माझी व्हिएन्ना यात्रा - सिंहावलोकन - २
भाग १ : http://www.maayboli.com/node/6559
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मला नेहमी एक प्रश्न पडायचा, तो म्हणजे या ढगाई सुंदर्या खुर्चीचे पट्टे सोडण्याचा संकेत आला की कपडे कशाला बदलून येतात ? इतकी काय ते हौस आपले वेगवेगळे गणवेश दाखवण्याची...पण या वेळच्या प्रवासात ते ही उत्तर मिळाले.. जी मुलगी ते ट्रॉलींचे व्यवस्थापन करत होती, तिने कशासाठी तरी एक थोड्या उंचीवरचा कप्पा उघडला आणि तिच्या अंगावर पावसाला सुरुवात झाली.. त्या कप्प्यात असलेल्या पाण्याच्या बाटल्यांपैकी एक बाटली गळत होती आणि हे लक्षात येईपर्यंत ती सुंदरी ओली झाली होती. झाले एवढे थोडे होते की काय म्हणून तिच्याच अंगावर नंतर एकदा पाण्याच्या रिकाम्या बाटल्या पण पडल्या. विमानात मनोरंजनाची सोय असते हे माहिती होतं, पण इतकं मन लावून कोणी ही जबाबदारी उचललेली या आधी पाहिली नव्हती.
मध्येच एकदा माझ्या डोक्यावरचा दिवा चालू झाला, बघितले तर माझ्या शेजारचा लेकुरवाळा झोपेत त्याच्या बाजुच्या रीमोट कंट्रोल वर सरकला होता आणि म्हणून त्याच्यासाठी असलेला दिवा चालू झाला होता. मी आपलं हळूच शुक शुक केलं, मग जरा जोरात शुक शुक केलं, माझ्या दुसर्या बाजुला बसलेला मुलगा दचकून जागा झाला (हो, आता आहे माझा आवाज थोडासा वरच्या पट्टीतला, नाही असं नाही), पण हा लेकुरवाळा ढिम्म हलला नाही.. शेवटी पूर्ण वेळ डोक्यावर दिवा चालू आणि शेजारी त्याचे झोपेतले शिट्टी संगीत अशा साथीने माझा प्रवास झाला..
तर असे मजल दरमजल करत आम्ही व्हिएन्ना ला पोचलो. फारसे काही उल्लेखनिय न होता सामान घेऊन बाहेर पडलो. विमानतळावरून हॉटेलवर जातानाचा प्रवास एकदम निसर्गरम्य होता.. आजुबाजुला शेते, छोटी डबकी दिसत होती, नुकताच पाऊस पडून गेला होता, त्यामुळे वातावरणात एक प्रकारचा ताजेपणा होता.(आता तसं म्हटलं तर पूर्ण युरोप मध्ये ४-६ महिने कायमच हवेत ताजेपणा भरलेला असतो असे म्हणावे लागेल...सारखा रिप रिप पाऊस पडतच असतो, साधारण ऑक्टोबर ते मार्च या काळात)
एक उल्लेख करायचा राहिला...दुबई विमानतळावर ध्वनिवर्धकावरुन हिंदी भाषेत घोषणा ऐकली आणि बरं वाटलं... तसं लंडन मध्ये पंजाबी भाषेत रेल्वे स्थानकाच्या पाट्या पाहिल्या होत्या पण स्वित्झर्लंड ला टिटलीस पर्वतावरची हिंदी पाटी सोडली तर हिंदी चा फारसा वापर पाहिला नव्हता.. जवळ जवळ नाहीच...त्यामुळे कदाचित अजून छान वाटलं असेल..
आल्या दिवशीच कामाला सुरुवात झाली आणि असं जर काम करायला लागणार असेल तर व्हिएन्ना बहुधा ऑफ़ीस मध्ये बसुनच पाहावं लागेल असा विचार मनात येऊन गेला. खूप काम केल्यावर खूप भूक लागते असं ऐकलं होतं..(हे मीच स्वत:ला काही वेळापूर्वी सांगितलं होतं असं अंधूक आठवत होतं) त्याप्रमाणे लवकरच मला खूप भूक लागली आणि जेवणाची सुट्टी घेऊन बाहेर पडलो..
