धक-धक धाक-धाक ढाक-ढाक...

Submitted by आनंदयात्री on 24 November, 2011 - 03:14

ढाक-बहिरीबद्दल चिक्कार ऐकलं होतं. सह्याद्रीमधला एक अवघड, थरारक ट्रेक ते शेवटच्या टप्प्यात भल्याभल्यांची XXX फाटते इथपर्यंतचे किस्से ऐकले होते. "रॉकपॅचवर स्वत:चेच ठोके स्वतःला ऐकू येतील इतके घाबरलेलो असतो आपण", "पाय नीट ठेवला नाही तर खाली दरी 'आ' करून तयारच असते, सो, ओन्ली वरी अबाऊट दॅट!" इ. इ. इ.

काही दिवसांपूर्वी "ऑफबीट"वाले (आम्ही XXXवालेच म्हणतो, पद्धत आहे तशी!) ढाकला ट्रेक नेत आहेत असं कळलं. मग काय! जायचं ठरवून टाकलं! सह्याद्री एक्सप्रेसमधल्या त्या अविस्मरणीय प्रवासानंतर लोणावळ्याला स्टेशनच्या विरुद्ध बाजूला उतरलो तेव्हा साडेआठ वाजले होते. हवेत उबदार गारवा होता. ट्रेन गेल्यावर प्लॅटफॉर्म वर चढलो आणि डावीकडून आलेल्या मकरंद आणि तुषारने (त्यांची ओळख नंतर झाली) 'ऑफबीट का?' असा प्रश्न टाकला. ट्रेकर लोकांचं हे एक बरं असतं! अजिबात ओळख नसतानाही 'आपलं ध्यान' त्यांना बरोबर ओळखता येतं!

"चला लवकर, ट्रेन सुटेल ३ नं वरून" - मग त्यांच्याबरोबर मी प्लॅ.क्रं ३ कडे (पुढचे तिकीट न काढताच) धावलो. ठरलेल्या वेळेपूर्वीच सर्व जमल्यामुळे एक ट्रेन आधीच निघणे, कामशेतला पोचणे, तिथून रंगोली ढाब्यावर बसने येणार्‍या तिघांची वाट पाहत नवीन कराव्याशा वाटणार्‍या ट्रेकच्या (हवेतल्या) गप्पा करणे इ इ सर्व गोष्टी यथासांग पार पडल्यावर पुढे निघालो.

ढाकला जायला जवळजवळ ८ ते १० वेगवेगळ्या वाटा आहेत. सर्वात सोपी वाट - आम्ही जाणार होतो ती - जांभिवली मार्गे. कामशेतहून शेवटची एसटी सायं ६ ची आहे. रात्रीच्या या प्रहरी आमच्यासाठी "हर सफर मे कहानी है" असं ढाकसाठी तरी सार्थ ब्रीदवाक्य असणारी टाटा मॅजिक उभी होती. ७ आसनक्षमतेच्या त्या गोंडस, नीटस आकाराच्या गाडीत एक तास आम्ही १२ जणांनी तुफान येंजॉय केला. डायवर, त्याच्यासोबत एक माणूस, मी आणि अजून एक ट्रेकमेट - राकेश, पुढे बसलो होतो. त्या एवढ्याशा जागेत मी आधी त्या अशिष्टंटच्या मांडीवर बसून पाहिलं. मग काचेजवळ रस्त्याकडे पाठ करून बसून पाहिलं. "टोचायला" लागलं म्हणून मग मुडपून खाली फतकल मारली. जरा वेळाने माझ्या पायापाशी गरम लागायला लागलं. हेडलाईटचा आतला भाग असेल म्हणून मी आधी दुर्लक्ष केलं, पण शेवटी न राहावून डायवरला विचारलं.
"इंजिन आहे ते!" - मी उडालोच! टाटा मॅजिकच काय पण कुठल्याही चारचाकीची इंजिने कुठे असतात याच्याशी माझा तसा काहीच संबंध नव्हता. इंजिनाशी डील करण्याचा प्रश्न कधी आलाच नाही - अभ्यासातही नाही, आणि रोजच्या लोकलप्रवासातही नाही! पण आता ऑप्शन नव्हता. मग कसंतरी पाय आखडून घेतले आणि अंताक्षरी गात बसलो.

