उल्लंघन

Submitted by मोहना on 24 October, 2012 - 06:51

"चलायचं?" शांत रस्त्यावर त्याचा दमदार आवाज त्यालाच घुमल्यासारखा वाटला.
"हो, तू सामान घेतलंस ठरल्याप्रमाणे?"
"कमॉन यार, फक्त एक रात्र. उद्या सकाळी परत येतोय आपण." ब्रायनने बेफिकीरपणे उत्तर देत सायकल दामटली. दोघांनीही शर्यंतीत भाग घेतल्यासारखा सायकलचा वेग वाढवला. गप्पांच्या नादात किती अंतर पार केलं ते लक्षात आलं नव्हतं, पण हळूहळू हिरव्यागार झाडीत दडलेल्या काळ्याभोर रस्त्यावरची वर्दळ कमी होत गेली. दोघांच्या सायकली टपरी सारख्या दिसणार्‍या दुकानासमोर थांबल्या तेव्हा पाय भरुन आले होते. वाफाळलेल्या कॉफीने ब्रायनच्या चेहर्‍यावर तरतरी आली.
"तू मरगळल्यासारखा वाटतो आहेस. झेपतोय ना प्रवास?" क्रिसला त्याने टोकरलं.
"मी ठीक आहे. आई, बाबा दोघांचा विरोध होता रात्री राहायला. त्यांना दुखावलं की काय असा विचार करत होतो."
"जाऊ दे ना. आई, बाबा करायचं वय आहे का आपलं. सब बकवास है यार. तू सरळ मजा करायला शीक ना." ब्रायनने बोलता बोलता हाताने टपरीसमोर पडलेला मिठाईचा कण टिचकीने लांब उडवला.
"निघू या? बराच पल्ला गाठायचा आहे." क्रिसने ब्रायनच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं.

