सांदण दरीच्या ट्रेकला पावसाने आमचा पाठलाग केला होता.पहिला पाऊस पडुन गेला होता.त्यामुळे खास पावसाचा आनंद लुटण्यासाठी परत सह्याद्रीच्या कुशीत जायची ओढ लागली होती. "नो डेस्टिनेशन" आमचा जुना भटकंतीचा ग्रुप.बरेच दिवस एकत्र ट्रेक केला नव्हता.या ट्रेकच्या निमित्ताने आम्हा सवंगडयांची भट्टी परत जुळुन आली.खर म्हणजे नाणेघाटावर माझे मित्र आधी जाऊन आले होते.तिथला पाऊस त्यांनी अनुभवला होता.त्यांचा आधीचा अनुभव ऐकुन माझी उत्सुकता ताणली गेली.कारण मी तो मुलुख पहिल्यांदाच पाहणार होतो.त्यामुळे रुळलेल्या वाटेने न जाता थोडया वेगळ्या वाटेने घाटावर जायच ठरल.
भोरांडयाच्या वाटेबद्दल ऐकुन होतो.पण आंतरजाळावर त्याची जास्त माहिती मिळत नव्हती.मग मायबोलीकर सुन्याकडुन माहिती काढली.कल्याणहुन माळशेज घाटात जाणार्या रस्त्यावर मोरोशी गाव लागते.तेथुनच भोरांडयाच्या वाटेने नाणेघाटावर पोहोचता येते.
कल्याणला आम्ही भटके ( गोपी,प्रदिप,सुधीर,भाविन,माझा भाऊ अतुल अन मी ) साडे-सातच्या दरम्यान एकत्र जमलो.नगरला जाणारी बस पकडली.कल्याण-मुरबाड मार्गे दर-मजल करत मोरोशीत दाखल झालो.ढगांच्या राशीत राकट सह्याद्रीची शिखर हरवुन गेली होती.मोरोशीला पोहोचलो तेव्हा कळले की ,येथुन भैरवगडला वाट जाते.पण नाणेघाट बराच मागे राहिला होता.
भोरांडे फाटा जवळ-जवळ पाच-सहा कि.मी. मागे राहिला होता.जास्त पैशाच्या मोबदल्यात स्थानिक जिपवाला आम्हाला सोडायला तयार झाला होता.पण ट्रेकच्या अतिउत्साहामुळे ते अंतर चालत जायची आम्हा सवंगडयांना खुमखुमी आली.मग काय रस्त्याने आमची वरात निघाली.
हा उत्साह जास्त वेळ टिकला नाही.ढगाळ वातावरण होत. पाउस काय पडत नव्हता.त्यामुळे थोडी दमछाक होत होती.
पण आजुबाजुचा निसर्ग सोबतीला होता.रस्तालगतची घर जागी झाली होती.

बळीराजाने आपल्या कामाला सुरुवात केली होती.

या रस्त्याने जात असताना मध्येच एक छोटा पाडा लागला.थोडा वेळ तेथे घुटमळलो.सिमेंट काँक्रिटच्या जंगलात राहणार्या आपल्यासारख्यांना कौलारु घर नेहमीच मनाला भुरळ घालतात ना..
पाडयावरच्या लोकांना पाणी आणण्यासाठी थोड लांब जाव लागत म्हणुन बैलगाडीला ड्रम बांधलेले पाहायला मिळाले.घराच्या आवारात कुठल्यातरी बिया वाळत घातल्या होत्या.

पाडयावरच्या लोकांना भोरांडयाच्या वाटेबद्दल विचारल्यावर त्यांनी समोरच्या डोंगराकडे बोट दाखवले पण वाट नक्की कुठुन असेल ते माहित नव्हत.परत आम्ही मुळ रस्त्याने चालायला सुरुवात केली.गाडयांची ये-जा तुरळक प्रमाणात होती.
खर म्हणजे नुसत्या डांबरी रस्त्याने चालायचा कंटाळा येतो.आडवाटा आपल्याला सोप्या वाटतात.जवळ-जवळ तीन ते चार कि.मी अंतर आम्ही पायी कापल असेल.

