वारीच्या निमित्ताने (अलौकिक गुरुशिष्य)

Submitted by अनिल तापकीर on 25 June, 2012 - 04:01

तुज येथे कोणी बोलाविले विठ्ठला | प्रार्थील्यावाचुनी आलासी का?| असे चक्क भगवंतांना बोलणारे, संत निळोबाराय हे खरोखरच महान होते. गुरुकृपा व्हावी ती देखील जगद्गुरू तुकोबारायांकडून हा अट्टाहास मनी बाळगून देहूला आले. परंतु हे होणे म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट होती. कारण तुकाराम महाराजांना वैकुंठाला जाऊन कित्येक वर्षे झाली. आणि त्यांच्या कडूनच आपल्याला अनुग्रह मिळावा असा निळोबारायांचा ध्यास होता. त्यापायी आपले घरदार सोडून ते देहूला आले. जिथून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते तिथे म्हणजे गोपाळ पुऱ्यात धरणे धरून बसले. अन्नपाणी वर्ज्य करून अखंड तुकोबारायांचा धावा आरंभिला.
अध्यात्मामध्ये गुरु करून त्यांच्या उपदेशानुसार आयुष्यभर आचरण करणे याला खूप महत्व आहे.सद्गुरू हे शिष्याला परमेश्वरा पर्यंत पोहचविण्याचे काम करत असतात म्हणून परमेश्वरा पेक्ष्या गुरुभक्तीला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण सद्गुरुंसारखा असता पाठीराखा | इतरांचा लेखा कोण करी ||
एकदा का सद्गुरूंची कृपा झाली कि मग इतर कशाचीही फिकीर बाळगायची नाही कारण सद्गुरू आपल्या शिष्याला या मायामोहाच्या सागरातून पैलतीराला सुखरूप पणे आणतात. त्यासाठी सद्गुरूंची सेवा खूप महत्वाची आहे. आपल्या भारत देशात खूप महान अश्या गुरुशिष्यांच्या जोड्या होऊन गेल्या आहेत त्यातीलच हि एक संत श्रेष्ठ तुकोबाराय नि त्यांचे शिष्य निळोबाराय.
निळोबाराय गोपाळ पुऱ्यात धरणे धरून बसले होते. बरेच दिवस अन्नपाणी सोडून फक्त तुकोबारायांचा धावा चालू होता.
प्रत्यक्ष देवाला काळजी वाटू लागली. व ते निळोबा रायांसमोर प्रकट झाले. व म्हणाले ऊठ निळोबा मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे. काय हवे ते माग. तेव्हा निळोबा म्हणाले. तुज येथे कोणी बोलाविले विठ्ठला | प्रार्थील्यावाचुनी आलासी का?| देवा मी तुमची भक्ती केलीच नाही आणि तुम्हाला मी बोलाविले देखील नाही. मग तुम्ही येथे आलाच कशाला मला माझे सद्गुरू तुकोबारायच हवे आहे. त्यांच्याकडून जेव्हा मला अनुग्रह मिळेल तेव्हाच मी हे धरणे सोडेल.
अखेर देवालादेखील निळोबा रायांच्या अट्टाहासा पुढे नमावे लागले व तुकाराम महाराजांकडून निळोबा रायांना अनुग्रह ध्यावा लागला.
तीव्र इच्छाशक्ती असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही हे निळोबा रायांनी दाखवून दिले.म्हणूनच वारकरी संप्रदायामध्ये या गुरु शिष्याच्या जोडीला मनाचे स्थान आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

श्रीकांत नि अन्जुत धन्यवाद , हि कथा निळोबाराय यांच्या चरित्रात आहे व मी ज्या ज्या वेळी देहूला गेलो त्या त्या वेळी जिथून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्या ठिकाणी वाचली आहे. बऱ्याच जणांना माहित आहे परंतु ज्यांना माहित नाही त्यांच्या साठीच वारीच्या निमित्ताने टाकली आहे

नगर जिल्ह्यामध्ये राळेगणसिदधीच्या जवळ निळोबारायांची समाधी आहे. विशेष म्हणजे तिथे दररोज अखंड २४ तास एकतारी वाजविण्याची सेवा केली जाते. प्रत्येक तासाला वाजणारा माणूस बदलतो पण वाजविण्यात खंड पडू दिला जात नाही.

एक संतकथा या निमित्ताने वाचायला मिळाली याचा आनंद झाला. मी पण ही कथा यापूर्वी वाचली नव्हती.

शिल्पाजी,धन्यवाद. निळोबारायांचे चरित्रात ही कथा आहे. खुप सुरस चरित्र आहे