जेवणाची सोय हमखास होण्याची जागा म्हणजे सिटी सेंटर.. सर्व युरोपीअन शहरात असतं तसं इथेही शहर मध्य उर्फ़ सिटी सेंटर मध्ये उत्साहाचं वातावरण होतं. एकच रस्ता, तो पण गाड्यांना बंदी असलेला. या टोकापासून त्या टोकापर्यंत, दोन्ही बाजुला दुकानं दाटीवाटीत उभी...जिकडे पाहावं तिकडे भेटवस्तूंची आणि चॉकोलेट्स ची दुकानं, उरलेली जागा कपड्यांच्या दुकानांना... या मध्यवर्ती रस्त्यावर जवळपास सगळी मोठ्या आणि प्रसिद्ध ब्रॅंड ची दुकानं आहेत. रस्त्याच्या एका टोकाला सेंट स्टीफन्स कॅथेड्रल आणि दुसर्या टोकाला जगप्रसिद्ध ऑपेरा थिएटर आहे... त्याविषयी नंतर लिहीनच..
शहरावरचा हा पहिला दृष्टीक्षेप इथेच आवरता घेऊन पोटपुजेचा प्रबंध करण्याकडे वळलो. एका झकास (दिसणार्या) चायनीज हॉटेल कडे मोर्चा वळवला. तशीही इतकी थंडी होती की पाय न ठरवता आपले आपण वळतच होते..
इथल्या हॉटेल्स मध्ये म्हणा किंवा अगदी बर्गर किंग सारख्या फ़ास्ट फ़ूड चेन मध्ये म्हणा, एक गोष्ट सारखी आढळली आणि ती म्हणजे किंमत ही तुम्ही एका पदार्थातले किती घटक (इन्ग्रेडीएन्ट्स) घेता यावर अवलंबून असते..साधा तिखट सॉस मागा, वेगळे पैसे. बर्गर घेतलात, चीज चे पैसे वेगळे, केचप चे पैसे वेगळे. माझा एक सहकारी म्हणाला, तो विचारणार आहे की बर्गर चा बन मी आणला तर किती पैसे कमी कराल म्हणून... अर्थात त्याच्या अंगात 'ते' उत्तरेकडचे रक्त खेळत असल्याने त्याने हे खरंच विचारलेले असू शकेल असे मला उगाच वाटून गेले
आलोच आहे तर पारंपारिक ऑस्ट्रियन अन्न काय असते हे बघायचे असे ठरवले होते. ती संधी लवकरच आली. इथे एका प्रसिद्ध खोपटामध्ये (खरं तर हॉटेल मध्ये, तेथे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त टेबल खुर्च्या ठेवलेल्या होत्या, इतक्या जवळ की पाठीला पाठ लावून बसणे हा केवळ शब्दप्रयोग ठरू नये) schnitzel खायला गेलो. schnitzel चा अर्थ Cutlet without bones. यात व्हील (गोमांस) चा अतिशय पातळ तुकडा, साधारण आपल्या भाकरी एवढ्या आकाराचा (आपली आजी करायची तेवढी मोठी भाकरी नाही बरं का.. ही आपली मध्यम आकाराची भाकरी), लिंबाची फाक आणि बटाट्याचे सॅलड या बरोबर दिला जातो, काही ठिकाणी जॅम पण देतात. अर्थातच मी हे खाऊ शकत नसल्याने माझ्यासाठी तसाच दिसणारा चिकन चा तुकडा आला.. हे व्हिएन्ना चे schnitzel इतके प्रसिद्ध आहे की कायद्याने wiener schnitzel हे नाव राखून ठवलेले आहे. पण हल्ली हे पोर्क चे वगैरे पण करतात असे कळले..
Schintzel संबंधी अधिक माहिती या दुव्यावर मिळेल http://en.wikipedia.org/wiki/Schnitzel
हे ते खोपट जेथे आम्ही गेलो. कधीही बघा, एकदम भरलेले असते.
