''श्यामली'' यांचे अभिनंदन

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 9 July, 2012 - 07:01

मायबोलीवरील कवयित्री,गझलकार श्यामली उर्फ'' कामिनी फडणीस-केंभावी'' यांच्या ''चांदणशेला'' या अल्बुमबाबत गौरवोद्गार असलेला लेख लोकसत्तेच्या कालच्या रविवारच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.... श्यामली यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या हातून अनेक उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती होवो हीच सदिच्छा.

अनिरुद्ध भातखंडे - रविवार, ८ जुलै २०१२
aniruddha.bhatkhande@expressindia.com

ध्यानीमनी नसताना एखादा उत्कट कलाविष्कार अनुभवण्यास मिळाला तर मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. सारेगमा कंपनीची निर्मिती असलेल्या ‘चांदणशेला’ या अल्बमने नुकतीच ही अनुभूती दिली. ‘शब्द सुरांचा नवा अविष्कार’ अशी टॅगलाईन या अल्बमवर आहे. प्रत्येक गीतकार-संगीतकाराला आपली गाणी वेगळीच वाटतात, त्यामुळे ही टॅगलाईन हा केवळ जाहिरातीचा प्रकार असेल, असे वाटले. मात्र ही गाणी ऐकल्यानंतर ही टॅगलाईन १०० नाही तर १०१ टक्के खरी असल्याचे जाणवले. कामिनी फडणीस-केंभावी यांची गीते (खरं तर कविता) आणि शशांक पोवार यांचे संगीत. ही दोन्ही नावे तशी प्रस्थापित नसलेली. तरीही यात घडणारा कलाविष्कार थक्क करणारा! हरिहरन, रघुनंदन पणशीकर, महालक्ष्मी अय्यर, बेला शेंडे, वैशाली सामंत अशा दिग्गज गायकांसह जसराज आणि जयदीप या नव्या गायकांनी यातील विविधरंगी गाणी गायली आहेत.
बेला शेंडे हिने गायलेल्या ‘मन रुमझुम रुमझुम गाते’ या गीताने या अल्बमची सुरुवात होते. अतिशय गोड सुरावटीच्या या गाण्यात संगीतकाराने सारंगीचे तुकडे वापरुन आपली प्रगल्भता सिद्ध केली आहे. भावगीतांच्या परंपरेशी नातं सांगणाऱ्या या चालीसाठी पोवार यांनी योजलेला ठेका आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रचलेला वाद्यमेळ एक अनोखं फ्यूजन निर्माण करतं. या अल्बममधील एकूण सात गाण्यांपैकी हेच सर्वात चांगलं गाणं ठरावं. या अल्बमचं प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे या गीतांचे शब्द! रघुनंदन पणशीकर यांनी गायलेल्या गाण्याचा मुखडा पहा, ‘संध्येच्या पारावरती विस्कटले उन जरासे, मग उगाच ऐकू येती दिवसाचे क्षीण उसासे’.. मराठी भावगीतांतील काव्यात काहीसा तोचतोचपणा येऊ लागला असताना या ओळी वेगळाच साहित्यिक आनंद देऊन जातात. संध्याकाळच्या पाश्र्वभूमीवरील या गाण्यात यमनच्या बरोबरीने ‘मारवा’चे सूर योजण्याची पोवार यांची कल्पकता दाद देण्याजोगी. पणशीकर यांच्या भारदस्त आवाजाने या गाण्याला पुरेपूर न्याय दिला आहे. मराठीत कमालीचं सहज गाणाऱ्या महालक्ष्मी अय्यरने गायलेलं ‘देहावर मोहरली रिमझीम सावरिया’ हे गाणंही उत्तम जमलं आहे. पहाडीच्या ठेक्यातील हे गीत ऐकताना अतिशय प्रसन्नता लाभते. जसराज जोशी याच्या स्वरातील ‘सुचावे न काही रुचावे मनासी, अशी हाय कोठून येते उदासी?’ हे गाणंही हटके आहे. गजलच्या फॉर्ममधील या गीताला पोवार यांनी अपारंपरिक चाल देऊन नवा प्रयोग केला आहे. जसराजने अतिशय समर्थपणे अस्वस्थ मनाची अवस्था श्रोत्यांपर्यंत पोहोचवली आहे. एक उत्तम पाश्र्वगायक होण्याची वैशिष्टय़े त्याच्या आवाजात आहेत. जयदीप बगवाडकर या आणखी एका तरुण गायकाने म्हटलेलं ‘जरा स्पंदनांना सांभाळ राणी, ऐकेल कोणी आपुली कहाणी’ हे रोमँटिक गाणंही पुन्हापुन ऐकण्यासारखं. ‘दिन आज भटकत राही, का उगाच स्मरते काही? हे गीत वैशाली सामंतने अतिशय समरसून गायलं आहे. अल्बमच्या अखेरीस येणारं हरिहरन यांच्या घनगंभीर आवाजातील ‘का हे मन जळते, का हे मन छळते? हे गाणं या अल्बमचा कळसच ठरावं! या सातही गीतात ‘चांदणशेला’ हा शब्द नसताना अल्बमला हे नाव कसं, असा प्रश्न पडला असतानाच हरिहरन यांच्या गीतानंतर कामिनी फडणीस-केंभावी यांचं काव्यवाचन कानी पडतं. ‘ही कुठली शुभंकर वेळा, हा ॠतू कोणता आला? कुणी देहावर पांघरला, जणू हळवा चांदणशेला’ ही ग्रेस यांच्या शैलीशी नातं सांगणारी कविता ऐकणं म्हणजे भरपेट जेवल्यानंतर मसाला पानाचा आस्वाद घेण्यासारखंच! अतिशय उच्च निर्मितीमूल्यं असणाऱ्या या अल्बमने मराठी भावसंगीत अधिक समृद्ध केलं आहे, असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरणार नाही, ही गाणी ऐकणारा प्रत्येक रसिक या विधानाशी सहमत होईल, यात शंका नाही.

लेखाचा दुवा..

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=236...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल लोकसत्ता मधे वाचलेले मी हे....पण त्या ह्याच आहेत हे ठावुक नव्हते...धन्यवाद डॉक्टर......
.
.
अभिनंदन श्यामली .....

श्यामली......खरंच तुझ्या कविता ह्या सगळ्या अल्बम मधे जास्त उठून दिसतात. चाली, गाणी अतिशय उत्तम आहेतच पण सगळ्यात जास्त दाद द्यायची तर ती तुझ्या काव्यालाच Happy
जियो जानेमन Happy
अभी तो शुरुआत है.....मंजिले और भी है ..... !!!

Pages