आदित्य : युद्ध अंधाराविरुद्ध

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 24 November, 2011 - 13:08

आदित्य : युद्ध अंधाराविरुद्ध

आदित्य ही कादंबरी मी सर्वप्रथम ऑक्टोबर २००० मध्ये वाचली. अरूण हेबळेकर यांच्या अनेक कथा कादंबर्‍या मी त्यापूर्वी वाचल्या होत्या आणि त्यानंतरही वाचल्या आहेत. त्यापैकी जवळपास सर्वच रंजक आहेत पण आदित्यचा प्रभाव एवढा जबरदस्त आहे की त्यानंतर गेल्या अकरा वर्षांमध्ये मी ही कादंबरी एकूण बारा वेळा वाचून काढली आहे. या कादंबरीत असे काय आहे? म्हंटले तर विशेष काही नाही. म्हणजे खटकेबाज संवाद, रोमांचक मारामारीची वर्णने, बोजड तत्वज्ञान, रोमॅंटिक / श्रुंगारिक वर्णन करणारी वाक्ये ही सहसा यशस्वी कादंबर्‍यांमध्ये आढळणारी वैशिष्ट्ये; पण आदित्य मध्ये यातले काहीच नाही. तरीही या कादंबरीत अशी काही अद्भुत ताकद आहे की तुम्ही ती एकदा संपूर्ण वाचलीत की तुम्हाला अजुन एकदा तरी संपुर्णत: वाचल्याशिवाय पुन्हा खाली ठेवावीशी वाटत नाही. या कादंबरीत एकही पात्र दुसर्‍या पात्राला साधी थप्पड लगावत आहे इतपत देखील हिंसेचा उल्लेख नाही तरीही ती वाचताना तुम्हाला एक युद्धवर्णन वाचल्याची जाणीव होते. हे युद्ध आहे अंधाराविरूद्ध. संकटपूर्व परिस्थिती, जी अगदीच थोडावेळ आहे; त्यानंतर येऊ घातलेल्या संकटाची चाहूल, मग संकटाची व्याप्ती समजताच मनाला होणारी हतबलतेची जाणीव, या निराशेतूनच मग अगदीच शेवटचा मार्ग म्हणून एका अनपेक्षित व्यक्तिची युद्धात घेतलेली तातडीची मदत, युद्धात आपण जिंकू की नाही याबद्दलची साशंकता, जिंकलोच तरी युद्ध किती काळ चालणार आणि किती हानी होणार याविषयी मनाशी बांधलेले आडाखे, त्याचप्रमाणे युद्ध सुरू होण्याआधीच आपण ते हरलोय हे मनाशी धरून युद्धोत्तर परिस्थितीला तोंड देण्याकरिता केलेली मानसिक तयारी, त्यानंतर प्रत्यक्षात युद्धाचे वर्णन आणि नंतर धक्कादायक शेवट ही या कादंबरीची बलस्थाने आहेत.

२४ डिसेंबर १९९४ ला रात्री पावणेबाराच्या आसपास कादंबरीतील कथानक सुरू होते आणि जवळपास दोन दिवस आणि काही तास झालेले असतात तेव्हा ते संपते. पन्नासेक तासांच्या या प्रवासात वाचकाला अनेक पात्रं भेटतात. कादंबरीचे शीर्षक ’आदित्य’ हे ज्यावरून आले आहे सर्वप्रथम त्याची ओळख करुन घेऊयात.

’आदित्य’ भारताचा आणि जगाचा पहिलावाहिला वीजनिर्मितीसाठी बांधला गेलेला फ्यूजन रिऍक्टर. सहा हजार हेक्टर जमिनीत कारवार अंकोला रस्त्याजवळच्या परिसरात याची स्थापना झालेली आहे. एक मोठा सूर्याकृती, बारा आर्‍यांनी वेढलेला, अर्धा-एक किलोमीटरभर व्यासाचा ’आदित्य’ नजरेत भरतो. आसावर ’आदित्य’चा गाभा. गाभ्यापासून बारा आरे निघतात आणि ते पाचशे मेगावॅट जनरेटर्सच्या पोटात संपतात. ’आदित्य’ चा अर्धाअधिक गाभा जमिनीत पुरलेला आहे. त्याच्यावर पंचवीस फूट जाड कॉंक्रीटचा थर देऊन त्यावर पुन्हा पोलाद आणि शिश्याच्या पत्र्याचे आवरण घातलेले आहे. ’आदित्य’ मध्ये हायड्रोजन आणि ऑर्फन वायूच्या साहाय्याने उच्च तापमानाला फ्यूजन प्रक्रियेद्वारे वीजनिर्मीती केली जाते. ’आदित्य’ च्या परिसरातच जवळपास दीड हजार कर्मचार्‍यांच्या निवासाची सोय केलेली आहे. या कर्मचार्‍यांना अथवा त्यांच्या कुटुंबीयांना कारवार आणि अंकोल्याला जाण्यासाठी दिवसातून सहा वेळा बसेस सोडल्या जातात.

’आदित्य’ हे एक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. तेथील कर्मचार्‍यांमध्ये जवळजवळ संपूर्ण भारताचे प्रतिनिधीत्व झालेले आहे. मिझोराम, त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश, आसामपासून राजस्थानपर्यंत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत. प्रत्येक राज्यातील, जवळजवळ प्रत्येक भागातील एक तरी कर्मचारी तिथे आहेच. आदित्य चा कर्मचारी वर्ग, काही अपवाद सोडल्यास पूर्ण कार्यक्षम आहे. युनियन आहेत, भांडणे आहेत परंतू संप झालेला नाहीय. याचे कारणही लगेच समजते. तिथे कर्मचारी वर्ग फारसा टिकत नाही. सात वर्षापूर्वी जेव्हा आदित्य ची स्थापना झालेली असते तेव्हाच्या कर्मचार्‍यांपैकी केवळ तीस टक्के लोक सध्या कार्यरत असतात. लोक येतात, प्रशिक्षण घेतात आणि दुसरीकडे बदली मागून घेतात. त्यामुळे तीन युनियन असूनही कुठल्याही युनियनने जम बसविलेला नाहीये. एकूण कर्मचार्‍यांपैकी केवळ अठ्ठेचाळीस टक्के कायम कर्मचारी आहेत. लोक निघून जातात कारण : भीती. ’आदित्य’ च्या एकंदर रचनेमुळे तिथे येणारा प्रत्येक माणूस बिचकतच येतो आणि जातो तो सुटकेचा नि:श्वास टाकून. ही भीती निर्माण व्हायला राजकारणी आणि वर्तमानपत्रवाले सारखेच जबाबदार आहेत. गल्ली पासून दिल्लीपर्यंत प्रत्येकच जण दरवेळी आदित्य च्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करीत असतो. अर्थात आदित्य मध्ये आजपर्यंत एकही अपघात घडलेला नसतो. त्याविषयी कर्नाटकचे मुख्यमंत्रीही कौतुकाने म्हणतात, “देशातील इतर अण्विक प्रकल्पांच्या कार्यक्षमतेकडे पाहता मला सांगायला अभिमान वाटतो की ’आदित्य’ ने गेल्या सहासात वर्षांत एका दिवसाची देखील विश्रांती घेतलेली नाही की तो बंद पडलेला नाही.”

आता आदित्यमध्ये काम करणार्‍या प्रमुख कर्मचार्‍यांची आणि या कादंबरीतील इतर पात्रांची ओळख करून घेऊ. सर्वप्रथम ’आदित्य’ चे विद्यमान संचालक डॉ. अनिरुद्धकुमार भारद्वाज. फीजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पी. आर. एल.) अहमदाबाद इथून सायंटिस्ट ’एफ’ म्हणून तीन वर्षे काम केल्यावर त्यांची नियुक्ती ’आदित्य’ च्या संचालकपदावर दोन वर्षांपूर्वी झालेली असते. ’आदित्य’ मध्ये काम करणार्‍या मोजक्याच संशोधकांपैकी ते एक. भारद्वाज, सुंदर राघव राव, कुलदीप तन्ना, मेहेर दस्तूरजी, सर्वेश्वर आणि डेमियन सोडल्यास इतर सर्व कर्मचारीवर्ग तंत्रज्ञ आहे. खरे तर दोन वर्षांपूर्वी संचालकपदाचा मान डॉ. सुंदर राघव राव यांना मिळायला हवा असतो; परंतु त्यावेळी केंद्रीय मंत्रालयातील ऊर्जा-विभागाचे सचिव प्रसन्नकुमार भारद्वाज आपले वजन खर्ची घालून आपले बंधू अनिरुद्धकुमार भारद्वाज यांची संचालक पदी नियुक्ती करून घेतात. अर्थात डॉक्टर अनिरुद्धकुमार भारद्वाज हे एक अभ्यासू आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वाचे गृहस्थ असल्याने त्यांनी केवळ वर्षभरातच आपल्या कर्मचारीवर्गावर छाप बसविलेली असते. जरी सुरूवातीला भुवया उंचावल्या गेल्या असल्या तरी त्यांना त्यांच्या कर्मचार्‍यांकडून विशेष विरोध होत नाही. खुद्द सुंदर राघव रावही फारसे मनावर घेत नाही. त्यामुळे भारद्वाज आपल्या पदावर खूष असतात. समाधानी असतात.

कादंबरीतील पुढचं महत्त्वाचं पात्र म्हणजे डॉक्टर स्टॅनिस्लास व्हेलरी डेमियन. संचालकानंतरचं दुसरं महत्त्वाचं पद भुषविणारे हे शास्त्रज्ञ आदित्य मध्ये अगदी सुरूवातीच्या काळापासून कार्यरत आहेत. पण तरीही... डेमियन तसा चांगला माणूस. सरळ, निर्भीड परंतु थोडासा भावुक. सबंध केंद्रात त्याला मोजकेच मित्र आहेत. तसे पाहता तो जिभेचा तिखटदेखील नाहीय. सबंध केंद्रात त्याने कुणाला दुखावलेले नाहीये. कधी कुणाला पाडून बोललेला नाही. आपल्या सहकार्‍यांचा त्याने चुकूनदेखील अपमान केलेला नाही. तरीही त्याला मित्र असे फारसे नाहीत. वेणू सोडला तर कोणीही नाही. सायंटिस्ट बी वर्गातील एकही माणूस डेमियनकडे येत नाही. त्याहीपेक्षा वरील श्रेणीतील तर सोडाच. वेणू हा एकटाच असा आहे की जो सायंटिस्ट ई-टू असूनही डेमियनला भेटायला जात असे. त्याच्याशी बोले. इतर डेमियनला वाळीत घातल्यासारखे वागतात. गेली सात वर्षे असेच चालु असते. इतके असूनही डेमियन पर्वा न करता काम करतोय. लोकांना भेटायचा प्रयत्न करतोय. तसे लोक बोलतात त्याच्याशी - तो बोलला तरच! त्याला गरज पडली तरच. अगदी कामापुरते. एरव्ही नाही. डेमियनशी नीट बोलणारे लोक म्हणजे - त्याच्या विभागात नव्याने आलेले जॉन, कॉनी आणि डेव्हिड हे तिघे खालच्या श्रेणीतील कर्मचारी, वेणू आणि . . . खुद्द संचालक. त्यांत वेणू एकटाच डेमियन शी मित्रत्वाने वागत असतो. पण त्याचेही हल्ली काहीतरी बिनसलेले आहे. काय ते त्याने सांगितलेले नाही, परंतु डेमियनला अंधुकशी जाणीव आहे. आता वेणूही त्याच्यापासून दुरावु लागलाय.

संचालक डेमियनशी बोलतात त्याचे कारण वेगळेच आहे. कदाचित तेच कारण वेणूने न बोलण्याचे आहे. जॉन, कॉनी आणि डेव्हिड हे चमचेगिरी करण्यापुरते जवळीक साधताहेत हे डेमियनलाही जाणवते परंतु त्याचा नाईलाज असल्याने तो ते चालवून घेतो.

डेमियनला त्याच्याशी अबोला धरलेल्या सहकार्‍यांचा विलक्षण राग येत असतो. त्याला वाटते, ते त्याचा दोष नसताना त्याच्याशी वितुष्ट धरताहेत. पण याबाबतीतही पुन्हा त्याचा नाईलाज असतो. तो कुणाशीही उघडपणे चर्चादेखील करू शकत नाही. कसा करणार? कोणीही त्या विषयावर बोलायचेदेखील टाळताहेत. सात वर्षांपूर्वी त्याने एक ’गुन्हा’ केलेला असतो. इतरांच्या दृष्टीतून! आणि त्या ’गुन्ह्या’ची शिक्षा ते त्याला भोगायला लावीत असतात. त्याच्याशी अबोला धरून. वेणू, इतर सहकारी - एवढेच कशाला? ’आदित्य’ मधील इतर ख्रिश्चन कर्मचारी देखील डेमियनकडे नीट बोलत नसतात. काही सात वर्षांआधीचे कर्मचारी असतात. काही नवीन. जुन्यांचे ठीक, परंतु नव्यांचे काय? कदाचित त्यांना जुने कर्मचारी शिकवून देत असतील. एकूण काय? तर डेमियनला कोणी आपला समजत नाही.

आणि हे सारे डेमियन सात वर्षांपासून सहन करीत आलेला असतो. अनेकदा त्याला वाटतेही की सूड घ्यावा ह्या सर्वांचा! सूडापोटी त्याला काही गोष्टी करणे शक्यही असते. भारद्वाजांनंतर संचालक होणे ही गोष्टही त्याला जमण्यासारखी असते, नाही असे नाही; पण सर्वमान्यता मिळवून होणे मात्र केवळ अशक्य असते. एक म्हणजे इतर असिस्टंट आणि डेप्युटी डायरेक्टर्सकडून विरोध होण्याची शक्यता असते. त्याशिवाय इतर कर्मचारीही विरोधात जाण्याची शक्यता असते. भारद्वाजांनंतर संचालकपदासाठी दोनच व्यक्ती स्पर्धेत असतात : जनरेटर्स ग्रूपचे डॉक्टर सुंदर राघव राव आणि रिऍक्टर मेंटेनन्स ग्रूपचे डॉक्टर दयाळ.

संचालकांनी हे जाणलेले असते आणि म्हणूनच ते डेमियनच्या अधिक जवळ येतात. संचालक भारद्वाज जवळ येतात आणि वेणू दुरावतो.

वेणू या कथानकातील अजून एक महत्त्वाचे पात्र. वेणूचे डॉक्टर डेमियन यांच्याशी सुरूवातीपासून अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. डेमियनची पत्नी विनी बेंगलोरचीच म्हणजे वेणूच्याच गावची. त्याला आपल्या धाकट्या भावासारखा मानत असते. वेणू पन्नाशीला पोचलेला, अविवाहित. वसाहतीत एकटाच राहत असतो. वेणूच्या मनात डॉक्टर डेमियन बद्दल दुरावा निर्माण होण्याची दोन कारणे असतात. एक म्हणजे गेल्या दीड एक वर्षांपासून डॉक्टर डेमियन अचानक अतिशय श्रीमंत झाल्यासारखे वागत असतात. घरातले फर्निचर बदलतात. त्याशिवाय इतरही बराच मोठा खर्च करीत असतात, जे नोकरीच्या पगारात अजिबात शक्य नसते. दुसरे कारण तांत्रिक मतभेदाचे असते. आदित्य मध्ये दोन हायड्रोजन अणुगर्भांचं मीलन होऊन एका हीलियम अणूगर्भात रूपान्तर होतं. हे रूपांतर घडण्यासाठी ’ऑर्फन’ नावाचा एक कॅटेलिस्ट लागतो. ऑर्फन म्हणजे ’ऑर्गॅनिक रिएजंट - फ्यूजन ऍक्टिव्हेटिंग न्यूक्लिआय’. हा कॅटेलिस्ट असेल तरच रूपान्तर झट्कन आणि दीड-दोन लाख सेल्सियस इतक्या तपमानावरच होतं. एरव्ही कोटीभर डिग्री सेल्सियस इतकं तापमान लागणार असतं. डॉक्टर डेमियन यांच्या निदर्शनास येतं की रूपान्तर न झालेला खूपसा हायड्रोजन तसाच रिऍक्टरमध्ये राहतो आणि तो मग नुसता जाळावा लागतो. त्यानं धोका निर्माण व्हायची शक्यता असते. म्हणून ते आपल्या मुंबईहून आलेल्या मित्रांच्या मदतीने एक प्रयोग करायचं ठरवतात आणि ऑर्फनचं प्रमाण थोडंसं वाढवतात. त्यामुळे निदान पन्नास टक्के तरी वेस्ट कमी होईल असं त्यांना वाटत असतं. पण वेणूला वाटतं की त्यामुळे रिऍक्टर हाताबाहेर जायची शक्यता आहे. डेमियन च्या मते वेणू इज ओव्हर कॉशस.

तर एवढ्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर ’आदित्य’चं कथानक सुरू होतं तेव्हा हवेत गारठा असतो. आनंदी वातावरणात ख्रिश्चन घरांमध्ये ख्रिस्मस कॅरोल्स गायल्या जात असतात. इकडे त्याच वेळी आदित्यच्या चार्ज कंट्रोल डिपार्टमेंट मध्ये रात्रपाळीत कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना दिसून येतं की गाभ्याचं तापमान जवळजवळ दहा टक्क्यांनी वाढलंय. थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात येतं चॅनल पाचच्या कुलिंग पाईपला गळती लागली असून तिथे धोका निर्माण झालेला असतो. संगणक सात नंबरच धोक्याचा इशारा देत असतो. सर्वप्रथम वेणूला फोन जातो. वेणूला परिस्थितीचं गांभीर्य कळतं तो ताबडतोब कार्यालयात हजर होतो. रात्री एक च्या सुमारास वेणूसारखा ज्येष्ठ सायंटिस्ट कार्यालयात आलेला पाहून सुरक्षा विभागालाही काही तरी धोका असल्याचा वास येतो. वेणू संगणकावर काही गणिती प्रक्रिया करून पाहतो आणि तापमान वाढण्याचा अंदाज लावतो. तीन एक दिवसात गाभ्याचं वातावरण वितळून जायची शक्यता त्याला लक्षात येते. ही बाब ती डेमियनच्या कानावर घालतो आणि डेमियन संचालक भारद्वाजांच्या.

इकडे चॅनल नंबर पाचच्या जनरेटर रूममध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांपैकी मोहन नावाच्या कर्मचार्‍यालाही जनरेटरची फ्रिक्वेंसी घसरल्यामुळे कूलिंग चॅनलमधली गडबड जाणवते. तो वेणूशी फोनवर बोलतो. वेणू त्याला याविषयी गुप्तता बाळगण्यास सांगतो आणि ड्युटी संपली तरीही संगणकासमोरच थांबण्याचा आदेश देतो.

