विषय क्रमांक १ - थोडासा रुमानी हो जाये - अर्थात बारिशकर!

Submitted by नानबा on 29 August, 2012 - 12:54

कोरड्या दुष्काळाचे दिवस आहेत.. सगळीकडे नुसता रखरखाट... आकाशात एक काळा ढग नाही.. पावसाची कुठलीच लक्षणं नाहीत. माणसानं निराश न व्हावं तर करावं तरी काय! आणि अशात "मेरी मानिये तो ये बारिश खरिदिये, सस्ती सुंदर टिकाऊ बारिश - सिर्फ पाच हजार रुपयमें!!" म्हणत दारात आलेला बारिशकर!

आणि बघा हं! त्याची बारिशही सामान्य नाहिये - ती त्याच्याच तोंडून अनुभवायची चीज आहे.

हां मेरे दोस्त - वही बारिश जो आसमान से आती है, बुंदों में गाती है
पहाडोसे फिसलती है, नदियों में चलती है
लहेरोमें मचलती है, कुएं पोखर से मिलती है
खपरेलोंपे गिरती है, गलियोमें फिरती है
मोड पर संभलती है, फिर आगे निकलती है
वही बारिश!

आणि ही बारिश विकत घ्यावी अशा मोहात पडलेला बिनीचा बाप. त्याच्या थोरल्या मुलाची तर पक्की खात्रीच पटली आहे की हा पाऊस विकतो म्हणून पाच हजार काढणारा नक्कीच कुणीतरी भामटा आहे. पाऊस काय असा पडतो काय! पण 'प्रयत्न तर करून बघूया' असं बापाला वाटतय.

आकाशातून पडणारं, हे "पाऊस" नावाचं पाणी विकणं हे त्या भामट्याचं 'घेतलेलं' रुप.. त्याच्या रांगड्या रुपात खरतर एक जादुगार दडलाय! पण सुरुवातीला बघताना हे आपल्याला तरी कुठं माहित असतं ! पाऊस विकणं वरवरचं.. खरतर तो त्यांना एक स्वप्न विकतोय. नव्हे नव्हे - स्वप्नं वाटतोय!

हां तर कशाबद्दल बरं बोलत होतो आपण? तर रखरखाट!
हा रखरखाट केवळ बाहेरचा नाहिये, हा माणसांच्या आतही आहे, मग तो दुसर्‍यावर अविश्वास असलेला दिलीप असो, 'मैं नही कर सकता' असा स्वतःवर अविश्वास असलेला बीम, "नको जाऊस" इतके दोन सोपे शब्द इगोपायी बोलता न येणारा आणि ती सोडून गेल्याचं दु:ख बाळगणारा जेडी असो, नाही तर स्वतःच्या स्त्रीत्वावरच विश्वास नसलेली बिन्नी असो.

ही सगळी माणसं आतून कातावलेली, धास्तावलेली, दुखावलेली आहेत. परिस्थितीनं हतबल झालेली आहेत. हाताबाहेरची परिस्थिती बदलण्याची गोष्ट सोडाच, परिस्थिती कधी बदलू शकते ह्याबद्दलही ते साशंक, प्रसंगी निराश दिसताहेत.

बादलोंका नाम ना हो अंबर के गांव में
जलता हो जंगलभी खुद अपने ही छाव में!
यही तो है मौसम ...

जगण्याच्या संघर्षात आपण बरेचदा दमून जातो - नियतीचे फटकारे खात खात कितीदा जखमी होतो, वैतागतो, निराश होतो, अगतिक होतो.. अशावेळी माणूस तग धरू शकतो ते केवळ त्याच्या आशेवर, त्याच्या स्वप्नांवर. अगदी अवघड अशा काळातून जात असतानाही आपल्या 'आतला झरा' जिवंत ठेवायचं काम करतात ती ही स्वप्नं. पण ह्या वैशाख वणव्यात माणसं स्वप्न बघायचीही विसरून गेली आहेत! आणि तीच स्वप्न घेऊन आलाय धूमकेतू सारखा गावोगाव भटकणारा हा बारिशकर. जो इन्द्रधनुष की सवारी करता है, बारिश जिसके इशारोपे नाचती है - असा "दृष्टद्युम्न पद्मनाथ प्रजापती नीलकंठ धुमकेतू बारिशकर"... !

रास्ता अकेला हो, हर तरफ अंधेरा हो
रात भी हो घात की दिन भी अकेला हो
यही तो है मौसम ... आओ तुम और हम
दर्द को बासुरी बनाये
थोडासा रुमानी हो जाये!

ह्याला आयुष्याचं मर्म कळलय. आयुष्य आहे म्हणजे दु:ख, त्रास तर असणारच आहे, पण ह्या त्रासाचच गाणं करायची जादू ह्याला जमली आहे. ह्या बारिशकरानं स्वतः भोवती एक आभासी दुनिया विणली आहे.
"मैने अपने लिये एक नाम रखा है" म्हणत "तुम्हे भी सिर्फ एक बिन्नी होने की क्या जरुरत है" असं विचारत त्या दुनियेत वावरतानाही, एकदा आपण आपल्याला आत गवसलो की बाकीच्या जगाच्या मान्यतेची गरजच काय - हे त्याला पक्कं माहितीये! म्हणूनच तो बिन्नीला "नही बिन्नी, आईना बाहर नही, यहां अंदर होता है" असं सांगू शकतो. तू सुंदर आहेसच, स्वत:वर विश्वास ठेव - काय गरज आहे त्या बाहेरच्या आरशाची, हे अगदी जीव तोडून सांगतो. त्याच्या स्वप्नाळू मनाला स्वप्नांइतक्याच ताकदीनं हे स्वत्वही गवसलय.

आणि तसं पहा, त्याचं आभासी जगणही आभासी कुठंय! आपण जन्माला येतो, आपल्याला एक नाव मिळतं, समाजाच्या रचनेप्रमाणे एक भूमिका घेऊन आपण जगत रहातो. पण आपण बाहेरून कितीही साच्यात जगत असलो तरी किती रंग असतात आपल्या मनाचे! रंगूनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा - हे आपल्या प्रत्येकाकरता आत कुठेतरी खरं असतं.. खरच काय गरज आहे आपल्याला फक्त एक बिन्नी म्हणून जगण्याची - एक बेरंग आयुष्य 'पार पाडण्याची'! आपली स्वप्नं छोटी असोत वा मोठी, ती उराशी बाळगायला, त्यांच्यावर विश्वास ठेवायला, त्या स्वप्नांद्वारे मांगल्यावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे! आयुष्याच्या सत्याला स्वप्नांचे पंख लावून एकदा बघुया तरी!

हे त्याला कळलय - म्हणूनच ह्या फाटक्या दिसणार्‍या माणसाचं जगणं पदोपदी एक उत्सव झालय.. खरतर अशा माणसांचं 'असणं' हाच एक उत्सव असतो!

शाळेत असताना पहिल्यांदा पाहिलेला हा चित्रपट तेव्हा पासून आजपर्यंत असंख्य वेळा पाहिलाय आणि दरवेळी हा चित्रपट तयार करणार्‍या, दिग्दर्शित करणार्‍या, ह्यात काम करणार्‍या अभिनेत्या, तंत्रज्ञांचे अनेक अनेक आभार मानलेत! अमोल पालेकरांचा हा चित्रपट मला प्रत्येक वेळी नव्यानं काहीतरी देऊन जातो. चित्रा पालेकरांचे संवाद आणि कमलेश पांड्यांचं शीर्षकगीत, चित्रपटातल्या एकनएक कविता मनावर गारुड करतात.

आणि ह्या सगळ्याला साथ देताना नाना पाटेकरांनी सशक्तपणे रंगवलेल्या बारिशकरच्या मी नव्यानं प्रेमात पडते!
अगदी "मै कर सकता हूं, मै करुंगा" चा मंत्र शिकवण्यापासून ते "मै सुंदर हूं" ची खात्री पटवण्यापर्यंत, लफ्फेदार संवादातून पाऊस विकायला निघालेला ते "तुम अगर साथ होगी तो मेरी नाव यहां वहां नही भटकेगी" म्हणत तिच्या कुशीत विसावू पहाणार्‍या आकाशासारखा तो. सगळ्या जगाच्या त्रासाचं ओझं स्वतःच्या डोक्यावर हसून वाहणारा, त्याबदल्यात लोकांना आनंद वाटणारा, जगायला शिकवणारा तो, शेवटच्या फ्रेम मधे पावसाबरोबर सृष्टीचाच एक भाग होऊन गेलेला तो - चित्रपटाच्या शेवटी पावसाला जसं पडावच लागतं तसच मलाही त्याच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडावच लागतं!

