जय हो !

Submitted by जयनीत on 28 January, 2012 - 03:47

सेठजींकडे स्वामीजींचे आगमन झाले .
स्वामीजींच्या भरगच्च कार्यक्रमाचा प्रचार अन् प्रसार व्हावा ह्यासाठी पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले .
सर्व काही सुरळीत सुरु होते . शांतपणे .
पण काही नवशिक्या अतिउत्साही तरुण पत्रकारांनी नाक खुपसलेच .
' स्वामीजी ! आपण प्रत्येक ठिकाणी फक्त श्रीमंतांनाच आपल्या आतिथ्याचा लाभ देता असे का ? ' एकाने विचारले .
' सुंदर ! अतिशय सुंदर ! ! ' स्वामीजी मंद स्मित करून म्हणाले , ' अशा प्रश्नांनीच आमची भूमिका स्पष्ट होण्यास मदत होते . '
' त्याचे असे आहे वत्सा ! ' स्वामीजी धीरगंभीर आवाजात पुढे म्हणाले , आता स्वामीजींचे डोळे बंद झाले होते , असे झाल्यावर स्वामीजींचा तिसरा नेत्र उघडून त्यांच्या मुखावाटे कितीही गहन प्रश्नांची उत्तरे झरझर बाहेर पडू लागतात , ते असे रंगात आले की त्यांना वादविवादात कुणीही हरवू शकत नाही ह्याचा भक्त जनांना अनुभव होता .
' गरीबाच्या झोपड्यात वास्तव्य करून मला अफाट प्रसिद्धी मिळेल हे खरे !
पण एका भुकेकंगालाच्या फुटक्या थाळीतील भाकरी संपवणे हा अन्याय नाही होणार का ? सांगा बरे !'
स्वामीजी सूरात उत्तरले .
भक्तजन गदगद झाले .
' पण आपणच नेहमी आपल्या प्रवचनात सांगता की सुईच्या छिद्रातून ... ' दुस-याचा प्रश्न अर्धवटच राहिला .
' कळले , कळले ! ' सेठजींनी हात उंचावला , स्वामीजींना लवून अभिवादन करून म्हणाले , ' जर आपली आज्ञा असेल तर ह्या प्रश्नाचे उत्तर मी देऊ इच्छितो .'
स्वामीजींनी मानेनेच होकार दर्शवला .
' स्वामीजींचे शब्दनशब्द मला मुखोद्गत आहेत '' स्वामीजी म्हणतात सुईच्या छिद्रातून उंटच काय पण हत्ती ही जाईल एखाद वेळेस पण धनवान मनुष्य स्वर्गाच्या दारातून आत प्रवेश करू शकणार नाही ,'' हेच म्हणतात ना ते ?' सेठजींनी विचारले .
' होय .' दुसरा म्हणाला .
' पण एक महत्वाची गोष्ट तुम्ही विसरता आहात , कारण तुम्ही स्वामीजींची सगळी प्रवचने ऐकली नाहीत . मित्रांनो ! ते नेहमीच म्हणतात की मनुष्य येतांना रिकाम्या हाताने येतो आणि जातांनाही रिकाम्या हातानेच जातो , आम्हा सर्वांनाच सगळी मोहमाया सर्व धनसंपत्ती देखील येथेच सोडून जायची आहे त्यास कुणीही अपवाद नाही , आम्ही पण जातांना काय घेउन जाणार आहोत ? जर देवापुढे सर्वच रिकाम्या हातानेच जाणार , मग त्याच्यापुढे कोण राजा अन कोण रंक ? कोण गरीब अन कोण श्रीमंत ? सगळीच देवाची लेकरे ! मग तो कसा आपल्या लेकरांमधे भेदभाव करील . उलट हा भेद मिटावा म्हणून स्वामीजी किती प्रयत्नशील आहेत ते तुम्हास ठाउक नसेल ते नेहमीच आम्हाला दानधर्मास प्रवृत्त करतात .' सेठजी म्हणाले .
' हो ! काही लोक असे आहेत जे स्वामीजींच्या संस्थांना लाखो करोडोच्या देणग्या देतात पण कर भरतांना मात्र टाळाटाळ करतात असे का ? तोच पैसा जर सरकारकडे आला तर ?' तिस-या तरुणाचाही प्रश्नं अपूर्णच राहिला .
ह्या वेळेस उत्तर देण्याची आज्ञा छोट्या सेठजींनी घेतली .
' पहिली गोष्ट तर , हा आरोप धादांत खोटा आहे ! दुसरं म्हणजे सरकारकडे गेलेल्या पैश्याचं काय होतं ते ठाऊक नाही का तुम्हाला ? छोटे सेठ म्हणाले . त्यातला किति पैसा प्रत्यक्ष लोकांकडे पोहोचतो आणि किती भ्रष्ट मंत्र्याच्या अन् अधिका-यांच्या खिशात जातो हे तर उघड गुपित आहे . ते का आम्ही वेगळं सांगायला हवं ?'
' हो ! पण तेच लोक नेहमी स्वामींजींना गराडा घालून बसलेले असतात ना ?' पहिला म्हणाला .
स्वामीजींची अजूनही ब्रम्हानंदी टाळी लागली होती . ह्याही आक्षेपाने ते जराही विचलीत झाले नाहीत , ते शांतपणे उत्तरले .
" न्यायपलिका गाजविते दंडाचा अधिकार !
मार्ग आमुचा वेगळा , आम्ही करतो अधमांवर संस्कार !
पतितांच्या उद्धाराचे प्रयत्न हा पामर नेटाने करणार !
पण दुरावा राखून उद्दीष्ट आमुचे , कसे साध्य होणार ?
ह्यास्तव आम्ही धरितो त्यांचा संग !
अन्यथा त्या सर्वशक्तीमानास ठाऊक आहे आम्ही आहोत किती निस्संग !"
असे म्हणोनी जेव्हा स्वामीजींनी तर्जनी आकाशाकडे नेली ,
त्यावेळी भक्तजनांनी केलेल्या जयघोषाच्या गडगडाटात सर्व प्रश्नचिन्हे विरून गेली !
(समाप्त)

गुलमोहर: 
शब्दखुणा: