'राग दरबारी'

Submitted by लसावि on 16 December, 2011 - 04:29

अनेक वर्षे हे पुस्तक घरात होते पण वाचायचा योग आला नाही. पण काही दिवसापूर्वी 'राग दरबारीचे लेखक श्रीलाल शुक्ल यांचे निधन' अशी बातमी आली आणि बघूया तरी काय आहे ते या विचाराने वाचायला घेतले.

'शहर का किनारा, जिसे छोडते ही भारतीय देहातों का महासागर शुरु होता है' या पहिल्या वाक्यातच या पुस्तकाने माझ्यावर जो कब्जा मिळवला तो शेवटपर्यंत.

या पुस्तकची भाषा हा त्याचा सर्वात धमाल भाग आहे. वन-लायनर पंचेस, झणझणीत म्हणी आणि सणसणीत उपहास; काही उदाहरणे पहा
'उस ट्रक को देखते ही पता चलता था की उसका जनम सिर्फ सडकोंपे बलात्कार करने के लिए हुआ है'
'प्रचलित शिक्षा पद्धती सडक पे पडी कुतिया की तरह है, जिसे हर कोई लात मार के चला जाता है'
'वह शुद्ध भाव से बेला का मनन करने लगा, और चूंकी भाव शुद्ध था उसने उसके कपडों के बारे मेंभी नही सोचा'
'पढा-लिखा आदमी सुअर की लेंड की तरह होता है, न लिपने के काम आता है न जलाने के'
दुरदर्शनच्या बातम्यात, राष्ट्रभाषा सेवा समितीच्या वर्गात, सलिम-जावेद-कादरखान पासून राहीमासूमरजा- अब्रारअल्वी- गुलशननंदा पर्यंतच्या हिंदीसिनेमासंवादातदेखील कधीही न भेटलेली कचकचीत, 'रॉ' हिंदी. मजा आली!

म्हटलं तर या कादंबरीला कोणी एक नायक नाही, तसे फारसे कथानकही नाही. रंगनाथ नावाचा नवपदवीधर तब्येत सुधारण्यासाठी शिवपालगंज या त्याच्या मामाच्या गावाला सहा महिने जाउन राहतो. त्या काळात गावात घडलेल्या गोष्टी एवढीच कथा. पुन्हा रंगनाथ या कथेचा निवेदकही नाही, ते काम लेखकच करतो.

मिरासदारांच्या ग्रामीण नमुन्यांची आठवण करुन देणारी एकापेक्षा एक नामंकित पात्रे हे या कादंबरीचे दुसरे वैशिष्ठ्य. सर्व गावाचे नेतेपद संभाळणारे रंगनाथचे धूर्त मामा बैद्यजी, त्यांचा अडेलतट्टू मोठा मुलगा बद्री पहलवान, धाकटा हिरोछाप रुप्पन, बैद्यजींच्या घरी भांग घोटणे एवढ्या पात्रतेवर सरपंच बनणारा सनिचर, बापाला दररोज बदडणारा बद्रीचा शिष्योत्तम छोटे पहलवान, 'सत्त की लडाई' म्हणून लाच न देता सरकारी काम करु पाहणारा लंगड, लबाड आणि लाचार कॉलेज प्रिन्सिपल, लफडेबाज बेला आणि तिचा बाप गयादिन........
या सर्व गोतावळ्याला बरोबर घेउन, त्यांच्या वैयक्तिक कहाण्या सांगत, एका गोष्टीतून दुसरी अशा लोककथेच्या अंगाने ही कादंबरी पुढे सरकते.

पण भाषा आणि पात्रांच्याही पलिकडे जाउन ही कथा स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय-सामाजिक-नैतिक अधःपतनाची आहे. अत्यंत धारदार उपहास हे लेखकाचे मुख्य शस्त्र आहे. ब्लॅक ह्युमरचा इतका प्रभावी वापर भारतीय साहित्यात फार कमी वेळा झाला असेल. संवेदनाहीन आणि निरर्थक सिस्टीम, भाकड रोमँटीसिझम आणि तत्वज्ञानात अडकलेले तत्कालिन साहित्य, 'सुंदर ,निरागस खेडे' अशा आणि यासारख्या अनेक भ्रामक कल्पना; यासर्वांवरचा रंग शुक्लाजी खरवडून काढतात आणि आतले भीषण, नग्न वास्तव उघडे करतात.