रात्रीत संचालक भारद्वाजांच्या निवासस्थानी तातडीची बैठक भरते. स्वत: भारद्वाज, वेणू, डेमियन आणि सिक्युरिटी इन्चार्ज कॅप्टन वरदन् त्यास उपस्थित असतात. आदित्य अतिशय सुरक्षित आहे असं यापूर्वी डेमियनसकट सार्‍यांनाच वाटत असतं. त्यामुळे काही बाबतीत सारेच गाफील असतात. एकटा वेणूच सुरूवातीपासून सांगत असतो की आदित्य बांधताना ठरवल्याप्रमाणे करायचे काही सुरक्षा उपाय राहून गेलेत. त्यामूळेच डॉक्टर डेमियन यांच्या प्रयोगांना वेणूची हरकत असते. बैठकीच्या सुरूवातीलाच भारद्वाज विचारतात, “सो मिस्टर वेणू, तुमची खात्री आहे की आदित्यचं आयुष्य संपायच्या मार्गावर आहे. तुम्हाला काय वाटतं? हे सारं डेमियनच्या आणि त्यांच्या मित्रांच्या संशोधनासाठी केल्या गेलेल्या प्रयोगांमुळे झालं?” यावर वेणू चूक कोणाची याचं थेट उत्तर द्यायचं टाळून आदित्यला आणि त्याही पूर्वी परिसरातील लोकांना वाचवायच्या बाबींना प्राधान्य देण्याचं सूचवितो. त्याच्या विस्तृत विवेचनानंतर सार्‍यांनाच पटतं की वेणू सुरूवातीपासून ज्या खबरदारीच्या उपायांचा पाठपुरावा करतोय ते किती गरजेचे होते आणि याआधीच ते अंमलात आणणं किती महत्त्वाचं होतं. अर्थातच आता संकट येऊ घातल्यावर हे उपाय करणं शक्यच नसतं. तेव्हा लोकांचे प्राण वाचविण्याकरिता सुरक्षा दल, पोलिस, अग्निशामक दल, महत्त्वाचे राजकीय नेते या सर्वांसोबत बैठक घेऊन आजुबाजूचा संपूर्ण परिसर मोकळा करण्याची गरज बोलून दाखवितो. सरतेशेवटी लोकांचे प्राण आणि आदित्य दोघांनाही खरंच वाचवायचं असेल तर खास दिल्लीहून त्याकरिता डॉक्टर भरत बसरूर यांना बोलविण्याची मागणी करतो. बैठकीत जणू काही बॉम्बच पडतो. सारेच एकदम स्तब्ध होतात. सर्वांनीच हे नाव ऐकलेले असते. डॉक्टर भरत बसरूर - ’आदित्य’ च्या संपूर्ण आराखड्याचा एक आधारस्तंभ. आदित्यची संकल्पना त्यांचीच असते. फक्त - आता ते त्यांच्यामध्ये नसतात.
“वेणू, ते जरा कठीण काम आहे. यू नो व्हॉट आय मीन!” भारद्वाज म्हणाले. “सर सांगतो म्हणून रागावू नका, तुमचे बंधू केंद्रीय मंत्रालयात उच्च पदावर आहेत. त्याच्याकरवी तुम्हाला हे काम करून घेता येईल. काही दिवसांसाठी तरी. अर्थात, आदित्यला वाचवायचं की नाही यावर ते अवलंबून आहे.” वेणू म्हणाला. “ते सारं करता येईल. परंतु भरत बसरूर येतील का, हा प्रश्न आहे.” भारद्वाज म्हणाले. “आपण सर्वेश्वर आणि गुप्ता यांना पाठवून त्यांना बोलावून घ्यावे.” वेणू म्हणाला. “परंतु तितका वेळ आहे का आपल्याला?” भारद्वाजांनी विचारले. “लगेच निघाल्यास जमेल. गोव्याहून मुंबईची सकाळची फ्लाईट घेतली तर ते दुपारच्या आत दिल्लीला पोचतील. तिथून सायंकाळी दिल्ली-गोवा डायरेक्ट फ्लाईट घेतली तर रात्रीच्या आत ते परत येऊन पोचतील. आपली बैठक आज मध्यरात्री किंवा उद्या पहाटे घेता येईल.” वेणू म्हणाला. वेणूने सारे काही योजून ठेवलेले होते. भारद्वाजांनी एक अस्वस्थ स्मित केले. “सो, यू वॉन्ट हिम!” भारद्वाज म्हणाले. “होय सर! आदित्यला वाचवायचा तो एकच आणि निर्वाणीचा पर्याय आहे. अर्थात त्यानं आदित्य वाचेलच असं म्हणत नाही मी. परंतु एक शक्यता आहे.” वेणू म्हणाला. “सद्य:परिस्थितीत ’आदित्य’ वाचायला तुम्ही किती टक्के चान्स देता?” भारद्वाजांन डेमियनला प्रश्न केला. डेमियनने वेणूकडे पाहिले. “काहीच नाही.” वेणूने डेमियनकरिता उत्तर दिले. “कुणी पैज लावली तरी मी पैज घेणार नाही. - सर”. वेणू बोलायचा थांबला आणि मग सावकाश म्हणाला, “पैज घ्यायला आपण असू की नाही हे तरी कुणाला माहीत आहे?” खोलीतील भयाण शांततेत ’आदित्य’च्या जनरेटर्सची गुणगुण तेवढी ऐकू येत होती. दोन वाजायला आले होते. ख्रिसमस चा दिवस सुरू झाला होता.
येऊ घातलेल्या संकटाची भयानकता वाचकांना इथे पुरेशी स्पष्ट होते. या बैठकीनंतर ताबडतोब संचालक भारद्वाज ठरल्याप्रमाणे आपले बंधू प्रसन्नकुमार भारद्वाज यांना दिल्लीला फोन करून परिस्थितीची कल्पना देतात. ते ऊर्जा राज्यमंत्र्यांना आणि ऊर्जा राज्यमंत्री पंतप्रधानांपर्यंत ही बातमी पोचवतात. त्यानंतर सकाळी आठ वाजता गृहमंत्री तसेच तीनही सेना दलाच्या दिल्लीतील अधिकार्‍यांच्या बैठकी सुरू होतात. भारद्वाज पंतप्रधानांना आपण डॉ. भरत बसरूरची मदत घेत असल्याचे कळवितात आणि भरत बसरूर ’आदित्य’ आणि परिसराला वाचविण्यास समर्थ असल्याची ग्वाहीही देतात. त्यामुळे एक मात्र घडते - भरत बसरूर च्या नकळत त्याच्या कार्यक्षमतेविषयी अनेक उंच अपेक्षा निर्माण होतात. अनेकांच्या मनात.

त्याचवेळी म्हंटले तर भीतीचे एक विलक्षण गूढ वातावरण सावकाश, हळुवारपणे ’आदित्य’ च्या परिसरावर पकड घेत असते. म्हंटले तर नाही. कारण सगळी कामे व्यवस्थितपणे पार पाडली जात असतात. एकतर सर्वांनाच अजुन धोक्याची कल्पना आलेली नसते आणि ज्यांना ती आलेली असते ती ते स्वत:पुरतीच सीमित ठेवतात एखादे गूपित हृदयाशी बाळगावे तशी. आदित्य नियंत्रणाबाहेर जात असतो खरा. तापमानही वाढत असते. पाच नंबर चॅनलमधील गळतीही चालुच असते. परंतु सारे काही सावकाश, बिनधास्त चाललेले असते. ’आदित्य’ ही त्या भरत बसरूर नामक त्रात्याची वाट पाहत निश्चिंतपणे नियंत्रणाबाहेर जात असतो.

कार्यालयात वैज्ञानिकांचा विचारविनिमय सुरू असतो. भारद्वाजांना पंतप्रधानांकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून विचारल्या गेलेल्या अनेक प्रश्नांत एक प्रश्न प्रामुख्याने उपटलेला असतो. तो म्हणजे, “आदित्य नियंत्रणाबाहेर गेलाय म्हणजे नेमकं काय झालंय? आणि नेमकं काय होणार? स्फोट होणार? किरणोत्सर्ग होणार? नुसती प्राणहानी होणार? मालमत्तेचा नाश होणार? आणि झालाच तर कितीसा परिसर त्याच्या प्रभावाखाली येणार?” भारद्वाजांकडे त्या प्रश्नांना उत्तर नसते. कुणालाच नीटसे माहीत नसते. ’आदित्य’चा स्फोट झालाच तर किरणोत्सर्ग होणार नाही असे डेमियन आणि वेणू यांचे मत असते. कारण फ्युजन रिऍक्टरची तीच एक खुबी असते. परंतु जर त्याची तुलना एखाद्या हायड्रोजन बॉम्बशी किंवा उष्णौण्विक म्हणजे थर्मोन्युक्लिअर बॉम्बशी करायची झाली तर मालमत्ता आणि मनुष्य-जीव ह्यांची हानी प्रचंड प्रमाणात होईल ही शक्यता असते. त्यामुळे प्रयत्न एकाच दिशेने व्हायला हवे असतात - आणि ती दिशा म्हणजे स्फोट होऊ न देणे. डेमियन आणि वेणू यांच्याशी राव, तन्ना आदी कंपनी सहमत नसते. राव दाखवून देतात की फ्यूजन प्रक्रियेमध्ये काही प्रमाणात न्यूट्रॉन्स पण निर्माण होतात आणि ह्या न्युट्रॉन्समुळे बर्‍याचशा प्रमाणात किरणोत्सर्ग होणारच असतो. तेव्हा नुसता स्फोट होऊ न देणे एवढ्याने भागणार नसते. सबंध प्रक्रियाच थोपविणेच गरजेचे असते. आणि ते काम करणे एकाच माणसाला - शक्य असलेच तर - शक्य असते आणि म्हणून सार्‍यांच्या नजरा डॉ. भरत बसरूर कडे लागून राहिलेल्या असतात. दरम्यान सर्वेश्वर आणि गुप्ता भरत बसरूर ना आणण्याकरिता दिल्लीला रवना झालेले असतात.

लष्करी अधिकारी कर्नल गुरदीपसिंग खन्ना आणि त्यांचे दुय्यम अधिकारी मेजर सारडा यांची ही तयारी सुरू असते. ऑल ऍलर्ट चा संदेश दिला जातो. प्रत्येक सैनिक सूचनेनंतर केवळ पंधरा मिनीटात तयार होईल, मोटराइज्ड कंपनीची सर्व वाहने तयार ठेवली जातील अशी व्यवस्था होते. कुठल्याही प्रकारच्या अत्यंत जोखमीच्या कामाची सिद्धता होते. कुटुंबियांना दूर पाठवायचं का असाही विषय निघतो पण कर्नलच्या मते ते शक्य नसते. त्यांच्याही चर्चेत तो विषय निघतोच. “आदित्यचे वैज्ञानिक कुणा भरत बसरूर नावाच्या माणसाची वाट पाहतायत. यू नो हू ही इज?” कर्नलनी विचारले. मेजरनी खांदे उडविले. “सम एक्स्पर्ट?” मेजरनी विचारले. “वाटतं खरं! परंतु तो आहे कुठे? दिल्लीत असल्यासारखे ते बोलत होते. त्यांच्या बोलण्याप्रमाणे तो एकटाच सार्‍यांना - आदित्यलाही वाचवू शकेलसं दिसतंय. कुठे असतो तो?” कर्नलनी विचारले. “दिल्लीत असं म्हणालात ना?” मेजरनी म्हंटले. “असं ते म्हणत होते खरे. पण दिल्लीत तो काय करतोय? जर तो ’आदित्य’चा एकमेव तज्ज्ञ आहे तर तो इथंच असायला हवा होता. दिल्लीत काही फ्यूजन रिऍक्टर्स नाहीत.” कर्नल म्हणाले. “एनी वे! कामाला लागा मेजर. मी त्यांना आपल्या वतीने सर्व साहाय्य मंजूर केलंय.”
इथे आता वाचकांनाही प्रश्न पडतो - कादंबरीचा लार्जर दॅन लाईफ असलेला नायक भरत बसरूर आदित्य च्या जवळ का नाही? दिल्लीत तो काय करतोय?

सेनाधिकारी आणि संरक्षणमंत्री यांच्या बैठकीत भरत बसरूर ’आदित्य’ ला वाचवण्यासाठी निघत असल्याची बातमी देण्यात येते आणि ती माहिती देतेवेळी भरत बसरूर मात्र तिहार तुरूंगात ख्रिसमसच्या आंघोळीची प्रतीक्षा करीत रांगेत उभा असतो. इथे वाचकांना प्रचंड मोठा धक्का बसतो. भरत बसरूर सव्वा सात वर्षांपासून तिहार तुरूंगात शिक्षा भोगत असतो. आता त्याच्या शिक्षेची दोन वर्षे आणि नऊ महिने बाकी असतात. गेल्या सात वर्षांत त्याने दोन वेळा राष्ट्रपतींना सुटकेकरिता अर्ज केलेले असतात परंतु दोन्ही वेळा ते फेटाळले गेलेले असतात. कुटुंबीय, मित्र परिवार यांनाही तो गेल्या दोन वर्षांत भेटलेला नसतो. ख्रिसमसच्या दिवशी नेहमीच्या अळणी जेवणासोबत जास्तीचा एक गोड पदार्थ - खीर खाल्ल्यावर तो तुरूंगाच्या खोलीत विश्रांती घेत असतानाच त्याला जेलरच्या केबिन मध्ये बोलावले जाते. तिथे सर्वेश्वर आणि गुप्ता त्याला घ्यायला आलेले असतात. ते त्याला थोडक्यात परिस्थितीची कल्पना देतात आणि आदित्यला वाचविण्यासाठी सोबत चलण्याची विनंती करतात. त्यांनी आठ दिवसांचा पॅरोलही आणलेला असतो. शिवाय आदित्यला वाचविल्यावर भरतची राष्ट्रपतींकरवी मुक्तता करण्याचेही आश्वासन देतात. भरत त्यांना कुठलेही खोटे भरीव आश्वासन न देता त्यांच्या सोबत येण्यास तयार होतो आणि तिघांचा दिल्ली गोवा विमानप्रवास सुरू होतो.
प्रवासात भरत त्या दोघांना तिजोरीफोड्याची ती प्रसिद्ध गोष्ट ऐकवितो. अमेरिकेतील गोष्ट. एक विमान एका शहरातून दुसर्‍या शहराला जात होते. त्या विमानातून एका कुख्यात तिजोरीफोड्याला कैद करू काही पोलीसही प्रवास करीत होते. विमान ठराविक उंचीवर गेल्यावर पायलट आणि को-पायलट दोघेही विमानाला ऍटोमॅटिक पायलटवर टाकून इतर प्रवाशांशी गप्पा मारायला कॉकपीटमधून बाहेर आले. मध्येच विमानाला एक हादरा बसून कॉकपीटचे दार बंद झाले. मजा अशी झाली की लॅचचे कुलूप होते आणि पायलट अथवा को-पायलटकडे किल्ली नव्हती. घ्या! भयानक गोंधळ आणि भीती. अखेर पायलट ला कळले की प्रवाशांमध्ये तो तिजोरीफोड्याही आहे. त्याच्या विनवण्या करून शेवटी एका अटीवर तो तिजोरीफोड्या ते कुलूप उघडायला तयार झाला. ती अट अशी : हवेतून जाणार्‍या विमानावर त्याचा पायलट म्हणजेच कॅप्टन हा अनभिषिक्त राजा असतो. तो विमानात घडणार्‍या गुन्ह्याकरिता गुन्हेगाराला जसा शिक्षा फर्मावू शकतो तसाच शिक्षा माफही करू शकतो. तेव्हा त्या तिजोरीफोड्याने आपल्याला मुक्त करण्याची अट घातली. आणि शंभरावर लोकांच्या प्राणाची किंमत म्हणून त्या कॅप्टनने ती अट मान्य केली. त्या चोराने कॉकपिटचे दार क्षणात उघडून दिले, आणि तो ज्या कुलूप फोडायच्या गुन्ह्यासाठी पकडला गेला होता त्याच गुन्ह्यामुळे मुक्त होऊन त्या विमानातून एक मुक्त नागरिक म्हणून उतरला. गोष्ट ऐकवून भरत मनसोक्त हसतो तर सर्वेश्वर आणि गुप्ताचे डोळे पाणावतात.

