'जब जाना आतमराम...' - डॉ. अनिल अवचट

Submitted by माध्यम_प्रायोजक on 30 April, 2012 - 00:13

सबबन तुलसी भयी
परबत सालिगराम ।
सब नदिये गंगा भयी
जब जाना आतमराम ॥

या कबीराच्या दोह्यानं 'हा भारत माझा' या चित्रपटाची सुरुवात होते. आपल्या अंतर्मनात डोकावयाला भाग पाडणार्‍या या चित्रपटाबद्दल सांगत आहेत डॉ. अनिल अवचट...

anilavchat.jpg

'हा भारत माझा' हा मला अतिशय आवडलेला चित्रपट आहे. अत्यंत उस्फूर्त आहे तो! अण्णांचं आंदोलन सुरु झालं त्यावेळी सुमित्रेच्या मनात हा विषय आला, तिने त्यावर कथानक लिहिलं आणि आम्हांला ऐकायला बोलावलं. खरंतर त्यावेळी त्यांचा 'संहिता' हा चित्रपट सुरु होता, तरीही या चित्रपटाला प्राधान्य दिलं गेलं. त्यासाठी कुणीही पैसे घेतले नाहीत, अगदी कॅमेरामनपासून. अफाट प्रयोग आहे तो! जसं आंदोलन उस्फूर्त होतं तसाच तो चित्रपट. तरीही तो आंदोलनावरचा चित्रपट नाहीये. तो आंदोलनाच्या परिणामावरचा चित्रपट. सुमित्रेला मी महाविद्यालयीन दिवसापासून ओळखतो आणि तिचा असा आग्रह असतो, की तुम्ही जे काही बोलता त्याची सुरुवात स्वतःपासून का नाही करत? ती विनोबांच्या सहवासात राहिली आहे आणि तिची वृत्तीही असेल तशी, ती मोठ्या आवाजात आंदोलन करणार्‍यांपैकी नाही. ती शांतपणे आपलं काम करते, म्हणून मला त्याचं फार अगत्य वाटतं. ही माणसं आहेत ती खरीखुरी प्रतिक्रिया व्यक्त करतात आणि कुठल्याही वावटळीत वाहून जात नाहीत.

त्या चित्रपटातल्या कुटुंबातल्या टीव्हीवर फक्त आंदोलनाची दृष्यं दाखवली जातात, तेवढाच त्याचा आंदोलनाशी प्रत्यक्ष संबंध! त्यातलं कुणी त्या आंदोलनात नाही उतरलेलं. पण त्या मुलाला लाखो रुपयांची कॅपिटेशन फी द्यायची असेल किंवा त्या बहिणीची जागा असेल, या सगळ्यांमध्ये आपण काय भूमिका घेतोय? भ्रष्टाचार हा काही फक्त राजकीय पक्ष करत नसतात. तो आपल्याही जीवनात आहे, त्याच्याकडे आधी आपण पाहूयात. अशा प्रकारे माणसाला अंतर्मुख बनवतो हा चित्रपट. मी एकीकडे म्हणतो, की हे राजकारणी असे आहेत, त्यांना शिक्षा व्हायला हवी, त्यांना फटके द्यायला हवेत, पण माझ्यावर वेळ आली की मी पटकन लाच देऊन मोकळा होतो. मग मला त्याच्याविरुद्ध बोलायचा अधिकार आहे का? तो अधिकार आपण कमवायला हवा. आंदोलनं झाली पाहिजेत, त्यांचाही परिणाम होतोच. पण आंदोलनात भाग घेणार्‍या माणसाचं चारित्र्यही तितकंच महत्त्वाचं आहे, असा संदेश हा चित्रपट देतो. ह्या छोट्या गोष्टी आहेत, असं समजता कामा नयेत. काय छोटीशी तर गोष्ट आहे, या मुलाला इंजीनियर व्हायचंय ना? मग करुयात की काहीतरी, असं नाही करता येणार. आणि जी गोष्ट चूक आहे ती चूकच आहे. ती लहान का मोठी याला महत्त्व नाही. त्यामुळे हा चित्रपटाचा संदेश अतिशय महत्वाचा आहे. हा चित्रपट बघून आपण आपल्याही जीवनातल्या जागा तपासायला लागतो. कुठेकुठे मी अगदी सहज अशी चूक करुन बसतो? किंवा ती छोटीशी आहे म्हणून दुर्लक्ष करतो? वावगं बोलून जातो का? किंवा फक्त इंप्रेशन मारण्यासाठी म्हणून काही करतो का? आपल्याला का नाही पूर्ण खरं बोलता येत? का ते कायम खोट्यानं अवगुंठितच व्हावं लागतं? असं मीही तपासायला लागलो. पैसे खाल्ले म्हणजेच भ्रष्टाचार असं नाही. पोलिसाने पकडल्यावर ऐपतीप्रमाणे पैसे दिले की काम होतं, वेळ वाचतो. पण त्यामुळे त्या भ्रष्टाचाराच्या त्या मोठ्या व्यवस्थेला आपण आधार देतो, त्याला मान्यता देतो. आणि हे त्या चित्रपटात दाखवलं गेलं आहे.

