निर्माण निर्मात्याचे

Submitted by चैतन्य दीक्षित on 19 September, 2012 - 13:24

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया !
प्रत्येक वर्षी नवीन वर्षाचे कॅलेंडर घेतले की सगळ्यात पहिल्यांदा 'गणपती कधी?' हीच तारीख पाहतो. बहुतेक सगळ्यांचेच असे असावे. आहेच गणेशोत्सव सगळ्यांच्या अगदी जवळचा. माझ्यासाठी गणेशोत्सव खूप म्हणजे जवळचा! याचं कारण अर्थात् बाप्पांवरची श्रद्धा !अजून एक सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे, त्यांच्याच कृपेनं दरवर्षी मला गणपतीची मूर्ती करता येते. मी आठवीत असल्यापासून घरीच गणपतीची मूर्ती तयार करू लागलो.
आज चौदा वर्षे झाली, दर वर्षी न चुकता बाप्पा ही सेवा करवून घेतात. असो, नमनाला घडाभर तेल नको!
ह्या लेखाचं प्रयोजन म्हणजे, जे कुणी घरीच गणपतीची मूर्ती करू इच्छितात त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे काही मदत होईल अशा 'टिप्स' देणे आणि ह्या वर्षीच्या आमच्या बाप्पांची निर्मिती तुम्हा सगळ्यांना दाखवणे हे आहे.
सगळ्याच 'स्टेप्स' चे फोटो घेता आले नाहीत, पण जेवढे फोटो घेऊ शकलो तेवढय फोटोंच्या सहाय्याने लेख लिहितोय. चौदा वर्षे झाली असली तरीही 'मूर्तिकामाच्या' दृष्टीने सुधारणेला बराच वाव आहे. त्यामुळे काही सूचना असतील तर नक्कीच कळवा.
साहित्य- शाडूची माती (सपिटाच्या चाळणीने चाळून घ्यावी, नाहीतर अगदी बारीक खडे असण्याची शक्यता असते. मूर्तीचे फिनिशिंग करताना ते खडे वर येऊन, फिनिशिंग करणे अवघड होऊ शकते.), लाकडी पाट/ जाड प्लायवूडचा तुकडा, फिनिशिंगसाठी हॅक्सॉ ब्लेड, पोस्टर कलर, गोल्डन कलरची पूड, वॉर्निश (गोल्डन कलरसाठीच), देवाचे सोवळे रंगवण्यासाठी हवा असल्यास मोतिया रंग/ अ‍ॅक्रेलिक कलर.

माती व्यवस्थित मळून घेऊन हात धुवून कोरडे करावेत. कोरड्या हाताने मळलेली माती हातात घेऊन पाहावी.
हाताला चिकटत नसेल किंवा कमीत कमी चिकटत असेल, तर माती नीट मळली गेली असे समजावे.
पहिल्यांदाच मूर्ती तयार करणार असाल तर पूर्ण मूर्ती भरीव करावी आणि शक्यतो लहान मूर्ती करावी.
मी पोकळ मूर्ती तयार करतो. पोकळ मूर्ती तयार करताना ती नीट होईल ना? मधेच कोसळणार नाही ना? अशी काळजी वाटू शकते. त्यासाठी काशा (पूर्वी सोफ्यात असायचा) किंवा नारळाच्या शेंड्यांवर शाडूची कालवलेली माती लावून लहान भाकर्‍या तयार करून, आतून सपोर्टसाठी लावल्या की काळजी नाही! मी १-२ वर्षे असं केलं होतं, नंतर तेवढी गरज वाटली नाही.

पाट- लाकडी पाटावर प्रथम शाडूच्या मातीचा पाट तयार करायचा आहे. मातीच्या पाटाची बॉर्डर आखून घ्यावी. खालील फोटो पाहा.
From Bappa

पाट पूर्ण भरीव करायचा तर शाडूची माती खूप वापरावी लागते आणि मूर्तीही जड होते. त्यासाठी खालच्या फोटोप्रमाणे शाडूच्या मातीच्या पट्ट्या पाटाच्या चौकटीत लावल्या तर कमी मातीत पाट पूर्ण होऊ शकतो.
मी अशा पट्ट्या लावून, मधल्या पोकळीत वर्तमानपत्राचे बोळे लावतो. वर्तमानपत्र पूर्ण उघडून पाण्यात बुडवतो.
पेपरमध्ये पाणी शोषलं गेलंय हे पाहून त्याचा बोळा करतो, असे बोळे त्या चौकटीत लावतो. आणि नंतर त्यावर शाडूच्या मातीचे चपटे गोल तयार करून पाटाची वरची बाजू तयार करतो.

