एक हरवलेली मैत्री..

Submitted by तुमचा अभिषेक on 17 March, 2012 - 07:28

वैताग वैताग आहे हा पाऊस, नेमके घरातून बाहेर पडायच्या वेळी दारात हजर. जा रे जा रे पावसा तुला देतो पैसा, पण ऐकतोय कसला. जरा कमी झाला तर निदान रिक्षास्टॅंड पर्यंत तरी जाता येईल. उगाच तेवढ्यासाठी म्हणून छत्री रेनकोट सांभाळायची झंजट नकोय. बाकी एकवेळ ते परवडेल, पण एकदा का हिची कधीपासून सांगतेय गाडी घ्या ची कॅसेट सुरू झाली की गाडी घसरलीच म्हणून समजा. उगाच मूडचा कचरा नकोय. किती दिवसांनी आज मस्त आऊटींग प्लॅन केलीय. मप्टीप्लेक्समध्ये सिनेमा, त्यानंतर मॉलमध्येच थोडीफार विंडो शॉपिंग, डोळे आणि मन भरून पावले की उदरभरणाची सोय जवळच्याच ओपन रेस्टॉरंटमध्ये. नेहमीचे आपले कोपर्‍यातले टेबल आणि इकडच्या तिकडच्या गप्पा.. आज तर सिनेमावरच रंगतील.. शेवटी शाहरुखचा आहे, माझा आवडता तर हिचा नावडता. कशी तयार झाली देव जाणे. बरेच दिवसांनी त्याचा सिनेमा येतोय म्हणून असावे. बाकी या शाहरूखला सुद्धा हल्ली आमीरचेच वारे लागले वाटते. बहुधा आय.पी.एल मध्येच जास्त व्यस्त झाला असावा. पण ही कुठे एवढा वेळ बिझी आहे, "ए चल ग लवकर, किती मेकअप-शेकअप करशील, समोर प्रियांका चोप्रा असताना तुला कोणी बघणार नाहीये तिथे." .. आह..!! प्रियांका चोप्रा..! तिचे सिनेमात असणे म्हणजे माझ्यासारख्या शाहरूख फॅनला पण बोनसच होता. ट्रेलर मध्ये काय चिकणी दिसत होती बया. सिनेमा बंडल निघाला तरी अर्धे पैसे वसूल याची फुल्ल ग्यारंटी.!

यार, या रिक्षावाल्यांचा पण संप आहे का आज. नको तेव्हा मार्केट मार्केट गणेशनगर गांधीचौक करत अंगावर येतात, पण आज एक दिसेल तर शप्पथ. शाहरूखच्या पिक्चरची स्टार्ट म्हणजे भारताची बॅटींग सुरु असताना सचिन सेहवाग खेळत असलेल्या पॉवरप्लेची पहिली पंधरा षटके. कसेही करून वेळेवर पोहचा पण त्याची एंट्री चुकता कामा नये. तरी नशीब, सहाच डोक्यात ठेऊन निघालेलो पण शोचा खरा टाईम सव्वासहा होता. पाचेक मिनिटे आधीच पोहोचलो. अजून पूर्ण अंधार केला नव्हता म्हणून बरे, जागा शोधायला जास्त त्रास झाला नाही. तसेही बाल्कनीमध्ये प्रिमियर गोल्डच्या फक्त चार रांगा होत्या. आपला कॉलेजच्या जमान्यापासूनचा एक उसूल होता, जर सिनेमा थिएटरातच बघायचा तर मग फुल्ल शानसे नाहीतर केबलवाला झिंदाबाद. हे स्टॉल-बिल मध्ये बसून बघणे आपल्याला कधी जमलेच नव्हते.

अजून जाहीरातीच चालू होत्या. एवढा वेळ हिला सिनेमाची सुरुवात चुकते की नाही याचे जराही टेंशन नव्हते पण आता जाहिराती देखील अश्या आवडीने बघत होती, जणू काही पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावरची चलचित्रे बघत होती. माझी नजर मात्र भिरभिरत होती.. नेहमीप्रमाणेच.. सवयीप्रमाणेच.. पुढे कोण बसलेय, मागे कोण बसलेय, कोणाचे डोके तर मध्ये येत नाहिये ना. आपण फॅमिली बरोबर आलो आहोत, बाजूला एखादा टवाळखोर ग्रुप तर नाहिये ना. सिनेमात मन नाही रमले, वा एखादे गाणे नाहीच बघावेसे वाटले, तर सहज नजर टाकायला म्हणून आजूबाजुला एखादे प्रेक्षणीय स्थळ......... अन ईतक्यातच, माझी नजर एका २८-३० वर्षाच्या मुलावर.. अंह.. सद्ग्रुहस्थावर पडली. चेहरा साईड अ‍ॅंगलने ओळखीचा वाटत होता पण प्रकाश पुरेसा नसल्याने खात्रीने सांगता येत नव्हते. शाळा सोडून आज १४ वर्षे झाली होती. त्या नंतरही ३-४ वर्षे प्रसन्ना माझ्या संपर्कात होता. कधीतरी भेटणे व्हायचे, वर्ष सहा महिन्यातून एखादा फोन. पण गेल्या ६-७ वर्षात काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. ते थेट आज दिसत होता. चेहरा बराच बदलला होता त्याचा. कित्येक जण मला बोलायचे, आजही तू सोळा वर्षांचा बछडा वाटतोस यार, पण हा मात्र अकाली प्रौढ झाल्यासारखा वाटत होता. बरोबर एक मुलगी होती. बायकोच असावी. दुसरे काही असण्याची शक्यता नव्हती, आजही तसाच बावळट असणार तो. त्या वयातही एखाद्या मुलीकडे पाहून त्याला कधी काही वाटले नव्हते, तर आता कसल्या मुली फिरवतोय. एक-दोन वर्षापूर्वी त्याच्या लग्नाची बातमी कानावर आली होती. तसा सिद्धूला मेल ही आला होता. लग्न झाल्यावर दहा-एक दिवसाने त्याने चेक केलेला. माझ्याकडे तर त्याचा मेल आय-डी देखील नव्हता. मोबाईलचा तेव्हा जमाना नव्हता. माझ्याकडे तरी बर्‍याच उशीरा आला. मध्यंतरी तो उच्च शिक्षणासाठी बाहेर गेलेला, हे ही इथून तिथून कानावर आलेले, त्याचे विमान उडाल्यानंतरच समजलेले. शाळेतील आमच्या ग्रुपमधील माझा सर्वात खास मित्र, पण आज त्याच्याबद्दल मला दुसर्‍यांकडून माहीती मिळत होती. अरे तुझा तो शाळेतला लंबू मित्र, काय नाव त्याचे.. हां.. प्रसन्ना.. आहे कुठे तो सध्या.. असे कोणी विचारले की माझ्याकडे उत्तर नसायचे. मग समोरचाच मला त्याच्याबद्दल काही सांगायचा जे मला माहीत नाही हे कबूल करायला लाज वाटावी.. चलता है, तसे मी तरी आजवर कुठे त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केलेला. या फेसबूक-ट्विटरच्या जमान्यात खरे तर ते सहज शक्य होते. पण नाही जमलं.. दुरावलेल्या नात्यांमध्ये नेहमी समोरून पाऊल उचलले जायची वाट आपण का बघतो.. त्यालाही माझ्याबद्दल इथून तिथूनच समजत असणार आणि तो ही आज माझ्याबद्दल असाच विचार करत असणार, जसे आज मी त्याच्याबद्दल करत होतो..

पण आज... आज मात्र अगदी जवळ बसला होता. पटकन हाक मारावीशी वाटत होती. ते देखील प्रसन्ना न बोलता ‘ए पश्याss फुसक्याs लंबूटांग’ करत ओरडावेसे वाटत होते. भले इतक्या वर्षांनी माझा आवाज ओळखणे शक्य नसले तरी हे शब्द त्याच्या कानी पडताच समजावे की कोणीतरी आपलाच शाळामित्र पुकारतोय. पण ही इच्छा तशीच दाबून ठेवली. समोर सिनेमा सुरू झाला होता. त्याच्याबरोबर त्याची बायको होती. मी सुद्धा एकटा नव्हतो. सिनेमा सुरू झाल्याने एक प्रकारची शांतता जाणवत होती, जिचा भंग करायची हिम्मत माझ्या नव्यानेच बनत चाललेल्या पांढरपेश्या व्यक्तीमत्वात नव्हती. ईतक्यात ही म्हणाली, "बघ रे, आता तुझ्या शारुकची एन्ट्री होईल". इतरवेळी मी हिला म्हणालो असतो, "चल हट, मी तर प्रियांकाच्या एन्ट्रीची वाट बघतोय." पण आज नुसतेच ‘ह्म्म’ केले. थोड्याच वेळात थिएटर शिट्ट्यांच्या आवाजाने दणानून उठले. कदाचित झाली असावी एन्ट्री. पण मी मात्र फ्लॅशबॅकमध्ये गेलो होतो.

