जंगलराज

Submitted by जयनीत on 19 January, 2012 - 03:50

जेव्हा माकडाला कळले की माणसाचे पूर्वज अगदी त्याच्या सारखेच होते तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही . माझा वंश इथे संपूर्ण पृथ्वीतलावर राज्य करतोय ! अन इथे ? इथे तो सिंह राज्य करतोय ! काहीही झाले तरी आता मात्र चूप बसायचे नाही , रानात तरी आपले राज्य असेलेच पाहिजे , आपल्या वंशजांचं नाव राखायला नको ? माकडाने विचार केला .
पण सिंहाच्या शक्ती पुढे आपलं कसं चालणार ?
त्याला तर सगळेच घाबरतात .
आपल्याला कोण साथ देणार ?
पण माणसा जवळ तरी कुठे फार मोठी शक्ती आहे तरीही तो सा-या जगावर राज्य करतोय ना ? कशाच्या बळावर ? डोक्याच्याच ना ? मग आपण ही डोकं लढवायला शिकलं पाहिजे , अगदी त्यांच्या सारखंच !
ते जे करतात तेच केलं तर ?
आपण इथे लोकशाही आणली तर ! माणसां सारखीच , मग सिंह एकटा पडेल .
माकड आपल्या कल्पनेवर स्वत:च खूप खुश झाले , अन त्याच्या मर्कटलीला सुरु झाल्या .
त्याने एकेका प्राण्याला पटवायला सुरवात केली .
पण त्याचे कुणी ऐकेना ?
साक्षात सिंह ! त्याच्या विरोधात जायची कुणाची हिम्मत होईना .
माकड इरेला पेटले होते .
कुठल्याही परिस्थितीत हार मानायची नाही असा त्याने पक्का निर्धार केला होता .
सिंहाच्या बरोबरीचा कुठला तरी प्राणी आपल्या सोबत असल्या शिवाय कोणताही प्राणी आपल्याला साथ देणार नाही हे त्याला लवकरच कळून चुकले .
तो वाघा कडे गेला .
वाघ फारसा उत्सुक नव्हता .
तो सिंह माझ्या कधी मधे पडत नाही मग मी कशाला ह्या भानगडीत पडू ? माझं माझ्या पुरतं सुरळीत चालू आहे , तुमचं काय ते तुम्ही बघा , वाघाने ठाम नकार दिला .
माकड निराश झाले , पण जे झाले ते एकापरीने बरेच झाले , एकदा सत्ता मिळाल्यावर ह्याने आपले काहीही ऐकले नसते तर ? आपण त्याचं काय करू शकलो असतो ? माकडाने विचार केला . हत्ती बरा आहे ह्या कामासाठी , बलवान आहे आणि वरून मुलखाचा आळशी अन मठ्ठ बुद्धी , तोच ह्या कामासाठी योग्य आहे , त्याला मूर्ख बनवून सगळी सत्ता आपल्याच हातात ठेवता येईल .
माकड हत्ती कडे गेले , कसे ही करून ह्याला पटवायचेच त्याने अगदी ठाम निर्धार केला .
अरे तू इतका बलवान ! अन इथे तू सोडून तो लहानसा सिंह जंगलावर राज्य करतोय ? तो म्हणे वनराज ! कसला वनराज रे तो ? खरं तर तूच राज्य करायला हवे वनावर , माकड म्हणाले .
जाऊ दे रे काय कारायचं ते राज्यबीज्य , हत्ती म्हणाला .
तुझी खरी किम्मत तुला कधी कळणार ? माझी पोरं तुला कीती मान देतात तुला ठाऊक नाही , माकड म्हणाले .
तुझी पोरं ! कोण ? हत्ती आश्चर्यचकीत झाला .
माणसं रे ! तुला माहीत नाही ती माझीच कच्ची बच्ची आहेत , ते जाऊ दे सध्या पण तुला किती मोठे पणा देतात ते माहीत आहे का तुला ? तुला सर्वशक्तिमान मानतात .
असं !हत्ती आश्चर्यचकित झाला .
मग ? तुला प्रसन्न करण्या साठी गाणी म्हणतात , पोपट तर तिथेच भटकत असतो नेहमी , त्याला तर ती गाणी आरत्या की काय म्हणतात त्याला त्या सुद्धा तोंडपाठ आहेत , वाटलं तर पोपटाला विचार माझ्यावर विश्वास नसेल तर ! माकड म्हणाले .
नाही रे तसं नाही , तुझ्यावर विश्वास आहे माझा , पण नेमकं काय करायचं म्हणतोस ? हत्तीने विचारले .
ते तू माझ्यावर सोड , ते सगळं मी बघील , तुला काहीही करायची गरज नाही तू राजा , मी प्रधान ! राजा कधी काही करतो का स्वत:काही ? ते सर्व प्रधानाच काम . आता आपण फक्त एक करायचं सगळ्या प्राण्यांना एकत्र करायचं , मी त्यांना जे समजवायचं ते समजवील .
ठीक आहे तुला जसं वाटतं तसं कर , हत्ती म्हणाला .
मग माकडाने सर्व प्राण्यांची एक सभा घेतली . हत्ती सोबत असल्या मुळे सर्व प्राण्यांचीही हिम्मत वाढली . सभेत एक घटना तयार करण्यात आली , लगेच निवडणुकही घेण्यात आली , प्रत्येक जातीचा एक प्राणी संसदेत घेण्यात आला . सर्वांनी एकमताने हत्तीला राष्ट्रपती आणि माकडाला प्रधान म्हणून मान्यता दिली मग सगळ्या प्राण्यांनी एक मिरवणूक काढली , हत्ती सर्वात समोर आणि माकड त्याच्या पाठीवर बसले होते .
मिरवणूक सिंहाच्या गुहे समोर थांबवून त्याला झालेल्या निर्णयाची कल्पना देण्यात आली .
बरं झालं माझ्या मागची कटकट गेली , आजपर्यंत उगाच नाव बदनाम व्हायचं माझं , तुम्हा सर्वांना आणि तुमच्या प्राणीशाहीला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा , सिंह म्हणाला ,
आता कसा सरळ आला , करेल काय ? बघितलं शेवटी मीच जिंकलो , माकड मनातल्या मनात म्हणाले .
सर्व प्राण्यांनाही मनापासून आश्चर्य वाटले .
इतकं सोपं असेल असं वाटलं नव्हतं , काही म्हणाले .
खरंच मनातून किती चांगला आहे ना सिंह ? बघा त्यानी कीती सुंदर नाव सुचवलं प्राणीशाही ! काही म्हणाले .
आपणच त्याला ओळखण्यात चूक केली , काही म्हणाले .
अं हं ! माकडा मुळेच हे सगळं शक्य झालं . माकडच बरोबर म्हणत होतं , एकीत बळ असतं ते कीती खरं होतं ते आत्ता कळतंय , काही प्राण्यांचे मत पडले .
सर्वांना ते पटले .
त्यांनी माकडाचा जय जय कार केला .
माकड ही भारावून गेले .
तू काही आम्हाला परका नाहीस, तुझ्या जातीलाही प्राणी संसदेत योग्य ती जागा दिली जाईल , माकड सिंहाला म्हणाले .
अरे ! मी तुमचाच आहे की ! सगळे राज्यच माझे आहे असं मी समजतो , एका जागेचं काय घेऊन बसलात , सिंह हसून म्हणाला .
सगळ्या प्राण्यांनी सिंहाचा जय जय कार केला आणि आनंदाने आपआपल्या वाटेने परत गेले .
काही दिवसांनी पोपट जंगलाच्या भ्रमंती वर आला , त्याची भेट हत्ती आणि माकडाशी झाली .
अरे वा इथे ब-याच सुधारणा झाल्यात की ! तुम्हा दोघांचंही अभिनंदन ! पोपट म्हणाला .
हू ! माकड म्हणाले .
का रे , तुम्ही असे उदास का ? पोपट म्हणाला .
हत्तीने निराशेने सोंड हालवली , ह्यालाच विचार काय ते ! एवढंच तो म्हणाला .
काय सांगू रे , माकड म्हणाले , इतकं सगळं करूनही राज्य त्या सिंहाचच आहे , आम्ही फक्त शोभेचेच ! सिंहाच्या शक्ती पुढे आमचं काहीही चालत नाही , तो जे म्हणेल तेच होतं . तो नुसता गुरगुरला की सगळे प्राणी त्याच्याच मनाप्रमाणेच वागतात .
हं ! ज्याच्या जवळ शक्ती बहुमत त्याच्याच बाजूने असते , पोपटाने उसासा सोडला .
तूझा तर माणसाच्या राज्यात सर्वत्र संचार असतो , तूच सांग काय केलं तर आपलं राज्य त्यांच्या सारखं होईल , माकडाने विचारले .
तिथेही काय वेगळं आहे ? पोपट म्हणाला , माणसात एक म्हण आहे ” बळी तो कान पिळी ‘ तिथेही प्रत्यक्षात बलवान लोकंच राज्य करतात , जसे दात आणि नखं ही सिंहाची शस्त्रे आहेत ना तसेच बलवान माणसे वेगवेगळी शस्त्रे वापरून राज्य करतात , पण त्यांच्यात सगळ्यात प्रभावी शस्त्र आहे पैसा , हे शस्त्र ज्याच्या जवळ असते खरे राज्य त्याचेच असते .
खरंच ? माकडाने आश्चर्याने विचारले .
हो , मग ! तिथले राज्यकर्ते ते कुठे मनाला लावून घेतात , बलवान लोकांशी भांडून आपण एक ही क्षणही राज्य करू शकणार नाही हे त्यांना चांगलं ठाऊक आहे , म्हणून ते तर उलट त्यांच्याशी जुळवून घेतात , तुम्ही पण इथे तसंच करा , सिंहाशी तेव्हढं जुळवून घ्या अन लहान लहान प्राण्यांवर रुबाबात राज्य करा , पोपट म्हणाला .
माकड विचारात पडले .
आता जास्त विचार नको , मी म्हणतो तसचं करा अ‍ॅन्ड जस्ट एन्जॉय इट मॅन ! ओह सॉरी ! जस्ट एन्जॉय इट अ‍ॅन !
पोपट चोच मिरवत म्हणाला .
( समाप्त )

गुलमोहर: 
शब्दखुणा: