"आई गंss... आईss..."
बाबाच्या खोलीतून आवाज आला तशी निमा हातातलं ठेऊन चटकन उठली. तिनं आरशात बघून कुंकू ठीक केलं आणि खोलीच्या दारात येऊन उभी राहिली.
कमरेला एका हाताचा आधार देत बाबा पाय उंच करून शेल्फच्या वरच्या फळीवरलं पुस्तक काढण्याच्या प्रयत्नात होता. तिची चाहूल लागताच वळला. तिला भेटण्याच्या अगदी क्षण आधी बाबाची नजर रिकामी झालेली तिला जाणवली.
आणि निमाला वाटलं, देवा... आपल्या पायातलं बळ जाणार आता... बाबा आपल्याला ह्या वेषातही विसरतोय...
तोच, चष्म्याच्या आडून डोळे मिचकावत बघण्याच्या त्याच्या नेहमीच्या सवयीने तिच्याकडे बघतानाच बाबाच्या नजरेत ओळख आली.
"काय रे... काय झालं?" पायापासून रक्तप्रवाहं डोक्याकडे वाहातोय असं वाटत असतानाच तिनं आवाजात प्रयत्नपूर्वक सहजता आणून विचारलं.
"किती हाका... आलीस... आई.... अं...बाबूकाका.... तो... त्याचं ते हे... ते आले की"... पहिल्या दोन शब्दांनंतर बाबा त्याचं नेहमीचं असंबद्धं बरळू लागला. निमा पुढे सरली. तिनं त्याला हवं होतं ते पुस्तक काढून त्याच्या हातात दिलं आणि आधार देत त्याच्या खुर्चीवर बसवला.
"बाबा, ज्यूस घेतोस ना?..... ज्यूsss सssss?" असं म्हणत तिनं ग्लास त्याच्या तोंडाला लावला. आज्ञाधारक मुलासारखा ज्यूस संपवून त्यानं तिच्या पदराला तोंड पुसलं अन पुस्तकात डोकं घातलन.
खोलीत एक नजर टाकून निमा वळली. समोरचा आईचा, तिच्या आईचा हसर्या चेहर्यातला फोटो बघून तिच्या काळजात कळ उठली. हुंदका आलाच तर मोठ्ठ्यानं बाहेर पडू नये म्हणून ती किंचित भरभर चालत खोलीबाहेर पडली.
स्वयंपाकघराच्या ओट्याला धरून तिनं भराभरा श्वास घेतले अन स्वत:ला सावरलं. गेला महिनाभर ती सावरायचा प्रयत्नं करीत होती. म्हणावं तसं यश येत नव्हतं. कधीकाळी घरच्यांशी वाद घालून प्रेमविवाह करून घरी आणलेली आपली पत्नी, आयुष्याची सखी जग सोडून गेलेलीही तिच्या बाबाला कळलं नाहीये. जीव लावावं अशी कुणी आपल्या आयुष्यात आली होती हेच मुळात हरवलय.
गेली पाचेक वर्षं बाबाच्या आठवणींची पानगळ सुरू आहे. डिमेन्शिया... एक एक करीत सगळे संदर्भं पिकल्या पानासारखे आपणहून गळून पडतायत. तसं बघायला गेलं तर, आजूबाजूच्या परिस्थितीचं भान आहे. पण, "काहीतरी आहे झालं" ह्यापलिकडे नाही. जिच्यावर त्यानं कधीकाळी "माझा कायेबाहेरील प्राण" अशी कविता केली ती त्याची लाडकी लेक, निमाही त्याच्या विश्वातून कधी अंतर्धान पावलीये, त्याचा त्यालाच पत्ता नाही... अन, त्याबद्दल त्याची तक्रार नाही.
खरतर बाबानंच अधिक जपलेलं तिचं-त्याचं खास मैत्रीचं नातं.
त्याच्याबरोबर अन बरोबरीनं कित्येक गोष्टी तिनं केल्या. भाऊ-बहीण नाही... बाबाच सगळं. लहानपणी भातुकलीपासून, मधल्या काळातल्या रांगोळ्यांमधून, मोठेपणीच्या बॅड्मिंग्टनसकट सगळ्यात बाबा तिचा पार्टनर.