इकडे प्रसन्नकुमार भारद्वाज भरत अयशस्वी ठरला तर असा विचार करून आदित्यला रेतीत पुरता येईल का याची चाचपणी सुरू करतात. पण त्यांच्या या प्रयत्नांतून त्यांना एवढेच कळते की भारतात एवढे मोठे प्रकल्प करणारी एकही सॅल्व्हेजींग कंपनी नाही. एक अमेरिकन कंपनी असली कंत्राटे घेते परंतू आदित्यला पुरायला किती खर्च येईल त्याचा फक्त अंदाज लावण्याचे कामच आठ दिवसांच्या वर जाणार असते. घ्या! म्हणजे इथे आदित्यचा स्फोट झालाच तर तीन दिवसातच होणार असतो. भारद्वाजांपुढे अजुनही एक अडचण असते. त्यांच्या धाकट्या बंधूंना त्यांनी वशिलेबाजी करून या आदित्यच्या संचालकपदी बसविलेले असते. याही बाबीची आता चौकशी होणारच. दुसरा कोणी संचालक असता तर ऊर्जा मंत्रालयाचे सचिव या नात्याने त्यांनी त्या संचालकाविरुद्ध कारवाई करून त्याला बडतर्फही करायला लावले असते पण आता आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी परिस्थिती. तिकडे त्यांच्या बंधूंचीही अशीच काहीशी अवघड परिस्थिती होते. नात्याने त्यांचा भाचा असलेला भार्गव नावाचा कर्मचारी आदित्यवरील गोंधळाचा फायदा घेऊन लेसर प्रक्रियेत लागणारी सोळा लाख रूपये किंमतीची आठ माणके घेऊन पसार झालेला असतो.

आदित्यच्या नंबर पाच जनरेटरच्या विजेवर चालणार्‍या अनेक कारखान्यांपैकी कुंदापूरच्या सुधाकर शेट्टींचाही काजुगराचा एक कारखाना असतो. विजेचा दाब आणि वारंवारिता कमी होत असल्याने मोटर्स नीट फिरत नाहीत आणि शेट्टींनाही आपला कारखाना बंद ठेवावा लागतो. हे शेट्टी लवकरच विधानसभेच्या निवडणूका लढविण्याची स्वप्ने पाहत असतात. स्थानिक बातमीदार गॅब्रिएल डिसुझा उर्फ गॅबी त्यांना योग्य ती पार्श्वभूमी तयार करून देत असतो. आदित्य मध्ये झालेल्या बिघाडाचा फायदा घेऊन त्याविरुद्ध रान उठवा आणि निवडणूक जिंका असा सल्ला गॅबी शेट्टींना देतो. पण शेट्टी आधी आदित्यवर फोन लावून नेमकी काय परिस्थिती आहे ह्याची चौकशी करण्यास गॅबीला सांगतो. गॅबी फोन वर आदित्यच्या पीआरओ शी बोलतो आणि त्याला धोका असल्याचा संशय येतो.

या धोक्याच्या तीव्रतेमुळेच स्वत: प्रत्यक्ष तिथे जाण्याऐवजी गॅबी वर्तमानपत्राच्या कार्यालयाला केवळ या बिघाडाची बातमी देतो आणि एखाद्या ज्येष्ठ वार्ताहराला आदित्यवर पाठवायची विनंती करतो. त्याप्रमाणे पन्नाशी गाठलेले पत्रकार गुरूराजा यांच्यावर ही जबाबदारी येऊन पडते. गुरूराजा निघण्याआधी थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाच फोन लावतात आणि त्यांना कळते की भरत बसरूर आदित्यला वाचविण्यासाठी येत आहेत. भरत बसरूर चे नाव ऐकताच गुरूराजा च्या जुन्या आठवणी ताज्या होतात. गुरूराजा संपादकांना तीच प्रसिद्ध तिजोरीफोड्याची गोष्ट ऐकवितो जी भरत विमानात सर्वेश्वर आणि गुप्तांना ऐकवित असतो. त्यानंतर आदित्य कडे निघण्यापूर्वी गुरूराजा वर्तमानपत्राचे जुने अंक चाळत बसतो. इकडे भरत बसरूरही त्याचे दोन्ही सहप्रवासी झोपी गेल्यावर विमानात बसल्या बसल्या जुना काळ आठवू लागतो आणि गुरूराजा व भरत सोबत वाचकांच्याही डोळ्यापुढे भूतकाळाचा पट उलगडतो.

१९६५ साली बार्क (बी.ए.आर.सी. - भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर) मध्ये पी एच डी करणारा विद्यार्थी भरत मोठ्या कष्टाने व त्याच्या मार्गदर्शकाच्या मदतीने आपला प्रबंध पुरा करतो. फ्युजन रिऍक्शनद्वारे वीजनिर्मीती करण्याचा शोध तो लावत असतो. पुढे तो या विषयावर बर्कलेतही काम करतो. त्यानंतर काही वर्षे पीआरएल मध्येही काढतो. नंतर त्याच्या या संकल्पनेला उचलून धरणारे राव, तन्ना, डेमियन हे इतर शास्त्रज्ञही त्याला येऊन मिळतात. त्यातल्या डेमियनशी तर त्याची विशेष मैत्री जुळते. पुढे चार वर्षे भरत याच फ्युजन रिऍक्टर च्या कामासाठी स्वत:ला सर्वस्वी वाहून घेतो.
१९७७ च्या जूनमध्ये आदित्य च्या यशाची चिन्हे दिसू लागतात. आदित्य च्या स्थापनेची प्रक्रिया सुरू होते. पण दरम्यानच्या काळात घरच्या आघाडीवर भरतला फार त्रास होतो. कुटुंबाला वेळ देऊ शकत नसल्याने पत्नी छायाशी त्याचे वारंवार खटके उडतात. या कटकटींमुळे तिला दिवस गेलेले असताना ती कुठली तरी गर्भनिरोधक औषधे घेते आणि तो गर्भ पाडते. ज्याचा परिणाम म्हणून पुढे तिला गर्भधारणा झाली तरी गर्भ टिकत नाही. शेवटी चवथ्या वेळी गर्भ राहून मुलगी सुनयना जन्मते पण “ऍब्नॉर्मल”. तिला जन्मत:च सेरेब्रियल पाल्सी हा असाध्य आजार असतो. आदित्यची घोडदौड सुरूच असते पण सुनयना कडे दुर्लक्ष होत असते.

आदित्य अंतिम टप्प्यात असतो तेव्हा भरतला अमेरिकेला जाण्याची संधी मिळते. तिथे त्याला एक विचित्र ऑफर दिली जाते. आदित्य विषयी ची सर्व माहिती त्याने अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना द्यावी त्याबदल्यात ते त्याला दहा लाख डॉलर देऊ करतात ज्यामुळे त्याला अमेरिकेत त्याच्या मुलीवर महागडे उपचार करणे शक्य असते. ही माहिती देणे हा देशद्रोह ठरेल का असे भरत डेमियनला विचारतो. डेमियन त्याला होकारार्थी उत्तर देतो तरीही त्यावेळी भरत ती चूक करतोच. ठरल्याप्रमाणे त्याची पत्नी छाया आणि मुलगी सुनयना अमेरिकेत राहू लागतात. सुनयनावर उपचार चालु होतात. भरत एकटाच भारतात परततो.