From Bappa

From Bappa

मूर्ती-

मूर्ती कशा प्रकारची करायची ह्यावर पुढची स्टेप अवलंबून आहे.
उदा. कमळात बसलेला गणपती करायचा असेल तर आधी कमळ तयार करायला हवे.
कमळ पाटापासून थोडे उंच करायचे असल्यास पाट सपाट न करता, मध्यभागी वर्तमानपत्र ओले करून त्याचे बोळे लावून थोडा उंचवटा तयार करायचा आणि त्याला आधी वरून शाडूची माती फासून घ्यायची. नंतर पाकळ्या वगैरे डिझाईन करता येते आणि अजून एक फायदा म्हणजे शाडू वाळला तरीही पाटापासून कमळ सुटे होणार नाही.
मी ह्या वर्षी 'सतार वाजवणारे बाप्पा' तयार करायचे ठरवले होते. माझी पत्नी सतार शिकत असल्याने सतार कशी असते? ती वाजवताना वादक कशा प्रकारे बसतो ह्याची मला पूर्ण कल्पना होती. तरीही इंटरनेटवर सतारवादकांचे फोटोही मी पाहिले हाताची आणि पायाची ठेवण कशी असावी ह्याची नीट कल्पना आल्यावर बाप्पांची 'बैठक' करायला घेतली. शाडूची माती चिकट असल्याने हवी तशी वळवता येते. पाय करण्यासाठी आधी पायाचा आकार लक्षात घेऊन तेवढ्या प्रमाणात मोठा चपटा गोल तयार करून, त्याची वळकटी केली (पोळी गुंडाळतो तशी) पाय गुडघ्यात दुमडला जातो त्यामुळे गुडघ्यापासून पावलापर्यंतच्या भागासाठी एक वळकटी, गुडघ्यापासून मांडी/कमरेपर्यंतच्या भागासाठी अजून एक वळकटी ह्या हिशोबाने एकूण ४ वळकट्या तयार करून घेतल्या आणि बैठकीच्या अनुषंगाने त्या एकमेकींना जोडल्या. जिथे जोड येतो तिथे शाडूची अजून एक चपटी पट्टी लावून जोडल्या जाणार्‍या दोन्ही वळकट्यांमध्ये शाडू मिसळून घेतला. शाडू मिसळून घेण्यासाठी हॅक्सॉ ब्लेडच्या काटेरी बाजूचा वापर केला. त्याने शाडूची माती नीट मिसळला जाऊन जोड पक्का होतो. ब्लेडच्या काटेरी बाजूने शाडू मिसळल्याने वरच्या बाजूला खूप खडबडीत दिसते ते ब्लेडच्या सपाट बाजूने पुन्हा सपाट करून घेतले. सतारवादकांच्या बैठकीला अनुसरून खालील फोटोप्रमाणे बैठक केली. जोडलेल्या २ पायांच्या ४ वळकट्यांना जोडून कमरेचा मागचा भागही जोडला (दुसरा फोटो)

(बैठक-१)
From Bappa

(बैठक २)
From Bappa

पायांवर देवाचे सोवळे/पितांबर येणार असल्याने आत्ता थोडं ओबड-धोबड वाटत असलं तरी हरकत नाही.
पायांचा ढोबळ आकार तयार झाल्यावर सोवळे तयार केले. सोवळ्याचा घोळदारपणा दाखवण्यासाठी आधी अशा पट्ट्या जोडल्या आणि ब्लेडने त्याही मूळ आकारात मिसळल्या.
(सोवळे- १)
From Bappa