हा आपला बाबा असणं जितकं आपल्याला आत्ता खोलवर, अगदी चिरंतन असल्यागत सत्यं वाटतय... त्याहुनही मी त्याची लेक असल्याचं त्याला पटलं, रुजलं असणारच... पण तेही पुरेसं नाही, शाश्वत नाही... ह्या स्मृतीभ्रंशाच्या वावधुळीत.... कुणीतरी बळेबळे हाताला धरून हिसडून, हुसकावून लावल्यासारखं अपमानित वाटलं तिला.
आपण मुलगी म्हणून बाबाच्या लेखी अस्तित्वातच नाही हे पुन्हा एकदा जाणवून काहीतरी आत पुन्हा पुन्हा आपटून, फोडून तुकडे तुकडे झाल्यागत झालं. निमा तोंडात पदराचा बोळा कोंबून गदगदू लागली. कितीही दीर्घ श्वास घेतला तरी हुंदके थांबेनात. ती धावत मागच्या अंगणात तुळशीआड गेली. तिथल्या छोट्या फुलबागेला पाणी घालायच्या आईच्या झारीलाच कवटाळून रडू लागली.
किती वेळ कुणास ठाऊक... पण मधेच बाबाची हाक ऐकू आली... "... आईss, आई गंss.... ए आईsss"
तिनं आजूबाजूला बघितलं... वारा सुटला होता, आभाळ भरून आलं होतं. आवाज स्वच्छं करीत तिनं "... मागे अंगणात आहे, मी. थांब आलेच हं आत.." म्हटलं.
’सावरायला हवं.... उठायलाच हवं... नाहीतर बिथरेल, बाबा’, म्हणत आपला चेहरा पुसून त्यावर एक प्रौढ, समजुतदार मुखवटा चढवीत ती आत आली. बाबाचं आत्ताचं अवतीभवतीचं जे वातावरण आहे ते तसच राखायला हवं. त्यात झालेले छोटेसे बदलही त्याच्या आठवणींच्या कप्प्यांमधे गोंधळ निर्माण करायला पुरे असतात ह्याचा तिनं चांगलाच अनुभव घेतला होता.
गेल्याच आठवड्यातली गोष्टं. त्याचं अजूनही काही-बाही वाचन चालू होतं. शब्दांचा, वाक्यांचा त्याला नक्की काय बोध होत होता कुणास ठाऊक. त्याच्या ज्ञानेश्वरीची सुटी झालेली पानं तिनं एका दुपारी बसून नीट डकवली. त्या संध्याकाळी, त्याला ज्ञानेश्वरी वाचता येईना. नुस्तीच पानं उलट-पालट करीत राहिला. त्याचा गोंधळ अन तगमग बघून तिला भरुन आलं. आपल्यामते सुधारायला जाऊन किती पडझड केली आपण त्याच्या आधीच हल्लक झालेल्या आयुष्यात.
जिवाभावाच्या लोकांच्या आठवणी सोडाच पण काळाचाही संदर्भं पुसट होत चालला बाबासाठी. आठवणींमधला जो कप्पा उघडेल, मिटेल त्यानुसार त्याचं स्वत:चं वय, आजूबाजूचं जग ह्याचं भान येतं अन जातं.
कुठच्यातरी फांदीवर कुठलंतरीच पाखरू येऊन नाचून गेल्यासारखे नवखे असंबद्धं दुवे जोडले जातात. त्यात निमाचं तिच्या आज्जीसारखं दिसणं धरून बाबा तिला त्याची आईच समजून होता.
जे काही आहे ते धरून ठेवण्याच्या कसोशीत निमा... निमा बाबाची आई बनून वावरत होती. आज्जीसारखी काठपदराची साडी, तिच्यासारखं चंद्रकोरीचं कुंकू, हातात बांगड्या, छोटा अंबाडा...
