माणूस जितका जुना असेल तितकीच जुनी बहुतेक घर सजवण्याची कला..! राहायला घर हवं, याचं भान आलं तसंच पुढे ते छान हवं, सुंदर हवं वगैरे याचंही हळुहळू आलं असेल. लाखो वर्षे गेली, नि उत्क्रांतीसोबतच या गृहसजावटीच्या कलेतही क्रांतीकारक बदल झाले. आजही घर आणि सजावट हा विषय सामान्याच्या जवळचा, जिव्हाळ्याचा. घर सजवून देणार्या लोकांशी जिव्हाळ्याचं नातं तयार होईल असा. ही कला सहजसाध्य, सोपी असेल असं कधी वाटतं, तर कधी तिच्या वेगवेगळ्या अविष्कारांमधून, साक्षात्कारांमधून थक्क व्हायला होतं. कल्पनाशक्तीला आणि बुद्धीला आव्हान देणारी ही कला नवनवीन तंत्राला, तंत्रज्ञानाला आणि बदलांना सहज सामोरं जाते.
गृहसजावट (इंटेरियर डिझाईन) हे वेड आणि व्यवसायही असलेल्या प्राजक्ता कुलकर्णींशी झालेली ही बातचीत.
तुझ्या व्यवसायाचा हा प्रवास कसा, कुठुन आणि कधी सुरू झाला?
प्राजक्ता- लहाणपणापासून माझ्यातली असलेली चित्रकलेतली गोडी, गती वडिलांनी ओळखली होती. त्यांनी चित्रकलेचं रीतसर शिक्षण द्यायला सुरूवात केली. मग हळुहळू 'इंटेरियर डिझाईनिंग' संदर्भातल्या प्राथमिक गोष्टी रंजक पद्धतीने सांगायला सुरूवात केली. अनेक चित्रं, फोटो दाखवले. या विषयावरचे चांगले लेख आणि नंतर पुस्तकंही वाचायला दिली. १९९८ साली मी अॅप्रेंटिसशिप एका आर्किटेक्ट फर्ममध्ये सुरू केली. आणखी एका आर्किटेक्चर फर्ममध्ये इंटेरियर डिझायनर म्हणून नोकरी केल्यावर २००२ मध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून रुजू झाले. इथल्या पाच वर्षांत माझं अनुभवविश्व विस्तारलं. अनेक गोष्टी बारकाईने बघायला शिकता आलं. एखादी गोष्ट 'हौशी' पातळीवर आणि 'व्यावसायिक' पातळीवर करणे यातला फरक हळुहळू समजला. आत्मविश्वास वाढला. शेवटी मनात आकार घेत असलेलं स्वप्न २००७ साली प्रत्यक्षात आलं. हे स्वप्न म्हणजेच माझी 'होम एटसेट्रा' (Home Etc.) नावाची फर्म.
हे नाव कसं सुचलं, सापडलं? नावामागे काही कार्यकारणभाव?
प्राजक्ता- आपल्यासारख्या सामान्य माणसाची 'घर' या गोष्टीशी जोडलेली नाळ आपणा सर्वांना चांगलीच माहिती आहे. या घरासाठी करावं तेवढं थोडंच असतं, याच भावनेतून 'घर पाहावं बांधून..' हा वाक्यप्रयोग किंवा म्हण जन्माला आली असावी. घर बांधून झाल्यावर ही कथा संपत नाही, तर तिथून नवं वळण घेऊन पुन्हा सुरू होते, असं म्हणायला हवं. काहीही फर्निचर, फर्निशिंग नसलेल्या ओक्याबोक्या घराची आजच्या काळात कल्पना तरी करता येते का? घर कितीही छोटं असू देत, त्याच्या आत करायच्या असलेल्या सोयी आणि वस्तू यांची यादी संपता संपत नाही. सोफा, वॉलयुनिट, किचन ट्रॉलीज, किचन कॅबिनेट, क्रोकरी युनिट, बुक शेल्फ, बेड्स, वॉर्डरोब्ज, कॉफी टेबल, डायनिंग टेबल, पीओपी आणि लाईटिंग, स्टोअरयुनिट, देवघर, आरसे, शोभेच्या वस्तू नि प्लँट्स, पोर्ट्रेट्स आणि फ्रेम्स, रंगकाम, वॉलपेपर्स... हुश्श..! पण तरी अजून काहीतरी बाकी राहतंच. एक केलं तर दुसर्याची रूखरूख लागून राहते. 'घरासाठी करावं तेवढं थोडंच असतं' ही स्टोरी नव्याने सुरू होते ती अशी. हे सारं प्रतीत होईल असं नाव, असे शब्द मला हवे होते. आमच्या जाहिरात एजन्सीशी बोलून, चर्चा करून अनेक नावांतून हे नाव शेवटी नक्की केलं. आता हे नाव आवडल्याचं अनेक लोक आणि क्लायंट्स सांगतात तेव्हा छान वाटतं.
व्यवसाय वाढवताना काय अडचणी आल्या? शिवाय आतादेखील कुठच्या प्रश्नांना तुला या व्यवसायात नेहमीच तोंड द्यावं लागतं?
प्राजक्ता- (हसून) वाढवताना अडचणी आल्या नाहीत असा एकही जगातला व्यवसाय नसेलच. पण आत्मविश्वास होता, अनुभव होता, घरातल्यांची साथ होती. निभावून नेलं छानपैकी. आताबद्दल बोलायचं, तर 'अडचण' अशी म्हणता येणार नाही, पण यातल्या तांत्रिक गोष्टी ग्राहकांना समजावून सांगण्यात, गळी उतरवण्यात अनेकदा खूप कष्ट पडतात, त्रास होतो. नवीन तंत्रज्ञान, नवीन मटेरियल्स, नवीन ट्रेंड्स यावर मध्यमवर्गी सामान्य माणसाकडून सहजासहजी विश्वास ठेवला जात नाही. पण आता तो धंद्याचा भागच झाला ना!
दुसरं म्हणजे कामगार वर्गाशी जुळवून घेणं, नवीन तंत्रज्ञान त्यांना समजावून सांगणं आणि एकंदरच त्यांची एनर्जी आणि वर्कमनशिप मेंटेन करत राहणं. त्रास होतोच, यांनाही अडचणी म्हणू नयेच.. हाही धंद्याचा भागच की.
या इंडस्ट्रीत / व्यवसायात सध्या भारतात कसं वातावरण आहे?
प्राजक्ता- भारतातलं वातावरण अतिशय उत्साहाचं आहे असं म्हणता येईल. आमच्यासारख्यांना बळ देणारं, नवीन प्रयोग करू पाहणार्यांना ऊर्मी देणारं आहे. गृहसजावटीवर पुण्या-मुंबईत आता आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रदर्शने भरू लागली आहेत. यांत तुम्हालाच नव्हे, तर आम्हालाही बरंच काही शिकायला बघायला मिळतं. होऊ घातलेल्या ग्राहकांनी आवर्जून ही प्रदर्शने पाहिलेली असली की आम्हाला मनापासून आनंद होतो. कारण आमचं काम सोपं झालेलं असतं!
यातल्या जागतिक ट्रेंड्सच्या दृष्टीने आपण कुठे मागे आहोत? नवीन तंत्रे / गोष्टी आणण्यासाठी प्रयत्न केलेत का?
प्राजक्ता- आपण मागे नाही आहोत. तिथलं सारं इथंही अतिशय कमी ठिकाणी, कमी प्रमाणात का होईना, आहेच आहे. फक्त एखादी गोष्ट 'वाईडली अॅक्सेप्ट' व्हायला वेळ लागतो, लागेल इतकंच. नवीन तंत्रे बघण्यासाठी, अभ्यासण्यासाठी अमेरिका, युरोप आणि चीन इथेही भेटी द्यायला सुदैवाने मला जमलं. तिथल्या गोष्टी, तंत्रे इथल्या वातावरणाला, जीवनशैलीला सुसंगत होतील अशा पद्धतीने थोड्या बदलून आपल्याइथे करून दाखवायचा प्रयत्न असतो.
या किंवा निराळ्या क्षेत्रात / व्यवसायात अजून निराळं काही करण्याची इच्छा आहे का?
प्राजक्ता- यामध्ये आता मन रमलं आहे. त्यामुळे सध्या तरी हे सोडून इतर काह करायची इच्छा नाही आणि वेळही नाही. भविष्य काय दिशा दाखवेल ते बघूया. इतर इंटेरियर कंपन्यांपेक्षा वेगळं म्हणाल, तर एका ठिकाणच्या कल्पनेची डिझाईनची इतर कुठेही पुनरावृत्ती होणार नाही, हे शक्यतो पाळण्याचा प्रयत्न करते आहे. आतापर्यंत त्यात बर्यापैकी यशही मिळालं आहे असं वाटतं.