तुकारामांचा एक अभंग आहे - ' कासया पहावे दोष अनेकांचे, मज काय त्याचे कमी असे? 'दुसर्‍यांचे दोष कशाला बघायचे, माझ्याकडे काय कमी आहेत? किंवा कबीर म्हणतो - 'बुरा जो देखन चला बुरा न मिलिया कोई, आपनी ओर देखा मुझसे बुरा न कोई'. सगळं स्वसमर्थनार्थ सुरू होतं. काय झालं मी केलं तर? सगळेच करतात. मी १९७३ साली डॉक्टरांवर टीका करणारा लेख लिहिला होता. ते कशी मालप्रॅक्टीस करतात, गरज नसताना तपासण्या करतात, हे मी त्यात लिहिलं होतं. माझे महाविद्यालयातले मित्र भांडायचे, 'आम्ही नाही केलं तर तो दुसरा करेल. किंवा तुम्ही किराणामालाच्या दुकानदाराला विचारता का, की भेसळ करतोस का म्हणून? मग आम्हीच का?' मग मी त्यांना विचारलं, की तुम्हीही त्याच पातळीवर उतरणार आहात का? मग सरळ ती व्यवसायाची प्रतिष्ठा काढून सांगा की आम्ही निखळ धंदेबाज आहोत आणि आम्हांला काळाबाजार करायचाय, लाचही द्यायची आहे, असं सगळंच.' समाजाला तोलून राहणारे खांब म्हणून राहाय्चं असेल, तर असा कुठलाच भ्रष्टाचार करायला नको. हा चित्रपट अशाच सगळ्या अंगांना स्पर्श करतो. तुम्ही दुसर्‍याकडे बोट दाखवून नका, आधी स्वतःकडे पाहा. 'मज काय त्याचे कमी असे?’ हे खरं महत्त्वाचं आहे. हाच मला या चित्रपटाचा मोठा संदेश वाटतो.

Photoset1 - HBM.jpg
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भ्रष्टाचार हा काही फक्त राजकीय पक्ष करत नसतात. तो आपल्याही जीवनात आहे, त्याच्याकडे आधी आपण पाहूयात. अशा प्रकारे माणसाला अंतर्मुख बनवतो हा चित्रपट.>>>>> नेमकी गोष्ट सांगितलेली दिसते आहे, पहायलाच हवा हा चित्रपट...

