हजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर! आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर यावी इतकी खोली, सकाळी अकरा वाजताही सूर्यकिरणे अडवली जातील अशा डोंगरांचा शेजार! त्याच्या एका बाजूला सरळसोट भिंत आणि दुसर्या बाजूच्या पोटात कोरलेली वेडीवाकडी कातळवाट! त्या भिंतीखाली थोडंस मोकळं पठार, त्याखाली बर्यापैकी उताराच्या वाटा आणि पायथ्याला वळसा मारून माळशेजकडे जाणारा कल्याण-नगर रस्ता! - भैरवगड या वर्णनापेक्षाही अधिक काहीतरी आहे!
कल्याण डेपोला शनिवार, ३ डिसेंबरला रात्री सगळे जमलो तेव्हा एक थरारक ट्रेक आपल्या नशिबात वाढून ठेवला आहे, याची मला अजिबात कल्पना नव्हती. 'ऑफबीट'च्या ब्लॉगवर टेक्निकल ट्रेक असं लिहिलं होतं, माहितीसाठी फोटो टाकलेले होते तरीही त्या फोटो-माहितीवरून भैरवगडाचा रोमांच कळला नाही. तो अनुभव प्रत्यक्षच घ्यायला हवा.
यावेळी "ऑफबीट"च्या भैरवगड ट्रेकचे लीडर होते - प्रीती, राजस आणि कदाचित टेक्निकल असल्यामुळे - सुन्या आंबोलकर. यष्टीमध्ये दोन-अडीच तासांचा प्रवास करून कल्याण-नगर रस्त्यावरील 'मोरोशी' या भैरवगडाच्या पायथ्याला असणार्या गावाला पोचायचे होते. एसटीमध्ये बसल्या बसल्या झोप घेता येईल अशा कल्पनेत जुन्या ओळखीच्या ट्रेकमेट्सची ख्याली-खुशाली विचारून झाली. थोड्याच वेळात "एसटी आली" असा आवाज झाला आणि प्रचंड गर्दी असल्यामुळे एसटी थांबत असतानाच खिडक्या उघडून खालूनच आतमध्ये बॅगा टाकून दिल्या. थोड्यावेळाने कळले, ती आमची एसटी नव्हतीच! मग पुन्हा खालूनच आतल्या प्रवाशांना सांगून त्या बॅगा काढून घेतल्या. (त्या धांदलीत बहुधा आमच्यापैकी कुणाच्याच नसलेल्या एक-दोन बॅगाही खाली आल्या असाव्यात असे नंतरच्या गोंधळावरून वाटले). मग आमचीही एसटी थोड्याच वेळात आली आणि कशाबशा दोन सीट्स मिळवल्या. मोरोशीपर्यंत प्रवास उभ्यानेच करावा लागणार होता.
एसटी सुरू झाली आणि आमची गाणीही! ट्रेकच्या मूडमध्ये असलो की एसटी, बाकीचे पेंगुळलेले लोक, काळ-वेळ याचं भान राहत नाही! (आजूबाजूचे लोक बर्याचदा आमचे हे 'उद्योग' चालवून घेतात.) पण तेव्हा मात्र आमची सूर-ताल(आणि प्रसंगी शब्दही) या सर्वांना सोडून चाललेली गाणी ऐकून कंडक्टर खवळला! "तुमचं हे जे काय आहे ते मुरबाड गेल्यावर करायचं" - इति कंडक्टर! ट्रेकमधल्या आमच्या एका जिव्हाळ्याच्या कार्यक्रमाचा असा उद्धार झालेला पाहून २२ फुल ऐवजी ४४ हाफ तिकीटे काढावीत असा "सूडविचार" माझ्या मनात येऊन गेला! अखेर कंडक्टर शेवटच्या सीटपर्यंत राउंड मारून गेला, लाईट बंद झाले आणि आमची गाणी मुरबाड यायच्या आधीच पुन्हा सुरू झाली!
