निसर्गाबद्दल लिहायचे म्हणून जरा निवांतपणे लिहायला घेतलेय आणि तसा निसर्गाला पण
भिडायला मुरायला वेळ द्यायला हवा ना !
मी इथे आलो तो दिवस दक्षिण गोलार्धातला सर्वात लहान दिवस होता, त्यामूळे सूर्य लवकरच
मावळला आणि एक देखणा सूर्यास्त बघायला मिळाला. वाळवंटातील सूर्यास्त हि एक खास
पर्वणी असते. इथली वाळू, अगदी मुलायम असल्याने दिवसभर आसमंतात उडत असते, आणि
संध्याकाळच्या वेळी ती आभाळात अनोखे रंग भरते. अबोली रंगाच्या वाळूमूळे, आभाळही
निळसर किरमीजी रंगाचे दिसले, सूर्याचे बिंब जरा जास्तच केशरी दिसू लागले, दुसऱ्या दिवशीचा
सूर्योदय पण तसाच देखणा होता.
आणि मग हे रोजचेच होऊन गेलेय. वर लिहिल्याप्रमाणे सूर्याचे दक्षिणायन पूर्ण झाल्याने, सूर्य
भरदुपारी देखील डोक्यावर नसतो. तो इतका खाली गेलेला असतो, कि सुर्योदय आणि सूर्यास्त
मला घराच्या एकाच खिडकीतून दिसतात. ( भारतातून असे दिसत नाही.)
इथे सर्वत्र वाळूच आहे, अगदी घोटाभर पाय रुतेल इतकी. त्यातही अबोली रंगाची जास्त. क्क्वचित
पांढरी वा पिवळसर पण दिसते. हि वाळू चरचरीत नसते, हाताला तर मुलायम लागतेच पण
डोळ्यात गेली तरी फ़ारशी खुपत नाही.
अशी वाळू असल्याने, झाडे वगैरे नसतील असा समज झाला असेल तूमचा, पण तसे नाही,
अगदी नैरोबी इतकी नसली तरी भरपूर झाडे आहेत इथे, आणि त्यातली बरीचशी ओळखीची,
पण वेगळ्या रुपड्यातली पण.
मस्कतमधले वाळवंट शुभ्र वाळूचे आहे आणि तिथे ठायी ठायी खजूराची फळावणारी झाडे
आहेत. रस्त्याच्या कडेने तर आहेतच पण खास मस्कती खजूराच्या बागायती पण आहेत.
इथे मात्र ती झाडे अजिबातच दिसली नाहीत.
पण काल खजूराबाबत एक हृद्य किस्सा घडला. घराजवळच्या मिनी सुपरमार्केटमधे मी गेलो
होतो. तिथे मला फ़्रिजमधे एक खजूराचे पाकिट दिसले. ते अर्थातच मी घेतले. कॅश काऊंटरवर
गेल्यावर तिथला मुलगा म्हणाला, ते खजूराचे पाकिट मी माझ्यासाठी ठेवले होते. मी म्हणालो,
मला माहित नव्हतं, ठेव तू. तर तो म्हणाला असं कसं, तू पण घे ना. त्याने दुसऱ्या पिशवीत
त्यातले अर्धे खजूर ठेवून मला दिले, आणि माझ्याकडून पैसेही घेतले नाहीत, मला एकाचवेळी
भरूनही आले आणि ओशाळल्यागतही झाले. ( सध्या रमदान चालू आहे.)
लाल माती आणि कच्चे रस्ते, असे बघून कोकणातच आलो आहोत कि काय असे वाटत राहते,
आणि या भावनेत भर घालतात ती इथे असणारी आंब्याची झाडे. चक्क आमराया आहेत इथे,
आणि त्यांच्या पानावर लाल मातीचे थर. सध्या सगळी झाडे मोहोरावर आहेत. पिकल्यावर
आंबा खायचा झाला तर रत्नागिरी, देवगड विसरूनच खावा लागेल, पण निदान कैऱ्या तरी
मिळतील. सर्व झाडे एकाच आंब्याच्या जातीची दिसली.