पाच हजार फूट उंचीवरच्या माहिती विभागात पोचायला त्यांना तासभर लागला. तिथं पोचल्यावर दोघांचंही भान हरपलं. दोघंही तिथल्या रखवालदारानं टोकेपर्यंत अंधारलेपण अंगावर घेत राहिले. जंगलाची माहिती देणारी सगळी कागदपत्र हातात घेत ते एकेक पायर्‍या उतरायला लागले. खाली पोचेपर्यंत मिट्ट काळोख पसरला होता. वरती घेतलेल्या आणि माहितीपत्रकात मिळालेल्या माहितीवरून अंधारात मुकाटपणे दोन सायकली वाट काटत राहिल्या. अधूममधून सायकली थांबवून बॅटरीच्या प्रकाशझोतात ते नकाशा बघून खात्री करुन घेत होते. सायकलीवर नकाशा पसरुन ठेवताना होणारा आवाजही तिथली शांती ढवळून टाकतो आहे असं वाटत होतं. त्या भयाण शांततेत झाडांची सळसळ, मध्येच उमटणारे विचित्र आवाज दोघांच्या मनातली शंका ठळक करत होते. पण काही न बोलता अनामिक आशेवर ते पुढे सरकत होते.
"आपण रस्ता चुकलोय क्रिस." दुखणार्‍या मांड्यांवर हात ठेवत अखेर ब्रायनने अस्वस्थपणाचा शेवट केला.
"चौथ्यांदा नकाशा बघून बदललेली पायवाट आहे ही. तुला वाटत होतं जोपर्यंत रस्ता दिसतोय तोपर्यत चुकलेलो नाही. पण आपण भरकटलोय. आत्तापर्यंत डांबरी सडक होती. मातीचा रस्ता, पायवाटा तुडवायला सुरुवात करुनही बराच वेळ झालाय." ब्रायन आपलं म्हणणं पटवून देत राहिला.
"मला भिती वाटतेय." क्रिसने एकदम हातातली सायकल सोडून पायवाटेवर बसकण मारली.
"दमायलाही झालंय प्रचंड." ब्रायनने बॅटरीचा प्रकाशझोत क्रिसच्या चेहर्‍यावर टाकला.
"अरे तोंडावर कसला उजेड टाकतोस. बाजूला कर ना आधी." क्रिसच्या चिडचिडलेल्या स्वराची पर्वा न करता ब्रायनने आवाज चढवला.
"तुझं लक्ष दुसरीकडे वळवायचा प्रयत्न करत होतो." ब्रायन उगाचच गडगडाटी हसला. क्रिस त्याच्याकडे पाहत राहिला. का हसतोय हा वरवर आणि इतकं खोटं? प्रश्न त्याच्या ओठावर येण्याआधीच ब्रायनचं वागणं बदललं. तो अस्वस्थ झाला. दोन्ही हातात डोकं धरुन तो मटकन खालीच बसला. म्हणजे यालाही भितीने घेरलंय तर. वरवर तर शूरपणाचा, बेफिकीरपणाचा आव आणतो आहे... मनातले विचार व्यक्त न करता क्रिसने सूत्र हातात घेतली.
"परत जाऊया त्या माहिती विभागात. तो रखवालदार करेल मदत आपल्याला." ब्रायनला क्रिसची कल्पना एकदम पसंत पडली. किती सोपा मार्ग होता इथून बाहेर पडण्याचा. त्याचा चेहरा उजळला. अंगात उत्साह संचारला. सायकलींची चाकं उलट्या दिशेने मार्गक्रमणा करायला लागली.
"हा रात्रीचा अंधार, रातकिड्यांची किरकिर, झाडांच्या काळ्याकभिन्न सावल्या आणि त्यातून मनात निर्माण होणारे चित्र विचित्र आकार. भीती नाही वाटत अशा वातावरणात?" काळोखाचा भेद घेत ब्रायनने विचारलं.
उत्तर न देता क्रिसने पाण्याची बाटली तोंडाला लावली.
"भुताची गोष्ट ऐकायची आहे तुला? सांगू?" ब्रायनने आवाजात घोगरेपणा आणत विचारलं.
खटकन ब्रेक दाबत क्रिसने सायकल थांबवली. वेगानं सायकल हाणणार्‍या ब्रायनच्या सायकलीचा कॅरियर पकडत त्याने सायकल थांबवली. ब्रायनला उतरण्याचाही अवधी न देता क्रिस त्याच्या पोटात गुद्दे हाणत राहिला.
"अरे, अरे मजा करत होतो जरा." कशीबशी स्वत:ची सुटका करत ब्रायन सायकलवरुन उतरला. त्याने क्रिसचे हात घट्ट धरले.
"मला भिती वाटते काळोखाची." ब्रायनच्या खांद्यावर डोकं टेकवत क्रिस हृदयाची धडधड संथ करत राहिला.
"मला पण. मी माझी अस्वस्थता तुझी मजा करुन घालवत होतो. तू एवढा घाबरशील असं नव्हतं वाटलं. चल, छोड दे. सायकली दामटवूया परत."
दोघं न बोलता निघाले. क्रिसला स्वत:च्या भित्रेपणाची शरम आतल्या आत जाळत राहिली. बोलायचं नाही असं ठरवलं असलं तरी त्याला राहावलं नाही.
"तुला आठवतंय ब्रायन? आपण कम्युनिटी हॉलमध्ये बॅडमिंटन खेळायचो. दिवे गेले तो पहिला प्रसंग माझ्या मनातून गेलेला नाही अद्याप. तेव्हाच माझ्या लक्षात आलं अंधारात जीव दडपतो माझा. छातीवर प्रचंड ओझं असल्यासारखं वाटतं. क्षणात दिवे आले नसते परत तर संपलाच असता खेळ."
ब्रायनचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मनातली भिती मनातच दाबून ठेवत स्वत:ला गप्प ठेवण्याचा तो कसोशीने प्रयत्न करत राहिला. विचारांना वेगळी दिशा द्यायचा प्रयत्न करत क्रिसही शांतपणे सायकल चालवत राहिला.

