्रमातल्या दर्भापासून ते ब्रम्हास्त्र बनवतो.

अश्वत्थामाकडे काहीच अस्त्र नसल्यामुळे तो व्यास मुनींच्या आश्रमातल्या दर्भापासून ते ब्रम्हास्त्र बनवतो<<
अश्वत्थामाकडे काहीच शस्त्र नसल्यामुळे तो व्यास मुनींच्या आश्रमातल्या दर्भापासून ते ब्रम्हास्त्र बनवतो.

चमन्जी,
द अस्त्रास वेअर इन द इन्कॅण्टेशन यु इवोक्ड व्हाईल थ्रोइंग देम यु नो? जस्ट लाईक द कर्सेस इन हॅरी पॉटर? आय मीन यू हॅव टू 'मीन इट' अर्जुन हॅड अ वाण्ड युनो. अ वाण्ड कॉल्ड गाण्डीवा. व्हाईल थामु डिडन्ट. सो ही जस्ट इन्कॅण्टेटेड इट. 'आवडा केडावरा' Wink अ‍ॅण्ड ही वाज द बॅड गाय. वाजन्ट ही?
सी?

the more it changes, the more it is the same. puranas and potter. both fiction Wink

वर श्री.चमन यानी दिलेल्या एका प्रतिसादात :परिक्षित अर्जुन-द्रौपदीचा नातू होता..." असा उल्लेख आला आहे. त्यात छोटीशी दुरुस्ती करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात परिक्षित हा अर्जुन-सुभद्रा यांचा नातू होय.

द्रौपदीची पाचही मुले [ज्याना उपपांडव म्हटले जात] अश्वत्थामा याच्याकडून मारली गेली. या चर्चेच्या निमित्ताने द्रौपदीने जन्म दिलेल्या या पाच मुलांच्या नावाविषयी....

१. प्रतिविंध्य [धर्मराजापासून]
२. सुतसोम [भीमापासून]
३. श्रुतकर्मा [अर्जुनापासून]
४. शतनिक [नकुलापासून]
५. श्रुतसेन [सहदेवापासून]

ही पाचही मुले अभिमन्यूसारखीच पराक्रमी होती आणि महाभारत युद्धात यानीही भाग घेतला होता.

अशोक, अहो श्री वगैरे नका हो म्हणू! चमन माझा आयडी आहे त्याला काही मायना/पदवी लिहायची गरज नाही. अरे तुरे केलेत तरी चालेल.

दुरुस्ती केल्याबद्दल धन्यवाद.

वेळ आणि माहिती दोन्ही हाताशी असल्यास तुम्ही 'सात्यकी' बद्दल काही माहिती सांगू शकाल का.
मला सात्यकी हे फार ईन्फ्ल्यूएंशिअल कॅरॅक्टर वाटते. तो कायम सावलीसारखा कृष्णाबरोबर राहतो.
शिष्टाई दरम्यान कृष्णाच्या झालेल्या अपमानाने संतापतो, दृष्टद्युम्नावर द्रोण वधासंबंधी संतापतो आणि कृष्णाच्या नरो-वा-कुंजरो-वा कारस्थानाचा निषेध करतो. तो यादवीत कृतवर्माशी लढतांना धारातीर्थी पडला असेही ऐकले आणि तोच एकटा यादव यादवीतून वाचला असे ही ऐकले.

नक्की माहिती सांगाल का?

विष्णू चे दहा अवतार
एकदम क्रिप्टिक स्वरूपात लिहिते आहे.. खूप आणि भरमसाठ लिहिता येईल असे विषय आहेत हे सर्व..

१. मत्स्य - मासा - मनुच्या ओंजळी मधे अर्घ्यदानाच्या वेळी आला..(गोष्ट नीट आठवून लिहीन)
२. कूर्म - कासव - प्रलयकाळी पृथ्वी ला आधार दिला
३. वराह - रान्-डुक्कर - हिरण्याक्ष राक्षसाने पृथ्वी समुद्रामधे बुडवली ( !) तेव्हा वराहरूपाने विष्णू ने ती सुळ्यावर खेचून बाहेर आणली. ( रुग्वेदामधे अशीच एक प्रजापतीची कथा आहे)
४. नरसिंह - सिंहाचे डोके, हात, पाय व इतर शरीर मानवी. हिरण्यकश्यपू ला मारण्यासाठी खांबामधून प्रगट झाला. ( रुग्वेदामधे अशीच एक नमुची व इन्द्र याची कथा आहे)
५. वामन - बटुचा अवतार घेउन तीन पावलांमधे जमीन, आकाश व्यापून बळीराजाला पाताळात ढकलले.
6. परशुराम - भार्गव कुलातील योध्दा ब्राह्मण, आईचे शीर उडवणारा, २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली
7. राम - दाशरथी राम - रामायणाचा नायक
८. कृष्ण - देवकीपुत्र, महाभारतामधील योध्दा-मुत्सद्दी, योगेश्वर
९. बुध्द - गौतम, ऐतिहासिक व्यक्ती, मध्यम मार्गाचा पुरस्कर्ता.
१०. कल्की - हा भविष्यातील अवतार आहे. हातात तलवार घेउन व घोड्यावर बसून येईल

विविध पुराणांमधे अजूनही काही अवतार दिलेले आहेत उदा. हयग्रीव, बलराम वगैरे. दहाहून जास्त अवतार असल्याचेही उल्लेख आहेत.

"....तुम्ही 'सात्यकी' बद्दल काही माहिती सांगू शकाल का...."

जरूर, चमन....मला खूप भावतात महाभारतातील अशी पात्रे की जी प्रमुख व्यक्तिरेखांच्या भाऊगर्दीत काहीशी झाकोळली गेली आहेत. 'सात्यकी' हे अशा पात्रांपैकी एक प्रमुख.

कृष्ण ज्या यादव कुळात जन्माला आला [संस्कृतमध्ये 'वृष्णी'] त्याच कुळातील एक सामर्थ्यवान योद्धा म्हणजेच सात्यकी, जो कृष्णासमवेतच लहानाचा मोठा झाला आणि त्यामुळेच तो सदैव कृष्णाच्या छायेतच आपले जीवितकार्य व्यतीत करीत होता. साहजिकच कुरुक्षेत्र युद्धापूर्वीपासूनच सात्यकी पांडवांसोबत साथीने युद्ध तसेच राजनितीचे धडे गिरवित असे. त्यानेही अर्जुनासह द्रोणाचार्याकडून धनुर्विद्या प्राप्त केली होती. तो त्यात इतका पारंगत झाला होता की युद्धप्रसंगी एकदा तर त्याने खुद्द गुरु द्रोणाचार्याच्या धनुष्याचा भेद करून त्याना मैदान सोडायला भाग पाडले होते. द्रोणाचार्यानी मोठ्या कौतुकाने त्याचा 'अभेद्य सात्यकी' असा उचित गौरव केला होता.

पांडवांच्या यादीत जे स्थान सात्यकीला होते तद्वत त्याचा मित्र म्हटला गेलेल्या कृतवर्माचे स्थान कौरवांच्या यादीत होते. पण युद्धात ते समोरासमोर आपापल्या बाजूसाठी लढले होते. युद्धसमाप्तीनंतर हे दोघेही हयात होते.

युद्ध टाळावे यासाठी घडलेल्या 'कृष्णशिष्टाई' समयी कौरव दरबारात कृष्णाने आपल्यासोबत फक्त सात्यकीला जोडीदार म्हणून घेतले होते. शिष्टाईप्रसंगी कौरवांनी कृष्णाने पांडवांच्यावतीने समोर मांडलेल्या सर्व मागण्या कौरवांनी फेटाळून तर लावल्याच, पण त्यापेक्षा खुद्द कृष्णालाच जेरबंद करण्याचा घाट घातला, त्यावेळी संतापलेला सात्यकी दुर्योधन आणि अन्य कौरवबंधूंच्या अंगावर तलवार घेऊन एकटा धावला, पण कृष्णाने त्याला रोखले.

प्रत्यक्ष युद्धात सात्यकी मर्दुमकी दाखवत होताच, पण त्याने १४ व्या दिवशी कौरवाकडील एक योद्धा भूरीश्रवस याच्याशी लढताना काही नियमभंग केले होते. म्हणजे सुरुवातीला भूरीश्रवसने सात्यकीचा जवळपास पराभव करून त्याला रक्तबंबाळ केले होते. ती बातमी दूताकरवी अर्जुनासोबत रथात असलेल्या कृष्णाला समजल्याक्षणीच त्याने सात्यकी पडलेल्या युद्धविभागाकडे रथ वळविला. तिथे भूरीश्रवस सात्यकीची हत्या करण्याच्या पावित्र्यात तलवार उचलत असतानाच अर्जुनाने आपल्या शराने त्याचा तो हात शरीरापासून अलग केला. वेदनेने कळवळलेल्या भूरीश्रवसाने कृष्ण आणि अर्जुन या दोघांचीही 'चेतावणी दिल्याखेरीज शर सोडला म्हणजेच आदर्श युद्धनितीचे पालन केले नाही....' म्हणून निर्भत्सना केली. पण इकडून अर्जुनानेही त्याची 'सात्यकीसारखा वीर मूर्च्छित पडलेला असताना तू त्याची हत्या करण्याच्या बेतात होतास....' म्हणून तोडीस तोड असे उत्तर दिले. हा संवाद चालू असतानाच दुसरीकडे शुद्धीवर आलेल्या सात्यकीने आपल्या तलवारीने तिथेच विव्हळत पडलेल्या भूरीश्रवसचे शीर धडावेगळे केले. जखमी आणि निशस्त्र योद्ध्याचा असा वध केल्याचे दूषण सात्यकीच्या माथी कायमचे बसले. सोबतीला कृष्ण नेहमीच हजर असल्याने सात्यकीच्या अंगभूत गुणाला एक वेगळे वलय प्राप्त झाले होते.

कौरव वध आणि सैन्य संहारानंतर महाभारत युद्ध जरी थंडावले तरी अश्वत्थाम्याच्या सूडाचा अग्नी शांत झाला नव्हता. कौरवाकडील कृतवर्मा याच्याच साहाय्याने अंधार्‍या रात्री अश्वत्थाम्याने पाच पांडव पुत्रांची नृशंस हत्या केली. त्याबाबत त्याला वेदनेचा चिरंजीव असा शापही भोगावा लागला. मात्र सात्यकीच्या मनी ही दु:खद घटना नेहमी सलत राहिल्याने तसेच त्या हत्येत आपला मित्र कृतवर्माही सामील होता त्याचे शल्य त्याच्या मनी होतेच. महाभारत युद्धाच्या निकालानंतर सात्यकी आणि कृतवर्मा यादव साम्राज्यात जरी परतले होते तरी प्रसंगी दोघेही त्या कारणामुळे एकमेकाशी वादविवाद करीत होतेच. अश्वत्थाम्याने पांडवपुत्र मारले त्याचवेळी निद्रावस्थेत असलेल्या आजुबाजूच्या राहोट्यातील सैनिकांचे शिरकाण कृतवर्मा आणि त्याच्या साथिदारांनी केले होते. हे नीतिबाह्य कृत्य असल्याचे सात्यकीचे म्हणणे तर जखमी आणि निशस्त्र असलेल्या भूरीश्रवसचे सात्यकीने मुंडके उडविणे हे कृत्यही घृणास्पदच होते असा बचाव कृतवर्मा करीत असे.

पुढे कालौघात सार्‍या 'यादव' कुळीचाच संहार झाला त्यात अर्थातच सात्यकी आणि कृतवर्माही मारले गेले. कृष्णावताराचेही कार्य त्याच दरम्यान संपुष्टात आले असल्याने खुद्द कृष्णानेदेखील यादव कुळाच्या अस्तित्वाची गरज संपल्याचे मान्य केले होते. सात्यकीचे कार्य पूर्ण झाले होते.

एक कुशल योद्धा याबरोबरीने सात्यकी जखमी वीरांवर रात्री तंबूत परतल्यावर औषधोपचारही करीत असे. तो शल्यविशारद असल्याचेही उल्लेख सापडतात. त्याच्या कौटुंबिक जीवनाविषयी अशीही माहिते मिळते की त्याला आसंग नामक मुलगा होता, तो महाभारत युद्धात मारला गेला. सात्यकीला उत्तरखंडातील सरस्वती नदी परिसराचे राज्य लाभले होते, त्याच्या मृत्युनंतर त्याचा नातू युगंधर याने तिथे राज्य केले.

मला वाटते इतपत माहिती पुरेशी होऊ शकेल 'सात्यकी' विषयी.