मला कधी निराश वाटायला लागलं तर मी हा चित्रपट बघतेच बघते. कारण? कारण तेच -

मुश्किल है जीना उम्मीद के बीना
थोडेसे सपने सजाये
थोडासा रुमानी हो जाये!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुन्दर........ मी पण लहानपणी बघितलेला.. पहिल्यांदा हा चित्रपट कळलाच नाही...त्यानंतर पुन्हा बघितला आणि मग त्याचा खरा अर्थ कळ्ला, त्यातलं खर सौंदर्य गवसल.. आणि त्याची गोडीच लगली.... छान लिहिलतं....

छान लिहिलय. मलाही हा सिनेमा लहानपणी बघितला तेव्हा कळला नव्हता, मोठेपणी बघितला तेव्हा खरा अर्थ कळला. आता हा लेख वाचल्यावर पुन्हा बघावा वाटतोय.

या सिनेमावर कुणितरी लिहाव अस वाटतच होत.छान पण लिहिलय.अजुन हव होत.आधिचि बिन्नी आणि नंतरचि आपल्यालाही सुंदर दिसणारी बिन्नी अभिनयातुन इतका फरक दाखवता येतो याच अश्चर्य वाटल होत.मलाहि यासिनेमानी आरसा दाखवला होता.

एकदा टीव्हीवर बघण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा काहीच समजले नाही. आता परत बघायला हवा!

मध्यंतरी फेसबुकवर नानाची एक क्लिप बघितली होती. त्यात वरचे डायलॉग नानाने म्हटले आहेत, हे आत्ताच समजले!

रच्याकने, मी शिर्षकातले 'बारिशकर' घाई-घाईत 'बार्शीकर' असे वाचले!

या सिनेमावर कुणितरी लिहाव अस वाटतच होत.छान पण लिहिलय.अजुन हव होत.आधिचि बिन्नी आणि नंतरचि आपल्यालाही सुंदर दिसणारी बिन्नी अभिनयातुन इतका फरक दाखवता येतो याच अश्चर्य वाटल होत.मलाहि यासिनेमानी आरसा दाखवला होता.

छान लिहिलय. Happy
हा चित्रपट पाहिलाय तेव्हा फक्त ढिश्शुम ढिश्शुम चित्रपट आवडण्याच्या वयात होतो.
आता परत एकदा पहावा लागेल.

पण ह्या त्रासाचच गाणं करायची जादू ह्याला जमली आहे. ह्या बारिशकरानं स्वतः भोवती एक आभासी दुनिया विणली आहे.
"मैने अपने लिये एक नाम रख्खा है" म्हणत "तुम्हे भी सिर्फ एक बिन्नी होने की क्या जरुरत है" असं विचारत त्या दुनियेत वावरतानाही, एकदा आपण आपल्याला आत गवसलो की बाकीच्या जगाच्या मान्यतेची गरजच काय - हे त्याला पक्कं माहितीये! <<<

व्वा व्वा

सुंदर लेख आहे. अनेक शुभेच्छा Happy

जियो मेरी जान..जियो.....
"शिपै, आमच्या नानबाला १०० गावं इनाम देवुन टाका बिगी-बिगी!" Happy

हाय्ये... मी वाटच बघत होतो अजुन कुणीच बारिशकरबद्दल कसं लिहीत नाही म्हणुन ! ते म्हणतात ना ’मर्मबंधातली ठेव’ वगैरे, तसं काहीसं आहे हा चित्रपटाचं माझ्या बाबतीत. मुळात ’नाना’च आवडता कलाकार आणि त्यात यातली ’बारिशकरची’, स्वप्नं विकणार्‍या जादुगाराची भुमिका....
Nana, at his best !

मनःपूर्वक आभार आणि शुभेच्छा !

बारिशकरच्या मी नव्यानं प्रेमात पडते! >> Happy

मी बघितलेला तेंव्हा तितकासा नव्हता आवडलेला. पण आता तुझा लेख वाचून पुन्हा बघावासा वाटतोय. मस्त झालाय लेख.

चित्रपटाच्या शेवटी पावसाला जसं पडावच लागतं तसच मलाही त्याच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडावच लागतं!>>खल्लास लिवलेय!!!

चित्रपट सुंदर होता. नाना आणि अनिता कुंवर चा अभिनय सुरेख!!!

हा सिनेमा विजय तेंडुलकरांच्या "अशी पाखरे येती" ह्या नाटका वरुन अमोल पालेकरांनी बेतला. मला वाटतं मुळ नाटकात स्वतः जब्बार ने काम केले आहे ( जाणकारांनी प्रकाश टाकावा. चुभुद्याघ्या) काही प्रयोगात. आर्थात ह्या नाटकाचे वेग्वेगळ्या संचात अनेक प्रयोग झाले.

नंतर ह्या विषयाची अनेक व्यावसायिक आणि प्रायोगिक बाळे निघाली. ( रेखाचा "खुबसुरत" , ह्रुषिकेष मुखर्जींचा " बावर्ची") अनेक प्रकारे हा विषय तोडला मोडला गेला. पण मुळ विषय पालेकरांनी मुळ स्वरुपातच सिनेमात आणला. अजुन टोकदार करुन.

नानाचा ह्यातला बारीशकर खुप कन्वीन्सिंग वाटतो.

खल्लास !
काय सुंदर लिहिलंयस गं.....पिटुकलंच पण अगदी परिणामकारक.
लहानपणी पाहिला होता. फारसा आठवत नाहीये. पुन्हा पाहणार.

मला तितकासा आवडला नव्हता हा. कारण गुलजारने पण हिच कथा, मुसाफिर मधे सादर केली होती.
हा चित्रपट बघितलाय का कुणी ?

नासिरुद्दीन, रेखा, मुनमुन सेन आणि पंकज कपूर होते. मूळ कथेतल्या नायकाला काही भूतकाळ नाही, पण गुलजारने त्याचे पुर्वायूष्य दाखवून त्याला थोडी पार्श्वभुमी दिली होती. त्या भागात मुनमुन सेन होती. आशाचे एकच गाणे होते आणि ते सुंदर होते. कथा केरळमधे घडते असे दाखवले होते. नासिर, रेखा आणि पंकजचा अभिनय त्यांच्या लौकिकाला साजेसा असाच होता. त्याच्या तूलनेत, मला रुमानी, फिका वाटला.

रुमानी मधे नानाची वेगळी भुमिका होती हे खरेय पण पालेकरांना अपेक्षित असलेला म्यूझिकल मात्र नव्हता तो. गाणी खास नव्हती.

हिच कथा, अशी पाखरे येती या नाटकात आणि एका मालिकेत पण आली होती.

छान लिहिलय. मलाही हा सिनेमा लहानपणी बघितला तेव्हा कळला नव्हता, मोठेपणी बघितला तेव्हा खरा अर्थ कळला. आता हा लेख वाचल्यावर पुन्हा बघावा वाटतोय.>>> + १००

हे त्याला कळलय - म्हणूनच ह्या फाटक्या दिसणार्‍या माणसाचं जगणं पदोपदी एक उत्सव झालय.. खरतर अशा माणसांचं 'असणं' हाच एक उत्सव असतो! >>> हे व यावरचे दोन पॅरा......... बस्स - या लेखालाच पहिला क्रमांक मिळू दे रे -

चित्रपटाच्या शेवटी पावसाला जसं पडावच लागतं तसच मलाही त्याच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडावच लागतं! >>> हे वाचूनच त्या पिक्चरच्या व या लेखाच्या प्रेमात पडायला झालं...

बस्स - या लेखालाच पहिला क्रमांक मिळू दे रे - >>> +१०० Happy
कसलं क्लास लिवलस गो माय , पुन्हा पुन्हा वाचतोय !

मी वाटच बघत होतो अजुन कुणीच बारिशकरबद्दल कसं लिहीत नाही म्हणुन ! ते म्हणतात ना ’मर्मबंधातली ठेव’ वगैरे, तसं काहीसं आहे हा चित्रपटाचं माझ्या बाबतीत. मुळात ’नाना’च आवडता कलाकार आणि त्यात यातली ’बारिशकरची’, स्वप्नं विकणार्‍या जादुगाराची भुमिका.... >>> +१०००!

खरंच मनापसुन वाटत होते कि कोणी तरी बरिशकर वर लिहावे!

धन्यवाद!
खुप शुभेच्छा!

मस्तच्.....खूप सही लिहिलय्स नानबा - मी हा सेनेमा नाही पाहिला, पण लेख खूप खूप आवड्ला..... डोळ्या समोर सगळं चित्र उभ राहीलं........पुलेशु......

सगळ्यांना थँक्यू..
शशांक आणि विशाल - खूप खूप थँक्यू!

ज्यांना आवडला नसेल त्यांना का आवडला नसेल ते समजू शकते.. प्रेमात पडलेला माणूस न आवडणार्‍या गोष्टींकडे काणाडोळा करतो, (मूव्हीच्या) तशा काही न आवडलेल्या गोष्टीत माझही होत असणारच आहे.. Happy

दिनेशदा बघितला नाहिये, पण जमेल तेव्हा नक्की बघेन मुसाफिर..

Pages