"थांबू या इथेच. मी पाऊलही पुढे टाकू शकत नाही." ब्रायन झाडाखाली कोसळलाच. क्रिसने मुकाटपणे पाण्याची बाटली त्याच्यासमोर धरली. पण ब्रायनच्या रागाचा उद्रेक झाला.
"भेदरट नुसता. एकत्र यायलाच नको होतं. स्वत:चा जीव घाबराघुबरा करायचा, बरोबर इतरांनाही सतावायचं."
"उगाच मला दोष देऊ नकोस. तूच घाबरला आहेस माझ्यापेक्षा." क्रिस सायकलला टेकून उभा राहिला.
"काय करायचं आता?" तिरसटलेल्यासारखा ब्रायन ओरडला.
"सेल फोन वापर." त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता क्रिसने सुचवलं.
"मठ्ठ मुला. एवढी सोपी गोष्ट मी केली नसेन का? बॅटरी संपली आहे केव्हाच."
रागाच्या भरात त्याने फोन भिरकावला.
"फेकतोस काय फोन?" क्रिस फोन उचलायला वळला. पण अचानक अंगात काहीतरी संचारल्यागत ब्रायन धावत पुढे गेला आणि त्याने पुन्हा फोन दूर फेकला. क्रिस बेचैन होत माघारी परतला. ब्रायनचं वागणं त्याला आश्चर्यचकित करत होतं, बुचकळ्यात टाकत होतं.
"तू दमला नाहीयेस ब्रायन. माझ्यापेक्षाही घाबरला आहेस आणि ते नाकारण्याचा प्रयत्न म्हणून मला दूषणं देतो आहेस. मी उगाचच तुला धाडसी समजत होतो." क्रिसला आपलं निरीक्षण नोंदवल्यावाचून राहवेना.
"मानस शास्त्रज्ञ समजतोस स्वतःला? आयला, इतकी वर्ष आपण एकमेकांना जीवलग दोस्त म्हणवतो आणि एक रात्र एकत्र काढणं जमत नाही. दोषारोप आणि अवगुणांची चिकित्सा चालली आहे नुसती. झोप आता." ब्रायनने त्याचं म्हणणं एकदम उडवूनच लावलं.
"मला वाटत होतं त्यापेक्षा फार वेगळे आहेत आपले स्वभाव." क्रिसला झोप येत नव्हतीच पण खूप बोलावं असंही वाटत होतं.
"चल काही तरीच. दहा वर्षातली ओळख एकदम कशी बदलेल?" ब्रायनने क्रिसचं म्हणणं धुडकावून लावलं.
"माणसाची खरी ओळख कठीण प्रसंगात होते." तितक्याच शांतपणे क्रिस उत्तरला.
"बकवास बंद कर आणि मुकाट्याने झोप बाबा आता तू. परत जायचा रस्ता सापडणं मुष्कील झालं आहे. माहिती विभागापर्यंत परत कसं पोचायचं ते कळेनासं झालं आहे. आता कुठे अडकलो आहोत ते माहीत नाही. इथेच झोपू आणि सकाळी उठून बघू पुढे काय करायचं ते."
ब्रायनने संभाषण संपवलंच. एकदा निर्णय झाल्यावर दोघांची थकलेली गात्रं क्षणात विसावली.

