ताटकळलेला बुद्ध.

Submitted by आदित्य डोंगरे on 16 May, 2012 - 16:17

ताटकळलेला बुद्ध.

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मनुष्यप्राणी डोळे मिटून हजारो वर्षे देव्हार्यापुढे ध्यानस्थ बसला होता. या आधी आपण डोळे कधी उघडले होते हे सुद्धा त्याला आठवत नव्हते. समोरचा देव्हारा नक्की कसा दिसतो हे सुद्धा तो विसरलेला होता. त्याला फक्त एका गोष्टीची खात्री होती की समोरच्या या देव्हार्याची एकूण लोकसंख्या आहे बरोबर तेहेतीस कोटी.
त्याच सुमारास तेथून भगवान बुद्ध चालले होते. त्यांची नजर त्या मनुष्यप्राण्यावर पडली. त्यांनी त्यास हलवून जागे केले आणि विचारले,” बाबा रे, तू असा रिकाम्या देव्हार्यासमोर ध्यानस्थ का बरं बसला आहेस?” चकित होवून मनुष्याने पाहिले तो खरंच देव्हारा रिकामा होता.
आपण ध्यानस्थ बसलो तेव्हापासून तो तसा होता की नंतर रिकामा झाला, हे त्याला काही केल्या आठवेना,उमगेना. पण गेली हजारो वर्षे, ज्या देव्हार्याची लोकसंख्या तेहेतीस कोटी आहे याची त्याला खात्री होती, ती प्रत्यक्षात शून्य दिसलेली त्यास सहन होईना. त्याच्या डोळ्यातून घळा घळा पाणी वाहू लागले, व तो बुद्धांना म्हणाला,”भगवान, आपण माझे डोळे उघडून मला सत्य परिस्थिती चे आकलन करून दिलेत हे उपकारच झाले माझ्यावर, पण हा देव्हारा रिकामा आहे असे सत्य स्वीकारण्याची मानसिक शक्ती माझ्या ठायी नाही. तेव्हा कृपया आपण अजून एक उपकार करा माझ्यावर. हा देव्हारा रिकामा असल्याचे आपण मला दाखवलेत, त्यामुळे त्याचे रिकामपण सहन करण्याची मनःशक्ती माझ्यात निर्माण होईपर्यंत तो रिकामा राहू न देण्याची नैतिक जबाबदारी आपल्यावर येते. तेव्हा जोपावेतो मी अशी दिव्य मानसिक शक्ती मिळवत नाही, तोपर्यंत आपणच या देव्हाऱ्यात बसा. कृपा करून नाही म्हणू नका, नाहीतर दु:खातिरेकाने माझा जीव......”
करुणा हाच स्थायीभाव असलेल्या बुद्धाला त्या मनुष्यप्राण्याची दया आली. त्याचे मन मोडवेना. तेव्हा तो तसे करायला कबूल झाला व देव्हाऱ्यात जावून बसला. शक्ती मिळवण्यासाठी मनुष्य परत एकदा.....आता भरलेल्या .........देव्हाऱ्यासमोर ध्यानस्थ बसला........
वर्षे गेली......शतके गेली.......युगे गेली.........रिकामा देव्हारा सहन करायची ताकद मनुष्यांत कधी येईल, व तो कधी ध्यान सोडून डोळे उघडून आपल्याला कृतज्ञ निरोप देईल? याची वाट पाहत भगवान बुद्ध आजही त्या देव्हाऱ्यात ताटकळत बसलेले आहेत............
------आदित्य डोंगरे.

माझ्या इतर लेखांसाठी पहा-----
http://www.adityalikhit.blogspot.in/

गुलमोहर: 

आदित्य: लिखाण खूप आवडल!

रिकामा देव्हारा सहन करायची ताकद मनुष्यांत कधी येईल, व तो कधी ध्यान सोडून डोळे उघडून आपल्याला कृतज्ञ निरोप देईल?

