तुम्ही किती व्यवस्थित आहात?

Submitted by फारएण्ड on 9 November, 2012 - 10:15

आजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल.

खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर "अ" असेल तर प्रत्येकी १००० गुण, "ब" असेल तर प्रत्येकी १०० गुण व "क" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा.

प्रश्नावली सोडवण्याआधी: हे पान प्रिंट करा व नीट ठेवून द्या. उद्या याच वेळेस ते पान सापडले नाही तर तुम्ही ही प्रश्नावली सोडवण्याची गरज नाही, फक्त आपला अव्यवस्थितपणा नीट सांभाळा. अधिक माहितीसाठी तुमच्या "अव्यवस्थितपणा सल्लागारा" शी संपर्क करा.

आता प्रश्नावली:

१. लग्न, पूजा किंवा 'एथनिक' कार्यक्रमासाठी तुम्ही निघायच्या तयारीत आहात. झब्बा किंवा त्यातून डोके घालायचा कोणताही शर्ट इस्त्री करून आलेला आहे. त्याची डोके जाण्यासाठी आवश्यक असणारी बटने तुम्ही कधी काढता?
अ. घडी उलगडायच्या सर्वात आधी.
ब. घडी उलगडून त्याची इस्त्री नीट चेक करतो, एखादा चिकटलेला धाग्याचा तुकडा काढून टाकतो व मग बटने काढतो.
क. तो घालताना डोक्यात अडकला की हात वर करून बटने शोधतो.

२. तुमच्या घरात हुकमी चालणारी पेन्स व सगळीकडे सहज दिसणारी एकूण पेन्स याचे गुणोत्तर काय आहे?
अ. शंभरः फोन शेजारी, कॅलेंडर वर व्यवस्थित चालणारी पेन्स नेहमी नीट ठेवलेली असतात. न चालणारी पेन्स लगेच पुन्हा चालू करतो किंवा टाकून देतो.
ब. शून्यः एकही पेन चालत नाही.
क. शून्य ते शंभरः बरीच चालू आहेत पण चालणारे नेमक्या वेळेला सापडत नाही. "पॉश" दिसणार्‍या पेनांमधे रीफिल नसते. मागचे बटन पुश करून चालू/बंद होणारी बॉलपेन्स प्राचीन काळापासून एकाच स्थितीत आहेत - ते बटन कायमचे दाबलेल्या अवस्थेत आहे किंवा खाली/वर कोणत्याही अवस्थेत केले काहीच फरक पडत नाही. टोपणवाली पेन्स व ती टोपणे "लंबी जुदाई" मोड मधे आहेत.

३. तुमच्या किल्ल्या सहसा कोठे असतात?
अ. भिंतीवर एक किल्लीच्याच आकाराचा किल्ली होल्डर आहे, त्यावर. कीचेन च्या रिंगांमधून किल्ल्या बाहेर येऊ पाहात नाहीत ना हे रोज चेक करतो.
ब. एक फॅन्सी बाउल आहे त्यात. कधीकधी इकडेतिकडेही असतात.
क. घरात आल्यावर पहिली जागा दिसेल तेथे, किंवा जेथून किल्ली स्वतःहून खाली पडत नाही अशा कोणत्याही जागी, बाहेर असताना ज्या हातात जड गोष्ट धरलेली आहे त्याबाजूच्या खिशात इतर दहा गोष्टींच्या खाली असतात, व बाहेर काढताना त्यातील किमान दोन गोष्टी खाली पडतात.

४. तुम्ही सेल फोनवर बोलताना ब्लू टूथ कधी कानाला लावता?
अ. ते नेहमी कानावरच असते. आंघोळ करताना शॉवर कॅप त्यावर घालतो.
ब. फोन आल्यावर किंवा करताना 'टॉक' बटन दाबायच्या आधी कानावर लावतो.
क. फोन उचलून १०-१२ वेळा 'हॅलो' म्हणून काहीच ऐकू आले नाही, "च्यायला, सिग्नल नसताना फोन कशाला करतात कोणास ठाऊक" वगैरे करून झाल्यावर मग ब्लू टूथ कनेक्टेड असल्याने फोन मधून काहीच ऐकू येणार नाही हे लक्षात आल्यावर.

