देव भेटलेला माणुस!

Submitted by रीया on 16 May, 2012 - 03:17

देव भेटलेला माणुस!

रविवारचा दिवस, हातात मस्त कॉफी..आणि सोबतीला वर्तमानपत्र....!
तस हे वर्णन आमच्या घरातल्या कुठल्याही सकाळसाठी फिट बसेल कारण पेपर वाचल्या शिवाय माझा दिवस पुढे सरकतच नाही. लहानपणी अनेकदा त्यावरुन आईचा मारही खाल्लायं. "सकाळी सकाळी कामधाम सोडुन पुरुषासारखा पेपर काय वाचत बसलियेस कार्टे?" हा आजीचा प्रश्न इतक्या वर्षात काहीच बदल न झाल्याने "पारच वाया गेलीये ही मुलगी!" हा भाव असलेल्या सुस्कार्‍यांमध्ये बदललाय इतकाच काय तो इतक्या वर्षाच्या सकाळमध्ये झालेला बदल.
नमनालाच तेलाचे घडे भरले नाही? असो! तर मी सांगत होते, सकाळ,कॉफी आणि पेपर या रोजच्या सकाळमध्ये आज एक गोष्ट घडली ज्यामुळे माझी सकाळपासुन आतापर्यंत भयानक चिडचिड होतेय Sad
काय झालं की नेहमीप्रमाणे मी पेपर हातात घेतला आणि त्यातुन एक पत्रक खाली पडलं आणि नेहमीप्रमाणे मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. हो तसही काय असणार होतं त्या पत्रकात? एखादी जहिरात नाही तर कुणाचं तरी कौतुक..म्हणुन ते पत्रक तसच जमिनीवर पडु दिलं आणि मी माझी कॉफी एन्जॉय करत पेपर वाचत होते. तितक्यात आई ते पत्रक उचलून माझ्या हातात देत म्हणाली "बघ बरं कसलासा फॉर्म वाटतोय हा!"
तो फॉर्म पाहुन मी जराशी आवकच झाले. एका स्पर्धेची प्रवेशिका होती ती. बक्षिस ३ लाख रुपये आणि स्पर्धा अगदीच युनिक !
काय तर म्हणे ’देव भेटलेला माणुस दाखवा आणि मिळवा ३ लाख रुपये....!’
विचार केला आज तसही काही काम नाहिये. प्रयत्न करुन पाहिला काय हरकत आहे.
जरा पत्ता वैगेरे पहावा म्हणलं तर कधीही न ऐकलेल्या ठिकाणाचं नाव होतं..जाऊ देत आपल्याला काय! आपल्याला फ़क्त ३ लाखाशी मतलब!
चटकन आवरुन तयार झाले..आणि निघालेले देव भेटलेल्या माणसाच्या शोधमोहीमेवर...
सुरुवात करावी ते देवळापासुन...तिथे अनेक भक्त भेटतील. कुणाला तरी कधी ना कधी देव भेटलाच असेल ना!
देवळात गेले.मोगर्‍याचा सुगंध त्यात मिसळलेला धुपाचा पवित्र वास सोबत सुमधुर घंटानाद...
वा! सुरुवात व्हावी तर ही अशीच! मन कसं प्रसन्न झालं. दर्शन घेऊन बाहेर आले. पाहिलं तर एक आजोबा एका झाडाखाली बसले होते.त्यांच्या शेजारी जाऊन बसले आणि त्यांना विचारलं "आजोबा, तुम्ही रोज येता का हो इथे?"
किंचितसे हसुन ते म्हणाले, "येतो म्हणजे? अगं मी इथेच रहातो. रोज देऊळ स्वच्छ करतो. पुजेची तयारी करुन ठेवतो.इथे पलिकडेच माझं घर आहे." असं म्हणुन त्यांनी एका छोट्याश्या खोलीकडे बोट दाखवले.
"अरे वा! मग इतक्या वर्षात तुम्हाला देव भेटला असेलच की!"
मी पटकन खडा टाकला.