त्या सुनसान खडबडीत रस्त्यावरून जांभिवली गावात पोचलो तेव्हा साडेअकरा झाले होते. मग पिठलं-भाकरीचं जेवण, ओळखपरेड झाल्यावर प्रीती-झीनत-राजस(लीडरलोक्स)यांनी सूचना दिल्या. ढाकच्या वाटेवर रानामध्ये उघड्यावर मुक्काम करायचा होता. जांभिवलीतून कोंडेश्वर महादेवाला डाव्या हाताला ठेवून डोंगराच्या धारेने चढून जायचे. वर पोचलो की डाव्या हाताला मांजरसुंभ्याचा डोंगर, समोर दूरवर खालच्या अंगाला सांडशी-कर्जत ही गावे दिसतात आणि उजव्या हाताला ढाकचा डोंगर दर्शन देतो. आम्ही रात्री चढत असल्यामुळे त्याचे फोटो घेता आले नाहीत. मुक्कामाची जागा ब्येष्ट होती. झाडोर्‍यात मध्यभागी एका सपाट जागेवर पथार्‍या पसरल्या. कृष्णपक्ष असल्यामुळे रात्री अडीच वाजताही चंद्राचा पत्ता नव्हता. शेकोटी पेटवली आणि साडेचारपर्यंत गप्पा 'टाकल्या'. या ट्रेकमध्ये निम्मे लोक्स ट्रेक्सवर मनापासून प्रेम करणारे असल्यामुळे गप्पा भुतांच्या अनुभवांपासून सुरू होऊन, सह्याद्रीतल्या जुन्या अविस्मरणीय ट्रेक्सवर येऊन थांबल्या. बाकीच्यांनी दुसरी पंगत मांडून गाणी म्हणून घेतली.

अखेर 'दोन तास तरी झोप घ्या' असा 'आदेश' आल्यामुळे शेकोटी तशीच ठेवून अंथरूणावर आडवे झालो. मध्येच कधीतरी सॅकमधून जर्कीन काढून घातल्याचे आठवते. त्याच वेळी समोरच्या झाडाच्या फांद्यांमधून चांदोबाने
कोरभर दर्शन दिले. आजूबाजूच्यांचा घोरण्याचा आवाज सोडला तर बाकी जंगल शांत होते.

मुक्कामाची जागा -

अगदी घरच्यासारखं झोपायचं, ट्रेक असला म्हणून काय झालं? Wink

साडेसहा वाजता जाग आली तेव्हा झुंजुमुंजू की काय म्हणतात ते होऊन गेलं होतं. दिसण्याइतपत उजेड होता. आटोपून, नाष्ता करून, जागा स्वच्छ करून साडेसात वाजता बहिरीच्या गुहेकडे निघालो, तेव्हा सगळीकडे कोवळे उन्हं पसरली होती. ढाक-बहिरीचा खरा ट्रेक आता सुरू होणार होता.

ढाकचा किल्ला हा एक दक्षिणोत्तर पसरलेला अजस्त्र डोंगर आहे. साधारण २७०० फूट उंच, एक-दीड किमी लांब आणि बराच रूंद अशा या किल्ल्याच्या पोटात बहिरीची पश्चिमाभिमुख गुहा आहे. त्यामुळे माध्यान्हीच्या आत उतरून खाली यायचे होते. साधारण अकरानंतर कातळांवर सूर्य येतो आणि मग हाताला चटके बसतात. गुहेकडे पाठ केली की समोर सरळसोट दरी, त्याखाली पठार, मग पुन्हा कडा, पुन्हा पठार आणि सर्वात खाली सांडशी गाव. ढाकच्या शेजारी डाव्या हाताला कळकरायचा सुळका आहे. त्या पलिकडे साधारण काटकोनात मांजरसुंभ्याची रांग. त्याच रेषेत दूरवर राजमाची किल्ल्याची आडवी जोडगोळी. रेल्वेतून जाताना दिसणार्‍या राजमाची किल्ल्याची बरोब्बर विरूद्ध बाजू इथून दिसते! पहिल्या नजरेत आवडून जावं असं हे रांगडं सौदर्य आहे! (तसं बघायला गेलं तर अशी ब्यूटी सह्याद्रीत जागोजागी आहे!).

