फक्त आणि फक्त श्रीदेवी — इंग्लिsh विंग्लिsh

Submitted by जिप्सी on 6 October, 2012 - 15:09

सदमा, चांदनी, लम्हे, चालबाज या आणि अशा कित्येक चित्रपटातुन अभिनयाचा ठसा उमटवणारी एकेकाळची नंबर वन नायिका श्रीदेवी. बोनी कपूरशी लग्न झाल्यावर अंदाजे एक तप चित्रपटसृष्टीपासुन दूर राहिल्यानंतर तीने "इंग्लिsh विंग्लिsh" या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. या चित्रपटाचे प्रोमोज पहिल्यांदा पाहिल्यानंतरच खास चित्रपटातगृहात जाऊन बघण्याचा निर्णय केला होता. अगदी फर्स्ट डे फर्स्ट शो नाही पण रीलीजच्या दुसर्‍याच दिवशी पाहुन आलो हा चित्रपट आणि तो पण फक्त आणि फक्त श्रीदेवीसाठीच. Happy

हि कथा आहे शशी गोडबोले (श्रीदेवी) या पुण्यात राहणार्‍या मध्यवर्गीय सुखवस्तु घरातील एका स्त्रीची. नवरा (आदिल हुसैन), मुलगा सागर, मुलगी सपना आणि सासुसोबत तिचा संसार अगदी व्यवस्थित चाललेला असतो. नवरा चांगल्या पदावर कामाला, मुले चांगल्या शाळेत शिकायला, लग्न, उत्सव प्रसंगी मोतीचूराचे लाडु बनवण्याचा तिचा व्यवसाय असं सारं काही व्यवस्थित असुनही एक गोष्ट शशीला खटकंत असते ते म्हणजे तिला इंग्रजी बोलता न येणं. यावरून तिला स्वतःच्याच घरी बर्‍याच वेळा अपमानित व्हाव लागत असे. छोट्या छोट्या प्रसंगातुन इंग्रजी न बोलता येण्यामुळे होणारा तिचा कोंडमारा तिचा यात दाखवला गेलाय. अगदी मुलीच्या शाळेतला प्रसंग असो किंवा "आप मेरी पढाई लोगी? आपको अंग्रेजी पडना आता है?" या मुलीच्या बोलण्यातुन मिळणारे शालजोडीतले यातुन फक्त इंग्रजी न बोलता येण्यामुळे होणारी घुसमट दाखवली. नवरा आणि मुलीच्या इंग्रजी बोलण्यामुळे आणि ते न समजल्याने ती त्यांच्या बाहेरच्या जगात कुठेही फिट नसते. तिचं एकच मागणं असतं कि प्रेम तर कुटुंबातुन मिळतंय पण पाहिजे ती फक्त थोडी आपुलकी.

अशावेळी अचानक तिच्या आयुष्याला कलाटणी देण्याचा एक प्रसंग घडतो आणि सुरूवात होते ती तिच्या एका नव्या प्रवासाची. तिला तिच्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी न्युयॉर्कला जावे लागते. सुरुवातीला तिला काही कारणास्तव एकटीलाचा सर्वांच्या आधी अमेरीकेत जावे लागते. तिचा हा पहिलाच विमानप्रवास. यावेळी व्हिसा काढण्याच्या प्रसंगापासुन इमिग्रेशन पर्यंत केवळ इंग्रजी न बोलता येत असल्याने शशीची होणारी तारांबळ, विमानप्रवासात तिला भेटणारा, अगदी न्युयॉर्कपर्यंत तिची मदत करणारा आणि "इन गोरे लोगोंसे डरना छोड दो और इन्हे तुमसे डरने दो" आणि विमान प्रवासाचा पहिला अनुभव "पहला experience है तो उसे अच्छी तरह से एन्जॉय करो, क्यो कि ये फिरसे नही आयेगा" असा मोलाचा सल्लाही देणारा "तो" हे सगळे प्रसंग मनाची पकड घेतात.

पुढे शशी जेंव्हा अमेरीकेत येते तेंव्हा तिच्यासोबत अशा काही घटना घडतात कि ती कुणाच्याही नकळत चार आठवड्यात इंग्रजी शिकवण्याच्या क्लासेसला जाते. इथे तिच्यासारखेच स्पेन, फ्रान्स, पाकिस्तान, चीन अशा इतर देशातुन इंग्रजी शिकण्यासाठी आलेले मित्र भेटतात. यातील क्लासमधल्या गमती बघताना हा चित्रपट पूर्वीची जुनी टिव्ही मालिका "जबान संभालके" च्या दिशेने जातोय कि काय असं काही क्षण वाटत. इथुनच मग पुढे सुरू होतो तो शशीचा अस्खलित इंग्रजी बोलण्याचा प्रवास.

संपूर्ण चित्रपट कुठेही इंग्रजी भाषेला अति महत्व देणारी एखादी डॉक्युमेंटरी न वाटता सहज आपल्या आजुबाजुला घडत असलेली एखादी गोष्ट वाटते आणि याचे श्रेय जाते ते कथा/पटकथा/संवाद आणि दिग्दर्शन करणार्‍या गौरी शिंदेला. हा संपूर्ण चित्रपट शशी म्हणजेच श्रीदेवी भोवती फिरतो. तरीही सुलभा देशपांडे, आदिल हुसैन, मेहदी नेबु, या कलाकारांनी आपआपल्या भुमिकेत छाप पाडली आहे. दोन्ही छोट्या मुलांचे कामही झक्कास आहे. श्रीदेवीच्या अभिनयाबाबत तर मी पामर काय बोलणार Happy मुलीच्या बोलण्याने उदास होणारी प्रसंगी चिडणारी आई, रेस्टॉरन्टच्या त्या प्रसंगाने भेदरलेली भारतीय स्त्री, मुलाच्या हट्टापायी केलेला मायकल जॅक्सनचा थोडासा डान्स, नवर्‍याने कौतुक करावे यासाठी आसुसलेली बायको, सासुची काळजी घेणारी सुन, न्युयॉर्कमधे साकारलेली विद्यार्थीनी, इंग्रजी क्लासमधला युवक तिच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी बोलतो तेंव्हाचा तो प्रसंग इत्यादी सारं काही श्रीदेवीने आपल्या सहज सुंदर अभिनयातुन साकार केलंय.

या चित्रपटाचे संगीतही श्रवणीय आहे. स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेली आणि अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सहजच ओठावर रेंगाळतात. विशेषतः
"नवराई माझी लाडाची लाडाची गं, आवड हिला चंद्राची चंद्राची गं"
बदला नजारा, गुस्ताख दिल आणि Manhattan हि गाणीही मस्त आहेत,

"बर्फी" चित्रपटानंतर पाहिलेला अजुन एक सुंदर चित्रपट. कुठलाही आयटम साँग नसलेला, सध्याच्या इतर चित्रपटांपेक्षा थोडा हटके विषय, बिगबजेट, मल्टीस्टारकास्ट आणि कुठलाही मेलोड्रामा नसणारा हा चित्रपट खरंच वेगळा आणि मस्त आहे.

कलाकार : श्रीदेवी, अदील हुसैन, सुलभा देशपांडे, मेहदी नेबू, प्रिया आनंद
दिग्दर्शन/कथा/पटकथा/संवाद : गौरी शिंदे
निर्माता : सुनील लुल्ला, राकेश झुनझुनवाला, आर बाल्की
संगीत : अमीत त्रिवेदी
गीत : स्वानंद किरकीरे

तटि: चित्रपट रीव्ह्यु लिहिण्याचा जास्त अनुभव नाही (देऊळ सोडला तर) पण फक्त आणि फक्त श्रीदेवीसाठीच हा प्रयत्न. Happy

वरील सर्व प्रचि आंतरजालाहुन साभार.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा चित्रपट इंग्रजी भाषा शिकण्याची भलावण करणारा किंवा इंग्रजाळलेल्या नवरा, मुलांना इंग्रजी शिकून पात्रता सिद्ध करणाऱ्या महिलेच्या कोड-कौतुकाचा आहे असं मला तरी वाटलं नाही. जिद्दीने इंग्रजी शिकणे याचा केवळ रूपक म्हणून उपयोग केला आहे अशा प्रकारे त्याकडे पहिले तर त्यात मला खूप अर्थ जाणवतो. सर्व-साधारण भारतीय कुटुंबात विशेषतः घरी बसलेल्या विवाहित स्त्री ला ती काहीही करत असली तरीही तिच्या सेल्फ-एस्टीम आणि आत्मा-विश्वासाला ला थट्टा-मस्करी च्या आवरणाखाली सतत पायदळी तुडवले जाणे, (अगदी आयटी मध्ये नोकरी करणाऱ्या महिलेला देखील 'तिची नोकरी, तिथले प्रश्न हे दुय्यम आहेत अशी भावना करून दिली जाते')तिला कायम नोकरा-सारखी वागणूक आणि दुय्यम दर्जा देऊन तू बाहेरच्या आधुनिक जगात मिसफिट आहेस याची जाणीव करून देणे अशा मानसिकतेच्या पार्श्व-भूमीवर बाहेरच्या जगातील अनोळखी माणसांनी ती उणीव भरून काढणे यातला विरोधाभास हे दिग्दर्शिकेला दाखवून द्यायचे आहे आणि त्यात ती पूर्णपणे यशस्वी झाली आहे असे वाटते. इंग्रजी च्या जागी इतर कोणतेही कौशल्ल्य (नेट वापरणे, गाडी चालवणे) वापरून हीच गोष्ट सांगता आली असती, पण भारतात इंग्रजी (न येणं हा) खूप वर्षान पासून आणि सार्वत्रिक आढळणारा कमी-पणाचा मुद्दा असल्यामुळे बहुतेक तो चित्रपटाच्या थीम साठी निवडला असावा. पण ह्या सिनेमाची गोष्ट इंग्रजी ची नक्कीच नाही असं मला वाटतं.

>>>सर्व-साधारण भारतीय कुटुंबात विशेषतः घरी बसलेल्या विवाहित स्त्री ला ती काहीही करत असली तरीही तिच्या सेल्फ-एस्टीम आणि आत्मा-विश्वासाला ला थट्टा-मस्करी च्या आवरणाखाली सतत पायदळी तुडवले जाणे, (अगदी आयटी मध्ये नोकरी करणाऱ्या महिलेला देखील 'तिची नोकरी, तिथले प्रश्न हे दुय्यम आहेत अशी भावना करून दिली जाते')तिला कायम नोकरा-सारखी वागणूक आणि दुय्यम दर्जा देऊन तू बाहेरच्या आधुनिक जगात मिसफिट आहेस याची जाणीव करून देणे अशा मानसिकतेच्या पार्श्व-भूमीवर बाहेरच्या जगातील अनोळखी माणसांनी ती उणीव भरून काढणे यातला विरोधाभास हे दिग्दर्शिकेला दाखवून द्यायचे आहे आणि त्यात ती पूर्णपणे यशस्वी झाली आहे असे वाट>>><<
+१

भारतीय लोकांना ईग्लिश बोलता न येणे खूपच न्युनगंड वाटतो. उगाचच.
आजूबाजूल इतके चायनीज, स्पॅनीश आहेत, त्यांच्यात भाषेसाठी इतकं वाईट वाटताना पाहिलेले नाही.

माधुरी त्या रोलमध्ये फिट झालीच नसती, बावळट दिसण्याचा तिने कितीही प्रयत्न केला तरी ती दिसु शकणारच नाही.:फिदी:

माधुरी त्या रोलमध्ये फिट झालीच नसती, बावळट दिसण्याचा तिने कितीही प्रयत्न केला तरी ती दिसु शकणारच नाही.
>>>> बावळट दिसणे ह्या सिनेमात अपेक्षित पण नाहिये ना? मलातरी श्रीदेवी कुठेच बावळट वाटली नाहि.

गोडबोलेंच्या घरात नवभारत टाईम्स आणि राजमा ???... आणि पुण्यात शिकून इंग्लीश अजिबात समजत नाही हे पटत नाही. बोलता न येणं हे मान्य! ...बाकी अप्रतिम.

एक प्रसंग..
शशी: '..आणि मी ती वाचलेली नाही'
सपना: 'वाचता आलं असतं तर वाचली असतीस नां!'
तोंडात मारणार्‍या या वाक्याने शशीच्या चेहर्‍यावरचे बदललेले भाव आणि दिर्घ श्वास घेऊन ती अपमानीत अवस्था श्रीदेवीने कांय दाखवलेय!!!!

हा मटाच्या review मधला काही भाग Happy

"शशी ही मराठी व्यक्तिरेखा असली तरी सगळ्यांना चहा देताना स्वतः कॉफी पिणं. इडली बनवणं. स्वरातला दाक्षिणात्य हेल. आणि केरळी व्यक्तीशी भेट झाल्यावर होणारा आनंद हे पाहिल्यावर शशी मराठी असूनही तिच्यात मराठीपण का जाणवत नाही, याचं उत्तर मिळतं. मूळच्या दाक्षिणात्य तिने गोडबोलेशी लग्न केलंय, हा संदर्भ कुठेही न बोलता अगदी सहज दिलाय. त्याचवेळी अमेरिकेत भाचीच्या लग्नाच्या वेळी सासूला फोन करून नवराई... हे मराठी गाणं लिहून घेणं आणि ते गाणंही अतिशय निखळ वाटतं"

मूळच्या दाक्षिणात्य तिने गोडबोलेशी लग्न केलंय>>>> पण मग बहिणीच्या मुलीचं लग्न असतं ना, तेही मराठीच कसे? दोन्ही बहिणींनी मराठी नवरे केले असतात वाटते Happy
असो. अजून पाहिला नाही, पण बघणार नक्की.

>>>>>>>>> पण मग बहिणीच्या मुलीचं लग्न असतं ना, तेही मराठीच कसे? दोन्ही बहिणींनी मराठी नवरे केले असतात >>>>><<<
हाच तर प्रश्ण मलाही पडलेला.. पण मूवीत तसे दाखवले नाही(की बहीणीचे सुद्धा लग्न मराठीशी झाले आहे.)

एक प्रसंग..
शशी: '..आणि मी ती वाचलेली नाही'
सपना: 'वाचता आलं असतं तर वाचली असतीस नां!'
तोंडात मारणार्‍या या वाक्याने शशीच्या चेहर्‍यावरचे बदललेले भाव आणि दिर्घ श्वास घेऊन ती अपमानीत अवस्था श्रीदेवीने कांय दाखवलेय!!!!

आँ?? अस दाखवलय? असा प्रसंग आईच्या घरी (म्हणजे मी मुलगी आणि माझी आई शशी असती तर) तुम्हाला मी गाल चोळताना दिसले असते! आणि माझ्या घरी असता तर--माझी लेक GROUNDED दिसली असती. असो. आईला काय बोलायच हे नियम प्रत्येक घरात वेगळे असतात. आपल्या आईच्या देशीपणाचा माझ्या अमेरीकन पोरांना भलता अभिमान आहे ह्यातच मी मशगूल आहे Happy

कल्पु, तो सीन फोनवर आहे Happy
मुवी धमाल. श्रीदेवी आधी कधी आवडली नव्हती पण यात मस्त दिसतेय अन अभिनयही परफेक्ट.
क्रेडिट गोज टु गौरी शिंदे. आवडली मला..पुढ्चा सिनेमा कधी येणार हिचा?

काही वर्षांपूर्वी पेपर मधे वाचले होते की माधुरी खुप सुन्दर नाही पण मेकअप केला की सुन्दर दिसते . आता ते तीलाच माहिती पण तीला गरजेपेक्षा जास्त डोक्यावर घेतले अणि आताही सुन्दर दिसत असली तरी नेने काकू झाली आहे हे विसरायला नको . मी श्रीदेवीची पंखा नाही पण ती भूमिकेत शिरते अणि जीव तोडून काम करते पण माधुरी सुरवातीपासून उपकार केल्यासारखे काम करते .

असा प्रसंग आईच्या घरी (म्हणजे मी मुलगी आणि माझी आई शशी असती तर) तुम्हाला मी गाल चोळताना दिसले असते! >>>+१०० ....सिनेमा बघताना माझ्या मैत्रिणीला मी अगदी हेच सांगितले.

>> मी श्रीदेवीची पंखा नाही पण ती भूमिकेत शिरते अणि जीव तोडून काम करते पण माधुरी सुरवातीपासून उपकार केल्यासारखे काम करते .

श्रीदेवी कधी कधी बरं काम करतेही पण माधुरी सुरूवातीपासून उपकार केल्यासारखी काम करते ही अतिशयोक्ती वाटते मला आणि अजिबात पटत नाही .. फॅन ची व्याख्या मला माहीत नाही पण मला माधुरी आवडते, श्रीदेवी आवडत नाही बर्‍याच वेळेला ..

नताशा: बघतेच आता!

मला माधुरी आणि श्रीदेवी कधीच खूप आवडल्या नाहीत. जुही चावला मात्र आवडायची. नॅचरल वाटते..परिणिता चोप्रा सारखी!

श्रीदेवीने अप्रतिम काम केलेय ... कित्येक सीनमध्ये बोलक्य डोळ्यांनी बाजी मारलिये.....
मला तो पाकिस्तानी पण छान वाटला आणि फ्रेंच पण मस्तच....... बोलके डोळे आहेत अतिशय.... स्पेश्यली शेवटच्या सीनमध्ये...

सुंदर अनुभव. सुंदर चित्रपट. निखळ मनोरंजन.

पण मग बहिणीच्या मुलीचं लग्न असतं ना, तेही मराठीच कसे>> बाल की खाल. Biggrin
हिन्दी शिनेमा हाये तो. बडे बडे शिनेमामे ऐसी छोटी छोटी बातें होतीच हय म्हणायच आणि सोडायच.
जास्तच खुपल तर अचाट आणि अतर्क्य असा धागा आहे नंदिनीने सुरु केलेला तितेह जाउन लिहायच.. Happy

असा प्रसंग आईच्या घरी (म्हणजे मी मुलगी आणि माझी आई शशी असती तर) तुम्हाला मी गाल चोळताना दिसले असते! >>> वेल सेड कल्पु , मुलगी आईला असं काही बोलु शकते ह्यावर माझा अजुन्ही विश्वास बसतं नाहीये .

गौरी शिंदेच्या रूपाने हृषिदा, बासू चटर्जी,सई परंजपे या परम्परेतील नवीन दिग्दर्शक मिळाला आहे असे म्हणावेसे वाटते . कास्टिंग एकदम परफेक्ट आहे. श्रीदेवी वगळता सगळेच अनोळखी असल्याने ती ती पात्रेच वाटत राहतात.श्रीदेवीही अनोळखीच म्हणायची या वयातली.आदिल हुसेन राजेंद्र गुप्तांची आठवण करून देतो.क्रिस्पी कुठेही न रेंगाळणारा चित्रपट.

चित्रपटात एका पात्राची सुखद आणि सरप्रायजिंग एन्ट्री आहे Wink

माबोवर एखाद्या सिनेमाच्या रिव्ह्यूवर इतके प्रतिसाद (विषयाला धरून) आले आहेत आणि सगळ्यांनीच हा सिनेमा चांगला असल्याचे म्हटले आहे !!

श्रीदेवीचे पुनरागमन भलतेच दणक्यात झाले की ! Wink

लवकर पहावा लागणारा आता इंग्लिश विंग्लिश...

इंग्लिश-विंग्लिश आवडलाच. गौरी शिंदेला फुल मार्क्स. श्रीदेवीकडून झकास काम करवून घेतलय. आपले आधीचे डोक्यात जाणारे लाडिक हावभाव बाजूला ठेवून श्रीदेवीनेही गौरीला छान सहकार्य केलय. बाकी सगळी कास्टही मस्त.

गौरी शिंदे बाल्कीपेक्षा निश्चितच जास्त चांगली दिग्दर्शक आहे.

मात्र या सगळ्यात मला खूप म्हणजे खूपच आवडलं मेह्दी नबू या फ्रेन्च अ‍ॅक्टरचं काम. तो फ्रेन्च्-युरोपियन फिल्म्समधला नावाजलेला अ‍ॅक्टर आहेच अर्थात. कसलं कमालीचं संयत आणि सुरेख काम केलय त्याने. त्याच्या डोळ्यांमधलं एक्स्प्रेशन, बॉडी लॅन्वेज अत्यंत बोलकी आहे. संवाद साधण्याची धडपड, शशीसोबत रहाता यावं, तिचा क्लास बुडू नये म्हणून त्याचे प्रयत्न, शेवटची भेट सगळंच हुरहूर लावून जाते.