"देव? अगं ती काय पिंडी आत! असं काय विचारतेयेस?"
"अहो आजोबा तसं नाही. ही पिंडी नाही, खराखुरा देव, चालता-बोलता, हातात डमरु, त्रिशुळ, डोक्यावर चंद्र,गंगा, गळ्यात नाग वैगेरे..तसा देव!"
"तसा होय? नाही गं. तसा देव काही मला दिसला नाही कधी. चल मी जातो खुप काम पडलय मला! खीर बनवायचीये"
"खीर? अरे वा! आज काही विषेश आहे का?"
"छे गं ! मी रोजचं बनवतो खीर! त्याचं काय आहे ना इथे लोक रोज आणुन दुध ओतायचे पिंडीवर. सफ़ाई करता करता नाके नऊ यायची. मग नविन नियम काढला की सरळ दुधाच्या पिशव्या वहाव्यात म्हणुन. मग रोज हे एवढालं दुध साठतं, काय करणार त्याचं म्हणुन खीर बनवतो"
मनातल्या मनात म्हणलं "भारीच आहे हे आजोबांचं! देवाच्या नावावर रोज खीर ओरपतायेत!
"पण रोज नविन नविन गोष्टी बनवायच्या ना. कधी खीर, कधी बासुंदी, कधी अजुन काय! रोज खीर खाऊन कंटाळा येत असेल तुम्हाला."
अतिशय उपहासाने मी आजोबांना म्हणलं. पण त्या वाक्यातला उपहास त्यांच्या लक्षात आला नसावा बहुदा. ते विचार मग्न होत म्हणाले
"बरोबर आहे तुझं. रोज खीर खाऊन कंटाळा येत असेलच. आज बासुंदी करुन पहातो. आवडली त्यांना तर मग बरंच आहे.काय?"
"त्यांना कुणाला?"
"अगं हे बाहेर बसतात ना भिकारी लोकं त्यांना. खरच बिचारे खीर खाऊन कंटाळले असतील."
"म्हणजे तुम्ही खीर स्वतःसाठी नाही बनवत?"
मी जाम गोंधळले होते.
"छे गं! माझी बायको गेल्यापासुन मी गोड खाणं सोडलय. या लोकांच्या चेहर्‍यावरचं समाधान पाहुनच माझं मन तृप्त होतं बघ."
माझा चेहरा खाडकन उतरला.
"तुम्ही अजिबात त्यातलं काही खात नाही?"
"वेडी की काय तू? परमेश्वरासाठीचं दान ते. मी स्वतःसाठी कसं वापरणार गं? पाप नाही का लागणार मला?"
आता मात्र अतिशय शरमुन जाऊन मी मनातल्या मनात आजोबांची माफी मागितली Sad
"पण खीर काय फक्त दुधाने नाही बनत. त्यासाठी लागणारे तांदुळ, साखरं?"
"ते होय! अगं रेशनात माझ्या खात्यावर मिळतं ते आणतो आणि वापरतो. तसाही मला काही संसार नाही मग पेन्शनचा मला काय उपयोग? त्यातुन जे मिळतं ती आणतो आणि ही लोक पण तेच गोड मानुन खातात.
"अहो पण कधी आजारी पडलात तर कसं करणारं तुम्ही? काही तजविज नको? मी थोडंस प्रॅक्टिकल मत मांडलं आजोबांसमोर.
"तो वर बसलाय ना? त्याला आहे की माझी काळजी, इतक्या वर्षात कधी आजारी नाही पाडलं त्याने मला मग आता कसा पाडेल? अग हे आयुष्य त्याचंच देणं! देणेदार आहे मी त्याचा! वर जाईन तेंव्हा हिशोब द्यावा लागेल आयुष्यभराचा. तेंव्हा आता त्याची तजविज करतोय असं म्हणालीस तरी चालेल.
