http://globalmarathi.com/Music.aspx?SearchText=Mayevina%20Bal%20Kshanbha...
मायेविन बाळ, क्षणभरी न राहे
न देखता होय, कासावीस ॥
आणिक उदंड, बुझाविती तरी
छंद त्या अंतरी, माऊलीचा ॥
नावडती तया, बोल आणिकांचे
देखोनिया नाचे, मायदृष्टी ॥
तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली
आणिकांचे बोली चाड नाही ॥
दिवसभर तापानं फणफणलीये पोर. दोन क्षणही खाली ठेवता आलं नाही. कसं करणार घरचं सगळं? गाई-गुजी, झाड-लोट, स्वयंपाकपाणी...
आवली कावून गेली होती. काशीला मांडीवर घेऊन घेऊन अंग आंबून गेलं होतं अगदी. मधे दुवक्त पाण्याचा घोट घेण्यासाठी तिला हातरुणावर काढली तेच काय ते... ठाण ठाण आक्रोशलं पोर. पुन्हा धावून तिला उचलून घेताना, उगी-उगी करताना आवलीला दावणीला शिंग खटखटावीत चारा मागणारी गुरं दिसत राहिली, झाडलोटीविना पारोसं अंगण, धुराच्या गंठनाविना उघडी-बोडकी चूल दिसत राहिली.
हे सगळं सांडून घरधन्यासारखं तोंड घेऊन निघून जावसं वाटू लागलं...
तिच्यातली पत्नी, गृहिणी, आई तिला ओढून ओढून धरून ठेवू लागली... समोरचं दैन्यं, आजारलेल्या पोरीबरोबर आजारला संसार... सगळं डोळ्यांवर येत राहिलं अन काहिली काहिली होऊ लागली तिची.
इतक्यात कवाडाशी तिला "... विठ्ठल... विठ्ठल" ऐकू आलं.
"... आलं.. आलं एकदाचं घरला. आख्खा भंडारा वाखरून, घळी, घोसळून आलं... एकदा ते काळं मिळूद्या तर हाती..." पुढलं तिला पुटपुटताही आलं नाही... नुस्तीच दात-ओठ खात राहिली.
हात, पाय, तोंड प्रक्षाळुन तुकोबांनी माजघरात पाऊल टाकलं. काशीची अवस्था बघून त्यांना अगदी दाटून आलं...
"... बरं नाही होय पोरीला... आगे, सांगावा धाडायचा नाहीस... " प्रेमभरल्या दिठीनं त्रासलेल्या आपल्या स्त्रीकडे अन ग्लानीत तिच्या पायांवर पडलेल्या लेकराकडे बघीत तुकोबा खाली बसले.
आवलीच्या दिठीत इतकी आग होती की, तिथं कर कटेवरी घेऊन तिचा तो दावेदार उभा असता, तर एव्हाना जळून खाक झाला असता. तिच्याच कुंकवाचं धन सामोरी होतं म्हणूनच वाचलं.
"... घ्या... संभाळा पोर... पोटाचं बघते काई... सांजावलं तरी जनावरांना..." तिला वाक्यं पुरं करू न देता तुकोबा तटकनी उठले.
"सांजावलं.... आलोच... आलोच आवले. इतुकावेळ थांबलीस तर अजून दोन पळ थांब... सांजावलं, गें... देवळात दिवा करून येतोच... आज देवाचं इथेच बसून म्हणेन... हा आलोच" असं म्हणून तुकोबा उठले आणि झरझर गेलेही.
हतबुद्धं झालेल्या आवलीला ’थांबा’ म्हणण्याची फुरसत मिळाली नाही. तिच्या अंगाची लाही लाही होऊ लागली. हा सौसार... हा सौसार माझा एकटिचाच काय? मोकलून घाला मग माझ्या माहेराला... नाहीतर उराशी धोंडा बांधून विहीर दाखवा बायको-पोरांना...
क्षणात लेकीच्या कण्हानं आवली भानावर आली. "थांबा म्हणे ...नाही थांबत मी, दोन पळंही नाही थांबत... त्या... त्या दगडाच्या मूर्तीचं साजरं करायला काय्येक सांगावं लागत नाही... सौसार... सौसार खुपतो... पोरं खुपतात, बाईल नडते... सोताचं एक ठ्ठालविट ठ्ठालविट करून पोट भरतं... आमचं काय? नाही निभत आमच्यानं... नेऊन घालते पोर ओटीत... संभाळा नाहीतर टाका... टाकतात कसले... कसे बघत नाहीत पोरीला तेच बघते... जातात कुठे... "
दात-ओठ खात आवली उठली. खसकन एका झटक्यात उचलून काशीला कडेवर घेतली आणि वार्यासारखी घराबाहेरी पडली. छोट्या देवळाच्या ओवरीच्या पायर्या चढताना, तिला ठाणवईच्या संथ प्रकाशात स्वस्थं उभी मूर्ती दिसलीही नाही... अगदी देखल्या देवाला करतात तितकाही, आपल्या संस्कारापुरताही नमस्कार तिला करवला नाही. भणभणत्या झंझावातासारखी ती गाभार्यात शिरली.
वात सरशी करून तुकोबा वळतात तोच तिनं काशीला त्यांच्या अंगावर सोपली, "... संभाळा पोर".
तुकोबांचा किंचित तोलही गेला. "... आगं आगं... येतच होतो... घेतो हं... देवाचं इथेच म्हणू म्हणतेस?... बंssरं... ये गंss बाळे... बरं नाही होय गं?...."
आली तशी फणकार्यानं आवली मंदिराबाहेर पडलीही. आधी जिवालाही कंटाळलेल्या तिला आता तिची दावणीची जनावरं दिसत होती, न लोटलेलं घर-आंगण आणि भेगाळली, कोरडी चूल दिसत होती.
अंग तापलेल्या काशीला खांद्यावर घेऊन थोपटीत तुकोबा देवळाच्या गाभार्यातच येरझारा घालू लागले. स्तोत्रं, पंचपदी म्हणता म्हणता तिला झोप लागल्याचं त्यांना जाणवलं. ते अलगद भिंतीशी बसले. पसरून घातलेल्या मांडीवर त्यांनी लेकराला हलकेच घेतलं. हात लांब करून अबीर-बुक्का बोटावर घेतला. "... विठ्ठल विठ्ठल" म्हणीत तिच्या कपाळावर ओढला आणि तिच्या तापल्या अंगावरून, पायांवरून, हातांवरून प्रेमानं हात फिरवीत बसून राहिले. श्वासोच्छ्वासासारखं विठ्ठलनाम चालूच होतं.
मधेच कधेतरी हात लांबवून त्यांनी एकतारी हातात घेतली... ती छेडता छेडता कानाला लावून ते ’विठ्ठल विठ्ठल’ म्हणण्यात अगदी दंग झाले. त्यांच्या हालचालीनं काशीला किंचित जाग आली.
ही आईची कूस नाही... हे ध्यानात येताच तिनं किरकिरायला सुरुवात केली.
"... माय हवी होय रे बाळा... बापापाशी थोडकी रहा, गे. मायेला कामं आहेत... उगी हं... मी म्हणतो तू ऐक हं... विठ्ठssलं विठ्ठssलं... आहाss... कसा नाद आहे... विठ्ठssलं विठ्ठssलं..."
काशीला तिची माय हवी होती. करकरीत संध्याकाळी बाळाला सगळ्या जगात एकच एक गोष्टं हवी असते... त्याची माय... त्या एका मायेच्या कुशीसाठी आक्रोशतं जगातलं प्रत्येक लहानगं सांजवेळी... काशी जगावेगळी नव्हती.
किरकिरणार्या लेकीला छातीशी धरून तुकोबा एकतारीच्या तालावर डोलत होते... "... विठ्ठssलं विठ्ठssलं". काशीचं रडणं वाढू लागलं... आणि तुकोबांची कासाविशीही.
"...कसा संभाळू हिला? हिचा टाहो तिच्या मातेसाठी आहे... मायेविना बाळ क्षणभरी तरी राहते का? माय दृष्टीआड होताच हुरुहुरु होतं बाळ... काळीज कातरत असेल पोरीचं... कशी कासाविशी ही, बाळाची आईसाठी.... ही तुटलेल्या नाळेची दु:खं आहेत... ती त्या बाळाच्या वंशी जाऊ तेव्हाच कळतिल...
मायेविन बाळ, क्षणभरी न राहे
न देखता होय, कासावीस ॥
"ओ लो लो लो, रडू काय म्हणून हे... मी तुझा बाप नोहे काय? माझी ओळखही नसल्यासारखं का करतेहेस बाळे?... आगे, माझ्याही रक्ताचा अंश तुझ्यात आहे... माझ्याही वंशाचा अंश तुझ्यात आहे... मग आईसाठीच हा हट्टं काये म्हणून... किती उदंड सायास करतो आहे तुझा बाप तुला रिझवण्यापायी... तुझ्या काळजाची हाक मात्रं तुझ्या मायेसाठीच..."
आणिक उदंड, दुजा वेचे तरी
संग त्या अंतरी, माऊलीचा ॥
"बघ बघ... विठू बघतो आहे... अशी कशी रडते माझी काशीबाळी?... अं? माऊलीला वाईट वाटेल ना... किती रडतेस अगं... नको रडू ना.. काशे... बाळा... लबाडे... आत्ता माय दिसली का लागलीच लाही लाही हासू फुटेल... बघ बघ... आत्ता येते माय... बघ हं... येतेच हं... तवर थोडका धीर धरा, माझे बाळा..."
नावडती तया, बोल आणिकांचे
देखोनिया नाचे, बाळदृष्टी ॥
"... असं करू नये... माझी शहाणी बाळ ती... थोडकी उसंत दे गे... कसा हा आकांत पोरी... असा टाहो फोडलास तर... तर... ओंजळीत स्वत:चा जीव असेल तरी तो सांडून धावेल ना माय तुझी... तुझी माय... तुझी माऊली.... जीव सांडून धावेल...."
तुकोबांच्या जीवाची तगमग झाली... मायेसाठी करायचा आकांत... हे बाळाचे करणे... अन असा, जीव तोडून केलेला असा आक्रोश ऐकताच हातीचे सांडून धावण्याखेरीज मायेला गत्यंतर नाही.... हा आपल्या लेकराच्या त्या टाहोमागचा अर्थं कळला त्यांना, अगदी अंतर्यामी झाला...
.... अन मांडीवरला लहानगा जीव कधी त्यांनी जमिनीवर ठेवला त्यांना कळलच नाही...
काशीच्या किंकाळ्या, टाहो, घरापर्यंत ऐकू जाईल इतका वाढला होता... ते ऐकून हातीचं सांडून आवली देवळात धावली. पदराचीही शुद्धं नाही अशी ती गाभार्याच्या दारात ठाकली तेव्हा तिला दिसलं...
पोर हात-पाय झाडीत आक्रोशत पडली होती... विठ्ठलाच्या चरणांना घट्टं मिठी घालून तुकोबा लहान लेकरासारखे हुंदकत होते... स्फुंदत होते... "माये... माऊली... तुजविण थार नाही आता... माये गे ssss"
***************************************************************************************************
आई-बाप असण्यानं पायाखाली जमीन घट्टं असल्याचा जो भक्कम अनुभव असतो... आपल्या अस्तित्वाला, व्यक्तीत्वाला खंबीर आधार असल्याचा अनुभव असतो, त्या अनुभवाची बरोबरी रागामधे सा आणि प हे स्वर खांबासारखे असणं, त्यांचा वारंवार लगाव होणं ह्यासारखाच.
पंचम नसलेल्या रागांना माय मरो पण मावशी जगो सारखा मध्यमाचा तरी आसरा असतो.
पण सा? षड्जं?....
षड्जं सार्या सुरांचं मातातत्वं... षड्जं उरलेल्या सगळ्या सुरांच्या उत्पत्तीचं मूळ... आधारस्तंभ. षड्जाला नाकारून गाता येत नाही. त्याचं अस्तित्वं टाळता येईल एकवेळ पण नाकारता येणार नाही...
मारवा हा असा एक राग ज्यात पंचम नाही. आणि षड्जं? ... नावापुरता.... त्याला टाळून गायचय. मूर्तीमंत अनाथ भावना! जगात एकटे आहोत, पोरके आहोत ही भावना ओटीत घेऊन आहे हा राग.
इतकच नाही तर... ह्या पोरकेपणाला आपलं घर, आपला हक्काचा निवारा जो षड्जं... त्याचा पत्ता ठाऊक आहे.
पण.... सगळं जग धुंडाळून हे अनाथलेपण आपल्या घरट्याच्या कवाडाशी येतं...