ढाक आणि कळकराय या दोघांमधल्या बेचक्यातून एक वाट खाली उतरते आणि ढाकच्या कड्याला समांतर (म्हणजेच १००० फूट खोल दरीलाही समांतर) उजवीकडे सरकते. ही वाट पूर्णपणे कातळावरून आहे. अधेमधे खाचा आहेत आणि आता रोप्सही लावता येतात. शंभर एक फूट ट्रॅवर्स मारल्यानंतर वर चढायला कातळात कोरलेल्या १०-१२ पायर्‍या आहेत. वर गेलो की पुन्हा उलट दिशेने पंचवीस-तीस फुटांचा दरीला समांतर ट्रॅवर्स! आधारासाठी लोखंडी तारा लावलेल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात खरा थरार आहे. तिथे नव्वद अंशातला चढ सोपा व्हावा म्हणून साधारण १५ फूट उंचीचा एक बांबू बांधलेला आहे. त्याच्या दोन्ही बाजूला ठराविक अंतरांवर खुट्ट्या बाहेर आल्या आहेत. त्यावर पाय देऊन वर चढायचे. हा बांबू म्हणजे खरोखर एक कौतुकाची गोष्ट आहे! बांबू संपला की, वर जरासा बाहेर झुकलेला कातळ आहे. त्यावर चढलो की स्वतःला खरेखुरे, अनुभवी ट्रेकर्स मानण्याचे सार्थक वगैरे होते - आपण फायनली गुहेत पोचतो!
अशा या नितांतसुंदर ढाक-बहिरीच्या गुहेकडे जाणार्‍या या पॅचचे काही फोटू -

ढाकचा कडा (बाजूने) -

ढाकचा कडा (खालून) - झेंडा म्हणजे गुहा!

ही वाट. या फोटोत आधारासाठी रोप्स दिसत आहेत -

कळकराय सुळका -

"वर्टिकल लिमिट!" -

बांबूवर!

बांबूच्या वरची स्टेप (ओन्ली वरी हिअर!)

ढाक-बहिरी अवघड मानला जाण्याचे कारण फक्त आणि फक्त वरील परिच्छेदातील रौद्रभीषण सौंदर्य! बाकी हा खूपच सोप्पा ट्रेक आहे. माझ्या मते, कोरड्या ऋतूमध्ये ढाक अजिबात अवघड नाही. थोडीशी एकाग्रता आणि आत्मविश्वास यांच्या मदतीने रोप्स, तारांचा आधार न घेताही बांबूपर्यंत पोहोचता येते (खोटं नाय बोलत, मी पोचलो होतो). बांबू पार करताना मात्र अधिक काळजी घ्यायला हवी. खाली उतरल्यावर ढाक-बहिरीमध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातांच्या ज्या कहाण्या ऐकल्या त्यापैकी बर्‍याचशा त्या बांबूच्या शेवटच्या टप्प्यातच झालेल्या आहेत. तात्पर्य, स्वत:ची काळजी सर्वात महत्त्वाची!

गुहेतून घेतलेले काही फोटू -

राजमाची किल्ल्याची जोडगोळी -

साडेनऊ वाजता सगळेच्या सगळे १५ जण बहिरीचा ट्रेक संपवून खाली उतरलो तेव्हा सूर्य नुकताच त्या कातळांखालच्या जंगलावर येत होता.

आमच्याकडे अख्खा दिवस बाकी होता. उतरताना सांडशीच्या वाटेने उतरावे म्हणजे नवीन वाट माहिती होईल किंवा मग ढाकचा किल्ला बघून तिथून थेट पायथ्याला गौरकामत गावात उतरावे असे दोन पर्याय होते. आपल्या माबोकर सुन्याची 'ऑफबीट' म्हणजे एकदम झक्कास काम! अनुभवी लोक्स सोबत असतील तर वाटा चुकूही देतात आणि शोधूही देतात. Wink ढाक किल्ल्याची वाट लीडरलोक्सांना नीटशी माहित नव्हती. (ढाक किल्ला ही पूर्णपणे रनटाईम वॅल्युअ‍ॅडेड ऑपॉर्च्युनिटी होती :)) तिथे भेटलेल्या एका गावकर्‍याच्या मते, ढाक पहाडाच्या मागच्या बाजूने ढाक गावाला टाळून एक वाट किल्ल्याच्या दिशेने तासभर जाते. त्यापुढे दीड एक तासाचा चढ पार केला की किल्यावर पोचतो. ढाक किल्ला हे एक विस्तीर्ण पठार आहे. तो बघायला १ तासही कमीच होता. तसेच तिथून खाली गावात उतरायला चार-एक तास लागले असते. हा सर्व विचार करून ढाक किल्ला रद्द करून आम्ही काही उत्साही लोकांनी सांडशी गावाकडे उतरण्याचे ठरवले. बाकीचे आल्या पावली झीनतबरोबर जांभिवलीकडे निघून गेले. प्रीतीला सांडशी गावात उतरायची लांबची वाट माहित होती. या वाटेवर कुठेही पाणी नाही आणि संपूर्ण वेळ सूर्य माथ्यावर असणार होता. या वाटेने कमीत कमी चार तास लागतात. त्यामुळे प्रत्येकाकडे कमीत कमी ३ लिटर पाणी असेल तर या वाटेने जाऊ शकतो असे तिने सांगितले. त्या गावकर्‍याने उतरताना 'एका आंब्यापासून खाली उतरायला एक शॉर्टकट आहे' असेही सांगितले. त्या आंब्याजवळच एक पाण्याचा साठाही गुहेखालून लीडर प्रीतीने फोटोत कॅच केला होता. पण तो आंबा आणि ते पाणी नक्की कुठे आहे, हे शोधावेच लागणार होते. पावणेबारा वाजता २ लीडर्सबरोबर आम्ही नऊ लोक्स सांडशी 'फाट्या'वरून गावाकडे निघालो.

सांडशीकडून येताना ढाकचा डोंगर दोन डोंगरांच्या मागे आहे. अतिशय खडतर आणि दीर्घ चढ चढून यावे लागते. आम्ही उतरत असलो तरी आमचीही हालत फारशी चांगली नव्हती. कारण आम्हाला ती लांबची वाट टाळायची होती. त्यासाठी तो आंब्याजवळचा शॉर्टकट शोधायचा होता. पाऊण-एक तासात एका सपाटीवर आलो. तिथून सांडशी गाव उजव्या हाताला खाली (दूरवर) होते. कुठेतरी शार्प उजवा टर्न घ्यावा (पायवाटांचा उजवा टर्न बरं का!) लागेल हे कळत होते. पण तशी वाट सापडली नाही, म्हणून तसेच पुढे चालत राहिलो. अचानक मधूनच झाडीमागून मांजरसुभ्याच्या डोंगराने दर्शन दिले. आभाळात घुसलेल्या सुळक्यावरून जणू तो आम्हाला विचारत होता - 'या बाळांनो! सांडशी शोधता शोधता वाट चुकलात आणि थेट इथेच आलात. असेच अजून थोडावेळ चालाल तर माझ्या पायथ्याशी पोचाल. येताय का?'

आम्ही वाट पूर्ण चुकलो होतो. कारण गाव मागे राहिले होते. आम्ही वरच्या बाजूने खूप पुढे निघून आलो होतो.
मागे ढाक असा दिसत होता -

थोडा झूमून -

अखेर वाटेत लागलेले बाण तपासत पुन्हा त्या पठारापाशी आलो. अडीच वाजले होते. एका झाडाच्या सावलीत बॅगा टाकल्या.