अशोक पाटील

कूर्म - कासव - प्रलयकाळी पृथ्वी ला आधार दिला.>>>>> कूर्म अवतारात - समुद्रमंथनाचेवेळी देव व दानव यांनी मंदार पर्वताची रवी केली होती परंतु पर्वत समुद्रात बुडत असल्याने विष्णुने कच्छ अवतार घेउन मंदार पर्वताला आधार दिला होता.

अप्सरा = अप्सु सरति इति अप्सरा (ज्या जलात रहातात त्या अप्सरा) त्यांचा अपभ्रंश आसरा..

अप्सरा प्रथम अथर्ववेदात (सुमारे १०००-८०० इसपू असा याचा संहितीकरणाचा काळ मानला जातो) दिसतात. सेमिडिव्हाईन बीइंग्ज/ अर्धदैविक अशा प्रकारात मोडतात. आत्ता हाताशी संदर्भ नाही, पण तिथे त्या वेगवेगळ्या कामांशी, क्रियांशी संबंधित आहेत. उदा: रथांच्या शर्यतीत जिंकायला मदत करणारी ती अक्षकामा, इ.
(ज्यांना अथर्ववेदाचं बर्‍यापैकी भाषांतर/ माहिती वाचायची असेल त्यांनी सिद्धेश्वरशास्त्री चित्रावांनी केलेलं भाषांतर वाचावं. त्याची प्रदीर्घ प्रस्तावना ही बहुतांशी अथर्ववेदाचे सर्वात अधिकारी गणले जाणारे अभ्यासक मॉरिस ब्लूम्फील्ड यांच्या लेखनावरून घेतलेली बेतलेली आहे.)

योगिनी हा फार फार नंतर (इ.स. ६व्या शतकानंतर) अस्तित्वात आलेला गट आहे. त्यांचा आणि अप्सरांचा संबंध नाही.

पुराणं हा फार गुंतागुंतीचा विषय आहे. आत्ता सवड नाही. नंतर सविस्तर लिहेन.

छान माहिती काका. धन्यवाद.
मनरी, परशुराम सहावा अवतार, सातवा रामावतार. कूर्मावतार समुद्रमंथनाच्या वेळेला घेतला होता ना?

वर इब्लिस यांनी म्हटलेल्या अस्तंबाबद्द्ल थोडेसे.
तळोदा शहरा पासुन साधारणपणे १५/२०किमी अंतरावर अस्लेल्या सातपुडा पर्वतरांगावर अस्तंबाचे म्हणजेच अश्वत्थामाचे मंदिर आहे.
ह्या नोव्हें. १२ तारखेपर्यंत त्याची म्हणजे मंदिर असलेल्या डोंगराची प्रदक्षिणा करुन तळोदा शहराच्या आसपास असणार्‍या शेतांमधे जवळ पास २५ हजार लोक डेरा टाकुन होते.
१३ ता. ला ह्या सर्व लोकांचे नातेवाईक येवुन तळोद्यातील हनुमान मंदिरात पुजा होवुन ह्या सर्व प्रदक्षिणा करणार्‍यांना वाजत गाजत मानाने आपापल्या घरी घेवुन जातात. हा सोहळा ५ वा. सकाळी चालु होतो वस्तीला असणारे व त्यांना घ्यायला येणारे नातेवाईक आपापल्या पारंपारिक वाद्यासहित मिरवणुक काढुन वस्तीपासुन मंदिरापर्यन्त येतात.
त्या मुळे १२ची रात्र ही जणु तळोद्यात भरलेली जत्राच असते. दुसर्‍या दिवशीच्या मिरवणुकीसाठी हे लोक मजबुत खरेदी करतात.
ह्याचे जास्त वर्चस्व पावरा व भिल्ल समाजावर आहे. हा सोहळा खरेच बघण्यासारखा असतो.त्यांचे गडद रंगीबेरंगी कपडे, ठेका धरायला लावणारे वाद्य व बेभान पावरी व भिल्ल नृत्य.
ह्यावेळेस जवळपास ५० हजारावर लोक जमले होते.