भोरांडे फाटा अजुन किती लांब असेल याचा काहिच अंदाज येत नव्हता.निसर्गाचा आस्वाद घेत अकरा नंबरची गाडी पुढे ढकलत होतो.
ढगांच्या भाऊगर्दित हरविलेली सह्यशिखर दिसत होती. दोन्ही बाजुला दाट झाडी अन वळणावळणाच्या रस्त्याने जात असताना मध्येच पावसाच्या टपोर्या थेंबांनी अंगावर शहारे आणले.आता तुफान पाऊस येईल मन चिंब भिजेल म्हणुन आम्ही खुप खुश झालो.पण कसल काय ... पाऊस बेगडी ठरला.आधीच चालुन कंटाळलो होतो त्यात आमची टर उडवुन निघुन गेला.
जर वाट सापडली नाही तर ट्रेक न करताच परतावे लागणार होते किंवा मुळ वाटेने नाणेघाटाला जावे लागणार होते.पण आमच्या नशीबाने अजुन थोड चालल्यानंतर एक ट्रॅक्टर देवासारखा धावुन आला.त्या ट्रॅक्टरवाल्या दादांना ती वाट माहिती होती.मग ट्रॅक्टररुपी रथातुन आम्ही पुढे कुच केले.तेथुन जवळ-जवळ एक कि.मी वर भोरांडे फाटा लागला. फाटयाच्या थोडस पुढे एक ब्रिज(छोटासा पुल) लागला.
येथुनच ती वाट सुरु होते जिच्या आम्ही शोधात होतो.

ट्रॅक्टरवाल्या दादांचे आभार मानुन ब्रिजच्या डावीकडुन खाली उतरलो.समोरचा नजारा पाहुन अवाक झालो.
वरुणराजा जरी आमच्यावर नाराज असला तरी निसर्ग आमच्यावर भलताच खुश होता. आहाहा .... पहिला तो नजारा डोळ्यांनी पिऊन घेतला.आम्ही एकमेकांकडे पाहिले.अन स्वत:ला झोकुन दिले.
हो बरोबर ओळखलत ... आधीच चालुन कंटाळलो होतो.पाणी जास्त खोल नव्हत.मग या पाण्यात आम्ही डुबक्या मारल्या. प्रवासाचा क्षीण कुठल्याकुठे पळाला.बराच वेळ आमची धमाल चालु होती.
पण आधीच खुप उशीर झाला होता.साडेअकरा वाजुन गेले होते.अन खर्या ट्रेकला अजुन सुरुवात झाली नव्हती.म्हशी जशा पाण्यात डुंबुन राहतात तसे आम्ही त्या निसर्गनिर्मित पाण्याच्या पुलातुन बाहेर यायला मागत नव्हतो.शेवटी मनाला मुरड घालुन कसेबसे आम्ही त्या पाण्यातुन बाहेर पडलो.
मस्तपैकी पोहोल्यावर आता सडकुन भुक लागली होती.आम्ही आणलेल्या शिद्यावर आता जर ताव मारला तर सगळे सुस्तावणार होते.त्यामुळे सटरफटर खाऊने पोटाची आग शांत केली.
झर्याचे थंडगार पाणी पिऊन बर वाटल.
आता एकच लक्ष्य डोळ्यासमोर दिसत होत.घाटमाथ्यावर जाणारी वाट या ओढयाला डावीकडे ठेवुन जाणारी होती. समोर फक्त दाट जंगल दिसत होत.

बैलगाडीच्या वाटेने आम्ही पुढे कुच केले.या वाटेवर करवंदाची जाळी पसरली होती.रानमेव्याचा आस्वाद घेत आमची वाटचाल सुरु होती.बैलगाडीची वाट नंतर निमुळती होत गेली. हळुहळु आम्ही आता जंगलात शिरत होतो.

वार्यामुळे सळसळणार्या झाडांच्या पानांच अन बाजुने वाहणार्या ओढयातील पाण्याच्या खळखळाटाच अनोख संगीत चालु होत.सुधीर पुढे हातात काठी घेऊन लीड करत होता.आता झाडी दाट होत गेली.खाली वाळलेल्या पानांचा खच पडला होता.बरीच झाडे वादळी पावसामुळे पडलेली दिसत होती.

खर जंगल आम्ही अनुभवत होतो.