लीडरलोक्स वाट शोधायला निघून गेले. वारा सुटला होता. रणरणत्या उन्हात ती झुळूक खूपच आनंददायी होती. वाट सापडली नाही म्हणून अखेर लीडरलोक्स परत फिरले. आता एकच पर्याय होता - थोडं अंतर अजून माघारी जाऊन आंबा शोधणे व न सापडल्यास त्या लांबच्या वाटेने उतरणे. पाणी कमी झालं होतं म्हणून त्या फोटॉवरून मी पाणी शोधायला निघालो. गंमत म्हणजे, पाण्याचा तो नव्हे, पण दुसरा एक डबकंसदृश साठा जवळच्याच ओढ्याच्या वाटेमध्ये सापडला. बाटलीच्या बुचातून रूमाल लावून पाणी भरून घेतलं आणि बाकीच्यांना येऊन ही खूषखबर सांगितली. सर्वांनी मग तिथे पाणी भरले आणि माघारी निघालो. पोटात पाणी गेल्यामुळे असेल म्हणा, किंवा झाडाखाली थोडा आराम झाल्यामुळे असेल म्हणा, पण पाचेक मिनिटांत तो आंबा सापडला, ते पाणी सापडलं आणि जवळच्या चौथर्‍याजवळून खालच्या दिशेने गेलेली एक मळलेली वाटही सापडली. त्या आनंदात तिथेच थोडं खाऊन घेतलं.

त्या आंब्यापासून केवळ वाट सापडली होती एवढंच सुख होतं. सांडशी अजूनही दोन पठारांखाली दोन-अडीच तास दूर होतं. ही वाट खरंच शॉर्टकटची आहे. पहिल्या टप्प्यात सत्तर एक अंशांच्या कोनात झाडीतून ही वाट खाली उतरते. मग सांडशीच्या दिशेने समांतर ट्रॅवर्स मारून अखेरच्या टप्प्यात ट्रेकर्सचा अक्षरशः कस पाहत पुन्हा खडा उतार उतरून एका नदीपाशी ही वाट येते. उतार-उन्हं-घाम - बाकी काहीही नाही! असे प्रसंग आले की मला हमखास एक प्रश्न पडतोच - कुणी सांगितलं होते हे उद्योग करायला? आणि मग उत्तरही आपोआपच मिळतं! Happy किंवा कोदापूर गावात एसटीतून उतरल्यावर कंडक्टरची कॉमेंट - "आयला! पैसे देऊन वर जीवाला त्रास" आठवते. असो. अर्थात या वाटेवर अध्येमध्ये बाण आखलेले आहेत, झाडाच्या खोडावरही खुणा आहेत. देखनेवाली नजर चाहिये बस्स! ही संपूर्ण वाट उतरताना मला सतत तोरण-रायगडच्या ट्रेकमध्ये सिंगापूरच्या नाळेने दापोलीकडे जाणार्‍या वाटेची आठवण होत होती.

नदीजवळून ढाक -

त्या नदीमध्ये मासे पकडण्यासाठी सुंदर लाकडी जाळी लावली होती. त्याच्या खालच्या अंगाला आम्ही पाणी प्यायलो. थोड्या वेळाने -
सुशील: तू ते पाणी प्यायलास का?
मी : हो.
सुशीलः मी त्या मामांना विचारलं, ते म्हणाले, या पाण्यात माशांसाठी औषध टाकलं आहे. ते पीत नाही आम्ही.
मी: (मनात कपाळावर हात मारून) आत्ता सांगतोयंस? आणि जाउ दे! ते औषध माशांसाठी आहे, माणसांसाठी नाही!

आजूबाजूला डोंगर, झाडी, पाचचा सुमार, कललेली उन्हं, विलोभनीय शांतता आणि नदीचं इतकं सुंदर, नितळ पाणी बघून त्याचा आस्वाद न घेणं हा केवळ करंटेपणा होता! आणि आता बहात्तर तासांनीही तब्येत ठणठणीत असल्यामुळे त्यावेळी ते पाणी प्यायलं हे बरंच केलं!