भरतच्या या तथाकथित देशद्रोहाबद्दल त्याच्यावर खटला चालविला जातो. पण त्याला कुठलीही शिक्षा ठोठावण्यापुर्वी त्याच्याकडून शक्य तितके आदित्यचे काम करून घेतले जाते. त्यानंतर पुढे १८ ऑगस्ट १९८७ ला आदित्य पूर्णपणे कार्यान्वित होतो. फक्त काही सुरक्षा उपाय राहिलेले असतात. त्याचाही आराखडा भरतने बनविलेला असतो. आपल्या सहकार्‍यांच्या ताब्यात भरत तो देतो आणि दोन दिवसांतच म्हणजे २० ऑगस्ट १९८७ रोजी त्याला अटक होते. देशद्रोहाच्या आरोपाखाली १० वर्षे सश्रम तुरूंगवासाची शिक्षा होते. खटल्यात डेमियनची साक्ष महत्त्वाची ठरते. त्यामुळे भरत विषयी सहानुभूती असणारे सर्वच अधिकारी कर्मचारी पुढे डेमियनला वाळीत टाकतात.

नंतर आदित्यच्या या सात वर्षांच्या कालावधीत एकट्या पडलेल्या डेमियनला दोन वर्षांपूर्वी नव्यानेच आलेले संचालक भारद्वाज बरोबर हेरतात आणि आपल्यासोबत भ्रष्टाचारात सामील करून घेतात. त्यामुळे खबरदारीच्या सुरक्षा उपायांच्या अंमलबजावणीत कसूर होत राहते. आदित्यच्या बांधणीत एक पैशाचाही भ्रष्टाचार न करणारा भरत केवळ प्रकल्पाची माहिती गुप्त न ठेवल्यामुळे दहा वर्षे तुरूंगात गेला हे पाहून डेमियन ही निगरगट्ट झालेला असतो त्यामुळे तो भारद्वाजांसोबत भ्रष्टाचारात सामील होतो - पैशांची विशेष लालसा नसतानाही. त्यामुळे त्याच्यापासून वेणूही दुरावतो.

तर हा असा भूतकाळाचा उलगडा झाल्यावर वाचक पुन्हा वर्तमानकाळात येतो. आदित्यच्या परिसरात भरतचे आगमन होते. भारद्वाज आणि डेमियनचे जुने सहकारी मित्र त्याचे स्वागत करतात. जुन्या आठवणी निघतात. भरतही काही काळ भावविवश होतो. पण नंतर लगेचच अजिबात वेळ न घालविता ज्या कामासाठी आलेला असतो ते काम सुरू करतो. तो ओटू प्रकल्प, फायबर ग्लास आणि स्टील सॅंडविच, लिक्विड हीलियम चेंबर्स याविषयी एकेक प्रश्न भारद्वाजांना विचारतो परंतू त्यापैकी एकाही सुरक्षा उपायाची अंमलबजावणी प्रत्यक्षात झालेली नसून केवळ ते कागदावरच असल्याचे त्याला समजते तेव्हा अतिशय धक्का बसतो. संगणकाने सात नंबरचा धोक्याचा इशारा देउनही काहीच हालचाल न झाल्याचे समजल्यावर तो आपण सात वर्षांपूर्वी बनवून दिलेले आराखडे मागतो. पण या गलथान लोकांना तेही सापडत नाहीत. भरतला बसलेला धक्का पाहून भारद्वाज त्याला पटकन सांगतात, “आदित्यला वाळूत पुरायची एक योजना पुढे आलीय. इथल्या लोकांना हलवायचं की नाही तेही ठरवायला हवं”.
“इथल्या लोकांना हलवणार? कुठं? कधी? आदित्यचा स्फोट झाला तर इतका मोठा परिसर उद्ध्वस्त होईल की तुम्हाला पळता भुई थोडी होईल. आपण सर्व वाचायची शक्यता आहे, डॉक्टर भारद्वाज - आदित्य वाचला तरच! आणि प्रकल्पाला वाळूत पुरायच्या योजनेबद्दल विचाराल तर मी एवढंच म्हणेन - ज्या माणसानं ती सुचवली असेल त्यालाच वाळूत पुरा. म्हणजे त्याला कसलीच झळ लागणार नाही. वाळूत तोंड पुरणार्‍या उंटासारखं!” इतकं बोलून भरत थेट चॅनल पाचवरच निघतो. तिथे त्याला पाहून जुन्या कर्मचार्‍यांमध्येही उत्साह पसरतो. स्वयंचलित सुरक्षा उपाय नसले तरी मॅन्युअली फायबरची भिंत सरकवण्याचे भरत ठरवितो. यात मोठा धोका असतो. हे काम करणारा भाजून निघणार असतो. परंतू कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यास तयार असलेले आदित्यचे कर्मचारी आणि सेनेचे जवान भरतच्या सूचनेप्रमाणे हे काम करू लागतात. त्याच्या उपायामुळे तापमान खाली येण्याची शक्यता दिसू लागते परंतू भारद्वाज इथेही आडमुठे पणा करायचा प्रयत्न करतात. “आपल्या जवानांच्या जीवनाची किंमत मी मातीमोलाची होऊ देणार नाही. शक्यतो एकाही जीवाची हानी होऊ न देता मला हे कार्य करायला हवं. एका जरी जीवाची हत्या झाली तरी मला माझी सद्सद्विवेकबुद्धी क्षमा करणार नाही.” भारद्वाज त्वेषाने टेबलावर मूठ आपटीत म्हणाले. भरतने अति सहजपणे सूत्रे हाती घेतलेली असतात. सारेच, अगदी कर्नलसुद्धा भरतच्या आज्ञा सहजपणे पाळत असलेले पाहून भारद्वाज मत्सराने जळत असतात. “दहा लाखांच्या किंमतीच्या हीलियम लिक्विफायरला पंचवीस लाख रूपये देऊन, आदित्य च्या सुरक्षा योजनेत अमूलाग्र बदल करताना तुमची सद्सद्विवेकबुद्धी कुठं पेंड खायला गेली होती काय?” भरतने रुक्ष स्वरात विचारले. त्यानंतर मात्र भारद्वाज काहीच बोलत नाहीत. भरतच्या मार्गदर्शनाखाली जवान आणि कर्मचारी जखमी होत होत हीलियम बाथचा मारा करीत राहतात. दरम्याने कुलिंग पाइपमध्ये साफ सफाई करताना ऍसिड राहिल्यामुळे छिद्र पडल्याचेही स्पष्ट होते आणि गळतीच्या मुख्य कारणाचा शोध लागून तेही दूर केले जाते.

काही तासांतच भरत आदित्यचं तापमान इतकं खाली आणतो की त्यामुळे तो आदित्यला स्फोटापासून रोखण्यास यशस्वी होतो. पण प्रक्रिया पूर्णपणे बंद पडून आदित्य जर पूर्ण थंड झाला तर कायमचा निरुपयोगी होणार असतो. प्रक्रिया पुन्हा चालु राहावी याकरिता लेझर चालु करणे गरजेचे असते. परंतु त्याकरिता लागणारी माणके भार्गव चोरून घेऊन गेल्याचे कळताच भरत भार्गव चोरी करून कुठे पळून जाऊ शकेल याचा अंदाज लावून त्या दिशेला पोलिस तपास करण्याचे सूचवितो. त्याप्रमाणे पोलिस भार्गवला सिकंदराबाद दिल्ली आगगाडीत अटक करतात आणि माणके ताब्यात घेतात.

पोलिस ठीक साडेबारा वाजता ही माणकं आदित्य वर पोचवतात तेव्हा एकच जल्लोष होतो. ख्रिसमस करिता बनविलेले केक्स वगैरे खाऊन यश साजरं केलं जातं. आदित्य पूर्ववत होऊन एक लक्ष अंश सेल्सियस तापमानावर कार्यरत होईतो दुपारचे दोन वाजतात. प्रत्येक कंट्रोल चेक-अप पॉईंटवरुन ओ.के. सिग्नल पाहिल्यानंतर भरत आपल्या घड्याळात पाहतो दुपारचे अडीच वाजलेले असतात. “सो माय डियर फ्रेंड्स काम संपलं! आता गुडबाय म्हणायची वेळ येऊन ठेपलीय.” भरत परतायची घोषणा करतो. सारेच गहिवरतात. भारद्वाज त्याला आनंदाची बातमी देतात. त्यांचे ऊर्जासचिव असणारे बंधू दिल्लीहून गोव्याला निघालेले असतात. येताना ते भरतकरिता माफीचा आदेश आणि टाईप केलेला अर्ज घेऊन येत असतात. भरतने फक्त अर्जावर सही केली म्हणजे त्याची मुक्तता होणार असते. पण भरत या प्रस्तावास विनम्र नकार देतो. ऐवीतेवी शिक्षेची सात वर्षे पूर्ण झालेलीच असतात. तीन वर्षांकरिता याचना करण्याची त्याची इच्छा नसते. आपण पुन्हा तुरूंगात जायच्या निश्चयावर ठाम असल्याचे तो बोलून दाखवितो. संचालकपदा साठी ज्याप्रमाणे आपण लायक नाही त्याचप्रमाने डॉ. भारद्वाज ही नाहीत हे तो त्यांना स्पष्ट सुनावतो. सुंदर राघव राव ला संचालकपदी नेमा असेही तो पुढे सांगतो. डेमियनलाही भ्रष्टाचारात सामील केल्याबद्दल भारद्वाजांना तो दोष देतो. “सुनी (सुनयना) माझी मुलगी होती तिला वाचविण्यासाठी मी देशद्रोह केला. हा आदित्य माझा मुलगा आहे. माझ्या मुलासाठी मी काहीही करीने.” या त्याच्या अखेरच्या वाक्यांनी भारद्वाज कमालीचे हादरतात.

सर्वेश्वर आणि गुप्ता भरतला गोव्याच्या दाभोळी विमानतळावर सोडवायला जातात. विमानतळावर भरत म्हणतो, “सर्वेश्वर, दिल्ली विमानतळावरून तिहार कडे जायला टॅक्सी करावी लागेल आणि माझ्याकडे तर पैदेखील नाही.” सर्वेश्वर खजील होऊन भरतला पाचशे रूपये देतो.

त्याचवेळी इकडे डेक्कन टाईम्सचा ज्येष्ठ वार्ताहर गुरूराजा आदित्यच्या प्रवेशद्वारापाशी टॅक्सीतून उतरतो. “एक सांग, आदित्य बिघडलाय म्हणे नं?” आपले ओळखपत्र दाखवित तो सिक्युरिटी गार्डला विचारतो. “बिघडला होता. काल रात्री दहा वाजता डॉक्टर भरत बसरूर आले. आज सकाळपर्यंत ठीक केला आणि दुपारी ते गेले.” गार्ड उत्तरतो. हे उत्तर ऐकून गुरूराजा हादरतो. “एवढ्यातच? इतका मोठा ऊर्जाप्रकल्प! काम एवढंसंच? आणि एवढ्याशा कामासाठी ते दिल्लीहून आले? काम फार नव्हतं?” गुरूराजा विचारतो. “काम अय्या! आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे हे. कितीही मोठा प्रकल्प असला, कितीही मोठी चूक असली तरी फुकट घालवायला लोकांना वेळ कुठे असतो? झट की पट काम व्हायलाच हवं! तुम्ही अजून विसाव्या शतकात आहात. ’आदित्य’ एकविसाव्या शतकाचा प्रकल्प आहे.” गार्ड हसत उद्गारतो.

गुरूराजा दूरवरच्या ’आदित्य’ चा कानोसा घेतात. एक संथ गुणगुण ऐकू येत असते. जणू काही काहीच झालेले नसते. काहीच बिघडलेले नसते.

आदित्यच्या वीजनिर्मितीच्या कार्यात क्षणभरही खंड पडू न देता अंधाराविरुद्ध अत्यंत कमी अवधीत युद्ध करून त्याला हरविणारा आपला महानायक पुन्हा स्वत:च्या आयुष्याला अंधाराच्या अधीन करायला निघून गेलाय ही हेलावून टाकणारी जाणीव वाचकाला करून देत आदित्य कादंबरी इथेच संपते.

वाचकाला एक वेगळीच अनुभूति देणार्‍या १२८ पानांच्या या कादंबरीत गालबोट लावल्याप्रमाणे फक्त एकच गणिती चूक आहे. पान क्र. ४८ वरील ही वाक्ये वाचा.

अर्ध्या किलोमीटर व्यासाचा हायड्रोजन बॉम्ब फुटला तर किती मोठा परिसर उद्ध्वस्त होईल? गणित सोपे आहे. प्रत्येक किलोमीटर वर्गाला पाचशे किलोमीटर वर्ग. म्हणजे जवळजवळ अडीचशे किलोमीटर वर्ग परिसर उद्ध्वस्त व्हायला हरकत नसावी. म्हणजे एक ऐंशी किलोमीटर लांबीचा दोर घ्या. त्याचे एक टोक आदित्य वर ठेवा आणि दुसर्‍या टोकाने त्याभोवती वर्तुळ काढा. त्या वर्तुळातील परिसर बेचिराख होऊन जाईल.

आता वर्तुळाचे क्षेत्रफळ = त्रिज्येचा वर्ग X ३.१४ हे सूत्र वापरून पाहिल्यास दोराची लांबी ऐंशी किलोमीटरच्या ऐवजी आठ किलोमीटर असायला हवी होती. शिवाय मजकुरात हे सर्व अंकी न लिहीता अक्षरी असल्याने आठ ऐवजी ऐंशी छापणे हा बहुदा मुद्रणदोष नसावा असे वाटते. म्हणजे ही लेखकाकडूनच अनवधानाने झालेली गणिती चूक असणार. असो. ही चूक वगळता आदित्य कादंबरी वाचनानंद देण्यात कुठेही कमी पडत नाही.

आदित्य । लेखक अरूण हेबळेकर । मौज प्रकाशन गृह, मुंबई.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान