तुम्ही लिहा मी वाचतो : माझा नवा धंदा

Submitted by असो on 29 January, 2012 - 05:18

सध्या ब-याच संस्थळांवर बरेच जण बरंच काही लिहीत आहेत. बरेच हा शब्द मागे पडून बहुतेक हा शब्द देखील मागे पडतोय आणि जवळजवळ सर्वच असा नवाच शब्दप्रयोग रूढ होऊ पाहतोय. पूर्वी कसं मोजकेच लोक लिहायचे. इतरांना त्यांचं अप्रूप असायचं. ते देवलोकातून आले असावेत असं लोकांना वाटायचं. काही जण तर त्यांना हात लावून पहात असत. आता मात्र सगळेच लिहू लागल्याने लिहीणे म्हणजे विशेष काय ते असं वाटू लागलं आहे. उलट जे कुणी लिहीत नाहीत त्यांच्याबद्दल हल्ली अप्रूप वाटतं. न लिहीता हा मनुष्य कसा काय राहू शकतो असं वाटून लोक त्यांना हात लावून पाहताना दिसतात. हा कुणी देवलोकीचा संतच असावा अशीच शंका यावी इतके न लिहीणारे दुर्मिळ होत चालले आहेत.

लिखाणाचं प्रमाणही इतकं प्रचंड आहे कि पहिलं पान हा पुण्यातल्या रस्त्यांचा आखाडाच झालाय. आत्ता होता गेला कुठं असं आपल्या धाग्याबद्दल पाचच मिनिटात म्हणावं लागतं. लेख तर लिहीला पण चक्रव्यूहात हरवलेल्या अभिमन्यूसारखा तो हरवून जायला नको असेल तर प्रतिसाद नावाचे सैनिक त्याच्या दिमतीला हवेत तरच हा चक्रव्यूह भेदण्याची आशा आहे.

पण ज्याला त्याला काळजी आपल्याच लिखाणाची. दुस-याचं लिखाण वर काढलं तर आपलं खाली जाईल ही भीती देखील हल्ली कित्येक *जाळीदार लेखकांच्या ललाटावर दिसून येते. *( जाळीदार = नेटवरचे).

तर या परिस्थितीचा बारीक अभ्यास केल्यानंतर माझ्या एका शहा नावाच्या मित्राने एक व्यवसाय सुरू केला आहे. तो लेख वाचायचे पैसे घेतो. त्याला मराठी येत नसल्याने मराठीत हा व्यवसाय आपण का करू नये असे पत्नीने सुचवल्यावरून मी देखील या धंद्यात उडी घेतली आहे.

तुम्ही लिहा मी वाचतो असं ढोबळ आणि धंद्याबद्दल सुस्पष्ट असं नाव देऊन संस्था नोंदणीकृत केली आहे. तुमचं लिखाण मी वाचतच असतो. फक्त आता इथून पुढे प्रतिसाद हवा असेल तर त्याचे चार्जेस पडतील.

सर्वात कमी चार्जेस प्रकाशचित्र या विभागासाठी राहतील ( कारण उघड आहे. लगेच पाहून होतात). लिखाण वाचायला किती वेळ लागतो यावर चार्जेस अवलंबून राहणार असल्याने कादंबरीकारांनी खिसा मोकळा करण्याची तयारी ठेवावी. याचा अर्थ कादंबरीसाठी सर्वात जास्त पैसे आकारले जातील असं वाटत असेल तर ते चूक आहे.

सर्वात जास्त दर कविता या विभागासाठी ठेवण्यात येणार आहे ( हे ही कारण उघड आहे. मागणी वाढली कि दर वाढतात). गझल या विभागामधे प्रत्येक शेरामागे एका कवितेचा चार्ज आकारण्यात येईल. ललितांचे पेव फुटले असल्याने धंदा जास्त होईल हे माहीत असतानाही ललितासाठी सेवा देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. कारण काही काही ललितं वाचल्यावर इंजिनातून (मेंदूतून) धूर येणे, विचित्र आवाज येणे अशा समस्या आल्याने ही सेवा नंतरच सुरू होईल.

गूढ / दुर्बोध कवितांना न वाचताच प्रतिसाद दिले जातील याची नोंद घ्यावी. मागाहून तक्रार चालणार नाही. क्रमशः कादंब-यांना प्रत्येक भागास एका कादंबरीचा चार्ज आकारण्यात येईल. वाद घालण्यात येऊ नये. एकाच स्थावर मालमत्तेच्या प्रत्येक व्यवहारासाठी प्रत्येक वेळी स्टँप ड्युटी / रजिस्ट्रेशन फी आकारण्यात येते. हाच नियम इथे लावला आहे. कादंबरी एकाच भागात प्रकाशित केली असल्यास लेखकाची बचत होईल.

दरपत्रकासाठी आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. या व्यवसायात नवे प्रतिस्पर्धी येण्याची शक्यता गृहीत
धरून त्याबाबतीत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. हा व्यवसाय आपल्या पसंतीस उतरून आपण आम्हांस आपली सेवा करण्याची संधी द्याल अशी आशा बाळगतो.

कळावे.