श्रीलाल शुक्लांना १९७० सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळवून देणारी ही कादंबरी आजही तित़कीच किंबहुना जास्तच प्रासंगिक ठरावी यापेक्षा दुसरे दुर्दैव ते कोणते?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रे! छान माहिती आहे.

कदाचित मराठी अनुवाद असल्याने असेल पण सुरूवातीची थोडी पाने वाचल्यावर खूप पकड न घेतल्याने पुढे वाचली नव्हती. आता पुन्हा चालू करतो Happy

माझं अत्यंत आवडतं पुस्तक. मला वाटतं मराठी अनुवाद आहे त्याचा. कारण मला आधी मराठीत वाचल्यासारखं वाटतंय. मग दिल्लीला गेल्यावर खरेदी केलेलं आणि वाचलेलं ते पहिलं हिंदी पुस्तक होतं.

<< ही कादंबरी आजही तित़कीच किंबहुना जास्तच प्रासंगिक ठरावी यापेक्षा दुसरे दुर्दैव ते कोणते?>> याला अनेको मोदक.

फणीश्वरनाथ रेणूंची (माझे सर्वात आवडते हिंदी लेखक) मैला आंचल स्वातंत्र्याच्या आसपास घडते. आणि ही त्यानंतर ३०-४० वर्षांनी. साधारणपणे आसपासच्या भूभागात. दोन्ही कादंबर्‍या मिळून एका प्रदेशाच्या अधोगतीच्या आलेखाचे भेदक दर्शन होते.

आगावा, मैला आंचल वाचली नसशील तर अगदी जरूर वाच. रेणू फारफार ताकदीचे लेखक होते.

आपण बिहारी म्हटलं की मनात हसतो - पण त्या मातीने अत्यंत सुंदर शुद्ध देशी हिंदी (सरकारी/ शाळेत शिकवल्या जाणार्‍या हिंदीला हिंदी म्हणणे हा तिचा अपमान आहे..) आणि हिंदीतले/ भारतातले सर्वश्रेष्ठ साहित्यिक दिलेत हे आपल्या मराठी लोकांना साधारणपणे माहितच नसते.

मस्त ओळख रे.
ही ओळख वाचल्यावर लक्षात आलं की आपण हिंदी काहीही वाचलेलं नाहीये. कंप्लिट ठणठणाट.
आता हेच पुस्तक मिळवावे आणि श्रीगणेशा करावा. Happy

नीरजा +१.

हिंदी काहीही वाचलेलं नाहीय आजतागायत. एखादी हिंदी कादंबरी वाचण्यासाठी मला जबरदस्त पेशन्सची गरज भासेल असं वाटतंय.
ती जी कचकचीत, रॉ हिंदीची उदाहरणं दिली आहेस त्यावरून तरी वाटतंय की अनुवाद भलताच च्यालेंजिंग असणार Wink

छान लिहिलंयस, आगावा, पण इतकं संक्षिप्त का लिहिलंस?

ललिता, पेशन्सची गरज नाहीये. एकदा हातात चांगलं पुस्तक पडलं की आपोआप गुंगून जाशील. मी हिंदी वाचायला सुरुवात केली तेव्हा माझी हिंदी भयाणच होती. Proud

मला जर नीट आठवत असेल तर याचे सादरीकरण दूरदर्शनवर झाले होते. >>> येस्स! काल शीर्षक वाचल्यावर क्षणभर मेंदूत काहीतरी हललं होतं खरं; Proud पण मी तेव्हा आठवण्याचा फारसा प्रयास केला नाही. आता मला थोडं थोडं त्याचं शीर्षकगीतही आठवतंय.

सादरीकरण - तुम्ही "कक्काजी कहिन" बद्दल म्हणताय का? काय जबरी धमाल सिरीयल होती ती! ओम पुरी आणि शैल चतुर्वेदी चे संवाद महान होते.

नाही नाही, फारेण्ड, कक्काजी कहिन हे येस मिनिस्टर या ब्रिटिश मालिकेचे स्वैर रूपांतर होते. राग दरबारी याच नावाने सीरियल असल्याचे अंधुक आठवतेय (ते ब्रँड नेम इतकं मोठं आहे की ते शीर्षक बदलणं शक्यच नाही!). पण मी एकूणातच टीव्ही कमी पहायचे शाळेत असताना त्यामुळे राग दरबारी पाहिल्याचं आठवत नाही..