निमासाठी ही तारेवरची कसरत होती. पहिल्यांदा-पहिल्यांदा चुकुन एक-दोनदा बाबानं हाक मारल्याबरोबर, ती तिच्या नेहमीच्या पंजाबी ड्रेसमधे धावत गेली. तो बिथरल्यासारखा बरळायला लागल्यावर तिला उमजलं. आता तिनं रिस्क घ्यायचीच नाही असं ठरवलं. कायम आज्जी बनूनच वावरायला लागली. तेव्हढातरी बाबा.. मूल म्हणून तरी हाताशी लागत होता.
आज कितीतरी दिवसांनी बाहेर वारा सुटला होता. वळीव कोसळण्याची लक्षणं होती. लहानपणीच का.... अगदी तिचं लग्नं होईपर्यंत अशा अवचित पावसात ती अन बाबा भिजायचे, मनसोक्तं. आई ओरडत असायची दारातून... शेवटी तिलाही खेचायचे पावसात. ती अगदी रडकुंडीला आली की सगळेच निथळत घरात यायचे. मग कांदा, कोथिंबीर घालून तिख्खट भडंग आणि आज्जीचा ओरडा असं एकदमच खाता-खाता, गरम गरम आल्याचा चहा पीत खिदळणं चालायचं.
किती झर्रकन ते सगळं हरवलं... गेल्या तीनेक वर्षांत ह्या घराचं घरपण, तिचं माहेर चिरा-चिरा, भिंत-आढा करीत तिच्याडोळ्यांदेखत ढासळत होतं. एखाद्या अप्रतिम चित्रातले मनाला येतील ते भाग, मनाला येईल त्यावेळी कुणीतरी पुसत होता. उरलेलं चित्रं संदर्भहीन, अपुरं, केविलवाणं झालं होतं.
"... आईsss आई गं... आईsss", बाबाची परत हाक ऐकू आली. तिनं चटकन आरशात टिकली बघितली अन आज्जी घेत असे तसा उजव्या खांद्यावरून पदर घेऊन बाहेर गेली. आणि....
आणि चित्रं झाली. मगाशी काढून दिलेल्या पुस्तकात त्याला खुणेसाठी ठेवलेलं जाळी पडलेलं पिंपळपान मिळालं होतं. तिनं शाळेत असताना एका फादर्स डेच्या खुळात गिफ़्ट म्हणून बाबाला दिलेलं... स्वत: रंगवलेलं... "वर्ल्डस बेस्ट डॅड"!
ते हातात घेऊन तो बसला होता... तिच्याकडे बघत एकदम म्हणाला, ’आई... निमू कुठाय गं?... शाळेतून आली नाही काय पोट्टी अजून?... आज जरा वेळ आहे तर तिला गोष्टं वाचून दाखवायची म्हणत होतो.’
बाबा आत्ता जे बोलत होता ते इतकं सुसंगत आहे, त्याला काही अर्थं आहे... आपल्याला अनेक दिवस, महिने जो हवा होता तोच अर्थं आहे... हे मुळी दोन क्षण निमाला समजलच नाही.
मग सावरून अतिशय उल्हासात तिनं म्हटलं ’अरे आत्ताच घरात शिरलीये...आहे, तिच्या खोलीत असेल... बोलावते हं’ अन वार्याच्या वेगानं आत धावली.
फरा फरा साडी सोडली तिनं अन थरथरत्या हातांना निघत नव्हती ती चंद्रकोरीची टिकली पदरानं खसाखसा काढली. कोणता पंजाबी ड्रेस घालू अशा घालमेलीत तिनं त्यातल्यात्यात जुना उचकटला कपाटातल्या घड्यांमधून. खांद्यावर ओढ्णी टाकून शेवटी आरशात डोकावून बघताना तिला कानातल्या कुड्या आणि घट्टं आंबाडा दिसला. "च्च..च्च..." करीत तिनं कुड्या कशाबशा सोलवटून काढून पलंगावर टाकल्या. आंबाडा सोडून भरारा केस विंचरून एकाबाजूनं पुढे घेतले अन धाव्वत बाहेर गेली.