पोर्तुगीज वसाहत असल्याने तितक्याच संख्येने काजूची झाडे आहेत. पण या झाडांनी जरा
चकवले. गोव्यात पोर्तुगीजांनी काजूची झाडे लावली, ती तिथली मातीची धूप रोखण्यासाठी
( फ़ेणी हि स्थानिक लोकांनी शोधलेली चीज आहे.) आणि हा हेतू फ़ारच मनावर घेतल्या
सारखी गोव्यातील झाडे (इतकेच नव्हे तर कोकणातली बहुतेक झाडे ) ही जमिनीलगतच
वाढतात. उभ्या विस्तारापेक्षा आडवा विस्तार अगदी डोळ्यात भरण्यासारखा असतो. पण
इथली झाडे मात्र सरळ खोड आणि वर गोलाकार विस्तार अशी वाढलेली दिसताहेत.
आमच्या कंपनीच्याच आवारात झाडे असल्याने, अगदी जवळ जाऊन, पानांचा वास घेऊन
बघता आले.
आपल्याकडे आंब्याचा आणि काजूचा मोहोर साधारण एकाचवेळी येतो, इथे मात्र काजूच्या
झाडावर सध्या ना मोहोर ना काजू. पण हि झाडे फळावता्त एवढे नक्की, कारण तशा खुणा
झाडावर आहेतच.
काजू सारखेच कोडे घातले ते इथल्या देशी बदामानी. आपल्याकडे हि झाडे वाढतात ती मधे उभे खोड
आणि सभोवताली समांतर प्रतलात पाने. तसे आपल्याकडे या झाडाला फ़ारसे महत्व नाही. (मालदीवमधे
मात्र मी याच्या बिया, सोलून वगैरे विकायला असलेल्या बघितल्या होत्या ) इथे हे झाड असा काही
खास आकार न घेता वाढलेले दिसते. आमच्या कंपनीच्या आवारातच आहे आणि झाडाखालच्या बिया
फ़ळे, इथले कामगार टाईमपास म्हणून खात असतात. या फ़ळात खाण्याजोगा भाग फारच थोडा असतो.
पण कोकणात फ़ारशी नसलेली कडुनिंबाची झाडे पण इथे भरपूर आहेत. अगदी घराच्या अंगणात
वगैरे लावलेली आहेत. आपल्या कोकणात कडुनिंब फ़ारच तुरळक दिसतो. तिथले अनेक लोक,
बकाण्यालाच कडुनिंब समजतात. पण इथे मात्र भरपूर आहे तो. तुरळक निंबोण्या दिसताहेत.
कधी फ़ुलतो ते बघायचेय आणि फ़ुलला कि नगर भागात जसा भरभरून फ़ुलतो का, ते ही बघायचेय.
पूर्व आफ़्रिकेत, बाभूळ तर ठेचेठेचेला आहे. तिथल्या गवताळ प्रदेशात, बाभूळ आणि गवत यांच्यात
कायम चढाओढ असते आणि हती कधी या पार्टीत तर कधी त्या पार्टीत असे करतो. त्याच्या
मनात आले तर गवताळ प्रदेशात बाभळीचे वन तयार करू शकतो आणि त्याच्याच मनात आले तर
बाभळीच्या वनाचा नायनाट करुन तिथे गवताळ प्रदेश निर्माण करू शकतो. ( याबाबत मी सविस्तर
दोन लेख लिहिले होते ) तिथल्या वनातील झाडे, सरळ खोड आणि वर सपाट असा पर्णसंभार अशी
वाढतात. पण ही झाडे नैरोबीतही भरपूर आहेत. तिथे मात्र ती गोलाकार वाढलीत. अंगोलात आल्या
पासून, मात्र मी एकही बाभळीचे झाड बघितलेले नाही.