हा भारत माझा हा सिनेमा मी जेव्हा बघतो तेव्हा मला असे वाट्ते की तो एक उस्फुर्त स्वगत आहे. अण्णा हजारेनि आन्दोलन सुरु केले आणि पाहता पाहता त्याला एका देशव्यापी आन्दोलनाचे स्वरुप प्राप्त झाले. सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी, कलावंत विचारवंत आणि समाजातल्या सर्व थरांपर्यंत हे आंदोलन जाऊन भिडलं. आंदोलनाचा विषय, मागण्या , त्यातल्या कायदेशीर बाबी यापलीकडे जाऊन सर्वसामान्य माणूस स्वतःच्याही नकळत या लाटेत ओढला गेला . या निमित्तानी होणारया चर्चा , वाद आणि विचार मंथन यामधून जगण्यातल्या शाश्वत मुल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. मूल्यांना - यशस्वी किंवा अयशस्वी अशा ढोबळ मोजमापात तोलता येत नाही. कारण अशी परिमाण त्यांना लागू पडत नाहीत. आंदोलनाच्या झपाटलेल्या दिवसांचे हे एक फळीतच आहे असे म्हणावे लागेल. आणि याचाच प्रतिबिंब "हा भारत माझा " मध्ये पडलेले दिसून येते.
आपला तो बाब्या आणि दुसर्याचे ते कारटे या चालीवर "आपण करतो ती परिस्थितीशी तडजोड आणि दुसरे करतात तो भ्रष्टाचार असे एक सर्वसामान्य चित्र आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते . मग ते भौतिक, बौद्धिक किंवा भावनिक पातळीवर असो !
भ्रष्टाचार हा शिष्टाचार होत आहे हे कधी काळी शाळेत ऐकलेले वाक्य त्यावेळेस अतिशय ग्लामारास वाटले होते. कारणे काही असोत पण खरोखर त्यावेळेस भ्रष्टाचार हा मुळात रुजलेला नव्हता . नियमबाह्य गोष्ट करण्यासाठी दिली किंवा घेतली जाणारी लाच एवढीच भ्रष्टाचाराची सीमा होती. पण जसा काळ बदलत गेला तशी भ्रष्टाचाराची व्याप्ती वाढत गेली. आणि मग होता होता तो आपल्या दर रोजच्या जगण्याचा एक अपरिहार्य भाग बनून गेला.

जगण्याच्या या पैलूवर जेंव्हा या चित्रपटात प्रकाश पडतो तेंव्हा आपल्या जगण्यातला विरोधाभास हा एखादी गोष्ट भिंगातून पाहिल्याप्रमाणे एन्लार्ज होऊन समोर येतो.
एखाद्या जत्रेत जसे हौशे गौशे आणि नौशे असतात तसे ते अण्णांच्या आंदोलनातही आले. या आंदोलनाची परिणीती , त्यातली राजकीय गणिते आणि क्रिया - प्रतिक्रिया यापलीकडे जावून सर्वसामान्यांची मने ढवळून काढण्याची ताकद या आंदोलनात नक्कीच होती. अन्यथा सर्व थरातून एवढा मोठा लोकाधार त्याला मिळालाच नसता. म्यानेजमेंटमध्ये ज्याला "Outside In - Approach " म्हणतात तसा एक दृष्टीकोन देण्याचे काम या आंदोलनाने दिले . हाच दृष्टीकोन घेवून सृजनाच्या एका तिरीमिरीत सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांनी "हा भारत माझा " तयार केल्याचे जाणवत राहते. साधे सोपे सरळ प्रसंग. तितक्याच प्रामाणिक भावनांचे चित्रण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक क्षणाला जाणवत राहणारा मानवतावादी दृष्टीकोन हि या चित्रपटाची बलस्थाने म्हणता येतील. ऐन आंदोलनाच्य काळात इतक्या झपाट्याने तयार केलेला हा चित्रपट हा खरोखर सृजनाचे सुंदर उदाहरण आहे. अशा चित्रपटाला वितरक मिळण्यासाठी एवढा उशीर व्हावा हे खरे तर प्रेक्षकांचेच दुर्दैव आहे. आता मात्र हा चित्रपट ४ मे रोजी प्रदर्शित होत आहे. त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळावा हीच अपेक्षा !!