आपला नम्र

व्यावसायिक वाचक

तळटीप : आपल्या शंका / मौलिक सूचना यांचे स्वागत आहे ( त्यासाठी चार्जेस पडणार नाहीत Happy ).

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धंद्याची जाहीरात करणे हे आद्यकर्तव्य असल्याने रिक्षास्टँड आणि शक्य त्या सर्व ठिकाणी रिक्षा फिरवण्यात येईल याची नोंद घ्यावी.

पाभे Proud

ए ना चालो बे
तुम्ही स्वतः कविता पण लिहीणार आणि प्रतिसादाचे पैसे घेणा-या मंडळींत (कंपनी) नोकरी पण करणार.. ये बात कुछ हजम नही हुई !

पाषाणभेद

नोकरीच्या जागा निघणारच कि. इतक्या लोकांचं एकट्यानेच वाचायचं म्हटलं तर हा जन्म पुरेल का ? Wink

Rofl

>>ललितांचे पेव फुटले असल्याने धंदा जास्त होईल हे माहीत असतानाही ललितासाठी सेवा देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. कारण काही काही ललितं वाचल्यावर इंजिनातून (मेंदूतून) धूर येणे, विचित्र आवाज येणे अशा समस्या आल्याने ही सेवा नंतरच सुरू होईल.

Biggrin अशक्य हसतोय

हे तुम्ही लिहीलेलं वाचणार्‍यांना काय्/किती चार्ज देणार आहात? Rofl

पाटी दिनकर पाटील आणि टोकुरिका

धंदेवाले कधी पैसे देतात का ? Wink
उलट सेवेची माहीती पोहोचवल्याबद्दलशुल्क आकारलेलं नाही याची नोंद घ्यावी Happy

24 तास ऑनलाइन असतो...झोपण्याचे सोडुन

बस बस बस... बायोडेटाची गरज नाही आता Happy

मी तर एक पक्की वाचक आहे.
लिहीता तर मला येतच नाही Proud (मग माझी नोकरी पक्की ना? )

१,५०,००० चालतील मला..........पीफ डिए वगैरे कापुन एवढा तरी हातात यायला हवा...तरच हे काम परवडेल... Happy
गझली आणि कवितांचे थोडे जास्त मिळतील का ? कारण प्रतिक्रिया देण्या अगोदर त्या वाचाव्या पन लागतील..आणि समजल्याच तर समजुन सुध्दा घ्याव्या लागतील Happy

प्रती,
'तुम्ही लिहा मी वाचतो'

मा. महोदय,
आपला उपक्रम अतिशय प्रशंसनीय आहे.
कोणत्याही लेखाला/कवीतेला चालतील असे 'टिपीकल' संक्षीप्त आणि त्याचप्रमाणे दिर्घ स्वरूपाच्या प्रतीसादांची मोठ्ठी यादी माझ्या कडे तयार आहे. उदा. १-भन्नाट कल्पना...२-सुंदर.. ३-अप्रतीम ...४-झक्कास..५- नेहमी प्रमाणे निनांत सुंदर लेख..६-वाचूनच मन प्रसन्न झाल...७-अरे वा! .. ८-छान वृतांत लिहिलायस ९-मजेशीर.......ई.ई..
यापूर्वी फक्त चांगले प्रतीसाद देतो असा (माबो वर) माझा लौकीक असला तरी काही कुपापत काढून प्रतीसाद वाढवण्यातही माझा हातखंडा आहे. वेगवेगळ्या आयडी सहीत माझी तात्काळ उपलब्धता शक्य आहे.
तरी कॄपया योग्य पदासाठी माझा विचार करावा...
धन्यवाद

१.५० लाख .... Uhoh
चिऊ - हंगाश्शी

चंबूशेठ - कोपरापासून नमस्कार ! दुकान आपलंच आहे Happy
मात्र कुरापतींची सेवा आपण न दिलेलीच बरी, नाही का ? होतकरू लेखकांना मात्र फी न देता रसद पुरवत जाऊ आपण ( पण ते कुणाला कळलं नाही पाहीजे Happy )

अनिल भाउ जर जास्त वाटत असेल तर मी कमी करण्यास तयार आहे.......पण मी मग कविता आणि गझल यांच्यावर प्रतिसाद देणार नाही...मान्य असेल तर तुम्ही देइल तेवढा पगार स्विकार करु

उदयवन ..काय राव आमच्याशीच घासाघीस का ?

( हा प्रतिसाद धंद्याची जाहीरात या व्यावसायिक दृष्टोकोणातून दिलेला आहे याची नोंद घ्यावी )

काही दिवस आम्हाला मायबोलीवर येता आले नाही. म्हटलं पुन्हा एकदा धंद्याची आठवण करून द्यावी
( ऑनलाईन पब्लिक कि मेमरी छह घंटे की होती है Wink )

अच्छा असे आहे होय. मी आधी लेखाची तारीख बघीतलीच नाही.:फिदी: घडामोडीत काहीतरी उपहासात्मक लिहीले आहे असे समजून वाचायला आले.:फिदी: आम्ही आपले नुसतेच वाचक.

कोणत्या साहित्य प्रकाराला किती चार्जेस लावायचे ह्याचे बिझीनेस मॉडेल आमच्या कंपनीला ऑट सोर्स कराच म्हणते मी Rofl