छत्रपति शिवरायांच्या कार्याचा अभ्यास करताना अनेक इतिहासकारांनी त्यांचे व्यक्तिमत्व वेगवेगळ्या दृष्टीकोनातून मांडले आहे. 'कै. नरहर कुरुंदकर' हे असेच एक प्रभावी लेखक. त्यांनी लिहिलेल्या 'छत्रपति शिवाजी महाराज - जीवन रहस्य' या पुस्तकात त्यांनी असेच काही वेचक आणि वेधक विचार मांडले आहेत.
इतिहासाच्या वाचकांना 'नरहर कुरुंदकर' माहीत असले तरी सामान्य वाचकांना मात्र ते 'श्रीमान योगी'च्या प्रस्तावनेतून माहीत आहेतचं. रणजीत देसाई यांना लिहिलेल्या विस्तृत पत्रातून त्यांनी शिवरायांचे व्यक्तिमत्व मांडण्याचा यशस्वीपर्यंत केलेला आहे.
हे लिखाण 'छत्रपति शिवाजी महाराज - जीवन रहस्य' आणि श्रीमान योगीची प्रस्तावना यावरून लिहिलेले आहे.
**********************************************************************************************************************
समाजाला नेहमीच नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते आणि अश्या नाट्यमय घटनांमुळे खरे कर्तुत्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो. महाराजांच्या जीवनात अश्या घटना ५-६ पेक्षा अधिक नाहीत. पहिली अद्भुत घटना १६५९ मध्ये अफझलखानवध ही आहे. तर शेवटची १६६६ ला आग्र्याहून सुटका ही आहे. ह्या ७ वर्षात पन्हाळा - बाजीप्रभु, शाहिस्तेखान प्रकरण, सूरतलूट ह्या घटना आहेत. म्हणजे एकुण ५० वर्षाच्या जीवनात पाहिल्या नाट्यमय घटनेपूर्वी २९ वर्षांचा नाट्यशून्य काळ आणि शेवटच्या नाट्यमय घटनेनंतर १४ वर्षांचा कालखंड...!!! ह्या अश्या ५-६ घटनांवर आपल्या कर्त्या पुरुषाचे चरित्र कसे पूर्ण होइल ??? छत्रपतींचे कार्य आणि चरित्र समजुन घेताना ह्या नाट्यमय रोमांचकारी घटनांचा मोह आपण टाळला पाहिले.
शिवरायांच्या नेत्रुत्वाचा विचार जेंव्हा जेंव्हा पडतो तेंव्हा २ प्रश्न समोर येतात ...
१. खुद्द औरंगजेब आपली राजधानी सोडून दक्षिणेत का उतरला ???
२. १६९२ नंतर आपण ही लढाई पूर्णपणे जिंकू शकत नाही, हे माहीत असुनही पुढची १५ वर्षे लढत का राहिला ???
त्याच्यासारख्या कसलेल्या युद्धनितीतज्ञ आणि मुत्सद्दी अश्या बादशहाला महाराष्ट्रातल्या पश्चिमेकडील एका कोपऱ्यातल्या डोंगराळ भागात वसलेले छोटेसे राज्य बूडवण्यात अपयश का आले??? औरंगजेबाने केलेल्या तयारीवरुन हे स्पष्ट दिसते की त्याने ही लढाई साधी - सोपी नक्कीच समजली नव्हती. लाखोच्या फौजा जातीने घेउन उतरणे यावरुनच ते स्पष्ट समजते. लाखोने मुघल फौजा सीमेवर उभ्या असताना अवघ्या ५० व्या वर्षी छत्रपतींना मृत्यू आला. पण तरीही राजधानी पासून दूर राहून, दरवर्षाला कोट्यावधी खर्च करून आणि उत्तर भारतात अव्यवस्था निर्माण होउन देखील औरंगजेब अखेरपर्यंत लढत राहिला. त्याने अनेक लढाया जिंकल्या पण तो युद्ध जिंकू शकत नव्हता. मराठ्यांना अपुऱ्या साधन-सामुग्रीवर मोघलांचा पराभव करणे शक्य नव्हते. तरीही सर्व प्रतिकूल परिस्थितिमध्ये मराठे लढत राहिले. छत्रपति संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली ९ वर्षे आणि त्यांच्या वधानंतर १९ वर्षे जनता लढत राहिली. पृथ्वीराज चौहान, राणा प्रताप, रामराजा ह्यांनी सुद्धा परकियांविरुद्ध प्रखर लढा दिला. पण जिकडे जनता लढते तिकडे फौजा निकामी होतात. भारताच्या इतिहासात १२०० वर्षांनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी जनता अखंड २७ वर्षे लढली. हयात धर्माभिमान नव्हे तर आपण लढू शकतो हा आत्मविश्वास जास्त महत्वाचा आहे. छापे घालण्याचे नवे तंत्र निर्माण करणे, वीरतेच्या खोट्या कल्पनेच्या आहारी जाउन 'लढून मरणे' यापेक्षा - टिकणे, गरज असल्यास पळणे, मग पळवणे, थकवणे आणि अखेर नाश करणे हे जास्त महत्वाचे. यासोबत प्रजेच्या इहलौकिक गरजा सांभाळणे आलेच. यानंतर धर्माभिमान महत्वाचा. एखादे राज्य टिकवण्यासाठी जनतेने इतका दीर्घकाळ लढा द्यावा, ही घटनाच हिंदुस्तानच्या इतिहासात सर्वात जास्त रोमांचक आहे... नवखी आहे...
