अशात तुमच्यावर परगावच्या येणाऱ्या पाहुण्याला घरापर्यंत मार्गदर्शन करायचा प्रसंग ओढवलाय का? माझ्यावर ही वेळ नेहेमी येते (बाहेरून येऊन पुण्यात स्थायिक झाल्यामुळे येणारे-जाणारे ‘पावणे’ भरपूर असतात. एके दिवशी अचानक फोन येतो.
“हॅलो, मी आलोय पुण्यात. आहात का घरी?”
“अरे वा.. अलभ्य लाभ. कुठे उतरलात? स्वारगेटला ना?”
“नाही, पिंपरीत उतरलोय मी”
“तिकडे कुठे?”
“कालच आलोय, भाच्याकडे उतरलोय. काम झालंय. म्हंटलं जाता-जाता भेटून जावं”
“बरं, बरं. या की मग. मी घरीच आहे”, बायकोला विश्वासात न घेता परस्पर या म्हंटल्याचं एक कलम तर नक्कीच लागलं, आता सांभाळून बोलायचं.
“कसं यायचं?” आली प्रश्न-पत्रिका माझ्या हातात... आपका समय शुरू होता है अब!
“सहकार-नगरची बस पकडा तिथून... आणि मग..”
“बस नाही हो, गाडी आहे आपली, मारुती. कसं कसं यायचं ते सांगा..” आजकाल सोम्या-गोम्याही गाडी घेतोय, आम्हीच आपले डोक्यावर पालथ्या कढया पेलत दुचाक्या पळवतोय ‘माझी गाडी, माझी गाडी’ करत.
“ओह.. मग सोप्पं आहे. बॉम्बे-पूना रोडनी संचेती पाशी आलात ना, की मग...”
“किती वेळ लागेल साधारण?”, आलाच प्रश्न, एका वाक्यात उत्तर द्या.
“निदान २५ मिनिटे...”
“अरे बापरे... लांब आहे की हो” तरीही तुम्ही तडमडणारच, माझ्या पत्रिकेतच आहे ते, आय नो.
“..........”
“तर मग, संचेतीपासून आत वळलात की...”, लहानपणी थांब तुला कापूस-कोंड्याची गोष्ट सांगतो असं नुस्त सांगून छळायचे तसं आता मीच मला छळून घेत होतो.
“एक मिनिट, बाळूशी बोला, तोच चालवतो गाडी”, आओ ठाकूर, बाळू तर बाळू.
(बाळू: तुम्हीच बोला अन मला सांगा की, माझी नाही ओळख..)
(पाहुणे: अरे पत्ता समजून घ्यायला काय ओळख पाहिजे? घे तूच फोन..)
“हां बोला”
“अरे बाळू, मी काका बोलतोय... काय म्हणतोस? आता मोठा झाला असशील ना तू”
“काका मी डायवर हाय, कसं याचं सांगा”, घासून चरे पडलेली डीव्हीडी फसकन बाहेर यावी, तसं मला खजील होतं क्षणभर.
“ओह.. बॉम्बे-पूना रोडनी संचेती पाशी आलास ना...” की तिथेच भरती व्हा असं ओठावर येतं अगदी.
“कर्वेनगरला याचं ना, मग ते उलट होईन ना”
“उलटं कुठे? पिंपरीहून निघालात की...”, मनात विचार येतो, का बुडवले मी प्राणायामाचे वर्ग? आत्ता पेशन्स नसता का राहिला याच्याशी बोलताना?
“आमी ढेक्कनलाय काका आता, पिम्परीस्न सकाळीच निगलो...काम करत करत”
“ऑ, बरं बरं. तुम्हाला कर्वेपुतळा माहिती आहे का?”
“पिंपरीतला?” पिंपरीत तुझ्या पप्पांनी उभारला होता कारे बाळंभटा?
“कोथरूडचा”
“तो कुठशीक आला?” प्रश्न ३.क योग्य ‘जोडे’ लावा.
“म्हणजे माहित नाही...”, माझा थंड निष्कर्ष.. वा, जमला की मला वेडा-वाकडा का होईना कुंभक की रेचक.
“..........”
“पौडफाटा?”
“म्हाईत हाय की” देव पावला.
“हं, तर पौडफाट्या वरून सरळ कर्वेपुतळ्याकडे यायचं” अक्षरशः ड्रॅग अन ड्रॉप करतोये मी या बाळ्याला.
“म्हंजे ते पुलावरून जायचं का?”, नको म्हणून कोकलतोय तरी गेलंच बाळ ‘वळणावर’
“नाही, नाही, पुलावर जायचंच नाही, सरळ यायचं, चढायचंच नाही पुलावर...” मनात येतं, जा लेका, तसाच सरळ मुळशीपर्यंत जा आणि टाटाच्या तळ्यात उतर गाडीसकट.
“पुलाचं काम चालूय का?” याचा मेल आयडी नक्कीच चांभार@चौकशी.कॉम असावा
“.........वाटेत एक मंदिर लागेल, डाव्या बाजूला मृत्युन्जयेश्वराचं... त्यावरून सरळ यायचं”
“लय लाम्बय”, लांब तू आहेस लेका, मी इथंच राहतोय ५ वर्षानपासून.
“पुढे कर्वेपुतळा येईल, तिथे थांबायचं डाव्याबाजूला”
“तिठं राहता का तुमी?” तिथं कर्वे राहतात कर्वे. चहा पण पाजतील तुला चौथऱ्यावर चढून गेलास तर.
“नाही, मी तिथे राहत नाही, पण मी स्वतः तिथे येतोय, कारण यापुढे मार्गदर्शन करायची शक्ती नाही माझ्यात”, मी स्पष्टच सांगतो.
“बरय मंग. थांबतो कर्वेमंदीरपाशी”, उपकार झाले दोस्ता.
“...........”
थोड्या वेळानी पुन्हा फोन.
“आलो आम्ही इथे, तुमी कुड्य?” बाळ्याच आहे पुन्हा राशीला. पावणे झोपले वाटतं मागच्या सीटवर वाटेत फुल-मस्तानी झोकून आणि बाळ्याला माझ्यावर ‘छु’ करून.
“कुठे आलात तुम्ही? मी इथेच आहे.”
“आमीबी इथंच हाये” अरे काय चाललंय? तुम्ही पण तिथे, मी पण तिथे. मग दिसत का नाही एकमेकाला? बाजूचा पोलीस आता माझ्याकडे उगीच सावज न्याहाळत घुटमळणारा ‘मंगळसूत्र’ चोर समजून संशयानं पाहायला लागतोय.
“काय दिसतंय तुम्हाला आजूबाजूला? खूण सांग ना एखादी”
“संदीप चप्पल मार्ट” काय पण जगातलं आठवं आश्चर्य, भाग्यच पुण्याचं इतकं प्रसिद्ध ठिकाण इथे?
“अरे मोठं काहीतरी आजूबाजूला दिसत असेल तर सांग बाबा” मग आजूबाजूला चौकशी. बहुतेक पाहुणे पण वामकुक्षी संपवून उठले असावे एव्हाना.
“गणपती-माथा मंदिर हाये इथं, तुमी कर्वे-मंदिर मनाले होते”, यांचा आख्खा कळप पार वारजे पूल ओलांडून पलीकडे गेला होता रे देवा. एक क्षण मला विम्बल्डन च्या टेनिस कोर्ट वर जाळीपाशी उंच स्टुलावर बसल्यासारखं वाटलं. यांना आता थांबवलं नाही तर मी रात्र उलटून गेली तरी संचेती ते वारजे नुस्त इकडून तिकडे मान हलवत आणि फोन वर बोलत बसणार अशी चिंता वाटायला लागली.
“कर्वे मंदिर नव्हे मर्दा, कर्वे पुतळा.... आणि मंदिर मृत्युंजयेश्वराचं होतं रे बाळ”, आता-मी@व्याकूळ.कॉम
“नवीन हाये का ते?” ...... नाही, बांधतो आता तुझ्या नावानं चंदा गोळा करून सकाळपर्यंत.
“आता कृपया आहे तिथेच थांब, मी येत आहे, माझी लाल रंगाची होंडा मोटारसायकल आहे, निळा टी-शर्ट आहे” एका दमात स्वतःचं अगदी ‘पोलिसी’ वर्णन करून मी फोन कट करतो, तोच हिचा फोन
“अरे कुठयेस तू? सारखा फोन एंगेज लागतोये तुझा...”
“माझा ना? लागणारच ना, एंगेजमेंटच आहे ना माझी आज, एंगेजच लागणार...”
“काय बडबडतोयस तू? त्यांचा फोन आला होता लँड-लाईन वर... काहीही खायला करू नका, लगेच निघणार आहे म्हणून”
“ठीक आहे, त्याचं जाऊदे, माझ्यासाठी करशील का काहीतरी खायला? सॉलिड भूक लागलीये मला पाहुणे-पाहुणे खेळून” एवढं बोलून मी हेल्मेटचा पट्टा लावत किक मारतो आणि गाडी उलट्या दिशेने फिरवतो.
