सह्यांकन २०११ - भाग १: पूर्वतयारी आणि प्रस्थान(दुर्गभ्रमण)
सह्यांकन २०११ - भाग २: आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा
सह्यांकन २०११ - भाग ३ : ढाकोबा, दुर्ग आणि मुक्काम अहुपे व्हाया हातवीज
सह्यांकन २०११ - भाग ५ : सिद्धगडमाची ते मुक्काम भीमाशंकर व्हाया भट्टीचे रान
सह्यांकन २०११ - भाग ६ (अंतिम) : पदरगड आणि निरोप
अहुप्याच्या शाळेत अतिशय शांत झोप लागली, आणि पहाटे पाच वाजताच मी जागा झालो. मीच काय, सगळेच्या सगळे शिट्टी वाजायच्या आधीच जागे झाले होते आणि बेड-टीची वाट बघत बसले होते. हे सातत्य पुढचे तीन दिवसही टिकून राहिले.
'पाणी कमी असल्यामुळे सर्वांनी सिद्धगडमाचीला पोचल्यावर दात घासायचे आहेत' हा फतवा निघाला. मी मात्र वेळ वाचला म्हणून खूश झालो! तसंही भल्या पहाटे सव्वापाचला 'विसर्जना'साठी दूरवर फेरफटका झाल्यामुळे कंटाळा आलाच होता. मग दोन-तीन चॉकलेट्स चघळली आणि सर्वात आधी सॅक पॅक केली, शूज चढवले आणि पीटीसाठी कॅमेरा घेऊनच बाहेर आलो. पूर्व समोरच्या बाजूला असल्यामुळे सूर्योदय दिसण्याची शक्यता होती.
पीटी झाली, आणि नाष्ट्याला गरमगरम पोहे समोर आले. मग पुन्हा चहा, ओळखपरेड (आदल्या दिवशी ओळखपरेड बाकी होती) झाली आणि बरोब्बर साडेसातला आम्ही कँप सोडला. अहुपेमधली ही शाळा, जिथे आम्ही काल मुक्काम केला होता -
आज सुरूवातीच्या टप्यात प्रचंड लांबलचक गायदर्याच्या पठारावरून चालून मग घाट उतरायचा होता. समोर दिसणार्या टेकाडावरून पुढे सुंदर, शांत रानातून वाट जाते -
त्या टेकडीवरून घेतलेला अहुपे गावाचा फोटो -
अहुपे ते गायदरा टॉप हे अंतर कापायला अर्ध्या तासाच्या विश्रांतीसह आम्हाला सव्वातीन तास लागले. वाटेत एके ठिकाणी बाजूच्या पायवाटेवर 'B' लिहिलेला, उलट दिशेने जाणारा बाण दिसला. याचा अर्थ, उद्या इथपर्यंत माघारी येऊन त्या वाटेने भीमाशंकरकडे जायचे होते. त्या बाणापासून गायदरा टॉप फक्त पंधरा मिनिटावर होता, हे सुदैव! जवळच पायवाटेच्या बाजूला एक विहीर दिसली आणि आम्ही तिथे थोडावेळ रेंगाळलो. (दात घासायचे बाकी होते, आठवयंय ना?)
गायदरा टॉपला पोहोचलो तेव्हा पावणेअकरा झाले होते. या फोटोतील कातळ उतरून पुढे निघालो.
A म्हणजे अहुपे, B म्हणजे भीमाशंकर, आणि S म्हणजे सिद्धगड -
गायदरा घाट म्हणजे आधी घळीसारख्या वाटेने थोडे अंतर चालल्यावर झाडीतून जाणारा दगड-धोंड्यांचा अनियमित उतार! क्षणाक्षणाला गुडघ्यांवर इतका ताण येत होता, की थोड्या वेळाने काटकी मोडल्याचा आवाज सुद्धा गुडघ्याच्या वाटीनेच केलेला आवाज नाही ना, असे (मला) वाटायला लागले होते! रात्री जेवताना वाट्या कमी पडल्या तर गुडघ्यातल्या दोन काढून देता येतील असेही वाटायला लागले होते. साखरमाचीचा अवाढव्य डोंगर उजव्या बाजूला ठेवून ही वाट खाली उतरते. वाटेत एके ठिकाणापासून डाव्या डोंगराआड दूरवर सिद्धगडाची माची हळूच डोकावते. ती पाहिल्यावर खाली उतरल्यानंतरही अजून तास-दीड तास चालायचे आहे, ही जाणीव होतेच!