शिवछत्रपतींच्या कार्यपद्धतीचा विचार अधिक तपशीलवारपणे समजुन घेणे महत्वाचे आहे. 'शिवाजी म्हणजे युद्ध नव्हे, तर नव्या व्यवस्थेचा आग्रह ... त्या व्यवस्थेच्या रक्षणासाठी युद्ध हे साधन.' सन १६४५ ते १६४९ ही ४ वर्षे बारा मावळची व्यवस्था लावण्याचे काम अखंड सुरू होते. वतनदारांचा बंदोबस्त करणे आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करणे ही सर्वात महत्वाची कामे ह्या काळात केली गेली. सामान्य असणाऱ्या मोरोपंत पिंगळे, तानाजी मालुसरे आणि प्रतापराव गुजर अश्या व्यक्तिंमधून असामान्य कर्तुत्ववान प्रधान, सेनापति, सुभेदार निर्माण करणे हा महाराजांचा आणखी एक पैलू.
शिवरायांचे व्यवस्थापन आणि संघटन कौशल्याचे वैशिष्ट्य ह्यात आहे की, जेंव्हा त्यांना माघार घ्यावी लागली, अपयश आले किंवा ताब्यातला प्रदेश होरपळून निघाला; तरीसुद्धा लोकांचा त्यांच्यावरील विश्वास तसूभरही कमी झाला नाही. एखादा चुकार माणूस वगळता त्यांच्या फौजेने कधी बंद पुकारले नाही. १६४९ मध्ये सुद्धा सर्वच अनिश्चित असताना लोक त्यांच्या बाजूने उभे राहिले असे लोकांना त्यांनी दिले तरी काय होते ??? त्यांचे वैशिष्ट्य यात आहे की, ते जेंव्हा-जेंव्हा जिंकत तेंव्हा-तेंव्हा नवा प्रदेश पूर्णपणे ताब्यात घेत आणि जेंव्हा पड़ती घेत तेंव्हा नव्याने जिंकलेल्या प्रदेशाचा काही भाग सोडून देत असत. म्हणजेच पुढच्या वेळी लढण्याची शक्ती त्यांनी सुरक्षित ठेवलेली असते. जन्मभर त्यांनी ह्याच पद्धतीने कारभार पाहिला. त्यांचे चौरस नियोजन आणि युद्ध आखणीला राज्य विस्तारात रूपांतरित करण्याचे श्रेय अप्रतिम आहे.
भारतीय राजांमध्ये ते एक असे एकमेव निराळे राजे आहेत, ज्यांनी सदैव संभाव्य परीणामांचा विचार केला. युद्धाच्या योजना आखताना भूगोलाचा विचार केला. त्यासाठी त्यांनी कोकणपट्टी आणि वरघाटचे नकाशे बनवून घेतले होते. त्यांचे 'हेरखाते आणि भौगोलिक नियोजन' हा त्यांच्या युद्ध नेतृत्वाचा महत्वाचा पैलू आहे. १६४८ मध्ये फत्तेखानाला पराभूत केल्यानंतरही सिंहगड आदिलशाहीला परत करणे ह्या मागे कुशल नियोजन आहे. १६४८ मध्ये शहाजी राजांची सुटका झाल्यावर छोट्याश्या स्वराज्याला खानस्वारी पेलवणार नाही हे त्यांना लगेच उमगले होते. जावळी जिंकल्याशिवाय 'अफझलखान' या प्रश्नाला उत्तर नाही हे त्यांना १६४९-५० लाच उमगले होते. ती संधी राजांना १६५६ ला मिळाली. जावळी मागोमाग त्यांनी पुन्हा सिंहगड काबीज केला आणि आदिलशाहीला उघडउघड आव्हान दिले. १६५९ च्या खानस्वारीपर्यंत जो वेळ राजांना जावळीत मिळाला, त्यावेळात जावळीच्या दुर्गम खोऱ्यात प्रत्येक माणूस - 'हे राज्य टिकले पाहिजे' या त्वेषाने पेटून उठला असला पाहिजे.
खानवधात एक प्रश्न नेहमी विचारला जातो ते म्हणजे दगा कोणी दिला ??? राजांनी की खानाने ??? समजा खान सुरक्षित परतला असता तर पुढच्या भेटीत शिष्टाचार म्हणुन राजांना खानभेटीस त्याच्या गोटात जाणे भाग पडले असते. प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेला ... नव्हे आणलेला खान परत जिवंत जाणे शक्य नव्हते. ती व्यवस्था शिवरायांनी करून ठेवली होती. खानवधापाठोपाठ त्याच्या फौजेवर बांदल - शिळीमकर यांनी हल्ला चढवणे, वाई तळावर नेताजी पालकरने विध्वंस करणे, मोरोपंतांनी पारघाटावर हल्ला करणे आणि पूर्ण ताकदीनिशी शक्य तितक्या लवकर कोल्हापुर प्रांती धडक मारणे एवढा व्यापक दृष्टिकोन आणि नेमके नियोजन ह्यामागे आहे. अनापेक्षित घाव घालून जग थक्क करता येते पण त्या थक्क अवस्थेतून बाहेर येईस्तोवर शिवराय काही स्थिर कामे करत असतात. ते विजयोस्तव साजरे करत बसत नाहीत. खानवधा पाठोपाठ कोल्हापुर - पन्हाळा जिंकणे, कुडाळ मारून विजापुर प्रांती धडक मारणे आणि पुढच्या १८ दिवसात १२०००च्या फौजेचा पराभव करून लूट मारणे व ती फौजा दुप्पट करण्यात वापरणे, आणि ह्या सर्वातून आदिलशाही सावरेपर्यंत जास्तीत जास्त प्रदेश जिंकणे, हे सैनिकी कौशल्य ... !!!