(सोवळे-२)
From Bappa

पाऊल-
पाउले करतानाही बैठक कशी आहे ह्याचा विचार करणे महत्वाचे असते. पाऊल करताना सुरुवातीला बोटे सोडून असलेला पावलाचा भाग तयार केला. आणि मग पायांच्या बोटांच्या आकाराचे शाडूचे गोळे करून ब्लेडच्या टोकाने ते त्या आकारात मिक्स केले.
(पाऊल-१)
From Bappa

(पाऊल-२)
From Bappa

(पाऊल-३)
From Bappa

नंतर पोट तयार करायला सुरुवात केली. खालच्या फोटोत पोट थोडे आकाराने मोठे वाटेल, परंतु नंतर छातीचा भात तयार करताना ते कमी केले.
From Bappa

छाती आणि खांद्याचा भाग तयार करताना वरच्या फोटोतले पोट उंचीने थोडे कमी केले आणि बनियनला असतात तशा प्रकारे दोन पट्ट्या (रुंदीला जास्त) तयार करून त्या पोटाच्या भागाला जोडल्या. पुन्हा ब्लेडने शाडू नीट मिसळून घेतला. आणि नंतर त्या पट्ट्यांना पुढे आणि मागे आडव्या पट्ट्या लावून पाठीचा आणि छातीचा भाग तयार केला. (बनियनसारख्या केलेल्या दोन पट्ट्यातली गॅप पुढून आणि मागून भरून काढली.)
खालच्या फोटोत ह्याची थोडी-बहुत कल्पना येईल. (सतार तयार करून लावली असल्याने पूर्णपणे दिसत नाहिये)

From Bappa

आता छातीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला हात तयार करण्यासाठी (पाय तयार करताना केल्या होत्या तशाच पण आकाराने जरा लहान) वळकट्या तयार करून जोडल्या. दोन हातांसाठी चार वळकट्या तयार केल्या. (खांद्यापासून कोपरापर्यंत एक आणि कोपरापासून मनगटापर्यंत एक- अशा प्रत्येक हातासाठी दोन)
हात फक्त मनगटापर्यंत करून मग पायाचे पाऊल केले तसे आधी हाताच्या पंजाचा बोटे सोडून उरलेला भाग केला. हाताच्या बोटांच्या आकाराच्या छोट्या वळ्या वळून त्या चिकटवल्या आणि ब्लेडच्या टोकाने नीट मिसळल्या. खालील फोटोत हाताचा अंगठ्याचा भाग उरलेल्या पंजात मिसळून झाला होता. बाकीची बोटे मात्र नुसती चिकटवली आहेत. नंतर ती ब्लेडने पंजाच्या भागात मिसळली.

From Bappa

पंजा तयार करून मनगटाजवळ जोडला आणि इथेही पंजा आणि मनगटाचा शाडू ब्लेडने नीट मिक्स करून घेतला. मिक्स झालेल्या जागेवर हातातले कडे करायचे असल्याने तिथे जास्त फिनिशिंग न करता, कडे करण्यासाठी तीन वळ्या करून तिथे जोडल्या. खालील फोटो पहा.
या फोटोत हाताचा अंगठा आणि इतर बोटे गरजेनुसार वळवली आहेत. बोटे वळवताना क्वचित बोटाची वळी मोडू शकते. लहान वळ्या लवकर वाळतात त्यामुळे असे होते. बोटाची वळी तयार करताना आधीच थोडीशी वाकवून तयार करणे हा एक उपाय आहे. सरावाने हे सहजसाध्य होते.

From Bappa

नंतर मानेचा भाग तयार करून त्यावर चेहरा जोडला.
दुर्दैवाने इथून पुढचे फोटो वेळे अभावी काढू शकलो नाही.
From Bappa

चेहरा जोडताना एक चेहर्‍याच्या उंचीएवढी रुंदी असलेली चपटी आयताकृती पट्टी तयार करून घेऊन ती मानेभोवती बाहेरून गुंडाळली. गालाच्या भागाचा फुगवटा दाखवण्यासाठी आतून तो भाग बाहेरच्या बाजूला दाबला. ब्लेडच्या सपाट बाजूने फिनिशिंग केले. नंतर त्यावर मुकुटासाठी शाडूचा चपटा गोल तयार करून पुरणपोळीच्या उंड्यासारखा खोलगट करून जोडला.
सोंड मात्र आतून पोकळ करता येत नसल्याने चेहर्‍यापेक्षा सोंड वजनात थोडी जड होते. त्यामुळे ती जोडताना/जोडल्यानंतर निखळून पडू शकते. म्हणून सोंड जिथे जोडायची तिथे ब्लेडच्या टोकाने थोड्या खाचा पाडून ठेवायच्या. खाचांबर बोटाने थोडे पाणी सोडायचे आणि मग सोंड जोडायची. जेणेकरून सोंड चेहर्‍याला नीट चिकटेल. सोंड चिकटवल्यानंतर बाहेरून शाडूची छोटी पट्टी सोंड+चेहरा जिथे जोडलाय तिथे आडवी ठेवून पट्टीचा वरचा भाग चेहर्‍याच्या शाडूत आणि पट्टीचा खालचा भाग सोंडेच्या शाडूत मिसळला.
फोटो देता येत नसल्याने, केवळ वर्णनाने कदाचित खूप किचकट वाटेल म्हणून इथेच थांबतो.
पूर्ण झालेला गणपती:

From Bappa

रंगवून पूर्ण झालेला गणपती:

From Bappa

मोरया!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार Happy
अवल, तुमचं निरीक्षण अतिशय अचूक आहे.
उंदिर मामांच्या पखवाजाचे क्लोज अप देईन उद्यापर्यंत.

छान

वा! अप्रतिम. काय सुंदर मुर्ती बनवली आहेत.
पाऊल ३ चा जो फोटो आहे तो पाहुनच तुमच्या कलाकारीची जाणीव झाली. पुढचे सगळेच अप्रतिम.

अमेझिंग. अत्युकृष्ट कलाकृती. मला न रंगवलेली मूर्ती खूप खूप आवडली. सगळे बारकावे अगदी सहज दिसतात. कुठलेही स्कल्पचर करायला खूप चिकाटी लागते. तुम्ही त्यातलेच एक आहात.

सगळे फोटो स्टेप बाय स्टेप पाहताना गोड शहारा आला अंगावर. Happy

किती वरदहस्त असावा!! फार उच्च झाली आहे मूर्ती. शब्द नाहीयेत कौतुक करायला!!>>>>बस्के +१०००० Happy

सुंदरच !!

पायरी-पायरीने दिल्यामुळे प्रत्यक्ष मूर्ती घडत असताना तिथे हजर असल्यासारखं वाटलं. पावले, बाहेर वळवलेला अंगठा फार आवडला. रंगवण्यापूर्वीची मूर्तीच फार सुरेख दिसते आहे.

(काही फोटो मात्र फारच अंधारे आलेत. त्यामुळे मूर्तीकाराने तेव्हा बघणार्‍यांना आसपास फिरकू दिले नसल्यासारखे वाटले Wink )

अप्रतिम सुंदर...बाप्पा निर्मीतीतले सगळे बारकावे खूपच छान विस्तृत केले आहेत्.कला आणि कलाकार दोघांना अभिवादन.

दुर्दैवाने इथून पुढचे फोटो वेळे अभावी काढू शकलो नाही.
Sad Sad

रंगवण्याबद्दलही लिहिले नाहीत, अर्थात त्यात काही वेगळे आणि वाचणेबल असेल तर लिहिता येईल का..

बाकी खूपच छान लिहिलेय.. निव्वळ अप्रतिम कलाकारी..

व्वा! चैतन्य ग्रेट आहेस. फारच सुबक झाली आहे मूर्ती! सुंदर!
आणि स्टेप बाय स्टेप लिहिणं फोटो काढणं...........केवढा पेशन्स!

प्रतिसाद देणार्‍या सर्वांना पुनश्च धन्यवाद!

