आयुष्यात एक गरज म्हणून नोकरी-व्यवसाय करणारे अनेकजण असतात. परंतु स्वतःची वैयक्तिक आवड जोपासत डोळ्यांसमोर निश्चित उद्दिष्ट ठरवून व्यवसायाच्या दृष्टीने शिक्षण घेणे, त्यानुसार मार्ग आखत योजनाबद्ध सुरुवात करणे, व्यवसायाचा नियोजनपूर्वक टप्प्या-टप्प्यांत विस्तार, नवनवीन आव्हानांच्या शोधात स्वतःतील कौशल्यगुणांना वाव देत राहणे हे सर्वांनाच जमते असे नाही! विणलेले कपडे व शाळा गणवेशांचा व्यवसाय करणार्या संगीता गोडबोले यांनी आपल्या आवडीच्या ह्या क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग करून मिळालेले अनुभवसिद्ध ज्ञान प्रत्यक्षात आणत केलेली प्रेरक वाटचाल आपल्यासमोर आणावी व त्यांच्या व्यवसायाविषयी जाणून घ्यावे यासाठी मी त्यांची घेतलेली मुलाखत येथे देत आहे :
आपल्या व्यवसायाचे स्वरूप काय हे जरा सांगाल का?
माझा मशीनवर लोकरी कपडे व शाळांचे गणवेश शिवण्याचा व्यवसाय आहे. मुख्यत्वे माझ्याकडे लहान बाळांचे लोकरी कपड्यांचे सेट्स, फॅन्सी बेबी वूलन आयटेम्स, बेबी वेअर, फ्रॉक्स, वूलन टोप्या यांच्या घाऊक ऑर्डरी असतात. त्या खालोखाल स्त्रियांचे कार्डिगन्स, वूलन कॅप्स, जाकिटे, स्कार्फ, शाली यांनाही मोठ्या प्रमाणावर मागणी असते व ते शिवून द्यायचे काम मी करते. तसेच शाळांचे गणवेश व त्यासोबत लागणार्या अॅक्सेसरीज (जसे पी.टी.शॉर्टस्, बेल्टस्, मोजे, स्वेटर्स इ.) यांच्याही मी कंत्राटी स्वरूपात घाऊक प्रमाणावर ऑर्डर्स घेते. त्याचसोबत किरकोळ प्रमाणावरील ऑर्डर्सही येत असतात, त्याही पुर्या करत असते. तर्हेतर्हेच्या कापडी बॅग्ज, एप्रन्स इत्यादीही मी शिवून देते.
गेली किती वर्षे तुम्ही या व्यवसायात आहात?
तसे पाहायला गेले तर गेली १८ वर्षे मी या क्षेत्रात आहे. परंतु संपूर्ण व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून एक प्रोफेशनल म्हणून माझा अनुभव व काम हे गेल्या १५ वर्षांचे म्हणावे लागेल.
या क्षेत्रात तुम्ही घेतलेले शिक्षण व व्यवसाय सुरू करण्याअगोदर घेतलेला अनुभव काय होता? या क्षेत्राची आवड सुरुवातीपासून होती का?
मी एस. एन. डी. टी. विद्यापीठातून बी. एस. सी. टेक्सटाईल होमसायन्स (गृहविज्ञान) ची पदवी घेतली. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा हा मी टेक्सटाईल डिझाईन व इंटीरियर डिझाईन मध्ये केला. शिक्षण झाल्यावर मी अडीच वर्षे इंटीरियर डिझायनर म्हणून नोकरीही केली. परंतु शिवण व विणकामाविषयीही काही करायचे मनात होते. त्याच दरम्यान माझे लग्न झाले, संसाराची जबाबदारी आली. मग विचार केला की हीच वेळ आहे व्यवसायाच्या दृष्टीने विचार करायची!
या क्षेत्राची आवड तर होतीच! माझ्या आईने ही आवड व माझ्यातील कलागुण ओळखले. मी पाचवीत असताना आम्ही सहकुटुंब तिरूपतीला गेलो होतो त्या प्रवासात माझी लोकरी विणकामाची खटपट पाहून तिला ही कल्पना आली असावी! पुढे त्याच दृष्टीने तिने माझ्या आवडीस खतपाणी दिले व शिक्षण-शाखा निवडताना मीही ती जाणीवपूर्वक निवडली.
तसेच, मी बारावीत असतानाच माझ्या आईने माझा कल बघून मला विणकामात पुढे शिकता यावे, प्रगती करता यावी म्हणून आमच्याकडे माहेरी विणकामाचे मशीन विकत घेतले होते. त्यावर सुरुवातीला तिने व मी मिळून बरेच प्रकार विणणे, शिवणे असे यशस्वी प्रयोग केले होते. त्या अगोदर मी अगदी ९ वी - १० वीत असतानाच माझी हौस पाहून तिने मला विणकामाचे मशीन कसे चालवितात याचे शिक्षण घेण्यास पाठविले होते. म्हणजे एकीकडे माझे शाळा - कॉलेजचे शिक्षण व दुसरीकडे हे विणकाम - शिवणकाम प्रशिक्षण, असे चालू असायचे. आईचा स्वतःचा अनेक वर्षांचा कपड्यांच्या शिवणकामाचा व्यावसायिक अनुभव होता. मी तिच्या हाताखाली सतत लुडबुडत असायचे. तिने काही विणले की त्याची नक्कल करून मीही तशीच वस्तू विणायचा किंवा शिवायचा प्रयत्न करायचे. तिला मदत करताना तिच्या हाताखाली मीही तयार होत गेले. नवनवीन प्रयोग करून पाहायची हौस तर होतीच! मग आपल्या आवडीचे व्यवसायात रूपांतर करावेसे प्रकर्षाने वाटायचे. आणि अशा तर्हेने आधी जमा केलेल्या ज्ञानाला व अनुभवांना मी प्रत्यक्ष व्यवसायात आणायचे ठरविले.
कोणत्याही शिवण-विणकाम प्रकारच्या व्यवसायासाठी जागा ही लागतेच! तुम्ही जागेचा प्रश्न कसा सोडविलात?
माझा नवरा व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. त्याचे आमच्या घराजवळच एका फ्लॅटमध्ये स्वतःचे ऑफिस होते. तेव्हा सुरुवातीला मी नवर्याच्या ऑफिसमध्येच एका खोलीत माझ्या व्यवसायाचे बस्तान बसविले. तिथे वाईंडिंग मशीन (लोकर गुंडाळण्याचे मशीन) व विणकामाचे मशीन ठेवण्यास पुरेशी जागा होती. त्याच जागेत माझ्या व्यवसायाचा श्रीगणेशा झाला. नंतर नवर्याचा ऑफिसचा व्याप वाढला व त्याने दुसर्या जागी आपले ऑफिस शिफ्ट केले. जुनी जागा सासू-सासर्यांची असली तरी त्यांनी त्या वेळी 'ही जागा तू तुझ्या व्यवसायासाठी वापर,' असे सांगून मला तो संपूर्ण फ्लॅट माझ्या व्यवसायासाठी उपलब्ध करून दिला. आज त्याच जागी, लक्ष्मी रोडला जोगेश्वरीच्या बोळात माझे विणकाम केंद्र (निटिंग सेंटर) आहे. व्यवसायाच्या दृष्टीने ही अतिशय मोक्याची जागा आहे. आजूबाजूला गजबजलेले व्यापार-केंद्र, भरपूर दुकाने, घाऊक बाजारपेठ आहे व मुबलक मनुष्यबळ उपलब्ध आहे, सर्व सोयी सुविधा आहेत. त्यामुळे मोक्याच्या व प्रशस्त जागेचा मला या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा करून घेता आला.
या व्यवसायात तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागली?
मी बारावीत असताना आईने विणकामाचे मशीन विकत घेतले. तेव्हा त्या काळी आम्हाला त्यासाठी ५००० रुपये मोजावे लागले. माझी मावशी श्रीमती विनीता मेंडजोगे हिने मदत केल्यामुळे ते मशीन एका फटक्यात घेणे आम्हाला शक्य झाले. लग्नानंतर ते मशीन मी माझ्याकडे आणले. व्यवसायाची सुरुवात तशी कासवाच्या गतीनेच झाली. पण पहिल्या दिवसापासून माझ्याकडे नातेवाईक व परिचितांच्या भरपूर ऑर्डर्स होत्या. माझे एक निश्चित होते की मला घरगुती स्वरूपाचा व्यवसाय करायचा नव्हता. जर काही करायचेच तर ते मोठ्या प्रमाणावर करायचे असे मनाशी पक्के ठरविले होते. त्यानुसार हात-पाय हालवायला सुरुवात केली. हळूहळू एकाची दोन मशीन्स झाली. सुरुवातीला लोकर गुंडाळण्याचे मशीन व विणकामाचे मशीन एवढेच होते. व्यवसायाच्या सुरुवातीस तेवढे पुरेसे असते. उत्तरोत्तर माझ्याकडील मशीन्सची संख्या वाढली. त्यासाठी सुरुवातीच्या काळात व्यवसायातील नफा पुन्हा व्यवसायातच गुंतवावा लागला.
आता तुमच्याकडे किती मशीन्स आहेत? या मशीन्सना किती खर्च येतो?
सध्या माझ्याकडे वाईंडिंग मशीन (लोकर गुंडाळायचे मशीन), विणकाम करायचे मशीन, स्टिचिंग मशीन, ओव्हरलॉकिंग मशीन असा जो एक सेट आहे त्यासाठी साधारण एक लाख रुपये किमान खर्च येतो. असे सध्या माझ्याकडे ३ सेट्स आहेत. विणकाम करायची ९ मशीन्स आहेत. शिवाय संगणकीय भरतकाम (कॉम्प्युटराईज्ड एम्ब्रॉयडरी) व मशीन भरतकाम करायचीही यंत्रे आहेत. आणि ही मशीन्स सतत बिझी असतात व ती तशी ठेवावीही लागतात.
वेगवेगळ्या मशीन्सवर काम करणार्या स्त्रिया
या व्यवसायाचे स्वरूप काय आहे? लोकरी कपड्याचे उत्पादन म्हणजे त्यात काय काय येते? पायरी-पायरीने सांगाल का?
ऑर्डर मिळाल्यावर आम्ही सर्वप्रथम त्यानुसार कच्चा माल खरेदी करतो. इथे कच्चा माल म्हणजे लोकर. ती पुण्याच्या होलसेल बाजारातूनही विकत घेता येते. परंतु मोठ्या प्रमाणावर कच्चा माल खरेदी करायचा असेल तर लुधियाना व दिल्लीच्या मार्केट्स ना पर्याय नाही. मी लोकर तिथूनच मागविते. मात्र तिथे किमान ऑर्डर १०० किलो लोकरीची नोंदवावी लागते. मी स्वतः जातीने त्या भागात हिंडून आमचे पुरवठादार निश्चित केले आहेत.
जेव्हा या लोकरी येतात तेव्हा त्यांना मशीनवर विणण्यालायक बनविण्यासाठी त्या गुंडाळून घ्यायला लागतात. त्यांचे गुंडे बनवावे लागतात. त्याशिवाय मशीनवर त्यांच्यापासून काही बनविणे शक्य नसते. मग या लोकरींचे गुंडे बनविण्यापासून सुरुवात होते.
कच्चा माल आल्यावर त्यापासून बाजारात मिळणारे तयार कपडे / उत्पादन तयार होण्यास इतरही अनेक पायऱ्या पार पाडाव्या लागतात. गुंडे बनविले की विणकामाच्या मशीनवर कपड्याच्या डिझाईनप्रमाणे मापे, पॅटर्न्स सेट करावे लागतात. त्यांचे आलेख बसवायला लागतात. टाके निश्चित करायला लागतात. त्याप्रमाणे कपड्याचे ते ते तुकडे विणले जातात.
मग असे विणून / शिवून झालेले वेगवेगळे तुकडे एकत्र जोडण्याचे काम असते. ते झाल्यावर ओव्हरलॉकिंग मशीनने धागे, कडा जोडणे इ. काम केले जाते.
फिनिशिंगमध्ये पुढे-मागे झालेले धागे नीट करणे, कपड्याला सफाईदार किंवा स्मूथ लूक आणणे हे काम चालते.
विणकाम यंत्र
याशिवाय मणी, बटणे, भरतकाम इत्यादी गोष्टी आवश्यकतेनुसार करायच्या असतात. हे सर्व झाले की इस्त्री, पॅकिंग, लेबलिंग हे काम असते.
या प्रत्येक कामासाठी वेगवेगळे लोक लागतात. आणि एवढ्या लोकांचे पगार करायचे तर त्यासाठी assured business लागतो. हा असा निश्चित व्यवसाय विशिष्ट कपड्यांच्या घाऊक ऑर्डर्समधून मिळू शकतो. जर एखाद्या प्रकारच्या व विशिष्ट साईझमधील उत्पादनाची घाऊक प्रमाणात, म्हणजे एका वेळी किमान तसे ५० नग, या प्रकारे ऑर्डर घेतली तर त्याप्रमाणे सर्व मशीन्स वापरता येतात, हाताखालच्या लोकांना त्या उत्पादनाबद्दल प्रशिक्षित करता येते व ते उत्पादन फायदा देऊ लागते. शिवाय त्या उत्पादनावर एकदा का कारागिरांचा हात बसला की त्या उत्पादनाचा फिनिश (सफाईदारपणा)ही तितकाच चांगला राहतो.
तुम्ही शिवलेल्या लोकरी कपड्यांच्या व व्यवसायाच्या मार्केटिंग साठी तुम्ही काही खास प्रयत्न केलेत का?
हो तर! या व्यवसायात शिरल्यावर महत्त्वाचे होते ते लोकरी कपड्यांसाठी ऑर्डर्स मिळविणे. मला घरगुती स्वरूपाच्या ऑर्डर्सना कधीच तोटा नव्हता व आजही नाही. कारण नातेवाईक, परिचित यांच्याकडूनच सतत मागण्या असायच्या. परंतु मला तेवढ्यावरच समाधान मानायचे नव्हते. मग मी लक्ष्मी रोड, रविवार पेठ व इतर आजूबाजूच्या भागांतील दुकानांमध्ये त्या दृष्टीने चौकशी करायला, हिंडायला सुरुवात केली. तेव्हा खूप ठिकाणी मी विणकामाचे, कपड्यांचे नमुने घेऊन हिंडले. मी या क्षेत्रात नवोदित असल्यामुळे प्रयत्नही भरपूर करायला लागायचे. माझ्या व्यवसायाच्या ठिकाणापासून व्यापार-केंद्र जवळच असल्याचा हा फायदा होता की विचारणा केल्यावर, आपल्याकडील लोकरी कपड्यांचे नमुने दाखविल्यावर त्यासंदर्भात माहितीही मिळायची. कोठे अशा प्रकारच्या मालाला खप आहे, कच्चा माल कोठे चांगला मिळेल, कोठे संधी आहे इत्यादी माहिती कळू लागली.
पुण्यातील छेडा ब्रदर्सच्या दुकानात त्यांनी मी शिवलेले लोकरी कपडे ठेवून घेण्यास सुरुवात केली. मग हळूहळू इतर दुकानदारही माल ठेवून घेऊ लागले. तरी त्या वेळी पुण्यातील दुकानांमध्ये तेव्हा प्रस्थापित असलेल्या अन्य काही व्यावसायिकांचा जम होता. त्यांचा अनेक वर्षांचा व्यवहार होता. मग मी पुण्याच्या आजूबाजूला, म्हणजे नगर, तळेगाव या ठिकाणी बरीच हिंडले. तेथील व्यापारी दुकानांमध्ये माझ्याकडचे लोकरी कपड्यांचे नमुने दाखविले. तिथे ते पसंतही पडले. मला तिथून नियमित ऑर्डर्स येऊ लागल्या. ही ठिकाणे व्यापारासाठी प्रसिद्ध असल्यामुळे पुण्यातही माझे नाव होऊ लागले. या क्षेत्रात तोंडी जाहिरात फार महत्त्वाची ठरते. एकदा तुम्ही गिर्हाईकाचा विश्वास संपादन केलात की त्यानुसार तुम्हाला काम मिळू लागते. तसेच या काळात ज्या ज्या दुकानांमध्ये मी माल ठेवायचे तिथे येणारे एजंट्सही मला लोकरी कपड्यांच्या ऑर्डर्स देऊ लागले. या ऑर्डर्स घेताना मी शक्यतो एकाच साईझच्या उत्पादनाची घाऊक प्रमाणात ऑर्डर घेण्यावर भर दिला. कारण, समजा, तुम्हाला एकाच साईझच्या लोकरी कपड्याची ऑर्डर मिळाली की तुम्ही त्याप्रमाणे हाताखालच्या मदतनिसांना प्रशिक्षित करू शकता व त्यांच्याकडून ते काम मोठ्या प्रमाणावर करून घेऊ शकता. एकदा ते शिकले की तुम्ही त्यात खूप लक्ष घालत बसण्याची गरज नसते. कालांतराने दुकानदारांना माझ्याकडील लोकरी उत्पादनांच्या गुणवत्तेची, माल घाऊक संख्येत पुरविला जाण्याच्या सातत्याची व ऑर्डर वेळेत पूर्ण होण्याबद्दलची खात्री पटत गेली. साहजिकच ऑर्डर्स वाढल्या व माझ्या व्यवसायाचा पसाराही वाढत गेला.
काही उत्पादनांची प्रकाशचित्रे :
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
पुण्याबाहेर व पुण्यात कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही लोकरी उत्पादनांचा पुरवठा करता?
पुण्याबाहेर मुंबई, सोलापूर व इंदोर येथे मी नियमितपणे वर्षभर लोकरी उत्पादनांचा पुरवठा करते. कोल्हापूर, इचलकरंजी येथे ऋतूनुसार मागणी असते. पुण्यात ७-८ दुकानांना मी नियमित स्वरूपात लोकरी उत्पादने पुरविते. डेक्कनवरील जी ३, कल्पना ड्रेसेस, छेडा ब्रदर्स, गणेश ड्रेसेस, न्यू हिरसन, बिबवेवाडीचे पुणे बझार इत्यादी दुकानांमध्ये मी बनवलेली लोकरी उत्पादने विक्रीला असतात. या शिवाय खूप लोक माझ्या विणकाम केंद्रावर येऊन तिथून खरेदी करतात, ऑर्डरी नोंदवितात ते वेगळेच. किरकोळ खरेदीही होते व घाऊक प्रमाणातही उत्पादने उचलली जातात.
याखेरीज प्रदर्शने, कला-जत्रा इत्यादी ठिकाणी तुम्ही भाग घेतलात का?