सर्व प्रवास संपवून सांडशी गावात पोचलो आणि सुदैवाने लगेच सव्वापाचची यष्टीही मिळाली. मग तिथून कर्जत, कर्जतहून दादर व्हाया चहाचे कप असा कंटाळवाणा प्रवास संपवून कर्मभूमीत पोचलो तेव्हा मनात एक अवघड ट्रेक सुफल झाल्याचा आनंद घुमत होता - धक-धक धाक-धाक ढाक-ढाक...

- नचिकेत जोशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे, काही फोटो पाहताना श्वास रोखला गेला माझा. व्हर्टिकल लिमिट नावाचा फोटो पाहून माझ्या डोक्यात विचार आला, की समजा कोणी निम्म्यावर पोचला आणि अवसान गाळून बसला तर? धड वरचा ना खालचा..

काय छान लिहिलंस रे... फिरुन आल्यासारखं वाटलं!
अरे, अणि त्या जंगलात मुक्काम ठोकला होतात... बापरे!! Uhoh

'या बाळांनो! सांडशी शोधता शोधता वाट चुकलात आणि थेट इथेच आलात. असेच अजून थोडावेळ चालाल तर माझ्या पायथ्याशी पोचाल. येताय का?'>> हे भारी Lol

माशांसाठी औषध Biggrin
प्रचि अ‍ॅड केल्यास त्यामुळे ट्रेक "समजला"! Happy

व्हर्टिकल लिमिट नावाचा फोटो पाहून माझ्या डोक्यात विचार आला, की समजा कोणी निम्म्यावर पोचला आणि अवसान गाळून बसला तर? धड वरचा ना खालचा..>>> हाच विचार करत वाचत खाली आले. तसे सोपे आहे येथे वाचत खाली येणे. पण तेथे काय?

वर नाहि न खाली नाहि, त्रिशंकु झाला म्हणजे?

सर्वांचे आभार! Happy

समजा कोणी निम्म्यावर पोचला आणि अवसान गाळून बसला तर? धड वरचा ना खालचा..
वर नाहि न खाली नाहि, त्रिशंकु झाला म्हणजे?

खुदपे भरोसा रखनेका! Happy
खरं सांगायचं तर ढाकला हल्ली आवश्यक तिथे सोयीसाठी रोप्स लावले आहेत. फोटोवरूनही ते समजेल.. पूर्वीइतका ढाक-बहिरी आता अवघड नाहीये! Happy

मस्तच...

ढाक च्या किल्ल्यावर जायला जिथून नाळ सुरू होते (वरची बाजू) तिथूनच रस्ता आहे... जराशी उडी मारून जावे लागते..
पहीला जो फोटो दाखवला आहे (>>अशा या नितांतसुंदर ढाक-बहिरीच्या गुहेकडे जाणार्‍या या पॅचचे काही फोटू ह्या नंतर) त्यात तो पोरगा ज्या डोंगरावर हात ठेऊन आहे त्यावर चढायचे..

हा खालचा फोटो त्या डोंगरावर चढायला लागल्यावर. जी एकदम खाली जी मुळी दिसते आहे, त्याला धरून तुम्ही खाली नाळेत उतरता. (फोटो वर क्लीक केल्यावर नवीन विंडो मध्ये मोठ्या साईझ चा उघडेल)

हा तिथूनच उतरतानाचा फोटो. म्हणजे अंदाज येईल कुठून चढायचे ते. ईथे डावीकडुन नाळेत उतरायचा रस्ता आहे तर उजवीकडे परत जांभवली ला जायचा

वाटेत काही घसारा आहे..हा उतरतानाचा फोटो

वरून दिसणारी गुहा आणी पायर्‍या.. ह्या पायर्‍यांनी आपण येत नाही.. ह्या पायर्‍या सांडशी ला उतरायला वापरतात... जिथे पायर्‍या संपतात तिथून जरा जपून उतरावे लागते... मी त्या वाटेने दोनदा गेलो आहे.. पण कधीही चुकल्याशिवाय खालच्या गावात पोचलो नाही...मधल्या पठारावर हमखास चुकायला होते...

हा फोटो वरून कळकराय आणी फॉल.

हा फोटो ढाक वरच्या पठाराचा..

खाली काही व्हीडिओ आहेत..
ह्यात त्या सांडशी ला जायच्या पायर्‍या दिसतात्..आणी आपण आल्याचा मार्ग ही दिसतो.. मी माझ्या पुढच्या मित्राला बहूतेक तेच सांगत आहे.

ह्यात वरून खालच्या फॉल चे चित्रण केले आहे..

ह्यात वरून कळकराय ला झूम केले आहे. वरचा भगवा दिसतो आहे स्पष्ट्पणे. ह्या सुळक्यावर लोक चढतातही..

आनंद अरे बढिया!!
कळ्ळं रे!! ढाक किल्ल्याची वाट त्या बेचक्यापासूनही आहे होय! (चल जायचं का? :))

आम्हाला तो गावकरी म्हणाला की बेचक्यापासून खाली उतरून मागे जा, एके ठिकाणी ढाक गाव, सांडशी आणि जांभिवलीच्या वाटा एकत्र येतात, तिथून ढाक गावाच्या दिशेने जा!

सही Happy

तिथे गेल्याचे कौतूक आहेच पण शद्बातून आणि फोटोतून ते सगळे आमच्यापर्यंत पोहोचवले, ते जास्त कौतूकाचे !!

लिखाण, वर्णन, अनुभव, फोटो सगळं छान.

काय साहसी अहात रे तुम्ही सगळे !
नाहीतर आम्ही ..... ४ मजली इमारतीच्या गच्चीमधून
नुसतं खाली डोकावलो,
तरी दिल धक-धक करायला लागतं…. Proud

आनंदयात्री जबरदस्तच ट्रेक......

ढाकभैरी चा ट्रेक अजून तरी झाला नाही पण या ट्रेक मुळे कर्जत-वदप-ढाक गावातून १० वर्षांपुर्वी केलेल्या ढाक किल्ल्याच्या ट्रेकची आठवण झाली... त्याचे काही स्कॅन केलेले काही फोटो आहेत माझ्याकडे जमलेतर टाकतो..

गेल्या काही वर्षात बर्‍याच वेळा हा ट्रेक प्लॅन केला पण जमले नाही....आता हे वर्णन आणी फोटो बघून ढाकभैरीचा ट्रेक करायची ईच्छा परत बळावलीय....

मस्तच रे. मला असे सगळे ट्रेकचे फोटो बघितले की खूप सुरसुरी येते असले काही तरी करायची मग जवळच्या पार्क मध्ये जावून एखादी ३-४ मैलाची छोटी ट्रेल/हाइक केली जाते पण तेवढीच अजून काही नाही.

वा! मस्त...
(मस्त कसलं, भयानक आहे ) Uhoh
"हि वाट" असे म्हणुन जो फोटो आहे ती वाट आहे?? Uhoh
नसलेल्या वाटा, पायर्‍यांसारख्या नसलेल्या पायर्‍या आणि सुळक्यांना पाहुनच पोटात खड्डा पडलाय. खरच ग्रेट आहात Happy

सर्वांचे आभार! Happy

उकाका, कुणाला सांगणार नसाल तर फक्त तुम्हाला म्हणून सांगतो, मलाही ४ मजली इमारतीच्या गच्चीमधून
नुसतं खाली डोकावलो, तरी पोटात गोळा येतो.. पण दरीत डोकावून बघताना नाही येत! कदाचित डोंगरावरून उंची कळत नसल्यामुळे तसं असेल! Proud

स्वप्नाली, अगं तीच वाट आहे. खाचा आहेत तिथे, फोटूत दिसत नाहीयेत..

इथे प्रचि दिसत नसल्यामुळे आपल्या ब्लॉगवर वाचला(घरून)...

निव्वळ चित्तथरारक!!

चांगली आवड आहे, सदैव जोपासा. खूप शुभेच्छा!!

Pages