पण त्याला तिथे प्रवेश नाही... त्याला ते टाळून जायचय. शेजारच्या निषादाच्या दारावर निवारा आहे, पुढे रिषभाच्या दारातही निवांत टेकता येतं... पण ज्याला आपलं घर-आंगण म्हणायचं, जिथं आपला जन्मसिद्ध हक्क असायला हवा, जिथे आपल्या शिणल्या जिवाला विराम मिळणारय... तिथे, त्या दारात मात्रं आपल्याला जागा नाही...
अशी जिवाची तगमग करणारी कासाविशी आहे ह्या रागात. हा राग आळवायचा तर भोगाला आलेला, षड्जापासूनचा दुरावा एकलेपणाची भावना जागवत रहातो.
गर्दीतही एकटं करणारी सांजवेळ....
वैभवच्या... वैभव जोशीच्या एका गजल मधला एक नितांतसुंदर शेर...
उन्ह म्हणते सोडुनी जाऊ नको रे... चांदणे म्हणते मला बिलगायला ये
सांजवेळ ह्याच्या अगदी उलट...
अगदी अगदी उलट्या काळजाची... उन्हं आपला भर्जरी पदर आपल्या मुठीतून सोडवून घेतायत आणि चांदण्याचा कुठे मागमूसही नाही...
उरात हुरहुर दाटते, नजर भिरीभिरी होऊन काय शोधू पहाते कुणास ठाऊक....
कुणी एक ओळखीचा चेहरा, एखादी ओल्या सुरात हाक, नेहमीची सावली, किंवा चाहूलतरी...
अगदी असं सगळं सवयीचं आजूबाजूला असूनही... आपण हरवतो. नक्की काय हवं असतं आपल्याला ह्या अवघडल्या क्षणी?
आपल्या मूळ आत्मतत्वाशी जोडून असलेल्या अन कधीतरी तुटून गेलेल्या नाळेची जखम ताजी होऊन भळभळते का?
त्याच आत्मतत्वानं घातलेली अविरत साद... जाणिवेच्या शहाणीवेनं आपणच वेळोवेळी कानाआड केलेली.... देहाचा पिंजरा फोडून बाहेर पडण्याइतकी रंध्रारंध्रात घुमते का?
आपल्यातलं ’मी’पण, अपुरेपणाची, अधुरेपणाची सगळी आवरणं उतरवून नागोडं होतं... एखाद्या हरवल्या लहानग्यासारखं अनवाणी पायांनी इथं-तिथं भिरकटतं... गुढग्यांवर रांगत, हात उंचावून रडतं, मुसमुसतं... उसासतं....
आई... आईसाठी.... त्या जगद्नियंत्या मातातत्वासाठी.
मारवा रागातली ही कासाविशी तुमच्या-माझ्यातल्या त्या हारपल्या, हुरहुरल्या लहानग्याची आहे... हे मला कळलच कळलं...
त्याचबरोबर हे ही कळून चुकलं की.... जीवाच्या करारानं आईसाठी आक्रंदणार्या पोराच्या पोटात जितकं तुटतं, तितकं माझ्या काळजात तुटेल.... तितकं पाणी पाणी होईल.... तेव्हा... तेव्हाच मला माझं मातातत्वं दिसेल... नव्हे नव्हे, अगदी आसुसून, कडकडून भेटेल...
जळात नुक्त्याच बुडून गेलेल्या शेवटल्या किरणात... आणि पूर्वेला अगदी एव्हढ्यातच किंचित लुकलुकू लागल्या इवल्या चांदणीत...
..... अगदी निषादात... अन रिषभातही...
************************************************************************************************
थोडकं... अगदी थोडकंच ह्या गाण्याविषयी. श्री. कमलाकर भागवत ह्यांनी चाल दिलीये आणि सुमन कल्याणपूर ह्यांनी गायलेलं हे गाणं. फार फार पूर्वी संध्याकाळच्या रेडिओ कार्यक्रमात ऐकलेलं गाणं. लहान-अर्धवट वयात संध्याकाळ ही खेळण्याची, धम्माल करण्याची वेळ असूनही... हे गाणं इतकं भिनलं, भिडलं.
मला भेटलेल्या प्रार्थनांमधली शेवटली प्रार्थना, लिहून काढली (http://www.maayboli.com/node/28302) .... आणि मनात हे गाणं जागं झालं... ह्या गाण्य़ानं जो काय पिंगा घातला... अगदी वेध लागले. कुठेही मिळेना सहज. मिळालं पण त्यातून आलेला अनुभव... तुकोबा-आवलीचा... इतका सदृश्य होता की लिहिणं अवघड झालं.