मी मनातल्या मनात कपाळावर हात मारुन घेतला. काय माणुस आहे! इतके वर्ष देवाची इतकी सेवा करुन देव भेटला नाही याला आणि वर गेल्यावर भेटणारेय म्हणे! आणि त्यासाठी आता स्वतःची पुंजी भिकार्‍यांसाठी खर्च करतोय. कठीण आहे सगळंच एकंदर. अजुन एखादी अशी "महान" व्यक्ती भेटण्याआधी इथुन बाहेर पडलेलं बरं.
आता पुढे कुठे?
एका बुवांच्या मठात जाऊन पाहुया म्हणलं. खुप काही ऐकुन होते त्यांच्याबद्दल. देवाने म्हणे त्यांच्या रुपात जन्म घेतला होता.विचार केला चला त्यांनाच विचारू कसं आहे त्यांच "खरं" रूप! तिथे गेले तर ही भली मोठी रांग! बाबांचे अनेक भक्त त्यांच्यासाठी नजराणे घेऊन आले होते.
अरे देवा! म्हणजे आता रांगेत उभं रहावं लागणार तर! एकतर रांग या प्रकाराचा मला भयंकर तिटकारा आहे. पण काय करता. ३ लाख रुपये खुणावत होते. रांगेत उभी राहीले, एक-एक जण एक-एक प्रताप सांगत होते. कोणी म्हणे ते हातातुन अंगारा काढतात, कोणी म्हणे हवेतुन प्रसादाचे सफरचंद काढतात.
श्याSS! काहीतरी चुकल्यासारखं वाटतं होतं खरं पण आता काय! ३ लाख काही लहान रक्कम नव्हती ना. त्यासाठी एकदा परिक्षा पहावी म्हणलं.
मोह! विचारांची, बुद्धीची सगळी दार बंद करुन टाकतो हेच खरं. हे सगळं चुकीचं आहे, खोटं आहे हे कळत असतानाही मी त्या रांगेत उभी होते.
इतक्यात एकच गलका झाला. वळुन पाहिलं तर एक जमाव एका माणसाला लाथा-बुक्यांनी तुडवत होता.सगळे पहात होते पण रांग सोडुन जायला एक जण ही तयार नव्हता, शेवटी मीच गेले तिकडे.
"का मारताय?" माझ्या या प्रश्नावर लोकांनी काही सेकंद मारणं थांबवलं आणि मला उत्तर देता देता पुन्हा त्याला मारायला सुरुवात केली.
"#@#@ साला! मुलीच्या अंगाला हात लावतो. लाज नाही वाटत याला."
आणि तो माणुस तोंडातुन एक शब्दही न काढता मार खात होता.
डोकंच फिरलं माझं. लाजा नाहीत यांना.घरी आया-बहिणी आहेत की नाही कुणास ठाऊक.
"थांबा! मी पोलिसांना फोन करते. त्यांच्या ताब्यात देऊ याला.सरळ करतील चांगलेच."
अस म्हणत मी मोबाईल काढला तसा सारा जमाव माझ्याकडे चवताळुन पाहू लागला."ए टवळे, तुला काय करायचय? जा पळ इथुन. आमच्या घराचा प्रश्न हाय ह्यो!"
बाजुला बसलेल्या बायकांपैकी एक आजी ओरडल्या.
"मोठी आलिये आम्हाला शिकवनारी.मारा रे त्याला.सोडु नगा.माझ्या पोरीला हात लावतोय. साप चावला म्हणुन बाबांकडं आणलं पोरीला, तर नालायकानी हात टाकला पोरीवर. चोखुन इष काढतोय म्हन. काय आडानी समजलास व्हय रं आम्हाला? चोखुन इष काय तुझ्या बानं काढलेलं का? बाबांच्या प्रसादानं वाचली माझी पोर आणि हे बेणं सांगतय म्या इष काढत व्हतो म्हनुन!"
घ्या! म्हनजे हे असं आहे तर. एकंदर सगळा प्रकार माझ्या नीट लक्षात आला. मी त्या माणसाकडे पाहिलं मार अजिबात सहन होतं नव्हता त्याला. माझं चुकलंच. काही माहिती नसताना त्या माणसाला मी गुन्हेगार ठरवुन रिकामी झालेले.कुणास ठाऊक कशी पण माझ्या आवाजात एक जरब आली.