मोरोशीला उतरलो तेव्हा बारा वाजून गेले होते. रस्त्यालगतच्या एका घर कम हाटेलात संयोजकांनी आधीच कल्पना देऊन ठेवलेली असावी. सुनसान रस्ता, उगवतीकडे काळोखात अस्पष्ट दिसणारी भैरवगडाची रांग, थोडीशी थंडी आणि त्या घरवाल्यांनी ऑफर केलेला चहा! क्या बात! कोण नाही म्हणेल? मग चहाचा राऊंड झाला. त्यांच्या अंगणात परिचयाचा कार्यक्रम पार पडला. मी नुकतेच घेतलेले हंटर शूज 'टेस्ट' करण्यासाठी घातले होते. त्यांच्या लांबलचक लेस त्या वेळात मी लावून घेतल्या.
प्रीतीने कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त घाबरवून सोडणार्या सूचना दिल्या. 'या भागात भरपूर विषारी साप आहेत. ते रात्रीच्याच वेळी अधिक अॅक्टीव्ह असतत. मान्सून नंतर या भागात येणार आपण दुसरे किंवा तिसरेच असू, त्यामुळे एकत्र चाला, प्रत्येकाकडे टॉर्च.... इ इ इ ' नुकत्याच झालेल्या वासोटा ट्रेकमधल्या अनपेक्षित "हिस्स" प्रसंगामुळे ही खबरदारी असावी. आम्हाला मुख्य चढणीचा भाग पार करून पठारावरच्या भैरोबाच्या वाडीपर्यंत जायचे होते. तिथे मुक्काम करून मग दुसर्या दिवशी सकाळी गड चढायचा होता. तिथलाच एक गावकरी वाटाड्या म्हणून येणार होता. पाऊण वाजता बॅगा पाठीवर टाकून निघालो. थोडे अंतर रस्त्यानेच चालून मग शेतातून एक पायवाट पकडली. नाकाबंदीसारखं काहीतरी रस्त्यावर लागलं होतं. तिथल्या पोलिसाने "भैरवगड का? वाटाड्या घेतला आहे का?" वगैरे चौकशी केली.
पायवाटेने थोडे अंतर चाललो असू, तेवढ्यात आमच्या वाटाड्याने एका बंद घराच्या पडवीत नेले आणि इथेच आराम करा असे म्हणू लागला. रानात वाट काट्यांची आहे, साप आहेत, रात्री चढता येणार नाही वगैरे वगैरे कारणे दिल्यावर आम्हाला 'वेगळीच' शंका आली. लीडरलोक्सांनी त्याला बाजूला नेऊन काय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकला. आणि मग त्या वाटेने वीसएक टॉर्च एकापाठोपाठ लखलखू लागले. सवयीने आमच्या जागाही आता ठरून गेल्या आहेत. नेहमीप्रमाणे सुशील आणि मी सुन्याबरोबर बॅकलीडला होतो. उतरताना आम्ही बरोब्बर फ्रंटलीडला असतो. वाट शोधायची असेल तर आम्ही कुठेही असतो - झाडीत, घळीत, निवडुंगात इ.इ. लीड-बिड ह्या सगळ्या मोहमयी गोष्टी आहेत! everyone will walk either behind us or in front of us असं सोप्पं सूत्र आहे! असो. 'पहिलटकरांना' "चले चलो"चा नारा देत, मागे कुणीही राहणार नाही याची काळजी घेत दोन-अडीच तास उभट चढ, सपाट पठार यावरून चालून अखेर भैरोबाच्या वाडीजवळ आलो. इथे दोन-चार उत्साही लोक शेकोटीसाठी लाकडं शोधायला निघून गेले.
शेकोटी पेटवली आणि पाच पर्यंत फक्त भुतांच्याच गप्पा टाकल्या.
उघड्यावर तासभर झोप लागली असावी. थंडी वाढल्यामुळे तमाम जनता कुडकुडत होती. मी पावणेसहा पासून जागाच होतो. काळोख संपत जातानाची ही वेळ फार सुंदर असते. एकही शब्द न बोलता, कसलाही विचार न करता, शांतपणे श्वास घेत फक्त स्वस्थ पडून होतो. साडेसहाच्या सुमारास आकाश हळूहळू उजळायला लागलं आणि आजूबाजूचा नजारा दिसायला लागला.
मुक्कामाची जागा नि:संशय सुंदर होती. डोंगरकड्यापासून वीसएक फुटांवर आम्ही पथार्या पसरल्या होत्या. विरूद्ध बाजूला भैरवगडाची भिंत. बाजूला घळ आणि लगेचच अजून एक भैरवगडापेक्षाही उंच डोंगर. तिथून उजवीकडे पार नानाच्या अंगठ्यापर्यंत गेलेली डोंगररांग. नुकताच गिलावा दिला असावा असे सरळसोट कडे आणि त्यांच्या समोर दूरवर नजर जाईल तिथपर्यंत जमीन!
टाईमपास करत सगळं आवरून निघायला आठ वाजले. भैरोबाची वाडी निर्मनुष्य आहे. पूर्वी इथे वस्ती होती असं म्हणतात. आता एखाद-दुसरं पडकं घर आहे. तिथलीच लाकडं आणून आमचा आदल्या रात्रीचा 'शेकोटीचॅट' पार पडला होता. भैरवगडाला पायथ्याला डाव्या दिशेने पूर्ण वळसा घालून वाट जाते.
त्यावाटेवर ही काकडीसारखी दिसणारी वनस्पती दिसली..
वाटेत एके ठिकाणी पाण्याचे टाके आहे. तिथे बाटल्या भरून घेतल्या.
टाक्याजवळ सुन्या - द लीडर!
डाव्या हाताला गेलो की भैरवगडाकडे एक सोंड चढून वाट जाते. (ही एकमेव वाट आहे). 'खरा' ट्रेक इथून सुरू होतो.
तिथून बाजूच्या डोंगररांगेचा फोटॉ -
एक थोडासा घसरडा पॅच पार केला की आपण गडाच्या मागच्या बाजूला येतो. आणि.... इतका वेळ पायवाटेशी असलेला संपर्क संपतो. इथून फक्त आणि फक्त सरळसोट कातळ लीडरवरच्या विश्वासापेक्षाही स्वत:वर अधिक विश्वास ठेऊन चढायचे.
या टप्प्यावर एके ठिकाणी एक खोलगट रिकामं टाकं असावं अशी जागा आहे. तिथे सर्वांनी बॅगा ठेवल्या. इथून वर ट्रॅवर्स मारून चढायचे असल्यामुळे, पाय ठेवण्यास योग्य खाच नसल्यामुळे आणि मागे लगेचच एक्स्पोजर असल्यामुळे (दोन-तीन पावलांवर खोल दरी असली की वाटेच्या त्या बाजूला 'एक्स्पोजर' असे म्हणतात) लीडर्सनी तिथे बिले लावले होते. अप्पर बिलेपाशी विश्वेश, तर लोअर बिलेपाशी सुन्या उभा होता. तो पॅच घाबरत, धडधडत किंवा आरामात पार करून एखादा वर आला की त्याच्या कमरेला लावलेला बोलाईन (हा नॉटचा एक प्रकार आहे) सोडायला अस्मादिक तिथे हजर होते. (जल्ला एकदा हे रॉक क्लायबिंगचे तंत्र शिकायचे आहे!) कुठलाही गोंधळ न होता, शिस्तबद्धपणे सर्वच्या सर्व २२ जण एकामागून एक तो पॅच चढण्याचा पराक्रम करते झाले. त्याचे हे फोटो -
सुन्या आणि प्रीती
सुन्या आणि वर विश्वेश बिले लावत असताना -
ज्याच्या भरवशावर ही चढाई झाली तो अँकर -
हे आमच्यातले सर्वात 'तरूण' नारायणकाका (यो रॉक्सच्या वासोट्यावरील लेखात यांच्या उडीचा फोटॉ आहे)
यानंतरही गडाचा माथा बराच वर आहे. त्या पॅचपासून पुढे अरूंद, अनियमीत अशा चिक्कार पायर्या आहेत. (हे सगळे इंग्रजांचे उद्योग असावेत!)
गडाच्या माथ्यावर अस्ताव्यस्त वाढलेला निवडुंग! त्याचे टोचणारे काटे टाळत प्रसंगी रांगत, घसरत चढावे लागते. हे एवढे सगळे उपद्व्याप करून जेव्हा वर पोचतो, तेव्हा स्वागताला असतो - आजूबाजूचा नितांतसुंदर नजारा. अफाट पसरलेला व्ह्यू इथून दिसतो. साधारण ईशान्येला हरिश्चंद्रगड-तारामती शिखर आणि सुप्रसिद्ध कोकणकडा, त्याच्या उजवीकडे घड्या पडलेल्या डोंगररांगा, पश्चिमेकडे नानाचा अंगठा, नैऋत्येकडे नाणेघाटाचे पठार, बोरांड्याच्या नाळेने नाणेघाट चढून गेल्यावर लागणारे वीजेचे टॉवर्स आणि उत्तर-पश्चिमेकडे नजर पोचेल तिथपर्यंत विस्तीर्ण सपाट प्रदेश, एवढा मामला आहे!!
