मिक्स हर्ब्स् राईस (मेतकूट घालून)

Submitted by निंबुडा on 18 October, 2012 - 06:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) बासमती तांदळाचा मोकळा शिजवलेला भात
२) मेतकूट
३) मिक्स हर्ब्स् (पास्ता, पिझ्झा ह्यासाठी वापरावयाचे मिक्स हर्ब्स् वाळलेल्या पानांच्या स्वरुपात बाजारात मिळतात.)
४) कोथिंबीर + पुदिना बारीक चिरून
५) १ मध्यम कांदा - पातळ उभ्या काचर्‍या
६) लसणीची पेस्ट (किंवा लसणीचे बारीक तुकडे)
७) फोडणीसाठी ऑलिव्ह ऑईल, लाल मिरच्या, तमाल पत्र
(माझ्या कडे लाल मिरच्या नव्हत्या म्हणून मी हिरव्या तिखट मिरच्या पोट फोडून वापरल्या)
८) चवी साठी मीठ

क्रमवार पाककृती: 

१) मोकळा शिजवलेला बासमती भात परातीत काढून गार करावा व अंदाजाने मेतकूट व मीठ घालून सारखा करून घ्यावा.
२) ऑऑ तेल कढईत / पॅन मध्ये गरम करून लाल मिरच्या, तमाल पत्र, मिक्स हर्ब्स्, बारीक चिरलेला पुदिना व कोथिंबिर, लसणीची पेस्ट व कांद्याचे उभे काप परतावेत.
३) कांदा शिजला व लालसर झाला की सारखा केलेला भात घालून परतावे.
४) कढईच्या बाजुने थोडे ऑऑ परत सोडावे (आवश्यक वाटल्यास)
५) पॅनवर झाकण घालून चांगली वाफ येऊ द्यावी. ५-७ मि. नी उतरवून डिश मध्ये लगेच काढावा व गरम गरम गट्टम करावा.

हे फोटो:

वाढणी/प्रमाण: 
जितक्या जणांसाठी भात शिजवाल तितका
अधिक टिपा: 

१) रात्रीच्या उरलेल्या भाताचा आपण सकाळी फोडणीचा भात करतो. तेव्हा ही मिक्स हर्ब्स व मेतकूट हाताशी असतील तर हा भात ट्राय करता येईल.
२) ऑऑ, मिक्स हर्ब्स व मेतकूट ह्या ट्रायो ची चव खूप छान लागते. (इटालियन प्रकाराला देसी साज चढवलाय!)
३) मी सोबतीला प्यायला छान मसाला ताक घेतले होते. गार्निशिंग साठी खारवलेले मसाला काजु वापरले.
४) फोडणीत काजू घातले तरी चालतील. राजमा, मटार, गाजराचे तुकडे, फरस्बी इ. भाज्या घालूनही ट्राय करता येईल.
५) मेतकूटामुळे भाताला पिवळसर छान रंग येतो. त्यामुळे फोडणीत हळद घातलेली नाही.

माहितीचा स्रोत: 
स्वतःच्या मनाने ट्राय केलेला पदार्थ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिळ्या फोभापेक्षा हे जरा फॅन्सी प्रकरण घरच्यांना फसवायला चांगलं आहे. चवीला पण छान आणि वेगळा असेल. आज रात्री चुकुन जास्त लावावा का भात? Wink

मला फोडणीच्या भातात व्हेरीएशन्स ट्राय करणे आवडते.
१) नुसत्या तेलावर मोहरी, हिंग, हळद, जिरं, बडीशोप, लाल तिखट ह्यांची फोडणी करायची. शिळ्या भातावर घालून वर मीठ + थोडी साखर + लिंबूरस + बारीक चिरून कोथिंबीर - हा झाला हात फोडणीचा भात. किंवा मग फोडणीत भात घालून वरील रेसिपीत म्हटलेय त्याप्रमाणे ५-७ मिनिटे वाफ येऊ द्यायची. पण सकाळच्या ऑफिसा घाईच्या वेळेला हात फोडणी जिंदाबाद Happy
२) वरीलच भातात कधी कधी लिंबा ऐवजी दही घालून खायचे.
३) वरील भातात मेतकूट घातले की अजून एक व्हेरीएशन मिळते.
४) कधी कधी लाल तिखटा ऐवजी मिरपूड.
५) कधी तरी फोडणीत शेंगदाणे/ बारीक चिरून कांदा
६) लेमन राईस करायचा असेल कडीपत्ता + लाल मिरची + लिंबूरस + उडदाची डाळ हे मस्ट!

Happy

हॅप्पी राईस इटिंग! Happy

(माझ्या चुलत साबा रावण भात ह्या नावाने एक प्रकार करतात. त्यात त्या फोडणीचा भात आणि पोळी एकत्रच एकाच कढईत करतात. मला तो अजिबात आवडत नाही. नेहमीसारखी फोडणी करून त्यात शिळ्या पोळीचा चुरा + भात एकत्र करून टाकायचा. )

निम्बुडा,
मस्त लागतो असा भात, शिळ्या पोळीचा चुरा + भात एकत्र करून. माझ्या साबा पण करतात.
आणि तुम्ही लिहिलय तस दही सुद्धा घालतात. पाण्याचा हबका मारायच्या ऐवजी दही.
आणि फोडणी मधे शेंगदाणे.
रात्रीची एखादी भाजी राहिली असेल तर ती सुद्धा मिक्सर मधे अजुन बारीक़ करुन फोडणी मधे परततात आणि नंतर पोळीचा चुरा व भात घालतात.
म्हणजे ती भाजी दुपारच्या जेवणात संपत बसवावी लगत नाही !
मला पण आधी आवडत नव्हता पण आता आवडतो.
मस्त पोट भरत त्यानी.

बर हे मिक्स herbs कुठे मिलतिल?

तोंपासु Happy

भात हा अत्यंत जीव की प्राण त्यामुळे कुठल्याही प्रकारे आवडतो....करुन बघेन Happy

मेतकुट + बारीक चिरलेला कच्चा कांदा + कोथिंबीर + हि मिरची + दही असे एकत्र कालवायचे आणि भातात घालुन खायचे Happy

फोटो छान आहे.
व्हेरिएशन हवं असल्यास उरलेला भात मोकळा करुन घेऊन बाजूला ठेवावा. एकीकडे पातीचा कांदा, गाजराचे चौकोनी तुकडे, झुकिनी मिळत असल्यास त्याचे चौकोनी तुकडे, रंगीत भोपळी मिरच्यांचे चौकोनी तुकडे, आवडत असल्यास मश्रूम्स, कॉर्न हे सगळं किंचित तेलावर परतून घ्यावं. त्यात रेड चिली सॉस, गार्लिक पेस्ट परतून घ्यावी. मोठ्या गॅसवर भाज्या परतत रहाव्यात. थोड्या शिजायला आल्या की मीठ, थोडा सॉय सॉस घालून मग भात घालावा.

बर हे मिक्स herbs कुठे मिलतिल?
>>>
चैत्राली, जनरली जिथे ब्रेड, जॅम, बटर, चीज, वेगवेग्ळे सॉसेस मिळतात तिथेच विचारून बघा. पास्ता साठी बसिल, ओरीगानो इ. मिक्स हर्ब्स हवेत असे सांगून बघा.

मस्त फ्यूजन !

बाकिच्या हर्ब्ज माहित नाही, पण बेसिल मुंबईच्या हवेतही नीट वाढेल. बाजारातून आणलेली जाड फांदी तशीच
खोचायची. जीव धरते.

Back to top