माय डॅडी द स्ट्रॉंगेस्ट

Submitted by निरंजन on 30 March, 2012 - 09:43

प्रत्येक लहान मुलाला आपल्या वडलांबाबत प्रचंड अभिमान असतो. घरात त्याला आपल्या वडलांचा अधार वाटतो पण काही अभागी मुलांना वडील असुन त्या वडलांबद्दल अभिमान वाटावा अस ऎकायला मिळत नाही. अनेक कारण असतात त्यासाठी. कधी कधी वडिल खरच कोणतच चांगल काम करत नाहीत. कधीकधी घरातल वातावरण तस असत. आई वडलांची भांडण असतात व त्यामुळे आई सतत वडलांबद्दल वाईटच बोलत असते.

नुकताच मला एक अनुभव आला.

माझ्याबरोबर पूर्वी काम करणारा एक माणूस मला रस्त्यात भेटला. अतिशय हुशार असा हा माणूस, माझ्या आधीच्या कंपनीत प्युन म्हणून लागला होता. बघता बघता संगणकाच रिपेअरिंग, थोडफ़ार सॉफ़्टवेअर हा थोड्या अवधीत शिकला होता. अत्यंत प्रामाणिक असलेल्या या माणसात सर्व गुण ठासुन भरलेले होते. फ़क्त एकच दुर्गुण या गृहस्थात होता ज्यामुळे त्याचे सर्व गुण फ़ुकट गेले होते तो म्हणजे हा दारुडा होता. अनेकवेळा मी त्याला खुप झिंगुन लडबडत चालताना पाहिलेल आहे. आज तो शुद्धीवर दिसला, म्हणुन त्याची चौकशी करावी अस वाटल. मला त्यानी रस्त्यातच नमस्कार केला.

आपल्या ३-४ वर्षाच्या लहान मुलाला घेऊन तो चाललेला होता. बाप व मुलगा दोघेही अनवाणी व विटक्या कपड्यात होते. बापाचा चेहरा दारुमुळे सुजलेला होता. मुलाला बहुतेक २-४ दिवस आंघोळ घातलेली नसावी. कपडे फ़ाटके व मळलेले होते. केस कोरडे व रखरखीत दिसत होते. मी मुलाकडे बघितल, लक्षात येत होते ते त्याचे चकाकणारे काळॆभोर, पाणीदार व मोठे डोळॆ. ते डोळे भराभर आजुबाजुचा परिसर न्यहाळात होते व मिळेल ते शिकत होते. त्याच्या बापासारखाच हाही खुप हुशार असावा. चेहरा खुप तरतरीत व बोलका होता. मी माझ्या नकळत खाली वाकलो आणि त्याला उचलुन घेतल. आणि त्याचा बाप नको नको म्हणत असता जवळाच्या दुकानातुन एक बिस्किटाचा पुडा घेऊन त्या मुलाला दिला.

त्या मुलाला म्हणालो "तुझा बाप माझा खुप चांगला मित्र आहे, खुप हुशार व प्रामणिक आहे तो. त्याच्यासारखाच हो बर का ! " तो मुलगा इतका गोड हासला. आणि त्यानी अभिमानानी आपल्या बापाकडे पाहिल. काही न बोलता मित्र मुलाला माझ्या कडेवरुन घेऊन निघुन गेला. मला वाट्ल मी बोलताना काही चुक केली की काय.

काही दिवस मधे गेले आणि तो मित्र माझ्या घरी आला. आज त्याचा चेहरा कमी सुजलेला वाटला. मला म्हणाला "काका, त्या दिवशी तुम्ही मला रस्त्यात भेटलात व मुलाला म्हणालात की ’तुझा बाप खुप हुशार व प्रामाणिक आहे’ हे ऎकल्यावर मुलानी माझ्याकडे इतक्या अभिमानानी बघितल की मला ती नजर सहनच झाली नाही. घरी जाऊन त्यानी सर्वांना सांगितल की आजोबा म्हणत होते की बाबा खुप हुषार आहे. त्यानी पहिल्यांदाच आपल्या दारुड्या बापाबद्दल चांगल ऎकलेल असेल. त्याला मी कधी बिस्किट घेऊन दिलेल नव्हत. त्याला आयुष्यात पहिल्यांदाच संपूर्ण बिस्किटाचा पुडा मिळाला. पण काका त्यानंतर दारु पिताना मला तीच नजर दिसते. पोटात ढवळुन येत आणि मी दारु न पीता सरळ घरी जातो. काल त्याला बिस्किटाचा पुडा घेऊन गेलो. त्यानी विचारल की ’आजोबांनी दिला का ?’ मी म्हणालो "नाही रे मीच तुझ्यासाठी आणला आहे, माझ्या बाळासाठी" मित्र म्हणाला "काका, मी हे बोलल्यावर त्यानी खुप आनंदानी माझ्या गळ्यात मिठी मारली. बस मी ठरवल आहे. आता दारु नाही प्यायची."

या माझ्या मित्राचा हा निश्चय किती दिवस टिकेल कल्पना नाही. पण त्या लहान मुलाला "माय डॅडी द स्ट्रॉंगेस्ट" अस नक्कीच वाटल असेल.

आपण किती नशिबवान असतो आपल्याला जगातले सर्वात चांगले आई-बाबा मिळालेले असतात. फ़क्त ते किती चांगले होते हे ते गेल्यानंतरच आपल्याला समजत. मला माझ्या वडलांच्या आठवणी एकामागोमाग एक येत गेल्या.

मला माझ बालपण आठवायला लागल. माझ्या त्यावेळच्या जगात असलेल्या प्रत्येक संकटांमधुन मला बाहेर काढायची शक्ति असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे माझे वडिल. मी त्यांना आण्णा म्हणायचो. त्यांच्या रुंद छातीचा मला खुप अभिमान होता. या छातीवर त्यांनी आभाळ पेललेल होत.

कधी ताप आला, काही लागल व नुसता त्यांच्या हाताचा स्पर्ष झाला तरी दुखण कमी व्हायच. ती एक त्यांच्या प्रेमाची जादू होती.

लहान असताना मला आजी शबरीची गोष्ट सांगत होत्या. खुप रंगवुन रंगवुन त्यांनी ती कथा सांगितली. शबरीनी बोरं कशी आणली व प्रत्येक बोर चाखुन कस पाहिल. आणि रामानी तीची भक्ति पाहुन ती बोरं कशी खाल्ली

आजी सांगत होती
"शबरीनी रामासाठी रानातुन बोरं आणली व ती गोड आहेत का हे बघायसाठी प्रत्येक बोर ती चाखत होती"

"पण आजी तीनी बोरं का आणली ? आंबा किंवा सफ़रचंद का नाही आणला ? देव तीच्या घरी येणार तर चांगल करायच न. आपण नाही का पूजा असली की किती चांगल करतो"

"अरे शबरी गरिब होती"

"गरिब म्हणजे काय ? "

"ज्यांच्याकडे कमी पैसे असतात त्यांना गरिब म्हणतात. ते लोक बाजारातुन फ़ळ आणू नाही शकत "

" आपण गरिब आहोत का ? "

" आपणही गरिबच. पण ती खुप गरिब होती "

" पण आजी आपण नाही का आंबे, द्राक्ष व सफ़रचंद आणतो. ते गोडच असतात. आणि रामानी ती उष्टी बोर कशासाठी खायची ? मला नाही ते आवडल. किती घाण होता तो."

माझ्या त्यावेळच्या जगात गरिबी व श्रिमंती या शब्दांना स्थानच नव्हत. आपण खुप आंबे, सफ़रचंद व द्राक्ष खातो. शबरी थो्डी कमी गरिब असेल पण तरी थोडी फ़ार अशी फ़ळ आणत असेलच न. मला काही केल्या आजीनी सांगितलेली गोष्ट पटतच नव्हती. आजीच लॉजीकच समजत नव्हत. उगाच आजीशी हुज्जत घालत होतो.