वरदा यांच्या वरील प्रतिसादातील कोशशास्त्रीकार 'सिद्धेश्वरशास्त्री चित्राव' हे ऋषितुल्य नाव वाचले आणि हाताची बोटे पटकन कानाच्या पाळीच्या दिशेने गेली. शंभर वर्षाचे दीर्घ आयुष्य लाभलेल्या आदरणीय महामहोपाध्याय सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांची ग्रंथसंपदा नुसती डोळ्याखालून घातली तरी आपणास महाराष्ट्रात जन्म लाभला हे किती मोठे समाधान असू शकते याची जाणीव होते.

वरदा यानी अथर्ववेदाचाही उल्लेख केला आहे, तो मराठीत आणण्याचे सारे श्रेय चित्राव यांच्याकडेच जाते.

"अथर्ववेद" तसा अन्य तीन वेदांशी काहीसा फटकूनच आहे कारण त्यात विविध प्रकारचे जारणमारण मंत्र आणि इतर जादूचे मंत्र मोठ्या प्रमाणावर संग्रहीत केले आहेत त्यामुळे या वेदास बराच काळ प्रतिष्ठा नव्हती. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यांचा उल्लेख ‘त्रयी विद्या’ असा करून त्यांच्या नंतर अथर्ववेदाचा वेगळा उल्लेख केल्याची उदाहरणे आढळतात. कधीकधी तर त्याचा उल्लेखही टाळला गेल्याचे दिसते....पण असो, फार गहन आहे हे सारे आणि अभ्यासाचा असला तरीही तितकाच किचकट विषय आहे हे 'वेद प्रकरण'. 'पुराणकथा' धाग्यात त्यामुळे विषयांतरही होऊ शकण्याची भीती आहेच.

सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा उल्लेख वाचनात आल्यामुळे उत्स्फुर्तपणे हा प्रतिसाद टंकला आहे, इतकेच.

अशोक पाटील

रामाणयात सीता स्वंयंवराच्या वेळेस रामाच्या शिवधनुष्य मोडते, तेव्हा परशुरामच आले होते ना? मग दोन अवतार समोरासमोर कसे आले???

समोरासमोर कसे म्हणजे ? तो अवतार होता, डबलरोल नव्हे. Happy जसे की अवतार घेतल्यानंतर देव स्वर्गातून गायब होत नसत तसेच असावे. अवतार म्हणजे देवाचा 'अंश' मानला गेला आहे.

<<<<<<<<<<<<रामाणयात सीता स्वंयंवराच्या वेळेस रामाच्या शिवधनुष्य मोडते>>>>>>>>>>>>> सीता शिवधनुष्य मोडते????? Uhoh

अशोक, छान पोस्ट...

यादव कुळ नष्ट झाले त्याबाबत मी वाचलेली कथा.. ( पात्रांची नावे विसरलो. )
एक ऋषी, गर्भार स्त्रीच्या पोटी काय जन्माला येईल याचे भाकीत करत. त्या ऋषींची थट्टा करण्याची बुद्धी एका यादवकूलोत्पन्न महाभागाला झाली. त्याने गर्भार स्त्रीचे सोंग घेतले. अर्थातच ऋषींनी ते ओळखले, आणि तूझ्या पोटी एक मुसळ जन्माला येईल, आणी तूझ्या कूलाचा नाश करेल, असा शाप दिला.

पुढे खरेच त्याला मुसळ झाले. शापाच्या भितीने, त्या मुसळाचे, चूर्ण करुन, समुद्रात टाकण्यात आले. त्या चूर्णापासून, लव्हाळी निर्माण झाली, ती लव्हाळी उपटून, यादवांनी एकमेकांचा जीव घेतला.

छान धागा.
यादव कुळाच्या अंताबद्दलची ही वरची कथा युगंधर मध्येही आहे.
मी असेही वाचले आहे की कौरव-पांडवाच्या युद्धसमाप्तीनंतर जेव्हा कॄष्ण बाकी पांडवांबरोबर धुतराष्ट्र्-गांधारीला भेटायला जातो तेव्हा धुतराष्ट्र भीमाला जवळ बोलावतो तेव्हा कॄष्ण भीमाऐवजी त्याच्यासारखाच एक पुतळा पुढे करतो जो धुतराष्ट्र भीम समजुन मिठीत घेतल्यावर तो पुतळा चेंगरुन टाकतो. गांधारी मात्र कॄष्णाला शाप देते की तुला शक्य असतानाही तू हे युद्ध थांबवले नाहीस आणी तुझ्यामुळे मला माझ्या कुळाचा निर्वंश बघावा लागतोय म्हणुन तुलाही तुझ्या डोळ्यादेखत यादव कुलाचा संहार बघावा लागेल आणि तू परमेश्वर असूनही त्यांची आपापसातील भांडणे टाळु शकणार नाहीस.
त्यावरुनच आपापसातील युद्धांना यादवी म्हटले जाते.