"स्थायी यश मिळणाऱ्या मोहिमेचा आरंभ म्हणुन अनपेक्षित धक्याला अर्थ असतो पण तो धक्का देऊन थक्क करणे आणि भानावर येण्यापूर्वी स्थिर विजय मिळवणे हा राजकीय वास्तववाद म्हणजे छत्रपति शिवराय..."
शाहिस्ते खान प्रकरण असो नाहीतर सूरत लूट, शत्रूला प्रत्येक ठिकाणी नवनवीन पद्धतीने थक्क करून त्यांनी आपले कौशल्य पणाला लावले आहे.
२२ हजाराची फौज घेउन आलेला खान, त्यामागोमाग ३२००० फौज घेउन आलेला सिद्दी जोहर, ६०००० च्या आसपास फौज घेउन उतरलेला शाहिस्तेखान ह्या सगळ्यात मराठी राज्य चिरडले गेले होते. पुढे मिर्झाराजा सुद्धा लाखभर फौज घेउन दख्खनेत उतरला. एवढे प्रचंड ओझे राज्यावर असताना , १ तप यातना भोगून, जाळपोळ, नासधूस, नुकसान सहन करूनही जनतेची निष्ठा तसूभर देखील कमी का झाली नाही ??? या लोकांना राजांनी असे काय दिले होते ??? बाजीप्रभु असो नाहीतर शिवा काशिद ... तानाजी असो नाहीतर मुरारबाजी ... ह्या सर्वात एक विलक्षण साम्य आहे. माणसे लढताना मरतात ही लढाई मधली नित्याची बाब आहे. पण जाणीवपूर्वक आपण मरणार याची खात्री असताना, केवळ मरण्यासाठीच लढतात ही अभुतपुर्व गोष्ट आहे. ह्या माणसांना मरण्याची प्रेरणा कुठून मिळते ???
अनेक साहसी लढाया आणि पराक्रम ह्याचा अंत पुरंदरच्या तहात झाला. १६ वर्षे खपून जे मिळवले ते एका क्षणात तहात गेले. या तहावरुन समजुन आले की ज्यांच्याविरुद्ध राजे लढत होते ते किती बलाढ्य होते. पुरंदरच्या तहात पूर्ण पराभव होता आणि आपली पुढची लढण्याची किमान शक्ती शाबूत ठेवून राजांनी हा तह पूर्णपणे मान्य देखील केला. या पराभवाचा परिणाम नेताजी पालकर वर झाला आणि त्याने स्वराज्याची साथ सोडली. १६५९ ते १६६५ या काळात जे कणखरपणे लढले ते प्रचंड कसोटयांमधून बाहेर पडले. राजे आग्र्यामध्ये असताना देखील त्यांनी कारभार चोख ठेवला. राजा अटकेत असताना देखील फौजा बंड करत नाहीत आणि जनतेचा विश्वास कमी होत नाही हे महत्वाचे आहे. आग्र्याहून सुटून आल्यावर शिवरायांनी स्वतः औरंगजेबाला पत्र लिहून तह मोडणार नसल्याचे कळवले होते. १६६७ ते १६६९ ह्या वर्षात उठावाची जोरदार तयारी केली गेली पण गेलेला एकही किल्ला घेण्याचा पर्यंत केला गेला नाही. मात्र १६७० च्या सुरुवातीपासून अवघ्या ५ महिन्यात सर्व किल्ले मराठ्यान्नी जिंकून घेतले. हे अजून एक थक्क काम. १६७१-७२ ह्या काळात तर खानदेश - बागलाण - बुरहाणपुर - जालना - व्हराड ह्या सर्व मोघल भागात छापे घालून लूट मिळवणे आणि अस्थिरता निर्माण करणे हे काम जोमाने सुरू होते. या सर्व घडामोडीसोबत १६५७ पासून आरमाराची उभारणी करून समुद्रावर छापे घालण्याचे तंत्र विकसित करणे, व्यापारी नौका उभारणे, नविन किल्ले उभारणे आणि हाती आलेले किल्ले दुरुस्त करणे असे चौरस उपक्रम सुरू होतेच.