थोड चालल्यांनतर वाट दिसेनाशी झाली. दाड झाडीमुळे वाटेचा अंदाज येत नव्हता.ओढा दिसेनासा झाला.थोडक्यात आम्ही वाट चुकलो होतो. काटेरी झाडे अंगाशी लगड करत होती.खर म्हणजे या वाटेने फारस कोणी येत नाही .मळलेली वाट नव्हती.बर्याच वेळाने वाटेचा मागमुस घेत आम्ही एका ठिकाणी पोहोचलो.पंधरा ते वीस फुट खाली एक कोरडा ओढा दिसला.त्या ओढयाच्या समोर एक चढण दिसत होती.मी अन सुधिर त्या कोरडया ओढयात उतरलो.अन तेथुन त्या चढणीवर आलो.तिथली माती पावसामुळे एकदम भुसभशीत झाली होती.पाय सारखा घसरत होता.कारवीची रोपटी नावाला होती.कारवीच्या झाडांना पकडुन चढाव तर ती मुळासकट हातात येत होती.शेवटी वरतुन येणार्या एका झाडाची मोठी वेल हाती लागली अन आमची वेल क्लायंबिग सुरु झाली. रोप क्लायंबिगची हौस भागवुन घेतली.सुधीर अन मी ज्या वाटेने त्या चढणीवर आलो ती खरच अवघड होती.म्हणुन बाकीच्यांना दुसरी वाट भेटते का ते बघायला सांगितले. काटाकुटयातुन एकदाची भाविनला वाट सापडली.कोरडया ओढयाला वळसा घालुन थोड लांबुन येणार्या वाटेने त्यांनी आम्हाला गाठले. मी अन सुधीरने शॉर्टकट मारला होता.
अजुन थोड चालल्यानंतर एका ठिकाणी दोन कोरडया पाणवाटा दिसल्या.दोन्ही वाटा समांतर घाटमाथ्यावर जाणार्या होत्या.पण त्यातील एकच वाट आम्हाला नळिच्या वाटेवर सोडणार होती.आम्ही परत बुचकळ्यात पडलो.नक्की कुठली वाट असेल.मग मी अन सुधीर एका वाटेने अन बाकीचे दुसर्या वाटेने जायच ठरवल.मध्ये दाट झाडी होती.पाऊस पडला असता तर या वाटेवर असंख्य धबधबे पाहायला मिळाले असते.त्या खडकाळ पाण्याच्या वाटेने जात असताना सुधीर अन मी बाकीच्या साथीदारांना आवाज देत होतो.पण तिकडुन काहिच प्रतिसाद येत नव्हता.त्या सरळ चढणीच्या वाटेने चढल्यानंतर एका ढोरवाटेला येऊन मिळालो.मी अन सुधीर बरोबर वाटेने आलो होते.पण बाकींच्या लोकांचा काहीच मागमुस नव्हता.
मग मी आधुनिक संदेशवहन यंत्रा(मोबाईल) चा वापर केला.नशिबाने या डोंगराळ भागात फोनला रेंज भेटली.आमचे सवंगडी बरेच मागे राहिले होते.त्या ढोरवाटेने थोड मागे गेल्यावर खाली दरीत आमचे मावळे दिसले.त्यांना वरतुन आवाज देऊन योग्य वाट दाखवली.त्यांची बरीच दमछाक झाली होती.गोपी तर पार दमुन गेला होता.वाट चुकल्यामुळे आमचा बराचसा वेळ वाया गेला होता.अजुन घाटमाथा बराच लांब होता.
उंचच उंच झाडे ... जणु आकाशाला गवसणी घालण्याची स्पर्धा लागली होती.आम्ही पोहोचलो तेथे बरीचशे उंच झाडे पाहायला मिळाली.वरती बघुन चालत होतो अन नेमका लाल मुंग्यांच्या वारुळावर पाय पडला.नशीब ...शुज घातल्यामुळे पायाला चावल्या नाहित.येथे वारा भन्नाट सुटला होता.थोडा वेळ वारा खाऊन आराम केला.आतापर्यंतच्या जंगल प्रवासात कुठलाही मोठा प्राणी किंवा साप नजरेस पडला नव्हता.मुंग्या,गोगलगाय,छोटे लाल किडे अन गुरांच शेण बस्स एव्हढच काय ते नजरेस पडल.
आम्ही आराम करत होतो तेव्हढयात एक माणुस खालुन येताना दिसला.सहसा या वाटेने कुणी येत नसेल असे आम्हाला वाटल होत.त्यांची विचारपुस केली असता समजले की,नेहमी या आडमार्गाने येतात.मुंबईला कामानिमित्त गेले होते अन येताना त्या ब्रिजच्या येथे उतरुन आले.घाटमाथ्यावर गेल्यावर घाटगर गाव लागते.माळशेज घाटातुन पुढे वळसा घालुन येण्यापेक्षा हा मार्ग त्यांना जवळचा होता.
सव्वा-तीन वाजुन गेले होते.अजुन बराच पल्ला गाठायचा होता.आता पायाला वेग देऊन आम्ही चढायला सुरुवात केली.हुश्य हुश्य करत एकदाचे नळिच्या वाटेवर पोहोचलो.

पळभर आराम करुन दगडाळ वाटेने पुढे कुच केले. या नळिच्या वाटेने जात असताना मध्येच एक शिट्टी कानावर पडली.एक निळा पक्षी त्या दरीत विहार करत होता.त्याच्या सुमधुर आवाजाने कान तृप्त झाले.पण त्याला काही कॅमेरात कैद करता आले नाही.
घाट-माथ्यावर पोहोचलो तेव्हा साडे-चार वाजुन गेले होते.खडकावर पाठ टेकवल्यावर थोड हायस वाटल.
वारा भन्नाट सुटला होता.वार्याने पाऊसाला जवळ-जवळ पळवुन लावला होता.
आता मात्र सडकुन भुक लागली होती म्हणुन आणलेल्या शिदोरीवर ताव मारला.पोटात भर पडल्यावर जीवात जीव आला.आमच लक्ष्य गाठल होत पण अंधार पडायच्या आत नाणेघाट उतरायचा होता.
आम्ही वेळेत खाली उतरु शकु की नाही याबद्दल बर्याच जणांची खात्री नव्हती.
घाटमाथ्यावरच्या एका पाडयात राहणारा..... कपडे जरी फाटके,मळलेले असले तरी मनाने खुप श्रीमंत अन निर्मळ होता.त्या पठारावर बकर्या चरायला घेऊन आला होता.आम्हाला उशीर होईल म्हनुन हक्काने घरी राहायला या असे सांगणारा बाळु ... हो बाळुच नाव सांगितल त्याने..

तासाभरात नाणेघाट सहज उतरुन खाली जाल,असे बाळुचे म्हणने होते.यांचा तासभर म्हणजे आपल्याला दोन तास लागतील या हिशोबाने आम्ही बाळुचा अन त्याच्या बकर्यांचा निरोप घेतला.आता परतीचा प्रवास सुरु झाला.
नाणेघाट हा भोरांडयाचा वाटेच्या थोडा बाजुला आहे.घाटामाथ्यावर पोहोचल्यावर दोन डोंगररांगा नजरेस भरतात.डाव्या बाजुला अजनावले,निमगिरी,हडसर तर उजव्या बाजुला जीवधन,चांवड ,शिवनेरी अशा डोंगररांगा पसरलेल्या आहेत.अन मध्ये कुकडी जलाशय पसरलेला आहे.
घाटावरच्या पठारावरुन पंधरा ते वीस मिनिटे चालल्यानंतर आम्ही नाणेघाटाच्या मुळ वाटेवर आलो.पावसाळी ढग जिवधनच्या करंगळीशी खेळत होते.वार्याची आमच्याबरोबर मस्ती चालली होती.पण पाऊस काय पडायचा नाव घेत नव्हता.
नाणेघाट नाव कशामुळे पडले हे तुम्हाला माहित असेलच...तरी पण सांगतोच..
नाणेघाट..... एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग सुमारे सव्वादोन हजार वर्षापुर्वी खोदला गेला असावा.सातवाहन काळातील प्रतिष्ठान म्हणजे आत्ताचे जुन्नर अन कोकणाला जोडण्यासाठी डोंगर फोडुन हा मार्ग केला गेला.
प्राचीन काळी कल्याण बंदरात उतरवलेला माल घोडे अथवा बैलावर वाहुन नेत असत.हा माल व्यापारासाठी सातवाहन काळातील राजधानी प्रतिष्ठान नगरीत नेला जात. या व्यापार्यांकडुन जकात जमा करण्यासाठी दगडी रांजणाचा वापर केला जात असे.
नाणेघाटाच्या डोंगरात कातळात कोरलेल्या गुहेत बाप्पांचे दर्शन घेतले.
हाच तो दगडी रांजण ... .
डोंगर फोडुन केलेला प्राचीन घाटमार्ग ....

गुहेतील भिंतीवर शिलालेख कोरलेला दिसला.ब्राम्ही लिपीत लिहिलेला हा लेख प्राचिन आहे. तिथेही काही प्रेमवीरांनी आपली नावे कोरलेली दिसली.बघुन वाईट वाटले. गुहेच्या बाजुला तीन पाण्याची खोदीव टाके दिसली.

असे क्षण आयुष्यात जेव्हा जेव्हा येतात तेव्हा ते साठवुन ठेवावेसे वाटतात.

शांत राहुन फकस्त या कातळाशी,कडेकपार्यांशी मुकसंवाद करायचा.मनाला या धुंद वातावरणात हरवुन द्यायच.मग आयुष्य निरर्थक वाटु लागत.
इकडे क्षणभर विसाव्यासाठी थांबलो तर तिकडे सुर्यनारायणाला घरी जायची घाई लागली होती.मग मात्र आम्ही गाशा गुंडाळला अन घाट उतराया लागलो.
नाणेघाटाची ही दगडाळ वाट उतरुन खाली आलो अन मागे वळुन बघितले तर... नानाचा अंगठा ...
नाणेघाटाच्या गुहेवरील उजवीकडील कातळी सुळक्याचा आकार अंगठ्यासारखा दिसतो.
अंधार पडायच्या आत आम्हाला वैशाखरे गाव गाठायच होत नाहीतर निदान हायवे पर्यंत तरी पोहोचायच होत.
खर म्हणजे शेवटच्या टप्प्यातल हे अंतर चालायचा कंटाळा आला होता. ट्रेकला जातानाच नियोजन केल होत पण परतीच्या वाटेवर सगळच रामभरोस होत.
नाणेघाट अन जिवधन....
हायवेवर पोहोचलो तोपर्यंत अंधार झाला होता.येईल त्या गाडिला हात करायचा अस ठरवल. जर काहीच नाही मिळाल तर पुढे वैशाखरे गावापर्यंत तंगडतोड होतीच.पण नशीब आज आमच्यावर मेहरबान होत.कांदे वाहुन नेणार्या एका ट्रकवाल्याने आम्हाला कल्याणपर्यंत सोडल.
खरच आजचा ट्रेक भन्नाट झाला होता.निसर्गाचा पुरेपुर आनंद लुटला होता. मोरोशी गावापासुन सुरु झालेला प्रवास......भोरांड्याची वाट चुकलेली असताना भेटलेले ट्रॅक्टरवाले दादा ......पाण्याच्या पुलात मारलेल्या डुबक्या ..... जंगलातला रोंमाच....नळीची वाट ...बाळु मेंढपाल .... रांगडा सह्याद्री ...घाटावरची वार्याची गाज ... नानेघाटावरची संध्याकाळ ... सगळच काही अनोखी अनुभुती देऊन गेला.

असा हा आठवणींचा अमुल्य खजिना...

फकस्त एक रुखरुख मनाला लागुन राहिली होती. पावसाने दिवसभर आमच्याशी पाठशिवणीचा खेळ केला होता.त्याची हि भेट अधुरीच राहिली होती.
पण पुढच्या सह्याद्रीवारीत हि भेट खास ठरणार होती ...
पुन्हा भेटुया ...
तोपर्यंत ...
सह्हीए!!!!!!!!!! प्रची
सह्हीए!!!!!!!!!! प्रची
सुंदर फोटो आणि वर्णन. ते
सुंदर फोटो आणि वर्णन. ते ऑर्किड पण मस्त टिपलय. पाण्यातले प्रतिबिंब खासच.
काय लिहावे ,? जबरदस्त !!! छान
काय लिहावे ,?
जबरदस्त !!!
छान वर्णन अणि प्र ची
खास करून प्र ची क्र. १० , लै भारी !!!
जबरी...कसले कड्क फोटो आलेत
जबरी...कसले कड्क फोटो आलेत मित्रा...लईच खास....
मस्त फोटो व त्याला साजेसं
मस्त फोटो व त्याला साजेसं वर्णन.
लै भारी रे दोस्ता!!! लै मजा
लै भारी रे दोस्ता!!!
लै मजा आली बग तुझ्या संग समदं अनुभवतांना...झक्कास!!!
सुंदर फोटो आणि वर्णन. ते
सुंदर फोटो आणि वर्णन. ते ऑर्किड पण मस्त टिपलय. पाण्यातले प्रतिबिंब खासच. >>> १+ जबरदस्त प्रचि रोमा
शांत राहुन फकस्त या कातळाशी,कडेकपार्यांशी मुकसंवाद करायचा.मनाला या धुंद वातावरणात हरवुन द्यायच.मग आयुष्य निरर्थक वाटु लागत. अगदी अगदी....
मनाची श्रीमंती आज खासकरुन अश्याच डोंगर दर्यात पहायला मिळते रे जिथे नफ्या तोट्याचे हिशेब नसतात.
आवडेश
प्र. ची. एकदम भन्नाट आलेत
प्र. ची. एकदम भन्नाट आलेत मावळ्या
मस्त ट्रेक अनुभवला वर्णनातून . लगे रहो . र.च्या.क.ने. एकादिवसात ल्यी घाइत केला का?
जहबहरदस्त
जहबहरदस्त
अ श क्य सुं द र
अ श क्य सुं द र
क्लास फोटो आणि वर्णनही!!!
क्लास फोटो आणि वर्णनही!!!
मस्त मस्त मस्त!!!!
मस्त रे.. आम्ही मागल्या भर
मस्त रे.. आम्ही मागल्या भर पावसात केला होता