असो... भागवतांनी चाल अतिसुलभ, सहज, साधी ठेवली आहे. सरोद, किंचित झिणझिणलेली सतार, तबला (मृदुंग) ह्याविना फारशी वाद्यं नाहीत. पण शब्दं, त्यांचा अर्थं आणि राग ह्याचा इतका चपखल मिलाफ आहे की गाणं थेट उतरतं. सुमनताईंच्या गोड, भावपूर्णं सुराला माझा मनापासून सलाम.
मारवा रागाचा मला लागलेला किंवा लागणारा "भावार्थ" हा निव्वळ माझा अनुभव. तुम्हाला वेगळा अनुभूत होत असेल...असेलच कदाचित. इथे जरूर चर्चा व्हावी त्याचीही.
समाप्तं
प्रतिसादाकरता शब्द आणि खुणा
प्रतिसादाकरता शब्द आणि खुणा कमी पडतील असे ललित आहे हे....... तुमचे लेखन वाचताना अक्षरश: अचंबित व्हायला होते. फारच अप्रतिम आहे हे.........
___/\___
अप्रतिम! दिवसाची सुरेल
अप्रतिम! दिवसाची सुरेल सुरूवात....
मला जर कधी काळी रागांची थियरी शिकायला मिळाली तर तुमची लेक्चर्स ज्या कॉलेजला असतील तिथंच प्रवेश घेईन
खूप मस्त समजावलंय....
निव्वळ अप्रतिम
निव्वळ अप्रतिम
मारवा हा असा एक राग ज्यात
मारवा हा असा एक राग ज्यात पंचम नाही. आणि षड्जं? ... नावापुरता.... त्याला टाळून गायचय. मूर्तीमंत अनाथ भावना! जगात एकटे आहोत, पोरके आहोत ही भावना ओटीत घेऊन आहे हा राग.
इतकच नाही तर... ह्या पोरकेपणाला आपलं घर, आपला हक्काचा निवारा जो षड्जं... त्याचा पत्ता ठाऊक आहे.
पण.... सगळं जग धुंडाळून हे अनाथलेपण आपल्या घरट्याच्या कवाडाशी येतं...
पण त्याला तिथे प्रवेश नाही... त्याला ते टाळून जायचय. शेजारच्या निषादाच्या दारावर निवारा आहे, पुढे रिषभाच्या दारातही निवांत टेकता येतं... पण ज्याला आपलं घर-आंगण म्हणायचं, जिथं आपला जन्मसिद्ध हक्क असायला हवा, जिथे आपल्या शिणल्या जिवाला विराम मिळणारय... तिथे, त्या दारात मात्रं आपल्याला जागा नाही...
>>>>>>>>>>>>>>>>
संगीताच्या तांत्रिक बाबीबाबत अडाणी असल्याची असे काही वाचले (आणि काहीच कळले नाही) की खुप खंत वाटते
लेख नेहमीप्रमाणे अप्रतिम..
दाद, अतिशय सुंदर. मारवा
दाद, अतिशय सुंदर. मारवा ऐकताना ही तगमग अनुभवली आहे आणि षडज्-पंचमासारख्या अचल स्वरांवर ठेहराव नसल्यामुळे असे होते हे ही माहीत होते पण ते असे इतक्या समर्थपणे शब्दांत मांडायला तूच हवीस
दुसरे काही सांगुच शकत नाही
दुसरे काही सांगुच शकत नाही दाद तुम्हाला मनापासुन __/\__
काय लिहु दाद.....शब्द नाहीत
काय लिहु दाद.....शब्द नाहीत माझ्याजवळ.....निव्वळ अप्रतिम
नेहमीप्रमाणे अप्रतिम!
नेहमीप्रमाणे अप्रतिम!
दाद ,लिहीत्या रहा प्लीज..
दाद ,लिहीत्या रहा प्लीज..
सु रे ख...
सु रे ख...
आजचा दिवस खरच सार्थकी लागला
आजचा दिवस खरच सार्थकी लागला दाद.
तुझ्या लिखाणाला साजेशी दाद देणं मला जमणारच नाही कधी.
सगळ्या सगळ्यांचे खूप आभार...
सगळ्या सगळ्यांचे खूप आभार... मनापासून आभार. मला स्वतःला वेगळा आनंद देऊन गेलेला हा लेख आहे.