या गावी बाभळी नसल्या तरी बोराची झाडे आहेत. मुद्दाम लावलेली दिसतात आणि बाजारात ती
बोरे विकायलाही असतात. अगदी थेट आपल्याकडच्या चवीचीच. बोराबरोबर पेरू हवेतच, त्याचीही
झाडे आहेत. पेरूपासून केलेले एक पेय, इथे चांगलेच लोकप्रिय आहे. चवीला छान लागते ते.
आमच्या ऑफ़िससमोर एक सिताफळाचे झाड आहे. फ़ळे धरलीत पण कच्ची आहेत अजून, त्याचीही
चव बघायची आहे. नवल म्हणजे इथे शिरिषाची झाडेही खुप आहेत. सध्या शेंगांवर आहेत, शेंगा सुकल्या
की तसाच पैंजणांसारखा नाद करतात आणि फ़ुलावर आली कि आसमंत सुंगधी करतात, तेही बघायचेय.
पण अशी मोठी झाडे सोडली तर खास शोभेसाठी किंवा फ़ुलांसाठी लावलेली झाडे अजिबातच नाहीत.
गुलमोहोराचीपण २/३ च दिसली. ती पण दुर्लक्षितच. (आपण जेवढे गुलमोहोराला डोक्यावर घेतलेय,
तेवढे त्याच्या मूळ स्थानी, मादागास्कारला पण घेतले नसेल.)
नायजेरियातील आणि न्यू झीलंडमधील काही झाडे, खुपच अनोळखी आहेत. त्यांचा आकार, पाने,
फळे, फ़ुले या कशाचीच आपल्याकडच्या झाडांशी तुलना होऊ शकत नाही, पण इथली काही झाडे
मात्र मला कोड्यात टाकतात. काही कोडी मी सोडवली तर काही कदाचित सोडवू शकणार नाही.
इथे हादग्यासारखी फ़ुले येणारी काही झाडे आहेत. पाने किंचीत लहान, पण फ़ुलांचा आकार तोच.
आपल्याला सहसा हादग्याची पांढरी फ़ुले दिसतात, कवचित गुलाबी फुलेही असतात, पण इथली
फ़ुले मात्र, लालभडक आहेत. आता हे कोडे सोडवायचे तर त्या फ़ुलांची भाजी करावी लागेल,
ते जरा कठीण वाटतेय.
पण एक कोडे सोडवले ते शेवग्याचे. जश्या मोई सालई बहीणी बहीणी ( असे बहिणाबाईंनी लिहिलेय)
तसे शेवगा हादगा भाईबंद असावेत. तशीही हि नावे जोडीनेच घेतली जातात. शेवग्याची झाडेही इथे
भरपूर आहेत. मुद्दाम लावलेली आणि मैदानात आपसूक उगवलेलीही आहेत. पण घराच्या अंगणात
आहेत, म्हणून मुद्दाम लावलीत म्हणावीत, तर झाडावर गेल्या हंगामातल्या सगळ्या शेंगा, या
हंगामातल्या कोवळ्या शेंगा आणि फ़ुले सगळेच आहेत, पानेही आहेत. माझ्या घरासमोरच एक झाड
आहे. रोज मी निरिक्षण करत असतो. या फ़ुलांवर भुंगे, सूर्यपक्षी नुसते तुटून पडलेले असतात.
पोपटासारखे दिसणारे पण रंगाने तपकिरी पक्षी पण भरपूर असतात. हे पक्षी नैरोबीतही खुप दिसतात.
पण जरा विनोदीच असतात. एकतर त्यांची शेपटी त्यांना पेलत नसल्यासारखे बसलेले असतात. तारांवर
पण कशी आडवे किंवा तिरपे बसत नाहीत, तर उभे बसतात ( आपण रेल्वेत लटकतो तसे )
तर एवढे सगळे पक्षी येताहेत, म्हणजे झाड विषारी वगैरे नसणार असा अंदाज केला ( तो चुकीचा
असू शकतो. विष खाउन ते पचवण्याची कुवत अनेक पक्ष्यांकडे असते.) तरीही एका रविवारी सकाळीच
जाऊन शेंगा तोडल्या, आणि केली की भाजी. छान होत्या चवीला. मग हे लोक का खात नसतील !
एक कोडे सुटले तर दुसरे पडले, म्हणायचे.
बाजारात अवाकाडो भरपूर म्हणजे अवाकाडोची झाडेही असणार, हे झाड मोठ्या पानांचे असून
कायम हिरवेगार असते. पानगळ होत नाही. आणि फळेही भरपूर लागतात. आफ़्रिकेत अनेक
लोक त्याचा लोण्याप्रमाणे वापर करतात. चक्क पावाला लावून खातात. या फ़ळाची एक खोड
म्हणजे हे झाडावर कधीच पिकत नाही. आणि घरी आणल्यावरही कधी पिकेल ते सांगता येत
नाही. मला खुप आवडते हे. आणि किंचीत मेद असणारे हे फ़ळ, लागतेही लोण्यासारखेच. (
फक्त कुत्रांसाठी हे फ़ळ धोकादायक ठरते. )
अंगोलाच्या एंबसीच्या वेबसाईटवर इथली एक खास रेसिपी आहे, त्यात पाम ऑइल वापरलेय.
या पाम ऑईलचा इथे फारच प्रसार झालाय. आणि अर्थातच त्याची भरपूर झाडे पण असणार.
खास करुन बायो डिझेलसाठी त्याची उपयुक्तता सिद्ध झाल्यावर तर धोकादायक ठरेल अशा
पद्धतीने या झाडाची लागवड झाली आहे. आणि अर्थातच स्थानिक वनस्पतींचा नाश झालाय.
नायजेरीयाला आमच्या ऑफ़िससमोरच मोठी बागाईत होती. या बागेत किंवा या झाडाखाली
बाकीची झाडे जगू शकत नाहीत. हीच जागा गुगल अर्थवर बघितल्यावर मात्र, खरेच डोळे
फ़िरतात, एवढा तिचा विस्तार आहे.
सकाळी आमच्या गल्लीतल्या सगळ्या आयाबाया अंगण झाडताना हिराची केरसुणी वापरतात.
त्याअर्थी इथे नारळाची झाडे पण असणार. पण नवल म्हणजे, मी राहतो ती जागा, समुद्रापासून
फ़ारतर २० किमी असेल, तरीही माझ्या परीसरात एकही नारळाचे झाड दिसत नाही. (बाजारात
नारळ देखील विकायला असतात.)
चिंचेला, तमार ए हिंद असे खास भारतीय नाव दिलेले असले तरी ते झाड मूळचे आफ़्रिकेतलेच.
आणि इथे बरीच झाडे दिसतात. इतकेच नव्हे तर एक स्थानिक पेय, पण चिंचेपासूनच केलेले
असते. टिनवर चिंचेचे चित्र बघून मला आधी खरेच वाटले नाही. पण चव मात्र खासच होती.
आपल्याकडे मिळते ते पेय थायलंडहून आलेले. आपल्या बाजारात मिळते गोडी चिंच पण तिथलीच.
असे छान चवीचे पेय, आपल्याकडे का बरं मिळत नाही ? अमृत कोकम पण आत्ता आत्ता मिळायला
लागले बाजारात. (तेसुद्धा कोकमापासून नसतेच बनवलेले.)
इथे यायच्या आधी इथल्या हवामानाबद्दल जे वाचले होते ते म्हणजे उष्ण. पाऊसही बेताचा.