सहावी ‘ब’ मधून मी सातवी ’अ’ मध्ये प्रवेश केला. वर्ग बदलला तसे वर्गमित्र बदलले. एकाच वर्गातील म्हणून वर्गमित्र नाहीतर मैत्री तशी अजून कोणाशी झाली नव्हती. पहिल्याच दिवशी वर्गशिक्षिका देशमुख बाईंनी सर्वांना आपापल्या मित्रांबरोबर हवे त्या जागी बसायची परवानगी दिली. नवीन मुलांमध्ये चटकन मिसळायची सवय नसल्याने मी मात्र एकटाच मागे राहिलो. पश्या त्या दिवशी आला नव्हता. त्यामुळे उरलेसुरले आपापसात या हिशोबाने दुसर्‍या दिवशी बाईंनीच आमची जोडी लावून टाकली. पण हीच जोडी पुढे जाऊन आपल्या डोक्याला ताप होणार आहे याची त्यांनी कल्पना केली नसावी. महिन्याभरातच जैसे को तैसा मिला म्हणत आमचे छान जमले. बंडखोरी ही आम्हा दोघांची वृत्ती नसून स्वभावाचाच एक पैलू होता. शाळेत आपण फक्त शिकायलाच येत नाही यावर आम्हा दोघांचाही ठाम विश्वास होता. शाळा म्हटले की शिस्त आली आणि शिस्त म्हणाले की नियम हे आलेच, पण प्रत्येक नियम हा एकदा ना एकदा तरी तोडलाच गेला पाहिजे हा नियम आम्ही दोघे काटेकोरपणे पाळायचो. आमच्या पुढच्या बाकावर सिद्धेश आणि सुयश बसायचे. जशी आमची एक जोडी तशी त्या दोघांची दुसरी जोडी, अन या दोन जोड्या मिळून आम्हा चौघांची एक चौकडी तयार झाली होती, जी पुढच्या काही महिन्यांतच ‘राजा शिवाजीची चांडाळ चौकडी’ म्हणून सार्‍या स्टाफ मध्ये ओळखली जाउ लागली.

कोणतीही पालकसभा असो, त्यात निघणारी ब्लॅकलिस्ट वा डिफॉल्टर लिस्ट असो, त्यात आमचे नाव नाही असे कधी झाले नव्हते. सातवी ते दहावी या चार वर्षात किमान चाळीस वेळा तरी आम्हा दोघांना एकमेकांचे कान पकडून कॉरिडॉरमध्ये उभे राहायची शिक्षा झाली असावी. आमचा सगळा कारभारच एकत्र चालायचा. रोज सकाळी मी मुद्दाम एक स्टॉप आधी उतरून त्याच्याबरोबर चालत यायचो, तर संध्याकाळी तो माझी बस येईपर्यंत माझ्या स्टॉपवर बसून मला कंपनी द्यायचा. दुपारचे जेवण एकमेकांच्या डब्यात व्हायचे. जगात उष्टे खाणे असा काही प्रकार असतो हे कधी मनालाही शिवले नव्हते. डब्यात एखादा खास पदार्थ असेल तर इतरांपासून लपवून ते आधी एकमेकांना द्यायचो. अश्यावेळी डबा शिक्षकांची नजर चुकवून मधल्या सुट्टीच्या पंधरा मिनिटे आधीच निघायचा. एखादी गोष्ट तुझी माझी असा उल्लेख आमच्यात कधी झालेला आठवत नाही. मग ते पेन-पेन्सिल, वही-पुस्तक वा पाण्याची बाटली का असेना. जेवण झाल्यावर पाणी प्यायलाही एकत्रच जायचो. डबा धुवायला मात्र मैदानाजवळच्या पाणवठ्यावर, जिथून शेजारील मुलींच्या शाळेच्या बिल्डींगवर सहजच नजर टाकता यायची. इथे मात्र तेवढे दोघांचे तोंड दोन दिशेला असायचे. कधी चोरट्या नजरेनेही त्याने तिथे पाहिल्याचे आठवत नाही.