मानस्मी१८,
वाईट वाटून घेऊ नका. मी प्रयत्नं करतेय...
सा किंवा षड्जं हा मूळ स्वर. शिवाय अधिक पंचम (प) हा दुसरा तसाच दृढ स्वर. ह्या दोन्ही स्वरांना त्यांचे कोमल, तीव्र असे आजूबाजूचे स्वर नाहीत.
मध्यम (म) च्या पुढचाच स्वर तीव्र मध्यम म्हणायचा. गंधार(ग)च्या आधीचा स्वर कोमल गंधार म्हणायचा. तसाच कोमल रिषभ (रिषभाच्या आधीचा), कोमल धैवत (ध च्या आधीचा) आणी कोमल निषाद (नी च्या आधीचा) असे स्वर आहेत.
म्हणजे सा आणि प सोडल्यास इतर स्वरांना कोमल सूर आहेत.... मध्यमाला कोमल नाही... पण तीव्र आहे.
तानपुरा जो गाण्यात सुरांचा अखंड स्त्रोत, रेफरन्स पुरवतो तो सा आणि प ह्या सुरांत लावलेला असतो. ज्या रागात प नाही, त्या रागात म तरी असतोच.... तेव्हा सा आणि मध्यमात लावलेला असतो.
बहुतेक सगळ्याच गाण्यांमधे पुन्हा पुन्हा सा, प हे सूर येत रहातात. त्यातही सा! सा ठरला की आणि ठरला तरच इतर सूर त्याच्या संदर्भात डिफाईन होतात.
मारवा हा राग असा आहे की, त्यात निषाद आहे, आणि कोमल रिषभ आहे. म्हणजे सा च्या अगदी आधीचा आणि अगदी नंतरचा असे सूर आहेत.... रागाचं वैशिष्ट्य असं की, आळवणी ह्या निषाद, रिषभात करताना, सा टाळायचाय. जो सूर अत्यंत स्वाभाविक आहे, मूळ आहे... तोच टाळणं हाच रागाचा स्थायीभाव, नियम...
अत्यंत विचलित, अस्वस्थ, विकल करणारा अनुभव असतो... ही षडजं टाळत केलेली आलापी.
अर्थात सा लागतच नाही असं नाही... पण जेव्हा लागतो तेव्हा... दुपारच्या काहिलीत अनंत फुटलेली वाट चालताना, देवळाची घुमटी दिसते... आणि गाभार्यातल्या थंड फरशीवर उभ्या शरीराला जो "विसावा" मिळतो.... तो विसावा मनाला मिळतो
असो... जास्तच लिहिलं जरा.
_______/\_________ केव्वळ
_______/\_________
केव्वळ अप्रतिम!
तुझ्या लिखाणातिल शब्द्नशब्द मनाला भिडतो.....
____/\_____
____/\_____
हे नमस्कार ____/\_____ नको
हे नमस्कार ____/\_____ नको न... थांबवा, प्लीज. मला खरंच अगदी लाजल्यासारखं होतय... कुठेतरी मुरून जावंसं...
मला गाणी अशी दिसतात, भेटतात, माझ्यापाशीच रहातात अशी मज्जा आहे... आणि ती मी तुमच्याशी वाटून घेऊ शकते... इतकच. अनेक गाणी आरपारही जातात... अगदी शब्दांत मांडता न येण्याइतकं अवघड करून जातात... त्या गाण्यांनंतर आपण वेगळे असतो... आधीचे नसतो... त्या गाण्यांची भुली त्यांच्या-माझ्यातच....
अन काही गाणी वळसा घालूनही जातात... काही गाण्यांना मी वळसा घालून जाते... फार कमी, पण आहेत
हे नमस्कार थांबवुया....
आपल्या-तुपल्यात हे काही नको... परक्यासारखं.
आई-बाप असण्यानं पायाखाली जमीन
आई-बाप असण्यानं पायाखाली जमीन घट्टं असल्याचा जो भक्कम अनुभव असतो... आपल्या अस्तित्वाला, व्यक्तीत्वाला खंबीर आधार असल्याचा अनुभव असतो>> दाद, ह्या वाक्यासाठी मानाचा मुजरा!! सुंदर व्यक्त झालात!
तुमच्या लिखाणातच जादू आहे.
तुमच्या लिखाणातच जादू आहे. सुंदर.