कधी त्याला आठवण आलीच... अन ओळख पटलीच तर.... तर काय बोलायचं बाबाशी, किती बोलायचं, कोणती आठवण सांगायची, की... की रुजेन पुन्हा लेक म्हणून... ते सगळं सगळं ठरवून घोकून ठेवलेलं... तिला काही काही आठवेना... व्याकूळ झाली ती बाहेरच्या खोलीत पोचेपर्यंत. तिच्या आतलं वादळ जणू बाहेरही घोंघावत होतं. मागच्या दारातून समोरच्या उघड्या दारादिशेनं जणू आपलच घर असल्यासारखा वारा पिंगा घालीत होता.
बाहेर येते तो, बाबा एका हातात फडफडणार्या पानांचं ते पुस्तक घेऊन रिकाम्या नजरेनं बसला होता... तिच्याकडे बघून त्यानं दाराच्या दिशेनं उडालेलं खुणेचं पिंपळपान दाखवलं... "... निम्मीची गिफ्ट... आईss.... आई कुठे... गोष्टं सांगतो ना...निमेsss गोष्टंsss"
जिवाच्या आकांतानं निमानं दाराच्या दिशेनं धाव घेतली ते पान धरायला... वार्यानं कधीच त्याला पंख दिले होते.... हवेत उडणार्या पाल्या-पाचोळ्यासोबत तेही भिरभिरत कुठे दिसेनासं झालं.
धाव्वत येऊन ती बाबाच्या पायांशी बसली. लहानपणी बसत होती तशी... बाबाचा लेंगा धरून तिनं हट्टाच्या सुरात म्हटलं..."गोष्टं सांग ना... शाळेतून आल्यावर गोष्टं सांगणार होतास ना... सांग कीsss"
आधी एक थंड-निर्विकार नजर तिला भेटली. मग तिचा हात गडबडीनं झिडकारून, हातातलं पुस्तक फेकून देत बाबा उभा राहिला... आतल्या खोलीच्या दिशेनं बघत मोठमोठ्याने हाका मारीत सुटला... "आईss... आई गं.... ए आईsss"
-- समाप्तं
.
.
खुप छान..
खुप छान..
speechless!!! जीवाजीवांचे बंध
speechless!!!
जीवाजीवांचे बंध इतक्या तरलपणे आणि कमालीच्या प्रभावीपणे मांडणं, ही तुमची खासियत आहेच दाद!
सकाळी सकाळी काहीतरी छान वाचायला मिळालं!
धन्यवाद!
काय एकेक लिहितेस गं तू.....
काय एकेक लिहितेस गं तू..... कुठल्या विश्वात वावरत असतेस आणि वाचकालाही अलगद कशी नेतेस तिथे ..... कळतच नाही अज्जिबात.....
मानवी मनोविश्वात अशी सहजी विहार करुन काय काय तुझ्या हाताला लागेल ... कधी काय पुढ्यात ठेवशील असे काही .... पत्ताच लागत नाही ....
तुला, तुझ्या लेखणीला कितीदा प्रणाम करुन झालाय...... अवाक तर तू कायमच करत असतेस.....
बस्स.... आता मी काहीही विशेषणे न देता, कुठलेही कौतुकाचे शब्द न वापरता तुझ्या कलाकृतींचा निर्भेळ, मनापासून आनंद घ्यायचं ठरवलंय - माझ्यापुरतं तरी....
ही कथा ह्रदयाच्या अंतर्ह्रदयाला स्पर्श करणारी आहे....... जिव्हारी जखम करणारी...... वाचून फक्त तडफड होत रहाते.... मनाची....
दाद, सकाळी सकाळी मेजवानीच तू
दाद, सकाळी सकाळी मेजवानीच तू लिहिलेलं वाचायच म्हणजे.
कस ग जमत तुला कितीही गुंतागुंतीचा विषय अलगदपणे उलगडायला? प्रणाम माते ___/\___.
खुपच सुरेख.