हे खत्तरनाक जमलंय. वाक्या
हे खत्तरनाक जमलंय. वाक्या वाक्याला हसत होते



आमच्यावर ही वेळ सारखीच येते त्यामुळे कदाचित जास्तच "भिडलंय"
मी डायवर हाय, टाटाचं तळं, संदीप चप्पल मार्ट, "गेलाच वळणावर" , चांभार्@चौकशी.कॉम>> एकदम ओरिजिनल
सगळे लेख एकत्र टाकून गायब नाही होणार नं तुम्ही?
@नताशा ताज्या गरम-गरम
@नताशा ताज्या गरम-गरम प्रतिसादाबद्दल धन्यवाद. काय गायब होत नाही मी.... चिंता करू नका
जबरदस्त .. लई हसवलं तुम्ही
जबरदस्त ..:)
लई हसवलं तुम्ही
अमेरिकेत नवीन होते , मी नुस्त रस्त्याच नाव लक्षात ठेवायचे .. ओक..
मग गोंधळच गोंधळ..
एकाच गावात ओक लेन्/स्ट्रीट्/सर्कल्/रोड्/प्लेस/बुलिव्हर्ड वगैरे वगैरे...
मस्त मजा आली. उलटी कढई भारी
मस्त मजा आली. उलटी कढई भारी
@विनू बापरे, अगदी
@विनू बापरे, अगदी 'ओक'सा-बोक्शी रडेन मी तर अशा ठिकाणी पाहुण्यांनी पत्ता शोधत पिडलं तर
पुना एकदा लय भारी.
पुना एकदा लय भारी.
भारी आहे हे तुमचे इतर लेख
भारी आहे हे
तुमचे इतर लेख वाचायला घेते आता 
मुंगेरी लालः आता जीपीएस नी
मुंगेरी लालः आता जीपीएस नी रस्ता शोधणं अतिशय सोपं केलय.
रस्त्याची नाव्/घर नंबर व्यव्स्थित लिहलं असत, नकाशात नीट असतं,
कुणी ओक च्या मागे-पुढे काही लिहून त्याचं बोक्/डोक वगैरे करण्याचे चान्सेस पण नसतात..
तो वरच लिहलेला माझाच वेंधळेपणा..कर्वे पुतळा न मंदिर सारखा
हाही भारी लेख! मला
हाही भारी लेख!
मला कर्वेपुतळ्या ऐवजी शिवाजी पुतळ्याबद्दल सांगावे लागते फक्त! 
हे पण भन्नाट जमलंय. आम्ही दर
हे पण भन्नाट जमलंय.
आम्ही दर २-३ वर्षांनी पुण्यात जातो, तिथे गेल्यावर प्रत्येक वेळी पुणे अजून बदललेले असते, आम्ही मारुतीमधूनच फिरतो, डायवर असाच कोणीतरी बाळ्या असतो, त्यावर दूरदूरचे नातेवाईक आणि मित्रमंडळींना भेटायचा घाट घालतो, आम्ही पुण्याच्या एका टोकाला आणि भेटायची ठिकाणं दुसर्या टोकांना असतात, आम्ही वेळ वगैरे ठरवून जरी गेलो तरी अगदी असंच सगळं सेम टू सेम घडत असतं.
आता समजलं की दुसर्या बाजुला काय आग लागते ते!!! 

देवा गुगला, जरा डीटेल मॅप टाक रे बाबा, गल्ली-बोळ, वन-वे, इ. इ. माहिती दे की.
अतिशयोक्ती सोडली तर पाहुणे
अतिशयोक्ती सोडली तर पाहुणे आवर्जून धडपडत घरी येणं ही आता पर्वणीच असते. कितीही त्रास झाला तरी आपली 'आज कुणीतरी यावे' ही ओढ चिरंतन आहे, हेच खरं.
मस्तच मुंगेरीलाल
मस्तच मुंगेरीलाल
मस्तच.... खुप आवडलं......
मस्तच.... खुप आवडलं......
बेस्ट आहे!! घासून चरे पडलेली
घासून चरे पडलेली डीव्हीडी फसकन बाहेर यावी, तसं मला खजील होतं क्षण>>> हे तर ज-ब-री!!
छानेय!
छानेय!
एकदम मस्त मुंगेरीलाल!
एकदम मस्त मुंगेरीलाल! त्यामानाने आमची ठाण्याची घरं हमरस्त्याला लागूनच आहेत. त्यामुळे आम्हाला आमचीच फारशी करमणूक करून घेता येत नाही!
अशा वेळेस आपल्यासारख्यांचा परानुभव कमी येतो!
आ.न.,
-गा.पै.
मस्तच!
मस्तच!
चांभार्@चौकशी.कॉम,व्याकूळ.कॉम.. उलटी कढई >> सही शब्द!!
मस्त. तुमची शैली खूप आवडली.
मस्त. तुमची शैली खूप आवडली.
मस्त मस्त
मस्त मस्त
>>>संदीप चप्पल मार्ट वरून
>>>संदीप चप्पल मार्ट वरून आठवलं,
<<<
एक असाच बावळट बाळ्या (नवरोबाचा मित्र) अमेरीकेत नुकताच आलेला कामासाठी.. गाडी (IDP चालत होते तेव्हा) रेंट केली , आम्ही जेवण करून वाट बघतोय.. आम्हाला तालेवार पणे म्हणला.. माहितीय मला नीट. चालव्लीय गाडी.
रस्ता चुकला.. मग फोन केल्यावर विचारले कुठेस.. मी इथे मॅकडोनाल्ड आहे जवळ्पास ना, तिथे थांबलोय शेवटी , रस्ता चुकल्याने. तिथे येता का? मग मी तुम्हाला फॉलो करतो?
हसावे का रडावे कळत न्हवते. मनात म्हटले अरे गा** पुण्यात आहेस का?
नेहमीचा अनुभव आहे हा.....
नेहमीचा अनुभव आहे हा..... तुम्ही खुप छान वर्णन केले.
खतरनाक लिहीलयं
खतरनाक लिहीलयं
हा हा हा !.. मुंगेरीलाल, मस्त
हा हा हा !.. मुंगेरीलाल, मस्त जमला आहे हा लेख पण.....मागे ह्याच ठिकाणी पत्ता सांगायचा आमचा अनुभव ताजा झाला. मागे अश्याच एका परप्रांतीय बाळूशेटने सांगितले होते कर्वे पुत्ला के पास खडा हुं लेकीन वोतो घोडा का पुत्ला है.. मग त्याला अश्या मनस्थितीतही हिंदीत समजावले होते की घोडा है लेकीन उसके उपर शिवाजी महाराज बैठे है..उनके आगे कर्वे पुत्ला है... और शिवाजी महाराज के हाथ मे जो तल्वार है उस्की दिशामे आगे आओ....:)
मस्तच लिहिले आहे. ब-याच
मस्तच लिहिले आहे.
ब-याच वेळेला हा अनुभव आलाय, आमच्याकडे एक पत्ता सांगून थकला कि दुस-याला फोन दिला जायचा.
लै भारी. मस्त लिहले आहे
लै भारी. मस्त लिहले आहे
इब्लिस, आधीचा प्रतिसाद आवडला
इब्लिस, आधीचा प्रतिसाद आवडला होता पण आपण तो काढून का टाकलात ते कळलं नाही.
गा.पै., हमरस्त्यावर राहण्याचे त्रास वेगळे आहेत
झम्पी, स..ही किस्सा
सुमेधाव्ही, येस्स... ह्या दोन पुतळ्यांमध्ये फार घोळ करतात लोकं..
सगळ्यांना नवीन प्रतिसादा बद्दल पुनश्च धन्यवाद.
सुमेधाव्ही, >> और शिवाजी
सुमेधाव्ही,
>> और शिवाजी महाराज के हाथ मे जो तल्वार है उस्की दिशामे आगे आओ.
ठाणे स्थानकातून लक्ष्मी बुक डेपो कडे जायचा मार्ग पण असाच सांगावा लागतो. स्थानकातून बाहेर आल्यावर आंबेडकरांचा पुतळा आहे. बाबासाहेबांनी दाखवलेल्या दिशेने चालत राहिले की ज्ञानभांडारात पोचलातंच तुम्ही! फक्त पहिली उजवी गल्ली पकडा!
आ.न.,
-गा.पै.
मुंगेरीलाल, हे बेष्ट >>और
मुंगेरीलाल, हे बेष्ट
>>और शिवाजी महाराज के हाथ मे जो तल्वार है उस्की दिशामे आगे आओ.... >> सुमेधाव्ही
आन्गापै, ज्ञानभांडाराचा रस्ता
आन्गापै, ज्ञानभांडाराचा रस्ता पण भारी
(No subject)
Pages