हिंदूंचा नवा अध्याय शिवरायांपासून सुरू होतो. हिंदू राजांनी विश्वास ठेवावा आणि परकियांनी दगे द्यावेत हा इतिहास बदलून शिवरायांनी दगे द्यावेत आणि शत्रूला थक्क करावे हा नविन इतिहास सुरू झाला. राजे धार्मिक होते पण धर्मभोळे नव्हते. साहसी होते पण आततायी नव्हते. त्यांची राहणी वैभव संपन्न होती पण उधळी नव्हती. राज्याचे सिंहासन ३२ मणाचे बनवणारा राजा सूती वस्त्रात, लाकडी पलंगावर झोपत असे. चित्र, शिल्प आणि संगीत ह्यांना आश्रय देणे यासाठी ना त्यांच्याकड़े वेळ होता ना पैसा. त्यांना मोठ्या मोठ्या ईमारती बांधण्याची फुरसत देखील नव्हती. दुष्काळात लाखो लोक अन्न-अन्न करीत मरत असताना २० कोट रुपये खर्चुन ताजमहाल बांधण्यात त्यांना रस नव्हता किंवा त्यांच्या मनाचा तो कल देखील नव्हता. अकबराने हिंदूंना औदार्याने वागवले, तर राजांनी मुसलमानांना औदार्याने वागवले. त्यांच्याकडून आक्रमणाची भिती होती तरीही. हिंदूंकडून अशी भीती कधीच नव्हती. राजांनी सर्वांना समान वागवले ते भोवतालच्या मुस्लिम राज्यांच्या भीतीने नव्हे तर स्वयंभू औदार्य म्हणुन.
ते कुशल सेनानी होते, युद्धतज्ञ होते. या खेरीज ते मुलकी कारभाराचे तज्ञ होते. प्रजेच्या ईहलौकिक कल्याणाची जबाबदारी आपली आहे, हे त्यांना पुरेपुर माहीत होते. प्रजेवर निरर्थक कर त्यांनी कधी लादले नाहीत. (सिंहासनपट्टी हा जादा कर सुद्धा त्यांनी वतनदारांवर लावला.) 'मी शत्रूंना दगा दिला, पण मित्रांना दगा दिल्याचे दाखवा' असे जाहिर आव्हान त्यांनी दिले होते. त्या आव्हानाला आजतागायत उत्तर आलेले नाही. कौल देऊन गावे बसवणे, बीघे-चावर जमीन मोजणे, जमीन लागवडीखाली आणणे, बी-बियाणे - नांगर-बैल यासाठी कर्ज देणे, शेतसारा निश्चित करणे असे विधायक उपक्रमही त्यांनी केले. त्यांच्या काळात उत्पन्नाच्या ४० टक्के कर होता. आजही हा कर लहान नाही. तरी सुद्धा लोकांनी २/५ ही वाटणी आनंदाने स्विकारली. कारण कर दिल्यावर पक्षपात न होता संपूर्ण संरक्षण आणि न्याय याचे आश्वासन मिळायचे. 'पक्षपातरहित निर्दोष अंमलबजावणी' हे त्यांच्या राजवटीचे एक गमक आहे. कारण त्यांनी हक्क वतनदारांकडे न ठेवता स्वतःकडे घेतले.
भाषा सुधारण्यासाठी 'राज्यव्यवहार कोश', पंचांग सुधारण्यासाठी 'करण-कौस्तुभ', धर्मात शुद्ध करून घेणे हे सुद्धा त्यांनी केले. स्त्रीची अब्रू निर्धोक केली. त्यासाठी स्वतःचा निष्ठावान सरदार सखोजी गायकवाड ह्याचे हातपाय तोडण्यास कमी केले नाही. फौजेला शिस्त लवली. गावातून काही फुकट घेऊ नये असा दंडक केला. आपल्या फौजेतल्या ३०० लोकांकडून एका गावाला उपसर्ग झाल्याचे कळताच त्यांचे हात तोडले. कारण बळकटपणे तलवारी हातात घेणारे हात ह्यापेक्षा शासनामागे उभा राहणारा जनतेचा हात त्यांना जास्त महत्वाचा होता. 'मुलकी सत्ता ही लश्करी सत्तेपेक्षा श्रेष्ठ असली पाहिजे' हे सांगणारा आणि त्यावर वाटचाल करणारा असा माणूस भारताच्या इतिहासात एकमेव आहे. म्हणुनच तर समर्थ त्यांना 'शिवकल्याण राजा' म्हणतात. स्त्रियांचे व गुलामांचे आठवडी विक्री बाजार त्यांनी बंद करवले. तर विरोधकांच्या धर्मग्रंथांचा व पूजास्थानांचा त्यांनी सदैव आदर केला. अतिशय संयमी आदर्श गृहस्थजीवन ते जगले. निर्दोष व सुखी राज्यकारभार केला.
स्वतः शुन्यातून राज्य निर्मिती करून 'हे श्रींचे राज्य' आहे अशीच त्यांची वागणूक राहिली. म्हणुन तर ते श्रीमंत योगी झाले. त्यांच्या नेतृत्वाचा अभ्यास म्हणजे आपला आत्मविश्वास जागा करणाऱ्या एका युगप्रवर्तक नेत्याचा अभ्यास असतो...
वंदे मातरम... वंदे शिवराय...
छान!
छान!
श्री शिवछत्रपती महाराज
श्री शिवछत्रपती महाराज जन्मदिवस , किल्ले शिवनेरी, (जुन्नर-पुणे), महाराष्ट्र.
(तिथी प्रमाणे - फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ )
महाराजांची जयंती असल्याकारणाने हा लेख वर आणत आहे...
वंदे मातरम... वंदे शिवराय..
छान
छान
सेनापती, उत्तम लेख तुमचा
सेनापती,
उत्तम लेख तुमचा अभ्यास दिसतो जाणवतो.
शिवाजी राजे कसे होते, हे आता कळतय.
कसे त्यांनी त्या परीस्थीतीत पदोपदी अश्या शत्रु बरोबर झुंझून राज्य शून्यातून निर्माण केले असेल.