इतक्या वर्षांत काय 'शिकायला' मिळालं, धडा मिळाला, असं वाटतं?
इंटेरियर कंसल्टंट आणि कंपनी म्हणून तुम्ही केलेलं काम घरातले सारे सदस्य अत्यंत गांभीर्याने घेतात. त्यामुळे काम चांगलं केलं, तर कर्णोपकर्णी तुमचं नाव पसरतं. त्या घरातल्या सर्व वयोगटातल्या सदस्यांचे तुम्ही अगदी जवळ जाता. मग माऊथ पब्लिसिटी हा सर्वात स्वस्त पण परिणामकारक जाहिरातीचा प्रकार तुमच्यासाठी भरभरून काम करतो. पण वाईट काम केलं, कामात नंतर घरातल्या वापरात प्रश्न आणि अडचणी निर्माण झाल्या तर मग.. भगवान बचाये! हीच माऊथ पब्लिसिटी तुम्च्यासाठी काय काम करेल हे सांगण्याची गरज नाही..!!
नवीन उद्योगात पडू इच्छिणार्यांना काय सांगशील?
अजून थोडी मोठी होऊ देत, वयाने नि अनुभवाने.. मग नक्की सांगेन! (हसून) सारे यशस्वी मोठे लोक सांगतात तेच.. 'ग्राहक देवो भव!'
***
प्रतिसादात प्राजक्ताला विचारलेल्या प्रश्नांचं स्वागत आहे.
***
***
धन्यवाद साजिरा छान झाली आहे
धन्यवाद साजिरा छान झाली आहे मुलाखत पण थोडी आटोपशीर वाटते.....
वा, काय एकेक सुंदर फोटो आहेत
वा, काय एकेक सुंदर फोटो आहेत इंटिरीयर्सचे....
सुरेख मुलाखत.......
धन्यवाद साजिरा......
छानच मुलाखत. अश्या धडादीचे
छानच मुलाखत. अश्या धडादीचे करावे तेवढे कौतुक थोडेच असते
बाकी ते फोटो तर सगळे मस्त आहेत.
छान मुलाखत! धन्यवाद साजिरा.
छान मुलाखत! धन्यवाद साजिरा.
वाह्ह्ह्ह काय छान मुलाखत आणि
वाह्ह्ह्ह काय छान मुलाखत आणि फोटोही सुंदरच आहेत.......
प्राजक्ताच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा......
धन्स गं साजिरा........
खुप छान. ही फर्म आहे कुठे?
खुप छान. ही फर्म आहे कुठे? पत्ता मिळु शकेल का?
धन्यवाद साजिरा, सुंदर ओळख
धन्यवाद साजिरा, सुंदर ओळख करून दिलीत!!
प्राजक्ताची डिझाईन्स एकदम फ्रेश आणी ट्रेंडी दिसत आहेत!!
प्राजक्ताच्या उतरोत्तर प्रगतीकरता माझ्या सदैव शुभेच्छा.
आम्हाला आम्च्या पुणयाच्या
आम्हाला आम्च्या पुणयाच्या घरात इन्टेरिअर डेकोरेशन करुन घ्यायचे आहे, तुमचा सम्पर्क क्रमान्क क्रुपया कळवावा.
छान ओळख् करून दिली आहे
छान ओळख् करून दिली आहे धन्यवाद
त्यांची वेबसाईट आहे का ?
आवडली मुलाखत! फोटोही छान!!
आवडली मुलाखत! फोटोही छान!!
साजिरा ओळख करून दिल्याबद्दल
साजिरा ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
माझे एक दोन प्रश्न
१. या मुलाखतील छायाचित्रात जे डिझाईन केलेले घर दाखवले आहे. त्यात लायटींग मधे जे निळे लाल लाईट्स आहेत त्यात निऑन लाईट्सचा वापर केला आहे का? आणि तो का केला आहे?
(या लाईट्सच्या प्रत्येक खोलीमधील वापरामुळे घरात एक कृत्रिमता जाणवते आहे, पब, रेस्टॉरंट्स मधे असते तशी..तेव्हा घरात हे वापरण्यामागचा उद्देश जाणून घ्यावासा वाटतो.)
