वारीच्या निमित्ताने एक घटना आठवली जी मी कधीही विसरू शकत नाही. घटना साधारणता सहा सात वर्ष्यापुर्वी ची. पालखी निघायला अवघे सात दिवस शिल्लक होते. त्यामुळे वारीला जाणाऱ्यांची कामे उरकायची धावपळ चालू होती. एकदा पेरण्या झाल्या कि बिनघोर दिंडीबरोबर चांगले पंधरा दिवस जाता येत होते. म्हणून वारकरी मंडळी आपापली कामे उरकण्यात दंग होते . मी हि दिवसभर शेतात काम करून घरी आलो. घरी आल्या आल्या आई म्हणाली तात्यांना (चुलत चुलते ) दवाखान्यातून सोडलंय पर त्यांना काय बरं वाटत न्हाय बाबा. दुपारपासून तर ते लयच काय बाय बोलत्यात नि सारखं मला वारीला जायचंय, मला वारीला जायचंय आरे भजनकरी कुठाय त्यांना म्हणावं चला लवकर दिंड्या निघाल्यात चूत मारीच्यांना परपंच सुटत न्हाय.
असं सारखं तोंड चालू हाय आणि सारखं देवाचे नाव घेत्यात. भजन म्हणत्यात .
आईने सारे मला एका दमात सांगितले मलाही जरा आश्चर्य वाटले कारण खूप दिवस ते आजारी होते अशक्तपणामुळे त्यांना बसता देखील येत नव्हते. कालपर्यंत ते दवाखान्यात होते. त्यांना सोडलेले मला सकाळी समजले होते.
हे तात्या म्हणजे कट्टर वारकरी होते. आमचा आख्खा वाडा माळकरी होता. जो तो ज्याच्या त्याच्या परीने वारी करायचा पण हे म्हणजे एकही वारी चुकवायचे नाही. दर गुरुवारी मंदिरात भजन करायचे. काकड्याच्या महिन्यात काकडा, श्रावणात हरीनाम सप्ताह असे सर्व कार्यक्रम राबविण्यात त्यांचाच पुढाकार असायचा. विशेष म्हणजे भजन गायला ते कुणाकडेही शिकले नाही तरी त्यांना उत्तम गाता येत होते. गावातील कित्येक जनांना त्यांनी गायला शिकविले होते. त्यांचे स्वरज्ञान तर जबरदस्त होते. चुटकीसरशी पखवाज लावायचे. विठ्ठलावर त्यांची गाढ श्रद्धा होती. देहू आळंदीची महिन्याची वारी करायचे.अतिशय हलाखीच्या परस्थिती मधेही त्यांनी कधीही वारी चुकविली नाही. कि भक्तीमध्ये खंड पडू दिला नाही.
पुढे त्यांची पुण्याई फळाला आली नि मोठा मुलगा चांगल्या कंपनीमध्ये कामाला लागला. परस्थिती चांगली सुधारली. आता ते जास्त वेळ भक्ती मध्येच घालवीत.
मागच्या महिन्यात ते आजारी पडले होते. किरकोळ थंडीताप वाटत होता तरी त्यांच्या मुलाने चांगल्या दवाखान्यात नेले.तेथे अडमिट झाले होते आणि काल दुपारी त्यांना सोडले होते. सकाळी मला त्यांना भेटायला कामामुळे जमले नाही. म्हणून आईने सांगताच मी हातपाय तोंड धुऊन लगेच भेटायला गेलो. त्यांच्या घाई गेलो तेव्हा तिथे बरीच गर्दी होती. गावातले व आमच्या वाड्यातले बरेच जन भेटण्यासाठी आले होते.
तिथे गेल्यानंतर मला समजले कि त्यांचे शरीर औषधाला साथ देत नाही. निमोनियाने सर्व शरीर निकामी केले आहे. काहीही उपाय चालत नाही म्हणून डॉक्टरांनी सोडून दिले आहे.
मी आत गेलो तर त्यांचा आवाज पाहून चकित झालो कारण महिनाभर आजाराशी झुंज देऊनही त्यांचा आवाज खूप कडक येत होता. अंत्यावस्थ असूनही हरिपाठाचे अभंग खड्या आवाजात म्हणत होते. मध्येच थांबून ओरडायचे आणि म्हणायचे आरे हे टाळकरी काय मेले काय? अजून कसे येत नाही. दिंडी निघल आता.
तसं पाहिलं तर त्यांची अवस्था इतकी वाईट होती कि ते शुद्धीवर नव्हतेच कारण कोणी भेटायला आला नि त्यांना विचारले कि यांना ओळखलं का? तर ते कुणालाच ओळखीत नव्हते.
परंतु आश्चर्य याच गोष्टींचे वाटत होते कि ते कुणालाच ओळखीत नव्हते. म्हणजे शुद्धीत नव्हते मग ते अभंग न चुकता कसे म्हणतात.