शशांक, <<बस्स.... आता मी
शशांक, <<बस्स.... आता मी काहीही विशेषणे न देता, कुठलेही कौतुकाचे शब्द न वापरता >>
ब्येस केलस बघ...
आभारी आहे, चिमुरे, आनंदयात्री, शशांक आणि शुभांगी... ही कथा सिडनीत झालेल्या कालिदास जयंती समारोहात मी सादर केली (जुलै २०१२).
आवडली. गोष्टीच्या
आवडली.
गोष्टीच्या कथानकापेक्षा ती लिहायची पद्धतच फार आवडली.
ओडिओ किंवा विडिओ असेल तर टाक ना प्लीज.
अफाट
अफाट लिहीलेत्................सगले भाव अगदी तरल आणि सहज........
खुपच छान आहे दाद ही कथा
खुपच छान आहे दाद
ही कथा सिडनीत झालेल्या कालिदास जयंती समारोहात मी सादर केली (जुलै २०१२).>>>>> मला जमल नव्हत यायला कालिदास जयंतीच्या वेळी आले आसते तर तुझ्याच कडून एकाला किती मस्त वाटलं असत.
ही कथा सिडनीत झालेल्या
ही कथा सिडनीत झालेल्या कालिदास जयंती समारोहात मी सादर केली (जुलै २०१२). >>> कृपया, इथे त्या तुझ्या आवाजातल्या ऑडिओची (व्हिडिओ असेल तर पळेलच..) लिंक देणार का ....
निशब्द! __/\__
निशब्द!
__/\__
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
(No subject)
दाद एवढे सुंदर लिहता आपण की
दाद एवढे सुंदर लिहता आपण की काय प्रतिसाद देवु सुचत नाही... पण खरेच मनापासुन तुम्हाला __/\__
बापरे..
बापरे..
अप्रतिम
अप्रतिम
खरंच शब्द नाहीत काही
खरंच शब्द नाहीत काही बोलायला.. अप्रतिम..
ग्रेट
ग्रेट
हावरटासारखी वाचुन काढली तुझं
हावरटासारखी वाचुन काढली तुझं नाव पाहुन. नेहमीप्रमाणेच मस्त.
नेहमीप्रमाणेच अप्रतिम!!!
नेहमीप्रमाणेच अप्रतिम!!! _/\_
तेव्हढं ऑडियो लिंकच मनावर घ्याचं
खुपच छान
खुपच छान
(No subject)
क्या बात हे.. दाद ..... कसली
क्या बात हे..
दाद .....
कसली खुलवतेस तू कथा
खुप छान
खुप छान
बापरे, काय अंगावर येते ही
बापरे, काय अंगावर येते ही कथा! काय प्रतिसाद लिहावा तेही सुचत नाही!!
-गा.पै.
सुन्न ! गलबललंय आत.....
सुन्न ! गलबललंय आत.....
हे कुणाकुणाच्या जगण्याचं ओझं
हे कुणाकुणाच्या जगण्याचं ओझं तू शब्दात मांडतेस दाद.. Godbless.
दाद.. तुमच्या नावाची कथा बघून
दाद.. तुमच्या नावाची कथा बघून काय आनंद झाला सांगु..
एका दमात वाचून काढली अधाश्या सारखी..
कुठुन सुचत एवढं सगळं???
मी ही कथा तुझ्या आवाजात
मी ही कथा तुझ्या आवाजात "कालिदास जयंती" मध्ये ऐकली, अप्रतिम! तुझं ते " आई...आई ग" जीवाचा ठाव घेत होतं....मला दाद म्हणजे तुच हे समजायला खुप वेळ गेला....खुप सुंदर कथा. तुझी "दिवाळी" हि गोष्ट माझी सगळ्यात आवडती आहे, मी खुप रडले होते ती कथा वाचुन...खुप छान लिहितेस, मी तुला तेव्हा फोन देखील केला होता पण भेट झाली नाही, पण आता नक्की भेटु...पुन्हा सांगते की "जाळी पडलेल्या पानाचं गुपीत जाणुन घ्यायचं आहे
अप्रतिम!
अप्रतिम!
Pages