गडावर बाकी काहीही नाही. दरवाजा नाही, निवासी बांधकाम नाही, तटबंदी नाही, बुरूज नाही! गडाचा वापर माळशेजसारख्या महत्त्वाच्या प्रदेशावर केवळ टेळणीसाठीच होत असावा.
अर्ध्या तासात परत फिरलो. आता उतरताना तर आणखी अवघड प्रकार होता. कारण कडा, कातळ, एक्सपोजर हे सगळे आता डोळ्यांसमोर असणार होतं.
तिथे भीतीचे अॅटॅक येण्यापेक्षा अशावेळी कड्याकडे तोंड आणि दरीकडे पाठ करून उतरणे हा उत्तम उपाय असतो. १० पायर्यांच्या एका पॅचवर माझी काही सेकंद ज्ज्जाम टरकली होती. पाठीमागे खोल दरी असताना पाय ठेवायला जागा नाही असे वाटणे, ही भीती फार भयानक असते. इतकी, की पुढच्या पॅचला असली भीती टाळण्यासाठी सरळ दरीकडे तोंड करून उतरावे का, असा (अ)विचार मी करत होतो.
(अवांतरः अनुभवांती असे वाटते की, नवख्या ट्रेकरला चढ/उतरताना दिली गेलेली त्याच्या दृष्टीने सर्वात भीतीदायक सूचना ही आहे - "तू जिथे हात ठेवला आहेस तिथे पाय ठेवायला हवा होतास!") असो. तर उतरतांना पन्नास फुटाच्या एका पॅचजवळ लीडर्सलोकांनी रॅपलिंगचा वापर केला आणि आम्ही सर्व २२ बहाद्दर वीर सुखरूप खाली परतलो.
हा दोरावर मी, खाली सुन्या -
ढाकचा रॉकपॅच हा आपण केलेला सर्वात थरारक ट्रेक होता' ही माझी समजूत चुकीची होती. ढाक जर यत्ता पहिली असेल तर भैरवगड यत्ता चौथी ('स्कॉलरशिप-अॅबॅकस' वगैरे परीक्षांसकट यत्ता तिसरी) असायला हरकत नाही! असो. आयुष्य सार्थकी वगैरे लावलेला अनुभव घेऊन पुन्हा पायथ्याकडे आलो. जेवणाच्या पुड्या सोडल्या आणि मागच्या तीन तासांचा थरार खाण्याबरोबर चवीने चघळला. येताना पुन्हा टाक्याजवळ पाणी भरून घेतले आणि उतरायला सुरूवात केली.
उतरताना माझा निसर्गदत्त आणि स्वाभाविक वेग अडवून सर्वांत पुढे जाऊ द्यायला सुन्या मास्तरांनी सपशेल नकार दिला आणि थोड्याच वेळात स्वतःच गायब झाले! ए-ओ च्या हाका देत त्याच्या मागून जाणारा सुशील गोंधळला आणि सुशीलला डोळ्यांसमोर ठेवून उतरणारे आम्ही चार जण अडकलो. अखेर ट्रेकमध्ये वाट चुकण्याची माझी जुनी (गौरवशाली वगैरे) परंपरा पाळली गेली म्हणून मी विलक्षण 'खूश' झालो. मागचा ग्रुप बराच मागे होता आणि प्रीती-राजसबरोबर असल्यामुळे सुरक्षित होता. समोर खालच्या दिशेने जाणारी वाट होती. गावाची दिशा माहित होती. परिस्थिती अवघड वगैरे अजिबातच नव्हती. थोडे उतरून खाली आलो, तर सुन्याला शोधत असलेले अजून तीन जण भेटले! मग आम्ही ८-९ जण वाट शोधू लागलो. आमच्या हाका ऐकून गावाच्या विरूद्ध दिशेकडून मला एक अनो़ळखी आवाज ऐकू आला. त्या आवाजाचा वेध घेत मी पुढे जाऊ लागलो तर "शिद्धा जा शिद्धा जा" अशी हिंदी सूचना ऐकू आली. अस्सल मराठमोळ्या सह्याद्रीच्या कुशीत ही हिंदी हाक कुठून आली असा विचार करत मी पुढे गेलो. कुठल्या दिशेने "शिद्धा जा"यला हवं होतं हे कळणं फार आवश्यक होतं, नाहीतर भलतीकडेच उतरलो असतो. "सीधा जा" हे असल्या 'प्रायोगिक' भाषेत सुचवणारा तो आवाज म्हणजे काल रात्री काट्यांत शिरायला बुजणारा आमचा गाईड कम गावकरी होता. काल त्याने अंगभर कांबळ पांघरलं होतं. त्यामुळे आज मी त्याला ओळखलंच नाही. मागून आलेल्या सुशीलने त्याची ओळख पटवून दिली. आता आम्ही न चुकता गावात पोहोचणार हे नक्की झाले होते. तिथून अर्धा पाऊण तास चालून जेव्हा हायवेवरच्या 'जय मल्हार' या हॉटेलची पाटी दिसली तेव्हा "फायनली आपण पोचलो" हा आनंद जगातल्या कुठल्याही आनंदापेक्षा जास्त होता. सुन्या कालच्याच घर कम हाटेलात चहा-नाष्त्याबद्दल सांगायला मावळ्याच्या गतीने पुढे निघून आला होता हे आम्हाला नंतर कळले. (आम्हाला वाटत होतं की, हाही हरवला!)
अंबाजोगाईवरून आलेली कल्याण एसटी पकडली आणि बसण्याची अपेक्षाच न ठेवता दोन तास उभे राहण्याची मानसिक तयारी ठेवली. झालेही तसेच. अशावेळी माझ्या फारसं आकारमान नसणार्या तब्येतीचा हमखास एक फायदा होतोच - मी उभ्या जागीच, WTC जसा सरळ खाली कोसळला, तसा सरळ खाली बसतो. दोन-तीन इंच अधिक जागा मिळाली तर मांडी घालूनही बसता येते! येताना मी तेच केले. मग यथासांग आठ वाजता कल्याण, स्लो ट्रेनने साडेनऊ वाजता दादर असा भैरवगड थरारनाट्याचा शेवटचा अंक पार पाडून दिवसाचा पडदा पडला, तेव्हा ज्ज्जाम थकलोही होतो आणि खूssssशही होतो...
अशा ट्रेकहून आलो की नेहमीच वाटतं, की 'दिवस चांगला गेला' याचा भटक्यांच्या प्र'चलित' शब्दकोशातला अर्थ असल्या अनुभवांपेक्षा अजून वेगळा काही असेल का?
- नचिकेत जोशी
(फोटॉ - सोहम बॅनर्जी, राहुल खोत, नचिकेत जोशी)
Indeed ! अतिशय योग्य
Indeed ! अतिशय योग्य शिर्षक
जबरा ट्रेक.....
थर्रार ! मस्तच प्रचि आणि
थर्रार !
मस्तच प्रचि आणि माहिती. मला फार 'जे' वाटतंय रे. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त थरारक वर्णन.
मस्त थरारक वर्णन.
आ.या., >> "तू जिथे हात ठेवला
आ.या.,
>> "तू जिथे हात ठेवला आहेस तिथे पाय ठेवायला हवा होतास!"
प्रचि छान आहेत. कोणे एके काळी मी कोकणकड्याला ट्रॅव्हर्स मारून हरिश्चंद्रगडावर गेलो होतो (एकून ५ जण) त्याची आठवण झाली. नाळीची वाट तीच का ('यो'ला प्रश्न)?
आ.न.,
-गा.पै.
__ /\ __
__ /\ __
फारच सही!! माझी बहिण आणि तिचा
फारच सही!! माझी बहिण आणि तिचा ट्रेकिंगचा ग्रुप (ट्रेकडी) इथे चुकले होते, पायलट ट्रेक करायला गेले होते. त्यांना वर जायची वाट नाही मिळाली, २ वेळा प्रदक्षिणा मारल्या गडाला तरिही!!! २ दिवस त्यांचा पत्ताच नव्हता. फोनला पण रेंज नाही, घरच्यांची हालत टाइट झाली होती. ही २००६ सालातली गोश्ट, आता परिस्थिती वेगळी असु शकते.
अप्रतिम ... सह्याद्रीच्या
अप्रतिम ...