हा बघ झब्बू..
सर्व वर्णन व प्रचि
सर्व वर्णन व प्रचि अप्रतिम.......
सगळ्यात आवडला तो झोपून पाणी पितानाचा फोटो - अशी मजा इतर कुठेच नाही....
शांत राहुन फकस्त या कातळाशी,कडेकपार्यांशी मुकसंवाद करायचा. मनाला या धुंद वातावरणात हरवुन द्यायच.मग आयुष्य निरर्थक वाटु लागत. अगदी अगदी....>>>>+१००
मनापासून धन्यवाद........
झब्बू भारीच , चिंब एकदम
झब्बू भारीच , चिंब एकदम
धन्यवाद ...
धन्यवाद ... स्मितु,दिनेशदा,संदिप पांगारे,चँपा,आऊटडोअर्स,शापित गंधर्व,झकासराव,मित,जिप्सी,शशांकजी
मनाची श्रीमंती आज खासकरुन अश्याच डोंगर दर्यात पहायला मिळते रे जिथे नफ्या तोट्याचे हिशेब नसतात. >> खरय रे ईनमीन ...

एकादिवसात ल्यी घाइत केला का? >> नाहि दादाश्री ... एका दिवसाचाच ट्रेक हाय रे
मस्त झब्बु स्मिहा ... आम्ही पण मागच्याच जुन महिन्यात केला पण पावसाने टांग मारली होती
रोहित अजुन एक , तुमचा
रोहित अजुन एक ,
तुमचा शेवटचा फोटो नेहमीच छान असतो !!
लै भारी भावा... वर्णन आणि
लै भारी भावा... वर्णन आणि फोटो खासच ... परत NR ka
वर्णन आणि फोटो, सगळेच भारी
वर्णन आणि फोटो, सगळेच भारी आवडले!
_/\_ _/\_ _/\_ सहीच
_/\_ _/\_ _/\_
सहीच !!!!!!
अप्रतिम वर्णन.. शेवट पर्यंत
अप्रतिम वर्णन.. शेवट पर्यंत सोबतीला होतो असच वाटलं आणि प्रचि तर क्लासच.
परत NR ka > +१ btw मागच्या पावसाळ्याचा ट्रेक आहे ना?
धन्यवाद यो,शैलजा,सुहास
धन्यवाद यो,शैलजा,सुहास झेले,इंद्रा
मागच्या पावसाळ्याचा ट्रेक आहे ना? >> हो...
परत NR ka > जरूर पण या वेळी नाणेघाट अन जिवधन दोन्ही करायचा असेल तरच...
अफलातून ! << शांत राहुन फकस्त
अफलातून !
<< शांत राहुन फकस्त या कातळाशी,कडेकपार्यांशी मुकसंवाद करायचा. मनाला या धुंद वातावरणात हरवुन द्यायच.मग आयुष्य निरर्थक वाटु लागत. >> मग शहरी आयुष्य निरर्थक वाटूं लागतं ! कारण जीवनाचा खरा 'परस्पेक्टीव्ह' तर त्या कडेकपारीतूनच मिळालाय ना तुम्हाला !! भाग्यवान आहात !!
मस्तच रे ... यो ला नेनार तर
मस्तच रे ... यो ला नेनार तर मी पन येनार ....:डोमा:
मस्त वर्णन आणि प्रचि
मस्त वर्णन आणि प्रचि
ऑर्किडचा फोटो सुरेखच!!!!!!
असे क्षण आयुष्यात जेव्हा
असे क्षण आयुष्यात जेव्हा जेव्हा येतात तेव्हा ते साठवुन ठेवावेसे वाटतात.काय लिहावे ,?
जबरदस्त !!!
छान वर्णन अणि प्र ची.
खुप मस्त फोटो आहे वा आव डले
खुप मस्त फोटो आहे वा आव डले मल . . ..