शनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या "११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस,कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस"मधल्या दोन तासांच्या प्रवासाची ही गोष्ट आहे!
हा अलौकिक प्रवास घडायचे निमित्त होते - "ऑफबीटसह्याद्री" आयोजित समस्त ट्रेकरजनांच्या आदरास पात्र अशा "ढाक बहिरी" नावाच्या ट्रेकचे! भेटायची जागा "लोणावळा स्टेशन येथे रात्रौ ९.२० पर्यंत केव्हाही" असल्यामुळे नोकरी आटोपून मी 'सह्याद्री'ने जायचे ठरवले. वास्तविक, कोल्हापूरला जाणार्या "सह्याद्री"मध्ये S4 बोगीमधील रिझर्वेशन्स पुण्याहून भरली जातात. त्यामुळे पुण्यापर्यंत तिकिटावर (प्रसंगी टीसीला 'भरवून') जाता येते. पण त्या दोन दिवसांच्या खात्यावर अस्मादिकांच्या नशिबात अविस्मरणीय योग लिहिलेले असल्यामुळे S4 सोडून जनरल डब्यात शिरायची मला बुद्धी झाली.
सीएसटी ते दादरमध्येही ट्रेन पंधरा मिनिटे लेट आली. (लोणावळ्यानंतर 'चिक्कार' अनयुज्वल स्टेशन्सवर थांबत जाणारी 'सह्याद्री' ही एक 'हात दाखवा ट्रेन थांबवा' कॅटेगरीतली गाडी आहे हे चढण्यापूर्वी प्लॅटफॉर्मवर पुण्याला जाणार्या एक-दोन प्रवाशांशी मी बोलून घेतलेच होते.त्यांना आता आणखी उशीर झाला असता!) अगदी आरामात नाही तरी एक सीट बसायला नक्कीच मिळेल असा विश्वास वाटत होता. (नंतर कळले, तो फारच अवास्तव भाबडा होता.) शनिवार संध्याकाळ असला तरी गर्दी स्वतःच्या आटोक्यात राहिल असंही वाटलं. दादरला गाडी थांबता थांबताच चढलो. जनरल बोगीच्या दारात एक बाई वाटणारी मुलगी उभी होती. (का? - देव जाणे!) माझ्या पाठीवर ट्रेकींगची मोठी वजनदार सॅक आणि हातात अत्यंत हलकी कॅरीमॅट! नाईलाज होता. तिला रेटूनच आत शिरलो आणि जागा मिळते का शोधत जाऊ लागलो. (तिने शिव्या घातल्या नसणार याची खात्री आहे!) प्रत्येक कंपार्टमेंट खच्चून भरलेला! उजव्या बाजूच्या खालच्या आणि वरच्या बर्थवर कमीतकमी प्रत्येकी ४ माणसे बसलेली! डाव्या बाजूच्या समोरासमोरच्या सिंगल सीट्सवर प्रत्येकी एक प्रवासी आणि वर अस्ताव्यस्त बॅगा पसरलेल्या!अचानक असं लक्षात आलं की आपण त्या संपूर्ण डब्याच्या मध्यभागी अडकलो आहोत! गर्दीमुळे पुढे जाऊ शकत नाही आणि मागच्या वाटा केव्हाच बंद झाल्या आहेत.
