चपलेवर चप्पल

Submitted by ट्यागो on 23 January, 2012 - 10:22

"हल्लो, अरे काय? येऊ ना परवाच्याला?"
"अगं हो, ये की, मी वाट पाहतोयच."
"अरे मग सांगणार कधी?"
"आत्ता सांगतोय ना?"
"बरं. शार्प अ‍ॅट ट्वेल्व, चालेल?"
"के, डन!"

मनालीशी बोलून फोन बाजूला ठेवत विनायक हापिसातल्या खुर्चीवर रेलत-रेलत 'जाने कहाँ गए वो दिन' मोड मधे गेला. चारेक वर्षांपूर्वींची ओळख, मग जवळीक अन् मग बरंच काही. ती मॅरीड असूनही आपण गुंततोय हे जाणूनही गुंतत गेला. तिचंही तसंच काहीसं. चूक-बरोबर, खरं-खोटं सार्‍याचा विचार बाजूला ठेवत दोघे एकत्र आलेले. दिवस, भेटी, ओढ सारंच हवंहवंस. आजही क्षण अन् क्षण तसाच जिवंत, हुबेहूब.
"गोष्टी घडतात, घडतात अन् घडतात.. काळाप्रमाणे, आपण निमित्तमात्र" या त्याच्याच उक्तीनुसार तोही चार हातांचा झालेला. पण न मानलेल्या संस्कारांचं ओझं मानणार्‍यांपैकी तोही एक, तेव्हा फारसा फरक जाणवेनाच.
"तेव्हाचे अन् आताचे यात फरक तो काय? एका लग्नाचा? धा झाली तरी मी असाच!"
असं बिनदिक्कत मित्रांत सांगताना त्याला कसली खुमखुमी यायची, देवास ठाऊक!

ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी मनाली आली. याने 'लिव्ह' टाकलेलीच.
"जाड झालीस गं खूप?" भिरभिरते डोळे अंगभर फिरवीत कधीकाळच्या 'नजार्‍यांना' मनोमन आळवीतच याने स्वागत केलं.
"हम्म, आता काय जाडच वाटणार तुला, डोळ्यांना सवय नसेल नाय का..
सध्यातरी?" पलटवार करीत बाई शिरल्याच कुशीत 'आय लव्ह यू'चं पुरण घेऊन पुरणपोळी लाटायला!
"खूप मिस केलं तुला" दोघांचेही सारखेच उद्गार. आपलं प्रेम किती उदात्त वगैरे आहे या भाबड समजूतीला हा अजून एक पुरावाच!
"मग काय म्हणतायत तुमच्या अर्धांगिंनी? कधी येतायत?"
"गेलीये चार दिवसांसाठी माहेरी.. कुणीतरी आजारी वगैरे.. येईल उद्यापर्यंत. ते जाऊ दे, तुझं सांग, काय चालूये सध्या? कशी गेली केरळ ट्रीप?"
"बरीच म्हणायची, पण सतत वाटायचं.. तू हवास जवळ. अन् असंही की तू आहेसच इथेच कुठेतरी.. माझ्याच जवळ."
"तो तर मी आहेच वेडे.. अगदी तुझ्यात!"
दिवसाचं सार्थक करत मनाली निघते. 'मिठ्या' अन् 'पुन्हा कधी भेट..'ची देवाणघेवाण करत दोघे निरोप घेतात.