गायदर्याच्या याच वाटेवर मी आणि लांबा सर्वात पुढे चालत असताना 'एमबीए परीक्षांचे बदलते स्वरूप आणि भविष्य' नावाच्या शीर्षकविरहीत विषयावर पाऊणतास एकतर्फी संवाद केला. म्हणजे फक्त मी बोलत होतो आणि लांबा ऐकत होता. हा क्षण भाग्याचाच! लांबा इतक्या आज्ञाधारकपणे ऐकत होता, की शेवटी मला असेही वाटायला लागले होते की हा भोळा बनून माझी परीक्षा घेतो आहे! आमच्या त्या गप्पा सिद्धगडकँपचे लीडर्स राजेश, पिनाक पुराणिक उर्फ पिपु, अनिकेत (हा अनिकेत वेगळा. हा मला स्वभावाने अतिशय गरीब वगैरे वाटला) आणि शार्दूल दिसेपर्यंत सुरू राहिल्या.
'तुम्हाला एवढा उशीर का झाला? तुम्ही इथे दहा वाजता पोचणार असं आम्हाला (घरून) लिहून देण्यात आलं होतं' - इति राजेश! तो उतार उतरून आल्यावर दमसास घेत असताना हा प्रश्न ऐकल्यावर माझे पुढचे एक-दोन श्वास घ्यायचेच राहिले! कुठल्या पायलटवीराने अहुपेपासून इथपर्यंतचे अंतर अडीच तासात काटून होईल हा टाईमलॉग दिला असावा हे कळेना! आमची गती व विश्रांती हे गणित पाहता आम्ही बर्यापैकी वेग राखून होतो हे नक्की होते! शेवटी आमची बॅच किती फास्ट चालते वगैरे त्याला उदाहरणासहित समजावून दिल्यावर तो दुसर्या बॅचेससाठी उद्यापासून साडेअकराला यायला तयार झाला! मागचे लोक्स बरेच मागे होते. एक तर चढावर फुल फॉर्ममध्ये असणारी आमची बॅच उतारावर सपाट व्हायची! त्यामुळे सर्वांची वाट न बघता, दोन कँपलीडर्सना घेऊन आम्ही पाच-सहा लोक्स पुढे निघालो आणि एमबीए परीक्षांवरील 'चालतं' चर्चासत्र लांबाने आपणहून पुन्हा सुरू केलं.
(त्या वरच्या फोटोमधल्या तीन बाणांपैकी "A"वाल्या बाणाकडून आलो असतो, तर आम्ही दहा-साडेदहापर्यंत पोचलो असतो, हे मागाहून कळलं.)
वळणावळणांची, झाडीतली पायवाट दोन डोंगरांना वळसा मारून तास-सव्वातासाने दमदम्याच्या खाली आणि सिद्धगडाच्या समोर येते (सिद्धगड आपल्या समोर असतो, दमदम्या डाव्या हाताला).
सिद्धगडाचा (माचीचा) पडका दरवाजा सुंदरच आहे!
इथून उजव्या हाताला वळून चार-पाच फर्लांग (एक फर्लांग म्हणजे किलोमीटरचा सहावा भाग) चाललो की आपण सिद्धगडमाची या गावात पोचतो. आम्ही कँपमध्ये पोचलो तेव्हा एक वाजून गेला होता. कँपप्रमुख विंदावहिनींनी सर्वांचं हसर्या चेहर्याने स्वागत केलं आणि थोड्याच वेळात भाजी-पोळीचं जेवण समोर आलं.
आम्ही पोचायच्या दोन दिवस आधी कँप लागला होता. पायथ्याच्या बोरवाडी गावातून २५ किलोंची पंचवीस पोती (तर मुलामुलींनो, सांगा बरं एकूण किती किलो?) इतके कँपचे सामान (शिधा, लॉजिस्टीक्स इत्यादी) त्यांनी स्थानिक गावकर्यांच्या मदतीने वर चढवले होते. सर्वच कँप्स कमी-अधिक प्रमाणात अशाच पद्धतीने लागले होते.
