सह्यांकन २०११ - भाग १: पूर्वतयारी आणि प्रस्थान
सह्यांकन २०११ - भाग २: आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा
सह्यांकन २०११ - भाग ३ : ढाकोबा, दुर्ग आणि मुक्काम अहुपे व्हाया हातवीज
सह्यांकन २०११ - भाग ४ : अहुपे ते सिद्धगड व्हाया गायदरा घाट
सह्यांकन २०११ - भाग ६ (अंतिम) : पदरगड आणि निरोप
आजूबाजूला कितीही 'घोरासूर' पसरलेले असले तरी मोहिमेत सुदैवाने त्यांच्यामुळे एकदाही माझी झोपमोड झाली नाही. बरोब्बर पाच वाजता आपोआप जाग यायची आणि उठायचा सर्वप्रथम प्रचंड कंटाळा यायचा. मग कालचा दिवस कसा गेला, आज किती चाल आहे हे आठवून हळूहळू प्रोसेसिंग सुरू व्हायचं. एकवेळ बेड-टी मिळाला नाही तरी चालेल पण 'साडेसहाच्या आत शूज घालून आणि सॅक पॅक करून तयार असलेलं बरं' या निर्णयाला पोचलो की मग आपोआप स्लीपिंग बॅग उघडली जायची आणि आतून अस्मादिकांचा देह बाहेर पडायचा. थोडक्यात, तीन दिवसांत एक मस्त रूटीन बसलं होतं.
आदल्या दिवशी झोपण्यापूर्वी, मुक्कामाची व्यायामशाळा कँपच्या मुख्य ठिकाणापासून बाजूला असल्यामुळे, 'सर्वांना साडेपाच वाजता तिकडे घेऊन ये' अशी आज्ञा बल्लूने मला दिली होती. त्यामुळे लीडर- को लिडर नंतर लीडर इन प्लेस म्हणून त्या दिवसापुरता मी को को लीडर उर्फ कोको झालो होतो. सर्व मोठ्यांना चहासाठी उठवण्याचे सबुरीचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर मग मात्र मी थेट पद्धत स्वीकारली आणि चहाची किटलीच कँपातून उचलून व्यायामशाळेत आणून ठेवली! (सगळे खूश झाले हे लिहायला हवंच का?)
अचानक, डाव्या गुडघ्याच्या डाव्या बाजूचा स्नायू दोन वर्षांपूर्वीच्या तोरणा-रायगडमध्ये जसा मधूनच दुखायला लागला होता त्याचे पूर्वसंकेत देऊ लागला आणि मी टेन्शनफुल झालो! अजून दोन पूर्ण दिवस बाकी होते! भट्टीच्या रानातील सपाटीचे टेंशन नसले तरी त्याआधी गायदरा घाट चढायचा होता. गुडघा आत्ता दुखत नसला तरी तो केव्हाही दुखू शकत होता या शक्यतेमुळे गायदर्यापर्यंत अतिशय काळजीपूर्वक पाऊल टाकणे हाच एकमेव उपाय होता.
उपमा खाऊन आणि पॅकलंच घेऊन बरोब्बर साडेसातच्या ठोक्याला सिद्धगडमाचीचा निरोप घेतला. जिथे जिथे एखाद्या मोठ्या पायरीइतकी उंची चढायची अथवा उतरायची असेल, तिथे तिथे त्याच्या आसपासच्या छोट्या दगडांचा आधार घेत ती उंची कमी करायची आणि मग पाऊल टाकायचे, अशी सोपी, नेहमीची पद्धत मी वापरली. गायदर्याच्या पायथ्यापर्यंत तर मी इतका काळजीने चालत होतो, की ते स्टेपींग माझ्या मागून चालणार्या आठवलेकाकांच्याही लक्षात आले. आणि त्यांनी, 'काय पायाची काळजी घेतोयस का?' असं विचारून टाकलं! ('मी तुझी सॅक घेऊ का' असं मात्र पूर्ण मोहीमभर कुणीही कुणालाही चुक्कुनही विचारलं नाही!)
