हे गणेशा श्री गणेशा - सूरमाय (२)

Submitted by संयोजक on 18 September, 2012 - 11:28


गीतः हे गणेशा श्री गणेशा (गीतकारः योग)

हे गणेशा श्री गणेशा
नम तुजला हे प्रथमेशा ||धृ||

रिध्दी सिध्दींचा तूच मालक
कार्यारंभी तूच नायक
तू सुखकर्ता तू दुखहर्ता
वरदमूर्ती हे विनायक ||१||

दानवा संहारीले तू
तीन लोका तारीले तू
परशुधारी एकदंता
रवी शशी ग्रह गती नियंता ||२||

सगुण निर्गुण आत्मरूपा
गौरीसूत ॐकार स्वरूपा... विश्वरूपा
शरण तुज देवाधीदेवा
मूढ मती मी चरणी ठेवा ||३||

संगीत/संयोजन/वाद्ये प्रोग्रॅमींगः योग

गायिका: सारीका(सौ. योग)

गीतकार/संगीतकारचे मनोगतः

खरे तर या गीताची आधी फक्त चालच सुचली. ती बनवून सूरमाय मध्ये सर्वांना पाठवली जेणेकरून त्या चालीला कुणीतरी शब्दांचे कोंदणही देईल. ज्यांनी शब्द लिहून पाठवले ते छानच होते पण कुठेतरी काहीतरी मनासारखे नीट बसत नव्हते. त्यात मीच स्वतः हे गीत रुपक तालात (१२३, १२३४) बांधल्याने त्यानुसार शब्द लिहीणे म्हणजे थोडी कसरतच होती. शेवटी बरेच दिवस अक्षरश: अनेक वेळा खरडल्यावर एकदा सहज काही शब्द सुचत गेले व सुचले तसे लिहीत गेलो. श्री गणरायाच्या कृपेने चालीला शेवटी शब्द मिळाले. दुसर्‍या कडव्यात, गणपती हाच अखिल पृथ्वी, ग्रह, सूर्य, चंद्र यांच्या गतीचा नियंता आहे अशी कल्पना मांडली आहे. त्याला पौराणिक आधार वगैरे आहे का माहित नाही, पण श्री गणेश हाच आदी व हाच अनादी आहे, अनंत आहे असे मानले तर या कल्पनेला आधार मिळू शकतो.

बासरी: चैतन्य दीक्षित
ऑगस्टच्या मध्यात एके दिवशी उल्हास काकांचा फोन आला, ते म्हणाले की योगेश जोशींना तुझा ई-मेल आयडी हवा आहे, देऊ का? मी त्यांना होकार कळवला. घरी आलो तेव्हा योगची मेल आली होती. त्या ई-मेल मुळे माझी आणि 'सूरमाय' ची ओळख झाली. योगने एक गाण्याचा ट्रॅक पाठवला होता, रूपक ताल आणि यमन रागात गाण्याची सुरुवात आणि मधली कडवी वेगळ्या रागातली. त्या ई-मेल नुसार, त्या गाण्याच्या सुरुवातीला आणि दोन कडव्यांच्या मध्ये बासरीचे तुकडे वाजवायचे होते. मी तो ट्रॅक मोबाईलमध्ये घेतला आणि ऑफिसला जाताना जमेल तितक्या वेळा तो ऐकू लागलो. साधारण कोणते सूर वाजवायचे याचा अंदाज यावा म्हणून. मला यापूर्वी कुठल्याही गाण्यासाठी म्हणून बासरी वाजवल्याचा अनुभव नव्हता. आणि अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर माझं बासरी-वादन अजून त्या पातळीचं नाही असंच मला वाटतं. खूप दिवस विचार केल्यानंतर योगला एक छोटा ट्रॅक रेकॉर्ड करून पाठवला, त्यात मी पूर्णपणे यमनच वाजवला होता. बासरी रेकॉर्ड करताना जर 'फु़ंकरीचा' (ब्लो) आवाजही रेकॉर्ड झाला तर तो कानांना खटकतो. मी अगदी खुलं वाजवत होतो त्यामुळे खूप ब्लो रेकॉर्ड होत होता. आणि गाण्याच्या स्केलपेक्षा मी वापरलेली बासरी वेगळ्या स्केलची होती.

योगशी ई-मेलद्वारे बोलून बासरीची स्केल कुठली वापरावी लागेल हे नक्की केल्यावर असं लक्षात आलं की ह्या स्केलची बासरीच माझ्याकडे नाही! बासरीच्या बाबतीत 'सा' बदलताही येतो. (थोडं तांत्रिक आहे, ते पुन्हा कधी तरी) पण मला तसे करायचे नव्हते. वाजवताना फार लक्षपूर्वक वाजवावे लागते आणि त्यामुळे बोटांच्या संगतीकडे जास्त लक्ष राहून बेसुरं वादन होण्याची शक्यता असते. म्हणून मग शेवटी मी ज्या स्केलची हवी होती त्या स्केलची बासरी स्वतः तयार केली आणि योगला रेकॉर्डिंग पाठवले. अनेक वेळा रेकॉर्डिंग करूनही मनाजोगे रेकॉर्डिंग होत नव्हते, पण शेवटी एकदाचे ते रेकॉर्डिंग बर्‍यापैकी झाले. योगला त्या रेकॉर्डिंगवर काही संस्कार करावे लागलेत. पण मनाजोगं रेकॉर्ड न होऊनही त्याने मला कायम प्रोत्साहन दिलं त्यामुळे आणि अर्थातच बाप्पांच्या कृपेमुळे रेकॉर्डिंग बर्‍यापै़की व्यवस्थित झालं.