वर्ग चालू असताना एकालाच टॉयलेटला झाली असली तरी दोघेही करंगळी वर करायचो. दादरच्या पूलावर ४-५ रुपयाला भेटणारी पिवळी पुस्तके मागच्या बेंचवर बसून मोठ्या आवडीने वाचायचो. एकदा चौगुले बाईंनी पकडले होते तेव्हा दोघेही ते पुस्तक आपलेच आहे असे बोलत होतो. शेवटी शिक्षा म्हणून दोघांनाही शंभर सुभाषिते लिहावी लागली होती. एखाद्या तासाला दोघांपैकी कोणालाही कंटाळा आला की आमचे वहीचे शेवटचे पान उघडायचे. तिथे फुलीगोळ्या पासून कार्टून काढण्यापर्यंत सारे खेळ चालायचे. ऑफ पिरीअडला वर्गात छापा-काटा करत हळूहळू जुगाराचा अड्डा सुरू करायचे श्रेय सुद्धा आम्हालाच जाते. शिक्षकांसाठी असलेल्या टेबलवर टेबलटेनिस खेळणे हा आम्हा दोघांच्या सामाईक आवडीचा खेळ, अन त्यासाठी कित्येकदा शाळा सुटल्यावर थांबून राहायचो ते शेवटी मामांनी येऊन हाकलवेपर्यंत.

आठवीच्या वर्गशिक्षिका फडणीसबाईंनी, तुमचा मुलगा दुसर्‍याच्या नादाने फुकट जात आहे असे सांगत, दोघांच्या पालकांचे वेगवेगळे कान भरल्याचे आठवतेय. आमच्यात फूट पाडायचा प्रयत्नच होता तो. पण त्या सहामाहीला आम्ही एकत्र अभ्यास करून त्याचे उत्तर वार्षिक निकालात दिले होते. कितीही मस्ती करत असलो तरी अभ्यासात आम्ही बर्‍यापैकी हुशार होतो ही आमची जमेची बाजू होती. मी त्याचा गणिताचा शिक्षक होतो आणि तो माझा इंग्लिश टीचर.

दहावीला असताना माझे पहिलेवहिले प्रेम. आमच्याच शाळेच्या गर्ल्सस्कूलमध्ये शिकणारी ती. जिच्या मागे वर्गातील अर्धी मुले लागली होती. अन म्हणून मी हे कोणालाही सांगितले नव्हते. जे फक्त आणि फक्त या कलंदरालाच माहीत होते. रोज सकाळी तिच्या शाळेत यायच्या वाटेवर ताटकळत थांबणे, संध्याकाळी दोघे मिळून स्टेशनपर्यंत तिचा पाठलाग करने, तिला पटवण्यासाठी म्हणून आमच्याच शाळेत असलेल्या तिच्या भावाची खुशामत करने, आणि सरते शेवटी तिला दादर स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक सहा वर केलेला प्रपोज. सगळ्या सगळ्यात हा सामील होता. पण शेवटपर्यंत कोणाला थांगपत्ता लागू दिला नव्हता गड्याने. आज याच्या दिसण्याने माझ्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या होत्या.

ईतक्यात थिएटरमध्ये अचानक लाईटस लागल्या. मध्यंतर झाले म्हणून मी हिला म्हणालो, "तू थांब, मी काहीतरी खायला घेऊन येतो". तसे हिने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि एकाएकी खोखो हसत सुटली. जेव्हा हि अशी बावळटासारखी हसते तेव्हा समजायचे की आपणच कोणतातरी मुर्खपणा केला आहे. आजूबाजूला एक नजर टाकली आणि एकदम ओशाळल्यासारखे झाले. सिनेमा संपला होता. थिएटर खाली होत होते. मध्यंतर केव्हा झाले, सिनेमा केव्हा संपला, नक्की कोणत्या दुनियेत हरवून गेलो होतो मी.. पण लवकरच भानावर आलो, म्हणालो चल पटकन, आपल्यालाही निघायला हवे. बाहेर येऊन चौफेर नजर टाकली, आसपास कुठे दिसला नाही तो. एवढ्या गर्दीत आता शोधू तरी कुठे याला, कुठच्या दिशेने बाहेर पडला असेल. इतक्या जवळ येऊनही भेट नाही झाली तर... मी कावराबावरा होऊन सवयीने नखे चावायला लागलो, आणि अचानक काहीतरी सुचावे तसे झाले.

हिला तिथेच थांबायला सांगून कारपार्किंगच्या दिशेने धावत सुटलो. अपेक्षेप्रमाणे तो दिसलाच. बरोबर वहिनी नव्हत्या. कदाचित त्यांचीच वाट बघत तो उभा होता. का कुणास ठाऊक, पण हेच सोयीचे वाटले. कदाचित त्यांच्यासमोर याला कडकडून भेटायला संकोचच वाटला असता. लांबूनच त्याला हाक मारली, अधीरतेनेच.. एक आरोळी ठोकल्यासारखा आवाज.. ओये पश्याss... त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले. माझा हलणारा हात, त्याच्या सहज नजरेस पडावा असा. किंचित रोखून पाहिले त्याने माझ्याकडे, तसे हळूहळू नजरेत ओळखीचे भाव दिसू लागले. तरीही थोडाफार साशंक चेहरा. की मलाच तसे वाटले. क्षणाक्षणाला त्याच्या चेहर्‍यावरचे पलटणारे भाव आणि बदलणारी नजर, की माझाच तो भास होता. त्या क्षणाला असे वाटत होते की जवळ जाऊन आनंदाने चित्कारून त्याला एक कडकडून मिठी मारावी जेणेकरून आजूबाजूच्या सर्व लोकांना समजावे, दोन जिगरी दोस्त आज कित्येक वर्षांनी असे अचानक भेटत आहेत. पण मी जसा त्याच्या जवळ जात होतो तसे आमच्यातील अंतर वाढत आहे असे वाटत होते. त्याच्या चेहर्‍यावर ना आनंद दिसत होता ना आश्चर्य. आलिंगन देण्यासाठी हवेत उठलेले माझे हात माझ्याच नकळत खाली झाले आणि सहज एखादी टाळी देण्यासाठी म्हणून हात पुढे केला. पण समोरच्याला तेही अपेक्षित नव्हते. केवळ औपचारिकता म्हणून आमचे हस्तालोंदन झाले. बोलणे ही जुजबी. त्यातही वहिनी येण्याच्या आधीच मला कटवण्याची घाई दिसून येत होती. वाटले की आपणच विचारावे, वहिनी कुठे आहेत. पण हा लोचटपणा जमला नाही मला. एकेकाळी आमची मुले देखील आमच्यासारखेच एकमेकांचे जिगरी दोस्त झाले पाहिजेत अशी स्वप्ने बघितली होती आम्ही, पण आज एकमेकांच्या परिवाराची साधी चौकशी करण्यात रस नव्हता. अजूनही काहीतरी शोधत होतो मी त्याच्या चेहर्‍यावर, पण ते दिसत नसल्याने स्वत:च्याच चेहर्‍यावरचे भाव लपवायची कसरत करावी लागत होती. चेहर्‍यावर कोरडे भाव ठेवण्यासारखा दुसरा कठीण अभिनय नसावा या जगात. मलाच आता आमचे संभाषण ताणून धरण्यात अस्वस्थता वाटू लागली. जसे तो चल निघतो आता असे म्हणाला, तसेच मी सुद्धा भेटत राहा बोलून तिथून निघालो. ना आम्ही फोननंबर एक्चेंज केले ना अ‍ॅड्रेस शेअर केले. साधा मेल आय-डी सुद्धा नव्हता एकमेकांचा. तरीही माझ्या भेटत राहा वर नक्की बोलून कसेबसे हसला तो..

परत आलो तर बायको माझी वाट बघत होती. कुठे गेलो होतो, या तिच्या प्रश्नाला देण्यास उत्तर नव्हते माझ्याकडे. आणि तिनेही जास्त ताणून धरले नाही. त्या रात्री माझी अस्वस्थता तिला जाणवल्याशिवाय राहिली नाही. कदाचित तिच्याशी हे शेअर केल्याने हलके वाटेल म्हणून सांगायचे ठरवले तिला, आज प्रसन्ना भेटला होता. ओळख पटावी म्हणून याआधी सांगितलेला आमचा एक किस्सा आठवून दिला. पुढे काय घडले हे माझा चेहराच सांगत होता. तिनेही हलकेच माझ्या केसातून हात फिरवत माझी समजूत काढली, "ठीक आहे रे, भेटलाच नाही असे समज." .. खरे तर भेटलाच नसता तर किती बरे झाले असते नाही. त्याच्या या अश्या भेटीने आजवरच्या सार्‍या आठवणी तुरट झाल्यासारख्या वाटू लागले होते. आजवर कित्येक वेळा मी माझ्या शाळेतले किस्से माझ्या आताच्या मित्रांना सांगितले असतील, बायकोशी शेअर केले असतील. पुढे जाउन मुलांना, नातवंडांनाही सांगितले असते. यानंतर मात्र कदाचित ते आठवायची इच्छाही होणार नव्हती. माझी ही मनस्थिती ओळखून बायको गपचूप कुशीत शिरून म्हणाली, "विसर हे आता, काढून टाक मनातून, एक मित्र हरवला असे समज आणि झोप गपचूप." .. मी मनातच खिन्नपणे हसलो आणि स्वताशीच विचार करू लागलो, नाही यार, मित्र कधीच हरवत नाहीत.. हरवते ती मैत्री.. जी आमची कधीच हरवली होती.. फक्त जाणीव आज झाली होती..

... तुमचा अभिषेक

गुलमोहर: 

मित्र कधीच हरवत नाहीत.. हरवते ती मैत्री.. जी आमची कधीच हरवली होती.. फ़क्त जाणीव आज झाली होती..

>>>>>>> अशी जाणीव होण हे फार त्रासदायक असतं

बाकी, लिखाण छान झालय तुमचं. आवडलं

अभिषेक छान प्रयत्न!
पण हेही एक सत्य आहे, वयोमानापरत्वे जसजश्या डिग्र्या आणि पॅकेज (पगाराचे) वाढते तसतशी मैत्रीतली ही विन सुटत जाते. मग मागे उरतो तो फक्त स्वार्थ.....मग त्याच्याबरोबरच येतात खोटे गिफ्टस्/सरप्राईझेस. उगाचच हसुन दाद देणे वैगेरे......! असो.
आम्ही शाळेतले मित्र अजुणही कधी कधी भेटतो. त्यातल्या काही जणांना सध्या आम्ही काय करतोय हे दाखवुण देण्यातच जास्त धन्यता वाटते.
तर काही जण संसारातल्या व्यापात पार बुडुन गेलेत. पण अजुणही जुण्या आठवणी आल्या की सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात अगदी जसेच्या तसे. किस्से तेच असतात पण दरवेळी ऐकताना काहीतरी नवीन उमगते. आणि शाळेतले मित्र लक्षात राहण्याचे कारण हेच कि त्यामगचा इनोसन्स अगदिच काही नाहीतर एखादा मधल्या सुट्टीतला वडापाव ही चालतो. त्यावेळी आपल्याला खरंच कळत नसत कोन काय आहे. किती कमावतो, घरची परिस्थिती, वडील काय करतात. फक्त एकच गोष्ट माहित असते कि तो/ती माझी मित्र/ मैत्रीण आहे बस्स........................! सुदैवाने (माझ्या) आम्ही काही मित्र अजुनही हे संबध जोपासुन आहोत.:)

मित्र कधीच हरवत नाहीत.. हरवते ती मैत्री..>>>>..
अगदी खर आहे हे... तेव्हा इतका त्रास होतो की मग असे वाटते की नको ते मित्र मॅत्रिणी एकटे रहीलेले चांगले.
खुप छान.. आवडली.. Happy
वाचुन आधीच्या सगळ्या आठवणी जाग्या केल्यात :'( .. खरच खुप छान लिहिले.

सुपर्ब...............
मस्त आहे मैत्री कितिही जोपासण्याचा प्रयत्न करा ती नेहमीच हरवते.............
लिहित राहा....वाचत राहु......

A+1

त्याचे काहीतरी कारण असावे.......'प्रवृत्त' असावा.....

एकदा पुन्हा स्वतःहुन भेट घेणे आवश्यक आहे.... नक्की काय ते कळेल.

खरे तर मित्रच हरवतात 'मैत्री' नाही........
मैत्री दोन्ही बाजुने असल्यास.

Chaan aahe, aavdli.. khup vait vate, jevha aaple friends ase vagtat.. pan thanks of god mazi aani mazya maitrini madhli maitri harvleli nahi, bhale aaj te kothehi aso pan contact madye aahet.

खरचं मनाला पटले... यार...
सालं या पैशाच्या दुनियात... आनी मोठे होण्याच्या नादात माणुस सगळे काही विसरून जातो... मी ही कदाचीत त्या प्रसन्न सारखाच वागतो., खुप वेळा. .
पन साल्ल कथा वाचताना, शाळेतील बालपण नजरेसमोर येऊन उभे राहीले.. ते मधल्या सुट्टीत बाकांच्या वर बसुन टीफीन खाणे. चालु तासाला आपल्याला आवडना-या मुलीकडे (मित्रांच्या भाषेत - आयटम Happy ) बघणे...
पी.टी च्या तासाला उगाच नको ते उदयोग करने आनी सरांचा मार खाणे.
साला लिखने बैंठेगे तो टाईम भी कम गीर जायेंगा.... But thanks yaar तुझ्या लिहील्या कथेमुळे शाळेतील सर्व आठवणी जाग्या झाल्या... Happy

मित्र हरवत नाहीत... आपण बदलतो तसेच मित्रही बदलतात......
खरंतर मैत्रीही हरवत नाही... वेळ आली की आपोआप नाहीशी होते... कार्यभाग संपावा तशी...

मैत्रि म्हटलं कि आठवतं ते कॉलेज, शाळेचे दिवस अन मैत्रिणींबरोबरचा कल्ला.. पण हे सगळं सुटलं कि चार दिशांना उडालेली सगळी पाखरं... Sad प्रत्येकजण आप-आपलं घरटं विणण्यातच मश्गुल.. कुणी कधी भेटत नाहि अन भेटाव म्हटल तर कोण कुठल्या कोपर्‍यात आहे हे पण ठावुक नसतं.
मैत्रि कधीच हरवत नाहित तर हरवतात ते मैतर.. फक्त मैत्रिची जपणुक होत नसते इतकच..
खुप छान लिहिलय... सगळ्या मैत्रिणींची आठवण आली... Happy

आत्ताच तुमची कथा वाचून एका जुन्या हरवलेल्या मैत्रिणीला फोन केला.
त्या वेड्या वयात काही शुल्लक कारणावरून आमच बोलण कमी झाल . कमी होता होता बंदच झाल . मग लग्नानंतर तीच गावच बदलाल.आत्ता तिला फोन केला तर.
मधला सगळा काळ कुठेतरी गायब झाला. किती बोलू नी किती नको अस झालेले. आता ती इथे सुट्टीला येणार आहे & आम्ही भेटणार आहोत
धन्यवाद अभिषेक

सर्व प्रतिसादांचे धन्यवाद.

मृणाल आपले विशेष, कोणाचा असा प्रतिसाद, असा अनुभव आला की पुढील लिखाणास हुरूप मिळतो.

अभिषेक वाचताना फक्त लहानपणी पैसे साठवून मित्रा साठी घेतलेले गिफ्ट्स वा इतर धमाल गोष्टी आठवल्या , आणि ब्याग्राउंड ला बालक पालक सिनेमातल गाण वाजत होत कां कळेना अशी हरवली पाखरे बास Sad Sad Sad Sad

khupch chan ....aavdli....
junya aathvanina ujala dilas mitra........

मस्त्...अगदि असच होत्...

मी माझ्या शाळेतील मैत्रीणिंच्या आजहि संपर्कात आहे...खुप छान वाटत..

मित्र कधीच हरवत नाहीत.. हरवते ती मैत्री.. जी आमची कधीच हरवली होती.. >>> आणि तेच मला होऊ द्याय्च नाही. म्हणुन मी स्वत:च नेहमी संपर्कात रहाते...

Pages

Back to top