दुधीचा रायता

Submitted by सायो on 28 March, 2012 - 16:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दुधी, फेटलेलं दही, भाजून कुटलेलं जिरं, हिरव्या मिरच्या, फोडणीकरता तूप, जिरं, हिंग, वरुन कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, साखर, लाल तिखट.

क्रमवार पाककृती: 

दुधीची सालं काढून चौकोनी फोडी करुन घ्याव्यात. कुकरला अगदी कमी पाण्यात घालून १ शिट्टी करुन घ्यावी. (मायक्रोवेवला शिजवल्यास १० मिनिटं). शिट्टी पडली की फोडी चाळणीत घालून निथळून घ्याव्यात.
कुकरचं काम सुरु असताना एकीकडे चमच्याने दही फेटून घ्यावं. जिरं भाजून घेऊन कुटून ताजी जिरपूड दह्यात घालावी. वरुन फोडणी घालावी. हिरव्या मिरच्या हव्यात तर दह्यात घालाव्यात किंवा फोडणीत घालाव्यात. चवीप्रमाणे मीठ, साखर, हवं असल्यास किंचित लाल तिखटही घालावं. निथळलेल्या दुधीच्या फोडी घालून मिक्स करुन घ्यावं. वरुन कोथिंबीर घालावी व फ्रिजमध्ये गार होण्याकरता ठेवावं.

वाढणी/प्रमाण: 
हवं असेल तसं. नुसता खायलाही छान लागतो.
माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती दिवसांपासून करायचं होतं...आज मुहुर्त साधला.. Happy
मस्त रेसिपी....वर म्हटल्याप्रमाणे नुस्तं खायला पण छान....(नुस्तंच खाल्लं म्हणण्यापेक्षा अशा प्रकारे अनुमोदन दिलेलं बरं...;) )

dudhirayta.jpg

सायो ..मस्त ..तोंपासु..
दुधी न आवडणार्‍यांना दुधीच ओळखू येणार नाही, हे बरंय Wink ..
जिरेपूड ची आयडिया आवडली

लिहू की नको ? लिहू की नको ? लिहू की नको ????
घरात आत्ताच भाजीसाठी तोंडली चिरली आणि ही रेसिपी वाचली. कल्पनेने तोंडाला पाणी सुटलं..दुधीचा रायता सारखंच आई तोंडल्याचं भरीत (रायतं म्हणा हवं तर.. ) करते.. देठं आणि टोकं काढून तोंडली प्रेशर कुकरला शिजवून घेऊन ती थंड झाल्यावर कुस्करायची.. त्यात दही, मीठ, थोडी साखर (हवी तर) ठेचलेली हिरवी मिरची, दाण्याचं कूट व कोथिंबीर घालायची. वरून तूप-जिर्‍याची फोडणी..

मी रायत्याची पाककृती टाकायची म्हणून लॉगिन केलं आणि सहज सर्च केलं तर ही रेसिपी सापडली. आता फोटो एवढे सजवले आहेत तर प्रतिसादात टाकते Happy

dudheeraayata.jpg

तिसर्‍या फोटोत हहिंमो फोडणी आणि दाण्याचा कूट दिसतो आहे Happy

शोनू, तेच की. आज दही असलेल्या पदार्थाचा फोटो टाकला उद्या कोल्ह्या-कुत्र्याचं काही तरी करून टाकतील. अधोगती हो अधोगती Proud

Pages