एकदम ठरवून एखादे पुस्तक वाचणे मला फारसे मानवत नाही. अचानक एक पुस्तक उघडावे आणि त्यात पार ओढले जावे यात काही वेगळीच मौज असते. अनोळखी रस्त्यावर उगाच प्रवासाला निघावे आणि त्यावर तुम्हाला चक्राउन टाकणारे, श्वास रोखायला लावणारे, श्रीमंत करुन टाकणारे अनुभव मिळावेत असे काहीसे!
'फ्रॉम हेवन लेक'च्या बाबतीत तर हे अगदी दुप्पट खरे ठरले. कारण हे पुस्तकच मुळात एका प्रतिभावान कलावंताने कसलीही खास तयारी न करता अगदी मनस्वीपणे केलेल्या भन्नाट प्रवासाचे अनुभवकथन आहे.
१९८१मध्ये विक्रम सेठ चीनमधील नानजिंग विद्यापीठात चिनी काव्य-साहित्य शिकायला गेले होते. तेथून भारतात परतताना हाँगकाँगमार्गे दिल्ली असा सरळ विमानप्रवास करण्याऐवजी त्यांनी रस्त्याने ल्हासा (तिबेट) मार्गे काठमांडू आणि तेथून विमानाने दिल्ली असा चित्तचक्षूचमत्कारिक प्रवास केला त्याची ही हकिकत.
विक्रम सेठच्या लिखाणात कायम आढळणारे वैशिष्ठ्य म्हणजे त्याची सामान्य लोक-प्रसंगातून काहीतरी खास सांगण्याची, रंगवण्याची हातोटी आणि अत्यंत प्रवाही, काव्यात्म, थेट संवाद साधणारी भाषा. या पुस्तकातही हे घटक आहेतच.
जिनजिअँगच्या वाळवंटातून सुरु होणारा त्याचा प्रवास आपल्याला पहिल्या पानापासूनच एका वेगळ्याच जगात घेउन जातो. एखाद्या इंप्रेशनिस्ट चित्रकाराप्रमाणे विक्रम, एखाद्या जागेचे, व्यक्तिचे, अनुभवाचे त्याच्या मनावर पडलेले प्रतिबिंब, तो ठसा आपल्यापर्यंत जिवंतपणे पोहचवण्यात कमालीचा यशस्वी ठरतो. तुर्फानचा उकाडा असो वा विरळ हवेने झालेली डोकेदुखी; चिनी नोकरशाहीने दिलेला मनःस्ताप असो अथवा तिबेटी आदरातिथ्य, प्रत्येक अनुभव आपल्यालाही तितक्याच ताकदीने मिळतो.
प्रवासवर्णन हे केवळ ठिकाणे, इमारती, इतिहास, निसर्ग इतक्या पुरतेच मर्यादित राहिले तर त्यात फार जीव उरत नाही. या सर्वापलिकडे जाउन तिथले लोक, त्यांचे जीवन याचा खरा रंग जर मिसळला तर ते जास्त गहिरे होते. विक्रम सेठ त्याही पलिकडे जाउन त्या जीवनाचा एक भाग बनून जातात आणि मग जे वास्तव समोर येते ते एकाच वेळी मनोहर आणि भेदकही असते.
अर्थात असे होण्यासाठी 'टूरिस्ट' पणाची चौकट मोडून सामान्यांच्या आयुष्यात घुसावे लागते आणि हे होण्यासाठी विक्रमने केला तसा प्रवास करावा लागतो- ट्रक्समधून लिफ्ट मागत, थंडी-वारा-दलदलीतून रस्ता काढत, सरकारी नियमांचे अडथळे पार करत. एकापेक्षा एक नमुनेदार व्यक्तिमत्वांची भेट घडवत चाललेला हा त्याचा प्रवास अत्यंत हृद्य आहे. जगात सर्वत्र सामान्य लोक एकसारखेच असतात, त्यांची सुखःदुखे, आशा-आकांक्षा सारख्याच असतात; फरक पडतो तो त्यांच्या राजकिय वातावरणाने, हे सत्य त्यातून पुन्हा अधोरेखीत होते.
या सगळ्यापुढे जाउन विक्रमचे राजकिय-सामाजिक परिस्थितीचे 'विश्लेषका'चा आव न आणलेले निरीक्षण, भारत-चीनची प्रगल्भ तुलना आणि सर्वात सुंदर-सहजपणे होणारे त्याचे आत्मचिंतन या पुस्तकाला एका वेगळ्याच पातळीवर नेउन ठेवते.
१९८१ पासून आजतागायत जग आणि त्यातही चीन प्रचंड बदलला, संदर्भही बदलले. पण तरीही हे पुस्तक मात्र काळाच्या कसोटीला पुरुन उरते कारण ते मुळात मानवी संवेदनशीलतेबद्दल आहे आणि ती तर कालातीत आहे.
..'या सगळ्यापुढे जाउन
..'या सगळ्यापुढे जाउन विक्रमचे राजकिय-सामाजिक परिस्थितीचे 'विश्लेषका'चा आव न आणलेले निरीक्षण, भारत-चीनची प्रगल्भ तुलना आणि सर्वात सुंदर-सहजपणे होणारे त्याचे आत्मचिंतन या पुस्तकाला एका वेगळ्याच पातळीवर नेउन ठेवते''.. अरे वा..छान दिसतंय हे पुस्तक.. बघते अॅमेझोन वर असेल तर ऑर्डर करता येईल इथे..
आगावा... पुस्तकाची ओळख करून देण्याबद्दल धन्स!!
हे काय! इतकंच? थोडक्यात का
हे काय! इतकंच? थोडक्यात का आटोपलं?
अनोळखी रस्त्यावर उगाच प्रवासाला निघावे आणि त्यावर तुम्हाला चक्राउन टाकणारे, श्वास रोखायला लावणारे, श्रीमंत करुन टाकणारे अनुभव मिळावेत असे काहीसे! >>>
सध्या असं मला 'द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज'च्या बाबतीत झालेलं आहे. (मूळ इंग्रजी पुस्तक, मराठी अनुवाद नाही हां)
अर्रे वा. नक्की वाचणार. थँक्स
अर्रे वा.
नक्की वाचणार. थँक्स आगाऊ.
वा वा, मस्तच! परत एकदा झटकणं
वा वा, मस्तच!
परत एकदा झटकणं चालवलंस माझ्या आठवणींवर
मला आवडलेलं विक्रम सेठचं एकमेव पुस्तक. कादंबर्या वाचायचा प्रयत्न केला पण कैच्या कैच बोरिंग वाटल्या. हे पुस्तक मात्र हातात घेताना आधी काहीही माहित नव्हतं. अगदी कोर्या पाटीवर वाचलं.
सुंदर ओळख करून दिलीस. आता विकत घेऊन परत एकदा वाचायला पाहिजे
वाचायला हवं . फार्फार
वाचायला हवं . फार्फार वर्षांपूर्वी सूटेबल बॉय वाचलं होतं पण कंटाळा आल्याने गुंडाळलं होतं.
वावा..माझं लय आवडतं पुस्तक...
वावा..माझं लय आवडतं पुस्तक... मस्त लिहिलं आहेस..
आता 'ऑल द वर्ल्ड इज अ स्पिटून' वाच. 'फ्रॉम हेवन लेक'चे काही संदर्भ या पुस्तकात डोकावतात.
पुस्तक वाचू नंतर.. पण पुस्तक
पुस्तक वाचू नंतर..
पण पुस्तक परिचयच इतका सुंदर झालाय कि बस्स !! खूपच सुंदर
हे पुस्तक मी इथे आज मागायला
हे पुस्तक मी इथे आज मागायला गेल्यावर त्यांनी नक्षलवादी असल्यासारखे माझ्याकडे पाहिले आणि संदर्भासाठीच मिळेल, बाहेर नेऊ शकणार नाही असे सांगीतले.
चीन येडचॅपच आहे जरा. तमाम १९८४ पासून ते 'वी द लिविंग' पर्यंतचे surveillance आठवले.
असो. तर माझी उत्सुकता लईच चाळवली गेली आहे. आता एखाद दिवस वेळ मिळाला की जातेच रेफरन्स मध्ये.
परिचय आवडला. विक्रम सेठ माझा
परिचय आवडला. विक्रम सेठ माझा लै आवडता लेखक आहे.
वाचून हेवा वाटला. कारण परवाच लँडमार्कमध्ये शोधलं तर त्यानं औट ऑफ स्टॉक आहे म्हणून सांगितलं.
आता फ्लिपकार्टवर बघायला लागेल.