श्रीदेवीचे पुनरागमन भलतेच दणक्यात झाले पण श्रेय गौरी शिंदेला द्यावे लागेल असे वाट्ते. Happy

या सगळ्यात मला खूप म्हणजे खूपच आवडलं मेह्दी नबू या फ्रेन्च अ‍ॅक्टरचं काम. तो फ्रेन्च्-युरोपियन फिल्म्समधला नावाजलेला अ‍ॅक्टर आहेच अर्थात. कसलं कमालीचं संयत आणि सुरेख काम केलय त्याने. त्याच्या डोळ्यांमधलं एक्स्प्रेशन, बॉडी लॅन्वेज अत्यंत बोलकी आहे. संवाद साधण्याची धडपड, शशीसोबत रहाता यावं, तिचा क्लास बुडू नये म्हणून त्याचे प्रयत्न, शेवटची भेट सगळंच हुरहूर लावून जाते.
---- अगदी अगदी, खरतर क्षणभर असे वाटते की द्यावे नवर्‍याला सोडुन शशीने आणि जावे त्याच्याकडे. अस वाटते की हा कॉम्प्लेक्स सतीशला ही आला होता का? स्वत:च्या विश्वात राहून दुसर्‍याला म्हणजे शशीला कमी लेखल्यामुळे खरतर तो अचानक डळमळीतच झाला, मानसिक रित्या हे रीतेपण त्याच्या --- तुम मुझसे अभीभी प्यार करती हो ना? ह्या प्रश्नातून आणि शरमलेल्या नजरेतून खुपच छान व्यक्त झालाय --- सकुसप बघण्यासारखा चित्रपट Happy

हो हो रायबा. मलाही कितीवेळा वाटलं त्या स्वार्थी नवर्‍याला जीव लावण्यात शशीने कशाला एनर्जी खर्च करायला हवीय? द्यावं सोडून. पण तो सिनेमाचा अ‍ॅन्गलच नव्हता. म्हणून जाऊदे. पण तिने निदान मेह्दीच्या भावनेला जास्त सहानुभूतीने समजवून घ्यायला हवं होतं असं खूपदा वाटलं. आता हा अ‍ॅन्गल घेऊन एक नवा सिनेमा बनवावा गौरीने. मस्त जमेल तिला.

या सगळ्यात मला खूप म्हणजे खूपच आवडलं मेह्दी नबू या फ्रेन्च अ‍ॅक्टरचं काम. तो फ्रेन्च्-युरोपियन फिल्म्समधला नावाजलेला अ‍ॅक्टर आहेच अर्थात. कसलं कमालीचं संयत आणि सुरेख काम केलय त्याने. त्याच्या डोळ्यांमधलं एक्स्प्रेशन, बॉडी लॅन्वेज अत्यंत बोलकी आहे. संवाद साधण्याची धडपड, शशीसोबत रहाता यावं, तिचा क्लास बुडू नये म्हणून त्याचे प्रयत्न, शेवटची भेट सगळंच हुरहूर लावून जाते.>>> अगदी माझ्या मनातलं लिहिलंस शर्मिला Happy राहून राहून त्याचा अभिनय डोळ्यासमोर येतोय अजून. खूप नॅचरल.

अस वाटते की हा कॉम्प्लेक्स सतीशला ही आला होता का? स्वत:च्या विश्वात राहून दुसर्‍याला म्हणजे शशीला कमी लेखल्यामुळे खरतर तो अचानक डळमळीतच झाला, मानसिक रित्या हे रीतेपण त्याच्या --- तुम मुझसे अभीभी प्यार करती हो ना? ह्या प्रश्नातून आणि शरमलेल्या नजरेतून खुपच छान व्यक्त झालाय >>> +१

शर्मिलाला आणि रायबाला खास अनुमोदन
<<मेह्दी नबू या फ्रेन्च अ‍ॅक्टरचं काम. तो फ्रेन्च्-युरोपियन फिल्म्समधला नावाजलेला अ‍ॅक्टर आहेच अर्थात. कसलं कमालीचं संयत आणि सुरेख काम केलय त्याने. >> अगदी अगदी फारच गोड आहे तो Happy

Pages