साडेआठ - गायदरा पायथा आणि सव्वा नऊ - गायदरा टॉप! कोंडवळ गावात भीमाशंकरची जीप दुपारी चार वाजता येणार होती. त्यामुळे जवळजवळ आठ तास वेळ हातात होता. भट्टीच्या रानातून कोंडवळचे अंतर दोन-अडीच तास होते. वेगात जाणार्या बॅचला आवरायचे लीडर्सचे कौशल्य कौतुकास्पदच होते. दुसरी बॅच आमच्याच कालच्या वाटेने सिद्धगडमाचीकडे जाणार होती. त्या बॅचची वाट पाहत वाटेवरच्या काल येताना बसलो त्याच विहीरीपाशी (वेळ काढत) बसायचे असे लीडर्सनी ठरवले.
त्या विहीरीपर्यंत पोचायला फारतर दहा मिनीटे लागली असती आणि आमच्या कालच्या अनुभवावरून दुसरी बॅच एवढ्या लवकर तिथे पोचणे शक्यच नव्हते, म्हणून आम्ही गायदरा टॉपवरच मैफल जमवली. हे एक बरे होते! बॅचमध्ये एक से एक नमुने भरलेले असल्यामुळे, चालताना मुख्यत्वे लांबामुळे आणि थांबल्यावर इतरांमुळे विश्रांतीच्या जागा हसण्या-खिदळण्याने जिवंत व्हायच्या. after all, एखादा ट्रेक म्हणजे नुसतीच वेळेमागे केलेली पायपीट थोडीच असते? डोंगराच्या कुशीत, पायवाटेशेजारी बसून रानफुलांच्या सान्निध्यात ऐकलेली एखादी कविता, एखादं गाणं, एखादा पोट फोडून हसवणारा किस्सा ट्रेकला अविस्मरणीय बनवून जातात! सुदैवाने, असे योग या बॅचच्या नशिबात बर्याचदा आले. सतत २४x७ आमचं तोंड सुरू असायचं - दिवसा बोलण्यासाठी आणि त्या 'कष्टां'मुळे रात्री घोरण्यासाठी!
पावणे दहा वाजता ती मैफल थांबवली आणि पाणी पिऊन विहीरीकडे निघालो. विहीरीजवळ यायला फारतर दहा वाजले असतील. येऊन पाहतो, तर तिथे दुसरी बॅच आमच्या आधीच पंधरा-वीस मिनिटे येऊन पोचली होती! हा धक्काच होता! याचा अर्थ, आमच्यापेक्षा पटसंख्येने अधिक असूनही त्यांचा चालण्याचा वेग आमच्याइतकाच होता. तो धक्का नव्हताच हे स्वतःलाच दाखवण्यासाठी मग त्यांनी ढाकोबा कँपवरून आणलेले काही पराठे आम्हीच खाल्ले. थोडावेळ विहीरीपाशी रेंगाळलो. कशावरून निघाला ते माहित नाही, पण विहीरीजवळच्या चर्चासत्राचा विषय होता - 'कुत्रा गाडीच्या चाकात सापडून झालेले अपघात तसेच रेबिज झाल्यास होणारे परिणाम'! सहभागी वक्ते - मी सोडून सगळेच! कारण आजपर्यंत एकही कुत्रा अथवा कुत्री मान अथवा पाय वर करून एकदाही माझ्या अथवा माझ्या बाईकच्या वाट्याला गेलेले नाहीत! (मीही त्यांच्या वाट्याला गेलेलो नाही!) मी त्यांच्या गप्पा ऐकत रिकाम्या आकाशातील कापसासारख्या दिसणार्या ढगांचे पडल्या पडल्या फोटो घेण्यात दंग होतो. त्यातच आदल्या दिवशी रात्री आमच्यापैकी एकाने 'त्यांच्या जेवणाची ताटली धुवायच्या आधी, अहुपेपासून आम्हाला सोबत केलेल्या एका कुत्र्याला चाटून साफ करायला दिली होती' हे आठवून सांगितले. एतेन विषय कंटिन्युड!! तात्पर्य, विषयांना तोटा नव्हता.
अखेर, अर्ध्या तासाने बल्लूने मोहीम पुढे नेण्याचा आदेश दिला. लगेच सतरा ट्रेकींग सॅक्स आपापल्या मालकांच्या पाठीवर निवांत बसून पुढे निघाल्या. इथून पुढची वाट अगदीच सपाट, सरळ आहे. इतके दिवस अनवट वाटांनी सह्याद्रीत फिरल्यावर ही वाट म्हणजे राष्ट्रीय महामार्ग असल्याचाच भास होत होता. दमदम्याच्या डोंगरावरून भट्टीच्या रानातून दक्षिणेकडे रमतगमत ही वाट जाते.
(अवांतरः मागच्या आठवड्यात पुण्याला जाताना ट्रेनमध्ये मी फोटो एडिट करत होतो. माझ्या शेजारच्या माणसाने ते पाहून - 'हे अहुप्याचे फोटो ना?' असं विचारलं. मी खूश! मग आमच्या गायदरा, अहुपे, आणि तिकडच्या रानवाटा यावर गप्पा झाल्या. त्याच्या नोकरीचं गाव कोंडवळ फाट्यापासून मंचरच्या दिशेला तीन किमी वर होते. तो म्हणाला - 'भट्टीच्या रानामध्ये बिबट्यांवर लक्ष ठेवायला एका पाण्यापाशी एक टॉवर आहे. मला एक रात्र तिथे मुक्काम करायचाय.' यावर मी त्याला खालील फोटो दाखवला. तो खूश!)
हां, तर भट्टीच्या रानातून सर्वात शेवटी मी, पुण्याच्या विद्याकाकू, माहीम, मुंबई-१६ चे विनायक, आणि नाशिकचे लहू डफळे (यांचं यंदाचं ५ वं की ६ वं सह्यांकन होतं) आरामात गाणी म्हणत येत होतो. आम्हाला वेळेचे अजिबातच बंधन नव्हते. त्यामुळे वाटेतल्या एका पाण्याजवळच्या पुलावर जेवणाची पंगत बसवली. पॅक-लंचमध्ये बटाटा भाजी व पोळी होती. प्लस आमच्याकडे चटणी, जॅम (तीन प्रकारचा बरं का!) आणि तोंडी लावायला भरपूर गप्पा होत्याच! जेवण झाल्यावर पुन्हा तिथे मैफल जमली. सुरूवातीचा विषय होता - 'देव आनंदची गाणी व पृथ्वीराज कपूर यांची ड्वायलॉक फेक'! तिथून तो विषय कुठच्या कुठे गेला हे सांगायला नकोच! 'काकूं'नी येतायेता बनवलेला रानफुलांचा गुच्छ आमच्या दोन प्रेमळ, तत्पर लीडर्सना देण्याचा कार्यक्रमही तिथे पार पडला. एव्हाना, आमचं १९ जणांच एक छोटंसं कुटुंबच तयार झालं होतं ना!
अखेर, पुन्हा तासभर चालून गावंदेवाडीपाशी आलो. तिथे एका गवताच्या गंजीखाली थोडावेळ विश्रांती घेतली. आणि 'पटकन काढता येईल अशी शूलेस कशी बांधावी' यावर लांबाने माझ्या शूजवर प्रात्यक्षिक करून दाखवलं. माझा गाठ न मारता येण्याचा जुना प्रॉब्लेम असल्यामुळे मी ती लेस अजूनही तशीच ठेवली आहे, हा भाग अलाहिदा!
तिथून दीड-दोन किमी चालून कोंडवळला पोचलो. तिथे आमच्यासाठी दोन जीप्स घेऊन विलासदादा (पहिला दिवस - सिंगापूर मुक्काम - पोह्यांचा नाष्टा; आठवला?) आला होता. जीपमधून भीमाशंकरच्या कँपला पोहोचलो तेव्हा फक्त चार वाजले होते.
