ग्रनियन रन, एक अनोखा अनुभव

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

गेल्या महिन्यात ग्रनियन (Grunion) रन अनुभवायला मिळाला. मॅरॅथॉन्सचे इतके पेव फुटले आहे की आधी तसाच हा ही एखादा रन असावा असे वाटले. पण हे सामन (Salmon) रन्सच्या जास्त जवळ आहे हे थोडी माहिती मिळवताच लक्षात आले व तिथे जायचे हे लगेच ठरविले. ग्रनियन्स हे चार-सहा इंच लांबीचे मासे दक्षिण कॅलिफोर्नीयाच्या समुद्रतटाजवळ आढळतात. तीन-चार वर्षे जगु शकणाऱ्या या माश्यांनी पुढच्या पिढीला जन्म देण्याचा एक अनोखा प्रकार उत्क्रांतीच्या वैविध्यपूर्ण विश्वाला बहाल केला आहे.

हे मासे चक्क समुद्राबाहेर येऊन वाळूवर आपला कार्यभाग साधतात व पुढच्या लाटेने परत जातात. हे असे होणे कधी सुरु झाले हे आपल्याला कधीच कळणार नाही, पण ते असे का वागतात याला मात्र शास्त्रीय कारण आहे. भरती आणि ओहोटी दररोज दोनदा होते - सुर्य-चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने समुद्राचे पाणी पृथ्वीपेक्षा जास्त ओढले जाऊन. अमावस्या आणि पोर्णिमेला या दोघांचे बल एकत्रीतपणे जास्त आकर्षण घडवते आणि त्या दोन दिवशी येणारी भरती सर्वात मोठी असते. नेमका याच गोष्टीचा हे ग्रनियन मासे फायदा उठवतात.

तो प्रकार कळताच मानवाने वेड लागल्यासारखे अमावस्या-पोर्णिमांना रात्री-बेरात्री समुद्रतटी जाणे सुरु केले. मार्चमधील पोर्णिमेला साधारणपणे भरती नंतर तासाभराने आम्ही सान पेड्रो गावातील समुद्रकिनाऱ्यावर हजर होतो. आमच्या सारखेच चार-पाचशे शौकीन किनाऱ्यालगत भलीमोठी रांग करुन हजर होते. तिथेच असलेल्या कॅबरिय्यो मत्स्यालयात किनाऱ्यावर कोणत्या दृष्याची अपेक्षा करायची हे सांगीतले आणि दाखवले गेले होते. लोकांजवळ विजेऱ्या होत्या पण त्या केंव्हा सुरु करायच्या आणि केंव्हा बंद हे ही सांगीतले होते. अनैसर्गीक प्रकाश जाणवला तर मासे येत नाहीत. वेळ जवळ येत होती तशी आमची उत्सुकता वाढत होती. कसा असेल या वेळी रन? दर वर्षी, दर दिवशी वेगळा असतो, कधी कमी तर कधी जास्त मासे दिसतात असे आमच्या मनावर खास अमेरीकन पद्धतीने बिंबवण्यात आले होते (पोर्णिमेच्या चंद्राइतके). हो, लोकांच्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या आणि कोर्टाच्या चकरा माराव्या लागल्या तर!

होते तरी काय असे तिथे? तर, एका लाटेवर आरुढ होऊन नर व माद्या किनाऱ्यावर येतात, जर पुरेसे नर आले नसतील तर माद्या परत जातात आणि नंतरच्या लाटेवर परततात. पुरेसे नर असले तर वळवळत आपल्या शेपटीने साधारण दोन-चार इंचांचा खड्डा बनवून त्यात शेपटीकडचा आपल्या शरीराचा अर्धा भाग पुरतात आणि अंडी घालतात. आजुबाजुला असलेले नर या मत्स्यकंन्यांच्या उर्ध्वांगाशी लगट करतात व या दरम्यान पुंबीज स्खलन होऊन मादीच्या शरीराचा नरसाळ्यासारखा वापर होऊन ते अंड्यांपर्यंत पोचते. अंडी ९-१० दिवस त्या बारीक रेतीच्या थराखाली तयार होतात. तोपर्यंत पुढच्या पंधरवड्यातील मोठ्या भरतीची वेळ होते. त्यावेळी नुकतीच बाहेर आलेली पिल्ले त्या लाटांवर स्वार होऊन समुद्रात जातात. पोर्णिमेला आणि अमावस्येला आणि त्या दोन्ही दिवसांनंतरच्या तीन दिवशी हे नाट्य साकारते. इथे केवळ एकाच भरतीचा संबंध नाही तर ती त्या पंधरवडयातील सर्वात मोठ्या तीन-चार भरत्यांपैकी एक हवी, आणि येवढेच नाही तर अंडी उबण्याचा कालावधी नेमका पुढची भरती येण्यापर्यंतच्या कालावधी इतकाच कसा साधला गेला असावा हे एक आश्चर्यच आहे.

मार्च ते अॉगस्टमधे हा चमत्कार दक्षिण कॅलिफोर्नीयाच्या भरपूर रेती असलेल्या समुद्रकिनाऱ्यांवर अनुभवता येतो. सामन (Salmon) रन दरम्यान ज्याप्रमाणे ते पाच-पन्नास किलोग्राम वजनाचे मासे पकडायला अस्वलांप्रमाणेच मानवी मच्छीमार पण टपले असतात त्याचप्रमाणे हे लांब बोटांप्रमाणे बारके ग्रनियनसुद्धा मोठ्या संख्येने पकडल्या जात. त्यांचे अस्तित्व आणि त्याचबरोबर हा अनोखा प्रकार राखण्याकरता म्हणून त्यांना या तीन महिन्यात पकडणे गुन्हा असल्याचे घोषीत केले गेले. त्यानंतर त्यांची संख्या स्थिरावली. आता मार्च महिन्यात फक्त स्वत:ला खाता येतील इतकेच मासे आणि निव्वळ हातांनी पकडण्याला परवानगी आहे (तुमचे वय १६ पेक्षा अधिक असेल तर मासेमारीचा परवाना असणे आवश्यक आहे). एप्रिल आणि मे मधे अजुनही हे मासे पकडता येत नाहीत.

तर असे आम्ही किनाऱ्यावर जमलो होतो. योग्य वेळ जवळ येताच मत्स्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी विजेऱ्या बंद ठेवण्याचे लोकांना आवाहन केले आणि त्यांनी सुचना करेपर्यंत मासे न पकडण्याबद्दल बजावले. आम्ही वाट पाहू लागलो. दोन-चार मिनीटांनी आलेल्या एका लाटेबरोबर एका बाजूला काही मासे आलेले दिसले. ते पहा - ते पहा असा काहीसा बऱ्यापैकी गलका झाला. पूढच्या लाटेबरोबर दूसऱ्या बाजूला काही मासे अवतरले. आणि मग दहा-बारा आले. अधुन-मधुन कमी मासे असलेल्या लाटा जरी येत असल्या (आणि ते मधूनच सुरु होत असलेल्या विजेऱ्यांमुळे पण असु शकेल) बहुतांश लाटांवर आता शेकड्याने मासे येत होते. आम्ही त्यांच्यापासून सात-आठ फूटच होतो तरी त्यांच्या छोट्या आकारामुळे सुरुवातीला तरी या किनाऱ्यावर येऊन पडणाऱ्या भेंड्यांना डोळे बारीक करुनच पहावे लागत होते. मनाची तयारी होती तरी बहूदा असे खरेच होईल यावर डोळ्यांचा विश्वास नसावा. नंतर मात्र बारकाईने पहाता रेतीत अर्धवट पूरलेल्या मत्स्यकन्या व त्यांच्याभोवती फिरणारे इतर मासे दिसु लागले.

हे चमत्कृतिपुर्ण दृष्य सगळ्यांनी पाहिल्याची खात्री करुन होतकरु, हौशी तसेच मुरलेल्या ग्रनियन कॅचर्सना हिरवा झेंडा दाखवल्या गेला. तिथे असलेले अर्धेअधिक लोक लग्गेच पुढे पळाले व हाती येतील ते मासे पकडायचा प्रयत्न करु लागले. पकडल्या गेलेल्यांमधे माद्याच जास्त असणार. हा प्रकार सुरु होताच बहूदा आपोआपच किनाऱ्यावर येणाऱ्या मास्यांची संख्या त्या दिवसापुरती कमी होत असावी. शेजारी स्थापलेल्या एका बूथवर स्थानिक वैज्ञानिक पकडलेल्या माश्यांमधून उरलेली अंडी व मिळेल तसे मिल्ट काढून घेत. प्रयोगशाळेत त्यापासून ग्रनियन्सच्या पुढच्या पिढीचे काही सदस्य मिळवले जातात आणि त्यांचा जवळून अभ्यासही होतो. काही मिनीट तो प्रकार न्याहाळून पुन्हा ग्रनियन रन पहायला यायचे अशी मनाशी खूणगाठ बांधत आम्ही परतलो.

लॉस एॅंजलिसवासी कॅबरिय्यो मत्स्यालयात याबद्दल अधिक माहिती मिळवून शेजारील समुद्रकिनाऱ्यावर हा अद्भूत प्रकार प्रत्यक्ष अनुभवू शकतात. पुढचे ग्रनियन रन ८, २३ एप्रील, ७ मे, ५, २१ जून आणि २० जुलैला आहेत. http://www.cabrillomarineaquarium.org/education/programs-individual-fami...

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

केवळ अद्भुत ! ह्या ग्रनियन रन च्या काळात ह्या समुद्र किनार्‍यावर लोकांना फिरायची पण बंदी असेल ना?

जबरीच.......

तिथे असलेले अर्धेअधिक लोक लग्गेच पुढे पळाले व हाती येतील ते मासे पकडायचा प्रयत्न करु लागले.>>>> पण या हौशी / बघ्यांना ही परवानगी कशी देतात ? याचा त्या माश्यांच्या प्रजोत्पादनावर परिणाम नाही का होत ?

माश्यांची संख्या स्थिरावली असल्याने एप्रिल-मे सोडून इतर वेळी मासे पकडल्याने फरक पडत नाही.

भरती-ओहोटीच्या वेळा त्या विशिष्ट दिवसांना उशीरा असल्याने लोक तेंव्हा किनार्‍यावर गेले तरच फरक पडणार, तेही, हे मासे सगळीकडे असतात असे नाही. बहुतांश लोकांना या बद्दल माहीत पण नसते. आम्हाला इथे राहून एक तप झाले आणि या वर्षी पहिल्यांदाच ऐकले या प्रकाराबद्दल.

अमेझिंग. असे काही प्रकार ऐकले की रँडम म्यूटेशन्स अन सर्व्हावयल ऑफ द फिटेस्ट पेक्षा इंटेलिजंट डिझाइन वर थोडातरी विश्वास ठेवावा असे वाटते Happy

मस्तच माहिती!! ८चे हुकले आता २३ला बघू जाऊन आम्ही.. इथे हे लिहील्याबद्दलही खूप धन्यवाद. आम्हालाही एक तप झाले असते तरी पत्ता लागला नसता असं काही असतं याचा! Proud

Pages