त्या मुसळाच्या टोकाला एक लोखंडी टोक होते. मुसळाचे तुकडे करुन पाण्यात टाकल्यावर ते टोक माशाने गिळले. तो मासा व्याधाला मिळाला. त्याने ते टोक बाणाला बसवले. त्या बाणाने श्रीकृष्ण मेला.

खरं तर संपूर्ण महाभारत हीच शोकांतिका आहे, कुणालाच सूख असे लाभले नाही.. त्यातल्या त्यात पांडवांना स्वर्गारोहण करता आले, हे भाग्य मानले तरच. पण त्यांचाही वंशनाश झालाच.

काही ठिकाणी ह्या मगरीचा राक्षसी म्हणून तर काही ठिकाणी मासा असाही उल्लेख आढळेल. मात्र हनुमानपुत्र 'मकरध्वज' याबद्दल एकमत दिसत्ये. पाताळप्रमुखाने याच मकरध्वजाला आपल्या साम्राज्यात द्वाररक्षकाचे काम सोपविल्याचा उल्लेख आहे.

मात्र प्रत्यक्ष पितापुत्राची कधी समोरसमोर गाठभेट झाल्याचे वाचनात आलेले नाही.
>>> इंद्रजीताचा मॄत्युनंतर रावण पाताळातले असूरांचे राजे अहिरावण व महिरावण यांना मदतीला बोलावतो. हे दोघेही मायावी युद्धात प्रवीण असतात ते राम-लक्ष्मणांना झोपेत उचलुन पाताळात घेउन जातात. हनुमानाच्या हे लक्षात आल्यावर तोही मागोमाग पाताळात पोहोचतो व तेथेच त्याची मकरध्वजासोबत भेट होते कारण मकरध्वज तेथे द्वारपालाचे काम करत असतो. त्याच्याकडुन हनुमानाला मकरध्वजाच्या जन्माची कथा कळते. पण दोघांनाही आपापली स्वामीनिष्ठा प्रिय असल्याने त्यांच्यात लढाई होते व मकरध्वजाचा पराभव होतो.

त्या मुसळाच्या टोकाला एक लोखंडी टोक होते. मुसळाचे तुकडे करुन पाण्यात टाकल्यावर ते टोक माशाने गिळले. तो मासा व्याधाला मिळाला. त्याने ते टोक बाणाला बसवले. त्या बाणाने श्रीकृष्ण मेला.
>> त्या व्याधाला श्रीकॄष्णाच्या पायाचा निळसर अंगठा हरिणाच्या डोळ्यासारखे वाटल्याने तो बाण मारतो व तो श्रीकॄष्णाला लागतो.ह्या एकाकी मॄत्युचे कारणही कोणाचा तरी शाप असतो ती कथा आता नीट आठवत नाहीये.

त्या व्याधाला श्रीकॄष्णाच्या पायाचा निळसर अंगठा हरिणाच्या डोळ्यासारखे वाटल्याने तो बाण मारतो व तो श्रीकॄष्णाला लागतो.ह्या एकाकी मॄत्युचे कारणही कोणाचा तरी शाप असतो ती कथा आता नीट आठवत नाहीये.

>>> संपुर्ण यादवकुलाचा नाश झाल्यावर आणी त्याच वेळेला कृष्णाला त्याचे अवतारकार्य पुर्ण झाल्याची जाणीव झाल्यावर तो वनात निघुन जातो. तेथे एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसलेला असताना त्याच्या निलवर्ण पायाचा अंगठा एका व्याधाला लांबुन हरीणाच्या तोंडासारखा वाटतो. आणी तो बाण मारतो. त्या बाणाच्या टोकाला "त्याच त्या" मुसळाचे टोक लावले असते. आणी त्या निमीत्ताने कृष्ण आपला अवतार समाप्त करतो.

अशी कथा मी वाचली आहे.

Pages