खाण्याचा विषय निघालाच आहे तर अजून एक गोष्ट पूर्ण महाद्वीपीय (Continental, भाषांतर गूगल कडून साभार) युरोप मध्ये सामायिक आढळली, ती म्हणजे गोड खाण्याचे प्रमाण. ब्रसेल्स मध्ये जो तो उठल्या सुटल्या चोकोलेट्स खात असायचा, अगदी मुली पण.. इथे त्या चोकोलेट्स ची जागा वेगवेगळ्या पेस्ट्रीज आणि केक नी घेतली आहे. जेवणात असला एक तरी पदार्थ घेतल्याशिवाय कोणी जेवतच नाही. अगदी सडपातळ बांध्याच्या ललना देखील केक मात्र आवडीने खाताना दिसल्या.. बांध्याचा अगदी बंधारा झाला तरी बेहत्तर पण गोड न खाता हलायचेच नाही असे ठरवूनच त्या कदाचित जेवायला येत असतील. जेवणाच्या मेन्यू मध्ये खोबर्यासारखं दिसणारं गोडसर सारण भरलेले वडे, पिठीसाखरेत घोळून ठेवलेले पाहिले.. त्यामुळे शुद्ध शाकाहारी लोकांना बाकी काही नाही मिळालं तरी केक खाउन जगता येत असणार.. फ़्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी मेरी अंटोइनेट ने दिलेला 'केक खा' हा सल्ला आपल्यालाच दिला आहे असं या लोकांना कदाचित वाटलेलं असणार...
क्रमशः
मस्त
मस्त चविष्ट झाला हा भाग!!

ढगाई सुंदरीची फजिती मस्त आहे!
फोटोज असतील तर ते पण टाक ना(ढ.सुं. चे नव्हे!).. मजा येईल वाचायला..
>>>>या ढगाई
>>>>या ढगाई सुंदर्या खुर्चीचे पट्टे सोडण्याचा संकेत आला की कपडे कशाला बदलून येतात ?
बापरे, इतक्या वेळेला केलेल्या प्रवासात मी कधीही नोटिस केली नाही ही गोष्ट.
वाचतेय.
वाचतेय. मस्त. पुढचा भाग येऊ द्या लवकर.
>>> इतक्या
>>> इतक्या वेळेला केलेल्या प्रवासात मी कधीही नोटिस केली नाही ही गोष्ट.

मी पण नाही.
>> जो तो उठल्या सुटल्या चोकोलेट्स खात असायचा, अगदी मुली पण..
तुम्ही
तुम्ही कशाला नोटीस कराल ? :p
एमिरेट्स आणि गल्फ मध्ये तर मी कायमच हे बघितले आहे
एकदा व्हर्जिन मध्ये आणि स्विस मध्ये पण.
विमानातून बाहेर जायचा गणवेष खराब होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जात असावी हा माझा तर्क. पुरुष सर्वसाधारणपणे फक्त त्यांचं जॅकेट काढून ठेवतात.
विमान कुठून कुठे चाललं आहे, प्रवासी कोण आहेत यावर पण अवलंबून असू शकेल
चॉकोलेट्स आणि ती पण गठ्ठ्याने / जथ्याने
एखादा तुकडा खाणे हे माहिती नसणार.
छान
छान मिलिन्दराव,
>>माझ्यासाठी तसाच दिसणारा चिकन चा तुकडा आला
म्हणजे चिकनसारखा दिसणारा veal चा तुकडा असेल.
पुन्हा 'क्रमशः' म्हणजे अजून किती राहिले? सिंह गेला आणि शेपूट राहिले का?
विमान
विमान प्रवासत इतके विमान सुंदरीवर रोखून लक्ष? बायको बरोबर नसल्याचे हे एक लक्षण का?
इतक्या वेळा प्रवास केलाय पण ही गोष्ट मी ही कधी नोटीस केली नाही की त्या सुंदरीने आधी एक वेगळा घातलेला वगैरे....
अजून ३ भाग
अजून ३ भाग असतील साधारण...शेपूट राहिलं असं म्हणायला हरकत नाही, फक्त त्या केस मध्ये शेपूट जरा मारुतीचे होईल कदाचित ... हा सिंहाचा गुण असेल असं म्हणावं का ?
३ री बाई हे मला सांगणारी
आणि रोखून नाही हो लक्ष द्यायला लागत. सहज बघितलं तरी दिसतं..तुमच्या भाषेत सांगायचं तर तुम्हांला एखाद्या मैत्रीणीने नवीन ड्रेस घातलेला किंवा नवीन कानातले कसे कळतात ना तसं 
मस्त चाललय
मस्त चाललय वर्णन!