इथे आमच्या बॅचमधल्या एका मद्रासी (की तेलुगु?) जोडप्याने, आमचा निरोप घेतला. संपूर्ण मोहिमेत सर्वांपासून काहीसे अलग राहिलेले हे दोघेच. बाकी सर्वजण वय, भाषा इ विसरून सहज मिसळून जात असतांना यांनी मात्र आपला स्वतंत्र बाणा कायम ठेवला होता. हिमालयात ट्रेक करतांना वापरतात तशा स्किईंग स्टीक्स घेऊन त्यांनी अख्खा ट्रेक केला. वाट माहित असो वा नसो, ते सतत सर्वांच्या पुढेच असायचे. मग लांबाने त्या स्टीक्समध्ये प्रचंड ताकद आहे असे सांगितले आणि त्या दिवशीच्या भ्रमंतीमध्ये त्यांना ओव्हरटेक करून पुढे जाणार्या प्रत्येकाला त्या स्टीक्सला नमस्कार करायची आज्ञा केली! (लांबाच तो!) गंमत म्हणजे, त्यातल्या बाईसाहेबांनी, पळू गावात सर्वात पहिल्या ओळखपरेडच्या वेळी, पूर्ण बॅचमध्ये चेहर्यावरून वयस्क दिसणार्यांनीही स्वतःचं वय सांगितलेले नसताना नावानंतर ताबडतोब वयच जाहीर केलं! (चुकून सांगितलं असेल! दुसरं काय! पण वागायला दोघेही फार मदतशील होते बरं!) असो.
कँपच्या बाहेरच्या पारावर हे सुखी जीव दिसले -
३२५० फूट उंचीवर असलेल्या भीमाशंकर स्थानाची वेगळी ओळख करून द्यायची गरजच नाही. भीमाशंकरचा कँप एका मंदिराशेजारच्या भल्यामोठ्या ओसरीवर होता. ओळखपरेड वगैरे झाल्यानंतर 'उरलेला रात्रीपर्यंतचा वेळ कसा घालवायचा' हा प्रश्न पडता पडता सुटला! कँपलीडर पराग आपण भीमाशंकर दर्शन किंवा नागफणीला जाऊ शकतो असं बोलला आणि दर्शनाला येऊ शकत नसल्याबद्दल मी मनातल्या मनात श्रीभीमाशंकराची क्षमा मागून टाकली. दुर्गमोहिमेवर असल्यामुळे मूर्तींपेक्षा कातळांमध्ये देव सापडण्याची शक्यता जास्त होती!
नागफणी!! आम्ही बारा जण, विलासदादा आणि एक गावकरी यांना घेऊन निघालो. वाटेत एक हनुमानाचे मंदिर लागले. (हीच एकमेव वाट आहे, असं नाही)
नागफणी पश्चिमाभिमुख असल्यामुळे सूर्यास्त पाहण्याची गेल्या चार दिवसातली मनोकामना पूर्ण होणार होती. वेळापत्रकाची पुरेशी धास्ती घेतल्यामुळे विलासदादाला आणि लांबाला 'सूर्यास्त झाल्याशिवाय खाली उतरायचं नाही' अशी गयावया करून घेतली. दोघांनीही होकार दिला. (याला म्हणतात अनुभव!) तासाभरात नागफणीवर पोचलो. डाव्या हाताला पदरगड अगदी जवळ दिसत होता. उद्याच्या पदभ्रमणात पदरगड होता. मोहिमेतील शेवटचे खांडस गाव खाली दूरवर दिसत होते. कालचा सिद्धगड उत्तरेकडे उठून दिसत होता. साखरमाचीचा डोंगर, दमदम्या, भट्टीचे पठार डोळे भरून पाहून घेतले.
पदरगडाची पहिली नजरभेट -
मागे पुसटसा सिद्धगड, जिथे आम्ही काल होतो -
आणि (अपेक्षेप्रमाणे) सूर्यास्त व्हायच्या आधीच सर्वांनी खाली उतरायला सुरूवात केली. साडेपाच वाजले होते. सूर्य अजून वीस-पंचवीस मिनिटात बुडणार होता. उतरताना एक झाडीतून जाणारा पट्टा होता आणि मग पठारावरून मोठी वाट कँपकडे जात होती. अखेर लीडर्सलोकांची परवानगी घेऊन झाडीतल्या त्या उतारावरही आणि पुढच्या पठारावरही धावत सुटलो. (गुडघे-बिडघे सह्याद्रीदेवाच्या हवाली!) निवांत बसून सूर्यास्त बघण्यासाठी ही शेवटची संधी होती and I wanted to give my best! ती एकूण वीस-पंचवीस मिनिटांची वाट जेमतेम साडेआठ मिनिटात कापून कँपच्या मागच्या बाजूच्या कड्याच्या टोकाशी पोचलो, तेव्हा सूर्याचा खाली जाता जाता ढगांशी लपाछपीचा खेळ सुरू झाला होता. काही मिनिटांची स्वस्थता मिळवण्यासाठी आधी तुफान धावपळ करावी लागली हा विरोधाभास इथेही सोबत होताच! पण डोळ्यासमोरचा सूर्यास्त पाहत असताना ते सगळे विचार हळूहळू पुसले गेले.
कँपमध्ये परतल्यावर जेवण तयार होईपर्यंत प्रशस्तीपत्रक आणि अभिप्रायाचा एक छोटासा औपचारिक कार्यक्रम आयोजित केला गेला होता. 'सह्यांकन'च्या आयोजनाला तोडच नव्हती. त्यामुळे त्याबाबतीत सर्वच खूश होते. बाकी एक-दोन किरकोळ सुधारणा आमच्याकडून सुचवल्या गेल्या व त्या कँपलीडरने आज्ञाधारकपणे वहीत टिपून ठेवल्या. जाता जाता 'कमी खायला द्या' अशीही उपसूचना कोणीतरी केलीच. त्यानंतर मोहिमेतला शेवटचा खाना म्हणून पेशल 'गाजर का हलवा' होता. (काय अप्रतिम चव होती म्हणून सांगू!!) सोबत पुर्या, छोले, कोशिंबीर, पापड, दाल-भात!! जेवल्यावर हात धुवायलाही उठण्याची अंगात ताकद नव्हती!
पुन्हा लांबासमोर पाय पसरून बसलो आणि आज पोटर्यांसकट पावलांना मालिश करून घेतले. थंडी चांगलीच होती. झोपण्यासाठी छप्परबंद ओसरीवर किंवा मग समोरच्या मंदिरात सोय होती. आठवलेकाकांच्या सांगण्यावरून मी त्यांच्यासोबत ओसरीवरच झोपायचे ठरवले आणि एक योग्य निर्णय घेतल्याची खात्री दुसर्या दिवशी पटली. रात्री मंदिराच्या फरशा प्रचंड गार पडल्या आणि तिथे झोपलेले अजूनच कुडकुडले. आम्ही मात्र एकदम टुणटुणीत होतो.
झोपताना पहिला विचार कुठला आला असेल तर, 'मोहिमेतली ही शेवटची झोप' हाच! हां हां म्हणता चार दिवस संपले होते आणि उद्या एव्हाना आम्ही आपापल्या घरी असणार होतो...
आजचा हिशेबः
२३ डिसेंबर २०११
एकूण चाल - अंदाजे १२ किमी
वैशिष्ट्ये - 'नागफणी' हे सरप्राईज पॅकेज!, एकमेव अप्रतिम सूर्यास्त. मोहिमेमधला शेवटचा मुक्काम. उद्या संपणार हे सर्व...
(क्रमशः)
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.com/)
फारच छान ---- चाललाय
फारच छान ---- चाललाय वॄत्तांत.
सापाची कात, पहिल्या फोटोतली अखंड मिळाली का? गेल्या महिन्यात विसापुरला गेले होते, तिथे मला कात मिळाली पण अखंड नाहीए
सह्यांकन करणार्या आणि सगळी
सह्यांकन करणार्या आणि सगळी व्यवस्था करणार्या लीडर्सना दंडवत.

अप्रतिम वर्णन आणि फोटो रे.
ती कात नागाची आहे का???
मस्तच रे , सूर्यास्ताचे प्रचि
मस्तच रे , सूर्यास्ताचे प्रचि तर एकदम भारीच
सुर्यास्ताचे प्रची छानच आहे.
सुर्यास्ताचे प्रची छानच आहे. मस्त चाललय..... एकदम मजा.
एकदम मस्त सफर घडवतोयेस
एकदम मस्त सफर घडवतोयेस रे...!!!!
सुंssssदर झालाय हाही
सुंssssदर झालाय हाही भाग!!
विश्रांतीच्या जागा हसण्या-खिदळण्याने जिवंत व्हायच्या>> क्या बात, क्या बात!