"थांबवा हे सगळं आधी. सफरचंदानं विष निघतं होय? त्या बाबामुळे नाहक मेली असती पोरगी तुमची. या माणसानं सगळं विष काढलं म्हणुन वाचली तुमची मुलगी. त्यांचे आभार मानायचे सोडुन त्यांना मारताय होय तुम्ही? लगेच थांबवा नाहीतर पोलिस स्टेशनला फोन लावते . माझी मैत्रिण PSI आहे. तुम्हाला आत टाकायला फारसा वेळ लागणार नाही."
कुणास ठाऊक त्या धमकीमुळे की अजुन कशामुळे पण मला शिव्या देत देत तो जमाव मागे फिरला.त्या माणसाला मी उठवलं आणि एका झाडाला टेकवुन बसवलं.पाणी दिलं आणि थोडंसं वैतागुनच म्हणाले,
"काय पडलं होतं तुम्हाला? कोणी लागते का ती तुमची? कशाला गेलात त्या लोकांवर उपकार करायला? केवढं मारलय त्यांनी! काय मिळालं तुम्हाला यातुन?"
"पोरी! तू तरी कोणी लागतेस का माझी? पण आलीसच ना मदत करायला? समाजातला एखादा घटक आपली अशी मदत करतो तशीच आपण पण इतरांना करायला हवी ना? आणि मला काय मिळालं म्हणुन विचारतेयेस ना? बघ ती मुलगी आता डोळे उघडुन पहातेय. त्या उघडलेल्या डोळ्यांनी मला समाधान मिळालं. हा बाबा भोंदु आहे हे इतर लोकांना कळेल तेंव्हा कळेल पण त्या नादात कोणाचा जीव नको जायला म्हणुन मी मात्र रोज इथे येणार."
आता मात्र हद्द झाली. म्हणजे हा माणुस रोज इथे येणार. रोज कुणाचा तरी जीव वाचवणार आणि रोज मार खाणार. याच्याशी जास्त बोलण्यात काही अर्थ नाहिये.
"तुमच्या घरच्यांचा नंबर सांगा मी फोन करुन बोलावुन घेते त्यांना"
"नको मी जाईन थोड्या वेळाने चालत. पण माझ्यामुळे तुझा रांगेतला नंबर गेला की"
"आता तो बाबा भोंदु आहे याचा इतका सढळ पुरावा मिळाल्यावर काय करु आत जाऊन?" सुस्कारा टाकत मी म्हणलं
"पण तुझ्यासारखी सुशिक्षित माणसं अशी इथे येतात म्हणजे.."
"नाही हो! मी काही दर्शन वैगेरे घ्यायला आले नव्हते. देव भेटलेला माणुस शोधायला आलेले. तुम्हाला भेटलाय का हो कधी देव?"
"देव? नाही गं. मुळात माझा या गोष्टींवर विश्वासच नाहिये. असो! निघतो मी आता. तुझं चालु देत"
"हं!"
आता पुढे कुठे? वाट फुटेल तिकडे जायचं ठरवलं.
चालता चालता एका गावात पोहचले.तिथे एका झाडाखाली शाळा भरलेली दिसली. गुरुजी अगदी तल्लीन होऊन गोष्ट सांगत होते. गांधीजींची,श्यामच्या आईची, अकबर-बिरबलाची आणि मुलं देखील अगदी मन लावून गोष्ट ऐकत होते.एक गोष्ट संपली की दुसर्‍या गोष्टीची फर्माईश.
आता गुरुजींनी प्रल्हादाची गोष्ट सांगायला सुरुवात केली. 'देव सगळीकडे असतो!'
जाम खुष झाले हो मी! मगापासुनचा सगळा शीण गेला. या माणसाला नक्कीच देव भेटला असणार. कधी संपणार शाळा असा विचार करेपर्यंत शाळा सुटली.पळत जाऊन मी गुरुजींना गाठलं.