नितांत सुंदर...
नितांत सुंदर...
धन्यवाद दाद.
धन्यवाद दाद.
अर्थात सा लागतच नाही असं
अर्थात सा लागतच नाही असं नाही... पण जेव्हा लागतो तेव्हा>> अगदी अगदी.. म प सा' तर अगदी मन वेडावणारा असतो.
सुन्दर. दाद - एक प्रश्न.
सुन्दर.
दाद - एक प्रश्न. "दुवक्त" हा शब्द का निवडला? मला तो दूसर्यांदा वाचताना खटकला.
अतिशय छन, अप्रतिम... मनाला
अतिशय छन, अप्रतिम... मनाला भिडणारं असं काही दिलंत ..धन्यवाद, आपल्या पुढील लिखाणाची उत्सुकतेन वाट पहातोय.
पुलेशु.
पुन्हा एकदा सगळ्यांचे
पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.
सुसुकु. दुवक्त - दोन वेळा. हा शब्दं मी त्या काळच्या (मुघलांचं राज्य महाराष्ट्रावर बराच काळ) काही कादंबर्यांमधून (if I am not wrong, गोनीदांचा शिवकालीन महाराष्ट्र, सुद्धा???) वाचलाय. हा शब्दं अजूनही अनेक ठिकाणी मराठी बोलीभाषांमधे सर्रास वापरला जातो.
दुवक्त प्येज घेतली.... त्या"बिगर" काय बी नाय... बिगर हा तसाच एक आपल्यात येऊन निवांत झालेला शब्दं.
नक्की काय म्हणून खटकला?
सुरेख!!!!!!
सुरेख!!!!!!
दाद! बायो ल्हीतच रहा असंच...
दाद! बायो ल्हीतच रहा असंच... खूप सुरेख!
फेसबुकवर मायेविन बाळ वाचलेअणि
फेसबुकवर मायेविन बाळ वाचलेअणि चकवा लागल्यासरखी सर्व लेखमलिका,त्यावरचे अभिप्राय सोबत असलेल्या सर्व अगदी अभिप्रायातीलहि लिन्क ऐकत पहात एडचापसारख आत आत शिरतच गेले.अक्ष्ररशः वेडी झाले.कशाकशाला दाद देउ? तुझ्या दाद या नावाला? गानभुल या मालिकेच्या नावाला?
तुझ्या तबला वाजवण्याला?तरल भावना आमच्यासारख्या सन्गितातिल प्ल्येग्रुपच्या विद्यार्थ्यानाही समज्तिल अशा भाषेत मांडण्याच्या हातोटीला?तुझ्या समरसतेला?शहणिवेला?अनुभव गीत संगीत या तिन्हिचि सुरेल गुंफण घालण्याच्या किमयेला?अभिप्रायाला दिलेल्या उत्तराना? त्यातिल विनयाला?
आणि कोणत्या शब्दात?खुप श्रिमंत झाल्यासारख वाटल.आता शांतपणे सर्व लेखमालिका पुन्हा वाचणार ऐकणार.
<<दाद - दुवक्त नक्की काय
<<दाद - दुवक्त नक्की काय म्हणून खटकला?>>
दुवक्त शब्दाशेजारिल बाकी सर्व शब्द पूर्ण मराठी आहेत. दुवक्त नाही असे मला वाटते. दुवक्त सारखे "तिवक्त, चौवक्त" असे मी वाचलेले नाही. म्हणून हा शब्द मला खटकला.
शलाकाताई, तुम्ही लिहायच आणि
शलाकाताई, तुम्ही लिहायच आणि आम्ही नि:शब्द व्हायचं.:)
खूप खूप लिही ग, तुझ्या प्रत्येकच लिखाणात वेगळी अनुभूती असते.
नितांतसुन्दर अनुभुती
नितांतसुन्दर अनुभुती ..अप्रतिम नेहमि प्रमाणे !!
शब्द जसे हात जोडुन उभे असतात दाद तुमच्या प्रतिभे पुढे ... !!
एखाद्या अभ॑गाच॑ त्याच्या
एखाद्या अभ॑गाच॑ त्याच्या रागासकट स्पष्टिकरण वाचण्याची ही पहिलीच वेळ;
त्यामुळे खरोखर॑च अप्रतिम वाचल्याचा अनुभव आला/ आन॑द मिळाला.
Pages