सकाळी जाग आली ती क्रिसला. घोरत पडलेल्या ब्रायनची झोपमोड न करता उजेडाची चाहूल घेण्याचा तो प्रयत्न करत राहिला. फर्लागभर इकडे तिकडे भटकूनही गर्द झाडीशिवाय काहीही दृष्टीला पडेना तसं त्याला परतावंच लागलं.
"कुठे आहोत आपण?" डोळे चोळत ब्रायन एव्हाना उठून बसला होता.
"जंगलात हरवलोय. उंच झाडांशिवाय काहीच दिसत नाही नजर टाकू तिकडे."
ब्रायनला एकदम वास्तवाची जाणीव झाली, त्याचबरोबर भूकेचीही.
"काहीतरी पोटात ढकलायला हवं. आपल्या घरातली माणसं लागली असतील का तपासाला?"
"तंबू ठोकून त्यात आहोत असाच समज झाला असेल. आज संध्याकाळपर्यत घरी पोचलो नाही तर शोधाशोध सुरु होईल." थकल्या स्वरात क्रिस म्हणाला.
ब्रायन ताडकन सावरुन बसला.
"मी आवरतो माझं आणि मग तू एक दिशा पकड, मी दुसर्‍या दिशेने जातो. कुणीतरी एक पडूच जंगलाच्या बाहेर आणि मग मदत मिळवून दुसर्‍याच्या मदतीला परत येऊ."
"नको, नको. तसं नको करायला. आत्ता आपण एकत्र आहोत. एकमेकांना धीर देऊ शकतो. एकेकटे पडलो की पुन्हा एकमेकांना शोधणंही कठीण जाईल." क्रिसने त्याचा पर्याय धुडकावून लावला.
"तू इथं राहा. मी पुढे पाहून येतो." ब्रायनने तयारी दर्शविली.
"नाही. एकत्रच राहायचं आपण." क्रिसच्या ठाम स्वराने ब्रायन वैतागला.
"कुठलाच मार्ग पटत नाही तुला. कर तुला काय करायचं ते." रागारागाने त्याने येरझार्‍या घालायला सुरुवात केली. काहीतरी तोंडात टाकण्यासाठी त्याने पिशवी उलटसुलट केली. त्यात खायला काही सापडेना तसा त्याचा पारा चढला. गोल गोल फिरवत त्याने जोरात पिशवी आपटली.
"माझ्या थर्मासमध्ये दोन घोट आहेत कॉफीचे." क्रिसला त्याचं वाक्यही पुरं करु न देता ब्रायनने थर्मासच तोंडाला लावला. सगळी कॉफी संपली तसा तो भानावर आला. क्रिसचे आभार मानण्याचं सोडाच त्याला एखादा घोट ठेवण्याचंही त्याला सुचलं नव्हतं.
"तुला विचारलंच नाही मी. भुकेपुढे कोसळलायच होतं मला." पुढे काय बोलावं तेच त्याला सुचेना. क्रिस हसला.
"चल, ताजातवाना झाला असशील तर मार्गक्रमणेला सुरुवात करु."