अस म्हणतात काही युगांपूर्वी माणसाला देव सहज दिसायचा. कड्क तपश्चर्या, मनापासून केलेला धावा, उपास-तापास, यज्ञ, कर्म्-कांड, व्रत्-वैकल्य इत्यादी टूल्स वापरून माणूस देवाला कुठल्याना कुठल्या स्वरुपात त्याच्यासमोर प्रगट व्हायला लावायचा. आणि हे काहितरी मागण्याकरता वा मिळवण्याकरताच असायच. मानवाच्या मागणया पुरवून देव जाम हैराण झाला आणि कंटाळून नारदाला म्हणाला. "काय करू मी? काहि पाहिजे असल तरच माझी आठवण येते या मानवाला. आणि याला आपल सतत काहितरी पाहिजे असत. कुठ लपू मी? म्हणजे हा मला जाम शोधू शकणार नाही?"
यावर नारदमुनी म्हणाले.."सांगू का? सरळ जाउन याच्या हृदयात बस. हुशार मानव सगळीकडे तुला शोधील पण स्वत:च्या हृदयात अजिबात बघणार नाही."
देव गोडसा हसला आणि म्हणाला "दे टाळी"! बरी युक्ती सांगितलीस!"

युग लोटली पण मानव आपला शोधतोय्,,शोधतोय!

आदित्य,

तुमचा लेख गमतीदार आहे. माझ्या मनात काय विचार आले ते सांगतो.

----------------------- विचार सुरू -----------------------------
बुद्धही एक माणूसच आहे. सिद्धार्थ गौतमाचं वर्तन माणुसकीला धरून होतं. त्यामुळे माणूस माणसाला 'देव्हार्‍यात बसून माझा देव हो' अशी विनवणी करतांना आढळतो.

आणि बुद्ध चक्क तयारही होतो. कारण बुद्ध स्वत: देव असता तर रिकामपणा सहन करण्याची शक्ती त्यानेच माणसाला दिली असती. माणसाला हे सारं कळतंय, कारण तोही बुद्धाकडे ती शक्ती मागत नाहीये. बुद्ध केवळ एक जागा भरणारा म्हणून हवाय.
----------------------- विचार समाप्त -----------------------------

त्यामुळे हे एकमेकांसमोर बसणे कधी संपेल ते ठाऊक नाही. या समस्येवर एकाच उपाय. तो म्हणजे माणसाला (हृदयातून उमलणारे) आत्मज्ञान करून देणे. याअर्थी सविस्तर प्रतिसाद देणार होतो.

मात्र आगोदरच तो कल्पुने दिलाय. Happy

कथा आणि तिचा प्रतिसाद दोन्ही सुरेख आहेत.

आ.न.,
-गा.पै.

छान

कल्पु,चारुदत्त,सुरेश्,अनघा_मीरा,चंद्रगुप्त,आबासाहेब्,गामा पैलवान्,मंदार्_जोशी,अनुसया,स्मितू.....सगळ्यांचे खूप खूप खूप आभार Happy तुमच्या प्रतिक्रियांमुळे उत्साह वाढला Happy

गामा पैलवान......."बुद्ध केवळ एक जागा भरणारा म्हणुन हवाय." या एका वाक्यात तुम्ही या कथेचे तात्पर्य सांगितलेत! बुद्धाचे खरे विचार जाणून घेऊन, चिंतन करून ते आत्मसात करण्याची तसदी मानवाने कधीच घेतली नाही......त्याला फक्त नमस्कारापुरते स्थान दिले!

तुम्हा सर्वांना मी लिहलेली कथा आवडली हे वाचून आनंद झाला. मी माझ्या इंडोनेशियन गुरुंकडून ही कथा पहिल्यांदा ऐकली. आपल्या हृदयात असणारा देवाचा अंश हाच आपला खरा देव आणि तोच आपला खरा शिक्षक. बाहेर बघायची गरजच नसते या विषयावर ते बोलत होते. असो.

@आदित्यः अश्याच प्रकारच विचारप्रवर्तक लिखाण तुझ्याकडून वारंवार याव हा प्रेमळ आग्रह
@गा.पै.-आदित्यच्या ह्या कथेवरील तुमचे विचार एकायला खरोखरच आवडतील आम्हा सर्वांना.

कल्पु,

>> आदित्यच्या ह्या कथेवरील तुमचे विचार एकायला खरोखरच आवडतील आम्हा सर्वांना.

अहो, मी काय वेगळं सांगणार आजून! सगळं तुम्ही आगोदरच लिहून ठेवलंय! Happy

आ.न.,
-गा.पै.

बर्‍याच दिवसानी एक सुंदर विचार देणारी कथा आणि त्यावरील तितकीच सुंदर (कुठली कटुता न आणता झालेली) चर्चा वाचली. छान!