माळरानी खड्कात जेव्हा रुजते बियाणे
यंदा पावसाने ताण दिला नि आख्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. कुठून कुठून पैदा केलेले बियाणे ज्याने त्याने घाई करून पेरले होते. पालख्या पंढरपुरात पोहचल्या कि हमखास पाऊस लागतो असा आजपर्यंतचा अनुभव होता. परंतु यंदा पालख्या परत फिरल्या तरी पाऊस जोर धरत नव्हता. दिवसातून एखादी सर यायची पण अंगावरील कपडे देखील भिजायची नाहीत. कमी ओलीमुळे दाणा पीठाळला नि उगवण चांगली झालीच नाही. उगाच कुठतरी फुटा दोन फुटावर मोड दिसत होता.