सुरुवातीची सात-आठ वर्षे मी व माझ्या आईने मिळून बर्याच प्रदर्शनांत भाग घेतला, तिथे आमची उत्पादने ठेवली, अनेक लोकांशी ओळखी करून घेतल्या. त्याचा व्यवसायाच्या दृष्टीने फायदाच होतो. मिटकॉन, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे भरवल्या जाणार्या प्रदर्शनांमध्ये आमचे स्टॉल्स असायचे. त्यात आमच्या स्टॉल्सवर कापडी बाळंतविड्यांपासून ते लोकरी कपड्यांपर्यंत बरेच प्रकार ठेवलेले असायचे. मुंबईला वनिता समाजातर्फे भरवलेल्या प्रदर्शनातही आम्ही भाग घ्यायचो. आम्हाला ''बेस्ट स्टॉल''चे बक्षीसही मिळाले होते. परंतु नंतर नंतर लोकरी कपड्यांना असलेल्या दैनंदिन स्वरूपाच्या व घाऊक प्रमाणावरच्या मागण्या आणि प्रदर्शनात अपेक्षित असणारी विविध प्रकारची उत्पादने हे गणित जमविणे मला कठीण वाटू लागले. त्यात मी घाऊक प्रमाणावरच्या मागण्यांवर लक्ष केंद्रित करायचे ठरविल्यामुळे कालांतराने प्रदर्शने मागे पडत गेली. आणि ह्या व्यवसायात जम बसल्यावर मग त्यांची तशी आवश्यकताही उरली नाही.
इतर कोठे जाहिरात करता का? तंत्रज्ञानाची मदत (जसे फेसबुक, सोशल नेटवर्किंग साईट्स, ब्लॉग इ.) त्यासाठी घेता का?
खरे सांगायचे तर विशेष अशी जाहिरात न करताही ज्या ऑर्डर्स येतात त्यांतून माझे डोकेच वर निघत नाही. परंतु यलो पेजेस मध्ये मात्र मी नियमित जाहिरात देते. फेसबुक, ब्लॉग इत्यादींचेही मनात आहे. बघूयात कसे काय शक्य होते ते!
या व्यवसायात तुम्ही घेतलेल्या खास शिक्षणाचा उपयोग कसा होतो? या क्षेत्रात होणारे नवे बदल, तंत्रज्ञान या दृष्टीने तुम्हाला तुमचे ज्ञान अद्ययावत ठेवावे लागते का?
गणवेशाच्या कामासाठी व लोकरकामासाठीही मला माझ्या शिक्षणाचा आजवर खूपच उपयोग झाला आहे. आम्हाला कॉस्च्यूम मेकिंग हा वेगळा विषयच अभ्यासाला होता. त्यानुसार वेगवेगळे पॅटर्न्स बनविणे, कापडाच्या वेगवेगळ्या पोतांप्रमाणे कपडा बनविणे याचे जे शिक्षण मला मिळाले होते त्याचा उपयोग गणवेशांसाठी झाला. काही शाळांना नेहमीचे पॅटर्न्स नको होते, त्यांना नवे काहीतरी हवे होते. तिथे मी त्यांच्या अपेक्षांना पुरी पडू शकले. मी बनविलेले नवे पॅटर्न्स त्यांना आवडले व त्यानुसार त्या शाळांचे गणवेश बेतले गेले. तसेच लोकरकामातही फॅब्रिक डिझाईनसारख्या विषयाच्या अभ्यासाचा मला खूपच फायदा झाला. त्यामुळे मशीनवर नवे डिझाईन बसवायला किंवा इंट्रोड्यूस करायला मला वेळ लागत नाही.
तरीही नवे तंत्रज्ञान आपलेसे करणे, वेळोवेळी प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे आपले या क्षेत्रातील ज्ञान अद्ययावत ठेवणे हे तर करावेच लागते! नव्या मशीनरीबद्दल डीलर्सशी सतत संपर्कात राहावे लागते. अधिकाधिक स्वयंचलित यंत्रणा राबविणे, त्यासाठीच्या मशीनरीची माहिती हेही ठेवावेच लागते.
स्पर्धा, बाजारातील नवे ट्रेंड्स, ब्रँड्स यांना तुम्ही कसे तोंड देता? तुमच्याकडील उत्पादनांची खासियत काय?
माझ्या क्षेत्रात तीव्र स्पर्धा ही आहेच! त्या दृष्टीने आपली उत्पादने उत्कृष्ट दर्जाची तर ठेवावीच लागतात, त्याशिवाय त्यांत नवनवे प्रयोग, नवी डिझाईन्स, नवी प्रॉडक्टस ही बाजारात दर वर्षी नव्याने आणावी लागतात. अर्थात हे सर्व तुम्हाला तुमच्या व्यवसायात अग्रेसर राहावयाचे असेल तर! आम्हाला सर्वात जास्त स्पर्धा असते ती लुधियाना व दिल्ली येथून येणार्या उत्पादनांकडून! कारण ही उत्पादने बाजारात घाऊक प्रमाणावर शिरकाव करतात व तुलनेने स्वस्त असतात. परंतु त्याच वेळी शिलाईची व कपड्याची गुणवत्ता पाहू गेले तर त्यात व मापात (फिटिंग, मेजरमेन्ट) आमची उत्पादने सरस ठरतात. मापाला, फिटिंगला पर्फेक्ट बसतात. त्या तुलनेत दिल्ली, लुधियाना साईडची उत्पादने कमी पडतात. तसेच आमच्या उत्पादनांचे फिनिशिंग जास्त चांगले आहे. आणि हा मला गिर्हाईकांकडून मिळालेला फीडबॅक आहे. मार्केटमध्ये बेबी वेअर क्षेत्रात माझे चांगले नाव झाले आहे. माझ्याकडील ८० % ऑर्डरी या बेबी वेअरसाठीच्या असतात. कोणत्याही ऑर्डरखेरीज मी तयार केलेल्या इतर लोकरी कपड्यांनाही हातोहात उठाव असतोच. लोक कित्येकदा माझ्या विणकाम केंद्रावर येऊन कपडे विकत घेऊन जातात. शिवाय दुकानांना पुरविलेला मालही 'लगेच संपला' म्हणून दुकानदार नव्याने ऑर्डरी देत असतात.
डिझाईन्सबाबत म्हणशील तर मी स्वतः नवी नवी डिझाईन्स, पॅटर्न्स तयार करत असते किंवा त्यांच्या मागावर असते. माझ्या अनेक मैत्रिणी फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात आहेत. त्यांनाही मी माझी डिझाईन्स दाखविते, त्यांचा फीडबॅक, सूचना घेते. त्याही नवे काहीतरी सुचवितात. तसेच या क्षेत्रातील नवी ट्रेनिंग्ज घेत राहणे हे आपले ज्ञान व कौशल्य अद्ययावत ठेवण्याच्या कामी येते.
या व्यवसायातील नफ्या-तोट्याचे गणित काय आहे?