बस्के, खरे आहे तुमचे..
बाप्पांचा वरदहस्त आहे हेच खरे.
अजून एक मुद्दा लेखात लिहायचा राहून गेला. लिहिणार नव्हतो खरं तर, पण तुमच्या प्रतिसादामुळे लिहितो आहे.
दर वर्षी बाप्पांची मूर्ती करत असताना किमान एक क्षण तरी असा येतो कि मला थोडासा गर्व होतो. 'मी लय भारी' असं वाटतं. तेव्हा जर बाप्पांचा 'आशीर्वादाचा हात' किंवा अजून काही करणे चालू असेल तर होतं असं की तो हात किंवा जो काही मूर्तीचा भाग आहे तो १० वेळा करून मोडला तरीही मनासारखा होत नाही. अशा वेळी बाप्पांना अनन्यशरण जाऊन 'मी चुकलो रे गर्व करून. आता करवून घे नीट.' अशी प्रार्थना करावी लागते आणि मग चमत्कार झाल्यासारखा तो भाग इतका सहज जमून जातो, की आधीच्या १० वेळा हे का झालं नाही? असा प्रश्न पडतो.
या वर्षी मी चेन्नईतून १ सप्टेंबरला पुण्यात शिफ्ट झालो. पहिले दोन दिवस घर लावण्यात गेले. त्यामुळे ३ तारखेला मूर्ती करायला सुरुवात केली. खूप धाकधूक होती की कसं काय होईल ह्या वर्षी. त्यात सतार घेतलेले बाप्पा करायचे, ती सतार जमेल की नाही असेही वाटत होते. सूरमाय च्या गाण्यासाठी बासरी वाजवून रेकॉर्ड करायची होती. बाप्पांनाच सांगितलं 'करवून घ्या'!! आणि त्यांनी हाक ऐकली. ह्या वर्षी अक्षरशः एकदाही मला कुठलाही भाग (बाप्पांचं पोट थोडं कमी करावं लागलं, ते सोडून) पुन्हा करावा लागला नाही. त्यांची कृपा नसती, तर शक्यच नव्हतं.

रंगकामाबद्दल-
आधी खालच्या फोटोप्रमाणे व्हाईटवॉश देऊन घेतला.

From Bappa

बापांच्या अंगासाठी मी साधे पोस्टर कलर वापरले आहेत. पांढरा रंग जास्त प्रमाणात घेऊन त्यात आधी पिवळा रंग मिसळून मग गरजेनुसार लाल रंग त्यात मिसळला. हा रंग जरा जास्त प्रमाणात तयार करून घ्यावा. डोळे रंगवताना किंवा गंध किंवा शरीरालगत असलेला वेगळ्या रंगातला कोणताही भाग रंगवताना ब्रश शरीरावर लागू शकतो. तो झाकण्यासाठी 'बॉडी कलर' जास्त असला तर उपयोगी ठरतो. तो संपवला तर आधीसारखाच रंग पुन्हा तयार होईल ह्याची खात्री देता येत नाही.

डोळे रंगवणे हे सगळ्यात महत्वाचे काम. आधी फिकट चॉकलेटी रंगाने डोळ्यांची आऊटलाईन काढून घेतली.
जर आऊटलाईन ठीक वाटली नाही तर जास्त करून ठेवलेल्या बॉडी कलरने ती झाकून पुन्हा करता येते.
आणि नंतर त्या फिकट चॉकलेटी आऊटलाईनवरून काळा रंग दिला.

गोल्डन रंग सगळ्यात शेवटी द्यावा. कारण म्हणजे गोल्डन कलरच्या पावडरीत वॉर्निश मिसळून रंग द्यावा लागतो. आणि तो देताना इतर कुठे ब्रश लागणार नाही ह्याचीही काळजी घ्यावी लागते. वॉर्निश मिसळले असल्याने, चुकून इतर कुठे ब्रश लागला तर साध्या पोस्टर कलरने तो गोल्डन रंग झाकणे कठिण जाते.

अवल, उंदराचा क्लोज-उप Happy
From Bappa

-चैतन्य.

सुरेख!! कला आहे हातात. खरचं फार सुंदर!!

मी कधीचं घरी मुर्ती बनवलेली नाहि. या वर्षी बनवायचा विचार आहे. अमेरिकेत शाडुची माती कुठे आणि काय नावाने मिळते हे कुणी सांगु शकाल का?

मागील वर्षी या बाप्पांच्या प्रत्यक्ष दर्शनाचे भाग्य लाभले - श्री चैतन्यकृपेकरुन .....
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ति मोरया .....

Pages