आण्णा ऎकत होते. रविवार सकाळाचा दिवस होता. ते म्हणाले चल आपण बाहेर जाऊ. रान जवळच होत. त्यात मला नेल. एका आदिवासी माणसाच घर दाखवल. गरिबी काय असते हे मी पहिल्यांदाच पाहिल होत तेव्हा. मग त्याच आदिवास्याच्या मुलाबरोबर मला बोरं आणायला पाठवल. त्यावेळी पायात कोणाच्याच चपला नसायच्या. माझ्याही नव्हत्या. २-३ बोरं आणेपर्यंत पायात काटे रुतले. परत आलो. वडलांनी मला जवळ घेतल म्हणाले की

"शबरी किती गरिब असेल समजल का ?" मी होकारार्थी मान हलवली.

मग त्यांनी त्या वातावरणात शबरीची गोष्ट परत सांगितली म्हणाले

"त्या शबरीनी राम येणार म्हणून खुप बोर आणली. तीला किती बर काटे रुतले असतील ? जर रामानी बोरं उष्टी आहेत म्हणुन खाल्ली नसती तर त्या शबरीला किती बरं वाईट वाटल असत." मला एकदम ही गोष्ट पटली. रामाबद्दल आदर वाढला.

वडिल खुप मेहनत करत. मुंबईला नोकरीला जायचे. ठाणा स्टेशनवरुन आमच घर ५-६ मैल लांब होत. तेव्हढ अंतर चालत जाऊन ऑफ़िसमधे मेहनतीच काम करण साध नव्हत. शिवाय घरी आले की शेतीच काम, गुरांच काम होतच. खुप पसारा त्यांनी वाढवला होता. कमी शिकले असले तरी जे शिकले ते ब्रिटिशांच्या वेळच्या इंग्रजी शाळेत शिकले होते. इंग्रजीवर प्रभुत्व होत. ते एक चालती बोलती डिक्शनरी होते.

मुलांना जास्तीत जास्त शिकवायच व हे शिकवत असताना त्यांच्यासाठी काही तरी स्थावर मिळकत उभी करायचीच या ध्येयानी ते पछाडलेले होते. स्वतः १६ व्या वर्षी गिरणीत नोकरीला लागले, ते एक हेल्पर म्हणून आणि काम शिकत शिकत ते कॉस्ट अकाऊंटंट झाले. त्यांनी अनेक हालअपेष्टा काढल्या होत्या, पण त्याची साधी झळसुद्धा आमच्या पर्यंत येऊ दिली नाही. हे करताना नेहेमी ते आनंदी असायचे. मी तुमच्यासाठी किती करतोय, त्याची जाणिव ठेवा वगैरे कधीच लेक्चर दिल नाही. आईची त्यांना साथ होतीच पण मुख्य जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर होती.

बहिणी मोठ्या होत्या, आम्ही मुलं लहान होतो. मुलींची लग्न, बाळंतपणं, आला गेला या सर्वांच त्यांनी केल. आणि त्यातच आमची शिक्षणं केली. प्रॉप्रर्टीच्या केसेस पूर्ण केल्या. आमच्यावर कोणतीच जबाबदारी ठेवली नाही. मोठी घरं मात्र ठेवली.

मला नोकरी लागली. पहिला पगार १ तारखेला यायचा होता. त्यावेळच्या मानानी पगार बरा होता. ३० तारखेला त्यांनी नेहेमीसारख बजेट केल व मला म्हणाले

"आयुष्यात पहिल्यांदा बजेट केल आणि पैसे शिल्लक राहिलेत"

हे बोलताना त्यांच्या चेहर्‍यावर इतक समाधान होतं.

मी विचारल की "येताना तुमच्यासाठी काय आणू ?"

ते म्हणाले "मला मिठाई व नानकटाई खावीशी वाटते. मी कधीच मजा म्हणून या गोष्टी खाल्या नाहीत"

आमच्यासाठी त्यांनी स्वतःचे किती हाल करुन घेतले असतील हे प्रथमच मला जाणवल. १६ व्या वर्षापासून नोकरीकरुन स्वतःच्या आई, बहिण व भावाला सांभाळताना. व नंतर संसाराचा गाडा ओढताना त्यांनी कितीतरी कॉंप्रमाईज केलेली असतील. या उतार वयात या कर्तबगार माणसाला या साध्या गोष्टी खाव्याशा वाटत होत्या.

मी पगार मिळताच येताना सर्वात पहिल्या या दोन गोष्टी विकत घेतल्या आणि घरी आलो. आण्णा झोपलेले होते. त्यांना खुप ताप होता.

मला म्हणाले की "मी ताप उतरला की मी मिठाई व नानकटाई खाणार आहे."

दोन दिवस ताप होता व तिसर्‍या दिवशी त्यांना हार्टअ‍ॅटॅक आला. अ‍ॅंब्युलन्स बोलावली व त्यांना हॉस्पिटलमधे नेल. त्यांच्या चपला न्यायच्या राहुन गेल्या.

ते म्हणाले "निरंजन माझ्या चपला इथे आण रे"

मी घरी आलो आणि त्यांच्या चपला उचलल्या. पार झिजुन त्याच्या टाचांना भोकं पडली होती. आमच्यासाठी त्यांनी न बोलता किती खस्ता खाल्या होत्या, किती मेहनत केली होती, हे त्या चपलाच मला सांगत होत्या.

मी नोकरीच्या इंटर्व्हुला जाणार म्हणून माझ्यासाठी त्यांनी जबरदस्तिनी आणायला लावलेले नवे कोरे बुट माझ्या आधीच्या चांगल्या स्थितीतल्या बुटांच्या बाजुलाच होते आणि माझ्या पायात नवी चप्पल होती.

आजवर मला हे मिळाल नाही, ते मिळाल नाही, म्हणून खट्टू होणार्‍या मलाच मी मनातल्या मनात शिव्यांची लाखोली वाहिली.

आण्णांचा तोच एकमेव चपलांचा झिजलेला जोड माझ्या हातात होता. मी तसाच तो डोक्याला लावला मनोमन त्यांना नमस्कार केला. त्यांच्या त्या त्यागापुढे नतमस्तक झालो होतो. माझ्या नकळत माझे डोळे भरुन आले आणि अश्रु त्या पवित्र चपलांवर पडले.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खर तर मी एक कथा लिहायला घेतली होती. पण वडलांची आठवण इतकी प्रकर्षानी आली की कथा राहिली बाजुलाच आणि ह्या आण्णांच्या थोड्या आठवणी लिहिल्या गेल्या. जे लिहिल ते इथे पेस्ट केल.

आई-वडिल हे नातच काही वेगळ असत. आपण अनेक चुका करतो. प्रसंगी त्यांच मनही दुखावतो. पण ते नेहेमीच आपल हित बघत असतात. अगदी मरे पर्यंत.

आयुष्यभर आपल्यासाठी झटलेले आपले आई-वडिल आपल्याला काय देऊन जातात हे मात्र आपल्याला जाणवत ते त्यांच्या मृत्युनंतरच हे सर्वात वाईट आहे.

जेव्हा जेव्हा त्यांची आठवण येते तेव्हा तेव्हा मनात येत

शब्दांनाही कोडं पडाव
अशीही काही माणसं असतात
किती आपल भाग्य थोर
की ती आपली असतात

चांगलं लिहीलय हो. Happy
लहान असताना वडिल किंवा अन्य कोणी घरातली मोठी माणसे असतात त्यांच्याकडे आपल्या सगळ्या प्रॉबलेमांची उत्तरं असतात. नंतर आपण मोठे होतो आपल्या पायावर उभे राहतो आणि ती लोकं रिटायरमेंट वगैरेच्या जवळ जाऊन अथवा रिटायर होऊन बॅकफूटवर जातात तरी आपल्याला तोच आधार वाटत राहतो.

निरंजन, चांगलं लिहिलंत! म्हणतात ना की मुलाला बाप हीन म्हणू नये (आणि सुनेसमोर सासूस नावे ठेऊ नयेत).
आ.न.,
-गा.पै.

Sad Sad

Pages

Back to top