नाशवंत वस्तूंच्या व्यवसायाच्या तुलनेत माझ्या व्यवसायात बराच फायदा आहे. एक म्हणजे कच्चा माल, जशी लोकर, घाऊक प्रमाणात घेऊन ठेवली तर ती खराब होत नाही. किंवा लोकरीचा कपडा शिवला व तो लगेच खपला नाही तरी तो खराब होत नाही. त्यात नुकसान होत नाही. लोकर तुम्ही नंतर वापरू शकता किंवा कपडा नंतर विकला जाऊ शकतो. जर तुम्हाला कपड्याची फॅशन जुनी वाटली तर त्यात दुरुस्ती, बदल करू शकता. एखादा कपडा विणला - शिवला जात असताना त्यात चूक झाली तर ते टाके उसवून तो कपडा पुन्हा शिवता येतो. नवे भरतकाम, मणीकाम इत्यादी करून तुम्ही कपड्याला नवा लूक देऊ शकता. त्यामुळे एकदा विकत घेतलेली लोकर किंवा शिवलेला कपडा सहसा वाया जात नाही.
पाहावयास गेले तर तुम्ही व्यवसाय घाऊक प्रमाणावर करता, किरकोळ प्रमाणावर करता की घरगुती स्वरूपात अथवा छंद म्हणून करता त्यावर तुमच्या नफ्याचे प्रमाण अवलंबून आहे. तरी माझ्या व्यवसायात हा नफा साधारणपणे १५ ते २० % पासून ३५ % पर्यंत जातो.
हाताखाली काम करणार्या मदतनिसांची निवड तुम्ही कशी करता? त्यांना वेगळे प्रशिक्षण द्यावे लागते का?
माझ्याकडे निटिंग सेंटरवर काम करणार्या मदतनीस या सर्व बायका आहेत. आधी मी सर्व काम स्वतःच करायचे. मग हाताशी मदतनीस ठेवले. त्यांच्याही संख्येत हळूहळू वाढ होत गेली. व्यवसायाच्या सुरुवातीला मला या कामात मदत करायला ओळखीतील अनेकजण पुढे आले. त्यावेळी मशीनवर विणकाम कसे करतात हे जाणून घेण्याची, ते शिकण्याची अनेक स्त्रियांना उत्सुकता असते हे माझ्या लक्षात आले. मग मी माझ्या सेंटरवर विणकामाचे प्रशिक्षण वर्गच सुरू केले. बायका यायच्या, मशीनवर विणकाम शिकायच्या. त्यांच्यातीलच काहीजणींना मी जॉबसाठी विचारणा केली. अशा तर्हेने प्रशिक्षण वर्गातून मला मदतनीस मिळत गेले. मी शाळांचे गणवेश शिवण्याचेही मोठ्या किंवा घाऊक प्रमाणावर काम करते. त्या काळात माझ्या सेंटरवर लोकांची अगदी रीघ लागलेली असते. तेव्हाही अनेकजण इथे चालणारे काम पाहतात, त्यात त्यांना रस असतो किंवा उत्पन्न होतो. त्यांना मशीनवर विणकाम शिकायचे असते. मग मी त्यांना तसे विणकाम शिकविते. त्यातील कोणाला अर्ध वेळ नोकरीची गरज असते, कोणाला पूर्ण वेळ नोकरी करायची असते, तर कोणाला या कामाची खूप हौस असते. अनेक बायकांना घरच्या जबाबदार्या सांभाळून जमेल तसे हे काम करण्यात रस असतो. मग मी प्रशिक्षण घेतलेल्या व हे काम पुढे करू इच्छिणार्या स्त्रियांना घरी काम देते. किंवा त्या सेंटरवर येऊन तेथील मशीनवर काम करण्यास तयार असतील तर त्यांच्या वेळेनुसार ते मशीन त्या व्यक्तीस उपलब्ध करून देते. त्या स्त्रिया इथे येऊन विणकाम व इतर शिवणकाम करतात. त्यांनी केलेल्या कामाची व तासांची मी वेगळी नोंद ठेवते व त्याप्रमाणे त्यांचे पगार होतात. तसेच काही गरजू स्त्रियांना परिस्थितीअभावी प्रशिक्षण वर्गाचे शुल्क भरणे शक्य नसते. त्यांना मी विनामूल्य प्रशिक्षण देते व नंतर त्या बदल्यात ह्या स्त्रिया माझ्याकडे तेवढे काम करतात. एकदा का पुरेसे शिक्षण मिळाले की त्यांच्या इच्छेनुसार त्या पुढे माझ्याकडे नोकरीलाही राहतात किंवा त्यांच्या घरूनही काम करू शकतात. अशा तर्हेने मी स्त्रियांना घरी काम करण्याचा किंवा माझ्या सेंटरवर येऊन काम करण्याचा, असे दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ते त्यांना जास्त सुटसुटीत पडतात.
अगोदर माझ्याकडे शिकायला व नोकरी करायला पुण्याच्या वेगवेगळ्या भागांतून बायका यायच्या. पार हडपसर, औंध इत्यादी भागांतून या बायका बसने प्रवास करून यायच्या. सध्या मात्र इथे नोकरीला कसबा, नारायण, शनिवार, रास्ता पेठ इत्यादी जवळपासच्या भागातील बायका आहेत. ते त्यांना व मलाही जास्त सोयीचे पडते.
कामाच्या ठिकाणी मी एक पथ्य कटाक्षाने पाळलेले आहे. ते म्हणजे मी स्वतः वेळेचे बंधन पाळते व इतर बायकांनाही पाळायला लावते. ठराविक वेळात ठराविक काम पूर्ण झालेच पाहिजे. तिथे कोणतीही निमित्ते, घरगुती सबबी चालत नाहीत. शिवाय कामाच्या गुणवत्तेवर देखील माझे बारीक लक्ष असते. कामाची गुणवत्ता कायम राहिली तरच गिर्हाईक तुमच्याकडे पुन्हा येते.
तुम्ही शाळांचे गणवेशही शिवता ना? या कामाची सुरुवात कशी झाली?
माझी आई खूप वर्षे पुण्यातील हुजूरपागा व कन्याशाळा या दोन प्रसिद्ध शाळांचे गणवेश कंत्राटी पद्धतीने शिवून द्यायचे काम करायची. तिच्याबरोबर मीही तिच्या मदतीला जायचे. अगदी शाळेत जाऊन मुलींची मापे घेण्यास मदत करण्यापासून ते कापडाची दुकाने पालथी घालून गणवेशासाठी कापडाचा तागा निवडणे, त्यानुसार इतर खरेदी करणे वगैरे अनेक बाहेरची कामे मी त्यातून शिकत गेले व नंतर स्वतंत्रपणे हाताळत गेले. काही वर्षांनी वयपरत्वे आईने या व्यवसायातून निवृत्त व्हायचे ठरविले. मग तिच्या जागी मी हे काम संपूर्णपणे हाताळू लागले. अर्थात त्यासाठीच्या आवश्यक बाबींची पूर्तता करूनच!