तरुणच मुलगा होता. त्याला मी थांबवलं.
"Excuse me! अं sorry I mean माफ करा जरा एक काम होतं तुमच्याकडे."
गावतला शिक्षक! इंग्लिश शब्द कमी वापरायला हवेत. यांना कळेलं न कळेल.
"Yes mam! What can I Do for you?"
घ्या! मी फ्लॅटच!
"तुम्ही इंग्लिश..?"
मी जरासं ओशाळून म्हणाले.
किंचित हसुन तो म्हणाला, "हो मला अगदी जर्मन पण येतं Happy बोला काय काम होतं आपलं?"
"मी प्रिया! ते तुम्ही मगाशी गोष्ट सांगत होतात ना....."
"हो मी नेहमी येतो सुट्टीच्या दिवशी इथे, इथे रहातो, इथल्यासारख्यांचे कपडे घालतो, या मुलांना गोष्टी सांगतो. फार बर वाटतं मनाला. आठवडाभराचा सगळा शीण असा सहज निघुन जातो"
मी जाम गोंधळले होते. या सगळ्यातुन मला फक्त एवढंच कळाल की हा माणुस इथे रहात नाही.
"म्हणजे तुम्ही शिक्षक नाही?"
"छे छे! अरे हो माझी ओळख राहिलीच की! मी विनायक. IT मध्ये काम करतो. पुण्याला असतो."
"मग इथे?"
"इथे ना? आठवडाभर पैसे कमावतो आणि मग वीकेण्डला समाधान कमवायला इथे येतो."
"मी पण आयटीमध्येच आहे. आठवडाभराची दगदग माहित आहे मला. त्यातुन शनिवार-रविवार ही कामं! दमत नाही तुम्ही?"
"हो ना! फार दगदग होते. म्हणुन ठरवलंय आता जॉब सोडुन इथेच सेटल व्हायचं"
"काSSय? "
मी जवळपास किंचाळलेच! त्यानं चमकुन माझ्याकडे पाहिलं.
"नाही म्हणजे जॉब सोडुन इथे येणार म्हणजे करिअरची वाटच की आणि कशाला इथे यायचं.. म्हणजे.."
शीSS! आज मला शब्दांचा भयंकर राग येत होता. मनातले विचार अजिबात मांडता येत नव्हते. अरे काय वेडा माणुस आहे का हा? एवढा गल्लेलठ्ठ पगार सोडुन.. इथे या खेड्यात! शीSS!
बहुदा त्याला चेहरा वाचता येत असावा.
"ताई तुम्ही ज्या पिढीत आहात ना त्याचं पिढीतला मी पण. गलेल्लठ्ठ पगार, शहरांचं झगमगतेपण माझ्याही मनाला भुरळ पाडतंच की! पण खर सांगु का जेंव्हा माझं लग्न होईल ना तेंव्हा मला पॉप्स म्हणुन मिठी मारणार बाळ नकोय, बाबा म्हणतं नमस्कार करणारं हवंय. पिझ्झा, बर्गर खाता खाता त्यानं झुणका-भाकरीला नाकं नकोत मुरडायला. कसं आहे माझी नाळ माझ्या मातीशी जोडली गेलीये. जे हात लिलया Computer चालवु शकतात तेच हात नांगरही तितक्याच समर्थपणे चालवु शकतात याचा मला अभिमान आहे आणि तो माझ्या पुढच्या पिढीलाही असायला हवा ही इच्छा!"
"माफ करा जरा स्पष्ट बोलतेय पण संस्कार काय कुठेही होतातच की. आम्ही शहरात रहातो म्हणुन लगेच आम्ही आमची संस्कृती गुंडाळून नाही ठेवली."
"अरे तुम्ही तर गैरसमज करुन घेतलात!. ताई मला एक सांगा शहरात का रहायचं?"
"का म्हणजे? इथे राहुन विकास कसा होणार?"
