दुधीचा रायता

Submitted by सायो on 28 March, 2012 - 16:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दुधी, फेटलेलं दही, भाजून कुटलेलं जिरं, हिरव्या मिरच्या, फोडणीकरता तूप, जिरं, हिंग, वरुन कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, साखर, लाल तिखट.

क्रमवार पाककृती: 

दुधीची सालं काढून चौकोनी फोडी करुन घ्याव्यात. कुकरला अगदी कमी पाण्यात घालून १ शिट्टी करुन घ्यावी. (मायक्रोवेवला शिजवल्यास १० मिनिटं). शिट्टी पडली की फोडी चाळणीत घालून निथळून घ्याव्यात.
कुकरचं काम सुरु असताना एकीकडे चमच्याने दही फेटून घ्यावं. जिरं भाजून घेऊन कुटून ताजी जिरपूड दह्यात घालावी. वरुन फोडणी घालावी. हिरव्या मिरच्या हव्यात तर दह्यात घालाव्यात किंवा फोडणीत घालाव्यात. चवीप्रमाणे मीठ, साखर, हवं असल्यास किंचित लाल तिखटही घालावं. निथळलेल्या दुधीच्या फोडी घालून मिक्स करुन घ्यावं. वरुन कोथिंबीर घालावी व फ्रिजमध्ये गार होण्याकरता ठेवावं.

वाढणी/प्रमाण: 
हवं असेल तसं. नुसता खायलाही छान लागतो.
माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुधीत पाणी न घालता शिजवते मी. आणि झाल्यावर फोडी किंचित कुस्करुन घेते, पूर्ण मॅश नाही पण जस्ट एकजीव झाल्यासारखं करते.

प्रिया, 'आईला करुन दे' असं सांगण्याची सवय पुढे बरेचदा 'टडोपा' आणते हे लक्षात असु दे! Happy Light 1

सायो, अशाच प्रकारे मी भोपळ्याचं रायतं करते आता दुधीचं करुन बघते!

मी पण दुधीचे जवळपास असंच रायतं करते. भाजून कुटलेलं जिरं घालत नाही, मात्र थोडं मेतकूट घालते. छान लागतो तो फ्लेवर.

आई करते असंच दुधीचं आणि लाल भोपळ्याचं भरीत. खूप मस्त लागतं. भाज्यांपेक्षा हेच जास्त आवडतं.

सासरी लाल भोपळ्याचं मोहरी फेटून रायतं करतात, ओरिया का कायतरी म्हणतात त्याला. दुधीचं मात्र टिपिकल पंजाबी पद्धतीचं रायत करतात. ते मात्र कंटाळवाणं लागतं.

केल व खाल्ल पण. Happy मवा म्हणते तस पाणी न घालता शिजवल्या फोडी आणि एकदा चॉपर मधून काढल्या.
मस्त लागत होत एकदम चपातीबरोबर.

बस्के, तुझी रेसिपी काय होती? तू आणि प्रॅडी बहुतेक दाण्याचं कूट घालून म्हणाला होतात का? तर ते न घालता केलं. खाल्ल्यावर त्याची गरज होती असं वाटलंच नाही.

सायो, मी भाजलेलं जिरं आणि लाल तिखट न घालता अशाच पद्धतीने बनवते दुधीचा रायता. आता हे ही घालून बनवून बघेन. भाजलेल्या जिर्‍याची खरपूस चव येत असेल ना रायत्याला? Happy

फोटो मात्र टाकायला हवा होता...

होय सानी. भाजून कुटलेल्या जिर्‍याची मस्त खमंग चव येते रायत्याला. मी मैत्रिणीकडे खाल्ला तेव्हा पहिल्यांदा दुधी आहे हे ही लक्षात आलं नाही. फक्त जिर्‍याची चव लक्षात मात्र राहिली. लाल तिखट ऑप्शनल समजलं तरी चालेल. ज्यांना मिरच्यांचा तिखटपणा नको असेल त्यांनी तिखट घालावं थोडं.
फोटो पुढच्या वेळी नक्की काढेन. दिसायला दह्यातल्या काकडीच्या कोशिंबीरीसारखंच दिसतं.

सायो, माझा आवडता पदार्थ आहे हा! पोळी / फुलक्यासोबत किंवा नुस्तंही ओरपायला छान लागतं. पुण्यातल्या कृष्णा डायनिंग हॉल मध्ये ह्यात दह्याऐवजी चक्का असतो. तो प्रकारही यम्मी लागतो. फेटलेला चक्का + मोहरी पूड + मिरपूड + चवीप्रमाणे मीठ, साखर + वाफवलेला दुधी. (हव्या असल्यास इतर वाफवलेल्या भाज्या : फ्लॉवर, घेवडा, मटार, बटाटा, लाल भोपळा इ. इ.) चक्क्याऐवजी दही वापरू शकतो.

मी पण पाणी न घालता वाफवते आणि दही अगदी अर्धा चमचा किंवा नाहीच घालत. मृण/मेधाने ढबु मिरची रायत्याची कृती दिली होती साधारण तसच करते.

ते जास्तीचं पाणी पराठ्याची कणिक** भिजवताना वापरावं किंवा वरणात/आमटीत ढकलावं अशा टिप्स आल्या नाहीत का अजून ? Wink

** नॉट टु मेन्शन, बोटभर गाजराचा तुकडा किसुन....इ Proud

झकास! भाजकं जिरं घातलं नाही कधी. आता घालून बघते.

दुधीच्या मोठ्या फोडी मिर्चीचा ठेचा लावून मुरवायच्या, ग्रिलवर भाजायच्या आणि मग दही घालून सायोच्या रेस्पिचं रायतं करायचं. मस्तं लागतं.

सायो , माझ्या रेसीपीत मी दाण्याचा कूट घालते व भाजून जिरेपूड वगैरे नाही. फक्त फोडणीत जिरे,मिरच्या हिंग घालते.

दुधीच्या फोडी चौकोनी चिरुन. किसू नकोस. जिरं अगदी छोटा चमचाभरचा भाजून कुटून घे. दह्याला वास लागण्याइतपतच. पुन्हा तुपाच्या फोडणीत हवं आहेच.

मस्त..हे दुधीसाठीपण करता येतं हे मला माहीत नव्हतं..साधारण असंच मी लाल भोपळ्याचं केलंय..पण लाल भोपळा बहुतेक मला आवडतच नाही.....आता दुधीचं रायतं करून पाहीन...फ़ोटो असला असता तर आणखी मजा आली असती...

माझा आवडता पदार्थ. पण भाजलेल्या जिर्‍याची पूड ही नवीन अ‍ॅडिशन. विचारानेच तोंपासु Happy

सायो, मसस्त झाला होता रायता. फोटो राहिलाच.. कारण लेगच चेपला.
दुभो ची भाजी इतकी बोअर होते, की हा छान ऑप्शन मिळाला.. ठंकू.

मी ही काल योगायोगाने केला होता. फोटोही काढलाय पण नंतर टाकेन इथे.
ह्या वेळेपेक्षा गेल्या वेळचा जास्त छान होता असं साबांचं मत पडलं Wink

मस्त आहे पाककृती,सायो. नक्की करुन बघणार.
भाजलेली जिरेपूड केळाच्या कोशिंबीरीतपण छानच लागते. केळ मात्र पुर्ण पिकलेले घ्यावे.

मी पण असंच करते पण फोडी ऐवजी जाड किसणीवर किसून मावेत ३ मि. ठेवते. दुधी ज्यांना आवडत नाही त्यांनी पण खाल्लं. नुसत खायलाही छान लागतं.

Pages