मी कधी कल्पनाही केली नव्हती की एखाद्या गाण्यासाठी मी बासरी वाजवेन. त्यामुळे हे सगळं करत असताना खूप मजा आली. माझ्या पत्नीनेही वेळोवेळी मला 'रेकॉर्डिंग कसे वाटते आहे? सुरात आहे की बेसुरे वाजतंय' इ. अभिप्राय देऊन वादन शक्य तितके अचूक असेल हे पाहण्यात मदत केली.

योग आणि सूरमायच्या सर्वच सदस्यांचे आणि मायबोली संयोजक मंडळाचे खूप मनापासून आभार.

गायिकेचं मनोगतः
गीताची चाल आवडली पण शब्द गायला खूप अवघड वाटत होते. त्यातच रूपक ताल असल्याने एका ठराविक मीटर, वजनानेच ते गायचे हे जरा आव्हानात्मक वाटले. एरवी चित्रपट वा नेहेमीचीच गाणी गाताना हे जाणवत नाही की काही काही वेळा शब्द, चाल, मीटर व अभिप्रेत भाव (एक्स्प्रेशन) बरहुकूमच गाणे हे सोपे काम नाही.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चाल------- मस्तच.. शब्दही छान!
गायन------ सुरेल आणि प्रॉमेसिंग
बासरीसाठी------ जोरदार टाळ्या
..........................
तबला अ‍ॅकॉस्टीक नाहीये का? म्हणजे नाहीच वाटत.
कारण डग्गा खूप लाऊड झालाये.

ओहरऑल... हॅटस् ऑफ !!!

चैतन्य,

बहोत खूब...! गाण्याला एक छान बैठक मिळते आहे... "बोलते" तुझी बासरी..

शाम,
सर्वच म्युझिक प्रोग्रॅमिंग आहे..
धन्यवाद! असेच अभिप्राय हवे असतात ज्यातून पुढील सुधारणांसाठी दिशा मिळते..

गीत ,संगीत, संगीत संयोजन सर्वकाही योग. व्वा क्या बात है! छान झालंय गीत.
सारीकाच्या आवाजात ताजेपणा आहे. गायली आहे पण गोड.
चैतन्यच्या बासरीत भक्तीभाव भरून राहिलाय. सुरेल झालंय बासरीवादन.
कौटुंबिक जबाबदा-या, कामांचा व्याप सांभाळत, हृदयात सृजनाचा अग्नी सतत पेटता ठेवणं
आणि त्या दिव्यानं दिवा पेटवत सर्वांना घेऊन सुरेल वाटचाल करणं याबद्दल योग यांचं खास कौतुक.

छान आहेत गाण्याचे शब्द आणि चाल. रुपकची एक वेगळीच मजा असते.
चैतन्य, तुझ्या बासरीने खरंच एक वेगळा फील दिलाय गाण्याला. सुरुवातीचे आणि दुसर्‍या कडव्याच्या आधीचे तू वाजवलेले तुकडे जास्त आवडले.
सारीका, तुझा आवाज गोड लागलाय अगदी. सुश्राव्य आवाज Happy

गीत आणि संगीत छानच.. चैतन्य तुमचं बासरीवादन अप्रतिमच झालंय. सारिका तुमचा आवाज खूप गोड लागलाय. मस्त वाटलं गाणं ऐकताना.

योग,
फायनल व्हर्जन आज ऐकलं. फारच छान फील येतोय.
सारिका, फार छान आवाज आहे तुमचा.

बासरी माझी मलाच ऐकून मस्त वाटतेय Happy योग, अनेकानेक धन्यवाद Happy

अरे वा! हे गीतही किती सुरेख झालं आहे! बासरी अप्रतिम आणि सारिकाचा आवाज खूपच छान आहे. शब्द आणि सूर हातात हात घालून चालले आहेत असं वाटतं. Happy

अहा..... बासरीसाठी उभं राहून टाळ्या........चैतन्या वा.........जबरी !!
सारिका ....छानच !!
योग......तुझी कसरत दोन्ही गाणी ऐकून कळतेय Happy सगळं सांभाळून वेळेवर गाणी तयार करणं म्हणजे गंमत नाही रे... कमाल आहेस !!

चांगलं झालंय गाणं. चैतन्य, तुझ्या बासरीने खुपच मजा आणली आहे. नैसर्गिक वाद्याची गंमत औरच! तुझं विशेष अभिनंदन.
सारिका, तुझ्या आवाजात गोडवा आहे.
योग, गीत आणि संगीत दोन्ही उत्तम. अष्टपैलू आहेस तू. बाप्पांचा वरदहस्त आहे तुझ्यावर.

अनिताताई, प्रतिसाद एकदम मस्त, अनुमोदन.

गीत ,संगीत, संगीत संयोजन सर्वकाही योग. व्वा क्या बात है! छान झालंय गीत.
सारीकाच्या आवाजात ताजेपणा आहे. गायली आहे पण गोड.
चैतन्यच्या बासरीत भक्तीभाव भरून राहिलाय. सुरेल झालंय बासरीवादन.
कौटुंबिक जबाबदा-या, कामांचा व्याप सांभाळत, हृदयात सृजनाचा अग्नी सतत पेटता ठेवणं
आणि त्या दिव्यानं दिवा पेटवत सर्वांना घेऊन सुरेल वाटचाल करणं याबद्दल योग यांचं खास कौतुक. >>>>

अनितातईंचा हा प्रतिसाद म्हणजे गीत ऐकल्यावर माझ्या मनात आलेले विचार..... पूर्णतः सहमत.

(भुंग्याच्या स्टाईलमध्ये म्हणायचं तर .... "योग तुस्सी ग्रेट हो .... :))