रोज सकाळी सात - साडेसातला आवरून उठून बाहेर पडणे व थोड्या अंतरावर असलेल्या हायवे वर जाऊन जी-२ बस पकडणे व आडीगुडी नाहीतर बिटीएम ऑफिसला पोहचणे हे रोजचे रुटिंग. दिवसभर कामे करून संध्याकाळी परत जी-२ पकडणे व परत इलेक्ट्रॉनिक सिटी कडे परत... येथे प्रत्येक बसला दोन दरवाजे आहेत, एक पुढील स्त्रियांसाठी राखीव व दुसरा मधला मोठा दरवाजा, जसा एअरपोर्ट वरील बसमध्ये असतो तसा, स्वयंचलित व त्या दरवाज्या पुढील ड्रायव्हर पर्यंतच्या सर्व सीट स्त्रियांसाठी राखीव. सकाळ सकाळी बसला आमच्या स्टॉपवर गर्दी नसते, बस तशी रिकामीच, थोडीफार माझ्या सारखी लवकर बाहेर पडणारी काही जणं सोडली तर, बसमध्ये शुकशुकाटच असतो.
तर मी काय सांगत होतो, एके दिवशी असाच जरा उशिर झाल्यामुळे गडबडीत बसमध्ये शिरलो व दरवाज्या समोरच्याच सीटवर जाऊन बसलो. तोच बस थोडी स्लो झाली व थांबली, माझ्या समोरचा दरवाजा उघडला व ती कशीबशी आत आली, जगाची परवा न करता तीने आपली खांद्यावरील बॅग नीट केली व राखीव असलेल्या माझ्या पुढील सीटवर बसली.. टिकीट काढले व नंतर मी मोबाईलवर गेम खेळण्यात गुंग झालो व बसमध्ये कधी गर्दी वाढली, कधी कोण चढले-उतरले ह्यांचा मला विसर पडला.
पुन्हा दुसर्या दिवशी, मी नेहमी प्रमाणे जरा उशीराच आलो, पण बस अजून थांबलेली होती, आत गेल्यावर नेहमीच्या सीटवर बसून मी बॅग मांडीवर ठेऊन हुश्श करत बसलो, तोच कंडक्टर समोर आला, टिकीट काढलं व जरा समोर नजर फिरवली, आज थोडी स्त्रियांची गर्दी होती, कालची ती कुठे दिसते का हे नजरेने पाहिले पण नाही, आपल्याला काय म्हणून खिश्यातून मोबाईल काढला व गेम सुरू करणार तोच दरवाजा उघडला व ती आपली बॅग व स्वतःला सांभाळत बस मध्ये चढली, समोर सीट मोकळी दिसत नसल्यामुळे ती च्या कप्पाळावर आट्या पडायला सुरू होण्याआधीच मी उठलो व सीट ती ला दिली , ती हसली. मी बॅग उचलली व मागे मोकळ्या असलेल्या सीटकडे निघणार तोच ती म्हणाली "इल्ले खुंडरी ( येथेच बसा.) याडं मंदी सीट इदे. ( दोन माणसांची सीट आहे)" मी हसलो व त्या रिकाम्या सीटवर बसलो. ती आपले पुस्तक वाचण्यात दंग झाली व मी मोबाईलवर गेम खेळण्यात. पण होसा रोड स्टॉप नंतर गेम मध्ये हरल्या मुळे म्हणा अथवा मूड नव्हता म्हणून म्हणा, मी गेम बंद केला व मग इकडे तिकडे पाहिले.. तर ही बाजूला बसून एक कुठलसं पुस्तक वाचत होती. आता जरा मी हिला निरखून पाहू लागलो.
सावळा रंग, काळेभोर डोळे, केसाला तेल लावून नीट वेणी घातलेली व त्या वेणी मध्ये कसलसं तरी एक पिवळसर फुलं. आकाशी रंगाचा झाक असलेला ड्रेस, खाकी रंगाची बँग व हातात कन्नड भाषेतील एखादे पुस्तक. मी तिच्याकडे पाहत आहे ह्यांची ती ला शक्यतो जाणीव झाली व तीने पुस्तक खाली करून माझ्याकडे पाहीले व एक स्मित हास्य केले, मी देखील उत्तर म्हणून स्मितहास्य दिले. काही वेळाने ती चा स्टॉप आला, गर्दीतून वाट काढत, स्वतःला व आपल्या बॅगला सावरत ती उतरुन गेली, माझ्या बाजूला रिकाम्या झालेल्या सीटवर दुसरा कोणीतरी येऊन बसला..
रोजचीच दिनचर्या झाली ही.. मी तिच्यासाठी नाहीतर तीने माझ्यासाठी सीट राखीव करून ठेवायची, ती अत्यंत उत्तम असे कन्नड बोलत असे ( जसे मराठी भाषेत पुणेरी भाषा ही उत्तम व कोल्हापुरी म्हणजे.... तसेच) व माझी कन्नड एकदम दैवी, ती लाच काय कधी कधी मला देखील कळत नसे मी काय बोललो ते. मग ती खुदुखुदू करून हसायची व मी तेव्हा माझ्या लक्ष्यात आले, हसताना ही च्या दोन्ही गालावर सुंदर खळी पडते.. आता मी रोज बस स्टॅन्डकडे जाताना अण्णाच्या दुकानातून तिच्यासाठी चॉकलेट्स इत्यादी घेईन जाऊ लागलो... न कळत ह्या बसच्या प्रवासात एक नाते निर्माण होऊ लागले.
ती चे व माझे सुट्टीचे दिवस सोडले तर रोजच बस मध्ये भेट होत असेच. हसणे खेळणे, अखंड बडबड करणे हा ती चा स्वभाव व जीवनाच्या भवर्यामध्ये अडकलेला माझ्या सारखा, आजकाल हसणे, बागडणे, बडबड करणे विसरुन गेला होता.. पण पुन्हा पालवी फुटली तिच्या जिवंत वागण्यामुळे. रोजच फक्त काही अर्धा-पाऊण तास असलेली ही प्रवासातील सोबतीनं जिवापाड आवडून गेली मला. कधी मैत्रिणींचे किस्से तर कधी घरातली भाऊ-बहिणीची गुपिते, तर आज डब्यात काय ओळख, हा खेळ. चालू असायचे ती चे काही ना काही. दिवसाच्या अश्या आनंददायी सुरुवातीमुळे दिवस पुर्ण आनंदात जात असे.. आपल्या हसण्याचं गुपित कळलं होतं मला...
ती चे नाव सरु, सरोजिनी. आडनाव व इतर गोष्टी विचारल्या नाही, नंतर विचारेन कधीतरी. असेल वय तीचे १०-१२ वर्ष. कन्नड शाळेत शिकायला जाते रोज. जी-२ बस ती च्या शाळेसमोरच थांबते, त्यामुळे ती ची कामावर जाणारी आईतील बसमध्ये बसवून जाते, गेली एक वर्ष ती अशीच एकटी जाते शाळेला, पण बसमधले नियमित प्रवासी ती ला ओळखतात त्यामुळे ती पण निर्धास्त व ती च्या घरचे देखील. बस कंडक्टर बस मुद्दाम ती च्या साठी म्हणून बस ती च्या शाळेच्या गेटवर थांबवतो, व मग थोडेच पुढे असलेल्या बस स्टॉपवर.. शाळा सुटल्यावर ती चे वडील ती ला शाळेतून घरी घेऊन जातात.. डाव्या पाय थोडा अखूड असल्यामुळे थोडी लंगडत चालते.. पण अत्यंत चपळ मुलगी...
काही दिवसांपूर्वी ती ची आई ती ला बस स्टॉपवर सोडायला आली होती बस अजून आली नव्हती, मला पाहताच सरु पटकन माझ्याकडे आली, मग आईला माझी ओळख करून दिली.. ती ची आई म्हणाली, रोजचे बस वाले सरुची काळजी घेतात, पण ती अपंग आहे म्हणून, पण का काय माहीत तुमचा ती ला लळा लागला आहे, ती च्या मते, तुम्ही ती अपंग आहे ह्यांची आता पर्यंत एकदा ही तिला जाणीव करून दिली नाही की पाया बद्दल कधी एक प्रश्न केला नाही, घरी आली की तुमच्या बद्दल सांगितल्या शिवाय दुसरे काहीच करु देत नाही.. मी हसून तिच्याकडे पहिले त्यांना हातानेच राहू दे म्हणालो व एक स्मित केले व त्या चिमुरडी बरोबर पुन्हा नवा गेम खेळण्यात दंग झालो.. अश्या वेळी काय उत्तर द्यावे व प्रतिक्रिया करावी तेच कळत नाही.. म्हणून मी निरुत्तर झालो होतो.. ती च्या आई समोर मी काही नाही म्हणालो पण ती ला नक्कीच सांगितले की अश्या प्रसंगी मला ओशाळल्या सारखं होतं... ती नक्की हे घरी सांगेल...
मन झर करून मागील जानेवारी - ते मे महिन्याच्या कालावधी कडे आपसूकच गेले.. व अपघातामुळे हातात आलेल्या पण कधीच घरी ठेऊन दिलेल्या काठीचा स्पर्श का माहीत पुन्हा एकदा जाणवला.... रोजचा हा प्रवास किती दिवस चालू राहणार आहे काय माहीत पण जे चालू आहे त्यामुळे मला एक वेगळेच सुख मिळत आहे.. लहानपणी मी देखील तिसरीत असल्यापासून अक्काचा हात धरुन अख्खा महाद्वार रोड पार करून नूतन मराठी शाळेत जात असे, तेव्हा अक्का पहिलीला होती.. ते दिवस काय केले तरी मला आठवत नसतं... पण ह्या चिमुरडी मुळे ते दिवस मी आता लख्ख पाहू शकतो,जसा मी तेथेच उभा आहे.. दिवस बदलायला वेळ नाही लागत.. पण मागच्या आठवणी हरवू लागल्या तर मन कसे बेचैन होतं... मनातील हा भाव ह्या एका निरागस हसण्यामुळे कुठल्या कुठे निघून गेला..
सरु आता देखील रोज भेटते... पण पुढे नाही भेटेल काही दिवसांनी तिच्या शाळेला सुट्टी लागेल, शक्यतो मी देखील त्याच जी-२ मधून प्रवास करत असेन असे खात्रीने सांगू शकत नाही.. पण एका लहानग्या मुलीने अगदी ती च्या नकळत मला माझे बालपण परत दिले.. ती मला कदाचित विसरुन ही जाईल.. पण हा दिड महिन्याचा प्रवास माझ्यासाठी, माझ्या आठवणींच्या खजिन्यासाठी मोलाची भर घालत आहे....
पुर्वप्रकाशित.
(No subject)
मस्तच रे....
मस्तच रे....
छान लिहिलय
छान लिहिलय