'राग दरबारी'!! अगदी नावापासूनच भेदक ब्लॅक ह्यूमरची सुरुवात... केवळ उच्च.. Happy परत एकदा वाचलीच पाहिजे.

आगावा, जरा डोक्यातली धूळ झटकल्याबद्दल धन्यवाद (थिंग्ज फॉल अपार्ट वरच्या पोस्टने असंच झालेलं.. मग परत ते पुस्तक परवा वाचलं.) असाच अधूनमधून तुझं झटकणं चालवत रहा Happy

प्रेमचंद ग्रेटच! इतक्या साध्या भाषेत इतकं परिणामकारक लिहिता येतं हे अशा लेखकांना वाचल्यावर कळतं. कधी कधी वाटतं की शाळा कॉलेजमधे मराठी शिकत/शिकवत असताना 'शैलीचं' अवास्तव स्तोम माजवतात. प्रेमचंद, रेणू, चुगताई, मंटो, मन्नु भंडारी, अमृता प्रीतम किती सरळ सोप्या भाषेत लिहितात... (मराठीत सरळ सोप्या भाषेत लिहिणारे महान लेखकु नाहीत असं माझं मत नव्हे याची नोंद घ्यावी प्लीज. इथे वेगळाच वाद उत्पन्न व्हायचा :फिदी:)

प्रेमचंदांच्या तर त्या दीड-दोन पानी गोष्टींमधे विश्व सामावलेलं असतं. सत्यजित रायनी दोनच हिंदी चित्रपट बनवले - सद्गती आणि शतरंज के खिलाडी. दोन्ही प्रेमचंदांच्या कथा. २-३ पानांच्या असतील नसतील. पण त्या ओळीओळी मधलं सबटेक्स्ट पकडून रायनी दोन अफलातून क्लासिक्स उभे केले..

आगावानं येका हिंदी बुकाचं नाव घ्येतल्यावर वर्दातैंनी येकदम हिंदी बुकांची लाय्बब्रीच चाल्वायला घ्येतली की Proud

अरे वा! अजून हे पुस्तक वाचायचा योग नाही आला. धन्यवाद आगाऊ.
हिंदी साहित्य वाचल्याला बरीच वर्षे झाली आता. पण हिंदी साहित्य वाचताना मजा येते याला अनुमोदन.

'राग दरबारी' या नावाचीच ती सिरियल होती. त्याकाळी गाजली होती. विशेषतः लंगड हे कॅरेक्टर फार गाजल होतं. कलाकाराचे नाव लक्षात नाही. पण सध्या 'अफसर बिटीया' या सिरियलच्या प्रोमोमध्ये वडिलांच्या रोलमध्ये दिसतात ते. बहुतेक हिंदी रंगमंचावरचे कलाकार होते. त्यातले काही नंतर सिरियल्स सिनेमामध्ये व्यस्त झाले. Happy

छान लिहिलेय. श्रीलाल शुक्लांची बातमी वाचताना राग दरबारी मालिका आठवली.

हिंदीत याआधी 'मेरी श्रेष्ठ कविताएं' वाचायचा प्रयत्न केलाय. राग दरबारीही मुळ रुपातच वाचायला आवडेल.

(माझ्या वडलांनी फारच थोड्या मालिका पुर्ण पाहिल्या, त्यात राग दरबारीचा समावेश आहे. त्यामुळे मला ती खुपच भारी वाटायची... मला मात्र पाहता नाही आली, खुपच थोडे भाग पाहिलेले. त्यातले लंगड हे पात्र आणि भीमसेन जोशींनी गायलेले शीर्षकगीत जे राग दरबारीचे लक्षणगीत होते एवढेच लक्षात आहे. बाकी काहीच आठवत नाही आता. अफसर बिटीयातले जे वडिल आहेत त्यांना पहिल्यांदा या मालिकेत पाहिलेले. त्यांनी केलेल्या भुमिकांमधली लंगड ही एक महत्वाची भुमिका असावी)