कित्येक शतक मोघलांच्या पायदळी तुडवलेल्या, जनतेला उभारी दिली व त्यातूनच असे शूरवीर निर्माण केले.
छान लिहिलय्सं आवडलं.
छान लिहिलय्सं आवडलं.
एवढे प्रचंड ओझे राज्यावर
एवढे प्रचंड ओझे राज्यावर असताना , १ तप यातना भोगून, जाळपोळ, नासधूस, नुकसान सहन करूनही जनतेची निष्ठा तसूभर देखील कमी का झाली नाही ??? या लोकांना राजांनी असे काय दिले होते ??? बाजीप्रभु असो नाहीतर शिवा काशिद ... तानाजी असो नाहीतर मुरारबाजी ... ह्या सर्वात एक विलक्षण साम्य आहे. माणसे लढताना मरतात ही लढाई मधली नित्याची बाब आहे. पण जाणीवपूर्वक आपण मरणार याची खात्री असताना, केवळ मरण्यासाठीच लढतात ही अभुतपुर्व गोष्ट आहे. ह्या माणसांना मरण्याची प्रेरणा कुठून मिळते ???
>>>>>>
हा खरेतर बर्याच इतिहासकारांनाही न उलगडलेला प्रश्न आहे. पण राजांच्या माणसे जोडण्याच्या कलेला मात्र मानायलाच पाहीजे. मग तो मुरारबाजी असो व बाजीप्रभु असोत.
रोहन.. खूपच सुंदर झालाय
रोहन.. खूपच सुंदर झालाय लेख्,खूप आवडला
सेनापती, आभार. असे
सेनापती, आभार. असे उत्तमोत्तम, अभ्यासपुर्ण लेख वाचायची संधी आम्हा शिवभक्तांना दिल्याबद्दल.
उत्तम लेख. कुरुंदकरांनी
उत्तम लेख. कुरुंदकरांनी केलेलं विश्लेषण पटण्यासारखं आहेच.
बरोबरच चर्चाही उत्तम झाली आहे. नेताजी पालकरांबद्दल काही ठिकाणी ते "राजे" असल्याचा उल्लेख आहे. शिवाय ते शिवरायांचे जवळचे नातेवाईक. त्यामुळे लोकांसमोर झालेला अपमान त्यांना प्रचंड झोंबला असावा. पण परत आल्यानंतर त्यांनी कोणत्याही पदाची मागणी केल्याचं दिसत नाही. शिवरायांच्या पश्चात त्यांनी संभाजीची साथ केली होती आणि राजारामाच्या कारकीर्दीत नेताजी वृद्धापकाळाने मृत्यू पावले. त्यांच्या गावात (चौक इथे) त्यांची समाधी आहे असं कुठेतरी आंतर्जालावर वाचलेलं आठवतंय. चू.भू.दे.घे.
हंबीरराव मोहिते हे शिवरायांचे मेहुणे आणि सोयराबाईंचे भाऊ होते असा उल्लेख वाचला आहे, तसं असेल तर त्यांनी संभाजी राजाना साथ देणे हे अजूनच महत्त्वाचं दिसतं.
आज आलेला हा लेख.
आज आलेला हा लेख.
रोहना ..... _/\_ लेख एकदा
रोहना ..... _/\_
लेख एकदा वाचलाय... पुन्हा एकदा वाचतेय!!
वंदन थोरल्या महाराजांना. अगदी
वंदन थोरल्या महाराजांना.
अगदी समयोचित लेख. दोन्ही पुस्तके मीही वाचली आहेत, पण सेनापती यानी नरहर कुरुंदकरांसारख्या समर्थ अभ्यासकाच्या लिखाणाचा यथार्थ मागोवा असा काही घेतला आहे की, पुन्हा ती पुस्तके हाती घ्यावीत असे वाटते. गुरुवर्य कुरुंदकरांची 'श्रीमान योगी' ची प्रदीर्घ प्रस्तावना हा मराठी भाषेतील एक चमत्कार आहे असे म्हटले जाते. क्वचितच असे घडले असेल की एखाद्या कलाकृतीसंदर्भात लिहिलेल्या मजकुराचेही स्वतंत्र पुस्तक काढावे अशी तीव्र भावना होत राहावी. इतिहासाचा अभ्यास म्हणजे व्यक्तीपूजा नसून घडलेल्या घटना कशा घडल्या याचे नि:पक्षपातीपणे अवलोकन करून ते प्रभावी आणि योग्य भाषेत मांडणे होय, जे कुरुंदकरांनी दोन्ही पुस्तकात दाखविले आहे. [इतिहासाबद्दल त्यात "जर-तर" द्यायचेच असेल तर लेखकाला स्वातंत्र्य असते पण त्यात जर भावनेला हात घालणारे हमखास यशस्वी रसायन मिसळले की मग इतिहास इतिहास राहत नसून ते एक दुखर्या मनाला फुंकर घालण्याचे साधन बनते.]
"त्यांच्या नेतृत्वाचा अभ्यास म्हणजे आपला आत्मविश्वास जागा करणाऱ्या एका युगप्रवर्तक नेत्याचा अभ्यास असतो"
~ सेनापतींच्या या विधानाशी सहमत. पण तो आत्मविश्वास जागृत करण्यासाठी 'नेत्या'च्या मुखवट्यात येणारी व्यक्ती त्या पवित्र नामाचा आधार घेऊन आपल्याला 'इमोशनल ब्लॅकमेकिंग' करीत नाही ना, याचा विवेक प्रत्येकाने पाळूनच आपले वर्तन ठेवले तरच त्या 'श्रीमंत योगी' ने आखून दिलेल्या वाटेवर आपल्याला चालण्याचा हक्क प्राप्त होतो हे लक्षात घेणे नितांत गरजचे आहे.
अशोक पाटील
@ ज्योति कामत ~ हंबीरराव
@ ज्योति कामत ~
हंबीरराव मोहिते यांच्याविषयी मांडलेले तुमचे मत त्या ज्येष्ठ सरसेनापतीच्या स्वामीनिष्ठेवर काहीसे अन्याय करणारे आहे.
हंबीरराव मोहित्यांनी 'शिवाजी' या नावाची शपथच घेतली होती आणि महाराजांच्या सान्निध्यात राहून त्यानी सर्वात मोठी शिकवण कुठली घेतली असेल तर ती म्हणजे योग्य व्यक्तीच्याबाबतीत अन्याय होऊ देणार नाही. सोयराबाईंचे ते थोरले बंधू म्हणजे थेट शिवाजी राजांचे मेहुणे. पण त्यांच्यावर आलेली मराठ्यांचे सरसेनापती ही जबाबदारी त्यांच्या व्यक्तिगत पराक्रमाचे द्योतक मानावे लागेल. पुढे महाराजांचे ते व्याहीही झाले. हंबीरराव मोहित्यांची कन्या 'ताराबाई' ही राजांचे दुसरे पुत्र 'राजाराम' यांची पत्नी झाली.
या नात्याने पाहिले तर मोहित्यांना आपला जावई म्हणून राजारामाविषयी प्रीती आणि जवळीक वाटणे अपेक्षित होते. पण शिवाजीराजांच्या मृत्युनंतर 'संभाजी' हेच ज्येष्ठ असल्याने [शिवाय पराक्रमीही] तेच मराठाशाहीचे पुढचे छत्रपती झाले पाहिजेत ही त्यांची न्याय्य भूमिका होती आणि ती त्यानी प्रकर्षाने जपली.
शिवाजींचे विश्वासू सल्लागार आणि सरदार अण्णाजी दत्तो सोमाजी दत्तो यानी संभाजीराजाच्या कारकिर्दीत आपला टिकाव लागणार नाही असे मानल्याने कोवळ्या राजारामाला गादीवर बसवावे आणि त्याद्वारे संभाजी सत्तेवर येऊ नयेत म्हणून जे प्रयत्न केले [त्यात सोयराबाईही सामील होत्याच] त्याचा या धाग्यात उहापोह करणे उचित नाही. तरीही वर म्हटल्याप्रमाणे राजारामाचे सासरे हंबीरराव मोहिते हेच खंबीर राहिले आणि त्यानी या सरदारांचे संभाजीला गादीपासून दूर ठेवण्याचे सारे प्रयत्न विफल ठरविले आणि त्यांच्याच कार्यवाहीमुळे संभाजीराजे हे दुसरे छत्रपती झाले.
अखेरपर्यंत हंबीरराव मोहित्यांनी याच भूमिकेचा पाठपुरावा केला आणि दुसरीकडे औरंगझेबाशी सातत्याने युद्धाची ज्योत तेवती ठेवली. अखेर वाई {सातारा} येथील अशाच एका लढाईत या शूर सेनानीला तोफगोळ्यांच्या मार्यात वीरमरण आले.
हा इतिहास आहे.
अशोक पाटील
@ पाटीलसाहेब, >>हंबीरराव
@ पाटीलसाहेब,
>>हंबीरराव मोहिते यांच्याविषयी मांडलेले तुमचे मत त्या ज्येष्ठ सरसेनापतीच्या स्वामीनिष्ठेवर काहीसे अन्याय करणारे आहे
याबद्दल जरा आश्चर्य वाटलं, कारण मी सरनोबताना कुठेही कमीपणा दिला नाही. उलट जवळच्या नात्यातल्या व्यक्तीसाठी शिफारस न करता स्वराज्याच्या हितासाठी त्यांनी असामान्य त्याग करणं हे या पार्श्वभूमीवर अजूनच उठून दिसतं इतकंच माझं म्हणणं आहे. त्यांच्या स्वामीनिष्ठेबद्दल प्रश्नच नाही, शिवाय त्याचं स्वामीने स्थापन केलेल्या स्वराज्याचं हित सर्वोपरि पाहणार्या या सेनानीचं स्वामीच्या प्रस्थानानंतरचं वागणं आणखीच आदर्शवत आहे.
अशोकदा.. मला वाटतंय तुम्ही
अशोकदा..
मला वाटतंय तुम्ही दोघेही हंबीररावांच्या बाजूनेच आणि बाजूचेच मत मांडत आहात. वाक्ये वेगळी आहेत इतकेच.. गैरसमज नसावा..
ज्योतिताई ~ तुमचे वाक्य असे
ज्योतिताई ~
तुमचे वाक्य असे आहे, "तसं असेल तर त्यांनी संभाजी राजाना साथ देणे हे अजूनच महत्त्वाचं दिसतं." ~ जे मी का कोण जाणे "....महत्वाचं होतं" असे वाचले, यामुळे त्या वाक्याचा सारा अर्थच बदलून गेला व सबब मला असे जाणवले की मोहित्यांचावर काही प्रमाणात अन्याय होत आहे. क्षमस्व.