चालता चालता दोघं एकमेकांना माहीत असलेल्या गोष्टीच पुन्हा पुन्हा सांगत होते. नाही म्हटलं तरी दहा वर्ष ते शेजारीच वाढले होते. पण तरी क्रिसचा अतिव्यवस्थितपणा, व्यवहारी दृष्टिकोन याव्यतिरिक्त त्याची फारशी ओळख नव्हती असं वाटत होतं ब्रायनला. एकत्र दंगामस्ती, मित्रमैत्रिणी सगळ्या वरवरच्या विषयातूनही त्यांना आपण जवळचे मित्र आहोत असं वाटायचं. क्रिसचं प्रसंगावधान, हुशारी आज प्रथमच ब्रायनच्या लक्षात येत होती. ब्रायनच्या वागण्याचं सुप्त आकर्षण असणार्‍या क्रिसला त्याचा उतावळेपणा आणि बेजबाबदार वृत्ती इथे आल्यावरच लक्षात आली. त्याच्या या स्वभावामुळे परिस्थितीवरील ताबा सुटू शकतो या विचाराने क्रिसला घेरलं होतं.
"तू अजून जातोस मानसोपचारतज्ज्ञाकडे?" अचानक क्रिसने विचारलं.
"सहा महिन्यातून एकदा. आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्या वेळेस आठवड्यातून एकदा जात होतो. आमच्या सुखी कौटुंबिक जीवनाचं चित्र तिनं पायदळी तुडवलं त्याचा राग मनात धुमसत होता. वाटायचं, बाबासारखा नवरा, तीन मुलं सगळं सुरळीत असताना आईला काय गरज होती असा वेडेपणा करण्याची?"
"ते कोडं शेजारीपाजारी अजून सोडवतायत. सगळ्यांना वाटायचं तुझ्या बाबाचं प्रकरण असावं बाहेर, पण ते तसे नाहीत हेही जाणून होते सारे. त्यामुळे आत्महत्येच्या प्रयत्नाचं खरं कारण कधी कुणाला कळलंच नाही. तुझी आईपण सहा महिन्यात पूर्वीसारखी हसती खेळती झाली. साराही बर्कलेला गेली ना पुढच्या शिक्षणासाठी?" क्रिसने कितीतरी वर्ष मनात असलेला प्रश्न विचारला. ब्रायन काही क्षण नुसताच क्रिसकडे पाहत राहिला.
"तेच कारण होतं आईच्या आत्महत्येच्या प्रयत्नाचं."
"म्हणजे?" क्रिसला त्याच्या बोलण्याचा अर्थ उलगडेना.
"सारावर तिच्या मैत्रिणीच्या वडिलांनी बलात्कार केला होता. पण ती स्वत:च्या कोशात राहिली. सुगावाही लागू दिला नाही तिने. तिच्या मनात गावातून बाहेर पडायचं एवढा एकच विचार घोळत होता. बर्कलेला प्रवेश मिळाला तो आईच्या आत्महत्येच्या प्रयत्नाच्या आधी." क्रिसला संकोचल्यासारखं झालं. असं काही झालं असेल या शक्यतेचा विचारही त्याच्या मनात आला नव्हता.
"ब्रायन, तू मला हे सगळं सांगितलं नाहीस तरी चालेल रे. मला कळतंय तुला किती त्रास होतो आहे सांगताना." घाईघाईने क्रिसने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.
"कुणाला तरी कधी ना कधी तरी सांगितलंच असतं ना. मी देखील कोंडून ठेवलं आहे सगळं मनात. ज्या दिवशी बर्कलेच्या प्रवेशाचं साराने सांगितलं त्याच वेळेस बलात्काराचंही. बाबा एकदम पेटून उठले. आई दु:खाने काळवंडली आणि मी भावनेच्या भोवर्‍यात अडकलो. निराशेचे झटकेच यायला लागले. सतत मनाला अस्वस्थपणाने घेरलेलं असतं. तो लपवताना निष्काळजीपणा पांघरावा लागतो. जीव गुदमरतो. फार फार थकवा येतो, मनाने, शरिराने दुर्बळ होऊन जायला होतं अगदी. साराने आपल्या मनातलं दु:ख सांगण्याएवढं जवळचं मानलं नाही, त्यामुळे करण्यासारखं काही उरलं नाही या रागाने बाबांनी साराशी अबोला धरला. परिस्थिती इतकी ताणली गेली की आत्महत्येनंच या सगळ्याचा शेवट होईल असं आईच्या मनाने घेतलं."
"बापरे, मला कल्पनाही करवत नाही." क्रिसच्या शब्दातून हळुवारपणा ओथंबत होता.
"त्यातून आई वाचली आणि बाबांनी तिला पुन्हा हसतंखेळतं केलं. आता मीही तसा ठीक आहे." अचानक मनावरचा ताण ओसरल्यावर ब्रायनला थकवा आला. त्याने मातीत अंग टाकलं.
"तब्बल दोन तास सायकली दामटवल्या आपण." क्रिसही तिथेच टेकला.
"भूक लागली आहे जबरदस्त. तुझ्याकडे उरलय काही?"
"संपलय सगळं." क्रिसच्या स्वरात निराशा होती.
"काहीतरी कर रे बाबा. तीन दिवस झाले. पोटात अन्नाचा कण नाही गेलेला. पाण्यावर किती दिवस काढायचे? एक वहाळ शोधायला दोन तास. मला नाही जमणार हे. मारुन टाक तू मला. मारून टाक एकदाचं." अचानक क्रिसचे हात जबरदस्तीने ब्रायनने आपल्या गळ्याभोवती आवळून घेतले, गुंतवले. क्रिस भडकला.
"मुस्काट फोडून टाकेन तुझं. शांत हो बघू आधी तू. काय हा वेडेपणा. किती उतावळेपणा करतोस."
हमसाहमशी रडत ब्रायन बाजूला झाला. दोघं एकमेकांशी एक शब्द न बोलता पडून राहिले. पाचदहा मिनिटात ब्रायनचा डोळा लागला. थोडावेळ क्रिस विचार करत राहिला. कधीतरी आपसूक तोही झोपला.

रात्री अपरात्री केव्हातरी झोपेत ब्रायन चाळवला. उठून बसला आणि रडायलाच लागला. जीवघेणी शांतता दोघांच्या मध्ये रेंगाळली.
"क्रिस मी आता एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही. तूही दमला आहेस ते ठाऊक आहे मला. पण मानलं तुला. तुझ्या इतकी सहनशक्ती माझ्यात नाही."
बोलता बोलता ब्रायनचं पोट ढवळून निघालं. पोट दाबून तो तिथून बाजूला झाला. उलटीची भावना येत असूनही त्याला कोरडा खोकला येत राहिला. बराचवेळ. क्रिस न बोलता ब्रायनच्या पाठीवर थोपटत राहिला.
"तू निघ मला सोडून. नाही तर इथेच मरु आपण." खोकला थांबला तसं ब्रायन क्रिसला विनवीत राहीला.
"तू विश्रांती घे म्हणजे असे विचार डोकावणार नाहीत. तुला सोडून कसा जाईन मी? आपण असं करु, ही जागा मुक्कामाची म्हणून ठरवू. तू इथेच थांब. मी मदत मिळवण्याचा प्रयत्न करतो. नाहीच तर परत इथेच भेटू. तू हलू नकोस." क्रिसच्या बोलण्यावर विचार करण्याचीही क्षमता ब्रायनमध्ये उरली नव्हती. तो निपचीत पडून राहिला. ब्रायनचा डोळा लागल्यावर क्रिस उठला. एकाकी, मदतीच्या आशेवर वणवण फिरत राहिला. पिशवीत कोंबलेल्या छोट्या आरशाच्या प्रतिबिंबाने लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत राहिला. पण प्रकाशाची तिरीपच झाडांमधून आत येत नव्हती तिथे त्या आरशाचा काय उपयोग? पाय रेटत, थकलेल्या देहाने तो मुक्कामाच्या ठिकाणी परतला. ब्रायन निपचीत पडून होता. क्रिसच्या मनातलं ब्रायनच्या बेदरकारपणाचं सुप्त आकर्षण आता त्याच्याबद्दलच्या करुणेत बदललं. तो तसाच बसून राहिला. त्या रात्री चारपाच वेळा ब्रायनला उलट्या झाल्या. त्याचं पोटही खराब झालं. अन्नपाण्यावाचून उकिरडा झालेल्या त्या जागेवरुन ब्रायनला अक्षरश: ओढत, फरफटत त्याने बाजूला नेलं.