२. विजेची टंचाई असलेल्या भारतात विजेचा वापर कमी करणारे दिवे वापरण्याबद्दल इन्टेरियर डीझायनर ग्राहकाला माहिती देतात का?
धन्यवाद साजिरा. प्राजक्ता,
धन्यवाद साजिरा. प्राजक्ता, आपल्या फर्मचे नाव आवडले.
हह+१
प्राजक्ता यांच्यासाठी प्रश्न
१) फोटोत दाखवली आहेत तशीच गृहसजावट दिसुन येते आजकाल. त्यात पूर्ण घर असे पॅक होऊन जाते की नंतर लोकांना त्रास होत नाही का? फार बंदिस्त सजावट वाटते ती. हा ट्रेंड अचानक कसा काय आला याबाबत आपण काही सांगु शकाल का?
२) अशा गृहसजावटीत नैसर्गिक प्रकाश, खेळती हवा वगैरेंना काय स्थान असते?
हह, ते निऑन लाईट्स नसून
हह, ते निऑन लाईट्स नसून (वीजबचत करणारे) एलईडी लाईट्स आहेत, असं वाटतं.
बाकी प्राजक्ता उत्तर देईलच
सुरेख मुलाखत... फोटो पण मस्त
सुरेख मुलाखत... फोटो पण मस्त
फक्त फोटोच पाहायला चांगले
फक्त फोटोच पाहायला चांगले वाट्ताहेत पण मुलाखतीत माहिती फारशी मिळत नाहीये...
मला यान्च्या फर्म चा पत्ता
मला यान्च्या फर्म चा पत्ता मिळेल का ?
अतिशय सुंदर मुलाखत झालेली
अतिशय सुंदर मुलाखत झालेली आहे. लेखक साजिरा यांचे आभार मानतो. मुद्देसूद प्रश्न व सहज पटण्यासारखी उत्तरे. तसेच या क्षेत्राची माहिती आम्हाला बर्याच प्रमाणात नव्यानेच समजली.
<<<दुसरं म्हणजे कामगार वर्गाशी जुळवून घेणं, नवीन तंत्रज्ञान त्यांना समजावून सांगणं आणि एकंदरच त्यांची एनर्जी आणि वर्कमनशिप मेंटेन करत राहणं. त्रास होतोच, यांनाही अडचणी म्हणू नयेच.. हाही धंद्याचा भागच की.>>>
हे विधान अतिशय आवडलं. घरांची सर्वच छायाचित्रे उत्तम. अश्या व्यवसायातील कॉस्टिंग कसे असते ते समजून घेऊ इच्छितो.
कळावे
गंभीर समीक्षक
सार्वान्ना प्रतिक्रिया
सार्वान्ना प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद!
प्राजक्ताला इथं मराठी लिहायला
प्राजक्ताला इथं मराठी लिहायला अजून थोडी अडचण येते आहे. वरील काही प्रश्नांना पाठवलेली उत्तरे देत आहे-
=============
या मुलाखतील छायाचित्रात जे डिझाईन केलेले घर दाखवले आहे. त्यात लायटींग मधे जे निळे लाल लाईट्स आहेत त्यात निऑन लाईट्सचा वापर केला आहे का? आणि तो का केला आहे?
(या लाईट्सच्या प्रत्येक खोलीमधील वापरामुळे घरात एक कृत्रिमता जाणवते आहे, पब, रेस्टॉरंट्स मधे असते तशी..तेव्हा घरात हे वापरण्यामागचा उद्देश जाणून घ्यावासा वाटतो.)
>>>
ते निऑन लाईट्स नसून वीजबचत करणारे 'एलईडी' लाईट्स आहेत. आकर्षक रंगसंगती, कमी जागा, फारसा मेंटेनन्स नसणं आणि खूप फ्लेक्झिबल वापर असेही त्याचे फायदे आहेत.
कृत्रिमतेबद्दल- अनेक ठिकाणी निर्जीव, छोटी, अंधारी वाटणारी जागा या दिव्यांच्या वापरामुळे सजीव, मोठी आणि फ्रेश वाटते, असा आमचा आणि आमच्या काही ग्राहकांचा अनुभव आहे. शेवटी आणि सर्वात महत्वाचं- सर्व माहिती देण्याचं काम आमचं असतंच- पण काय वापरायचं हे शेवटी ग्राहकाच्या इच्छा, बजेट आणि आवडीनुसारच ठरतं.
वरील काही फोटोंत कृत्रिमता वाटत असेल, तर फोटोचा आणि काढण्याच्या पद्धतीचा दोष म्हटला पाहिजे. हे फोटो प्रोफेशनल कॅमेर्याने आणि एक्स्पर्टकडून काढायला हवे होते, ही माझी चूक आहे- हे मी मान्य करते.
विजेची टंचाई असलेल्या भारतात विजेचा वापर कमी करणारे दिवे वापरण्याबद्दल इन्टेरियर डीझायनर ग्राहकाला माहिती देतात का?
>>>
अर्थातच देतो. ते आमचं काम आणि कर्तव्यही आहे- असं मी समजते. मात्र ग्राहकाला हवी असलेली गोष्ट करून देणे- हेही माझं कामच आहे. त्यांची मतेही काही अनुभवांतून आणि गृहीतकांतून बनलेली असतात. ती चूक किंवा बरोबर असतीलही, पण त्यांचा सन्मान झाला पाहिजे.
फोटोत दाखवली आहेत तशीच गृहसजावट दिसुन येते आजकाल. त्यात पूर्ण घर असे पॅक होऊन जाते की नंतर लोकांना त्रास होत नाही का? फार बंदिस्त सजावट वाटते ती. हा ट्रेंड अचानक कसा काय आला याबाबत आपण काही सांगु शकाल का?
>>>
पुन्हा एकदा- फोटो काढायच्या पद्धतीचा हा दोष आहे. साध्या कॅमेर्याने फारतर कुठचा तरी एकच अँगल आपण दाखवू शकतो. अशा फोटोंत सारे काही द्विमितीय होऊन जाते. या द्विमितींत प्रकाशयोजना, रंगसंगती, अंतरे - हे सारं त्रिमिती (थ्री डायमेन्शनल व्ह्यू) आणि वास्तवापेक्षा वेगळं दिसू शकतं. वरील फोटोंत केलेली रचना ही 'बंदिस्त' अशी नक्कीच नाही. वरचे हॉल्स हे ५५०-६०० चौरस फुटांच्या आसपासचे आहेत. या आकाराच्या खोलीत वरची रचना केल्याने बंदिस्त नक्कीच होत नाही. ही अशी बंदिस्त आणि सारी 'स्पेस' व्यापून झाकून टाकणारे इंटेरियर करण्याच्या मी स्वतःच विरोधात आहे.
पण जागा मोकळी दिसण्यापेक्षा पहिल्यांदा युटिलिटी महत्वाची आहे, ते आधी बघा आणि आमच्या गरजेप्रमाणे करून द्या, हेही सांगणारे अनेक ग्राहक आहेतच. परंतु हा ट्रेंड नक्कीच नव्हे. बदलत्या स्टाईल्स, बदलती मटेरियल्स, बदलते तंत्रज्ञान यांच्या ट्रेंड्सबद्दल मात्र भरपूर बोलता येईल.
अशा गृहसजावटीत नैसर्गिक प्रकाश, खेळती हवा वगैरेंना काय स्थान असते?
>>>
कुठच्याही गृहसजावटीत नैसर्गिक प्रकाश, खेळती हवा यांना महत्वाचे स्थान हवेच- असे मला वाटते. माझ्या कुठच्याही डिझाईनमध्ये प्राधान्यक्रमात या गोष्टी फार वर असतात. दिशा, हवा, उजेड या सार्या गोष्टींचा विचार केल्यानंतरच त्या अनुषंगाने गरजांचा आणि उपलब्ध जागेचा विचार केला जातो. वरील फोटोंत (किंवा खरंतर कुठच्याही फोटोत) हे सारं केलेलं अर्थातच दिसणार नाही. कृपया आपणांस शक्य असेल तर या गोष्टी बघण्यासाठी आम्ही केलेल्या कामाच्या ठिकाणी आपणांस घेऊन जायला मला खूप आनंद वाटेल.
प्रश्न आणि प्रतिसाद - या दोघांबद्दल खूप धन्यवाद तसेच मायबोलीचेही आभार. आणखी काही प्रश्न असतील, तर संवाद साधायला जरूर आवडेल.
छान मुलाखत!
छान मुलाखत!
खुपच सुंदर ! अभिनंदन ,
खुपच सुंदर !
अभिनंदन , शुभेच्छा !