पण त्या निमित्ताने हंबीररावांच्या एकूणच सेवेबाबत काही लिहिणे घडले. होते असे की कित्येक वाचकांना [जालीय नव्हे तर सर्वसाधारणतः सर्वच थरावरील] 'वारसा' बाबत सखोल माहिती असत नाही. फक्त शिवाजी, संभाजी, राजाराम, शाहू या चार नावानंतर मराठ्यांचा इतिहास संपतो व मग तिथून पेशवाई. अधेमध्ये सत्तेबाबत ज्या काही उलटसुलट घटना घडत जातात त्याचा अन्वयार्थ लावण्यासाठी हाती चटकन साधनेही उपलब्ध नसतात, मग ऐकीव माहितीवर विश्वास ठेवावा लागतो आणि जी नावे अंधारात राहतात त्यांच्याभोवती संशयाचे धुके साचत जाते.
असो. आशा आहे की हंबीरराव मोहिते संदर्भात मी लिहिलेल्या प्रतिसादामुळे आपल्या भावना दुखावल्या नसतील.
२. सेनापती ~ वरील खुलासा तुमच्यासाठीही आहे, कारण ज्योतिताई आणि मी त्या सेनानीसंदर्भात 'उजव्या' बाजूनेचे लिहित आहोत हे तुम्ही ओळखले आहे. धन्यवाद.
अशोक पाटील
फक्त शिवाजी, संभाजी, राजाराम,
फक्त शिवाजी, संभाजी, राजाराम, शाहू या चार नावानंतर मराठ्यांचा इतिहास संपतो व मग तिथून पेशवाई. अधेमध्ये सत्तेबाबत ज्या काही उलटसुलट घटना घडत जातात त्याचा अन्वयार्थ लावण्यासाठी हाती चटकन साधनेही उपलब्ध नसतात, मग ऐकीव माहितीवर विश्वास ठेवावा लागतो आणि जी नावे अंधारात राहतात त्यांच्याभोवती संशयाचे धुके साचत जाते.
>>> अशोकदा... खरेतर एक एक व्यक्तिमत्व घेऊन प्रत्येकावर किमान पानभर लिखाण व्हायला हवे. त्यांचे कार्यही लोकांपर्यंत पोचायला हवे असे वाटते..
सेनापती ~ इथले एक ज्येष्ठ
सेनापती ~
इथले एक ज्येष्ठ सदस्य श्री.झक्की यानीही तुमच्या गाजलेल्या 'पानिपत' धाग्याच्या निमित्ताने झालेल्या चर्चेच्या आधारे असेच मत मांडले आहे. त्यांच्या आणि तुमच्या आता इथे प्रकट झालेल्या विचाराचा हेतू अतिशय स्तुत्य आहे हे मला पटले आहे.
तुमची अनुमती असेल तर मी 'तशा' व्यक्तिमत्वांविषयी इथे जरूर लिहिण्याचा प्रयत्न करेन. मलाही तो काळ पुनश्च अभ्यासणे आनंदाचे वाटेल. [ही बाब श्री.झक्की यानाही मी स्वतंत्ररित्या कळविली आहेच.]
@अशोकदा, गैरसमजातून असो, पण
@अशोकदा, गैरसमजातून असो, पण त्या निमित्ताने आज आपण शिवरायांच्या काही तोलामोलाच्या साथीदारांचीही आठवण केली, त्यांच गुणवर्णन केलं हे फार छान झालं. तुम्ही जरूर लिहा. वाचायला नक्की आवडेल. एरवीही इतिहासाबद्दल फार कमी वाचायला मिळतं ही तक्रार आहेच!
अशोकदा.. अहो माझी कसली अनुमती
अशोकदा.. अहो माझी कसली अनुमती मागताय.. तुम्ही इथे (इथे म्हणजे मायबोलीवर, या धाग्यावर नव्हे) या विषयावर लिहिणार हेच वाचून मला अतीव आनंद झाला आहे. शक्य असल्यास इतिहास विभागात 'मराठ्यांची धारातीर्थे' किंवा 'इतिहासाच्या साक्षीने' या नावाने एक धागा सुरू करता येईल. तिथे सर्व लिखाण एकत्र ठेवता येईल. मायबोलीवर असणाऱ्या सर्व इतिहासप्रेमी सदस्यांकडून त्यावर लिखाण अपेक्षित असेल आणि ते ही आनंदाने करतील ह्याची मला खात्री आहे.. ह्यातून वाचकांना खूप माहिती एका जागी उपलब्ध होऊ शकेल. मी देखील या कामात आपल्याला सहाय्य करू शकीन.
सेनापती, अशोक.. शुभारंभ
सेनापती, अशोक.. शुभारंभ करावा. त्यानिमित्ताने माझ्यासाऱख्यांच्या तुटकफुटक ज्ञानात थोडी भर... शुभेच्छा
आणि ज्योताय.. थँक्यू हा... नाहीतर हंबीरराव मोहीते हे व्यक्तिमत्त्व माहीत पडलेच नसते
सेनापती, अशोकजी, आम्ही तुमचे
सेनापती, अशोकजी, आम्ही तुमचे लिखाण वाचायला अतिशय उत्सुक आहोत. खरंच इतिहास वाचून खूप वर्षे झाली. आणि मधे मधे कादंबर्या वगैरे वाचल्या तरी जर असे चर्चायुक्त वाचन असेल तर खूपच चांगले. प्रत्येक वेळी नवीन मवीन माहिती मिळतेच.
>>फक्त शिवाजी, संभाजी,
>>फक्त शिवाजी, संभाजी, राजाराम, शाहू या चार नावानंतर मराठ्यांचा इतिहास संपतो व मग तिथून पेशवाई<<
पेशवाई मराठ्यांच्या इतिहासापासुन वेगळी आहे का? "मराठ्यांचा इतिहास" लिहिलं गेलंय; तुम्हाला "छत्रपतिंची राजकारभारातील सक्रिय कारकिर्द" असं म्हणायचं आहे का? या चार छत्रपतिंच्या कारकिर्दिनंतरहि मराठ्यांनी इतिहास घडवला.
राज ~ काहीतरी गैरसमज होतोय
राज ~ काहीतरी गैरसमज होतोय तुमचा.
लेट मी ट्राय टु एक्स्प्लेन :
माझ्या आणि ज्योति कामत या सदस्या यांच्या दरम्यान महाराजांचे सरसेनापती "हंबीरराव मोहिते' यांच्याविषयी छोटीशी चर्चा झाली. त्या दरम्यान मोहित्यांनी ते 'राजारामा'चे सासरे असूनही न्यायपूर्णरितीने संभाजी हेच गादीचे वारस होतील हे पाहिले आणि संभाजीवर नाराज असणार्या त्यावेळेच्या सरदार आणि अमात्यांचे प्रयत्न डावलले गेले. महाराजांचे वारस आणि मग तो प्रवास कुठपर्यंत चालला असा एकूण त्या चर्चेचा सूर होता. म्हणून मग शिवाजी संभाजी राजाराम शाहू इथपर्यंत तो विषय चालला आणि मग शाहूंनी बाळाजी विश्वनाथांकडे राज्यशकट सोपविल्यावर "महाराज" परंपरा संपुष्टात आली व पेशवेपदावरून मराठा राज्याची वाटचाल सुरू झाली, ती देदीप्यमान होती यात संदेह नाही. [मृत्युपूर्वी घातल्या गेलेल्या शाहूच्या अटीनुसार जरी 'भट' घराण्याकडे वंशपरंपरागत "पेशवे" पद राहिल असे असले तरीही सातारा गादीवर बसलेल्या छत्रपतीच्या वंशजाला पेशव्यानी 'स्वामी' नावानेच संबोधावे अशी प्रथा होती, जी पेशव्यांकडून, ते सर्वार्थाने मराठा राज्याचे प्रमुख झाले तरी, पाळली जात असे].
या अर्थाने त्या वाक्याकडे कृपया पाहावे. धन्यवाद.
अशोक पाटील
नमस्कार मी आपले लेख वाचतो आणि
नमस्कार
मी आपले लेख वाचतो आणि खूपच माहिती पूर्ण असतात. हिरोजी इंदुलकर आणि बहिर्जी नाईक बाद्दल काही माहिती मा. बो. वर देऊ शकाल का?
धन्यवाद
विनायक परांजपे
सेनापती, शिवरायांच्यावरचा हा
सेनापती,
शिवरायांच्यावरचा हा लेख सुंदरच आहे.
विनायक... वरती उल्लेख
विनायक... वरती उल्लेख केल्याप्रमाणे इतिहासातील सर्वच संबंधित व्यक्तिमत्वांची ओळख व्हावी यासाठी लिखाण नक्कीच केले जाईल.. धन्यवाद..
अप्रतिम लेख सेनापती वर
अप्रतिम लेख सेनापती
वर विनायक परांजपे यांनी म्हटल्याप्रमाणे हिरोजी इंदुलकर आणि बहिर्जी नाईक यांच्याबद्दलही वाचायला आवडेल. मला वाटते महाराजांनी जिंकलेल्या सर्व लढायांमध्ये बहिर्जींच्या गुप्तहेरीचाही सिंहाचा वाटा होता.
अवांतर :
<<<<एवढे प्रचंड ओझे राज्यावर असताना , १ तप यातना भोगून, जाळपोळ, नासधूस, नुकसान सहन करूनही जनतेची निष्ठा तसूभर देखील कमी का झाली नाही ??? या लोकांना राजांनी असे काय दिले होते ??? बाजीप्रभु असो नाहीतर शिवा काशिद ... तानाजी असो नाहीतर मुरारबाजी ... ह्या सर्वात एक विलक्षण साम्य आहे. माणसे लढताना मरतात ही लढाई मधली नित्याची बाब आहे. पण जाणीवपूर्वक आपण मरणार याची खात्री असताना, केवळ मरण्यासाठीच लढतात ही अभुतपुर्व गोष्ट आहे. ह्या माणसांना मरण्याची प्रेरणा कुठून मिळते ???>>>
हा खरोखर सगळ्यात मोठा चमत्कार होता शिवाजीराजांनी घडवलेला....!!
मस्त लेख आहे सेनापती... पुढील
मस्त लेख आहे सेनापती... पुढील लेखनाची वाट पहातो आहे..:)
कुरुन्दकरान्चा लेख अप्रतिम
कुरुन्दकरान्चा लेख अप्रतिम असणारच, परन्तू त्य वरिल चर्चा जास्त माहितिपूर्ण आहे.
सुहास क्षीरसागर
Pages