जेवल्यावर अडीच वाजता सिद्धगडाच्या दिशेने निघालो. सिद्धगड माचीची उंची २०२० फूट, तर सिद्धगडाची उंची ३२१६ फूट! म्हणजे आजच्या उरलेल्या दिवसात साधारण बाराशे फूट अजून चढून उतरायचे होते. सॅक्स कँपवरच ठेवल्या आणि पिट्टू सॅकमध्ये पाण्याच्या बाटल्या घेऊन निघालो. सोबत राजेश-पिपु-अनिकेत आणि स्थानिक गावकरी रमेश येणार होते. इथून वरच्या अंगाला 'बाबाची गुहा' आहे.
एका सधन गृहस्थाने संसारातून विरक्ती घेऊन पूर्वी या गुहेत मुक्काम ठोकला होता. त्याचा मुलगा त्याला सर्व शिधा दर आठवड्याला आणून देत असे. गुहेमध्ये फरशा घातलेल्या आहेत. (थोडक्यात अलिशान निवास होता). 'त्याच्या हातच्या चहाची चव अप्रतिम असायची तसेच तो तिथे जाणार्या सर्वांना चहा आग्रहाने पाजायचा' अशी आठवण मी ऐकली. सध्या ते बाबाजी पुन्हा मुलाकडे राहायला गेले आहेत असेही ऐकले. पण पंचक्रोशीमध्ये बाबाजी प्रसिद्ध होते, हे मात्र नक्की!
मग बाबांच्या गुहेमध्ये थोडा 'प्रकाश टाकला' -
त्या वाटेवरून घेतलेला फोटो. फोटोत सावली आणि सूर्याच्या सीमारेषेवरची घरं म्हणजे सिद्धगडमाची गाव.
या फोटोत समोर साखरमाची डोंगर आणि उजव्या हाताला दमदम्या डोंगर. साखरमाची डोंगराच्या खालच्या झाडीत साखरमाची गाव आहे. साखरमाची आणि दमदम्या यांच्यामधल्या घळीत गायदरा घाट आहे. दमदम्याच्या पायथ्याच्या जंगलभागातून सकाळी आम्ही आलो होतो. यावरून वाचक वाटांचा अंदाज लावू शकतील.
गुहेपर्यंतची वाट सरळ चढाची आहे. खरी मजा गुहेपासून पुढे येते. अरूंद चढ, मागे थेट दरी आणि थोडीशी स्क्री (सुटे दगड, वाळू, माती) अशी रंगतदार वाट आहे. मोहिमेमध्ये पहिल्यांदाच अशी वाट अनुभवत होतो.
वर पोचलो तेव्हा चार वाजले होते. समोरच उघड्यावर स्थानापन्न झालेले शिवलिंग -
कोण्या एके काळी उभ्या असलेल्या पडक्या वाड्याच्या दरवाजाची कमान -
सिद्धगडाच्या माथ्यावरून दिसणार्या दृश्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतील. दक्षिणेला दूरवर भीमाशंकरचे पठार (जिथे आम्ही उद्या असणार होतो), नागफणी, त्याच्या उजवीकडे खाली पदरगड, त्याच्या मागे लांबवर पेठचा किल्ला (कोथळीगड), सिद्धगडाच्या पायथ्याला बोरवाडी गाव, हुतात्मा भाई कोतवालांच्या स्मारकाचे बांधकाम, वायव्येकडे बदलापूरचा बारवी डॅम, उत्तरेकडे गोरखगड, त्याच्या मागून हळूच डोकावणारा मच्छिंद्रगड, साखरमाचीचा डोंगर व झाडीतले साखरमाची गाव, आणि त्याच्या मागे अहुप्याचा डोंगर, त्याच्या उजवीकडे दमदम्या आणि राजाची लिंगी! (प्रस्तरारोहणासाठी गिर्यारोहक जे छोटे-मोठे सुळके निवडतात त्यांना लिंगी म्हणतात). याठिकाणी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण झाली! (हरये नमः हरये नमः |). उपलब्ध हवामानामध्ये आम्हाला एवढं पाहायला मिळालं. हवा अजून स्वच्छ असती तर कदाचित अजूनही एखादा किल्ला दिसला असता. फोटो घेण्याइतकी स्वच्छ हवा नसल्यामुळे ते फोटो घेता आले नाहीत.
पण सिद्धगडाच्या एका टोकापाशी जाऊन घेतलेले हे फोटो - ह्या त्रिकोणी पठाराच्या उंचीवर सिद्धगडमाची गाव आहे.
झूम करून सिद्धगडमाची गाव -
उतरतांना तर अधिक थरार होता. कारण - तेच नेहमीचेच! दरी डोळ्यांसमोर असणार होती! पण लीडर्सलोकांनी कडक शिस्तीमध्ये सर्वांना खाली आणले. लांबाने तर मला 'बाबाच्या गुहेपाशी जाईपर्यंत मोठमोठ्याने बडबडलास तर वरून दगड मारेन' असा सज्जड दम दिला होता. (मग मी गुहेपर्यत पिपुला पुणेकर वर्सेस मुंबईकर वरून छळत बसलो होतो. तोही काही कमी नव्हता हे लिहिणे महत्त्वाचे!). उतरेपर्यंत अंधार पडला होता. माचीवर पोचलो तेव्हा साडेसहाच्या अंधुक प्रकाशात सिद्धगड-दमदम्याची फक्त किनार दिसत होती. फ्रेश होऊन आलो आणि (इथे पहिल्यांदाच) ओळखपरेड झाली. आतापर्यंत आम्ही एकमेकांची ओळख करून देण्याइतके सर्वांना ओळखू लागलो होतो. तो कार्यक्रम छानच रंगला.
जेवायला व्हेज पुलाव व दाल आणि भजी असा मेनू होता. भरपेट जेवून व्यायामशाळेमध्ये आलो. (मुक्कामाची सोय तिथे होती. कृपया गैरसमज नसावाच!) पायांना तेल लावायची इच्छा झाली. माझ्याकडे तेल होतेच. पण लांबाकडेही एक असरदार वारीचे तेल होते (आषाढीच्या वारीमध्ये वारकर्यांच्या पायाला मोफत मालीश करायचे बहुगुणी तेल). 'तू करणार की करून द्यायला हवंय?' - इति लांबा! मग लगेचच पायाला मालिश करण्यासाठी मी याचक बनून लांबापुढे 'पाय पसरून' बसलो. सहभागी सभासदांची स्वतःहून सेवा करणारा असा लीडर आतापर्यंत पाहिला नाही! थोड्याच वेळात अजून दहा पावले लांबासमोर जमा झाली. तो कार्यक्रम पार पडल्यावर अंथरूणावर अंग टाकलं तेव्हा दहा वाजून गेले होते. गेल्या दोन दिवसांपेक्षा झोपायला थोडा उशीरच झाला होता. पडल्यापडल्या झोप लागली, हे सांगणे न लगे!
आजचा हिशेबः
२२ डिसेंबर २०११
एकूण चाल - अंदाजे १३ किमी
वैशिष्ट्ये - दमवणारा गायदरा घाट आणि रंगतदार सिद्धगड. तीन दिवस संपले. अजून दोन बाकी.
(क्रमशः)
- नचिकेत जोशी
ब्लॉगवर प्रकाशित - (http://anandyatra.blogspot.com/)
आज मपला पयला नंबर... एक से
आज मपला पयला नंबर...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक से बढकर एक प्रचि रे. झूम करून घेतलेला फोटू लै आवडला
लांबाने तर मला 'बाबाच्या
लांबाने तर मला 'बाबाच्या गुहेपाशी जाईपर्यंत मोठमोठ्याने बडबडलास तर वरून दगड मारेन' असा सज्जड दम दिला होता >>>
मग....? तशी वेळ आणलीस का त्याच्यावर....दगड मारायची.. ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हा भाग पण छान, सगळे फोटोज पण मस्तं...
चला आता ४ हि भाग वाचून झाले.
चला आता ४ हि भाग वाचून झाले.
पुढचा कधी?
हा पण भाग मस्तच...!!!
हा पण भाग मस्तच...!!!
सिद्धगड मस्तच आहे.. त्रिकोणी
सिद्धगड मस्तच आहे.. त्रिकोणी पठार जबरीच..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्ही काही वर्षांपूर्वी गेलो होतो तेंव्हा बाबाजी गुहेत राहत होते.