काय आवश्यकता असते यासाठी?
दरवर्षी या शाळा त्यांच्या अटींमध्ये बसणाऱ्या शिवण व्यावसायिकांकडून गणवेशाच्या कामासाठी निविदा मागवतात. तुमची निविदा संस्थेद्वारे संमत झाली की त्याप्रमाणे तुम्हाला त्या शाळेच्या गणवेशाचे कंत्राट मिळते. अर्थातच त्या त्या शाळेचे विशिष्ट नियम, अटी इत्यादी असतातच! ते सर्व पूर्ण करून किंवा पाळून त्याप्रमाणे काम करावे लागते.
कसे असते या कामाचे स्वरूप?
शाळेची निविदा भरल्यावर आम्ही कापडाच्या पुरवठादारांना किती प्रमाणात आमची ऑर्डर असेल याची पूर्वकल्पना देऊन ठेवतो. त्याप्रमाणे ते तितक्या ताग्यांची तयारी ठेवतात. तसेच शिवण कामगार, टेलर, मास्टर टेलर यांची आमची जी टीम असते त्यांनाही पूर्वकल्पना दिलेली असते. ते त्याप्रमाणे वेळ काढून ठेवतात. जर निविदा संमत झाली तरच हे काम मिळणार आहे हेही त्यांना ठाऊक असते. त्या दरम्यान आम्ही साहजिकच इतर कपड्यांच्या ऑर्डरी कमी घेतो, किंवा त्यांपेक्षा गणवेशाच्या कामावर जास्त लक्ष देतो. एकदा का ऑर्डर हाती आली की आमची टीम कामाला लागते. कापडाच्या पुरवठादाराकडून योग्य रंग, पोत, मटेरियलचे कापडाचे तागे खरेदी करून ते नमुने शाळेकडून संमत करून घ्यायचे व दुसरीकडे शाळेत जाऊन ठराविक वेळात मुलामुलींची मापे घेणे, ती मापे शिवणकाम करणार्या टीमला सुपूर्त करणे हे काम असते, जे शक्यतो मीच हाताळते. काही वेळा शाळांना गणवेशाचे नवे डिझाईन, पॅटर्न्स हवे असतात. काहीतरी नावीन्य हवे असते. त्यानुसार नमुने तयार करून ते संमत करून घ्यायचे व ते कपडे शिवायचे असे काम असते. तसेच सोबत पैशाचे हिशेब, पालक-शिक्षकांशी समन्वय हेही असतेच! त्या काळात आम्ही सगळेजणच जवळ-जवळ १८-१८ तास काम करत असतो. हे काम दीड-दोन महिने चालते. पण सर्व टीम सांघिक भावनेने, प्रेरणेने काम करते. या काळात कोणी सुट्टी घेत नाही. घरच्या सबबी सांगत नाही. ह्या सर्व लोकांच्या साथीने ते काम शक्य होते. असे माझ्या टीममध्ये सध्या दहा लोक आहेत.
तुम्ही फक्त गणवेश शिवता की त्याबरोबर अन्य अॅक्सेसरीजही शिवता?
ते शाळे-शाळेवर अवलंबून आहे. परंतु गणवेशासोबत अनेक शाळांचे कवायतीचे कपडे, पी. टी. शॉर्टस्, कापडी पट्टे, स्वेटर, स्कार्फ, मोजे हेही मागणीनुसार मी शिवून / विणून देते. कित्येकदा त्यांना त्या कपड्याचे खास असे डिझाईन हवे असते, किंवा शाळेचा लोगो त्यावर हवा असतो - त्याप्रमाणे त्यांच्या पसंतीस उतरतील व विद्यार्थ्यांना वापरायला सोयीचे पडतील असे कपडे मी देत असते. या ऑर्डरी मोठ्या संख्येत असतात व ठराविक, मर्यादित काळात पूर्ण करायच्या असतात. त्यामुळे ते आव्हानही असतेच!
कोणकोणत्या शाळांच्या गणवेशाचे काम तुम्ही करता?
सध्या मी हुजूरपागा, कन्याशाळा, कर्वेनगरची अभिजात शाळा, हडपसरची वंडर किड्स शाळा या शाळांचे गणवेशाचे काम घेते. त्यातील हुजूरपागा व कन्याशाळेचे काम मी गेली कित्येक वर्षे सातत्याने करत आहे. त्याच गुडविलवर हुजूरपागेची कात्रज शाखा जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याही शाखेच्या गणवेशांचे काम मला मिळाले.
या व्यवसायात तुम्ही काय पथ्ये पाळता?
अगोदर सांगितल्याप्रमाणे मी वेळेच्या गणिताबद्दल काटेकोर आहे. स्वतःच्याबद्दलही व हाताखाली काम करणार्या कारागिरांबद्दलही! त्यांनी वेळेत काम पूर्ण करावे ही माझी अपेक्षा असते व त्या दृष्टीने प्रयत्नही असतात. मी स्वतः घरातील व्याप, चिंता, सबबी व्यवसायाच्या ठिकाणी आणत नाही व त्यांना आणू देत नाही. तसेही पाहिले तर या गोष्टी कोणाला चुकतात? परंतु इथे थोडे कडक धोरण ठेवावेच लागते हा माझा अनुभव आहे.
तसेच हातातील ऑर्डरी दिलेल्या वेळेत, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता पूर्ण करण्यावर मी भर देते. तिथे घासाघीस नाही.
माझ्या आईने मला व्यवसायाच्या सुरुवातीस एक कानमंत्र दिला होता, तो मी आजही पाळते. तो म्हणजे 'मुंगी होऊन साखर खायला शिकलं पाहिजे.' काहीही झाले तरी समोरच्या व्यक्तीशी जिभेवर साखर ठेवून बोलायचे. ते तंत्र या व्यवसायात जमावेच लागते. आपले बोलणे समोरच्या व्यक्तीला गोड शब्दांमध्ये पटवून द्यायचे. कारण गिर्हाईक हा राजा असतो व असे गोड बोलण्याने जे साध्य होते ते आपला संताप, राग दाखवून साध्य होत नाही. शिवाय माझ्या व्यवसायातील बरेचसे प्रतिस्पर्धी हे गोड बोलण्यातील मुरलेले लोक आहेत. ते आपल्या गोड बोलण्यातून गिऱ्हाईक बांधून ठेवतात. त्यांच्याशी स्पर्धा करताना मला या गोष्टीचे भान ठेवावेच लागते. मराठी माणसाने याबाबतीत त्यांच्याकडून शिकायला हवे.
तुम्ही वर्क - लाईफ बॅलन्स कसा ठेवता?
इथेही वेळेचे गणित पाळल्याचा फायदा होतो. माझे घरकाम ठराविक वेळेतच संपवायचे व व्यवसायाच्या कामासाठी ठरलेल्या वेळेला मी घराबाहेर पडायचे हे सुरुवातीपासून ठरविले आहे. व्यावसायिक कामाच्या इथेही ठरलेल्या वेळेहून जास्त वेळ काम करण्यापेक्षा त्या वेळेत ते काम पूर्ण करण्याकडे माझा कटाक्ष असतो. घरगुती इमर्जन्सीजच्या वेळी यात जरा बदल करावा लागतो. परंतु माझे कामाचे वेळापत्रक तितपत लवचिक आहे. तसेच कधी व्यवसायाच्या ठिकाणीही अनपेक्षित इमर्जन्सी उद्भवली तर घरची मंडळी समजून घेतात. एकदा घरी गेले की तिथे मी व्यवसायाच्या व्यापांना आणत नाही. तो वेळ माझा व माझ्या कुटुंबियांचा असतो.
या कामात तुम्हाला प्रोत्साहनाचे, उत्तेजन देणारे किंवा मजेशीर अनुभव मिळतात का?
हो तर! मिळतात ना! सर्वात पहिल्यांदा सर्व नातेवाईक, सुहृद, परिचित यांनी मी व्यवसाय सुरू करते आहे म्हटल्यावर माझ्यात दाखविलेला विश्वास व त्यांनी त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे दिलेले प्रोत्साहन याबद्दल दादच द्यावी लागेल. अगदी पहिल्या दिवसापासून या लोकांनी मला कपड्यांच्या, विणकामाच्या ऑर्डर्स दिल्या आहेत आणि आजही तितक्याच जोमाने देत आहेत.
प्रोफेशनली म्हणशील तर माझ्यासारखे टेक्सटाईलमधील खास शिक्षण घेऊन पूर्ण तयारीनिशी या व्यवसायात उतरणार्या स्त्रिया पूर्वी तशा कमीच असायच्या. मी जेमतेम २५ - २६ वर्षांची असेन तेव्हा या क्षेत्रातील दिल्लीचे एक ज्येष्ठ व मान्यवर डीलर पुण्यात आले होते व त्यांनी माझ्याबद्दल, माझे शिक्षण - अनुभव व काम यांबद्दल ऐकून या कामासंदर्भात माझी खास मुलाखतच घेतली होती. माझ्या कामाची विस्ताराने माहिती घेतली होती. त्यांच्यासारख्या माणसाने दाखविलेला विश्वास, तो अनुभव मला खूप प्रोत्साहक ठरला. तसेच या क्षेत्रात तुमचे काम चांगले असेल तर लोक लगेच तुम्हाला त्याची पावती देतात हे फार सुखावह आहे. कर्णोपकर्णी मिळणारी प्रसिद्धी, तुमच्या व्यवसायाची त्यातून होणारी जाहिरात, त्यानुसार मिळणाऱ्या मोठ्या ऑर्डर्स हेही मोठे प्रोत्साहनच ठरते.
मजेशीर अनुभव म्हणशील तर एक गमतीदार किस्सा आहे. माझ्याकडे लोकरीचे खूप छोटे छोटे तुकडे उरलेले असतात. तर माझ्या एका मित्राने मला चॅलेंज दिला की तू या तुकड्यांचा एक स्वेटर शिवून दाखव! मग मी त्याला अट घातली की तो स्वेटर घालून त्याला त्याच्या कॉलेजात जायला लागेल! तर त्याने पुन्हा एक अट घातली की जर तो असा स्वेटर घालून कॉलेजात गेला तर तो स्वेटर मी त्याला फुकट देईन म्हणून!!! अशी अटींची साखळी वाढतच होती. शेवटी तो तुकड्या-तुकड्यांच्या लोकरीचा स्वेटर मी एकदाचा शिवला. कल्पना कर, त्या स्वेटरमध्ये मिळतील तेवढ्या प्रकारच्या, रंगाच्या, पोताच्या व जाडीच्या लोकरी एकत्र गुंफल्या होत्या! मजा म्हणजे माझा मित्रही तो स्वेटर घालून लेक्चरसाठी आपल्या कॉलेजला ... बी. जे. मेडिकलला गेला.... आणि तो पैज जिंकल्यामुळे मला तो रंगीबेरंगी स्वेटर त्याला फुकट द्यावा लागला!!! आजही आम्ही ते सारे आठवून खूप हसतो.
भविष्यातील योजना/ प्लॅन्स काय आहेत?
डोक्यात बरेच प्लॅन्स आहेत. त्यांवर अद्याप काम सुरू केले नाहीये. पण मला व्यवसायातील ऑटोमेशन लेव्हल वाढवायची आहे. भविष्यात इतर देशांमध्ये मी शिवलेल्या कपड्यांची निर्यात करायची आहे. व्यवसायाचा विस्तार करायचा आहे. ऑनलाईन सेलसाठी आवश्यक यंत्रणा, कॅटलॉग इत्यादी करायचे आहेत. त्यातून बिझनेस वाढवायचा आहे. बघूयात कसे कसे पुढे जाता येते ते!
तुमच्या कामात तुम्हाला प्रेरणा देणार्या कोणी व्यक्ती आहेत का?
माझी आई ही माझी पहिली प्रेरणा आहे. तिनेच मला या वाटेवर चालण्यासाठी प्रोत्साहन दिले, मार्गदर्शन केले, सल्ला दिला, मदत केली. तिने ज्या संघर्षमय परिस्थितीत स्वतःचा व्यवसाय यशस्वी करून दाखवला त्याकडे पाहिल्यावर मला जाणवते की आपल्याला त्या मानाने तुलनेत काहीच संघर्ष नाहीत!! आईखेरीज माझ्या क्षेत्रातील, या व्यवसायातील जे दिग्गज आहेत त्यांच्याकडे पाहून मला कायमच प्रेरणा मिळत राहते.
या व्यवसायातील नवागतांना काय सल्ला द्याल?
पहिली गोष्ट म्हणजे पेशन्स अजिबात सोडायचा नाही. भरपूर पेशन्स ठेवावा लागतोच! शिवाय आपल्या रोजच्या आयुष्यातही नवनवी कौशल्ये कशी आत्मसात करता येतील व ती आपल्याला या व्यवसायात कशी उपयोगात आणता येतील हे पाहायचे. आपल्याजवळील ज्ञान घासून पुसून लख्ख ठेवायचे. कौशल्ये विकसित करत जायची. मोठ्या चित्रावर नजर असली तरी त्याचबरोबर लहान-सहान बारकावेही सांभाळायचे!
----------------------------------------------------------------------------------------
आयुष्यातील निरनिराळ्या वळणांवर वाटचाल करताना आपले व्यावसायिक ध्येय निश्चित ठेवून त्या रोखाने दमदार पावले उचलणे, धाडसी निर्णय घेणे व ते अंमलात आणणे यासाठी लागणारी दृष्टी व कष्टांची तयारी संगीता गोडबोलेंच्या शब्दा-शब्दांत व कृतीत दिसून येते. शिवाय त्यांचे कलेवर, आपल्या कामावर असलेले मनापासूनचे प्रेम आणि त्याच जोडीला त्यावर घेतलेली मेहनत त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांमध्ये दिसून येते. आपल्या क्षेत्रात घडणारे बदल, तंत्रज्ञान, नव्या कल्पना इत्यादींच्या बाबतीतही त्या सजग आहेत. आपला व्यवसाय आणखी विस्तारायची स्वप्ने पाहत आहेत. त्यांना आगामी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!
-- मुलाखतकार : अरुंधती कुलकर्णी.
-------------------------------------------------------------------------------------------------------
संगीता गोडबोले यांच्याशी संपर्क खालील पत्त्यावर होऊ शकेल :
संगीता गोडबोले निटिंग सेंटर,
४२, कृष्णा सोसायटी, दुसरा मजला, गणपती चौक, लक्ष्मी रोड, बुधवार पेठ, पुणे - ४११००२.
फोन : +(९१)-(२०)-२४४५१८६८
इमेल : sangita.godbole@gmail.com
------------------------------------------------------------------------------------------------------------
** संयुक्ताच्या माध्यमातून स्त्रियांसाठी व्यक्त होण्याचे एक वेगळे व्यासपीठ मायबोलीने उपलब्ध करून दिले आहे. व्यवसाय, करियर, आरोग्य, सल्ला-मार्गदर्शन, आधार, मदत, माहिती, संवादाच्या माध्यमातून स्त्रियांना व्यक्त होण्याचे, जाणिवा प्रगल्भ करण्याचे प्रयत्न संयुक्ताच्या माध्यमातून सातत्याने चालू असतात. आज अडीचशेहून अधिक स्त्रिया संयुक्ताच्या सदस्या आहेत व या व्यासपीठाचा लाभ घेत आहेत. नव्या मैत्रिणी मिळवत आहेत. मायबोलीवरील कोणीही स्त्री सदस्या संयुक्ताचे सभासदत्व घेऊ शकते.
अकु, मुद्देसूद मुलाखत . काही
अकु, मुद्देसूद मुलाखत .
काही माणसांमध्ये स्वतःला काय आवडतंय , काय नीट जमतंय , आवडणार्या क्षेत्रात उद्योजक म्हणून स्वतःच्या पायावर उभं कसं राहायचं ह्याची इतकी उत्तम जाण असते , त्याबद्दल संगीताताईंना मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा .
अकु, प्रेरणादायी आणि नेहमी
अकु, प्रेरणादायी आणि नेहमी प्रमाणेच छान झालीये मुलाखत ..
त्यां नी केलेल्या कामाचे फोटो पण दिता आले तर छानच!
सुरेख मुलाखत. धन्यवाद अरुंधती
सुरेख मुलाखत. धन्यवाद अरुंधती
संगीताताईंना मनःपूर्वक शुभेच्छा
अरु, खूप छान झाली आहे मुलाखत
अरु, खूप छान झाली आहे मुलाखत
वेगळ्या वाटांबद्दल अशी माहिती
वेगळ्या वाटांबद्दल अशी माहिती दिली जाते त्यामुळे हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहेच. फोटो देण्याचे जमले तर अजुन बहार येईल
प्रतिसाद देणार्यांच्या
प्रतिसाद देणार्यांच्या मागणीनुसार संगीताताईंकडे असलेल्या विणकामाच्या वेगवेगळ्या मशीनरीचे व लोकरी कपड्यांचे फोटोज अपलोड केले आहेत. संगीताताईंचे अनेक थँक्स, त्यांनी वेळात वेळ काढून हे फोटो सेशन अॅरेंज केल्याबद्दल!
स्वप्ना, एक मुलगी, वेका,
स्वप्ना, एक मुलगी, वेका, शिल्पा_के, पौर्णिमा, चिनूक्स, संपदा, माधुरी१०१, अगो, अश्विनी के.... प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
वा ! वा! फोटोंसाठी धन्यवाद
वा ! वा! फोटोंसाठी धन्यवाद अकु. हे मस्तच झालं.
खूपच प्रेरणादायी आहे मुलाखत
खूपच प्रेरणादायी आहे मुलाखत धन्य्वाद.
छान प्रश्न आणि मनमोकळी
छान प्रश्न आणि मनमोकळी सविस्तर उत्तरे !
अत्यंत माहितीपूर्ण व
अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी मुलाखत.:)
अरूंधती कुलकर्णी यांनी विचारलेले प्रश्न अगदी आपल्या मनात उद्भवलेल्या प्रश्नांशी जुळतायेत अशी जाणीव प्रत्येक प्रश्नोत्तरानिशी होत रहाते. संगीताताईंचा आवड - प्रशिक्षण - लग्न - व्यवसाय हा प्रवास खुप आवडला. अनेक नवीन व्यावसायिका मैत्रीणींना प्रोत्साहन देणारी, लक्षात राहण्याजोगी सुंदर मुलाखत.
हे वाचायची संधी दिल्याबद्दल मायबोलीस अनेक धन्यवाद!
पहिल्या फोटोतील निळा स्वेटर
पहिल्या फोटोतील निळा स्वेटर सेट, लाल छोटुकला लोकरी फ्रॉक आणि तो गुलाबी बटवा मस्त आहेत!
खुप छान - आवडली मुलाखत -
खुप छान - आवडली मुलाखत - इन्सपायरिंग आहे.....
नमस्कार
नमस्कार
पुणेकरां साठी हे खूप छान माहीती आहे . तुमच्या छंद आणी व्यवसायला माझ्या हार्दिक शुभेच्छा
Pages