>>रोखून
>>रोखून नाही हो लक्ष द्यायला लागत. सहज बघितलं तरी दिसतं..तुमच्य>><<
पण ते मागितल्याशिवाय इतके एक्स्प्लेनेशन मिळाले की काय समजायचे हो? आणि किती ते डिफेन्सीव बोलणं. हो बघतो मी रोखून असे म्हणून मोकळं व्हायचं त्यात काय एवढे. 
असू दे असू दे, तुमचे डोळे,काहीना का काही बघोत.
BTW, तिसरा भागात काय असेल त्याची वाट पहातोय.
प्रत्येक
प्रत्येक भागात हवाई सुंदरींचे तपशीलवार वर्णन येतंय . लेखाचे नाव बदलायचे का ?
छान लिहिले
छान लिहिले आहेस मिलिंदा, आवडले.
>जो तो उठल्या सुटल्या चोकोलेट्स खात असायचा>> मज्जा आहे!
छान
छान लिहताय्....आवडल.....
आवडलं. wiener
***
तुका म्हणे नाही | आमुची मिरासी | असावेसी एसी | दुर्बळेची ||
वा मिलिंदा
वा मिलिंदा मस्त चालू आहे..
आत्ता ह्या वेळी परत येताना मी पण एमिरेट्स मघे नोटीस केली होती हवाई सुंदर्यांची ड्रेस बदला बदली..
चांगले
चांगले चालु आहे रे.
त्या पाण्यावरुन आठवले. जपानवरुन येणारी काही विमाने दिल्लीमार्गे मुंबईला येत असत. याच विमानात हाजयात्री पण दिल्लीमधे चढतात. एकदा माझ्या मागेच एक हाजयात्री दमदम विहीरीचे पाणी (आपल्याकडे गंगेचे पाणी जसे पवित्र मानले जाते तसे त्यांच्यात दमदमचे पाणी पवित्र मानतात. ) अगदी ड्रमड्रम भरुन चढला. त्याने ते कॅन वरती लगेजमधे ठेवले. विमानाने आकाशात भरारी घेतल्यावर त्याखाली बसलेल्या दुसर्या माणसाला मात्र दमदमच्या पाण्याने अभिषेक घडला व तो पवित्र (रागाच्या पवित्रात आला) झाला. मग ही जुंपली. ज्याने पाणी आणले होते त्याला मात्र अल्ला भेटल्यासारखे झाले होते.
मिलिंदा,
मिलिंदा, प्रवासवर्णन मस्त आहे. पुढचे येऊ दे.
ढ.सु. कपडे
ढ.सु. कपडे बदलतात हे जर आपातकालीन निकासाजवळची जागा मिळाली तर कळते (मी कळते असे लिहिले आहे, दिसते असे नाही. तेव्हा उगाच आपातकालीन निकासाची जागा मिळवायला धडपडु नका).
ते दमदम
ते दमदम नाही झमझम असते बहुदा.
लोकहो,
लोकहो, अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद !!
कोणीतरी वाचतंय आणि चांगला अभिप्राय देतंय याबद्दल खुश व्हायचं की नाही हे पण आजकाल कळत नाही
दिसते असे नाही. << टण्या, :p
केपी,
केपी, टण्या
***
तुका म्हणे नाही | आमुची मिरासी | असावेसी एसी | दुर्बळेची ||
सोप्पं
सोप्पं आहे, प्रतिसाद कोणत्या आय डी ने दिलाय ते बघून ठरव . खुश व्हायचं की नाही ते ...
नूतन वर्षाभिनंदन.
हो झमझमच
हो झमझमच असावे.
तरीच गालीब म्हणतो
रात पी झमझम पे मय और सुभदम धोये धब्बे जाम्-ए-एहराम के.
रात्री झमझमपाशी दारु पिउन पहाटे हाजच्या ड्रेसवरचे डाग धुतले.
लेख
लेख चांगला, प्रतिसाद खुसखुशीत, इ.इ. सगळं खरय. पण पुढचा भाग कवा टाकणार आहात?
चांगलं
चांगलं आहे! .. अजून ?
ठेविले अनंते तैसेची रहावे
चित्ती असू द्यावे समाधान!
मस्तच
मस्तच चाललय वर्णन. येउ देत अजुन
केपी
बाय द वे, पार्ल्यावरची सिंहावलोकनाची चर्चा इकडे का टाकली नाहीये कोणी?
इथे हसुं
इथे हसुं चं अवलोकन असताना सिंहांचं आणि परत कशाला, म्हणून नसेल टाकली