त्यांनी म्हटलेल्या काही ओळी आजही मला आठवतात , त्या काही ओळी अश्या होत्या -
कर्म धर्म त्यांचा| झाला नारायण ||
याच साठी केला होता अट्टाहास | शेवटचा दिस गोड व्हावा ||
जाता पंढरीशी | सुख वाटे जीवा ||
अश्या कितीतरी सुरस ओळी त्यांच्या मुखातून येत होत्या. आम्ही सारे भारावून गेलो होतो. त्यांच्या या अवस्थेचे वर्णन करणे खूप अवघड होते. मला तर वाटत होते कि उन्मनी अवस्था तर नसेल हि , परंतु त्यातले ज्ञान नसल्यामुळे नक्की सांगता येत नव्हते. लक्षणे तर तीच वाटत होती.
जवळ जवळ तास भर त्यांच्या मुखातून अश्या अतिशय सुरस ओळी येत होत्या. त्या ऐकायला खूप बरं वाटत होते परंतु त्या ओळी त्यांचा अंतकाळ जवळ आला हे हि जणू सुचवीत होत्या.
थोडा वेळ ते शांत झाले तेवढ्यात त्यांच्या लहान मुलाने त्यांना विचारले -तात्या पाणी देऊ का प्यायला ?
त्यावर ते म्हणाले आरे तू काय मला पाणी पाजणार, मगाशीच माझ्या पांडुरंगाने मला पाणी पाजलंय .
हे वाक्य एकले नि अंगावर सरसरून काटा आला.
थोड्या वेळाने मी त्यांना म्हटले तात्या, ज्ञानेश्वरी वाचू का ?
तटकन त्यांनी डोळे उघडले व म्हटले -कोण अनिल का? आरे वाच तू चांगली वाचतो.
मी म्हटलं तात्या कोणता अध्याय वाचू ?
दहावा अध्याय वाच भक्तीयोगावरचा.
आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटत होते कि मगाशी हे कोणालाही ओळखत नव्हते नि आता मला ओळखलेच परंतु दहावा भक्तीयोगावरचा अध्याय वाचायला सांगत होते.
मी जवळ जवळ अर्धा तास वाचन केले. त्यांनी अतिशय शांतपणे एकले. मग मला लोकांनी सांगितले कि तुला ते ओळखतात, तू त्यांना झोपायला सांग तुझे ते ऐकतील.
मी म्हटले तात्या खूप वेळ झाला आहे झोपा आता.
तर ते म्हणाले कश्याचा येळ झालाय तव्हा आपण भजन करू.
त्यावर मी म्हटले तात्या, अहो खूप रात्र झालीय आपल्याला पहाटे काकडा करायचा आहे ना? त्यांनी हो म्हणताच मी म्हटले मग झोपा आता लवकर उठायचे आहे.
त्यांनी लहान मुलासारखी मान डोलावली व डोळे मिटले.
मी सर्वांना बाजूला घेतले व जेऊन घ्या म्हणून सांगितले. व मीही जेवायला गेलो.
जेवण अर्धे झाले तोच एकजण बोलवायला आला. कि तात्या जागे झालेत नि तुला हाक मारतात. मी तसाच हात धुऊन उठलो व गेलो .
ते मागच्या सारखेच हरिपाठाच्या ओव्या म्हणत होते. दुपारी चार वाजल्यापासून त्यांचे तोंड चालू होते. ते रात्री आठ वाजेपर्यंत मधे मी ज्ञानेश्वरी वाचताना ते शांत होते. त्यानंतर फक्त दहा मिनिटेच ते झोपले होते. आणि आता पुन्हा खड्या आवाजात त्यांच्या ओव्या चालू झाल्या होत्या.
आम्हाला राहून राहून आश्चर्य वाटत होते कि अंत्यवस्थ म्हणून डॉक्टरांनी घरी पाठविले अंगात अजिबात शक्ती नाही. शुद्धही नाही मग ह्या माणसात एवढ्या खड्या आवाजात अभंग म्हणायची शक्ती येते कुठून?
तेवढ्यात त्यांनी आवाज दिला अनिल आरे टाळकरी आले का न्हाय काकडा करायला उशीर होतोय
मी म्हणालो तात्या अहोजून खूप रात्र आहे. तुम्ही दहाच मिनिटे झोपला होता. पहाट व्हायला अजून पाच तास बाकी आहे. तेव्हा झोपा आता मी उठवीन तुम्हाला.
जरा वेळ ते शांत बसले. आम्ही बाहेर येऊन गप्पा मारीत बसलो. आम्ही चार मित्र नि तात्यांची मुले एवढेच तिथे होतो. गावातील मंडळी निघून गेली होती. थोडा वेळ बाहेर बसलो दहा पंधरा मिनिटे झाली असतील तेवढ्या त पुन्हा त्यांच्या ओव्या गाणे चालू झाले होते.