सुंदर ओळख करुन दिली आहे. मनःपूर्वक धन्यवाद Happy
खरं तर माझं बोलण्यातलं हिंदी बरं आहे ( उर्दू हिंदी नव्हे, संस्कॄत हिंदी Happy ) पण तेच पुस्तकरुपाने समोर आलं की वाचायला वेळ लागेल. चिकाटी ठेवावी लागेल. तरी आता हिंदी पुस्तक मिळवून वाचलेच पाहिजे अशी जबरदस्त इच्छा झाली. सुदैवाने इथल्या लायब्ररीत आहेत थोडीबहुत हिंदी पुस्तके. हे पुस्तक नाही मिळालं तर वर उल्लेख झालेल्या लेखकांपैकी एकाचं तरी नक्कीच वाचेन Happy

प्रेमचंदबद्दल वरदाला अनुमोदन, केवळ शैलीचा सहजपणाच नाही तर मानवी दुखःबद्दल अपार करुणा हे ही त्याचे वैशिष्ठ्य आहे.
http://www.scribd.com/doc/19062291/Shrilal-Shukla-Rag-Darbaari
ज्यांना ऑनलाईन वाचायची आहे त्यांच्यासाठी

थँक्स आगावा.... इथे या पुस्तकाची ओळख व लिंक दिल्याबद्दल. अनेक हिंदी ब्लॉग्ज / संकेतस्थळे मी लहर आली की वाचत असते. त्यात वरच्या चर्चेतील पुस्तकांचे, लेखकांचे संदर्भ येत असतात. कविताकोश वाचतानाच दमछाक होतेय Proud आणखी कितीतरी बरेच बरेच काही वाचायचे आहे....

मस्त पुस्तक आहे हे.

हिंदी साहित्याचं माझंही वाचन अगदी कमी पण वाचलेली पुस्तकं कायम लक्षात राहिली. सर्वात पहिली कथा मी वाचली होती मनू भंडारी यांची 'यही सच है' बासू चटर्जींच्या सिनेमांवर एक दीर्घ लेख करत असताना ऋतूरंगच्या अरुण शेवतेंनी ही कथा आवर्जून वाचायला सांगीतली होती. 'रजनीगंधा' सिनेमा याच कथेवर निघाला होता. इतकी साधी, सोपी, अनलंकृत आणि तरीही देखणी हिंदी भाषा होती मनू भंडारींच्या त्या कथेची. यही सच है कथा कोणीही प्रेमात पडावं इतकी गोड आहे. त्याही आधी एकदा लांबच्या ट्रेनसफरीत सोबतच्या सहप्रवाशाचं पुस्तक वाचायला घेतलं होतं ते गुलशन नंदांचं 'मैली चांदनी' काही पानं वाचताच लक्षात आलं की हे 'कटी पतंग' सिनेमाचं कथानक आहे. कमालीची पकड होती त्या कथेत. गुलशन नंदांच्या अनेक कथानकांवर हिंदी सिनेमे निघाले आहेत हे नंतर कळलं.
शेवतेंचं हिंदी साहित्याचं वाचन भरपूर आहे. त्यांनीच मोहन राकेश यांचं 'प्रानिधिक कहानियां' वाचायला दिलं. अप्रतिमच होतं ते. आधे-अधुरे वाचलं. त्याच सुमारास हे 'राग दरबारी' वाचलं. मग इस्मत चुगताईंच्या काही कथा मुळातून वाचल्या. गुलझारांची हिंदीतली पुस्तकं वाचली. प्रेमचंद वगैरे मात्र नाही वाचणं झालं कधी. कमलेश्वरांची 'काली आंधी' वाचली. आता फणीश्वरनाथ रेणूंचं वाचायचं आहे.

आगाऊ, मनःपूर्वक धन्यवाद.

इथेच वाचून 'राग दरबारी' आणले. वाचत आहे. अचाट आहे. सत्तरच्या दशकातील भारताच्या परिस्थितीचे विडंबनात्मक वर्णन वाचताना विचारपण करायला लावतं. त्यावेळची आणि आत्ताच्या परिस्थितीत विशेष फरक पडला नाही असं वाटत राहतं.
धन्यवाद आगाऊ, हे पुस्तक सुचवल्याबद्दल. Happy

मी पण माहीत नाही कितव्यांदा राग दरबारी वाचत आहे, तरी प्रत्येक वेळेस सतत हे तर आजच्या साठीच लिहिलं गेलंय असंच वाटत रहातं.

अप्रतीम सटायर. हसवत हसवत कमालीचं खिन्न आणि हताश करून जातं.

Pages