नामिबीयाच्या किनाऱ्यावरुन एक समुद्रीय शीत प्रवाह वहात असतो, त्यामूळे तिथे ढग
निर्माण होत नाहीत आणि पर्यायाने पाउसही पडत नाही. आणि त्याच प्रवाहामूळे अगदी
समुद्रानजीकही तिथले हवामान कोरडे असते. अंगोलामधे त्याचा थोडाफ़ार फ़रक पडत असावा.
पण मी आल्यापासूनतरी इथे हवामान थंडच आहे. घरी एसी लावावा लागत नाही. आकाशातही
बरेच वेळा ढग असतात. पाऊसही एकदाच शिंतडला. चौकशी केल्यावर कळले कि साधारण,
डिसेंबर जानेवारी मधे हवामान गरम असते. किती तपमान विचारले तर म्हणतात ३४ अंश सेंटीग्रेड
पर्यंत जाते. आता या तपमानाला, निदान मुंबईकर तरी घाबरणार नाही. पुढच्या महिन्यापासून
पावसाला सुरवात होईल, असेही म्ह्णतात.
मी राहतो तो भाग, निवासी आहे आणि ऑफ़िसचा भाग औद्योगिक भागात. पण वाटेत काही
शेती दिसते. शेतात कसावाचेच पिक आहे. पण शेती फ़ार निगुतीने केली जाते, असे दिसत नाही.
आणि तसेही या पिकाला फ़ार काही करावे लागत नाही. इतकेच नव्हे तर तयार झाल्यावर वर्ष
दोन वर्ष काढले नाही, तरी जमिनीखाली कसावा सुरक्षित राहतात. दुष्काळी परिस्थितीत हे
पिक चांगलेच तग धरते. रताळ्या / बटाट्याप्रमाणे याच्या सालीजवळ विषारी द्रव्ये असतात.
पण सोलून, धुवून घेतले कि ते रहात नाही. आपल्याकडे पण हे पिक चांगले येईल.
वरती मी काही पक्ष्यांचा उल्लेख केलाय त्यांच्याबरोबर मला इथे चिमण्या आणि कबुतरेही
भरपूर दिसतात. ऑफ़िसच्या खिडकीच्या काचेवर टोचा मारत बसायचा उद्योग चिमण्या
इथेही करत असतात. कबुतरेही तसाच पण तेवढ्या संख्येने नाही, रस्त्यावर डेरा टाकून असतात.
पण नवल म्हणजे मी इथे आल्यापासून एकही कावळा बघितलेला नाही. नैरोबीतले कावळे
आपल्या कावळ्यांपेक्षा वेगळे असतात. त्यांची मान आणि पोट पांढरेशुभ्र असते. पण तेही
कावळे इथे दिसले नाहीत. स्विस मधल्या बर्फ़ाच्छादीत मांऊट टिटालीसवर पण कावळे
असतात, इथे का नसावेत.
आणि आता एका अति खास झाडासंबंधी.
आफ़्रिकन बाओबाब किंवा आपली गोरखचिंच हे अगदी खास झाड असते. एक भलेमोठे
गाजर उलटे ठेवलेले, आणि त्याला फ़ांद्या व पाने असे याचे रुप. मुंबईत नवलाची झाडे
बघायला राणीच्या बागेत किंवा वसईच्या किल्ल्यात जावे लागेल. पुर्वी दादरला पोर्तूगीज
चर्चच्या आवारात पण बघितल्यासारखे आठवतेय, पण आता नाही.
या झाडाची फुले पण देखणी असतात आणि भल्यामोठ्या गोरखचिंचा तर खासच. नैरोबीला
असताना, या चिंचेच्या गरापासून केलेला खाऊ खुप खाल्ला. खरे तर नैरोबीच्या
परिसरात हि झाडे अजिबात नाहीत. बहुतेक हि झाडे, मोंबासाच्या जवळपास असावीत.
अंगोला ला आल्यापासून मात्र हि झाडे खुप बघितली. गावाच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक
अवाढव्य झाड नव्हे तर वृक्षराज आहे. मुंबईतील झाडांच्या खोडाचा घेर फ़ारतर एक ते
दिड मीटर्स असेल, इथल्या काही झाडांच्या बुंध्याचा घेर चक्क चार ते पाच मीटर्स आहे.