संपूर्ण रात्र आम्ही डोळ्यांनी जागून काढली होती. रात्रभर तात्यांचे अभंग म्हणणे चालू होते. सकाळी पुन्हा गावातील माणसे भेटायला येऊ लागली. मी घरी जाऊन आंघोळ करून आलो.
भाऊच्या म्हणजे (तात्यांच्या मोठ्या मुलाच्या) कंपनीतले लोक भेटायला आले.
त्यांचे असे मत पडले कि इथे त्यांच्या मृत्यूची वाट बघण्यापेक्षा त्यांना पुन्हा मोठ्या हॉस्पिटलमध्ये अडमिट करावे ते नक्की बरे होतील. भाऊ त्यांना म्हणाला देखील कि काही उपयोग नाही डॉक्टरांनीच सांगितलय
परंतु ते सगळे शिकलेले होते. आम्ही कुणीच काही बोललो नाही. भाऊने पुन्हा गाडी करून तात्यांना पुना हॉस्पिटलमध्ये अडमिट केले.
सहा दिवस ते तिथे होते. चांगले ऐंशी नव्वद हजार बिल झाल्यानंतर तेथून उपचाराचा काही उपयोग नाही म्हणून त्यांना सोडून दिले. दवाखान्याच्या गाडीतूनच त्यांना घरी आणले.
दवाखान्यात औषधामुळे झोपायचे परंतु जागेपणी सतत अभंगाच्या ओव्या, रामकृष्ण हरी हा जप चालू होता.घरी आले साऱ्या घरभर नजर फिरविली.
इकडे आळंदीत पालखी पंढरपूरला जाण्यासाठी निघाली. आणि इथे घरी तात्यांनी प्राण सोडले.
वारीच्या निमित्ताने (आगळा वेगळा वारकरी)
Submitted by अनिल तापकीर on 29 June, 2012 - 08:12
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
खरच भक्ती म्हणावी ती अशी!!
खरच भक्ती म्हणावी ती अशी!!
आगळा वेगळा वारकरी>>>>> अगदी
आगळा वेगळा वारकरी>>>>> अगदी अगदी... खुप छान लिहिलय..
पाडुरन्ग पाडुरन्ग .....
पाडुरन्ग पाडुरन्ग .....
पांडुरंग पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग
याच साठी केला होता अट्टाहास |
याच साठी केला होता अट्टाहास | शेवटचा दिस गोड व्हावा ||
असा शेवट फार थोड्या लोकांच्या
असा शेवट फार थोड्या लोकांच्या वाट्याला येतो. वाचून अंगावर रोमांच उभे राहिले.
हि खरि भक्ती .आसा वारकर्रि
हि खरि भक्ती .आसा वारकर्रि होणार नाहि.
कथा,चीमूरी,सुहास्य्,बंडोपंत्,
कथा,चीमूरी,सुहास्य्,बंडोपंत्,उज्वला,शिल्पा,नानक या सर्वांना धन्यवाद
वाचून अंगावर रोमांच उभे
वाचून अंगावर रोमांच उभे राहिले.>> +१
धन्यवाद्,मोनालिप
धन्यवाद्,मोनालिप
भक्ती अंगात भिनलेली असली, की
भक्ती अंगात भिनलेली असली, की परमेश्वरच त्या व्यक्तीचा सर्वेसर्वा असतो. पण सर्वसामान्य संसारी माणूस अशा माणसाचा संग सोडूही शकत नाही आणि त्याच्या त्या अवस्थेला त्याच्यासारख्याच नि:संगपणे सोबतही करू शकत नाही. तुमच्या नशीबात ते आले छान अनुभव
धन्यवाद हर्षल्क
धन्यवाद हर्षल्क
इकडे आळंदीत पालखी पंढरपूरला
इकडे आळंदीत पालखी पंढरपूरला जाण्यासाठी निघाली. आणि इथे घरी तात्यांनी प्राण सोडले. >>> खरोखरंच विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघून गेले की....
फारच हृद्य व भक्तिरसाने परिपूर्ण प्रसंग......
धन्यवाद, शशांक
धन्यवाद, शशांक
खुप सुंदर कथा अशी भक्ती आजकल
खुप सुंदर कथा अशी भक्ती आजकल पाहायला मिळत नाही
कथा कि सत्य घटना? तुमचा अनुभव
कथा कि सत्य घटना?
तुमचा अनुभव कळला पण आम्हाला तुमच्यासारखा कळणार नाही.
कौतुक नि सुसूकु
कौतुक नि सुसूकु धन्यवाद,
सुसुकु हि सत्य घटना आहे त्यांच्या शेवटच्या वेळी मि स्वता: तेथे होतो.