एव्हाना गाडी सुटली होती. अचानक माझं लक्ष एका कंपार्टमेंटमधल्या सगळ्यात वरच्या बर्थकडे गेले. तिथे चक्क दोनच माणसे बसलेली होती आणि पलीकडे बॅग्स ठेवलेल्या होत्या. ही गोष्ट गर्दीच्या लक्षात आलेली नाही आणि फक्त मलाच दिसली आहे हा माझा आनंद क्षणकाळच टिकला. कारण मी जेव्हा ताबडतोब त्याला बॅग काढून तिकडे सरकायला सांगितले, तेव्हा तो म्हणाला, "तिथल्या लाकडी फळ्या तुटलेल्या असून केवळ लोखंडी रॉडची चौकट आहे, आणि म्हणून तिथे बॅगा ठेवलेल्या आहेत!" मी विचार केला, मेरे पास वो है, जो इनमेसे किसीकेभी पास नही है - आणि ती गोष्ट म्हणजे रात्रीच्या मुक्कामात झोपण्यासाठी घेतलेली कॅरीमॅट! मग पुढच्या गोष्टी यथासांग घडल्या. पाच मिनिटांनंतर मी त्या तुटलेल्या बर्थवर होतो. माझ्या 'खाली' रॉडच्या चौकटीच्या आधारे ठेवलेली कॅरीमॅटची गुंडाळी आणि त्याखाली खालच्या बर्थवर बसलेल्या माणसाचे डोके! पुढचा बराच वेळ मला 'मी जर खाली कोसळलो तर काय?' हीच भीती वाटत होती! पण तिकडे दुर्लक्ष करून मी स्थिरस्थावर व्हायला लागलो.
माझ्या समोरच्या अप्पर बर्थचं नशीबही असंच "तुटकं" होतं. त्यामुळे तिथेही तीनच माणसे होती. मग मी माझी सॅक त्या बर्थवर ठेवून दिली. आणि मी लोणावळ्याला उतरेपर्यंत त्यावरचा माणूस तिला आपली मानून धरून बसला होता आणि मी निवांत झालो होतो. खालच्या बर्थवर एक माणूस, दोन बायका. त्या दोन बायका एकमेकींच्या कुणीतरी असाव्यात. (आपण सासू-सुना समजू). त्यांच्या शेजारी अजून दोन माणसे. माझ्या खालच्या बर्थवर कोण बसले आहे हे मात्र कळू शकले नाही, आणि पडायच्या भितीने मी वाकून बघायचा प्रयत्नही केला नाही. यात किती वेळ गेला माहित नाही, पण गाडी स्लो जात होती. कारण बर्याच वेळाने जेव्हा कल्याण आले असे मला वाटले, तेव्हा गाडी पारसिकच्या बोगद्यात शिरत होती.
पुढचे दोन तास खायला उठणार अशी माझी खात्री व्हायला लागली होती. वेळ कसा काढायचा हा खरंच प्रश्न होता. घड्याळ बघून झाले, मोबाईल पाहून झाले, थोडा वेळ नखंही कुरतडून झाली. ट्रेकला निघालो असल्यामुळे जवळ पुस्तकही नव्हते. आणि सॅकमध्ये हेडफोन घ्यायला विसरलो होतो. माझ्या शेजारच्या माणसाच्या कानात केव्हाच हेडफोन शिरले होते. त्या पलिकडे एक विद्यार्थी वाटावा असा एक तरूण बसला होता. तो एक जाडजूड पुस्तक वाचण्यात दंग होता. "what is cood" की असं काही तरी टायटल असलेलं ते पान मी वाचलं आणि हे "dhood" आपल्याच्याने झेपायचं नाही असं मला लगेच कळलं! माझ्या मागे असलेल्या दुसर्या कंपार्टमेंटमध्ये अप्पर बर्थवर वेगळी परिस्थिती नव्हती. एकंदरीत बोगीमध्ये "बघण्यासारखं" कोणीही नव्हतं आणि मीही बघण्यासारखा नसल्यामुळे कोणी माझ्याकडेही बघत नव्हतं! एक कवी, गझलकार, ट्रेकर, संपादक आपल्याबरोबर प्रवास करतोय याची जाणीव त्या गर्दीला अजिबातच नव्हती! हल्लीच्या समाजात... जाऊद्या!
मी पुन्हा एकदा स्वतःची पोझिशन चेक करून घेतली. दोन्ही पाय समोरच्या बर्थच्या रॉडला टेकवले होते. कॅरीमॅटवर फक्त बूड टेकवले होते. दोन्ही हात मोकळे होते आणि त्या अवस्थेत आराम शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. त्या इतक्या बिकट गर्दीमध्ये जेव्हा "सामोसे - वीसचे पाच" ही आरोळी ऐकली तेव्हा मात्र मी धन्य झालो! दुसर्या टोकाकडून तो माणूस परत येताना तीच आरोळी "दहाचे तीन" अशी झाली! मग जसेजसे कल्याण जवळ येऊ लागले, तसा तो "दहाचे चार" वर आला. त्याच्या कडून मग कुणीतरी चार सामोसे घेतले. कल्याण प्लॅटफॉर्मात गाडी शिरताना तर "दहाचे सहा"! आणि इथे त्या चार सामोसे घेणार्याचा आणि माझा असे दोन चेहरे भिन्न कारणांमुळे पाहण्यासारखे झाले होते! माझे "जोशी"मन एकदम जागे झाले! पण एकट्याच्याने सहा सामोसे संपणार नसल्याने मी शेजारच्याला सामोसे खाणार का असे विचारून पाहिले. (खायच्यावेळी कसली ओळख? हक्काने खायचं!) पण तो बिचारा "अनोळख्या सहप्रवाशाने दिलेले खाद्यपदार्थ खाऊ नयेत" या विचारांचा पाईक असावा! तो नाही म्हणाला आणि जोशींनी आपणहून ऑफर केलेल्या खाण्याची दुर्मिळ संधी हुकवता झाला! समोरच्याचा उपास होता. मग मीही सामोसे घेण्याच्या विचारांचं 'कल्याण झालं' असं मानून गप्प बसलो.
कल्याण आले तेव्हा मागच्या कंपार्टमेंटमध्ये जरा इंटरेस्टींग गोष्टी घडल्या. कल्याणला शिरलेली भयंकर गर्दी हे त्याचे मुख्य कारण! आधीच चार माणसे बसलेल्या अप्परबर्थवर जेव्हा गर्दीतला एक जण बिंधास चढला तेव्हा मग काही तुरळक शाब्दिक चकमकी वगैरे गोष्टी गर्दीची घटकाभर करमणूक करून गेल्या. खरंतर गर्दीच एवढी होती, की कुणी भांडायच्याही मूडमध्ये नव्हते. कारण इंचभर जागेवर उभं राहण्यासाठी भांडण्यापेक्षा सरळ तिथेच लोटालोटी करून जागा घ्यावी हे अधिक प्रॅक्टीकल होतं. सर्वजण तेच करत होते.
माझ्या आसपासच्या बर्थवरील सर्वांच्या कानात वायरी होत्या आणि मी हातभर अंतरावर असलेल्या आणि मला जराही वारा न देणार्या पंख्यांचा आवाज ऐकत होतो. तेवढ्यात त्यापैकी एका पंख्यावर ठेवलेला बूट खाली पडला आणि माझ्या गुडघ्यावर टप्पा घेऊन खालच्या माणसाच्या मांडीवर विसावला. त्याची पहिली नजरही माझ्यावर नको म्हणून मी तेव्हाच माझे दोन्ही हंटर शूज लेस तपासायच्या बहाण्याने (स्वतःचा तोल सांभाळून) माझ्या हातात धरले.
"आज गाडी लई प्यॅक आहे!" - अखेर समोरच्या बर्थवरच्या माणसाला कंठ फुटला. मला स्वतःला डोक्यात कविता-बिविता सुचत नसतील तर अबोल प्रवास अजिबात आवडत नाहीत. कानात वायरी खूपसून गाणी ऐकत प्रवास करणार्यातला मी नाही! त्यापेक्षा शेजारच्या अनोळख्यांशी गप्पा मारण्यातही मजा येते. मग सह्याद्री एक्प्रेस आजच कशी भरलेली आहे, इतर गाड्यांच्या तुलनेत ही किती स्लो आणि अभागी गाडी आहे इ इ विषयांवर आमच्या गप्पा झाल्या. त्याच्या शेजारचा माणूसही थोड्या वेळाने त्यात सामील झाला. लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे जनरल डबे स्त्रियांनी प्रवास करण्याजोगे नसतात वगैरे सामाजिक मुद्द्यांवरही आम्ही आमची (अमूल्य) मते शेअर केली. तेवढ्यात विरूद्ध बाजूकडील वरच्या रॅकमधली एक बॅग घसरून खाली पडली. मग आम्ही "ट्रेनचे रूफ त्या रॅक्सवरतीही सपाटच असायला हवेत म्हणजे अजून ५-६ बॅगा बसतील" असा मुद्दा 'डिस्कस' केला. खंडाळा घाटातल्या बोगद्यांमध्ये दरवाजात उभे असलेल्यांनी लहान मुले जशी ओरडतात तशा किंकाळ्या मारल्यावर तर "पहिल्यांदाच बोगदा पाहिला असणार" या त्याच्या कॉमेंटच्या टोनवर सगळेच हसलो!
माझ्या सॅकचा कंबरेला सपोर्टसाठी असलेला बेल्ट खाली लोंबकळत होता. खालच्या बर्थवरील दोघींपैकी सुनेच्या हाताला अचानकच एक टाईमपास मिळाला होता. सॅक त्या जागी ठेवल्यापासून देवळातली घंटा हलवावी तसा तो बेल्ट ती हलवत बसली होती. गप्पांमध्ये एखादा भावनिक वगैरे मुद्दा निघाला की ती तो जोरात हलवायची. कधीकधी सासूला टाळी कशी द्यायची असं वाटत असल्यामुळे ती त्या बेल्टलाच टाळी द्यायची. कल्याणनंतर तिने तो एक-दोनदा निरखून, तपासून वगैरे पाहिला! कर्जतनंतर तिने तो बेल्ट हलवणे थांबवून घट्ट धरून ठेवला आणि घाटातल्या बोगद्यांमध्ये तर तिने गप्पांच्या नादात त्याला खालून गुंडाळायला सुरूवात केली. इथे मात्र मी सावध झालो. गुंडाळायला बेल्ट कमी पडतोय असं वाटून तिने जरा जरी जोर लावला असता तर ती १०-१२ किलोची सॅक खाली आली असती. तसंही एवढा वेळ त्या बेल्टशी तिची दोस्ती झाली होतीच! पण सुदैवाने तिने तसं काहीही केलं नाही!
कर्जतनंतर तर डब्यात एवढी गर्दी झाली होती की मी खाली उतरून चालत दरवाज्यापर्यंत जाण्याऐवजी त्यांच्या डोक्यावरून सरपटत गेलो असतो तरी सहज पोचलो असतो! सुदैवाने माझ्या खालच्या बर्थची खिडकी "emergency window" होती. लोणावळा स्टेशन त्याच बाजूला येणार होते. त्यामुळे दरवाजापेक्षा तिथूनही उतरण्याचा पर्याय होता. मी माझ्या समोरच्या माणसाला हे बोलून दाखवल्यावर तो जोक समजून हसलाही! खंडाळ्याच्या आधी दुसर्यांदा मी त्याला तोच विचार बोलून दाखवल्यावर मात्र तो शहाण्यासारखा, 'काही गरज नाहीये, दरवाजातूनच उतरा, आरामात पोचाल' असे बजावता झाला. खालच्या माणसाला 'खंडाळा आलं की सांगा, मग उतरायला घेतो' असं सांगितल्यावर तो "कराड? त्याला लई अवकाश आहे" असं म्हणाला. खंडाळा आणि कराड यांच्या उच्चारात काय साम्य आहे माहित नाही! पण काही का असेना, त्यानंतर तो बिचारा खिडकीशी नाक लावून खंडाळ्याकडे लक्ष ठेवून बसला होता.
अखेर, घड्याळात वेळ पाहून, "आतापासून उतरायला घेऊ तर लोणावळा येईपर्यंत दरवाजा गाठता येईल" असा विचार करून अखेर त्या अधांतरी आसनावरूनखाली उतरलो. पॅसेजमध्ये भयंकरच गर्दी होती. त्यात खंडाळ्याला काही माणसे चढली. इतक्यात माझ्या शेजारच्या एका बुटुकमूर्तीला उलटीचा फील आला! आणि तो जवळच्या खिडकीशी जायचे सोडून टॉयलेटच्या दिशेने निघाला! ते सर्व ढोंग असून उलटीपेक्षा त्या गर्दीतून लाक्षणिक कलटीचा तो प्रयत्न आहे हे उपस्थितांपैकी एकाच्या लक्षात आले आणि मग त्याच्या "झेपत नाही तर खातो कशाला" या त्याच्या अस्सल शालजोडीतल्या ठसक्यावर आजूबाजूला हशा पिकला!
तात्पर्य, दोन तास कसे गेले कळले नाही. प्रचंड गर्दी, उकाडा, एकाच स्थितीत उभे राहण्याची शिक्षा इ सर्व प्रतिकूल गोष्टी असूनही माणसे निवांत होती. एक-दोन कुरबुरी सोडल्या तर त्या परिस्थितीतही हास्य-विनोद सुरू होते, वर्तमानपत्रातली कोडी सोडवण्याची तयारी होती, खाणं सुरू होतं, गंभीर चेहर्यांसह गप्पाही सुरू होत्या. प्राप्त परिस्थितीला अशा दृष्टिकोनातून सामोरे जाण्याचे दृश्य खूप आनंद देऊन जाते. त्या गर्दीतून हिंदकाळत, ठेचकाळत माझा इवलासा जीव सांभाळत लोणावळ्याला स्टेशनच्या विरूद्ध बाजूला उतरलो तेव्हाही एका अस्ताव्यस्त, त्रासदायक पण तरीही अविस्मरणीय प्रवासाच्या आठवणी मनात रेंगाळत होत्या आणि मी ढाकच्या तितक्यात अविस्मरणीय ट्रेकसाठी रेड्डी झालो होतो...
- नचिकेत जोशी
पुढे ढाकबहिरी आणि
पुढे ढाकबहिरी आणि ट्रेकबहिरीचे प्रवासवर्णन असणार आहे का?
उत्सुकता लागली आहे.
गर्दीत मिसळला की माणूस त्या
गर्दीत मिसळला की माणूस त्या गर्दीचा होऊन जातो ह्याचा प्रत्यय देणारा अनुभव. अजून खुसखुशीतपणा आणता आला असता तर जास्त मजा आली असती.
मस्त लिहले....आनंद...छान
मस्त लिहले....आनंद...छान अनुभव
भारी लिहिलंय...
भारी लिहिलंय...
आंदू.. दोन - चार फोटो डकवायचे
आंदू.. दोन - चार फोटो डकवायचे की त्या गर्दीचे...
मस्त रे... अगदी डोळ्यासमोर
मस्त रे... अगदी डोळ्यासमोर उभे केलेस सगळे प्रसंग.
छान लिहिलंय!! अगदी डोळ्यासमोर
छान लिहिलंय!! अगदी डोळ्यासमोर आलं चित्र.
छान लिहीलं आहेस..!!
छान लिहीलं आहेस..!!
चांगलं लिहिलय नचिकेत. वर्णन
चांगलं लिहिलय नचिकेत.
वर्णन केलेल्यातलं बरंचसं डोळ्यासमोर उभं राहिलं.
“एकंदरीत बोगीमध्ये "बघण्यासारखं" कोणीही नव्हतं आणि मीही बघण्यासारखा नसल्यामुळे कोणी माझ्याकडेही बघत नव्हतं! एक कवी, गझलकार, ट्रेकर, संपादक आपल्याबरोबर प्रवास करतोय याची जाणीव त्या गर्दीला अजिबातच नव्हती! हल्लीच्या समाजात... जाऊद्या!”