माझ्या घराजवळचा बाजार, याच झाडाच्या आजूबाजूला भरतो.
मुंबईतील झाडांना फ़ार कमी चिंचा लागतात, इथल्या काही झाडांना तर शेकड्याने
चिंचा लागल्या आहेत. काही झाडांच्या बुंध्यांवर, गोलाकार खाचा आहेत. कदाचित
त्या गोळीबाराच्या खुणा असतील. इथल्या झाडांच्या आकारमानातही विविधता आहे.
हि झाडे अर्थातच शेकडो किंवा हजारो वर्षे पुराणी असतील. नव्याने रुजलेली, तरीही
पाच पन्नास वर्षे आयूष्यमान असतील अशीही झाडे दिसतात. त्यांच्या बुंध्यांचा घेरही
अर्धा मीटर सहज आहे.
या झाडांना इथे पवित्र मानतात ( पुरणात वर्णन केलेला कल्पवृक्ष हाच असावा, असाही
कयास आहे.) त्यामूळे इथे सहसा ही झाडे तोडली जात नाहीत. कुठेही असलो, तरी
नजरेच्या टप्प्यात एक भला मोठा वृक्ष दिसतोच. आता त्यांना बहर कधी येतोय, त्याची
वाट बघतोय.
तर सध्या या निसर्गाच्या ग्रंथाचे केवळ पहिले पान उघडलेय मी.
तिसर्या भागाचे स्वागत !
तिसर्या भागाचे स्वागत !
दिनेशदा तुम्हाला इतकी माहिती
दिनेशदा
तुम्हाला इतकी माहिती कशी याचं उत्तर तुमच्या केल्याने देशाटन या वृत्तीमधे आहे. सोबत तुमची अफाट निरीक्षणशक्ती, त्याला असलेली वाचनाची जोडी, रसग्रहण, विनम्रता हे गुण आणि सांगण्याची उत्तम शैली. अतिशय दुर्मिळ असं कॉम्बिनेशन आहे हे. या लेखात हे सगळं उतरलंय आणि नेहमीप्रमाणेच उत्तम लेख झालाय. मला तर गोरखचिंच हा शब्दही माहीत नव्हता, तुम्ही तिचं बाओबाब हे तिकडचं नावही सांगून टाकलंत.
तुमच्या लेखांचं पुस्तक निघालं तर मी नक्कीच विकत घेऊन ते संग्रही ठेवीन.
दा, मस्त लिहताय. चांगली
दा, मस्त लिहताय.
चांगली माहिती मिळतेय आम्हांला घरबसल्या तुमच्यामुळे.
अबोली वाळूचा फोटो टाका ना एखादा.
आणि हो त्या चिंचेच्या अन पेरूच्या पेयाची रेसिपीपण येउ द्यात.
मस्त आठवणी लिहल्यात
मस्त आठवणी लिहल्यात दिनेशदा...
(फक्त कुत्रांसाठी हे फ़ळ धोकादायक ठरते. )
<<ते कसे?
अबोली वाळू....वॉव..दिनेशदा,
अबोली वाळू....वॉव..दिनेशदा, फोटो टाका ना प्लीज.
सुंदर !
सुंदर !
मस्तच!! डोळ्यांसमोर उभंच
मस्तच!! डोळ्यांसमोर उभंच राहिलं सगळं! पुढचे भाग लवकरच येउंदेत....
आहा, मस्त वर्णन केलंय. किती
आहा, मस्त वर्णन केलंय. किती छान निरीक्षण चालंलय! प्रचि टाकता येत नाहीयेत ना अजून? हम्म्म.....
अमृत कोकम पण आत्ता आत्ता
अमृत कोकम पण आत्ता आत्ता मिळायला लागले बाजारात. (तेसुद्धा कोकमापासून नसतेच बनवलेले.)>> अरे बापरे...मग हो? कशापासून बनवतात ते? आम्ही आपले कोकमाचा आस्वाद घेत असल्याचे मानसिक समाधान घेत असू आत्तापर्यंत......
लेख मात्र एकदम माहितीपूर्ण
लेख मात्र एकदम माहितीपूर्ण आणि वाचनीय झालाय दिनेशदा...हे सांगायचेच राहून गेले आश्चर्याच्या भरात...
दिनेशदा, लेख ऊत्तम
दिनेशदा,
लेख ऊत्तम जमला आहे.
एव्हढा मोठा लेख लिहीलात !! हे जर पहीले पान असेल तर पुढे ग्रंथ लिहीणार का ?
जबरदस्त निरीक्षण, अगदी व्यवस्थीत नोंदी ठेवलेल्या आहेत. त्या प्रमाणे लेखाचे उतारे आले आहेत.
निसर्ग अक्षरशा: नजरे समोर ऊभा केलात. आता आफ्रिकेला गेलेच पाहीजे.
तिसरा भाग खूपच आवडला. दिनेशदा
तिसरा भाग खूपच आवडला.
दिनेशदा . अबोली वाळू सहीच दिसत असेल
सुन्दर लेखन. आवडले.
सुन्दर लेखन. आवडले.
छान लिहीलय आवडलं
छान लिहीलय
आवडलं
दिनेशदा, छान लिहिलंय. पण,
दिनेशदा, छान लिहिलंय.
पण, पहिले दोन भाग कुठेय????? मी हा तिसराच भाग पाहतोय???
विपुत लिंक प्लीज
तिसरा भाग खूपच
तिसरा भाग खूपच आवडला.+१
आफ़्रिकेत अनेक लोक त्याचा लोण्याप्रमाणे वापर करतात. चक्क पावाला लावून खातात.>> मला वाटायचे मीच एकटी असे करते.
आम्ही आपले कोकमाचा आस्वाद घेत असल्याचे मानसिक समाधान घेत असू आत्तापर्यंत......>>अगदी अगदी
दिनेशदा, मी अजुनही तुमच्या उंदियोच्या पाकृची वाट बघत आहे. पण वेळ मिळाल्यावर नक्की टाका.
फोटो टाका!
फोटो टाका!
अबोली वाळूचा फोटो पाहिजे बॉ
अबोली वाळूचा फोटो पाहिजे बॉ
गोरखचिंचेची झाडे सीप्झ (अंधेरी) मध्ये बरीच आहेत. एखाद्या बॉम्बगोळ्यासारखी फळे असतात त्याची.
मस्त! फोटू?
मस्त! फोटू?
फोटो हवेत ह्या भागाबरोबर.
फोटो हवेत ह्या भागाबरोबर.
तुम्हाला इतकी माहिती कशी याचं
तुम्हाला इतकी माहिती कशी याचं उत्तर तुमच्या केल्याने देशाटन या वृत्तीमधे आहे. सोबत तुमची अफाट निरीक्षणशक्ती, त्याला असलेली वाचनाची जोडी, रसग्रहण, विनम्रता हे गुण आणि सांगण्याची उत्तम शैली. अतिशय दुर्मिळ असं कॉम्बिनेशन आहे हे. या लेखात हे सगळं उतरलंय आणि नेहमीप्रमाणेच उत्तम लेख झालाय.>>>>> किरणने(इंग्लिश किरण हां) अगदी अॅप्ट वर्णन केलंय.
तो सिंदबाद कसा वेगवेगळ्या बेटांवर, प्रदेशात जात असतो त्याची आठवण झाली - अग्दी अद्भूतरम्य असते तुमचे लिखाण....... सुरेखच झालंय पहिलं पान, आता पुढील पानांच्या प्रतिक्षेत - पण फोटोसह येउ द्या हो......
आह्हा.. इतकं रसाळ वर्णन आहे
आह्हा.. इतकं रसाळ वर्णन आहे ना...कि चव घेत घेत हळू हळू वाचलं. अंगोला चं चित्रं डोळ्यासमोर उभं केलंत दिनेश दा..
अबोली वाळू काय, निसर्गदृष्ये काय,झाडं,फळं सगळं सगळं, वर्णन वाचता वाचता समोरच दिसू लागलं की!!!
तो सिंदबाद कसा वेगवेगळ्या
तो सिंदबाद कसा वेगवेगळ्या बेटांवर, प्रदेशात जात असतो त्याची आठवण झाली >> +१००
अरे फोटू फोटू म्हणून ओरडू
अरे फोटू फोटू म्हणून ओरडू नका.:)
दिनेशदांना फोटो टाकता येत नाहीयेत सध्यातरी असं त्यांनी पहिल्या भागातच लिहिलं आहे. नाहीतर दिनेशदा फोटो टाकणार नाहीत असं होईल का? जरा दम धरा मंडळी!!!! भगवान जब देता है, छप्पर फाड के देता है |
दिनेशदा, तुम्हाला इतकी माहिती
दिनेशदा,
तुम्हाला इतकी माहिती कशी याचं उत्तर तुमच्या केल्याने देशाटन या वृत्तीमधे आहे. सोबत तुमची अफाट निरीक्षणशक्ती, त्याला असलेली वाचनाची जोडी, रसग्रहण, विनम्रता हे गुण आणि सांगण्याची उत्तम शैली. अतिशय दुर्मिळ असं कॉम्बिनेशन आहे हे. या लेखात हे सगळं उतरलंय आणि नेहमीप्रमाणेच उत्तम लेख झालाय. मला तर गोरखचिंच हा शब्दही माहीत नव्हता, तुम्ही तिचं बाओबाब हे तिकडचं नावही सांगून टाकलंत.
तुमच्या लेखांचं पुस्तक निघालं तर मी नक्कीच विकत घेऊन ते संग्रही ठेवीन.>>>>>>>>> अगदी हेच
दा मस्त लेख. फोटो नसले तरी
दा मस्त लेख. फोटो नसले तरी तुम्ही इतके अचुक वर्णन करता की सर्व चित्र उभे ठाकते डोळ्यांसमोर.
तो तेवढा कोकमाचा उलगडा करा. व त्या मधुर पेयांच्या पाकृ पण द्या
थोड त्या "कल्पवृक्ष" बद्दल अजुन उलगडा नंतर.
दिनेश, तुम्ही कशावरही लेख
दिनेश,
तुम्ही कशावरही लेख लिहू शकता.. का माहीती आहे? कारण तुमची निरिक्षणशक्ती जबरदस्त आहे.
ह्या लेखात वाळू, पक्षी व अनेक झाडांचा उल्लेख आहे, त्यांचे फोटो असते तर अजून मजा आली असती.
तिथे पब्लिक ट्रान्स्पोर्ट काय आहे? एकूण लोकसंख्या किती? पोटापाण्याचा मुख्य उद्योग काय? लोक मिळून मिसळून वागतात का? भाषेची अडचण?
तिथे जेवण कसे असते,
तिथे जेवण कसे असते, मासांहार/शाकाहार?
लोक कशी आहेत?
घे दक्षे तुझ्या यादीत आणखी भर..
वा सुंदर लिहील आहे. दृश्य
वा सुंदर लिहील आहे. दृश्य डोळ्यासमोर उभी राहीली सगळ्या झाडांची.
दिनेश, मस्तच. अबोली वाळू, लाल
दिनेश, मस्तच.
अबोली वाळू, लाल हादग्याची फुले, कसावाचे शेत, उंच वाढलेला काजू - एकदम अजब वाटते वाचताना पण! त्यांचे फोटो टाका जमेल तेंव्हा.
Pages