Submitted by gajanan mule on 26 November, 2011 - 13:16
सळसळली झाडे आणिक
बोलली काहीच नाहीत
काय होते सांगायचे जे
त्यांचे त्यांनाच माहित
सावली हलली जरा ...
अन् कावडसे हलले जरा
सावल्यांतील कवडश्यांना
काय होता अर्थ खरा ..?
मी मनाला ' हो ' म्हणालो
अन् स्वतःला ' जा ' म्हणालो
कवडशातील ऊन झालो
सावलीची खुण झालो
सळसळत्या झाडाचे
एक हळवे पान झालो
- गजानन मुळे
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त... पुन्हा पुन्हा वाचतोय
मस्त...
पुन्हा पुन्हा वाचतोय
गजाननः धीस ईज समथिंग ग्रेट.
गजाननः धीस ईज समथिंग ग्रेट. आव्हानात्मक काव्य रचले आहे तुम्ही. शुभेच्छा.
अरे! खरोखरच! अगदी जबरदस्त !!!
अरे! खरोखरच! अगदी जबरदस्त !!!
रचना खुप आवडली. मी मनाला ' हो
रचना खुप आवडली.
मी मनाला ' हो ' म्हणालो
अन् स्वतःला ' जा ' म्हणालो
कवडशातील ऊन झालो
सावलीची खुण झालो>>>>विचार करतोय,,कविला काय सांगायच आहे, अर्थ काय आहे.
विभाग्रज, मीही रचना पुन्हा
विभाग्रज, मीही रचना पुन्हा वाचली.
"कवडशातील ऊन झालो
सावलीची खुण झालो" येथपर्यंत 'पानाला' बरोबर ट्रेस करतो आहे, अन येथपर्यंत वेगळीच अनुभुती मिळते आहे पण माझा गोंधळ पुढल्या दोन ओळींनी झालाय.
"सळसळत्या झाडाचे
एक हळवे पान झालो"
म्हणजे ते पान पुन्हा वर लटकले काय? अर्थात कविचे उत्तर देणे बंधनकारक नाही.
कवी प्रतिमांची मांडणी कशी
कवी प्रतिमांची मांडणी कशी करतो हे पाहणंच कधीकधी आनंददायक ठरतं. अशा वेळी कोलाज पेंटिंगसारखा त्या रचनेचा अनुभव घ्यावा.. कोलाज मधे प्रत्येकाला वेगवेगळी शक्यता दिसते तसंच काहीसं !
अगांतुक घुसल्याबद्दल माफ
अगांतुक घुसल्याबद्दल माफ करावे.
माझी रसधारणा अशी आहे, "झाडे कधीच बोलत नाहीत. कवडसे तर परावलंबी, केवळ झाडामागील सूर्यावर, उन्हावर, व या उन्हाची नक्षी जमीनीवर कोरणा-या पानांच्या हलण्यावर अवलंबून! माझ्या मनाच्या झाडाची पाने म्हणजे माता, पिता, पत्नी, बहीण, भाउ, मित्र. ही पाने हलतात. माझ्या जीवनातील उन-पाउस्,सुख्-दुखः झेलून सुंदरसे कवडसे निर्मितात. या सर्वांचा कर्जदार मी आज मुक्त होण्यासाठी स्वतःला त्या पानांत सामील करू पहातो. माझे मीपण विसरतो. हळवा होउन जातो, व पहातो की मी कुणाचे तरी दु:ख झेलून मी निर्मिलेला कवडसा किती सुखद बनेल."
आपण एकाहून एक रसिकराज आहात. फक्त माझ्या मनातील एक अर्थ मांडला. पुनश्च क्षमस्व!
मी मनाला ' हो ' म्हणालो अन्
मी मनाला ' हो ' म्हणालो
अन् स्वतःला ' जा ' म्हणालो
कवडशातील ऊन झालो
सावलीची खुण झालो >>>
मी, माझे, माझ्यासाठी यातल्या 'मी' ला विसरुन, अंतरीच्या हाकेला ओ देत मी त्यांच्या मुक्या व्यथांना शब्दरुप देतो, आणि त्यांच्यासाठी भक्कम आधार बनण्याचा निर्णय घेतो, असे कविला म्हणायचे आहे असे मला वाटते.