सह्याद्रीच्या राकट कडा .. जबरी
माझा पण राहिलाय ... अरे लिस्ट वाढतच चाललेय..
अप्रतिम वर्णन
अप्रतिम वर्णन नचिकेत.............
हॅट्स ऑफ टू यू गाईज.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक नंबर ट्रेक झालाय रे...आणि
एक नंबर ट्रेक झालाय रे...आणि प्रचितर खल्लास...नविन कॅमेराची जादू
टायमर लावून फोटो काढलाय
टायमर लावून फोटो काढलाय हा?
२२ च्या २२ जण दिसताहेत.
Oh ! My God ! ....
Oh ! My God ! ....
जबरी.
जबरी.
भन्नाट !!!!
भन्नाट !!!!
सर्वांचेच आभार! ईमीती,
सर्वांचेच आभार!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ईमीती, गामापैलवान![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गामा, हो, टाईमर लावूनच काढलाय तो फोटो..
हा सगळा खेळ आवड, मनाची कणखरता नि फिटनेस यावर अवलंबून आहे.. +१११
हिमु, ट्रेकडीच्या काही लोकांना ओळखतो मी. माझा मित्र ट्रेकडीशी संबधित होता.
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
योग्या असे अनेकदा म्हणशील आता तू.
बागेश्री, डॉक,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चॅम्पा, थँक्स रे!
भन्नाट!!!!!!!!!!!!!!!!!!!!
भन्नाट!!!!!!!!!!!!!!!!!!!!
वा रे बहाद्दर - खूप अभिमान
वा रे बहाद्दर - खूप अभिमान वाटतो बाबा तुम्हा लोकांचा, कसले अवघड ट्रेक्स करत असता..........
राकट कणखर महाराष्ट्र देशातील तुमच्या सारखी कणखर राकट मंडळी पाहिली की भरून येतं अगदी......
मस्त रे... काय छान प्रचि आणी
मस्त रे...
काय छान प्रचि आणी वर्णन...
धन्यवाद दोस्त्स!
धन्यवाद दोस्त्स!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्या आत्री तुम भी?? नवीन
क्या आत्री तुम भी?? नवीन फोटोंसह म्हणता आणि फशिवता काय?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आनंदयात्री... खुपच छान
आनंदयात्री... खुपच छान लिहिले आहेत... वाचून असे वाट्ले कि मि पण ह्या ट्रेक ला होतो!........ फोटो पण सुन्दर आहेत...
चित्तथरारक! मोहमयी!!
चित्तथरारक! मोहमयी!! अपूर्व!!!
ट्रेक, त्याचे वर्णन, फोटो सर्वच सुरेख. आवडले.
मस्त लिहीलय.. फोटो पाहून
मस्त लिहीलय.. फोटो पाहून एकंदरीत डेंजर वाटतय !
सुन्दर नाचि, मस्त लिहिलय.
सुन्दर नाचि, मस्त लिहिलय.
जगदीश, नरेंद्रजी, पराग, रज -
जगदीश, नरेंद्रजी, पराग, रज - धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान वर्णन केलेय नचिकेत... आणि
छान वर्णन केलेय नचिकेत... आणि प्रचि पण सुंदर!!
हाता पायाला घाम सुटला फोटो
हाता पायाला घाम सुटला फोटो बघुन!! बाप्रे!!!!
सहीच एकदम थरारक ट्रेक !!!
सहीच एकदम थरारक ट्रेक !!!
मीही वाचलं परत! मलाही छान
मीही वाचलं परत! मलाही छान वाटलं वाचून...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्स दोस्तहो!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भैरवगडाच्या या दीर्घलेखावर
भैरवगडाच्या या दीर्घलेखावर आधारित ई-पुस्तक लवकरच प्रसिद्ध होत आहे. "ई-साहित्य प्रतिष्ठान"तर्फे "त्या सुंदर यात्रेसाठी" या पुस्तकमालेमध्ये "भैरवगड - केवळ थरारक" याच नावाने ते प्रकाशित होईल. हे पुस्तक विनामूल्य कुणाला हवे असल्यास esahity@gmail.com इथे संपर्क करावा.
. जबरी प्रचि आणि
. जबरी प्रचि आणि वर्णन.मस्त्च आम्ही या १० तारखेलाकरणार आहोत.
.
Pages