आणि शिवजी उघड्यावर स्थानापन्न झालेले नाहीत तर स्थानापन्न झाल्यावर उघड्यावर आलेले आहेत...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
गायदरा आणि दमदम्याच्या वाटेचे
गायदरा आणि दमदम्याच्या वाटेचे वर्णन वाचून बरे वाटले... अहूपे ते सिद्धगड या पावसाळी ट्रेकसाठी तुलाच आम्ही लांबा (ट्रे.लि.) करणार आहोत.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हा भागही आवडला.
जबरा
जबरा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हाही भाग मस्त. बाबाची गुहा
हाही भाग मस्त. बाबाची गुहा खूप आवडली. चिंतन करायला छान जागा आहे. वारीचे तेल काय असते लिहीणार का? उत्सुकता आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
.
.
वा नचिकेत - हे वर्णनही अगदी
वा नचिकेत - हे वर्णनही अगदी बहारीचं..... फोटुही मस्तच.....
लै भारी!!!
लै भारी!!!
मस्त !
मस्त !
मस्त फोटोज आणि वर्णन... !
मस्त फोटोज आणि वर्णन... ! त्रिकोणी पठार झकास..
अहूपे ते सिद्धगड या पावसाळी ट्रेकसाठी तुलाच आम्ही लांबा (ट्रे.लि.) करणार आहोत>>
उतरायचे मात्र बोरवाडीतून.. मज्जा येईल..
अहूपे ते सिद्धगड या पावसाळी
अहूपे ते सिद्धगड या पावसाळी ट्रेकसाठी तुलाच आम्ही लांबा (ट्रे.लि.) करणार आहोत>> तेल ही घेऊन जा. म्हणजे चांगाली मालीश करून मिळेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अहूपे ते सिद्धगड या पावसाळी
अहूपे ते सिद्धगड या पावसाळी ट्रेकसाठी तुलाच आम्ही लांबा (ट्रे.लि.) करणार आहोत>> उतरायचे मात्र बोरवाडीतून.. मज्जा येईल >> हो सहीच...
अरे नची त्या सिध्धगड माचीवरील दरवाज्याच्या पुढे एक मंदिर आहे .तेथे गेला नव्हता का ?
बाकी तुमचा ट्रेक मस्त चाललाय ... ते त्रिकोणी पठार भारीच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पावसाळा असेल तर बोरवाडीच्या
पावसाळा असेल तर बोरवाडीच्या वाटेने उतरायला मज्जाच येते...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच !
मस्तच !
तू लांबाला १ तास लेक्चर
तू लांबाला १ तास लेक्चर दिलंस? .. तुला घाबरूनच रहायला हवं!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Btw लांबाही माबोकर आहे
धन्यवाद लोकहो! पजो, लीडरचं
धन्यवाद लोकहो!
पजो, लीडरचं ऐकायचं असतं!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अश्विनीमामी, मला एवढंच माहितेय. अजून माहिती हवी असल्यास सांगा. मी विचारून कळवतो.
रोमा, माचीच्या पुढच्या देवळात नाही गेलो. दुरूनच नमस्कार केला..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अहूपे ते सिद्धगड या पावसाळी ट्रेकसाठी तुलाच आम्ही लांबा (ट्रे.लि.) करणार आहोत>>पावसाळ्यात मला वाटा सापडत नाहीत.
जाऊ रे! नक्की तुम्हाला वाटेला लावेन!
हेम, हो, लांबा माबोकर आहे.
मस्त.. लई भारी.. काही फोटो
गुरुदेवा _/\_ मस्तच वर्णन
गुरुदेवा _/\_ मस्तच वर्णन
बहरदार एपिसोड!!!!
बहरदार एपिसोड!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्षणाक्षणाला गुडघ्यांवर इतका ताण येत होता, की थोड्या वेळाने काटकी मोडल्याचा आवाज सुद्धा गुडघ्याच्या वाटीनेच केलेला आवाज नाही ना, असे (मला) वाटायला लागले होते!>> बाबारे! माझ्याकडून कधीच ट्रेक वगैरे होणार नाही बहुधा!![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
एक- दोन श्वास घ्यायचे राहिले >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
प्रकाश टाकला>>![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
सनराईज अफलातून टिपला आहेस! आता ५वा भाग वाचते..
लई भारी!!!
लई भारी!!!