दोघांचाही डोळा लागेना. गलितगात्र अवस्थेत रात्र कशीबशी पार पडली. डोळा लागतोय असं वाटत असतानाच क्रिस दचकून जागा झाला ते ब्रायनच्या गदगदा हलवण्याने. तेवढ्या श्रमानेही ब्रायन परत कोसळला. अडखळत त्याच्या तोंडातून कसेबसे बाहेर पडले.
"क्रिस, माझा जीव घे, मदत कर मित्रा. मारुन टाक, मारुन टाक रे मला. पाय धरतो तुझे पण असा जिवंत नाही राहू शकत मी."
"काय बोलतोस हे ब्रायन?" क्रिस हवालदिल होऊन रडायला लागला.
"तू शांतपणे विचार कर क्रिस. इथून जंगलाबाहेर आता शोधपथकाशिवाय पडूच शकत नाही आपण. तुझ्यावरही मर्यादा पडतायत माझ्यामुळे. माझी औषधंच वाचवू शकतात मला. पण ती इतक्यात मिळण्याची शक्यता नाही. असातसा मरणारच आहे तर तूच यातनांतून सुटका कर माझी. तुलाही माझ्या अडथळ्याशिवाय रस्ता शोधणं सोपं पडेल."
क्रिसने जीर्ण झालेल्या ब्रायनला घट्ट आलिंगन दिलं.
"दोस्ता तुझा उतावळेपणा बोलतोय हा. भलतंच काही तरी सांगू नकोस. आपल्या शोधाला सुरुवात झालेली असेलच. अजून दोन तीन दिवस असेच काढू शकतो आपण. नंतर रुग्णालयातच हलवतील आणि तब्येती सुधारतील."
ब्रायनच्या नजरेला नजर देत क्रिसने त्याच्या आशा वाढवण्याचा क्षीण प्रयत्न केला. तो थोडासा शांत झाल्यावर क्रिस उठलाच. काही करुन त्याला जंगलाच्या बाहेर पडायचं होतं. मदत मिळवायची होती. पायात जोर नसला तरी पावलं भरभर टाकण्याचा तो प्रयत्न करत होता.
’खरंच ब्रायनला मारावं लागलं तर?" क्रिसच्या अंगावर मनात डोकावलेल्या या विचारानेच काटा आला. दहा वर्ष संगतीत असलेल्या मित्राला आपण असा कायमचा निरोप द्यायचा?
ब्रायनच्या अवस्थेवरुन एखादाच दिवस आणखी असं वाटत होतं. मग कशाला जीव घ्यायचा? नैसर्गिकपणे जे होईल ते होईल. पण हाच शेवट असेल तर यातनातून तरी सुटका होईल त्याची माझ्यामुळे. कधी किडामुंगीलाही न दुखावलेल्या क्रिसच्या छातीचे ठोके कल्पनेनंच ढोलकी बडवल्यासारखे कानात आपटायला लागले. तो तसाच माघारी पळत सुटला. घसा कोरडा पडलेल्या, घामाघूम क्रिसला आता हृदयविकाराचा झटका स्वत:लाच येईल असं वाटत होतं.
"फार लांब नाही गेलो. तुझ्याबद्दलच्या विचारांनीच शीण आला. काळजीने धावत आलो परत." क्रिसच्या जवळ जाऊन तो गुडघ्यावर बसला. ब्रायनच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या.
"तुझ्यासारखा मित्र लाभला मला. नशिबवान आहे मी. कृपा कर मित्रा. सोडव मला यातनातून. खुनाचा आरोप नाही यायचा तुझ्यावर. सांगूच नको कुणाला काय घडलं ते. दूर दूर निघून जा. ऐक माझं." इतकं बोलतानाही ब्रायनला धाप लागत होती. शब्द ओठातून बाहेर पडताना अडखळत होते.
क्रिसच्या कानावर एकेक शब्द आदळत होता. पण नजर शून्याचा वेध घेत होती. त्याचा हात कधी खिशात गेला हेही त्याला कळलं नाही. खिशातली छ्प्पनसुरी एका झटक्यात त्याने ब्रायनच्या हाताच्या शिरेत घुसवली. मनगटातून रक्ताची धार लागली. आधीच जीर्ण झालेल्या त्या कुडीने क्षणात विसावा घेतला.

तांबारलेल्या नजरेने क्रिस गोठल्यासारखा पाहत राहिला. जोरात किंचाळावंसं वाटूनही त्याच्या घशातून आवाज फुटेना. तो ब्रायनला गदगदा हलवित राहिला. दु:खाने कोसळला. ब्रायनने सांगितल्याप्रमाणे त्याला तिथून हलवेना. निष्प्राण झालेल्या मित्राची संगत त्याला सोडवेना. सडत जाणार्‍या देहाची भुकेल्या, थकलेल्या मनानं क्रिस राखण करत राहिला.

तब्बल बहात्तर तास गुडघ्यात डोकं खुपसून बसलेल्या क्रिसचा चेहरा बॅटरीच्या प्रकाशझोतात उजळून निघाला.
"ब्रायननेच करायला लावलं हे, त्याच्यामुळेच केलं मी हे कृत्य. मदत हवी होती त्याला. मदत." ब्रायनच्या आई वडिलांच्या नजरेला नजर देत क्रिस त्याच्या आई वडिलांच्या कुशीत कोसळला.

हातातल्या पाकिटावर ब्रायनच्या घरचा पत्ता लिहीत वडिलांच्या हातात पत्र सोपवलं आणि क्रिसने केविलवाण्या चेहर्‍याने तुरुंगातल्या बाकड्यावर देह टाकला. चेहर्‍यावर आडवा हात टाकून तो तसाच पडून राहिला. पुढे काय हे प्रश्नचिन्ह होतं. कोर्टाचा निकाल त्याच्या हातात नव्हता. आई- वडिलांचे काळवंडलेले चेहरे पाहून पोटात ढवळून निघत होतं. पण कुठं तरी आपलं मन त्यांना कळल्याच्या खुणा पाहिल्यावर क्रिसच्या मनाला थोडीफार शांतता लाभली.
आता पुढचा मार्ग असेल तसा स्वीकारण्याची मानसिक तयारी झाली होती क्रिसची. तरीही ब्रायनच्या आई वडिलांनी आपली आणि त्यांच्या मुलाचीही बाजू समजून घ्यावी एवढीच क्रिसची इच्छा होती. ब्रायनचे आई वडील सारी हकिकत ऐकतायत, पत्रातलं अक्षर न अक्षर पुन्हा पुन्हा वाचतायत, त्यांनी क्रिसला, ब्रायनला दोघांनाही समजून घेतलं आहे. डबडबून आलेल्या डोळ्यांसमोचं अंधुक चित्र भंगता नये इतकाच ध्यास त्याच्या मनाला लागला....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

तृष्णा धन्यवाद,
Harshalc, अनुवाद नाही, केव्हाकेव्हा तर्कात न बसणार्‍या गोष्टी घडतात आयुष्यात. सत्यकथा आहे ही.

कथा छान आहे. एकदम वेगळ्याच विषयावरची आणि गूढ!
पण हर्षलशी सहमत.. मधल्या काही वाक्यांमधे सुसंगती वाटत नाहीये, क्रिस बोलतोय का ब्रायन ते कळत नाहीये.. उदा. - >>ब्रायनला जाग आली ती क्रिसच्या गदागदा हलवण्याने.
"क्रिस मदत कर मला. मारुन टाक रे मला. पाय धरतो मी तुझे पण असा जिवंत नाही राहू शकत मी.">>

हे 'क्रिसला जाग आली ती ब्रायनच्या गदागदा हलवण्याने' असं पाहिजे का? तरच पुढच्या वाक्याचा संदर्भ लागतो.
किंवा
>>"क्रिस मी आता एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही. तूही दमला आहेस ते ठाऊक आहे मला. पण मानलं तुला. तुझ्या इतकी सहनशक्ती माझ्यात नाही. माझा मधुमेह आणि वजन हे ही कारण असेल.>> मधुमेह आणि वजन हा क्रिसचा प्रॉब्लेम आहे ना?

एकदा परत मुद्रितशोधन कराल का?

मजा आली वाचताना. खरेच अनुवादीत असल्या सारख्या लिहिता कथा! आता तुमच्या आधीच्या कथा वाचल्यामुळे हे माहीत आहे मला. काहीतरी वेगळाच अनुभव देऊन जाणार्‍या असतात तुमच्या कथा.

अजून येऊ द्या प्लीज!

क्रिसने जीर्ण झालेल्या ब्रायनला घट्ट आलिंगन दिलं. >>> जीर्ण शब्दाचा वापर जरा खटकला मला इथे!

समहाऊ पटली नाही. जर क्रिस काहीच न खाता-पिता जिवंत राहु शकला तर कॉफिचे २-३ का होईना.. पण घोट घेऊन ब्रायन तग धरु शकला असता. तो काही दुर्धर आजाराने खंगलेला आणि अगतिक झालेला नव्ह्ता त्याला क्रिसने इच्छामरण द्यायला.

२-३ दिवसात उपासमारीने आणि दमल्याने कोसळलेल्या माणसाला लगेच मरणच द्यायचे असेल तर 'मॅन वर्सेस वाईल्ड' किंवा 'आय शुडन्ट बी अलाईव्ह' या कार्यक्रमातले लोक मुर्ख असतात का? ऑनेस्टली मला ब्रायनला अजुन एखाद दिवसात नैसर्गिक मरण आलंच असतं हेही पटत नाही. माणसाचं शरीर इतकं कमकुवत असतं का?

सॉरी मोहना.. पण हेमाप्राम.

पियू - धन्यवाद. ही कथा लिहून खूप वर्ष झाली. पुन्हा वाचून स्पष्टीकरण देत नाही Happy त्यावेळेस त्या दोन मुलांची बातमी टी. व्ही. वर सारखी असायची. त्या बातमीवरुन मिळालेली माहिती शोधून लिहिलेली कथा आहे.

Patli nahi as 2- 3 diwsat koni marat nahi .. Mi swata tracking la jato .. I know that

Back to top