"तेच तर! अगदी बरोबर बोललात आता. म्हणजे बघा जे शहरात राहिलेत, शहरात वाढलेत त्यांच्याबाबत मी बोलत नाहिये पण आमच्यासारख्यांनी खेड्यात जन्मायचं,खेड्यात वाढायचं आणि खेड सोडुन शहराला समृद्ध करायला पळायचं मग कसा होणार खेड्याचा विकास? इतके दिवस बक्कळ पैसा कमावला आता या माझ्या मातीत तो रुजवायचा म्हणतोय. काय?"
माझ्या मनात एकच विचार आला
"Horrible! सकाळपासुन तिसर्‍या वेड्याशी भेट झालीये माझी!"
"बरं! हे विचारायचं होतं का तुम्हाला?"
"नाही विचारायचं हे होतं की तुम्हाला कधी देव भेटलाय का?"
"देव? बघा हं! माझ्या गावची माती, ही खळखळणारी नदी, डोलणारी पिकं, हंबरणारी गुरं या सगळ्यातुन मला जे समाधान मिळतं ते देव पाहिल्यावर मिळत असेल तर हो मी पाहिलाय देवं!
"नाही मला खराखुरा देव भेटलेला माणुस हवाय"
याच्या सोबत अजुन थोडा वेळ राहिले तर मला पण वेड लागेल असा विचार करुन मी तिथुन लगेच कल्टी मारली. भयाण चिडचिड होत होती.एक माणुस धड नाही. सगळे हे असले अविचारी लोकं भेटतायेत मला :(. मरु देत ती स्पर्धा. स्वत:ला त्रास करुन घेण्यापेक्षा घरी गेलेलं बरं असा विचार करुन मी परतीची वाट पकडली.
बसमध्ये शेजारी एक माणुस येऊन बसला. भारदस्त व्यक्तीमत्त्व. साधारण ६०-६५ वय असावं.त्याने तिकिट काढलं आणि तिकिट आणि पैसे पुन्हा पाकिटात ठेवुन त्यातला एक फोटो मन लाऊन पाहू लागला. बराचं वेळं ! मग माझं कुतूहल चळावलं तसा मी त्या फोटोकडे चोरटा कटाक्ष टाकला.त्याच्या लक्षात आलं असावं ते. त्याने सरळ माझ्यासमोर तो फोटो धरला.
"हा बघ माझा मुलगा! आर्मीत होता."
"अरे वा आर्मीत! छानच की! आता कुठे असतो सध्या?" उगाच काहीतरी बोलायचं म्हणुन मी विचारलं.
"कारगिल युद्धात कामी आला देशाच्या! तस लहानपणापासुनच त्याला आर्मीचं वेड होतं. भयंकर देशप्रेम! लग्नही करणार नाही म्हणायचा कधी.मग एक दिवस आर्मीत सिलेक्शन झाल्याची बातमी आली तेंव्हा काय आनंद झालेला त्याला.अशीच एकदा युद्धाची बातमी आली.युद्धावर लढायला गेला आणि युद्ध संपलं की घरी येईन म्हणाला. पण परत आलाच नाही. "
मला काय बोलावं ते सुचेना. शब्दांनी पुन्हा एकदा माझा घात केला होता. पुन्हा एकदा माझी साथ सोडली. एकही शब्द तोंडातुन बाहेर पडेना. बर्‍याचं वेळ शांतता पसरली म्हणुन त्यांनी एकवार माझ्याकडे पाहिलं आणि मला समजुन घेतलं.
"माझं पोरगं अमर झालं हे मात्र नक्की! आजही उर अभिमानानं भरुन येतो बघ. आता दुसरा मुलगाही चांगला मोठा झालय. हा बघ त्याचा फोटो". त्यांनी दुसरा फोटो दाखवला.
"छानेय की हा पण! काय करतो हा?"
"हा? आता हा पण आर्मी जॉईन करायची म्हणतोय. नातेवाईकांचा भयंकर विरोध चालू आहे. एकच मुलगा, त्याला पण काही तरी झालं तर. पण लोकांना अजिबात कळत नाही. मरायचं तर एक दिवस सगळ्यांनाच आहे.पण मरावं तर हे असं. नाही तर मी. नोकरी केली आणि आता रिटायर होऊन घरात बसलोय. आता कधी तरी आजारी पडेन आणि मरेन. वाया गेलं माझं आयुष्य. माझ्या मुलाचं तरी सार्थकी लागु देत."
नशिब माझा स्टॉप आला. माहित नाही काय बोलणार होते मी.
चिडचिड वाढली. घरी आले आणि रागाने ती प्रवेशिकाच फाडुन टाकली.सरळ जाऊन बेडवर आडवी पडले.
आई आली आणि पहिलंच वाक्य "आलात हुंदडुन?"
संतापाचा उद्रेक झाला माझ्या.
"हुंदडुन काय? उन्हातानातुन फिरुन डोकं फिरवुन आलीये. वेड्यासारखी वेड्या माणसांसोबत दिवस घालवून आलिये. तुझं काय जातंय बोलायला. जा तू बाहेर. झोपू देत मला शांत !"
ही आणि अशा स्वरुपाची प्रचंड बडबड केली मी आईला. तेंव्हा आई तिथुन निघुन गेली खरी पण एका तासातच भरलेलं ताट घेऊन परत आली.
"हे घे! जेवुन घे. सगळं तुझ्या आवडीचं केलंय. मुळात बाळा तुला चिडचिड का होतेय तेच मला कळत नाहिये. ती माणसं जशी होती ते त्यांच्यापाशी. तुला का त्रास होतोय? कदाचित तुझ्या मनाला ते सगळं पटतंय आणि बुद्धी मानायला तयार होत नसावी. किंवा मग पैसे गेले म्हणुन तुला चिडचिड होतं असावी. नेमकं काय ते तुलाच माहितं पण जे आपल्याकडे आहे त्यातच समाधान मानावं"
आता काही बोलण्याची ताकद उरली नव्हती माझ्यात मी शांतपणे आईला न्याहाळलं. एक जुनी साडी,कपाळाला टिकली आणि गळ्यात काळी पोतं घालुन आई माझ्याकडे पहात होती. आहेच काय आईकडे? चांगल्या साड्या नाहीत की अंगभर दागिने नाहीत. मग नेमकं कशात समाधान मानतेय ही?
"हे घे! तुला हीच पर्स आवडली होती ना? आणली बघ बाबांनी"
"अगं पण तेंव्हा म्हणाली होतीस ना की पैसे नाहियेत सद्ध्या?"
"अगं बाबांना बुट आणायला नव्हते का ठेवले? बाबा म्हणाले महिनाभर जातील आताचे बूट मस्तपैकी. आता काही नकोयेत त्यांना. पुढच्या महिन्यात आणू म्हणाले. तुमच्यासाठीच तर जन्म आमचा.तुमच्या चेहर्‍यावरचा आनंद हेच आमचं समाधान!"
बास, बास झालं आता! सकाळपासुन काय सगळेच वेड्यासारखे वागतायेत?
स्वत:चे सगळी पेन्शन भिकार्‍यांवर खर्च करणारे ते आजोबा, रोज मार खायला तयार असणारा पण लोकांचा जीव वाचला पाहिजे म्हणणारा तो माणुस, गावाच्या मातीसाठी, संस्कृतीसाठी गल्लेलठ्ठ पगाराची नोकरी सोडायला तयार झालेला विनायक, मी देशासाठी मेलो नाही म्हणुन हळहळणारा आणि स्वतःचा एकुलता एक आधारही देशाच्या कामी यावा म्हणणारा एक बाप, माझीच बोलणी ऐकुन घेऊन पुन्हा भुक लागली असेल ना म्हणत माझ्या आवडीचे पदार्थ माझ्या हातात आणुन देणारी माझी आई आणि स्वतःचे झिजलेले बुट माझ्या पर्ससाठी कॅन्सल करणारे माझे बाबा!