तोंडी लावायला भरपूर गप्पा>> कुठल्याही चटकदार लोणच्याला ह्याची चव नाही यायची
स्वतंत्र बाणा, पुष्पगुच्छ, १७ बॅग्जचा प्रवास>> मस्त मस्त!
बादवे, मागच्या भागात सिद्धगडा माचीचा फोटो फार आवडला, हे सांगायचं राहिलं होतं..
आणि हा सूर्यास्त... अमेझिंगच टिपलाय!
पुढील भाग, शेवटचा असणार ना?
सह्यांकन ओव्हरऑल मस्त रेखाटलं आहे!
डफळेंना ओळखतो मी!
डफळेंना ओळखतो मी! सूर्यास्ताचे फोटो भारी.. Me pan gorakh-ahupe ghat- bhattiche ran- kondhwal-bhimashankar-ganpati ghat-khandas trek kelela .. Doghannich. Bhari chal ahe. .
___/\____
___/\____
भट्टी मस्त जमलीय
भट्टी मस्त जमलीय रे...!!!
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
सह्ही वर्णन, भारी
सह्ही वर्णन, भारी फोटो......
सह्यांकन करणार्या आणि सगळी व्यवस्था करणार्या लीडर्सना दंडवत. स्मित>>>>> झकासरावांना अनुमोदन..
सुरेख. फोटोही मस्त
सुरेख. फोटोही मस्त आहेत.
कुतुची पिल्लं कसली गोडुली आहेत!
गुरुदेवा सुर्यास्ताचे फोटो
गुरुदेवा सुर्यास्ताचे फोटो एकदम भारी. वर्णन नेहमीसारखेच _/\_
मस्त रे छान वर्णन अन प्रची
मस्त रे छान वर्णन अन प्रची ...
वाचुनच खुप मजा आली ... तुम्ही तर त्याहुन जास्त केली असेल ...
माझा गाठ न मारता येण्याचा
माझा गाठ न मारता येण्याचा जुना प्रॉब्लेम असल्यामुळे मी ती लेस अजूनही तशीच ठेवली आहे>> खरय..
असो.. मस्त वर्णन...
मस्त रे!!!
मस्त रे!!!
फोटो फार सुंदर आले आहेत ..
फोटो फार सुंदर आले आहेत ..
आधीचे भाग वाचले नाहियेत मे पण हा भाग आवडला वाचायला .. सूर्यास्ताबद्दलचं मनोगत छान .
निवांत बसून सूर्यास्त
निवांत बसून सूर्यास्त बघण्यासाठी ही शेवटची संधी होती and I wanted to give my best! >>> दिसतय ना.... संधीचं सोन झालेलं... सोनेरी किरणांचे सूर्यास्ताचे फोटो सही आलेत....
मस्तं भाग हा पण.....
धन्यवाद दोस्तहो! सुरश, हो,
धन्यवाद दोस्तहो!
सुरश, हो, अखंड मिळाली होती कात. पण नाजूक होती फार, म्हणून आणली नाही. सापडेल पुढच्या वेळी..

झकासराव, ते नाही ओळखता येत मला..
बागेश्री, अगदी अगदी!
हेम, डफळे मस्त माणूस आहे. एकदम शांत आणि अतिशय सौजन्यपूर्ण बोलणे. ते Central Bank of India त असल्यामुळे आम्ही त्यांना प्रत्येक कँपवर ओळख करून देताना 'CBI'मध्ये आहे असंच सांगायला लावलं होतं. त्यांच्याकडे बघून वाट्टंही!
शैलजा, कुतुची पिल्लं - :D, कसला गोड शब्द आहे!
मुक्ता, काय खरंय??
पजो, संधीचं सोन झालेलं... >> हो ना!
चला दोस्तहो, शेवटचा भाग टाकलाय...

सुखी जीवांचे फोटो फार गोड
सुखी जीवांचे फोटो फार गोड आहेत.
तुम्ही पण थकल्याभागल्यावर असेच पहुडता का?
लेख आणि प्रचि मस्त, विशेषकरून सुर्यास्ताची.
थँक्स दक्स! तुम्ही पण
थँक्स दक्स!

तुम्ही पण थकल्याभागल्यावर असेच पहुडता का?
आठवत नाही आता!