दूर कुठेतरी पाहिले...

Submitted by अ. अ. जोशी on 27 January, 2012 - 09:32

दूर कुठेतरी पाहिले वादळ ढगामागे
आज पुन्हा हृदय कोणते लपले मनामागे ?

शील कधीच गेले तिचे अन प्राणही गेला
लोक अजूनही नेमके होते कशामागे ?

फक्त उपोषणे पाहिली त्यांनी; व्यथा नाही
आणि जमून गेली पहा जत्रा कुणामागे

आज पुन्हा पहा एकदा आपापल्या हृदयीं
कोण असेल शक्ती खरी दुबळ्या जगामागे?

स्वर्ग नसेल उंचीवरी इतका पुढे जा तू
आणि वळून बघ एकदा थोडे पुन्हा मागे

आस तुला नसावी, तिला जितकी तुझी होती
काय उगाच कीर्ती अजय फिरल तुझ्यामागे?

गुलमोहर: 

गेयता-कदाचित वृत्तामुळे असेल, कमी वाटली.
बाय-दि-वे कोणते वृत्त आहे हे ? माझ्यासाठी नवे आहे !!
गझल बरी वाटली, खूप जास्त आवडली नाही यावेळी !

शील कधीच गेले तिचे अन प्राणही गेला
लोक अजूनही नेमके होते कशामागे ?

फक्त उपोषणे पाहिली त्यांनी; व्यथा नाही
आणि जमून गेली पहा जत्रा कुणामागे

आज पुन्हा पहा एकदा आपापल्या हृदयीं
कोण असेल शक्ती खरी दुबळ्या जगामागे?

स्वर्ग नसेल उंचीवरी इतका पुढे जा तू
आणि वळून बघ एकदा थोडे पुन्हा मागे

आस तुला नसावी, तिला जितकी तुझी होती
काय उगाच कीर्ती अजय फिरल तुझ्यामागे?>>

अतिशय सुंदर आशय असलेल्या द्विपदी

व्वा

मात्र ही गझल किंवा जी कविता ती समजायलाही रसिक ताकदीचा हवा ही आवश्यकता अनाठायी वाटली.किंवा ती आवश्यकता नाहीच आहे असे म्हणणारे आणि न म्हणणारे यात ('प्रामाणिकपणे') जास्त किती आहेत हाही प्रश्नच.

आपल्याला जे द्यायचे आहे ते सेलेबल नसल्यास प्रकाशित करण्याची गरजच नाही आणि जे प्रकाशित करायचे आहे ते आपल्याला द्यायचे असण्याची गरजच नाही अशा थर्डक्लास जगात आपण असतो याची भूल पडलेली वाटते.

-'बेफिकीर'!

आशयसंपन्न गझल.

कवितेच्या आशयाशी एकरूप होण्याकरीता वाचकाचीही जबाबदारी असते असे सूचित करणारी रचना.

शील कधीच गेले तिचे अन प्राणही गेला
लोक अजूनही नेमके होते कशामागे ?>>> व्वा! सर्वाधिक आवडलेला शेर!

बेफी जी :तुमच्या प्रतिसादाचा अर्थ निदान तुम्हाला तरी काळाला असेल कि नाही माहित नाही पण मूळ काव्याच्या आणि कवीच्या डोक्यात नको नको ते किडे सोडून स्वतःची दिमडी वाजवणे तुम्हाला छान जमते हे मात्र नक्की !!!
असे केल्यामुळे विशेष प्रयत्न न करता ( कवितेसाठी) आपली वाहवा करून घेता यावी हा हेतू असावां !
असली फालतूगिरी बंद करतायेईल का ते बघा जमलंतर

असो :तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही एक चांगले समीक्षक आहात तर तो तुमचा निव्वळ गैरसमज आहे . कृपया यापुढे कविता आवडली/ नाही आवडली इतकाच प्रतिसाद देत जा !! बाकीचे तुमचे शब्द राहूनराहून निरर्थक वाटतात

छान आहे.
शील कधीच गेले तिचे अन प्राणही गेला
लोक अजूनही नेमके होते कशामागे ?>>>>>

शील 'लुटले' गेले तिचे अन प्राणही गेला
लोक अजूनही नेमके होते कशामागे ?

सर्वांना धन्यवाद!

बेफिकीर,
गझल कोणाला आवडली की नाही या भानगडीत मी पडत नाही.
पण निदान ती समजली असेल तरी खूप झाले.
त्यामुळे आपण कुणाला सांगायला गेलात तर उगाच वेगळे वळण मिळेल.
तसे तुम्ही लिहिलेले इतरांना समजले नसेल , मला समजले आणि कित्येक अंशी ते खरेही आहे...
धन्यवाद.

वैभव
वृत्त कोणते हे मलाही माहीत नाही. आम्ही लिहितो ते वृत बनते.

शाम
प्रवाहीपणा नदीला असतो, सागराला नाही .... ::स्मित::

खरेतर या गझलेसाठी मला एक शेर सुचला होता. पण रसभंग नको म्हणून दिला नाही....

ती घडवून चर्चा नवी नेली पुढे इतकी
वाद विवाद झाले पुढे... आम्ही पुन्हा मागे

धन्यवाद!

<<<<वृत्त कोणते हे मलाही माहीत नाही. आम्ही लिहितो ते वृत बनते.>>>>>

आहा!

मान गये!

दूर कुठेतरी पाहिले वादळ ढगामागे
आज पुन्हा हृदय कोणते लपले मनामागे ?

स्वर्ग नसेल उंचीवरी इतका पुढे जा तू
आणि वळून बघ एकदा थोडे पुन्हा मागे>>>>

या गझलेचे उदाहरण देता येईल.

वरील दोन शेरांमध्ये एक मतला आणि एक शेर आहे. मतल्यात मागे हा शब्द ढगा व मना या शब्दांना जोडून आला आहे व त्याचे स्वतंत्र शब्द म्हणून अस्तित्व नाही आहे. मात्र शेरामध्ये मागे हा शब्द स्वतंत्र शब्द म्हणून आला आहे.

खरे तर काफिया हा एकह शब्द असू शकतो. रदीफ जशी एआहून अधिक शब्दांची असू शकते तसा काफिया असू शकत नाही. मात्र हा प्रकार एक सूट म्हणून मान्य होतो. भटांच्या शेराचे उदाहरण मी गझल परिचय या लेखात दिले होते.

तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही

असा मतल्यातील मिसरा व तसेच सर्व शेर होते. म्हणजे किनारे, इशारे, पुकारे या प्रकारचे काफिये होते व त्यातील 'रे' हे अक्षर स्वतंत्र शब्द म्हणून नव्हे तर एका शब्दाचे एक अक्षर म्हणून होते. मात्र खालील शेरातः

अजून गा रे, अजून गा रे, अजून काही

या ओळीत रे हे अक्षर स्वतंत्र आलेले आहे.

शेवटी उच्चारसाधर्म्य महत्वाचे आणि त्याहीपेक्षा शेराचा आशय. त्यामुळे अनेक लोकांनी अशा प्रकारे काही ओळी लिहिलेल्या आहेत व त्यात हरकत घेण्यासारखे काहीच नाही. मात्र हे मुद्दाम करण्यासारखे नाही आहे व मुळात गझल उत्तम असल्यास असे झाले तर काही वाटणारही नाही. मागे एकदा एका स्थळावर पुलस्तींनी एका गझलेबाबत ही चर्चा छेडलेली होती, पण तेथे चर्चा झालीच नाही.

या निमित्ताने ही गझल पुन्हा वाचली.

-'बेफिकीर'!

बेफिकीर,
मला असे वाटते की, उर्दू किंवा हिंदी या भाषांमध्ये शब्दाचा प्रत्यय वेगळा करून लिहिण्याची पद्धत आहे. त्यामुळे त्या भाषेत काफियाचा नियम अगदी सहजपणे पाळला जाऊ शकतो.

उदाहरणार्थ :-

मराठीत : बेफिकीरचा, अजयची, जळण्यामध्ये माझ्यापुढे.... असे शब्द
हिंदीमध्ये : बेफिकीर का, अजय की, जलने में, मेरे आगे

अशा पद्धतीने लिहिले जातात. त्यामुळे काफिया हा मराठीसाठी वेगळाच शब्द असला पाहिजे असा आग्रह नसावा.

शेर कोणाला चांगला वाटतो आणि कोणाला नाही. त्यामुळे शेराच्या दर्जाबाबत मी चर्चा करणार नाही. गझलेचे तंत्र शेर चांगला असण्यावर नाही तर ठराविक इतर काही गोष्टींवर अवलंबून असते. मात्र, ज्या ठिकाणी भाषेचे नियम असतील तर ते त्या त्या भाषेप्रमाणेच हवेत.

जर मराठी गझलेत काफिया हा रदीफपेक्षा एक स्वतंत्र शब्द असावा असा नियम केला तर कोणताही प्रत्यय वापरण्यावर बंधनेच येणार आणि फार चांगली रचना मिळण्यापासून रसिक आणि करण्यापासून गझलकार वंचितच राहणार. त्यामुळे तारतम्य बाळगून मूळ गझल नियमांमध्ये मराठीसाठी किरकोळ बदल करणे भागच आहे.

आपण माझ्या गझलेतील दिलेले उदाहरण....

कशामागे आणि पुन्हा मागे

हेच जर हिंदी भाषेत केले असते, तर असे झाले असते...

किस के पीछे आणि फिर से पीछे

यामध्ये 'ए' हा स्वरकाफिया होवून 'पीछे' हा रदीफ झाला असता. मात्र मराठीत

कशा मागे किंवा तुझ्या मागे

असे करण्याची पद्धत नाही.

त्यामुळे मला असे वाटते, ही सूट शेर चांगला असण्यामुळे नाही तर मराठी गझलेतील दर्जा टिकून रहावा यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अर्थात यासाठी बाकीचे नियम पाळायला हवेत हे वेगळे सांगायला नको.

धन्यवाद पाटील!!

व्यवस्थापकांनाही धन्यवाद!!