हे अधिक आवडलं.
पुं. लं. च्या 'म्हैस' ची आठवण
पुं. लं. च्या 'म्हैस' ची आठवण झाली
आनंदा, प्रवासाची गोष्ट आवडली
आनंदा, प्रवासाची गोष्ट आवडली रे ट्रेक्सची सविस्तर वर्णन करण्यापेक्षा आता तू प्रव लिहित जा. बरा लिहितोस
सर्वांचे आभार! पुढे
सर्वांचे आभार!
पुढे ढाकबहिरी आणि ट्रेकबहिरीचे प्रवासवर्णन असणार आहे का?
आपली उत्सुकता लवकरच पूर्ण होईल...
अजून खुसखुशीतपणा आणता आला असता तर जास्त मजा आली असती.
शिकतोय...
आयडू, लगता है, अगले ट्रेकपे आपको लेके जाना पडेंगा!!!
आंदू.. दोन - चार फोटो डकवायचे की त्या गर्दीचे...
नेक्ष्ट टाईम!!
भारी लिहिलंय एक कवी,
भारी लिहिलंय
एक कवी, गझलकार, ट्रेकर, संपादक आपल्याबरोबर प्रवास करतोय याची जाणीव त्या गर्दीला अजिबातच नव्हती! हल्लीच्या समाजात... जाऊद्या!”>>
नचिकेत, धम्माल प्रवासवर्णन
नचिकेत, धम्माल प्रवासवर्णन लिहीलस!
तू खरोखर त्या मॅटवर असा अवघडून बसून प्रवास केलास? धन्य!!
बाकी,
एक कवी, गझलकार, ट्रेकर, संपादक आपल्याबरोबर प्रवास करतोय याची जाणीव त्या गर्दीला अजिबातच नव्हती! हल्लीच्या समाजात... जाऊद्या!”>> लई हसले... माफ कर रे त्या पामरांना
नचिकेत, लट्टू जमलाय लेख...
नचिकेत, लट्टू जमलाय लेख... त्या बाईचं पट्ट्याशी खेळणं... धमाल जमलय वर्णन.
आंदू.. दोन - चार फोटो डकवायचे
आंदू.. दोन - चार फोटो डकवायचे की त्या गर्दीचे...
नेक्ष्ट टाईम!! >>>>>> म्हणजे परत तु त्या 'हात दाखवा ट्रेन थांबवा' मध्ये जाणार तर
एक कवी, गझलकार, ट्रेकर, संपादक आपल्याबरोबर प्रवास करतोय याची जाणीव त्या गर्दीला अजिबातच नव्हती! हल्लीच्या समाजात... जाऊद्या! >>>:हाहा:
मजा आली वाचताना, तुला ही आली असेलच 'हात दाखवा ट्रेन थांबवा' मध्ये
नवीन प्रतिसादकांचे आभार!!
नवीन प्रतिसादकांचे आभार!!
दाद, धन्य जाहलो!
धम्माल जमलाय लेख
धम्माल जमलाय लेख
लेख आवडला हो जोशीबुवा!!
लेख आवडला हो जोशीबुवा!!
प्रयत्न करतोच आहेस लिहायचा तर
प्रयत्न करतोच आहेस लिहायचा तर वरच्या यादित प्रवसवर्णनकार पण अॅड कर
कविता, ठांकू!! शिल्पा, आरती
कविता, ठांकू!!
शिल्पा, आरती - बहुधा पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिलीत - मनापासून थँक्स!
छान जमलाय लेख. मजा आली.
छान जमलाय लेख. मजा आली.
फार छान लिहिले आहेस नचिकेत.
फार छान लिहिले आहेस नचिकेत. मज्जा आली.
आभार्स अनया, डॉक...
आभार्स अनया, डॉक...