५. तुम्ही गाडी केव्हा धुता?
अ. मी दर रविवारी सकाळी साडेसात वाजता (आपोआप, गजर न लावता) उठून बाहेर गाडी धुतो. माझ्या गाडी धुण्याच्या वेळेप्रमाणे आजूबाजूचे लोक घड्याळे लावतात, व पक्षी/खारी वगैरे पाणी प्यायला आधीच जमा होतात.
ब. दर तीन चार महिन्यांनी, गाडी ओळखू येईनाशी होते तेव्हा, किंवा धुळीत "वॉश मी" वगैरे लोक लिहून जातात तेव्हा.
क. दर पावसाळ्यात आपोआप धुतली जाते.

६. तुमचे रिमोट्स कोठे असतात?
अ. टीव्हीच्या कपाटात प्रत्येक रिमोट साठी स्वतंत्र योग्य आकाराचा कप्पा केलेला आहे व त्यावर कोणत्या रिमोटसाठी ते लिहीलेले आहे. वापरून झाल्यावर प्रत्येक रिमोट त्याच्या कप्प्यात ठेवतो. कोचवर बसलेलो असताना आवाज वाढवायचा असेल्/चॅनेल बदलायचे असेल तर उठून रिमोट काढतो, वापरतो व परत ठेवून देतो. दर सहा महिन्यांनी बॅटरी बदलतो व रिमोट परत कप्प्यात ठेवून त्या बॅटरीज इ-वेस्ट सेंटर मधे देऊन येतो.
ब. बहुतेक वेळेस कॉफी टेबलवर. कधीकधी शोधावे लागतात.
क. जो रिमोट हवा आहे तो नेमका कोचाच्या उशांखाली, कोचाच्या खाली, खेळण्यांमधे किंवा "इकडे कोणी ठेवला?" विचारण्यासारख्या अनेक ठिकाणी असतो. शोधायच्या नादात ५-१० मिनीटे सहज जातात. कधीकधी तर तेव्हा सापडतच नाही पण नंतर दुसरे काहीतरी शोधताना सापडतो. त्यावेळेस नको असलेले रिमोट्स अगदी समोर ठेवण्याच्या बाबतीत मात्र मी एकदम टापटीप आहे.

७. तुमच्या मित्रांचे/ओळखीच्यांचे फोन नंबर कसे लक्षात ठेवता?
अ. मला सगळे पाठ आहेत.
ब. मी आजवर आलेला वा केलेला प्रत्येक फोन नंबर माझ्या सेल फोन मधे कॉन्टॅक्ट्स मधे आहे.
क. जेव्हा गरज पडेल तेव्हा आधी मागितल्यावर आलेल्या मेल मधून शोधतो (आधी जीमेल, मग याहूमेल या क्रमाने), अगम्य नावाच्या फाईल्स उघडून त्यात लिहीलेला आहे का पाहतो. पोस्ट-इट नोट्स, बिलांच्या मागच्या बाजू वगैरे ठिकाणांहून मिळवतो. नंबर बरोबर नाव लिहीलेले नसल्यास 'असाच काहीतरी नंबर होता' एवढा आत्मविश्वास आल्याशिवाय तो ट्राय करत नाही.

८. बर्‍याच कारणांनी तुमच्याकडे आलेल्या पावत्यांचे तुम्ही काय करता?
अ. माझ्या नोंदवहीत कोणती पावती किती दिवस ठेवायची याचा चार्ट आहे. रोज रात्री एकदा त्यादिवशीच्या पावत्या त्याप्रमाणे लावतो, व योग्य दिवशी फाडून/श्रेडर मधे घालून टाकतो.
ब. इतर बिलांबरोबर असतात. अधूनमधून फाडतो.
क. पँटच्या मागच्या खिशात "जाणार्‍या पावत्या दिसतात पण येणार्या दिसत नाहीत". पॅण्ट धुवून परत आल्यावर कागदाचे बोळे तेथून खाली पडतात. त्यातील एक दोन कधीकधी उलगडून ते बसचे तिकीट होते, की रेस्टॉरंटची पावती, की सिनेमाचे तिकीट हे शोधण्याचा प्रयत्न करतो. "अरे ही परवा आपण शोधत होतो ती पावती" हा खूप कॉमन संवाद आहे.

९. इतरांच्या तुमच्याकडे किंवा तुमच्या इतरांकडे विसरलेल्या गोष्टी
अ. माझ्याबाबतीत असे कधी होतच नाही. इतरांनी आमच्याकडे येताना बरोबर आणलेल्या गोष्टी आयफोनच्या कीबोर्डच्या दाबलेल्या बटनांप्रमाणे मला इतर गोष्टींच्या मानाने कायम ठळक व मोठ्या दिसतात. विसरण्याचा प्रश्नच नाही.
ब. पुन्हा आठवेल तेव्हा.
क. सहसा ती गोष्ट द्यायला म्हणून जायचे ठरवतो व तीच गोष्ट न्यायची विसरतो. माझ्या विसरलेल्या गोष्टी शिफ्टिंग्/मूव्हिंग करताना वेगळ्या काढून मित्र नेण्यासाठी फोन करतात.

आता उत्तरांची बेरीज करून एकूण गुण पाहा:

गुणः ५००० व जास्तः आपल्या चरणकमलांवर पाणी घालून ते तीर्थ विकायला ठेवा. जोरात खपेल. 'दिल चाह्ता है' मधल्या सुबोधचा रोल तुम्हाला न देता त्या दुसर्‍या कोणाला कसा दिला याची कागदपत्रे काही वर्षांनी खुली होतील तेव्हा आधीच त्यावर पुस्तक लिहा.
गुणः ५०० पेक्षा जास्त पण १००० पेक्षा कमी: तसा प्रॉब्लेम नाही पण दर सहा महिन्यांनी ही प्रश्नावली चेक करा.
गुणः १० पेक्षा कमी: अभिनंदन! तुम्हीही अधूनमधून ही प्रश्नावली चेक करायला हरकत नाही पण तुम्हाला वेळच्या वेळी ही सापडणे अशक्य आहे. तेव्हा नाद सोडून द्या.

(***) ते सर्वेक्षण छापून आणले होते पण लेख लिहीताना सापडले नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नी. देवाला फार मज्जा येते अशा जोड्या जमवायला. आपण नाही सासु-सुन भांडणाच्या मालिका बघत. तसंच त्यालाही काही एंटरटेनमेन्ट हवी की. मजा येत असेल झक्काझक्की बघायला. असं किती कमी दिसतं कि दोघं नवरा-बायको गलथान किंवा दोघंही ओसीडीग्रस्त त्यामुळे घर एकदम चकाचक. संसारात चवच नाही रहाणार काही. म्हणुनच स्वर्गातल्या 'रोहिणी' रेकॉर्डसमधे असं मॅच मेकिंग असेल. Happy

आमचे एक शेजारी नवराबायको (रिटायर्ड) ह्याबाबत लास्ट स्टेजला आहेत.
मी त्यांच्याकडे गेले असताना रवी, उलथने, झारा वगैरे गोष्टी मोरीत पाहील्या म्हणून जरा विचारात पडले. पण मग लगेचच डेमो मिळाले. बॉयलरमधे पाणी तापवून, मग कडकडीत पाण्यात साबणचुरा घालून तो रवीने घुसळतात. मग त्यात कपडे घालून झारा व उलथने वापरून कपडे वरखाली करून घेतात कारण पाणी खूप गरम असते म्हणून हे हातानी करता नाही येत. मग ते कपडे मोरीतच ब्रशने घासून दगडावर आपटून वगैरे सगळे सोपस्कार झाले के मग कपडे परत वॉशिंग मशीनला लावतात. लगेचच ते कपडे धुवून टाकून वाळत व दुपारी ४ ला "ससा"वाल्या जाहीरातींप्रमाणे घड्या घालून कपाटात. धुणे धुवून झाले की मोरी, बादल्या, तपेल्या, घासण्या, वॉ. मशीन पण घासून पुसून जागेवर Happy

सुमेधा Lol तु वाक्य एडिट केलंस ते किती बरं झालं. मला तुझी पोस्ट वाचल्यावर वाटलं कि कोणी तरी शेजारी लास्ट स्टेजला होते, तु त्यांना भेटायला गेलीस तेव्हा तुला त्यांच्या घरच्या स्वच्छतेचा डेमो मिळाला. Proud

अनघा. | 12 November, 2012 - 12:42
अरेरे.. बिचारे कपल... आयुष्याचा मौल्यवान वेळ असा घालवताहेत.
<<

अनघा, रिटायर झाल्यानंतर वेळ कसा घालवावा याचीच खरी काळजी असते Wink बरा आहे ना त्यांना टाईमपास. नैतर माबोवर येतील लिवायला रिकाम्या वेळात :घाबरलेला बाहुला:

>>बरा आहे ना त्यांना टाईमपास. नैतर माबोवर येतील लिवायला रिकाम्या वेळात :घाबरलेला बाहुला:
येऊ द्या, पण येताना बॉयलर, पाणी, साबणचुरा, रवी, झारा, उलथणे, ब्रश सगळे घेऊन या म्हणावे Wink

लेख मजेशीर आहे. पण लेख व प्रतिसाद बघता तो विनोदी लेखन मधे असायला हवा होता असं वाटत.

एकंदर वेंधळेपणाच उदात्तिकरण झालय. A place for everything and everything in its place. हे मानणारा माणूस घरात विनोदाचा धनी होतो. उलट तो घरातही 5S कार्यपद्धतीनुसार वागतो हे अनुकरणीय आहे. पण बहुतेक ते सगळं फक्त ऑफिसपुरतंच असायला हवं. ऑफिसबाहेर परत जैसे थे! मला खरच या लोकांच कौतुक वाटतं, split parsonality असल्या प्रमाणे ऑफिसमधे भलीमोठ्ठी टीम लिलया सांभाळणारे घरी बेजबाबदार आणि वेंधळ्यासारखे कसे वागू शकतात?!

आणि, OCD चा उल्लेख देखिल किती सहज केला जातो. हे लक्षात घ्या,
... while many people who do not suffer from OCD may perform actions often associated with OCD, the distinction with clinically significant OCD lies in the fact that the person who suffers from OCD must perform these actions, otherwise they will experience significant psychological distress.
पण यात आपला दोश नाही....
The phrase obsessive–compulsive has become part of the English lexicon, and is often used in an informal or caricatured manner to describe someone who is excessively meticulous, perfectionistic, absorbed, or otherwise fixated.

OCD?

Lol

कधीकाळी होता आमचा स्कोर ५००० पण आता काय आहे ना, एक माणूस किती लोकांना समजावून सांगणार.. Proud

नेलकटरची धारदार (नख शार्प करणारे बाजू) अश्या अवस्थेत बो**** टोचले , तेव्हा कळले हे कन्या रत्नांचे उद्योग आहेत. लहानपणी माझ्या भितीने वस्तू नी ट ठेवली जायची आता भीती ही उरली नाही. .. आता मीच घाबरते. Proud

आमच्याकडे अस्मादिक क मध्ये आहेत तर सौभाग्यवती अ मध्ये! मात्र नीट ठेवलेल्या वस्तूंपेक्षा ढिगार्‍यातल्या वस्तू लवकर सापडतात. Lol आम्हा दोघांचे एकत्रित रेटिंग काढले तर कुव्यवस्थित निघेल! Biggrin
-गा.पै.

पुन्हा एकदा थॅन्क्स लोकहो.

आगाऊ - तो नं १० चा चहाचा कप वाला पण प्रश्न सही आहे. त्यात मी अ/ब/क तिन्ही मधे असतो कधीकधी. एखादे सेल्फ-हेल्प्/इन्स्पिरेशन पुस्तक वाचले की पुढचे एक दोन चहा "अ", नंतर हळुहळू ब व नंतर कायम "क" मधे. झाडू मारला की कप गडगडत येणे मात्र महान Lol

Pages