सगळेच वेडे!
देव भेटलेला माणुस शोधायला निघालेले मी! आणि सगळ्या वेड्यांना भेटुन आले होते. पण या सगळ्या वेड्यांमध्ये ना एक गोष्ट कॉमन होती. त्यांच्या चेहर्‍यावरचं तेज.
देवाच्या चेहर्‍यावरही असंच तेज असतं म्हणतात ना!
बाप्रे! काहीही काय! देवाकडे शस्त्र असतात. असुरांचा नाश करायला यांच्याकडे कुठे आहे शस्त्र?
तस म्हणायला गेलं तर आहेच की! कुणाकडे निर्हेतुक भक्ती, कुणाकडे माणुसकी, कुणाकडे मातीची ओढ, कुणाकडे देशभक्ती तर कुणाकडे प्रेम!
शस्त्रच की ही! त्यांना अमुलाग्र बदलवणारी! मोहरुपी राक्षसाचा अंत करणारी!
पण देवाला सगळं सहज मिळतं.अलंकाराने मढलेला तो. यांच्याकडे कुठे काही आहे?
त्यांना तर फक्त समाधान हवंय. ते त्यांना भरपुर मिळतंच आहे की! अगदी मन भरुन टाकेल इतका आनंद! तो त्यांचा दागिना!
आता बरचस शांत वाटतंय मनाला.
शांतपणे उठुन मगाच्या फाडलेल्या प्रवेशिकेचे तुकडे उचलुन डस्ट्बिनमध्ये टाकले. माझे ३ लाख रुपये तर हातातुन गेलेत खरे पण आज लाखमोलाचा दिवस मिळालाय.
आणि देव भेटलेला माणुस????
तो तर समोरच्या आरशातुन माझ्याकडे पाहत हसतोय. Happy
...............
समाप्त.

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

गुलमोहर: 

प्रिया,
मस्तच लिहिली आहेस कथा...... माझ्या डोक्यात जसे होते त्यापेक्षा शतपटीने जास्त सहज अन सुंदर लिहिले आहेस. फुल्ल मार्क्स तुला........ Happy
असे लिहितेस म्हणूनच म्हणतो की कवितांबरोबरच जरा गद्याकडे लक्ष दे. आणखी मस्त लिहिशील.

पजो, भावना, दिपिका, शैलजा,नानूभऊ, वेकुडे, मंदार, अनंत,ऋतुजा,सारु, विजयजी, बस्के,सावली, राधिका, अस्चिग्,भ्रमर, शाम : खुप सारे आभार.
प्रोत्साहानाने हुरुप येतो. Happy

नानुभाऊ : Proud आधी तरी सांगायचं ना.... आता मी फाडुन टाकली ती प्रवेशिका Proud
वेक्स : पेशल धन्स गं Happy

निखिल आणि चाफा : धन्स....पुन्हा एकदा आठवडाभर डोकं फोड करायची इच्छा असेल तुमची तर सांगा मग मी गद्यलेखन करायला तयार आहे Proud
जोक्स अपार्ट तुमचं मार्गदर्शन राहु द्या..... नक्की लिहीन Happy

छान कल्पना आहे. आणि रंगवलियेस पण छान.
शेवट तर खुपच सुरेख <<माझे ३ लाख रुपये तर हातातुन गेलेत खरे पण आज लाखमोलाचा दिवस मिळालाय>>

खुप सुंदर लिहले आहे मागच्या आठवड्यात वाचायला घेतलि होती परंतू पुर्ण नव्हती झाली.
मनापासून आवड्ली

खुपच मस्त लिहल आहे. ताई, तुमचे विचार चान्गले आहेत म्हनुनच इतका सुन्दर लेख लिहला आहे. कथेमध्ये जी पात्र रन्गवली आहेत, खुपच परोपकारी आहेत.
--भाग्यवान- देव भेटलेला माणूस
वेडा

Pages

Back to top