विन्या दार लावून घेतो. शांतपणे सिगारेट शिलगावून शीळ देत 'स्थिर' होत असतोच तोवर दारावर बेल.
"ही परत आली की काय.." असं मनोमन म्हणत दार उघडतो तो समोर बायको!
"तू..? आत्ता? कळवलं पण नाहीस?"
"फोन करतेय पण उचलाल तर.. आणि तुम्ही घरी कसे? सकाळीच तर सांगितलेत आज खूप काम आहे म्हणून. म्हटलं कामात असाल म्हणून फोन नसतील उचलंत."
"अरे लिव्ह टाकली हाफ़-डे. डोकं दुखत होतं जरा अन् कामातले फोन नको म्हणून सायलेंटवर ठेवलेला."
"दिसतंयच.. म्हणून थंडीतही इतका घाम जमलाय कपाळावर. बरं आत घेणार आहात की
नाही अजून?"
"अरे हो.. सॉरी.." म्हणत कपाळावरचा घाबरा जीव रुमालानं पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो.
मोकळा श्वास घेत श्वेता आत येते.
"आज दिवसभर कसंसंच वाटत होतं, काहीतरी हरवल्यासारखं. कधी एकदाची घरी
येतेय असं झालेलं."
स्वत:शीच बोलत असल्यासारखी पुटपुटत श्वेता घरभर बघते.
हॉलमधे दारामागे विन्याची चप्पल बघून नाराजीनं म्हणते,
"कितीदा सांगायचं तुम्हाला, चपला इथे ठेऊ नका म्हणून?" असं म्हणत चप्पल उचलायला जाते तर चपलेवर चप्पल चढलेली पाहून क्षणभर थांबते. काहीतरी कळतंय अन् बरंचसं अनभिज्ञ राहिलंय असं वाटून चप्पल उचलते.
आज दिवसभर असंच होतंय, चुकल्यासारखं, काहीतरी कळून न कळल्यासारखं, का ते कुणास ठाऊक?
झटकन विचार झटकून निर्‍या खोचत पुढच्या कामाला लागते.

विन्या जळालेल्या सिगारेटीसोबत 'राख' झालेला.. चटक्याने 'मांस' चढतं!

(समाप्त)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ट्यागो, खुप दिवसांनी.......
थोडक्यात बरंच काही ! आवडेश Happy

काय झाल आणि काय होतय हे काहीच कळल नाही.
मी_चिऊ: +1 => चप्पल आणि कथेचं काहीच कनेक्शन जुळतेसे दिसले नाही.
नक्की तुंम्हाला काय सांगायचे आहे? चप्पल विषयी शकुन-अपशकुन, श्रद्धा- अंधश्रद्धा की काय?

मयुरेश,

मला वाटल व.पुं च बाई बायको आणि कॅलेंडर वाचुन फँन्टसी लिहायला बसलास काय. पण लग्न झाल्या झाल्या असले विचार मनात येण काही बर लक्षण नाही.

कथा कळली. आवडली. नायकाच्या बायकोची हुरहुर, तिच्या मनाला लागलेली चुटपुट नायकाच्या त्या दिवसाच्या वागण्याशी जुळतं आहे. फक्त 'चपलेवर चप्पल्'चा signficance काय आहे ते गुढ आहे. एखादा जुना विश्वास किंवा काही अंधश्रद्धा आहे का या संबंधित?

चप्पलेवर चप्पल कधी चढते. जर कोणी दुसरा आला असेल आणि त्याच्या चपलेला जागा नसेल (किंवा केर काढताना).
विन्या वाचता वाचता पकडला जाणार होता त्याचा हा संदर्भ आहे.

>>मला वाटल व.पुं च बाई बायको आणि कॅलेंडर वाचुन फँन्टसी लिहायला बसलास काय. पण लग्न झाल्या झाल्या असले विचार मनात येण काही बर लक्षण नाही.

>> विन्याचे पण नुकतेच चार हात झालेले आहेत Happy

????

कथा कळली. आवडली. नायकाच्या बायकोची हुरहुर, तिच्या मनाला लागलेली चुटपुट नायकाच्या त्या दिवसाच्या वागण्याशी जुळतं आहे. फक्त 'चपलेवर चप्पल्'चा signficance काय आहे ते गुढ आहे.>> तेच तर ना. कथा अजिबातच नाही कळली अस नाहिये, पण 'चपलेवर चप्पल्' हा मुख्य संदर्भच स्पस्ट होत नाहिये.

यासाठी लेखकानेच आता 'संदर्भासह स्पस्टिकरण' द्यावे. Wink

चपलेवर चप्पल ठेवू नये असं शास्त्र सांगते. याला शास्त्रीय कारणही आहे. वरच्या चपलेची खालची घाण खालच्या चपलेच्या वरच्या बाजूला लागते. चप्पल पायात सरकवताना किंवा उचलून ठेवताना ती आपल्या हाताला लागते. हाताला लाखो जंतूंचा प्रादुर्भाव होतो आणि आपण आजारी पडतो.